संसर्गरोग -टी.व्ही.चा

Submitted by jyo_patil25 on 12 October, 2008 - 01:41

'ए, सुशे काय गं वरडतीय त्या आलेशासारखी' रस्त्याने जातांना कानावर पडलेले वाक्य ऍकून ही आलेशा कोण असावी असा विचार मनात चमकून गेला. आत्तापर्यंत आम्ही कुणी गाणं म्हणत असेल तर म्हणायचो कशाला,बिच्चार्‍या गायकांच्या पोटावर पाय देतेस. एकतर आम्हांला लता मंगेशकर शिवाय दुसरे कुणी गाणे म्ह्टलेले आवडायचे नाही हेच खरे.त्यामुळे आलेशा कोण असावी असा प्रश्न पडला आणि कानावर त्या पोरीचा आवाज आदळला 'मेड ईन ईंडिया'. आता कुठे माझ्या डोक्यात प्रकाश पडला. आलेशा म्हणजे आलिशा होय. आलिशाची लोकप्रियता झोपडपट्टीत देखील पसरली इतकी ती महान गायिका होय हे सांगणे न लगे. आलिशा आणि आलिशाच्या गाण्याला लोकप्रियता लाभूनही भारतीय बाजारपेठेत मेड इन इंडियाच्या मालाला लोकप्रियता का लाभली नाही हे कोडे काही सर्वसामान्यांना सुटले नाही. कदाचीत आलिशा विदेश वार्‍या करुन भारतात येते तसेच तिचे गाणेही विदेशी स्वर घेऊन भारतात आले त्यामुळे लोकप्रिय झाले असावे. भारतीय उत्पादन कंपन्यांनी आपला माल विदेशात नेऊन भारतीय बाजारपेठेत आणला तर त्याला लोक निश्चितच स्वीकारतील, असा विचार करीतच चालू लागले तेवढयात'कायकू शारूख की स्टाईल मारता हॅ' हे वाक्य कानावर आदळ्ले. कट्टयावरची चार पाच मुलं काळा गॉगल घातलेल्या पोराला उद्देशून जुना डायलॉग थोडया नवीन पद्धतीने हिरोंच्या नावाची अदलाबदल करुन म्हणाले होते.राज दिलिप देव नंतर अमिताभलाही निवृत्ती मिळाली याचा आनंद झाला. नाहीतर भविष्यात जख्ख म्हातारा अमिताभ चौदा पंधरा वर्षाच्या पोरीबरोबर उडया मारताना पाहावा लागला असता.
कट्ट्यावरची पोरं शाहरूकवरुन डायरेक्ट आती क्या खंडालाचे स्वर आळवू लागली. मी दचकलेच यांना आती क्या खंडाला म्हणायला काय झाले. मी इकडे तिकडे बघू लागले तर समोरुन चार पाच पोरींचा घोळका येतांना दिसला. तरीच मला शंका आली पोरांना आती क्या खंडालाचे सूर आळवायची लहर अशी अचानक कशी आली. बिच्चार्‍या पोरांची तरी काय चूक. एकीचा स्कर्ट हा स्कर्ट होता की हाफ पँट (परंतु दादा कोंडकेची हाफ पँट गुडघ्यापर्यंत असायची.) म्हणणे तसे चुकीचे ठरेल. हं तर मी म्हणत होते, की त्या मुलीचा स्कर्ट हा स्कर्ट होता की हाफ पँट हेच कळत नव्हते. दुसरीचा टी शर्ट
साडीवर घालायचे ब्लाऊज होते की काय तेच कळत नव्हते. तिसरीची फॅशन तर विचायरायलाच नको. मद्रासी बाबूची लुंगी आणि खांदयावरील उपरणे वाटावे इतक्या छान स्टाईलने तिने गुजराती साडी घातली होती. (येथे 'साडी नेसणे' हा शब्द आम्हांला गावंढळ वाटतो म्हणून आम्ही साडी घातली असा आधुनिक शब्द वापरतो.) इतक्या चांगल्या प्रकारे 'फॅशन शो' पोरांना रस्त्यावर पाहायला मिळाला तर त्यांच्या तोंडून आती क्या खंडालाचे स्वर नक्कीच आळवले जाणार, यात बिच्चार्‍यांचा काय दोष? हा दोष दयायचाच झालाच तर जवानीलाच दयावा. आती क्या खंडाला पोरांनी नाही म्हणायचे तर मग म्हातार्‍यांनी म्हणायचे का?
संध्याकाळची वेळ असल्यामुळे रस्त्यावरचे प्रत्येकजण आपल्याच धावपळीत चालले होते. कुणी नाटक,सिनेमाला चालले होते, कुणी कट्टयावर चालले होते,कुणाला घर गाठायचे होते. अशा धावपळीत गृहिणींची ही पाण्यासाठी धावपळ चालली होती. नळावर पाणी भरण्यावरुन दोन बायकांमध्ये भांडण चालले होते. भांडण खूपच विकोपाला पोहचले. दोघी बायका एकमेंकींच्या झिंज्या ओढू लागल्या. त्यांचे ते अवसान बघून बायकांच्या डब्ल्यू. डब्ल्यू. एफ्.मध्ये भारतही मागे नाही याची खात्री पटली.या दोघींना विदेशी चॅनेलवरुन तर स्फूर्ती मिळाली नाही ना,असे वाटू लागले.
रस्त्याने जाताना इतक्या चांगल्याप्रकारे करमणूक होऊ शकते याचे ज्ञान मला इतके दिवस का होऊ शकले नाही, याबद्दल खंत वाटायला लागली. रस्त्याने पायी चालतांना इतक्या चांगल्याप्र्कारे करमणूक होत असेल तर कशाला गाडीचे झंझट बाळगायचे पॅशांची बचत होईल आणि फुकटात करमणूक ही व्हायची.
घरी आले तर दारातच चिरंजीव म्हणाले,ओ मम्मी मम्मी,डॅडी डॅडी,आज मॅने एक लडकी को देखा तो ऐसा लगा...चिरंजीवांचे वक्तव्य ऐकून ठरविले की घरातील कोंदट वातावरणात बसून टी.व्ही. बघून डोळे खराब करण्यापेक्षा बाहेरच्या मोकळया गार हवेतील टीव्ही पाहणे अधिक फायदेशीर होय. आज पायी चालत गेल्यामुळे घरातल्या टीव्हीपेक्षा निसर्गाच्या सान्निध्यातील टीव्ही अधिक भावला. रात्री जेवताना घोषित केले की मला टीव्ही विकायचा आहे.जेवण करयचे सोडून सगळयांच्या नजरा माझ्यावर रोखल्या गेल्या. मला वाटले मी राष्ट्रवादी काँग्रेसची नाहीतर मनसेची तर घोषणा केली नाही ना,सगळे असे रोखून बघत आहेत...
टीव्ही विकायचे म्हटल्यावर पुढील वाद सर्वांना ठाऊकच आहे. मी घरातील सर्वांना सांगितले,आमचे संरक्षण खाते वेळीच जागे झाले म्हणून काश्मिरचे संरक्षण झाले. मला ही घराचे संरक्षण करण्याकरिता जागे व्हावे लागले.यावर मुले ओरडली, मम्मी आप तो टीव्ही देख देख के जाग गयी,नहीं तो आपको पता भी नहीं था कारगील द्रास कहाँ हॅ और संरक्षण क्या होता हॅ. मुलांचे वक्तव्य ऐकून कपाळावर हात मारण्याची पाळी माझ्यावर आली.

गुलमोहर: 

धन्य तो टिव्ही महिमा. गेली पाच वर्षे आम्ही केबल हा हद्द्पार केलेला प्रकार सध्या डिशच्या नावाने घरात शिरतोय. बघु पुढे काय होते ते !!!
ज्यो, छान लिहीताय.

चांगल लिहीलय...
सध्ध्या "उपग्रह वाहिन्या" मायबोलीवरही दिसू (घुसू) लागल्या आहेत...! Happy