तू गझल आहेस, तू माझा अभंग!

Submitted by सतीश देवपूरकर on 10 February, 2013 - 04:30

कविवर्य श्री. गिरिश सांगळे यांच्या खयालांवर आधारीत........
गझल (खयाली तरही)
तू गझल आहेस, तू माझा अभंग!
शब्द माझे सारखे तुझियात दंग!!

माझिया प्रहरांतला तू इंद्रचाप....
तूच माझ्या जीवनाचे सप्तरंग!

शब्द नवलाईत प्रेमाच्या भिजून....
अंतरी उठतात गझलेचे तरंग!

ही धिटाई पावलांना तू दिलीस....
चालताना सावली तू, तूच संग!

तूच माझा कंठ, कंठातील गीत!
तूच हृदयातील माझ्या जलतरंग!!

सोडुनी तुजला जिणे, केवळ अशक्य!
ना कुणावरही असा येवो प्रसंग!!

राहते कोठे जगाचे त्यांस भान?
प्रेमिकांना रीत कुठली, ते भणंग!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users