नाट्यपदांचा सरळ भाषेतला अर्थ

Submitted by सौ. वंदना बर्वे on 13 April, 2013 - 00:55

जुनी नाट्यगीतं विशेषत: कृष्णाजी प्रभाकर खाडिलकरांच्या नाटकातली नाट्यगीते श्रवणीय असली तरी दुर्बोधतेकडे झुकणारी होती. या नाट्यपदांचे अर्थ लावणे हे खरोखरच क्लिष्ट काम.

त्यावरून राम गणेश गडकरींचे ठकीचे लग्न व तत्संबंधी लेख आठवला. त्यात तिंबूनानांना एका वरातीत "अष्टकन्या सौभाग्यवती भव" असा आशिर्वाद दिल्यामुळे खटल्यास सामोरे जावे लागते. ज्यात जज्जसाहेब त्यांना जी शिक्षा सुनावतात ती येणेप्रमाणे, "आरोपी तिंबूनाना, तुमच्यावर हा आरोप शाबीद झालेला आहे ... म्हणून मी तुम्हाला, विविधज्ञानविस्तारातील ’क्रितो व फिदो’, ज्ञानप्रकाशांतील ’स्थानिक सहकारी पतपेढयां’संबंधी सारे अग्रलेख व ’ब्रह्मज्ञानदीप’ हे आध्यात्मिक गद्यनाटक वाचण्याची, ’मानापमान’ नाटकातील प्रत्येक पदाचा अन्वयार्थ लावण्याची शिक्षा फर्मावितो. हे सर्व वाचन हो‌ईपर्यंत तुम्हाला पुण्यातल्या एखाद्या खाणावळीत जेवावे लागेल. आणि दर आठवडयास ’विक‌एंड’ तिकिट काढून सदर्न मराठा रेल्वेच्या तिसर्‍या वर्गातून पुण्याहून मिरजेपर्यंत प्रवास करावा लागेल. यापेक्षा कमी शिक्षा तुम्हाला करताच येत नाही."

मी थोडीशी उशीरा जन्माला आले. नाहीतर या शिक्षेत "सौ. वंदना बर्वेंच्या लेखात तिला नेमके काय म्हणायचे आहे ते सांगा" याचाही अंतर्भाव झाला असता. असो.

या नाट्यपदांचा सरळ भाषेतला अर्थ आणि अन्वयार्थ जाणकार व्यक्तींनी सांगावा या अपेक्षेने हा धागा सुरु केला आहे. "चंद्रिका ही जणू", "दे हाता शरणागता" किंवा कुठलीही जुनी नाट्यपदे व त्यांचे रसग्रहण व्हावे ही नम्र विनंती.

सौ. वंदना बर्वे.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नुसतेच शब्द, ओळी यांचे अन्वयार्थ लावणे कठीण, असे नाही तर काही गायक गातात तेव्हा शब्दहि कळत नाहीत.
एकदा मी अगदी जुन्या गायकाचे मम आत्मा गमला हे गाणे अनेकदा ऐकत होतो पण ते तीन शब्द सोडले तर मला इतर कुठलेहि शब्द कळले नाहीत.
पुढे श्री. प्रशांत दामले यांनी एका नाटकात म्हंटलेच आहे की मराठी नाट्यगीत असे गायचे की शब्द कळले नाही पाहिजेत.

हे मराठीचे. कित्येक हिंदी सिनेमातल्या गाण्यांचे शब्द कळले तरी ते उर्दू असतात नि त्याचा काहिही अर्थ कळत नाही.

त्यामुळे जसे कविता, गझल यातले काही कळत नाही तसे गाण्यातले सुद्धा काही कळत नाही. फक्त संगीत बरे वाटते कानाला एव्हढेच.

मलाही " काड सखे गळ्यातील, तुझे चांदण्याचे हात , क्षितिजावरी उभे ,पहाटेचे दूत " सा ओळीन्चा अर्थ समजला नाही. कुणी लिहिल का ?