पुठ्ठा, सेलोटेप आणि ’पॅकर्स अँड मूव्हर्स’.

Submitted by ललिता-प्रीति on 13 November, 2008 - 06:44

नुकताच, नवऱ्याच्या नोकरीबदलामुळे, गेली अकरा वर्षं वास्तव्य असलेलं गाव सोडून नवीन गावी स्थलांतराचा योग आला. स्थलांतर आपल्या सोबत शंभर गोष्टी घेऊन येतं. त्यांत प्रथम स्थानावर विराजमान अर्थातच सामानाची बांधाबांध. सामानाची बांधाबांध आपल्या सोबत अजून डझनभर गोष्टी घेऊन येतं आणि त्यातली सर्वात अपरिहार्य कुठली असेल तर ती नवरा-बायकोची वादावादी! कुठल्या वस्तू फेकायच्या, कुठल्या ठेवायच्या, "कशाला इतका पसारा जमवून ठेवलाय", "वेळच्यावेळी आवरायला काय होतं", "मला काय तेवढं एकच काम असतं का घरात"... या प्रत्येक शीर्षकाखाली तात्विक मतभेदांवर(! ) आधारित अजून ढीगभर संवाद! पण यावेळी त्या डझनाच्या पटीतल्या सर्व गोष्टींना फाटा मिळणार होता कारण सामानाच्या बांधाबांधीला आम्ही प्रथमच ’पॅकर्स अँड मूव्हर्स’ना बोलवायचं ठरवलं होतं. (इथे सर्वात आधी हे स्पष्ट केलं पाहिजे की या संज्ञेचं मराठीकरण शक्य नाही. ’पॅकर्स अँड मूव्हर्स’ च्या जागी ’सामानाची बांधाबांध करणारे आणि सामान हलवणारे’ असं त्याचं भाषांतर केलं तर सगळी मजाच जाईल. शिवाय शीर्षकावरून लेख कशाबद्दलचा आहे ते ब्रह्मदेवाच्या बापालाही कळणार नाही. मध्यंतरी दुकानांवर मराठी पाट्या लावण्यावरून महाराष्ट्रात जेव्हा गदारोळ झाला होता तेव्हा वाचकांच्या पत्रव्यवहारात वाचलेलं एक पत्र मला आठवतंय. ’दुकानांवर मराठी भाषेतल्या पाट्या हव्यात की देवनागरी लिपीतल्या ते आधी आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट करावे’ असं त्या पत्रलेखकाचं म्हणणं होतं. तो मुद्दा मला मनोमन पटला होता. उदा. Shopper's Stop ची देवनागरी पाटी ’शॉपर्स स्टॉप’ अशी होईल मात्र मराठी भाषेतली पाटी ’खरेदी करणाऱ्यांचा थांबा’ अशी होईल. ) तर अश्या त्या (देवनागरी लिपीतल्या) ’पॅकर्स अँड मूव्हर्स’शी आमचा प्रथमच संबंध येणार होता.
’पॅकर्स अँड मूव्हर्स’ या जमातीबद्दल, त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीबद्दल नातेवाईकांकडून, मित्रमंडळींकडून अनेकदा ऐकलं होतं. तरीही, प्रत्यक्षात ते (देवनागरी लिपीत) पॅकिंग आणि मूव्हींग कसं करतात ते पहायची निदान मला तरी प्रचंड उत्सुकता होती. हे काम करणाऱ्या तीन-चार कंपन्यांशी आधी बोलणी केली. (गाव महाराष्ट्राबाहेरचं असल्यामुळे ही देवनागरी लिपीतली बोलणी मात्र हिंदी भाषेत होती! ) ही बोलणी साधीसुधी नसतात. प्रत्येकाकडचे Field Executive किंवा Field Officer असे आंग्लभाषिक पद धारण करणारे अधिकारी(! ) येऊन आधी पाहणी करून जातात. ते त्यांचं Field म्हणजे प्रत्यक्षात आपलं घर असतं आणि येणारा "माज्या मते धा-पंदरा खोकी व्हतील, दादानू" असा अंदाज बांधायला आलेला असतो. त्या माणसांना घरातल्या बारीक सारीक सामानाबद्दल माहिती द्यावी लागते. म्हणजे फ्रीज, टी. व्ही, वॉशिंग मशीन इ. मोठ्या वस्तू आहेत (अथवा नाहीत... अर्थात, ही शक्यता आजकाल फारच कमी असते म्हणा! ) हे आपण न सांगताही बघणाऱ्याला लगेच कळतं पण स्वयंपाकघरात किती भांडी आहेत, काचसामान किती आहे, कपाटात किती कपडे आहेत हे सुद्धा त्यांना सांगावं अथवा दाखवावं लागतं. एक वेळ बाहेरची खोली, स्वयंपाकघरापर्यंत ठीक आहे पण कपड्यांचं कपाट पण सताड उघडून त्यांना दाखवायचं? हे म्हणजे फारच झालं! आधीच पेपरवाला, कुरियरवाल्यापासून दाराशी येणाऱ्या प्रत्येक अनोळखी व्यक्तीशी दाराच्या फटीतून बोलणारी मी, त्या परक्या माणसांना घराच्या सगळ्या खोल्यांतून फिरवून सामानाची माहिती देताना मला फारच विचित्र वाटत होतं. माझ्याच घरातल्या लहानमोठ्या वस्तूंचा अश्या प्रकारचा आढावा मी स्वतःसुद्धा कधी घेतलेला नव्हता. आढावा वगैरे करायचाय काय? घरं बदलायची वेळ आली की औषधांच्या दुकानातून मोठी रिकामी खोकी आणायची आणि दणादण त्यात वस्तू भरत सुटायचं हीच इतक्या वर्षांची सवय. सगळ्या वस्तू कोंबून त्या खोक्यांची तोंडं सेलोटेपने बंद केली की माझ्या नवऱ्याच्या चेहेऱ्यावर कसं कर्तव्यपूर्तीचं समाधान झळकायचं! (सेलोटेप या संज्ञेचंही मराठीकरण शक्य नाही. ’सेलोटेप’ या शब्दाच्या जागी ’चिकटपट्टी’ हा शब्द टाकून बघा ती मजा येते का. ) आणि भरपूर ’तात्विक मतभेद’ होऊनसुद्धा नंतर असं समाधान जोडीदाराच्या चेहेऱ्यावर पाहणं या व्यतिरिक्त संसारात दुसरं काय हवं! भांडी-कुंडी, कपडे-लत्ते हे सगळं निमित्तमात्र! जितकी जास्त खोकी, तितका जास्त सेलोटेप आणि तितकंच जास्त नवऱ्याच्या चेहेऱ्यावरचं समाधान - हे सूत्र मनाशी पक्कं बांधून मी घरात भरपूर सामान वाढवून ठेवलं होतं आणि नवरा नव्या नोकरीच्या जागी लगेच निघून गेल्यामुळे ते भरपूर सामान बांधायच्या कामासाठी आता या लोकांवर अवलंबून राहावं लागणार होतं. तीन-चार जणांशी बोलणी केल्यानंतर मध्यमवर्गीय स्वभावधर्माला अनुसरून ज्यांनी सर्वात कमी पैसे मागितले त्यांच्याकडे हे काम सोपवलं. बचतीसारखा दुसरा मार्ग नाही! (.... घरात सामान वाढवताना बचतीचा विचारही मनाला शिवला नव्हता!! )

... आणि तो दिवस उजाडला. तसा माझा आधीचा आठवडा हे टाक, ते टाक, जुने कपडे, भांडीकुंडी बोहारणीला दे, रद्दी आवर यात गेलाच होता. तरीही खास पॅकर्स अँड मूव्हर्सच्या आगमनापूर्वी आपण घरात काय-काय तयारी करायची असते याची काही कल्पना नव्हती. आपल्या स्वतःच्याच घरातल्या सामानाची बांधाबांध चालू असताना आपण निवांत एका बाजूला बसून रहायचं (आणि त्या निवांतपणासाठी पाच आकडी रक्कम मोजायची) ही कल्पनाच मला जगावेगळी वाटत होती आणि म्हणूनच येणाऱ्या त्या नव्या, अभिनव पाहुण्यांची मी सकाळपासूनच आतुरतेनं वाट पाहत होते.
साडेआठची वेळ देऊन, साडेनऊनंतर उगवून, ’पॉंच आदमी आएंगे’ असं सांगून प्रत्यक्षात तिघांनीच हजेरी लावून त्यानंतरचे दहा-बारा तास त्या लोकांनी घरात जो काही पसारा घातला त्याला तोड नव्हती. येताना त्यांनी एक प्लॅस्टिकचं आणि एक पातळ पुठ्ठ्याचं भलंथोरलं भेंडोळं आणलं होतं आणि सोबत सेलोटेपची असंख्य चाकं. त्या पुठ्ठ्याच्या भेंडोळ्यात घरातलं सामानाच काय घरात राहणारी सगळी माणसंही व्यवस्थित ’पॅक’ झाली असती.
पुठ्ठ्याचे लहान-मोठे तुकडे फाडून त्यांतले दोघं समोर दिसेल ती वस्तू त्यांत गुंडाळत सुटले. भरपूर पुठ्ठा गुंडाळून त्या वस्तूचा आकार दुप्पट करायचा आणि सेलोटेपच्या अगणित वेटोळ्यांत त्या वस्तूला गाडून टाकायचं हाच एक कलमी कार्यक्रम होता त्यांचा. तिसऱ्यानं त्या सगळ्या वस्तू खोक्यांत भरायला सुरूवात केली. नजरेच्या टप्प्यातल्या एकाही निर्जीव वस्तूला त्यांनी सोडलं नाही. दारापाशीच मी जुनी रद्दी काढून ठेवली होती. त्यांनी ती रद्दी पण एका खोक्यात तळाशी ’नीट’ ठेवली. "अरे बाबांनो, ती रद्दी आहे, ती नका भरू त्यात" असं मला सांगावं लागलं त्यांना. डोकंबिकं वापरून काम करायच्या पलिकडचं प्रकरण होतं हे! पण कदाचित डोकं न वापरता, झापडं लावून केल्यामुळेच ते काम दहा-बारा तासांत उरकलं बहुतेक! बाहेरच्या खोलीतल्या छोट्या वस्तू सेलोटेप-नशीन झाल्यानंतर त्यांनी सोफा, खुर्च्या अश्या मोठ्या वस्तूंकडे आपला मोहोरा वळवला. पुठ्ठ्यात गुंडाळलेल्या सोफ्याच्या दोन्ही बाजूला बसून दोघांनी ’कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या’च्या चालीवर सेलोटेपचं एक आख्खं चाक मोकळं केलं आणि सोफा लिंपून टाकला. एक-एक करत घरातल्या वस्तू म्हणजे जणू ’पुठ्याआडची सृष्टी’ बनायला सुरूवात झाली... आणि अश्या प्रकारे रात्री बाराच्या सुमाराला जेव्हा सगळं सामान त्यांच्या ट्रकमध्ये चढवण्यात आलं तेव्हा खोक्यांची संख्या साठ भरली!

दुसऱ्या दिवशी नवीन गावी, नवीन जागी सगळं सामान उतरवण्यात आलं. काही खोकी लगेच उघडणं गरजेचं होतं. त्या लोकांनी प्रत्येक खोक्यावर त्याच्या आत काय असेल ते एक-दोन शब्दात चक्क लिहून ठेवलं होतं. हवी असलेली चार-पाच खोकी आम्ही लगेच उघडली खरी पण आतली पुठ्ठ्याची वेगवेगळी पुडकी नुसती पाहून प्रत्यक्षात त्याच्या आत कुठली वस्तू असेल याचा अंदाज बांधणं केवळ अशक्य होतं. मोठ्या बरणीच्या आकाराचं एक पुडकं सेलोटेपचा अपसव्य करून उघडलं तर तो पाणी प्यायचा काचेचा पेला निघाला! एका पुडक्यात एक जाडजूड पुस्तक असेल अश्या अपेक्षेनं ते टरकावलं तर आत दोन लहान कॅसेटस मिळाल्या! आमचा एक मित्र याचं एकदम सहीसही वर्णन करायचा. तो म्हणायचा - हे लोक साध्या खुर्चीचं सिंहासन करतात आणि दुचाकी वाहनाची रिक्षा!!

निरनिराळ्या खोक्यांतून हव्या असलेल्या वस्तू शोधण्यात पुढचे चार-पाच दिवस गेले. आपल्या स्वयंपाकघरात तीन खोकी भरून भांडी आहेत हे मला त्यानंतर कळलं, साडेपाच-सहा फुटी तीन देह झाकायला चार खोकी भरून कपडे लागतात हे ही तेव्हाच समजलं.

आता या गोष्टीला दोन-तीन महिने उलटून गेले. लाकडी वस्तूंवरचे सेलोटेपचे चिकट डाग काढायचा मी आजही नेटाने प्रयत्न करते आहे. अजूनही छोट्याछोट्या बारा-पंधरा वस्तू तश्याच पुठ्ठा आणि सेलोटेपच्या पांघरुणात पडून आहेत आणि दोन-तीन महिन्यांनंतरही त्या वस्तूंविना आमचं काही काम अडल्याचं माझ्या तरी स्मरणात नाही!

----------------------------------------

('स्त्री' मासिकाच्या जानेवारी-२०११च्या अंकात हा लेख प्रकाशित झाला.)

गुलमोहर: 

मोठ्या बरणीच्या आकाराचं एक पुडकं सेलोटेपचा अपसव्य करून उघडलं तर तो पाणी प्यायचा काचेचा पेला निघाला! एका पुडक्यात एक जाडजूड पुस्तक असेल अश्या अपेक्षेनं ते टरकावलं तर आत दोन लहान कॅसेटस मिळाल्या! <<<<<<<<<<<

हे जबरीच!
मस्त लिहिता तुम्ही. अजून येऊदे. Happy

सही लिहिलय! आवडलं!

हे लोक साध्या खुर्चीचं सिंहासन करतात आणि दुचाकी वाहनाची रिक्षा>>>>> Lol
मस्त लिहिलय.

छान लिहीलय. आवडलं.

मस्त. Happy

>>त्या पुठ्ठ्याच्या भेंडोळ्यात घरातलं सामानाच काय घरात राहणारी सगळी माणसंही व्यवस्थित ’पॅक’ झाली असती. Lol

फार छान! मस्त लिहिलंय
मोठ्ठाच उपदव्याप करतात म्हणजे हे मूव्हर्स!

मस्त लिहिलंय. भारतात प्रोफेशनल मुव्हिंग कसं केलं जातं ह्याचा अंदाज आला. ह्यावर माझे मुव्हिंगचे थोडे अनुभव लिहावेसे वाटायला लागलंय पण ते माझ्या पानावर.

छान लिहिलंय. Happy

छान लिहिलंय Happy
अजूनही छोट्याछोट्या बारा-पंधरा वस्तू तश्याच पुठ्ठा आणि सेलोटेपच्या पांघरुणात पडून आहेत आणि दोन-तीन महिन्यांनंतरही त्या वस्तूंविना आमचं काही काम अडल्याचं माझ्या तरी स्मरणात नाही!
>>>>
मला हे सगळ्यात आवडलं Biggrin

वा.. सही लिहीता तुम्ही!! चप्पल नंतर हे ही आवडलं!
सगळीच वाक्य खुसखुशित झाली आहेत!
पण मला, गोविंद घ्या गोपाळ घ्या लई लई आवडलं!! Lol :)))))

मस्त लिहिलय.. Happy

फक्त सुरुवातीला ती मराठीकरणा बद्दलची explanations (उदा. Shopper's Stop ची देवनागरी पाटी ’शॉपर्स स्टॉप’ अशी होईल मात्र मराठी भाषेतली पाटी ’खरेदी करणाऱ्यांचा थांबा’ अशी होईल) नसती तरी चाललं असतं... उगीच भरकटायला झालं मला त्यामुळे..

मस्त लिहिलंय.... आवडलेलं आहे... Happy

छान लिहिलय. आवडलं ........ Happy

~~~~~~~~~~~~~~
देवाचिये द्वारी, उभा क्षणभरी

नाही, नाही! भारतात प्रोफेशनल मुव्हिंग प्रोफेशनलीच केलं जातं, यात वाद नाही. मी फक्त विनोदी दृष्टीकोनातून त्याकडे बघायचा प्रयत्न केला आहे.
अर्थात, तुम्ही तुमचे अनुभव जरूर लिहा. त्या लेखनाला शुभेच्छा.

एडिएम ला अनुमोदन!
बाकी छानच लिहिलय! Happy
(फक्त ते मराठी/देवनागरी करणाचा उल्लेख म्हणजे वरणभाताच्या घासात खडा लागावा किन्वा माशाचा काटा नरड्यात अडकावा अस वाटल! )
...;
आपला, लिम्बुटिम्बु

बापरे मला वाटलं आही सेलोटेपनी नवर्‍याचे तोंड बंद करणार काय ह्या ताई Happy

ललिता, अप्रतिम लिहिलसं गं! सर्व विनोद कसे संसारीक झाले आहेत. नविन घरात तुला आणि तुझ्या कुटुंबियांना सुखसंपन्नता लाभो!

छान खुसखुशीत लिहिलय.. अडमला अनुमोदन..

संपूर्ण लेखात विनोदनिर्मिती ही प्रसंगातून उभी झाली आहे.. फक्त त्या मराठीकरण वाक्यात विनोदासाठी विनोद असा प्रकार झाला आहे.. म्हणुन लिंबुने म्हटल्याप्रमाणे ती वाक्य वेगळी वाटताहेत..

ए मस्त गं Happy मला पण आमचा अनुभव आठवला. पण आमचा अनुभव खूपच चांगला होता. एकाही वस्तूवर साधा ओरखडाही आला नव्हता Happy

धमाल अनुभव...

>>>>> ’दुकानांवर मराठी भाषेतल्या पाट्या हव्यात की देवनागरी लिपीतल्या ते आधी आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट करावे’ असं त्या पत्रलेखकाचं म्हणणं होतं.

बर झाल बाई, "त्या पत्रलेखकाच म्हणण होत" अस सान्गुन टाकलेत ते! Proud
पण आता त्याला कुठे शोधत जाऊ? इथेच लिहितो झाल!
काय हे ना? की कोणतीही भाषा ही "बोलीभाषा" अस्ते म्हणजे बोलताना सन्वादाकरता वापरायची भाषा
जेव्हा हीच भाषा लिहावी अशी गरज भासते, तेव्हा तेव्हा, त्या त्या पुराणकाळात, त्या त्या भाषेची जोपासना करणार्‍यान्नी, त्या भाषेस एखादी लिपी बनवुन दिलेली/ठरवलेली अस्ते! जसे की मराठी भाषेला देवनागरी लिपी! (तशी ती सन्स्कृत व हिन्दीलाही वापरली जाते, सन्स्कृतमधे सम्पुर्ण रूपात तर बाकी दोन भाषात गरजेप्रमाणे! तसेच जगातील [की साऊथ अमेरिका/आफ्रिका खन्डातील?] अनेक भाषान्ना त्यात्या काळात गरजच न पडल्याने ठरवुन दिलेल्या लिप्याच नाहीत हेही एक सत्यच, अन तस म्हणल तर आता प्राण्यान्च्या देखिल भाषा अस्तात, लिप्या थोडीच अस्तात सगळ्यान्च्या? अन असल्या तरी कोणत्या स्वरुपात? डिस्कव्हरीत दाखवतात तशी जन्गलातली झाड की रस्त्यावरचे खाम्ब? Lol तेव्हा लिपी हा दुय्यम व अध्यार्‍हुत भाग ठरतो भाषेचा!)
सर्वसाधारणतः जगात प्रत्येक भाषेच्या ठरलेल्या लिप्या "त्रिकालाबाधित" अस्तात, म्हणजे त्यात सहजासहजी बदल होत नाही, अर्थात स्थलकालपरत्वे, राजकीय/परकीय आक्रमणान्च्या दृष्टीने इतिहासात अपवाद सापडतातच, (जसे की मुघल अम्मलात फारसी (ही लिपीच आहे ना हो??? चु.भु.द्या.घ्या), वा नन्तर मोडीचा लिपी म्हणून वापर, तसेच स्वातन्त्र्याच्या अगदी आगेमागे हिन्दुस्थानी भाषान्करता रोमन लिपीच्या सक्तीची मागणी, इत्यादी) पण तरीही अलिखित नियमानुसार एखाद्या भाषेचा उल्लेख केला अस्ता लिहिण्यास त्याभाषेची ठराविक लिपीच नजरेसमोर अस्ते! त्यादृष्टीने, भाषा असे म्हणल्यावर तिची ठरलेली लिपी गृहितच अस्ते! अर्थात, मराठीतून पाट्या हव्यात म्हणल्यावर अजुन वेगळे, "देवनागरीत"असे सान्गायची काहीही गरज नस्ते! हे म्हणजे पिवळा पिताम्बर किन्वा गाईचे गोमुत्र म्हणण्यासारखे झाले, तसेच त्यात्या भाषेतल्या शब्दान्च्या अर्थाचे भाषान्तरही अपेक्षित नस्ते! पण बोलूनचालून वेड पान्घरून पेडगावला जाऊ इच्छीणार्‍या असल्या लेखकान्ना काय हो? कुठूनतरी टीआरपी वाढण्याशी मतलब! Happy
जाऊद्या, तुम्ही काय अन मी काय, आपण मनाला लावून नको घेऊयात!

(त्यात काय हे ना की आज पोर्णिमा हे, बहुतेक इस्पेशल लोकान्प्रमाणे माझाही "सटकायचा" दिवस! तेव्हा मी कलटी मारतो कशी!) Happy

तुमचा लेख खुपच छान उतरला हे! Happy
...;
आपला, लिम्बुटिम्बु

छान लेख,एकदम आवडला,गेल्या वेळेच्या माझ्या स्थलांतरात मुवर्स-पॅकर्स वापरायचा मोह टाळला होता.पुन्हा वेळ येईल तेव्हा नक्कीच तुमचा लेख आठवेल.
*************************************************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

पटलं एकदम.
गेल्या महिन्यातच मी कुर्ला येथुन खारघरला शिफ्ट झालो. तेव्हा सौं.चं चाललं होतं " पॅकर्स......" ना बोलवायचं. मी पैसे वाचवण्याला प्राधान्य दिलं. आता तुमचा लेखच तिला वाचायला देतो. धन्यवाद.

बाकी नेहेमीप्रमाणेच तुमची लेखन शैली छानच आणि पुढे काय याची उत्सुकता वाढवणारी.

विशाल कुलकर्णी.
नवी मुंबई.

मस्तच लिहिता तुम्हि. आता आम्ही नवीन घरात ३ डीसेम्बर ला रहायला जाणार आहोत. बान्धा बान्ध आम्हिच म्हण्जे मीच करीन (नेहेमी प्रमाणे नवर्याला भयानक काम असेल). फक्त हलवा हलवी ला मूवर्स बोलवु.

सही आहे! शेवटचे वाक्य आवडले Happy

प्रिती, मस्त खुसखुशीत लिहिलं आहेस. मी नुकतीच ह्या अनुभवातून गेले आहे, त्यामुळे तू लिहिलेलं सगळं डोळ्यासमोर लखलखीतपणे उभं राहिलं. Happy

अजूनही छोट्याछोट्या बारा-पंधरा वस्तू तश्याच पुठ्ठा आणि सेलोटेपच्या पांघरुणात पडून आहेत आणि दोन-तीन महिन्यांनंतरही त्या वस्तूंविना आमचं काही काम अडल्याचं माझ्या तरी स्मरणात नाही!

अश्या कित्येक वस्तू आमच्या घरात बर्‍याच वर्षांपासून 'पडून' आहेत आणि त्या वाचून आमचं काहीही अडलेलं नाही. Lol
---------------------------------------------
उपास-तपासाच्या मी विरोधात आहे, पण 'फराळाच्या' नाही.... Happy

Pages