जाहिराती अधिकृत की अनधिकृत?

Submitted by सागर on 12 August, 2012 - 04:13

मायबोलीचे वेबपेज उघडल्यावर उजव्या बाजूला (आणि बर्‍याचदा मुख्य पानाच्या वरती) ज्या जाहिराती येतात (Ads by Google नव्हे) त्या अधिकृतपणे येतात की गुगलच्या काही सुविधा वापरल्यामुळे येतात? (उदा. शादी.कॉमची जाहिरात या क्षणी मुख्य पानावर आहे)
मी ब्राऊजर बदलून पाहिला तरी त्या जाहिराती आल्याच (क्रोम वापरल्याने जीमेलवरील जाहिराती वाढल्या होत्या तो अनुभव आहे)
यावर काही उपाय करता येईल का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपण याच विषयावरचे दोन धागे उघडलेले आहेत. यातला कुठला अधिकृत आणि कुठला अनधिकृत ?
उपाय - मायबोली न उघडणे. उघडल्यास इथे तिथे क्लिक न करणे.

या सर्व जाहिराती अधिकृत आहेत. या जाहिरातीमधून मिळणार्‍या उत्पन्नामुळे काही प्रमाणात मायबोली चालवण्याचा खर्च भरून निघतो आहे. आणि तुम्हाला मायबोली विनामूल्य वापरता येते आहे.

मायबोलीच नाही तर कुठलेही मोठे प्रकाशन चालू राहण्यासाठी, जाहिराती हा एक महत्वाचा भाग आहे.

फक्त मायबोलीच्याच नाही, तर कुठल्याही प्रकारे मोठ्या प्रमाणात मराठी आंतरजालाच्या अस्तित्वासाठी या जाहिराती आवश्यक आहेत. मराठी जाहिराती वाढत आहेत तसे मराठी भाषिकांसाठी नवीन नोकर्‍या अस्तित्वात येत आहेत हेही लक्षात ठेवले पाहिजे. जितक्या जास्त मराठी वेबसाईट जाहिराती दाखवतील, आणि त्या जाहिरातींवर जितक्या जास्त क्लीक मिळतील तितक्या जास्त प्रमाणात या उद्योगावर जास्त गुंतवणूक होऊ लागेल. थोडक्यात मायबोलीवरच्या जाहिरातींचा जाहिरातदारांना फायदा झाला , तर फक्त मायबोलीचेच नाही तर इतर अनेक मराठी वेबसाईट, मराठी सोशल नेटवर्किंग साईट, मराठी जाहिरात संस्था, त्या जाहिराती तयार करणारे कलाकार, तंत्रज्ञ यांचेही भले होणार आहे. या पूर्वी सुरु झालेल्या अनेक मराठी वेबसाईटस त्यांना जाहिरातीतून पुरेसे उत्पन्न मिळू न शकल्यामुळे बंद पडल्या आहेत.

वेमा
अचूक उत्तर. वेमांना अशा प्रकारे उत्तर देण्यासाठी आपला वेळ खर्च करावा लागला याचं वाईट जरूर वाटतंय. सदस्यांनी आपला विवेक वापरून धागे काढायला काय हरकत आहे ? टाटा स्कायचं कनेक्शन पैसे भरून घेतील आणि जाहिरातीही पाहतील पण जे संस्थळ दुसरं कुणीतरी चालवतंय तो आपल्याकडून एक पैसाही घेत नाही याचं भान न बाळगता जाहिरातींचा त्रास होतो म्हणून तक्रारी करतील. मानवी स्वभाव आहे शेवटी.. इलाज नाही.

किरण, अगदी सहमत ... शिवाय , चॅनेलवरच्या जाहिराती कंप्ल्सरी पहाव्या लागतात .. आपला वेळ जातो.. इथे तसे काही होत नाही... जाहिरात क्लिक नाही केली की झालं...

ऑनलाईन जाहिरातींवर क्लीक केले तरच जाहिरातदार त्यांना प्रतिसाद मिळतो आहेत असे समजतात. आणि तरच मायबोलीला (किंवा कुठल्याही प्रकाशकाला) त्यातून आर्थिक फायदा होतो. याचा अर्थ असा नाही तुम्हाला नको असताना प्रत्येक जाहिरात तुम्ही क्लीक करावी असे मी सांगतोय. कारण त्यातून जाहिरातदाराला खरा प्रतिसाद मिळत नाही. पण "जाहिराती क्लीक करू नका म्हणजे झाले" असे वर सांगितले आहे तेही पूर्ण चुकीचे आहे.

जाहिरातदार मायबोलीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. त्यातल्या काही जाहिराती तुम्हाला योग्य वाटतील काही योग्य वाटणार नाही. ज्या तुम्हाला योग्य वाटतील त्यावर क्लीक केले तर सगळ्यांचाच फायदा आहे. तुम्हाला हवी असलेली सेवा सुविधा किंवा त्याबद्दल माहिती मिळेल, जाहिरातदाराला ग्राहक मिळेल आणि मायबोलीलाही त्यातून काही पैसे मिळतील.

(फक्त जाहिरात नुसती दाखवली तरी पैसे देऊ अशी तयारी असणारे जाहिरातदार असतात/असायचे. पण दिवसेंदिवस त्यांचे प्रमाण कमी होत जाऊन ते अगदी नगण्य झाले आहे. आजकाल प्रत्येक ऑनलाईन जाहिरातदाराला क्लीक्स हव्या असतात, तरच ते पैसे देतात.)

ज्याना जाहिराती पहायच्या आहेत, ते पाहू शकतात.

ज्याना नाही ते टाळू शकतात. पण चॅनेलच्या जाहिराती पहाव्याच लागतात, या अर्थाने माझे वाक्य आहे. कृपया गैरसमज नसावा.

मला लर्न इंग्लिश ची जाहिरात पहावीशी वाटली, मी ती पाहिली.

मास्तर एक प्रश्न, माहीत नाही म्हणुन विचारतोय , आपण फक्त उपयोगी पडणार्‍याच जाहीराती नाही का सिलेक्ट करु शकत ? कारण बर्‍याचश्या जाहीराती अशा आहेत की मायबोलीकरांना त्यात अजिबात इंटरेस्ट नाही , जर आपण उपयोगी पडणार्‍या जाहीराती सिलेक्ट करु शकलो तर साहजीकच त्यावर मायबोलीकरांच्या क्लिकस पण वाढतील.

ज्याचा काही उपयोग नसतो, त्याच्याच जाहिराती अ‍ॅग्रेसिवली होतात आणि मग लोकानाही त्या हव्याशा वाटू लागतात Proud

जाहिरातींना माझा विरोध नाही हे नम्रपणे स्पष्ट करतो.
त्याचा त्रास होतो आहे असेही म्हणने नव्हते आणि नाही.

बर्‍याचदा आपण जो ब्राऊजर वापरतो त्यावरील माहिती वापरून जाहिराती दिल्या जातात ज्या आपल्या नियंत्रणात नसतात. Gmail आणि Google Chrome च्या बाबतीत असे अनुभव वारंवार येत आहेत.
मायबोलीवरही अशा अनधिकृत (किंवा प्रशासकांची परवानगी न घेता म्हणूयात) जाहिराती येत आहेत की काय असा प्रश्न पडला होता. त्याकरता एक दोन ब्राऊजर बदलून पाहिले आणि नंतरच प्रश्नाचा धागा उघडला.

यात मायबोलीच्या (किंवा कुठल्याही वेबसाईटवर) अर्थकारणाविषयी किंवा सस्टेनिबिलीटीविषयी शंका/प्रश्न नव्हते.
मायबोलीच्या संस्थाळावर असे काही घडत असेल (जाहिरातींच्या बाबतीत) तर ते प्रशासकांना कळावे आणि घडत असेक तर त्यावर योग्य ते उपाय करावेत एवढाच हेतू होता.

webmaster,
शंकेचे निरसन केल्याबद्दल धन्यवाद.

>>उपयोगी पडणार्‍या जाहीराती
तुम्ही कुकीज डिसेबल केल्या नसतील आणि क्रोमसारखे ब्राउझर वापरत असाल तर उपयोगी पडणार्‍या जाहीरातीच दिसतील. नुक्तेच शोधलेल्या गोष्टींविषयी, किंवा ऑनलाइन खरेदीच्या ठिकाणी बघितलेल्या वस्तुंच्या जाहिराती दिसतील. उदा. मी आज आमच्या नव्या घरासाठी बाथरूममधील वस्तू शोधत होते. तर मला सगळ्या जाहिराती बाथटब, बेसिन, नळ, शॉवर वगैरे गोष्टींच्याच दिसत आहेत.

@श्री
याचे मुख्य नसले तरी, थोडेफार कारण मराठी माणसाच्या मानसिकतेत आहे.
मायबोलीकरांना ज्यात इंटरेस्ट वाटू शकेल अशा जाहिरातदारांना, जाहिरात करणेच योग्य वाटत नाही. जाहिरातीमुळे जास्त ग्राहक मिळवावेत अशी इर्षा त्यांच्यात असेलच असे नाही. किंवा कदाचित ते स्वतः मराठी असल्यामुळे अशी जाहिरात त्यांनी केली तरी, मराठी लोक त्या जाहिरातीने आकर्षित न होता त्या जाहिरातींबद्दल नाकेच मुरडतील असे त्यांना वाटत असावे.

जे लोक जाहिरातीत पैसे गुंतवायला तयार आहेत त्यांना मराठी लोकांकडून जर प्रतिसाद मिळत नसेल, तर मराठी माणसाला योग्य वाटतील अशा जाहिराती करण्याचे कष्ट त्यांनी का घ्यावेत?

आणि एखादा मराठी माणूस जाहिरात बघून वस्तू/सेवा विकत घ्यायला आला आणि तो जर हिंदीत्/इंग्रजीत व्यवहार करत असेल तर तो मराठी जाहिरात वाचून आला आहे हे जाहिरातदाराला कळेलच असे नाही. पुन्हा मराठी माणूस फारसे काही विकत घेत नाही या गैरसमजात पुन्हा भर पडते. हे फक्त मायबोली किंवा ऑनलाईन जाहिरातींबद्दल नाही. इतर माध्यमातही हे अनुभव आले आहेत.

यावर काही उपाय करता येईल का?<< असे मूळ धाग्यात विचारले होते तेंव्हा या जाहिराती अनधिकृतपणे येत आहेत असा माझा गैरसमज झाला होता त्याबददल क्षमस्व.

<< ऑनलाईन जाहिरातींवर क्लीक केले तरच जाहिरातदार त्यांना प्रतिसाद मिळतो आहेत असे समजतात.
<< पण "जाहिराती क्लीक करू नका म्हणजे झाले" असे वर सांगितले आहे तेही पूर्ण चुकीचे आहे.

यानिमित्त्याने वरील दोन महत्वाच्या गोष्टी स्पष्ट झाल्या.

>तुम्ही कुकीज डिसेबल केल्या नसतील

अगदी बरोबर. जाहिरातदारही योग्य अर्थाने शहाणे होत चालले आहे. एकच जाहिरात, ज्याला ती बघायची नाही त्याच्या माथी पुन्हा पुन्हा मारून कायमचा त्याचा रोष ओढवण्यापेक्षा, त्या न दाखवणे चांगले, ज्यात इंटरेस्ट आहे त्याच दाखवणे योग्य हे त्यांना हळूहळू पटते आहे. (अर्थात सगळ्यांनाच हे शहाणपण अजून आले नाही.) पण ती नको असलेली जाहिरात तुम्हाला दाखवली गेली का नाही हे त्यांना कळण्याचा मार्ग , तुम्ही कुकीज डिसेबल केल्या असल्या तर नष्ट होतो.

<< ती नको असलेली जाहिरात तुम्हाला दाखवली गेली का नाही हे त्यांना कळण्याचा मार्ग , तुम्ही कुकीज डिसेबल केल्या असल्या तर नष्ट होतो. >>
म्हणजे लोकांनी कुकीज डिसेबल करू नयेत असं म्हणायचं आहे का?