चष्मा !

Submitted by कवठीचाफा on 30 September, 2008 - 12:38

आता हे सुध्दा तुम्ही चष्म्यासकट वाचत असाल तर माझ्या बर्‍याच प्रश्नांची उत्तरे तुमच्याकडे आहेत. गेले कित्येक दिवस या चष्म्याने मला नकोसे करुन टाकलेय. रात्री एकतर झोपच लागत नाही नाहीतर स्वप्नात चष्मा येउन मला जाग येते. काम करताना उगीचच नजर अधु झाल्यासारखी वाटते. समोर कुणी चष्मा लाउन बसलेलं असेल तर माझं लक्ष कामातुन निघुन तिकडे जातं आणि मग झालेल्या चुका शोधताना डोळ्यांच्या मदतीला चष्मा नसतो.
मुळात या चष्मा प्रकरणाचा शोध कुणी लावला? जगातल्या नक्की कोणत्या व्यक्तीला `जगातला पहीला चष्मिष्ट' अशी प्रसिध्दी मिळाली? एखाद्या घरात अगदी लहान मुलांपासुन ते आजोबांपर्यंत सगळ्यांना चष्मे कसे काय असतात? बरं असतात तर असतात मग त्यातल्या लहान मुलाला नक्की किती वयाचा असताना चष्मा लागतो? तो लागला आहे असे कसे कळते? बरं आगदी पाळण्यात खेळायच्या दिवसात चष्मा लागतो का? लागला तर तो मुलांना लावायचा कसा? आणि आपण लावलाच तो बळजबरीने, तर तो त्यांनी का म्हणुन टीकवायचा? हे माझे काही मुलभुत प्रश्न. पण याच्या पुढेही काही प्रश्न नविन तयार होऊन मला आणखी त्रास देत रहातात.
चष्मेवाली माणसं झोपताना चष्मा न लावता झोपतात मग त्यांना स्वप्नं व्यवस्थित दिसतात का?
चष्मा दुरचा वेगळा आणि जवळचा वेगळा असे बाळगणारे लोक दुरची वस्तु जवळ जाउन का पहात नाहीत? म्हणजे त्यांच्या एका चष्म्याचा खर्च वाचु शकेल. बरं नेमका जवळचे दाखवणारा चष्मा हरवला तर त्याला शोधायला ही माणसे दुर जाउन उभी रहात असतील का?
"झिरो नंबरचा चष्मा वापरतो" असे म्हणणार्‍या लोकांची नजर कमजोर नाही का? कारण चष्मा नसलेल्या माणसाची दृष्टीक्षमता सहा भागीले सहा म्हणजे ६/६ असते असे म्हणतात.
उन्हाचा त्रास होऊ नये म्हणुन चष्मा लावणारे लोक एकाच रंगाच्या काचांचे चष्मे का नाही वापरत?
गाडीवर घालायचा चष्मा वेगळा आणि काम करताना घालायचा चष्मा वेगळा असे करणारे लोक म्हणजे `खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे' याचे मुर्तीमंत उदाहरण नव्हेत काय?
चष्मा लावणारी लोकं जेंव्हा चष्म्याच्या आडून देखील बारीक डोळे करुन पहातात तेंव्हा त्याना आणखी एखाद्या चष्म्याची गरज असते का?
चष्मेवाला माणुस भडकला तर बिनचष्मेवाल्यापेक्षा जास्त हिंस्त्र का दिसतो?
बरं जरी झालीच त्याची कुणाशी लठ्ठालठ्ठी, तर त्यात समोरच्या माणसाने त्याचा चष्मा फ़ोडून टाकला, तर पुढे काय?
`वरचश्मा असणे' हा वाक्प्रचार एखाद्या चष्मेवाल्याने सुरु केला असावा काय?
`चश्मेबद्दुर' हे गाणे चष्मा लावुन पहावे किंवा ऐकावे काय?
बरं हे गाणे मुळात ` तेरी प्यारी प्यारी आँखोको' असे भलत्याच विरुध्द टोकाकडून कसे काय चालु करायचे सुचले असावे?
चष्मा आणि चाळशी यात नेमका फ़रक काय?
दोन चष्मेवाले एकमेकांकडे पहातात त्याला `नजरभेट' म्हणावं की चष्मा भेट?
एखाद्या चष्मेवाल्याने चष्मा काढुन ठेवल्यावर आपण त्याला आणि त्याने आपल्याला कसे ओळखावे?
डबल भिंगाचा चष्मा म्हणजे नक्की काय? कारण त्यांना काचा तर प्रत्येक डोळ्यासमोर एक अश्या दोनच असतात.
बरं चष्मा लावल्यावर माणुस भारदस्त दिसतो असा बरेच जणांचा समज का असावा?
आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्याला चष्मा लागला म्हणजे दृष्टी कमजोर झाली यापेक्षा नविन चष्मा घेता येणार असा आनंद लोकांना का होतो?

सध्या मला सारखे हे प्रश्न भेडसावतायत कारण आठच दिवसापुर्वी सौ. ला चष्मा लागलाय आणि घरात असे म्हणतात की त्यामुळे ती माझ्यापेक्षा जास्त गंभीर आणि विचारवंत दिसते.

गुलमोहर: 

बढीया Happy

हे मी चष्मा काढून वाचलय आणि लिहीलय Happy

फलंदाज दोन्ही डावात शून्यावर बाद झाला की त्याला चष्मा मिळाला का म्हणतात ? त्याला बाद होण्यासाठी जर पैसे मिळत असतील तर त्या पैशाचा तो चष्मा घेत असेल का ?

मस्त...
केदार ,:)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
तु माझ्या असण्याचा अंशअंश
तु माझ्या नसण्याचा मधुर दंश.....

चाफ्फ्या "चाफी "चे काळजी घे रे
kedar123 नेहमीप्रमाणे dialogबाजी Happy

दिसलीस तू...फुलले ॠतू..................

एखाद्या घटनेच्या साक्षीदारास "चष्मदीद गवाह" असं का म्हणतात? त्याने ती घटना चष्मा घालून पाहीलेली असते का? Proud

मुळात 'ह्या' प्रकाराला(भिंगाना) चष्मा हयाच शब्दाने का संबोधतात? Happy

मस्त 'भेजा फ्राय' ची (मूवी) आठवण झाली.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कधी आवडे चकली, कधी आवडे चिवडा
करंजी मात्र मी कधीच खात नाही

लाडू आवडे मात्र, ते कीतीही खा
बेदाणा हा त्या

सहीच चाफ्या...

अजुन एक शंका...
चष्मेवाल्याला 'ढापण्या' का म्हणतात? घोड्याला ढापण तर आजुबाजुच दीसू नये म्हणून लावतात ना?????

चष्मेवाल्याला 'ढापण्या' का म्हणतात? .....
समस्त चष्मेवाल्यांकडुन तुमचा निषेध...............
चष्मा.... असुन अडचन नसून खोळंबा....
मी गेली २० वर्षे अनुभव घेतोय.

चाफ्फा,
मस्तच एकदम. खुप मस्त, छान लिहिलं आहेस.
सेन्स ऑफ ह्यमर मस्तच.....

बरं पण बायको ला निदान आता तरी चष्मेबद्दुर म्हणतोस ना?

तुझ्यातल्या लेखकाला सलाम.
अनघा
----------------------------------------------------
If there is a way, I will find one.
If there is none, I will make one.

अहो नितीन, निषेध कशाला करता माझा... मला ही चष्मा लावायला लागतो PC वर काम करताना...आपण एकाच माळेतले मणी (आता परत निषेध नका करू कारण ज्याला नीट दिसत नाही त्याला म्हणतात ना 'डोळे आहेत की काचेचे मणी'????)

अनु,

चाफ्याला सांग आधी बायकोला 'चष्मेबद्दुर' चा खरा अर्थ विचार, नसेल माहीत तर समजावून दे. नाहीतर हा जायचा तिची तारिफ करायला, आणि ती रागे भरायची.
बिच्चारा चाफा. Proud

चाफ्या, मला चष्मा नसल्याचा उगाच आनंद झाला बघ. पण एक मात्र खरे, काही माणसे चष्म्यामुळे खुलतात तर काही चष्मे माणसांमुळे. पटतय का ???

चष्मा दुरचा वेगळा आणि जवळचा वेगळा असे बाळगणारे लोक दुरची वस्तु जवळ जाउन का पहात नाहीत? म्हणजे त्यांच्या एका चष्म्याचा खर्च वाचु शकेल. बरं नेमका जवळचे दाखवणारा चष्मा हरवला तर त्याला शोधायला ही माणसे दुर जाउन उभी रहात असतील का? >> Lol जियो!! चाफ्फा! Happy
कावरे कोल्ड्रिंक्स मधे एक "चष्मेशाही " नावाचं गुलाबी रंगाचं आईस्क्रीम मिळतं...ते स्पेशल चष्मेवालयांसाठी बनवले आहे का? म्हणजे बाकीच्या आईस्क्रीम प्रमाणे ते चुकून चष्म्याला लागले तर तो चष्मा एकदम शाही दिसू लागतो...

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
पारिजातकाचं आयुष्य लाभलं तरी चालेल , पण लयलूट करायची ती सुगंधाचीच!
Happy

सही रे चाफ्फ्या Lol

आयला चाफ्या.....
जर नवरा - बायको दोघांना चष्मा असेल तर काय अडचण होत असेल ते पण जरा सांगीतले असते तर?
पावसात रात्री बाईकवर चष्मा घालणे म्हणजे काय दिव्य असते महितेय का?

लाजो........ निषेधाबद्दल क्षमस्व. चष्म्याशप्पथ!!!!

चाफा..... लै भारी रे! Happy

>>दोन चष्मेवाले एकमेकांकडे पहातात त्याला `नजरभेट' म्हणावं की चष्मा भेट?
हा उच्च आहे!

>>नविन चष्मा घेता येणार असा आनंद लोकांना का होतो?>>
हे अगदी खरं..... शाळेत असताना मला चष्मा खुप आवडायचा, उगीचच चष्मा लावुन सिन्सिअर दिसावे असे वाटायचे म्हणुन मग मी आईबाबांकडे "झिरो" नंबरच्या चष्म्याचा हट्ट चालु केला.... त्यांनी सहाजिकच "नसते फॅड" म्हणुन माझी मागणी धुडकावुन लावली... मग मी डोळे दुखायच खोट खोट नाटक करुन आणि त्या डॉक्टरांच्या तक्त्यावरची सगळी अक्षरे दिसत असुनही खोटी खोटी उत्तरे देउन एकदाचा चष्मा मिळवला.... फार दिवस वापरला नाहे ती गोष्ट वेगळी Happy

असो,

माझ्याकडुन ही काही प्रश्नः
काही लोक (विशेषतः साहेब जमातीचे लोक) चष्मा डोळ्याऐवजी नाकावर का लावतात? म्हणजे डोळ्याला असतो तसा नाकालाही नंबर (उपप्रश्न : याला नंबर असणे का म्हणतात?) असतो का? आणि हे लोक कोणती गोष्ट चष्म्यातुन आणि कोणती गोष्ट चष्म्यावरुन बघायची हे कसे ठरवतात?

>>घोड्याला ढापण तर आजुबाजुच दीसू नये
लाजो, माझ्या माहितीप्रमाणे त्याला झापड म्हणतात.

चाफा, सुरवात वाचली. आणि एक भयकथा असेल अशा मूड मधे वाचायला सुरवात केली. पण पुढे मस्तच विनोदी.
अगदी साध्याही विषयात भंकस किती मोठी कधी आढळे.
पण हे सगळे विनोद खूप गंभीरपणे घ्यावे अस वाटून त्यावर गंभीर लिहिणार होते.
पण पुन्हा कधीतरी.

धन्यवाद मित्रमंडळ ! यात भर टाकण्याचे अमुल्य कार्य केल्याबद्दलही धन्यवाद ! ते चष्मेशाही आईस्क्रीम म्हणजे बहुतेक चष्मा लाऊन खायला लागत असणार ना ? Happy
.................................................................................................................................
** आयुष्य म्हणजे एक फार मोठी गुंतागुंत आहे, ती सोडवत बसण्यापेक्षा त्यात गुंतुन मनमुराद जगावे **

यावरून एक विनोद (कुठेतरी वाचलेला) आठवला -

एका जाड भिंगाच्या चष्मेवाल्याला त्याचा मित्र म्हणतो, "अरे, तू चष्मा घातलास तर घुबडासारखा दिसतोस..!" त्याला तो चष्मेवाला म्हणाला, "मित्रा, मी चष्मा काढला तर तू मला घुबडासारखा दिसतोस.. !"

आफताब, हसून हसून मेले Lol

एखाद्याचे कान कापल्यावर त्याला दिसत नाही.
.
.
कान कापल्यावर चष्मा कुठे अडकवणार?

चाफ्या सॉल्लीड निरीक्षण

विषेषतः

चष्मेवाली माणसं झोपताना चष्मा न लावता झोपतात मग त्यांना स्वप्नं व्यवस्थित दिसतात का?
चष्मा दुरचा वेगळा आणि जवळचा वेगळा असे बाळगणारे लोक दुरची वस्तु जवळ जाउन का पहात नाहीत?

<< Lol

दक्षीतै Lol चष्मदीद गवाह

Lol