शक्य ..अशक्य

Submitted by कौतुक शिरोडकर on 26 September, 2008 - 03:43

बर्‍याच दिवसांनी आज चालायची लहर आली म्हणून चालत निघालो. रमत गमत चौकात पोहचलो. तेवढ्यात बसस्टॉपच्या मागे जुन्या-पूराण्या पुस्तकांचा पसारा मांडून बसलेल्या काळ्या कभिन्न माणसाकडे नजर गेली. सहज म्हणून पुस्तके न्याहाळायला सुरूवात केली. त्या ढिगातच एक ३०-४० पानांचं एक जुनाट असं ते पुस्तक होतं. मुखपॄष्ठावर नजर खिळ्ली. त्यावरच्या रेखाचित्रातला चेहरा ओळ्खीचा वाटला. बराच वेळ मी ते चित्र पहात होतो.
"लेने का है क्या ?" त्या काळ्या माणसाचा गुरगुरत आलेला प्रश्न. मी किंमत विचारली. पैसे दिले आणि स्टॅडच्या दिशेला वळलो.
घरी कोणी नव्हतंचं. त्यामुळे निवांतपणा होता. बॅग कोपर्‍यात ठेऊन वॉश घेतला. उद्या रविवार. मस्त भटकून आरामात झोपू... हा एक नेहमी दाबून ठेवलेला विचार उसळी मारून वर आला. म्हटल आज संधी आहे. बाहेर पडलो.

रात्री नाक्यावरच्या कोकण किनार्‍यात पोहोचला तेव्हा बरीच सामसूम होती. जेवून निघालो ते थेट घरी. वॉचमन डुलक्या काढत होता. त्याला जागवून घरी पोहोचलो. पलंगावर अंग टाकलं आणि मघाशी बॅगेत टाकलेले पुस्तकं आठवलं.

पुस्तक घेऊन उभ्या उशीला टेकलो. मुखपॄष्ठावरचा चेहरा निरखत असतानाच लक्ष समोरच्या आरशात गेलं. तो मीच होतो. का कुणास ठाऊक..पण एक थंड लहर रक्तात धावल्यासारखी वाटली कार्ण रेखाचित्राच्या गळ्याभोवती फास होता. वर रक्ताळलेली अक्षरे.. बळी. लेखकाचे वर नाव नव्हते. मी पाठची बाजू पाहीली. काळ्या कागदाने ती पुर्ण झाकली होती. मी पुस्तक उघडलं. पहिलं पान कोरं होतं. बाहेरून जुन्या वाटणार्‍या त्या पुस्तकाचा आतील शुभ्रपणा नजरेत भरणारा होता. दुसर्‍या पानावर लिहील होतं...."फक्त तुमच्यासाठी". अशी अर्पणपत्रिका माझ्यासाठी नवीन होती. पान पलटत असताना हात थरथरल्यासारखा वाटला. तिसर्‍या पानाच्या मध्यावरून सुरूवात होती..
"मी राघवेंद्र इनामदार.."

.....छे !! शक्य नाही. माझचं नाव्...मला अस्वस्थ झाल्यासारखं वाटलं. कपाळावर घामाचे थेंब जाणवले. वर पंखा चालू होता. मी पुस्तक मिटलं. योगायोग दुसरं काय ? दुसरं काहीच नाही. पुस्तक बाजूला ठेवलं. थोडं पाणी प्यायलो. बरं वाटलं. मी या पुस्तकाला घाबरलो की काय ??? छे..छे.. पुस्तकाला काय घाबरायचं ?वाचूया..पाहू तरी पुढे काय लिहीलय ??? मी पुन्हा पुस्तक उचललं.
........मी राघवेंद्र इनामदार. सध्या कल्याणला असतो. तीन वर्षापुर्वीच येथे आलो. तसा मी मु़ळचा नागपुरचा. माझा मॅनेजमेंटचा कॉर्स पुर्ण झाला आणि वडिलांच्या ओळ्खीने नोकरीचं जमलं. पण ऑफिस मुंबईला. ऑफर चांगली होती. नकाराचा प्रश्नचं नव्हता. वडिलांचा होकार होताच. नाही...नाही...म्हणता शेवटी आई ही तयार झाली. वडिलांनीच या फ्लॅटची तजवीज केली. सगळ आयतं. घरापासून लांब..तेही एकटं.. हाऊ ऍडवेंचरस... अनोळ्खी माणसं...अनोळ्खी जागा...असं काहीसं डोक्यात तरळलं आणि मी पोहोचलो येथे. कल्याणला.

..............दरदरून घाम फुटला.सगळं तंतोतंत जुळत होतं. आत्मचरित्र वाचतोय असं वाटायला लागलं. मनाचा गोंधळ उडाला होता. हे कसं शक्य आहे ? माझ्याबद्द्ल एवढं ...नाही माझ्याबद्द्ल कसं असेल ते ? कि माझ्या एखाद्या परिचिताने खुबीने माझी माहीती वापरून हे लिहीलं असेल. हे शक्य आहे. हेच असेल................

सुरूवातीला थोडं जड गेलं. एकटयाने राहण्याची ही पहिलीच वेळ. स्वतःचं सगळं स्वत:च आवरायचं. पण हे सारं सुरूवातीलाच. नंतर मात्र मी सरावलो. सारं सुरळीत झालं. फक्त ओळ्खी वाढल्या नाहीत. स्वभावाने मी तसा एकलकोंडाच. एकट्याने फिरणे, वाचन करणे हे माझे शौक. मित्रांच्या घोळक्यात असा मी नसायचोच. त्यामुळे माझी सगळी गुपिते माझ्याच मनात. कारणाशिवाय शेजार्‍याकडे ओळ्ख करून घेणे मला आवडत नाही. हे बहुधा शेजार्‍यांच्या लक्षात आलं होतं, त्यामुळे कोणी माझ्या घरात डोकावण्याचा प्रयासही केला नाही. पण माझ्यासारख्या एकलकोंड्या आणि शांत जीवन जगणार्‍या माणसाच्या आयुष्यात असं काही होईल याचा कधी विचार स्वप्नातही मी केला नव्हता. पण जे घडायचं असते ते कोणीही टाळू शकत नाही. हेच खरे.

................एकेक गोष्ट जुळतेय. हा निव्वळ योगायोग ????शंका झटकून मी पुढे वाचायला सुरूवात केली.

गेले तीन महिने क्षणाचीही उसंत मिळाली नव्हती. प्रोजेक्ट फायनल स्टेजला होता. शेवटी एकदाचे फायनल प्रिंट सबमिट केलं आणि सोबत चार दिवसांच्या रजेचा अर्ज. शरीराला आणि मनाला विश्रांतीची नितांत गरज होती. अर्ज ताबडतोब मंजूर झाला. ऑफिसमधून निघालो आणि घरी जाण्यापुर्वी लायब्ररीतून चार पुस्तके उचलली. शिरवळकरांची. रहस्य कादंबर्‍या. फेवरेट माझ्या. शिवाय कोपर्‍यावरच्या स्टॉलवरून चार लेटेस्ट मॅगेझिन्स पण घेतली. झपाझप पावले टाकत मी सोसायटीजवळ पोहचलो. मनातल्या मनात न्यावयाच्या सामानाची उजळणी चालूच होती. ती वॉचमनच्या कॅबीनजवळ उभी होती. पाठी वॉचमन. संशयग्रस्त. मला पाहताच तिच्या चेहर्‍यावर स्मित पसरलं. ती दोन पावले पुढे सरली. मी माझ्या विंगच्या दिशेला वळ्लो.
"एक मिनिट. प्लीज." तिचा आवाज मंजूळ होता. मी वळलो. ती सुंदर होती. पण मला तिला न्याहाळत बसण्याइतका ही वेळ नव्हता. शिवाय ज्याला गेल्या तीन वर्षात कुणी हॅलो बोलायला आलं नाही, त्या माणसाला एक सुंदर तरूणी चक्क आवाज देतेय यावर त्या वॉचमनचाही विश्वास बसत नव्हता व हे त्याच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होतं. त्यामूळेच मी जास्त अवघडलो. त्याचा कम्प्लीट वॉच आम्हा दोघांवरच होता.
"मी ?" माझ्या चेहर्‍यावर प्रश्नचिन्ह.
"हो" ती जवळ्जवळ धावतच माझ्या दिशेला आली.
"मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचयं" ती जवळ येताच म्हणाली.
"हे पहा, मला बाहेर जायचयं. माझ्याकडे वेळ आधीच कमी आहे. हवं तर चालत चालत बोलू." मी ब्याद टाळण्याचा प्रयत्न केला.
"चालेल." आम्ही एव्हाना वॉचमनपासून बरेच लांब आलो होतो. मी विंगमध्ये शिरताना वळून पाहीलं. वॉचमन अजून आमच्याकडेच पहात होता.
तिच्या भावाने म्हणे आमच्या ऑफिसमध्ये जॉबसाठी ऍप्लाय केलं होतं. तो जॉब त्याच्यासाठी मस्ट होता. भावासाठी साकडं घालायला ती माझ्यापर्यंत पोहोचली. मला तिच्या त्या आगाऊपणाची चीड आली होती. शिवाय तिचं असं मला येऊन भेटणं म्हणजे माझ्याबद्द्ल तिला काहीतरी भलती सलती माहीती कोणीतरी पुरवल्याचं फलित आहे हे मला जाणवलं होतं. मी कसंबसं तिला मार्गाला लावलं आणि घरात शिरलो.
रात्री साडेदहाला जेव्हा मी निघालो तेव्हा वॉचमन बदलला होता. मी थेट अलिबागला गेलो. चार दिवस निवांत घालवले. कसली कटकट नाही..गोंगाट नाही..फक्त मी..समुद्र्..आणि एकांत. आयुष्यातले सर्वात सुंदर असे ते चार दिवस.
पण ही शांतता वादळापुर्वीची होती. पुढे काय होणार याचा जराजरी अंदाज लागला असता तर मी अलिबागवरून परत घरी गेलोच नसतो. पण...

.................माझी झोप आता पुर्ण उडाली होती. कारण आता हा योगायोग उरला नव्हता. कथेतला राघवेंद्र इनामदार दुसरा तिसरा कोणी नसून मीच होतो. ............

सोमवारी संध्याकाळी मी घरी पोहोचलो. टॅक्सीतून उतरणार तोच एक खर्ड्या आवाजात हाक आली.
"मि. इनामदार ?" मी वळलो. त्या दिवसाच्या वॉचमनबरोबर एक धिप्पाड माणुस उभा होता.
"तुम्ही राघवेंद्र इनामदार ?" तोच धिप्पाड माणुस.
"आपण ? " मला शेजारी उभ्या वॉचमनच्या डोळ्यातला भाव अस्वस्थ करून गेला.
"पोलिस." त्याने माझा दंड पकडला. त्याच्या पकडीतली मजबूती मला जाणवली. " चला." तो गुरगुरला.
"कुठे ?' मी त्यातल्या त्यात धीर एकवटला.
"चौकीवर." त्याने जवळ जवळ खेचतच त्याच टॅक्सीत बसवलं. बघ्यांची एव्हाना गर्दी जमली होती. बहुतेक सोसायटीतलेच होते. घॄणा आणि विस्मय यांचा अजब संगम त्या नजरांमध्ये होता. लोक माझ्या दिशेला बोट दाखवून एकमेकांना माहीती पुरवत होते. मला काय चाललय त्यातलं एक अक्षर कळत नव्हतं. काहीतरी भयंकर घडलय एवढं मात्र जाणवलं.
चौकीत मी खुर्चीत अंग चोरून बसलो होतो. 'स. क. वाघमारे' ही नेमप्लेट इन्स्पेक्टरच्या छातीवर दिसत होती. बराच वेळ हातातल्या फायलवर रोखलेली नजर नंतर त्याने माझ्यावर रोखली.
"खुन का केलास तिचा ?" सपकन घाव घालावा तसा त्याचा तो प्रश्न. वाटलं उभा चिरतोय हा.
"क्...कुणाचा ?" माझ्या नकळत माझ्या तोडून प्रतिप्रश्न बाहेर पडला.
माझ्यावर रोखलेली नजर न काढता त्याने एक फोटो समोर फेकला. मी फोटोकडे पाहीलं. तो तिचाच फोटो होता. मी तो चेहरा ओळखलाय एवढं त्या इन्स्पेक्टरच्या अनुभवी नजरेने ओळखलं. दोन्ही हात टेबलावर ठेवून त्याने पुढे सरत पुन्हा विचारलं. "खुन का केलास तिचा ?"
'मी...मी नाही. मला यातलं काहीच माहीत नाही. मी आजच अलिबागवरून आलोय. आत्ताच." वाक्य संपल आणि एक जबरदस्त चपराक कानशीलात बसली. मी खुर्चीसकट कोलमडलो. क्षणभर डोळ्यासमोर अंधार होता.
"कुरणे, तुम्हाला एवढी घाई कसली असते ?" वाघमारेचा आवाज. त्या कुरणेने, मघासचा धिप्पाड माणूस, मला खुर्चीसकट सरळ केलं.
"मी हा खुन केला नाही. मला काहीच माहीत नाही." मी चुरचुरणार्‍या गालाच्या वेदना विसरत ओरडलो.
"तुच." माझा गळा आवळत कुरणे ओरडला." गुरूवारी रात्री तिचा खुन करून तू पळालास, तो आज उगवलास. सांग का मारलसं तिला ?" त्याच्या हाताचा दाब गळ्यावर वाढला.
"माझ्यावर विश्वास ठेवा. माझा यात काहीच संबंध नाही." माझा स्वर रडवेला झाला.
"तुझ्या घरात, तुझ्या पलंगावर, तुझ्या चाकूने तिचा खुन झाला आणि तू म्हणतोस तुझा यात काहीच संबंध नाही. तुला काय वाटल आम्ही अलिबागवरून आलोय."
तो आता माझाच खुन करील असं मला वाटायला लागलं.
"मी तिला ओळ्खत ही नाही." मला माझाच आवाज दूरून आल्यासारखा वाटला.
"ओळ्खत नाहीस ? मग त्या दिवशी तुम्ही दोघे बोलत एकत्र बिल्डींगमध्ये कसे शिरलात? कोणतं महत्त्वाचं काम होत तिचं तुझ्याकडे?" त्याच्या गुरगुरण्यात फरक पडत नव्हता. हे सारं वॉचमनचं काम हे मी ओळखलं.
"मी खरच तिला ओळ्खत नाही. मी तिचा खुन कशाला करीन ? " मी अजून माझी बाजू लावून धरली होती, पण त्यात त्राण नव्हतं.
"मी सांगतो ना का ते ..............." त्याने सुरूवात केली आणि मी एक काळोख्या डोहात डुबून गेलो.

.................मी पुर्णपणे घामाने डबडबून गेलो होतो. श्वासांचा वेग वाढला होता.............

ज्या चक्रव्युहात मी अडकलो होतो, त्याचा भेद करण्यासाठी त्याची माहीती मिळवणे गरजेचे होते. मी ती मिळवली. तिचं नाव जेनी होतं. पोलिसांच्या माहीतीप्रमाणे ती एक कॉलगर्ल होती. ती माझ्यासोबत सोसायटीत शिरल्यावर परत बाहेर आलीच नाही. त्यामुळे ती माझ्याबरोबर माझ्या घरीच गेली हा तर्क. वॉचमनच्या साक्षीने. मी रात्री निघून गेल्यावर दुसर्‍या दिवशी सहाव्या मा़ळ्यावरचे आचरेकर त्यांच्या कुत्र्याला घेऊन सकाळी फिरायला निघाले. तेव्हा त्यांचा कुत्रा नेमका माझ्या फ्लॅटजवळ येऊन भुंकायला लागला. संशयाच्या आघारे पोलिसांना पाचारण करण्यात आलं. तेव्हा माझ्या फ्लॅटमघ्ये माझ्याच पलंगावर तिचे प्रेत सापडले. चाकू छातीत खुपसण्यात आला होता. चाकूवर माझ्या हाताचे ठसे होते. घरात तिचेही ठसे सापडले. पण तिसर्‍या माणसाच्या मागमूस नव्हता. माझ्याविरूद्ध आरोपपत्र तयार होतं. थिअरी सिंपल होती. तारूण्याची मौज म्हणून आमचे संबंध होते. नंतर बदनामीच्या नावाखाली तिने मला ब्लॅकमेल करायला सुरूवात केली. माझं लग्न ठरलं होतं. यामूळे नोकरीही धोक्यात आली असती. बदनाम होऊन जगण्याएवजी तिला संपवण्याचा मार्ग सोपा होता. म्हणून मी तिला घरी नेलं. खुन केला व पळून गेलो. मग प्रेताची विल्हेवाट लावायला मी परत आलो आणि पोलिसांच्या जाळ्यात सापडलो. पोलिसांचा साधा सरळ हिशोब.

वडिलांनी मुंबईतल्या नामांकित कुलकर्णी वकीलांना ही केस सोपवली. कुलकर्णी मला भेटायला आले तेव्हा मी पुर्ण निराशावस्थेत होतो. मला यातून बाहेर पडण्याचा काहीच मार्ग दिसत नव्हता. त्यानी तपशीलवार मला सगळं विचारलं. सांगता-सांगता घशाला कोरड पडली. त्यांच्या सांगण्यावरून हवालदार पाणी घेऊन आला.
मी हवालदाराने पुढे केलेला ग्लास घेऊन संपवला व कुलकर्णी म्हणाले," बॉय यु विल बी आऊट सुन." त्यांचा तो दिलासा मला उमेद देऊन गेला.
केस कोर्टात उभी राहीली. तुरूंगातला एकटेपणा असह्य होता. जे होवो ते होवो पण निकाल लागू दे, या निर्णयापर्यंत मी पोहोचलो. वडिल स्वतःला सावरून होते, पण आईची अवस्था फार वाईट झाली होती.
सरकारी वकीलाने केस मांडली. साक्षीपुरावे झाले. उलटतपासणी झाली. पण मला अजून कुलकर्णीच्या त्या वाक्याचा आधार सापडला नव्हता.
शेवटी कुलकर्णी बोलायला उभे राहीले."जेनीला माझ्या अशीलाबरोबर पाह्ण्यात आलं पण त्याच्या घरात, त्याच्या सोबत शिरताना पाहणारा कोणी साक्षीदार नाही. माझ्या अशीलाबरोबर यापुर्वी तिला पाहणारा एकही साक्षीदार नाही. घरातल्या चाकूवर माझ्या अशीलाचे ठसे असणे यात नवल नाही."
"खुन दहा अकराच्या सुमारास झाला तेव्हा आरोपी घरात होता व खुन त्याच्याच घरात झाला आहे." इति सरकारी वकील्.
"मान्य. पण साडेदहाला माझा अशील टॅक्सीस्टँडवर होता. ते मी सिद्ध केलय. खुन त्याच्या घरात झाला म्हणजे तोच खुनी असे म्हणण्यात काही अर्थ नाही. जेनी
माझा अशीलाला त्या दिवशी का भेटली हे त्याने सांगितलेच आहे. तो गेल्यावर जेनी दुसर्‍या कोणाबरोबर डुप्लीकेट चावीचा वापर करून माझ्या अशीलाच्या घरात शिरली असावी. त्यावेळेस त्या दुसर्‍या व्यक्तीने तिचा खुन केला असावा. जेनीसारख्या स्त्रीला शत्रूंची कमी नसावी."
"हे एखाद्या रहस्य चित्रपटाच्या कथेसारखे वाटतेय." इति सरकारी वकील.
" माझा अशील एक सुशिक्षित तरूण आहे. इतका मुर्ख नक्कीच नाही की तो स्वतःच्या घरात एखादा खुन करेल, सगळे पुरावे मागे ठेवेल व पळून गेल्यावर पुन्हा घरी येईल. तरी तुमच्या समाधानासाठी मी शेवटचा साक्षीदार बोलावतो."
साक्षीदाराच्या पिंजर्‍यात आता डॉ़क्टर होते.
"तुमच्या रिपोर्टप्रमाणे खुन मोठ्या आकाराच्या चाकूने झाला असून खुनी इसमाने मयताचे डाव्या हाताने तोंड दाबले व उजव्या हाताने चाकूचा वार केला." कुलकर्णी.
"बरोबर."
"तोंड उजव्या हाताने दाबून डाव्या हातानेही वार करता येतो. " कुलकर्णी.
"हो. पण या केसमध्ये ते शक्य नाही. मयताची लिपस्टिक डाव्या बाजुला पसरली होती व वार छातीत डाव्या बाजूस तिरपा होता. शिवाय हा खुन घाईत झालाय. त्यामुळे खुनी इसमाने खुन करताना कोणतीही दिशाभूल करणारी गोष्ट केली नाही."
"पण वार समोरून करून लिपस्टिक हाताने पसरवता येते." कुलकर्णी गोंधळ वाढवत होते.
"लिपस्टिक हाताने पसरवणं शक्य आहे. पण घाईत समोरून केलेला वार छातीत नसून पोटात होईल किंवा हात उगारून जर वार केला तर जखम वरून खाली अशी होईल. पण माझ्या अनुभवावरून मी सांगतो की मी लिहीले आहे तसाच हा खुन झाला आहे. यात दुमत नाही. "
"सरकारी वकीलांना हा रिपोर्ट मान्य आहे." कुलकर्णी आता सरकारी वकीलांकडे वळले.
"हो." सरकारी वकील ठाम.
"मग प्रश्नच मिटला." एवढ बोलून कुलकर्ण्यांनी समोरच्या टेबलावरच पुस्तक माझ्याकडे भिरकावलं. मी ते हवेतच धरलं.
"केस इज क्लियर. माझा अशील डावखुरा आहे." कुलकर्णी विजयी मुद्रेने खुर्चीत बसले.
संशयाचा फायदा मिळाला व मी सुटलो. नोकरीत ट्रान्सफर घेतली व नागपुरात परतलो. शहर सोडलं व नव्याने सुरूवात केली...............

............मी डोळे मिटले. क्षणभर विसावलो. मग पान पलटलं. पुढच्या पानावर दुसरी कथा होती. वीस वर्षापुर्वी घडलेल्या सत्य घटनांवर आधारित पुस्तक होत ते. एकूण पाच घटना. प्रत्येक घटनेच्या मुख्य आरोपीला निवेदक बनवून कथा सादर केल्या गेल्या होत्या. ऐकीव व छापील माहीतीवर आधारित. मी डोळे मिटले..

..........जेनी खरचं सूदर होती. पण तिचा व्यवसाय मला माहीत नव्हता. मी लग्नाचाही विचार केला होता. पण खरं कळल्यावर मी संबंध तोडले व तिच्याकडे असलेले सारे पुरावे हस्तगत केले. माझ्याकडील सार्‍या गोष्टी जा़ळून टाकल्या. पण तिला खरचं माझ्याशी लग्न करायचं होतं. म्हणून मला शोधत ती त्या दिवशी प्रथमच घरी आली. आम्ही बाहेर भेटायचो व माझे कुणाशी काहीच संबंध नसल्याने ही गोष्ट दोघातच होती.
तिने तेव्हा बाबांच पत्र पाहीलं. माझं लग्न ठरलं हे कळताच ती बिथरली. तिचा आवाज चढताच मी डाव्या हाताने तिचं तोंड आवळलं आणि काही कळायच्या आतच चाकू तिच्या शरीरात होता. नको ते करून बसलो व मग हादरलो. बाहेर पडलो. सरळ टॅक्सी करून बस पकडायला गेलो. तिच्या घरी काही असेल असे मनात येताच तिच्या घरी गेलो. तिच्या कुलूपाची डुप्लीकेट चावी माझ्याकडे नेहमी असायची. रहस्यकथा वाचून थोडी अक्कल आली होतीच. ठसे येणार नाही याची काळजी घेऊन उरल्या सुरल्या सार्‍या खूणा घेऊन निघालो. पण तिचं प्रेत माझ्या घरी होते. माझं फसणं साहजिक होतं. शेवटी विल्हेवाट लावायला मी परतलो. पण तोवर आचरेकरांच्या कुत्र्याने घोळ केला.

लेखकाने माझा जवाब व इतर माहीतीचा वापर करून खुबीने कथा रचली. पण सत्य फक्त मलाच माहीत होते.

जन्मापासून मी डावखूराच. सगळे डावरा म्हणायचे, याचा राग. त्यामुळेच सर्वापासून दूर होत गेलो. म्हणूनच नकळत उजव्या हाताचा वापर करायला सुरूवात केली. सराव जमला ही होता. त्यादिवशी डाव्या हाताने तिचं तोंड दाबल्यावर उजव्या हाताने चा़कू उचलण्याशिवाय पर्यायच नव्हता. प्रयत्नाअंती काहीही शक्य होते. करून बघा.

गुलमोहर: 

मस्त लिहिलंय.

*************************************************************
मनापासुन.............मनापर्यंत
*************************************************************
प्रिया

नमस्कार...

कौतुक शिरोडकर...
कथा छान आहे... पण खरंच तुमची आहे का?...

कारण याच कथेवर बेतलेला जोएल शूमाकर ने दिग्दर्शित केलेला आणि जिम कॅरी च्या अभिनयानी नटलेला 'द नंबर २३' नामक सिनेमा साधारण दीड वर्षापूर्वी येऊन गेला...
भारतात हा सिनेमा लागला नाही... पण इंटरनेटच्या माध्यमातून हा पहायला उपलब्ध आहे...

आपली कथा जर या कथेवर बेतलेली असेल तर तसे खुल्या दिलाने नमूद करा....
अथवा आपल्या कथे प्रमाणे खास आपल्यासाठीच तर ही कथा लिहिली गेली नाही ना....?

_______
नमस्ते लंडन

प्रिय ankyno1,

ही कथा माझीच आहे. जर उचलेगिरी असती तर नक्कीच तसं लिहीलं असतं. मी माझ्या कवितामध्ये माझ्या प्रेरणा ही स्पष्ट मांडतो. एवढया स्पष्टपणॅ विचारलतं त्याबद्दल मी आभारी आहे.

वाव अल्टिमेट

वाव अल्टिमेट

कौतुक...

जर तुमची स्वतःची कथा असेल तर न्यू लाईन सिनेमा, जोएल शूमाकर आणि फर्नले फिलिप्स (लेखक) यांच्याविरुद्ध केस करा...
अहो चक्क तुमच्याच कथेवर सिनेमा बनवलाय त्यांनी... तो ही दीड वर्षापूर्वी...
म्हणा सिनेमा पडला... पण तरी काय झालं... चोरी ती चोरीच....

_______
नमस्ते लंडन

प्रिय ankyno1
सल्ल्याबद्दल आभारी. या कथेचे चार वर्षापुर्वीचे हस्तलिखित माझ्याकडे आहे. पण मी यापुर्वी कधीही ही कथा कुठे प्रकाशित केली नाही. त्यामुळे या नस्त्या उठाठेवीत रस नाही. शिवाय एकच कल्पना दोन वेगवेगळ्या व्यक्तींना सुचण्यात नवीन काहीच नाही. लवकरच माझी 'भीती' ही कथा मी सादर करेन, तेव्हा तुम्ही न विसरता प्रतिसाद द्यावा ही नम्र विनंती.

कौतुक .... पटलं मला ... किप इट अप ....

देवनिनाद

कौतुक, चांगली कथा. पण मला Richard Gere, Edward Norton यांच्या Primal Fear शी तो पहिला पुस्तकाचा भाग वगळता खूप साम्य वाटले (तू तेथून उचलली आहेस असे म्हणत नाही) - विशेषतः शेवटचा ट्विस्ट. पाहिला नसशील तर जरूर पाहा तो, तुलाही जाणवेल.

स्रुजनाला नेहमीच टिकेला सामोरे जावे लागते. तुम्ही कश्याचाही विचार न करता लिहीते रहा. तुम्ही तुमच्या मनाशी मात्र प्रामाणिक रहा... नेहमीच !

लगे रहो उच्लते रहो
चोरी करोगे तो पकदे जओगे

सायबा, इथेही आपली नाळ जुळतेय असं दिसतंय.
मी देखील सु.शि. चा पंखा आहे. विशेषतः अमर विश्वास...
चांगलं आहे, चालु द्या.

आता थोडेसे कथेबद्दल,
बाकी सर्व उत्तमच जमलंय, फक्त लिपस्टिकचा मुद्दा तवढा खटकतो.
डाव्या हाताने तोंड दाबल्यावर साधारणपणे ज्या व्यक्तीचे तोंड दाबलेले आहे त्या व्यक्तिच्या चेहर्‍याच्या डाव्या
बाजुला तुमच्या हाताच्या अंगठ्याचा भाग तर इतर चार बोटे चेहर्‍याच्या उजव्या बाजुला येतात. तेव्हा लिपस्टिक उजव्या बाजुला पसरण्याची शक्यता अधिक असते, जर तुम्ही डाव्या हाताने त्या व्यक्तीचे तोंड दाबले असेल तर.
Correct me if I am wrong!

बाकी कोण काय म्हणते याची पर्वा करु नको. फक्त मनापासुन लिहीत राहा.

सुंदर !

विशाल कुलकर्णी.
नवी मुंबई.

विशाला, नव्या मुंबईत आहेस कुठे ? भेट कधीतरी. फार संशयी स्वभाव आहे रे तुझा.
हल्लेखोर डावखुरा असल्याने त्याच्या डाव्या हाताची पकड घट्ट असणारचं. बेसावध पाठमोर्‍या व्यक्तीच्या जर डाव्या बाजूने हात घेऊन त्याचे तोंड आवळले तर ती व्यक्ती उजवीकडेच तोंड फिरवते कारण डावी बाजू बंदिस्त आहे. त्यातच हल्लेखोराच्या उजव्या हाताची हालचाल होण्याआधी निसटण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे या प्रयत्नात लिपस्टिक डाव्या बाजूला पसरते. तू हा प्रयत्न करून बघ. न सांगता. पण नंतर मार खाल्लास तर मी जबाबदार नाही. कळव न विसरता.

Pages