कोल्हापूरच्या कुळकर्ण्यांच्या कमलचे काका ....

Submitted by ललिता-प्रीति on 24 October, 2008 - 00:10

’क’ या अक्षरापासून सुरू होणारे ’कोल्हापूरच्या कुळकर्ण्यांच्या कमलचे काका ...’ हे वाक्य सर्वांना माहितीच आहे. अशीच इतर अक्षरांपासून सुरू होणारी ही काही वाक्ये.
(यांत वापरलेली नावे पूर्णपणे काल्पनिक आहेत. प्रत्यक्षात साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. हा केवळ एक विरंगुळा आहे. कुणालाही दुखवायचा यात हेतू नाही.)

’अ’ : ओगलेवाडीचा आमदार आबाजी एकतारे उगीचच आमच्यावर ओरडत असतो.
’ख’ : खत्रूड खालिद खसखस खाता-खाता खाविंदांवर खेकसला.
’ग’ : गाणगापूरचा गोल गुळगुळीत गोटा गंगापूरच्या गाडीतून गडगडत गेला.
’घ’ : घनघोर घोरणाऱ्या घारपुऱ्यांच्या घरात घुबडे घुसली.
’च’ : चलाख चिरागने चाफेकरांच्या चपला चोरणाऱ्या चंदूला चिंचेखाली चोपले.
’छ’ : छे! छगनरावांची छोटी छकुली छळ-छळ छळते!
’ज’ : जाड जीवन जमनीस जीर्ण जानोरीकरांकडे जरूरीपेक्षा जरा जास्तच जेवला.
’झ’ : झुडुपामागे झोपलेल्या झगेवाल्या झीनतला झिपऱ्या झरिनाने झाडूने झोडपले.
’ट’ : टुकार टारझनने टारगट टोणप्यांना टेकडीवर टाचणी टोचली.
’ठ’ : ठेंगण्या ठुसक्या ठमी ठोसरला ठोमणेने ठणकावले.
’ड’ : डावखुऱ्या डबूने डुगडुगणाऱ्या डब्यात डासांना डांबले.
’ढ’ : ढालगज ढमी ढमढेरेने ढीगभर ढेपा ढकलल्या.
’त’ : तापट तुषार तुंगारेने तिरसट तुकारामचा तपकिरी तबला तोडला.
’थ’ : थायलंडचा थोराड थिमय्या थंडीने थोडासा थिजला.
’द’ : दमणच्या देशी दारूच्या दुकानातला दीड दमडीचा दत्तू दामले दम्याने दहा दिवसांतच द्रविडच्या दारात दगावला.
’ध’ : धारवाडच्या धीरगंभीर धीरजने धाकट्या धन्याला धुरकट धुपाटण्याने धू-धू
धुतले.
’न’ : नाहीतरी नागपूरच्या नाटकी नेमाड्यांच्या नखरेल नमीचे नाक नकटेच!
’प’ : पुण्याच्या पाजी पोतनिसांचा पुचाट पुष्कर पिताजींना पाणी पाजून पालखीतून पट्कन पोलंडला पळाला.
’फ’ : फिकट फातरफेकरांच्या फेंगड्या फातिमाने फुकटचे फारच फुगे फोडले.
’ब’ : बनेश्वरच्या बेरकी बाबा बर्व्यांच्या बाहेरच्या बागेतल्या बाकावर बसलेल्या बिनडोक बनीच्या बावळट बोक्याला बंगलोरच्या बुळ्या बबनने बोगद्यात बबितासमोर बदड-बदड बदडले.
’भ’ : भोचक भडकमकरांचा भेकड भीम भूतानमध्ये भुतासारखा भटकतो.
’म’ : मानखुर्दच्या मेंगळट मिलींदने मराठीत मात्र मस्त मार्क मिळवले.
’य’ : यवतमाळची यमी येवलेकर यंदा यानातून यात्रेला येणार.
’र’ : राकट राशिंगकरांचा रोड रमेश रात्री राजरोसपणे रस्त्यावर रेंगाळतो.
’ल’ : लुकड्या लता लुकतुकेने लबाड लालाजीला लीलया लोळवले.
’व’ : वाशीचा विचित्र वसंत विचारे वेड्या वामनवर वैतागला व वाल वेचायला विसरला.
वाशीचा विचित्र वसंत विचारे वेड्या वामनच्या वस्तू वरचेवर वापरतो.
’श’ : शांत शंतनू शेक्सपिअरच्या शानदार शाळेत शंभरदा शिंकला.
’स’ : सांगलीचा सदू सुतार सिमल्यात सोकावलेल्या संजयच्या सापळ्यात सापडला.
’ह’ : हरघडी हरवणऱ्या हेकट हजामाला हुशार हिरेमठने हौदातून हजारदा हाकलले.

गुलमोहर: 

असेच एक वाक्या माझी आजी सतत गमतीने म्हणायची नी आम्ही पोरं तीला फॉलो करत म्हणयचो. कळयचे काही नाही पण ह्या वाक्यात गम्मत वाटायची.

काकूने काकांच्या कपाटातील काही कामाचे कागद कात्रीने कराकरा कापले....

म्हणून बघा हे वाक्या.. मजा वाटते.

ओगलेवाडीचा आमदार आबाजी एकतारे उगीचच आमच्यावर ओरडत असतो.
>> जरी अ च्याच बाराखडीत असले तरी ए आणि उ यापेक्षा अ चेच शब्द वापरले तर?
म्हणजे
ओगलेवाडीचा आमदार आबाजी आबनावे अनाठायी आमच्यावर ओरडत असतो.
Happy

समर्थांचे "मनाचे श्लोक" अनुप्रास छंदाचे अद्भुत उदाहरण आहे ...
================================
रा श्रीवरा त्या हरा अंतराते। तरा दुस्तरा त्या परा सागराते।
रा विसरा त्या भरा दुर्भराते। करा निकरा त्या खरा मत्सराते।।८०।।
================================

काकूने काकांच्या कपाटातील काही कामाचे कागद कात्रीने कराकरा कापले....
>>>
आम्ही ते असे म्हणायचो!

काल करमरकर काकूंनी काकांच्या कोर्टाच्या कामाचे कागद कात्रीने कराकरा कापून कचरापेटीत कोंबले.

आणि आमची मालगाडी जरा मोठी होती...
काल करमरकर काकांनी करमरकर काकूंना काठीने कांडून काढले कारण की करमरकर काकूंनी काकांच्या कोर्टाच्या कामाचे कागद कात्रीने कराकरा कापून कचरापेटीत कोंबले.
Happy