वास्तू....... म्हणे.... तथास्तू......!!!

Submitted by kalpana_053 on 2 November, 2008 - 08:21

मुलाला झोपेसाठी थोपटताना स्वराच्या मनांतील विचारही तसेच त्याचबरोबर हिंदोळू लागले. अखेर वास्तूचे सातत्याने मनांत उमलणारे दिवास्वप्न 'स्वप्न'च रहाणार की काय? या विचाराने नाराज झालेली स्वरा अजूनच उदासली. मुलाला काँटवर ठेवून, आवाजाच्या प्रदूषणापासून मुलाच्या झोपेचे रक्षण करण्यासाठी खोलीची दारे, खिडक्या तिने दडपून टाकल्या. मात्र विचारांना काही दडपता येत नव्हते. हाँल, किचन, बेडरूम अशा एकमेव सर्वांनी युक्त खोलीकडे तिने उदासपणे कटाक्ष टाकला. मोठ्या घराचे.... किमान एक बेडरूमच्या घराचे स्वप्न तुटपुंज्या उत्पन्नात कसे पूर्ण होणार? याची काळजी वरचेवर जास्तच वृध्दिंगत होत होती. मनांत खूप असूनही सासू-सासर्‍यांना गांवाकडून शहरात आणता येत नव्हते..... दोन्हीकडील खर्च भागवता भागवता दमछाक होत होती..... एकमेव खोलीचा उपयोग हाल, डायनिंग, परंतु आता बाळ झाल्यापासून मात्र मोठ्या जागेची उणीव फारच जाणवत होती. पैशाचे सोंग आणता येत नाही.... ही जाणीव अधिकच भांबाऊन सोडत होती. कुठं जावं? काय करावं? म्हणजे मोठ्या जागेची समस्या दूर होईल....? पैशांची जमवाजमव कशी होईल? तिला मार्गच दिसत नव्हता. 'आपणच गांवाकडे जावून रहावे' हा विचार अनेकवेळा मनांत आला तरी नवर्‍यापासून दूर रहायला मन परवानगी देत नव्हते..... सतत आडवणूक करणार्‍या ह्या विचाराना चुचकारत ती झोपी गेलेल्या बाळास जोरजोराने थोपटू लागली. समोरच्या खिडकीतल्या काचेतून येणारी दुपारची सूर्याची तिरपी किरणे तिच्यावर व बाळावर चाल करून आल्यासारखी येऊन शरीराबरोबरच तिच्या मनालाही शेक देऊ लागली. उसळणार्‍या समुद्रात दमछाक झालेले एखादे माणूस केवळ योगायोगानेच तीराला लागावे अशी तिची नजर अचानक शेजारीच पडलेल्या वृत्रपत्रामधील जाहिरातीवर गेली. "एक बेडरुमचा फ्लँट..... किंमत नाममात्र..... पत्ता......!" अशा स्वरुपाची ती जाहिरात होती. बर्‍यापैकी गांवातच असणार्‍या या फ्लँट्ची किंमत मात्र 'नाममात्र' असे कां लिहले असावे? या विचाराने तिला घेरले. झोपलेल्या बाळाला कॉटवर टाकून तिने त्याला पांघरले. लगेचच तो उठायची शक्यता नसल्याने दार लोटून समोरच्या दुकानात वृत्रपत्र घेऊन ती फोन करायला गेली. जाहिरातीतील नंबर फिरवून ती अपेक्षेच्या उत्तराच्या दानाची प्रतिक्षा करू लागली.
हॅलो, आज आपली फ्लॅट संदर्भात जाहिरात आहे नं.....! त्याविषयी माहिती हवी होती..... विशेषतः आपण जे किंमत 'नाममात्र' असे लिहलेय त्याविषयी....." तिने एका दमात सर्व बोलून टाकले.
"हो..... ५५० स्वे. फूट्चा फ्लॅट आहे. पत्ता......! किंमत नाममात्र ५०,०००रु.! कायदेशीर बाबींचा खर्च घेणार्‍याने करायचा हे आधीच स्पष्ट सांगतो..... अजून एक महत्वाची गोष्ट..... आपण आत्मा.... भूतखेत वगैरे गोष्टींवर विश्वास ठेवून घाबरत असाल तर न आलेलेच बरे.....! कारण या जागेमध्ये यापूर्वी माझे वडिल एकटेच रहात होते.... पण अत्यंत दीर्घ..... कंटाळवाण्या आजारपणाला व एकटेपणाला कंटाळून त्यांनी एक महिन्यांपूर्वी एथेच आत्महत्या करून घेतली. त्यामुळे आजूबाजूचे कुणीही इकडे फिरकत नाहीत..... आणि त्यामुळेच खरंतर या फ्लॅटची किंमत नाममात्र आहे. मला या फ्लॅटला 'हसतं-खेळतं' ठेवायचं आहे...... त्यामध्ये वास करणार्‍या माझ्या वडिलांच्या आत्म्याला शांती मिळावी हिच इच्छा आहे...... खरंतर मी, पत्नी-मुलासहीत इथे रहायला यावे अशी माझ्या वडिलांची फार इच्छा होती. परंतु पत्नीने ती कधीच मान्य केली नाही...... त्यामुळे माझाही नाईलाज झाला. वृध्दाश्रमाची कल्पना त्यांना कधी पेलवली नाही..... आणि शेवटी असा हा त्यांचा दुर्दैवी मृत्यु झाला. तुम्ही अंधश्रध्दाळू नसाल तर फ्लॅट पहायला फोन करून केव्हाही येऊ शकता......" असं म्हणून पलिकडून फोन ठेवलाही गेला.
स्वराला एका बाजूने खूप आनंद व एका बाजूने थोडे भयही वाटून गेले..... हातातील रिसिव्हर ठेऊन दुकानाच्या काऊंटरचा आधार घेत उभ्याउभ्यानेच तिचे शरीर थोडे विसावले. एखाद्या झाडात अडकलेल्या पतंगाप्रमाणे तिचं अस्वस्थ मन विचारांच्या अंतराळात तशाच वेड्यावाकड्या गिरक्या घेत राहिलं. आत्महत्या केलेला अपरिचित देहातील आत्मा....! आपल्याला त्याच्या वास्तूत शांतपणे..... सुखाने राहू देइल कां? पण मुळात आत्मा असतोच कां? हा अतृप्त आत्मा आपल्याला कशाला त्रास देईल? कशाचा आत्मा अन काय....! सब झूट आहे..... घराला नवा रंग देऊ..... एक पूजा घालू..... फार तर दरवर्षी त्या आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे श्राध्दही घालू...... अशा अगणित शेंडाबुडखा नसलेल्या विचारांनी स्वरा हैराण झाली. तिला वाटले, आत्मा, भूतखेत सर्व माणसांनीच स्वतःच्या मतलबासाठी तयार केलेले शब्द..... या शब्दांना अस्तित्वही मानवानेच दिलेले..... अचाट मेंदूच्या कल्पनेतून व स्व्तःच्या फयद्यानुसार, कुवतीनुसार कल्पनाकृती करून स्वतःची फक्त कायम सोय पाहणारी मानवजात..... खरंतर सूक्ष्म पेशींपासून प्राण्यातील जीवसृष्टीतील आत्मे असे अंतराळात वास्तव्य करत राहिले तर हे विश्व त्यानेच व्यापून जाईल..... त्यामुळे आत्मा हा शब्दच मुळी वांझोटा...... खरंतर प्राणशक्ती संपल्यावर कशाचा आत्मा अन् काय? "मरेपर्यंत स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडा" या पलिकडे काहीच सत्य नाही....! विचारांच्या वेगाने धाप लागल्यासारखी होऊन तिने दोन-तीन दीर्घ नि:श्वास टाकले..... हळूहळू मग मात्र एका निश्चयाप्रत तिचे मन वळू लागले. ढगाळलेल्या आभाळात मधेच एखादी चांदणी अस्फुटपणे चमकून जावी तशी या "वास्तूची आशेची पालवी" स्वराच्या डोळ्यांसमोर चमकत राहिली..... आणि आशाळभूत अशा तिच्या मनाला ही वास्तू म्हणजेच आपली 'भाग्यतारका' आहे असे वाटू लागले..... तिच्या मनांत विचार आला, काय नशिब आहे..... आपल्याला आपल्या सासू-सासर्‍यांना जवळ घेऊन राहण्यासाठी मोठी जागा हवी आहे..... अन् या वास्तूच्या मालाकाचीही तशीच इच्छा होती..... पण त्यांच्या मुलाने ती पूर्ण केली नाही.... आपल्याकडून ती नकळत पूर्ण होतेय...... विचारांना एक अमर्याद वेग येऊन 'न बघितलेली अत्यल्प किंमतीची वास्तू' तिच्या मनांत फेर धरून अत्यंत द्रुत लयीत नाचू लागली. न बघितलेल्या त्या वास्तूमधून तिचे मन अनेकवेळा आतबाहेर घिरट्या घालून आले. त्या धुंदीत ती असतानाच दारावरची बेल वाजली. नखशिखांत न बघितलेल्या वास्तूची धुंदी चढलेल्या तंद्रीतून ती जागी झाली. नवर्‍याला एका दमात सर्व गोष्टी सांगून टाकल्या. तोही फार अंधश्रध्दाळू नव्हता. तो फ्लॅट बघण्यास लगेचच तयार झाला. त्यालाही आपल्या आई-वडिलांना घरी आणण्याची घाई झाली होती...... काहीही वेळ न दवडता बाळाल कडेवर घेऊन ती दोघे फोन करून फ्लॅट बघण्यास गेली. एखाद्या चाणाक्ष, प्रेमळ, हुशार गृहिणीने जीवापलिकडे जोपासलेला संसार त्या वास्तूमधून जीवंत दर्शन घडवत होता. सुंदर..... दिसताक्षणी मनाला भुरळ घालणारी अशी ती छोटेखानी वास्तू पाहून ती दोघेही सुखावली. फ्लॅटमधील गेलेल्या व्यक्तीचा व त्याच्या बायकोचा फोटो पाहून स्वराचे हात नकळत नमस्कारासाठी जोडले गेले.... झुकलेल्या पापण्यांमधून स्वरा आपल्या वास्तूपूर्तीचे स्वप्न साकारताना पहात होती... वास्तूमधून फिरताना एक अनामिक सुखाची झुळूक दोघांच्याही शरीरामधून गेली. किरकोळ असलेल्या अटी मान्य करून लवकरच फ्लटचे खरेदीखत करून टाकू असे जाहिरात देणार्‍या व्यक्तीशी बोलणे करून दोघे आनंदाने घरी परतली.
'आत्महत्या केलेल्या व्यक्तीचा फ्लॅट असल्याने त्याला गिर्‍हाईकही फारसे मिळत नव्हते.... मिळाले तर ते ऑफिस वगैरेसाठी मिळत होते..... ते तर त्या व्यक्तीलाही नको होते.... जीवंतपणी नाही निदान मरणानंतर तरी वडिलांची शेवटची इच्छा पूर्ण करावी या विचाराने 'या' कुटुंबास फ्लॅट देण्याचे त्या व्यक्तीने ठरवले होते.... स्वतःच्या वडिलांच्या वास्तूत ती व्यक्ती रहाण्यासाठी धजावत नव्हती...... वडिलांच्या जीवंतपणी त्यांचा धाक वाटला नव्हता..... भीती वाटली नव्हती..... पण मरणानंतर त्यांच्या आत्म्याने मात्र ते काम चोख बजावले होते. त्यामुळे वडिलांची अतृप्त इच्छा मात्र ती व्यक्ती पूर्ण करण्याचा निष्फळ प्रयत्नात होती..... अनोळखी आत्म्यास न घाबरता स्वरा व तिच्या नवर्‍यानेही वास्तूत आनंदाने रहाण्याची तयारी दर्शवल्याने त्या व्यक्तीच्या मनांवरील खूपसा ताण कमी झाला होता...... कारण आधुनिकपणाच्या मोठमोठ्या गप्पा मारणार्‍या दुनियेत त्याला "अंधश्रध्देचंच" पीक फोफावलेलं दिसून येत होतं...... आत्महत्या केलेल्या मृत आत्म्याचा धसका घेणारेच जास्त दिसून येत होते.......! आणि मनांत विचार येत होता......"खरंतर आपण तरी काय? जिवंतपणी कधी वडिलांकडे लक्ष दिले नाही..... आणि आता मात्र त्यांच्या "आत्म्या"चा हा असा धसका....?????" आपणही त्यातलेच आहोत ही भावनाही त्या व्यक्तीचे मन कुरतडत होती......
सासू-सासर्‍यांना जवळ ठेऊन त्यांच्या सहवासाचा आनंद मिळणार म्हणून स्वरा अन तिचा नवरा सुखावले होते.....! "आई-वडिलांना संभाळणार्‍या कुटुंबास" आपली वास्तू मिळणार हे पाहून त्या घरातील आत्महत्या केलेल्या व्यक्तीचा अतृप्त आत्मा मनाला चिरंतन शांती मिळून......... आनंदाने.......... मुक्तपणे...... अन स्वच्छंदीपणाने स्वतःच्या मुलाच्या घरी अदृश्यपणे....... कायमस्वरूपी वास्तव्यास जाण्यासाठी अधीर झाला होता......!! केविलवाणी वास्तू "तथास्तू...." म्हणून फक्त आशिर्वाद देत होती......

गुलमोहर: 

खूप छान लिहिलं आहेस. अगदी मोठ्या प्रश्नाला सहज हात घातला आहेस. सॉरी, तुझा लेख वाचायचा राहुन गेला होता खरंतर. थँक्स! स्वराचं मानसिक मस्त मांडलं आहेस.

आवडली. मस्त आहे कथा. बाकी श्रद्धा - अंधश्रद्धा या भानगडीत मी पडत नाही.