नृत्यनाटिका अंबा (दोन अंकी)

Submitted by उमेश वैद्य on 17 October, 2012 - 03:48

ही काव्य-नृत्य-नाटिका असून यात काव्याबरोबच नृत्यांना अतिशय महत्व आहे. या मधील संवाद काव्य रूपात असून ते शास्त्रीय तालांवर म्हणता येतील. पात्रांचा रंगमंचावरील वावर हा संपूर्णपणे नृत्यातच आहे. त्या अनुषंघाने मुद्रा-अभिनयाला सुध्द्दा महत्व आहे. शाळा, महाविद्यालयांच्या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी
ही नृत्यनाटिका बसवता येईल. त्यातील काव्याचा भाग चांगल्या आवाजाच्या पुरूष-स्त्री गायकांकडून म्हणून घ्याव्यात व पात्रे हावभाव करीत असताना पडद्यामागून म्हणावा. उत्तम नृत्य जाणणा-यांनी नृत्याचा भाग शास्त्रीय नृत्य प्रकारवर सुव्यवस्थीत बसवावा. यात त्या त्या भावांप्रमाणे काही नृत्य

प्रकारांचा उल्लेख आहे उ.दा. वंदन नृत्य, तथास्तू नृत्य, बेभान नृत्य, शरण नृत्य, प्रकट नृत्य ,युध्द नृत्य व विजय नृत्य. असे आहेत. ही नावे म्हणजे प्रचलीत नृत्यप्रकारांची नसून त्या त्या वेळी आवश्यक असलेला प्रमुख भाव दर्शविण्यासाठी आहेत. या नृत्यनाटिकेच्या सुरवातीला प्रेक्षकांना कथेच्या आरंभापासून नाटिकेच्या
वस्तूविषयापर्यंतथेट जोडणारे पडद्या मागून ऐकू येणारे निवेदन आहे. तो सगळा गद्याचा भाग असल्याने येथे दिलेला नाही. जर कुणी मागीतला तर अवश्य देईन.

नृत्यनाटिका अंबा (दोन अंकी)

पात्रे:

पहिला सूत्रधार
दुसरा सूत्रधार
महिषासुर
ब्रम्हदेव
शंकर
महाविष्णू
महिषासुराचा प्रधान असिलोमा
महिषासुराचा दूत
आदिमाया अंबा देवसेना
सहा ते आठ देवांच्या वेषातील पात्रे

अंक पहिला प्रवेश पहिला;

पडदा उघडतो तेंव्हा रंगमंचावर अंधार असून पूर्ण पडदा उघडल्यावर रंगमंचावर
हळूहळू प्रकाश पसरतो. त्याच वेळेस दोन सुत्रधार नृत्य करीत रंगमंचावर अवतरतात.
नृत्य चांगले रंगात आल्यावर... (नृत्य अंदाजे पाच मिनीटे)

पहिला सूत्रधार:
"मंडले तिन भूवने हा काळ ऐसा पातला
ब्रम्हदेवाच्या वराने दैत्य म्हैसा मातला
दैत्य महिषासुर वरेच्छे जो तपाला बैसला
तापसी दैत्यापुढे साक्षात ब्रम्हा जाहला"

पुन्हा नृत्य.... (अंदाजे 6 मिनीटे)

दुसरा सूत्रधार:
"लोटली वर्षे अनेक तो एका पायावरी
राहिला ऊभा महीषी बोलवा दिग अंतरी
ब्रम्हदेवाने दिलेल्या त्या वराने माहिषी
जिंकले मृत्यूसही ना काळजी ती फ़ारशी"

सूत्रधार नृत्य करीत करीत निघून जातात. रंगमंचावर अंधार,

पहिल्या अंकातील प्रवेश पहिला संपूर्ण.

------------------------------------------------------

अंक पहिला प्रवेश दुसरा
आता रंगमंचावर महिषासुर तप करीत असलेला दिसतो. तो एका पायावर उभा राहून तप करत असतो. तोच वीज चमकल्या सारखा आवाज होतो व एक दिव्य प्रकाश पडतो रंगमंचावर ब्रम्हदेव नृत्य करीत प्रवेश करतो. ब्रम्हदेवाला पहाताच महिषासुर वंदन नृत्य करू लागतो.ब्रम्हदेव व महिषासुर दोघेही नृत्य करू लागतात.
नृत्य चांगले रंगात आल्यावर....... (नृत्य अंदाजे 10 मिनीटे)

ब्रम्हदेव:
"भक्त माझा तूची खासा पाहता आनंदलो
सांग वत्सा काय देऊ मुदित तुजसी जाहलो
सोड संकोचास आता दे मला ती माहिती
रे महीषा बा कशाची ही तुला वाटे भिती
या तपाची योजना केलीस कोण्या कारणे
बोल आता जे हवे ते काय इच्छा मागणे......"
हे ऐकताच महिषासुर अत्यंत आनंदाने नृत्य करू लागतो. नृत्य रंगात आल्यावर....

महीषासूर:
"जिंकणे सा-या त्रिखंडा हेच आता लक्षणे
शत्रु मृत्यू पासुनी दे बा मला संरक्षणे
ब्रम्हदेवा दे वरा ना नाश कोण्या कारणे
कोणत्याही कारणाने ना मला कुणि मारणे......"
हे ऐकताच ब्रम्हदेव नृत्य करताना थोडा थबकतो. महिषासुराकडे पाहून
हसतो व पुन्हा नृत्य करत.....

ब्रम्हदेव:
"ते मला ही शक्य नाही फ़ोल ऐसे बोलसी
येत जन्मा जीव त्याचा होत मृत्यू खासची
माग काही राज्य किंवा त्या निराळे जे हवे
सांग काही जे असे अप्राप्य अन्य दानवे"
पुन्हा नृत्य......

महीषासूर:
"येत मृत्यू खास ऐसे सांगसी देवा तरी
कोणत्याही पुरुष हस्ते मरण ना ऐसे करी
कोणत्या काळी कधी येइल मृत्यू जो मला
मागणे ऐसेच तो येईल स्त्रीहस्ते मला"
महिषासुराचे हे बोलणे ऐकून ब्रम्हदेव मोठ्याने हसतो व ’तथास्तू नृत्य’

करू लागतो. नृत्य रंगात आल्यावर......
ब्रम्हदेव:
"तथ अस्तू मागसी तैसेच होई दानवाऽऽऽ तैसेच होई दानवाऽऽऽऽ तैसेच होई दानवाऽऽऽऽ "

हे ऐकताच महिषासुर अत्यंत आनंदाने बेभान होऊन नृत्य करू लागतो ब्रम्हदेव मात्र
गालातल्या गालात हसत महिषासुराच्या त्या बेभान नृत्याकडे पहात असतो.
ब्रम्हदेव नृत्य करीत रंगमंचावरून निघून जातो तरी महिषासुर बेभान होऊन नृत्य
करीतच रहातो. हळूहळू रंगमंचावर अंधार......

अंक पहिला प्रवेश दुसरा समाप्त

अंक दुसरा प्रवेश पहिला;

सूत्रधार रंगमंचावर नृत्य करताना दिसतात.

पहिला सूत्रधार:
"सुर त्राही किन्नराही त्या भये ते कापती
दैत्य म्हैषाच्या भयाने ठार मेले नृपती
देव आले फ़ार ज्यांना त्रास होऊ लागला
ब्रम्ह विष्णू वा शिवाला साकडे घालायलाsss,साकडे घालायलाsss,साकडे घालायलाsss"

सूत्रधार पटकन रंगमंचावरून जात क्षणभर रंगमंचावर अंधार. रंगमंच प्रकाशतो तेंव्हा एकीकडे शंकर तपास बसलेले दिसत असून बाजूलाच महाविष्णू शेषावर स्वस्थ निजलेला दिसत आहे दुस-या बाजूने देवसेना प्रवेश करते व नृत्य सुरु होते. हे नृत्य सुरु असताना रंगमंच्याच्या कोप-यात सुत्रधार येतो सुत्रधाराचे कथन सुरु असतानाच देव शंकराला गा-हाणे घालत असलेले दिसतात.

पहिला सूत्रधार:

"ब्रम्हाचे वरदान कारण असे उन्मत्त म्हैशासुरी
सांगा काय उपाय यास वधणे तात्काल देवेश्वरी"

हे ऐकून शंकर विचारमग्न झालेला दिसत असून काहीच उपाय सुचत नाही असा अभिनय करतो.

दुसरा सूत्रधार:
"आपुलाले दु:ख जेंव्हा सांगती देवाधिशा
त्यांस ही ना सापडे काही उपायच की तसा"

शंकर जमलेल्या देवांसहीत रंगमंचावर बाजूला शेषावर निजलेल्या विष्णूंकडे या प्रश्नावर उपाय विचारण्यासाठी येतात. शंकरासहीत सर्व देव आलेले पाहून विष्णू तात्काळ उठून सर्वांचे स्वागत करतो.

पहिला सूत्रधार:
"देवां त्या पुसताच शेष शयना वात्सल्य मूर्ती जशी
देता तो अभया तयास वदता चिंता नुरे फ़ारशी
देवांनी निज दु:ख त्यास कथले म्हैषी कसा मातला
दैत्याने अति तीन लोक पिडले स्वर्गास ही जिंकलाऽऽऽऽ जिंकलाऽऽऽऽ जिंकलाऽऽऽऽ"

विष्णू सर्वांचे बोलणॆ ऐकून घेतो.

विष्णू:
"ब्रम्हदेवे बोलले ते खरे
वावगेसे काय सांगा बरे?
नाश आहे दानवाचा खरा
मागण्यामध्येच आहे पहा"

शंकर:
"कोणती स्त्री सांग नारायणा
वधण्या येईल या दानवा?"

विष्णू:
"देवहो मी सांगतो मार्ग हा
दे करील आदिमाता पहा
आपुलाली शक्ति गोळा करा
अन महादेवीस त्या निर्मुया"

हे ऐकून सर्व देव विष्णूचे म्हणणे पटल्याचा अभिनय करतात. तिनही देव देवसेनेसहीत महाशक्ति प्रकट करण्यास जातात रंगमंचावर हळूहळू अंधार

प्रवेश पहिला समाप्त.

--------------------------------------------------------------------------------------------------------

प्रवेश दुसरा
रंगमंच प्रकाशतो तेंव्हा ब्रम्हा विष्णू व शंकरासहित सर्व देव वर्तुळाकारात नृत्य करीत असलेले दिसतात. वर्तुळाकारात नॄत्य करीत आपापली सर्व शक्ति वर्तुळाच्या केंद्रस्थानी एकवटतात. तोच मोठा विजा कडाडल्यासारखा आवाज होऊन मध्यभागी महादेवी प्रकट होते. देवीस दहा भूजा असून अनेक
उत्तमोत्तम वस्त्रालंकाराने ती नटलेली आहे. तिच्या प्रत्येक उजवीकडील हातात अनुक्रमे, भाला,चक्र,खडग तलवार),धनुष्य व गदा ही शस्त्रे असून प्रत्येक डाव्या हातात अनुक्रमे शंख,अग्नी,अंकुश,पाश व त्रिशूल ही आयुधे आहेत. ती प्रकट झालेली पहाताच देव तिच्या तेजाने प्रभावीत होतात व अत्यंत विस्मयाने तिच्याकडे पाहू लागतात. महादेवी प्रकट नृत्य करू लागते.

आदिमाया:
"सांगा हो सुर देवहो मज अता आवाहना कारणे
कोण्या संकट काय दु:ख हरणे कैचे असे मागणे"

एक देव:
"काय बोलू काय सांगू काय आम्ही सोसतो
स्वर्ग वासी देव आम्ही रान माळी हिंडतो"

दुसरा देव:
"दुष्ट म्हैशाने कशी केली पहा ऐसी दशा
स्वर्ग दे आम्हास पुन्हा उतरवी त्याची नशा"

सरा देव:
"इन्द्र चंद्रादीक त्याने जिंकले की स्वर्गिचे
ब्रम्हदेवाच्या वराने त्राहि त्राही होतसे"

आदिमाया:
"काय ऐसे वचन सांगा त्यास ब्रम्हाने दिले
कारणे त्या देव तुम्ही या दशेसी पावले"

ब्रम्हा, विष्णू, महेश:
"हाय सांगू काय माते ब्रम्ह म्हैशासी वदे
जे कधी ना पाहिले ना ऐकले ऐसे घडे
येइना म्हैशास मृत्यू कोणत्याही कारणे
देव नाही दैत्य नाही कोणतीही मानुषे
मारू ना शकती तयासी त्यास हे वरदानसे
येत मृत्यू कोण काळी हस्त स्त्रीचा तो असे"
हे ऐकताच आदिमाया त्यांस अभय नृत्य करीत अभय देते

आदिमाया:
"देवहो आश्वस्त ऐसा खेळते युध्दास मी
महिष दैत्ये मारते निर्दालते रण-अंगणी
ही पहा आताच निघते मारते म्हैशासुरा
देवहो आनंद तुम्ही वरि करा हो साजरा"

असे म्हणून आदिमाया आपले वाहन सिंहावर बसून तात्काळ महिषासुराशी युध्द खेळायला निघते.महादेवी निघून जाताच सर्व देव तिच्या मागे युध्द पहण्यासाठी तिच्या मागे जातात.

प्रवेश दुसरा संपतो.
-------------------------------------------------------------

प्रवेश तिसरा
रंगमंच प्रकाशतो तेंव्हा रंगमंचावर डाव्या बाजूस महिषासुराच्या राजमहालाचा देखावा असून एका मंचकावर महिषासूर गाढ झोपेत असून मोठ्याने घोरत पडलेला दिसत आहे रंगमंच्याच्या उजव्या बाजूस महिषासुराच्या महालाबाहेरील देखावा दिसत आहे महालाबाहेरील असलेल्या स्वर्गिय उद्यानाच्या काठावर महादेवी
आपल्या वहानासमवेत बसून त्याच्याशी खेळत असलेली दिसत आहे. रंगमंच प्रकाशीत झाल्यावर व प्रेक्षकांना दृष्याचा अंदाज आल्यावर ... सिंह मोठी गर्जना करतो त्याच्या मोठा आवाज होतो त्या आवाजाने महिषासुर
दचकून जागा होतो. तोच दोन दानवदूत नृत्य करीत तेथे येतात. त्या दोघांपैकी एक सामान्य दूत व प्रधान असिलोमा हा असतो.

दूत:
"तळ्याकाठ स्त्री एक आहे महाराज ऽऽऽऽ,आहे महाराज
पहा काय लावण्य आहे महाराज ऽऽऽऽ,आहे महाराज
तिचे मुख तेजाळ आहे महाराज ऽऽऽऽऽ,आहे महाराज
अतीक्रूर सिंहास पाळे महाराज ऽऽऽऽ,आहे महाराज
तयापास खुषाल खेळे महाराज ऽऽऽऽ,आहे महाराज
तळ्याकाठ स्त्री एक आहे महाराज ऽऽऽऽ,आहे महाराज"

ते ऐकून महिषासुराला मोठे आश्चर्य व कौतूक वाटते

असिलोमा:
"पहाया अष्ट्भूजा सुंदरी ती
झणी राया चला की अप्सरा ती
मराली सुंदरी ती शस्त्र धारी
दशा अष्टे नवी शस्त्रे झळाळी
पराक्रमी दिसे राजा बहू ती
तुला बा पट्टराणी शोभते की"

हे ऐकताच प्रधानाचे खुषामती बोलणे ऐकून तो तात्काळ महादेवीस बघण्यासाठी निघतो.......प्रधान अ दूत देखील जातात...रंगमंचावर अंधार.... दुस-या बाजूने महिषासूर आपल्या प्रधान व दूतासमवेत प्रवेश करतात व पहातात की अंबा आपले वाहन सिंह याच्याशी खेळताना दिसत आहे. अंबेला निरखत निरखत महिषासुर तिच्याशी खुळावून भाषण करण्याचा प्रयत्न करू लागतो. तेव्हा क्रोधित मुद्रेने अंबा त्याच्याकडे पहाते व म्हणते.

अंबा:

"महिषा रे दैत्य आसूरा बहू तू मातला
देवतांसी रे तुझा अत्यंत त्रासू जाहला
जगत सारे ग्रासले उन्मत्त तुझ्या वर्तने
जाहले आता प्रकट मी देवतांच्या प्रार्थने
सोड स्वर्गा पृथ्वि तू पाताळ ही जागा तुला
ना तरी युध्दात आता मारते रे मी तुला"

हे आदीमायेचे बोलणे ऐकून महिषासूर अत्यंत क्रोधीत होऊन अंबेवर जोरदार चाल करून जातो. अशा प्रकारे घनघोर युध्द सुरू होते. ते सतत नऊ दिवस चालते. शेवटी महिषासूर आपल्या मायावि शक्तिंचा प्रयोग अंबेवर करू पहातो. परंतू आदिमाया त्यास किंचीतही बधत नाही. असे बराच काळ युध्द नृत्य झाल्यावर महिषासुर आपले सर्व बळ एकवटून मोठ मोठ्या डरकाळ्या फ़ोडीत महदेवीर उडी घालतो. देवी ती उडी वरच्यावर आपल्या
भाल्यावर घेते आणि महिषासुराचे मस्तक धडापासून वेगळे करते. तोच दोन्ही सूत्रधार मंचावर प्रकट होऊन

दोन्ही सूत्रधार: (पडलेल्या महिषासुराकडॆ पाहून)

"अंबेने मग घोर युध्द करता, निर्दाळले दानवा
भाल्याने बघ कंठ छेद करता आनंद झाला नवा"
सर्व देव रंगमंचावर प्रकट होऊन अंबेवर पुष्पवृष्टी करतात
तो दिवस विजयादशमीचा असून देव अंबेसमोर विजय नृत्य करू लागतात
विजय नृत्य सुरू असतानाच पडदा पडतो.

समाप्त

उमेश वैद्य

Group content visibility: 
Public - accessible to all site users