॥ मुलखेडचा खंडोबा ॥

Submitted by अनिल तापकीर on 11 November, 2013 - 03:01

॥ ॐ मार्तंड भैरवाय नम:॥
मुलखेड, मुळशी तालुक्यातील मुळा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले एक सुंदर खेडे. सगळीकडे हिरवीगार शेती, पाठीमागे आणि डाव्या बाजूला डोंगररांग डोंगरातील घनदाट झाडी, आणि उजव्या बाजूने गावाला वळसा घालून बारामहीने वाहणारी मुळा नदी
नदीकाठी शंकराची दोन सुंदर प्राचीन मंदिरे , गावाच्या मध्यभागी विठ्ठल मंदिर आणि थोडे खालच्या बाजूला ग्रामदैवत भैरवनाथ तेही मंदिर पुरातन,
आणि गावाचा पाठीराखा खंडोबा वरती डोंगरावर बसून गावाचे रक्षण करतोय. साधारणता बाराशे ते पंधराशे फुट उंचीचा खंडोबाचा डोंगर आहे. दक्षिणेच्या बाजूने सरळ चढण आहे तो भाग सर्व खडकाचा असल्यामुळे थोडा वृक्ष विरहित आहे परंतु डोंगराचा उत्तर आणि पश्चिम भाग हे घनदाट झाडीने व्यापलेले आहेत.
खंडोबाचे मंदिर पुरातन आहे ते कोणत्या काळात बांधले गेले आहे हे कोणालाच माहित नाही. परंतु मंदिर खूप सुंदर आहे. आतमध्ये खंडोबा, म्हाळसाई मार्तंड भैरव आणि इतरही काही सुंदर मूर्ती आहेत व बाहेर कासव आणि एक पडकी दीपमाळ आहे. वरती चढून गेल्यावर थोडीशी दमछाक होती. परंतु एकदा तेथे पोहचले कि मंदिर आणि आजूबाजूचा परिसर पाहून सर्व शीण कुठच्या कुठे जातो. शिवाय थंड वाऱ्याने तहानही हरपल्या सारखी होते.
मुलखेड मध्ये खंडोबा, भैरवनाथ आणि शंकर हि एकाच देवाची तीन म्हणजे शंकराच्या अवताराची तिन्ही मंदिरे आहेत तीनही मंदिरे पुरातन आहे परंतु त्यांचा इतिहास कोणालाच माहिती नाही.
खंडोबा मंदिराची सेवा वंश परंपरेने गावाचे माजी पोलिस पाटील रघुनाथ नाना तापकीर ( पाटील) यांच्याकडे आहे. ते व त्यांची सर्व भाऊकी खंडोबाची सेवा करतातच परंतु सर्व गावही देवाच्या सर्व कार्यक्रमात भाग घेत असते. शिवाय घोटावडे गावाचे गुंडगळ बंधू हे हि देवाची मोठ्या भक्तिभावाने सेवा करतात.
खंडोबा देवाचे उत्सव चैत्र पोर्णिमा आणि नवरात्रीमध्ये साजरे होतात. चैत्र पौर्णिमेला पाटील घराणे एक खूप उंच गुढी (काठी ) सजवून वरती नेतात सर्व गावकरी भंडार खोबरे घेऊन वरती जातात. घोटावड्या गुंडगळ हेही काठी सजवून आणतात आणि शेकडो लोकांच्या उपस्थितीत भंडार खोबरे उधळून "येळकोट येळकोट जय मल्हार" चा गजर करतात.
नवरात्रीमध्ये नवही दिवस जागर होतो. वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
आता डोंगरावर जाण्यासाठी रघुनाथ तापकीर यांनी आणि काही भाविकांनी रस्ताही बनविला आहे. चारचाकी दुचाकी मंदिरापर्यंत नेता येते.
मुलखेडचा खंडोबा हे जागृत देवस्थान आहे. त्याची जो मनोभावे सेवा करतो त्याच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतात. नुकताच मंदिराची दुरुस्ती करण्यात आली आहे. समोर एक पत्र्याचे शेड बनविले आहे. रंगरंगोटी करून नवीन कळस बसविले आहेत.
कळस संदर्भात एक घटना नुकतीच घडली आहे. कळस बसविल्या नंतर काही दिवसातच ते चोरीला गेले. राक्षसी वृत्तीच्या चोरट्यांनी कळस चोरले खरे परंतु खंडेरायाने त्यांना काहीतरी अद्दल घडविली आणि त्यांनी काही दिवसातच चोरलेले कळस पुन्हा मंदिराजवळ आणून टाकले.
वरील घटना हि जेजुरी येथे काही वर्ष्यापुर्वी घडलेल्या घटनेची आठवण करून देते. मुलखेड गावातील वयोवृद्ध सांगतात कि आपल्या गावाचा खंडोबा हा जेजुरीचाच आहे.

संपूर्ण महारा ष्ट्र चे कुलदैवत खंडोबा देशातही इतर खूप ठिकाणी आहे त्याची हि माहिती
खंडोबाची खालील स्थाने आहेत.[१०]

अणदूर (नळदुर्ग) (उस्मानाबाद जिल्हा)
आदी मैलार (बीदर जिल्हा) (गुलबर्ग्याजवळ)
काळज (ता. फलटण)(सातारा जिल्हा)
जेजुरी (पुणे जिल्हा) (खंडोबा देवाचे मुख्य पीठ)
देवरगुड्डा (राणीबेन्नूर)
निमगाव दावडी (पुणे जिल्हा)
पाली (सातारा जिल्हा)
पिंपळगाव निपाणी ता. निफाड जि. नाशिक
मंगसुळी (बेळगाव जिल्हा)
माळेगाव (नांदेड जिल्हा)
मैलार लिंगप्पा (खानापूर, बेळगाव जिल्हा)
मैलारपूर (यादगीर) (बेळ्ळारी जिल्हा)
शेगुड (अहमदनगर जिल्हा)
सातारे (औरंगाबाद जिल्हा)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users