ओ मेरे दिलके चैन

Submitted by स्वप्ना_राज on 21 July, 2012 - 10:54

'काय ग कुठे मारामारी करून आलीस की काय? काय ते केसांचं टोपलं झालंय' मी घरात शिरल्या शिरल्या माझा अवतार बघून भ्राताश्री उद्गारले. 'ए, गप् बस हं' मी आरश्यासमोर उभी राहून टोपलं निरखत म्हणाले. 'काय पण देवाने केस दिलेत. बसमधून येताना जरा वारा लागला की चहूदिशांना पांगतात.'. 'पण ती अरुणा काय खुश होती तुझ्या जावळावर.' इति आईसाहेब. हा संवाद आमच्या घरात वर्षातून किमान ३ वेळा होतो. त्यामुळे आम्ही दोघांनीही 'कोण अरुणा' हा प्रश्न विचारला नाही. अरुणा माझ्या जन्माच्या वेळी मॅटर्निटी होममध्ये असलेली एक नर्स. ती राजेश खन्नाची जाम चाहती होती. रोज सकाळी मला आंघोळीला घालून केसांचा नीट फुगा पाडून आईच्या खोलीत आणायची आणि म्हणायची 'हं, हा घ्या तुमचा राजेश खन्ना.' कधीमधी आईच्या आईसाहेब तिथे बसलेल्या असायच्या. पहिला नातू न झाल्यामुळे त्या जराश्या रुष्ट होत्या. मग लगेच त्या म्हणायच्या 'खन्ना कसला, खन्नी आहे ती'. राजेश खन्ना नावाचा भारतीय चित्रपटसृष्टीतला पहिला सुपरस्टार आणि मी ह्यांचं असं माझ्या जन्मापासूनचं नातं आहे.

राजेश खन्नाचा जन्म झाला २९ डिसेंबर, १९४२ मध्ये पाकिस्तानात. त्याचे वडील रेल्वे कॉन्ट्रेक्टर होते. ३ मुलींच्या पाठीवर लग्नानंतर १८ वर्षांनी झालेला हा मुलगा. २ वर्षांचा होईतो त्याचं जावळ काढलं नव्हतं. म्हणून तोवर त्याला बिचाऱ्याला न शिवलेले कपडे घालत. Happy छोटा राजेश लहानपणी दूध प्यायला नाराज असायचा. मग त्याच्या आईला त्याचं नाक दाबून त्याला दूधप्यायला लावायला लागायचं. इतकंच काय तर त्याने दूध प्यावं म्हणून ज्योतिषाच्या सांगण्यानुसार रोज सकाळी दूधाचा कटोरा घेऊन एक नोकर गावात एखाद्या काळ्या कुत्र्याला शोधून त्याला दूध पाजायला निघायचा म्हणे. हे ह्या महाराजांचे लहानपणीचे थाट. त्याचं कुटुंब नंतर भारतात आलं आणि जवळच्याच एका नातेवाईकाला त्याला दत्तक देण्यात आलं.

जन्माच्या वेळी सटवाईने त्याच्या कपाळावर जे लिहिलं होतं त्या हुकुमाची अंमलबजावणी करत नियतीने त्याला एका ड्रामा कंपनीत आणलं. जिथे तो ह्या तालमींना जायचा त्याच बिल्डिंगमध्ये गीता बालीचं ऑफीस होतं. तिने ह्याला पाहिलं आणि सिनेमात काम करणार का म्हणून विचारलं. हा हो म्हणाला. युनायटेड प्रोड्युसर्स आणि फिल्मफेअर मॅगेझीन ने आयोजित केलेल्या टॅलन्ट हंट मध्ये राजेश दहा हजारात निवडून आला. त्यावेळी हरलेल्या तरुणांत एक नाव विनोद मेहराचंही होतं. पण काही काल स्ट्रगल केल्यावरही अपेक्षित यश मिळेना तेव्हा पिताजींनी धमकी दिली की ५ वर्षात हिरो झाला नाहीस तर घरची फिल्म कंपनी सांभाळ. नशिब आपलं की 'आराधना' हिट झाला. खरं तर ह्या रोलसाठी आधी शक्ती सामंतांनी राजकुमारचा विचार केला होता. कारण राजेश खन्नाचा तारखांचा घोळ होता. पण राजेशने मूळ बंगाली चित्रपट पाहिला आणि सांगून टाकलं की हा रोल माझा आहे. And the rest, as they say, is History. Alistair MacLean चं पुस्तक हातात धरून ते वाचण्याचा निष्फळ प्रयत्न करणारी शर्मिला टागोर आणि ट्रेनला समांतर धावणार्‍या रस्त्यावरून चाललेल्या जीपमधून तिला बघून गाणं म्हणणारा राजेश खन्ना पाहून किती तरुण-तरुणींनी लांब पल्ल्याच्या प्रवासाची तिकिटं काढून 'भारतीय रेल' चा महसूल वाढवला असेल देवच जाणे. Wink राजेश खन्ना तर ह्या गाण्यात इतका क्यूट दिसलाय की ते व्यक्त करायला मला टोपीकरांच्या भाषेचा आधार घ्यावा लागतोय - He looked so yum that you could simply eat him up. पहा आणि खात्री करा - मेरे सपनोकी रानी Happy

aradhana.jpg

त्याच्या डोळे मिचकावण्यावर आणि मान किंचित तिरकी करून हसण्याच्या अदेवर तरुणी फिदा झाल्या नसत्या तरच नवल होतं. मुली त्याला आपल्या रक्ताने पत्रं लिहायच्या म्हणे. काही काही तर इतक्या वेड्या होत्या की त्या चक्क त्याच्या फोटोशी लग्न लावत आणि स्वत:चंच बोट कापून घेऊन स्वत:च्या रक्ताने 'मांगमे सिंदूर' भरत म्हणे. सकाळी बंगल्यातून बाहेर पडताना स्वच्छ असलेली त्याची इम्पाला संध्याकाळी परत येताना मुलींच्या लिपस्टिकच्या ठशांनी भरून गेलेली असायची म्हणे. हे सगळं मी ऐकून होते पण मला ते बरंचसं अतिरंजित वाटायचं. पण त्या दिवशी 'पुरानी जीन्स' वर आरजे अनमोल म्हणाला की त्याला सुजाता म्हणून एका स्त्रीचा फोन आला होता. तिने सांगितलं की तिनेही तिच्या तरुणपणी राजेशच्या फोटोशी लग्न लावलं होतं. खरं तर तरुणपणी आपण सगळेच कोणा ना कोणा सिनेकलाकारावर लट्टू असतो. मग वर्षं जातात आणि आपल्याच वेडेपणाचं आपल्याला हसू येतं. पण राजेशला असे चाहते लाभले की ते त्याचे जन्मभराचे चाहते झाले. ही सुजाता इतकी दू:खी होती की तिने ऑन-एयर अनमोलशी बोलायचं नाकारलं. फक्त तरुणीतच नव्हे तर त्याही पुढे जाऊन राजेशला आबालवृध्दात लोकप्रियता लाभली. 'उपर आंका, नीचे काका' असंच म्हणत म्हणे. त्याला एकदा डोळयांचे इन्फेक्शन झालं होतं. झालं! लोकांनी त्याच्या फोटोवर आय ड्रॉप्स टाकायला सुरुवात केली. त्याला ताप आला तर फोटोवर पाण्याच्या ओल्या घड्या ठेवल्या जाऊ लागल्या. पण सगळ्या चाहत्यांची गत म्हणजे 'प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यारा' तश्यातली. भले राजेश म्हणू देत ''ओ मेरे दिलके चैन, चैन आये मेरे दिलको दुआ किजीये'. त्याच्या चाहत्यांना मात्र बेचैन राहणंच पसंत होतं.

rajesh1.jpg

सगळ्यांची ह्र्दयं काबीज करून बसलेल्या ह्या काकाचं हृदय कोणी काबीज केलं? तर एका पार्टीत भेटलेल्या १५-१६ वर्षांच्या डिम्पल कपाडीयाने. त्यांची दुसरी भेट झाली ती मुंबई-अहमदाबाद दरम्यानच्या एका विमानप्रवासात. बरेचसे फिल्मस्टार्स त्या विमानात होते. आणि डिम्पलच्या शेजारची सीट रिकामी होती. तिथे एखादा ढेरपोट्या किंवा तोंडाचा भोंगा चालू असलेलं पोर घेतलेली लेकुरवाळी न बसता चक्क सुपरस्टार राजेश खन्ना बसला. राजेशने तिला प्रपोझ पण केलं ते एका बीचवर नेऊन. पण प्रत्यक्ष लग्नाची तारीख ठरली तेव्हा मात्र पठ्ठ्या काही रात्री झोपू शकला नाही - ह्या काळजीने की आपल्यापेक्षा १५-१६ वर्षांनी लहान असलेल्या मुलीशी लग्न करतोय हे बरोबर की चूक. योगायोग म्हणा किंवा काही. ह्याआधी राजेशने मुंबईच्या कार्टर रोडवरचा बंगला राजेंद्रकुमारकडून विकत घेतला होता. त्या बंगल्याचं नाव राजेंद्रकुमारने आपल्या मुलीच्या नावावरून ठेवलं होतं - डिम्पल. तो बंगला राजेशचा झाल्यावर 'आशिर्वाद' झाला. तुम्ही 'राजा रानी' मधलं 'मै एक चोर तू मेरी रानी' ऐकलंय? पंजाबी लोकांत उखाणा घ्यायची पध्दत असती तर राजेशने डिम्पलला उद्देशून हेच गाणं म्हटलं असतं असं मला ते ऐकताना नेहमी वाटतं. Happy

rajeshmarriage.jpg

राजेश खन्नाला 'काका' का म्हणतात माहित आहे? पंजाबीत छोट्या मुलाला 'काका' म्हणतात. घरातला सगळ्यात धाकटा म्हणून त्याला 'आई' काका म्हणायची. मग पुढे सगळेच त्याला 'काका' म्हणू लागले. तसं त्याचं मूळचं नाव 'जतीन'. 'राजेश' हे नाव त्याच्या वडिलांनी तो चित्रपटसृष्टीत येताना त्याला दिलं. 'सुपरस्टार' ही पदवी मात्र त्याला त्याकाळची प्रसिद्ध सिनेपत्रकार देवयानी चौबळ हिने दिली. तर ह्या 'काका'ला सकाळी लवकर उठायची अजिबात सवय नव्हती. परिणाम हा झाला की पहिल्याच फिल्मच्या शुटिंगच्या पहिल्याच दिवशी राजेश्री ३ तास उशिरा पोचले. चित्रपट होता 'राज' आणि त्याची हिरॉईन होती बबिता.

राजेशच्या स्वभावात एक खटयाळ मूल दडलं होतं. ह्याबाबत 'पुरानी जीन्स' वर अभिनेत्री सायरा बानूने एक किस्सा सांगितला. 'छोटी बहू' ह्या चित्रपटात राजेश खन्नाबरोबर ती काम करणार होती. पण ती आजारी असल्याने फक्त २ दिवसाच्या चित्रीकरणानंतर तिला चित्रपट सोडावा लागला. सेटवर पहिल्या दिवशी बरेच पत्रकार होते. सुपरस्टारबरोबर काम करायचं म्हणून सायरावरही नाही म्हटलं तरी दडपण होतंच. सगळे पत्रकार फोटो घ्यायला धडपडत होते तेव्हा राजेश म्हणाला 'तुम्हाला फोटोच पाहिजे ना? एक असा फोटो देतो की उद्याच्या सगळ्या पेपरात फ्रंट पेजवर हाच फोटो येईल.' त्याच्या हातात कोणीतरी चहाचा कप दिला होता. त्याने चहा बशीत ओतला. आणि एका बाजूने प्यायला सुरुवात केली. मग सायराबानूला म्हणाला तू दुसर्‍या बाजूने प्यायला सुरुवात कर. तिच्याच शब्दात सांगायचे तर 'दोन मांजरी दोन बाजूने बशीतून चहा पिताहेत' असं वाटत होतं. तो फोटो दुसर्‍या दिवशी सगळ्या पेपरात झळकला हे वेगळं सांगायला नकोच. राजेश खन्नाच्या स्वभावातली हीच मिश्कील बाजू दाखवणारं 'आपकी कसम' मधलं 'जय जय शिवशंकर' म्हणूनच मला फार आवडतं.

aapkikasam.jpg

त्याच्या ह्याच खेळकर स्वभावाची एक आठवण अभिनेत्री शबाना आझमीने सांगितली आहे. ते एकत्र शूट करत असताना एके दिवशी सकाळी राजेश सेटवर आला तेव्हा त्याच्या घोट्याला बॅन्डेज बांधलं होतं. अर्थातच तिने काय झालं म्हणून विचारलं तर 'घोड्यावरून पडलो' असं उत्तर त्याने दिलं. 'पण काल तर आपण एकत्र शुटींग केलं. मी नाही कुठे घोडा बघितला ते'. शबाना आश्चर्याने म्हणाली. ह्यावर राजेशने तिला 'चूप बस' म्हणून दटावलं. आणि मग बाकीचे लोक निघून गेल्यावर हळूच म्हणतो कसा 'अग, मी माझ्याच लुंगीत पाय अडकून धडपडलो आणि पाय मुरगळला. आता हे मी सगळ्यांसमोर कसं सांगणार?'. माझी खात्री आहे की हे म्हणताना त्याच्या डोळ्यात त्याची सुप्रसिध्द 'twinkle' असणार. 'आन मिलो सजना' तलं 'अच्छा तो हम चलते है' बघताना म्हणूनच त्याला म्हणावंसं वाटतं की अरे बाबा, तू हसायचा अन डोळे मिचकवायचा थांबलास तर ती घरी जाईल ना. आशा पारेखचीही कमाल. ती घरी जायला निघते तरी. आपण घरी नसतो गेलो बुवा Wink

माणसं पूर्णपणे ब्लॅक किंवा व्हाईट कधीच नसतात. पण ज्याला एखाद्याचा जसा अनुभव येतो त्यावरून तो तसं मत बनवतो. 'पुरानी जीन्स' मध्ये रमेश देव ह्यांनी 'आनंद' च्या शुटिंगच्या वेळचा आपला अनुभव सांगितला. त्यांचा राजेश खन्नासोबतचा पहिला शॉट होता त्यात ते त्याला 'अबे साले, बैठता क्यो नही?' असं काहीसं म्हणतात. हिंदी फिल्म इंडस्ट्री ज्याला सुपरस्टार म्हणून ओळखते त्याला एकदम 'साला' म्हणताना रमेश देवना अवघडल्यासारखं झालं होतं. पण तेव्हढ्यात राजेश खन्नाने त्यांना आपल्या गिरगावात रहात असल्याच्या दिवसांची आठवण करून दिली आणि हेही आवर्जून सांगितलं की ते मराठी फिल्म इंडस्ट्रीमधले हिरो होते म्हणून तो आणि त्याचे मित्र त्यांना बघायला मुद्दाम रस्त्यावर उभे रहात असत. छोटासाच प्रसंग पण त्यामुळे राजेशच्या स्वभावाचा एक वेगळा पैलू दिसतो. ह्याउलट सेटवर उशिरा येणार्‍या आणि 'मी वेळेत यायला आणि जायला क्लार्क नाही, सुपरस्टार आहे' असं म्हणून त्याचं समर्थन करणारर्‍या राजेश खन्नाचेही किस्से तीच फिल्म इंडस्ट्री सांगते. मग खरा राजेश खन्ना कुठला? राजेश खन्नाला जर कोणी हा प्रश्न विचारला असता तर त्याने कदाचित आपल्याच एका गाण्याच्या ओळी म्हणून दाखवल्या असत्या - 'कुछ तो लोग कहेंगे, लोगोंकां काम है कहना'.

rajesh_amarprem.jpg

काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. संध्याकाळी ऑफीसमधून निघाले होते. गाडीच्या प्लेयरवर जी सीडी लावली होती त्यात 'आनंद' आणि 'सफर'ची गाणी होती. एका कलीगला मध्ये त्याच्या घरी सोडायचं होतं. त्याने सीडीवरची गाण्याची लिस्ट पाहिली आणि डोक्यावर हात मारून घेतला. 'पागल हो गयी है क्या?' शामके वक्त ये गाने सुनते हुए घर जायेगी? रोती रहेगी पुरा टाईम्'. मी तेव्हा हसले आणि तो उतरून गेल्यावर मुद्दाम व्हॉल्युम आणखी मोठा केला 'मी कसली रडतेय, जगाला रडवेन' अश्या थाटात. पण आयुष्याची एक गंमत मला अजून कळायची होती. जगताना किती दु:खं असतात - कधी स्वत:ची, कधी जवळच्या लोकांची, कधी कधी तर कोणा अनोळखी माणसाचीसुध्दा. कधी एखादी इतकी छोटी गोष्ट असते की आपण दुखावलं गेलोय हेही लक्षात येत नाही बराच काळ. प्रत्येक वेळी आपण डोळ्यातून पाणी नाही काढत. बर्याचदा तेव्हढा वेळ नसतो, कधी आपलाच इगो असतो तर कधी जवळच्या लोकांना वाईट वाटू नये म्हणून ते पाणी आतल्या आत थोपवलेलं असतं. पण हे सगळं दू:ख जिरून जात नाही. ते साचून राहतं मनात आत, तळाला कुठेतरी. माझंही तेव्हा तसंच झालं होतं....माझ्या नकळत. म्हणूनच गाणी ऐकता ऐकता डोळ्यांना कधी धार लागली ते कळलंच नाही. माझ्याच गाडीत बसून मी पोटभर मनसोक्त रडून घेतलं. आणि अगदी मोकळं वाटतंय असं म्हणेपर्यंत सफर मधलं गाणं लागलं - 'नदिया चले चले रे धारा, चंदा चले चले रे तारा, तुझको चलना होगा'. मी पुन्हा गाडी सुरु केली आणि घर आल्यावर उतरले तेव्हा डोळे अगदी कोरडेठाक होते. मन स्वच्छ होतं. राजेश खन्नाच्या गाण्यांनी मला मनाचं Spring cleaning करायला मदत केली होती. मग भले तो म्हणेना का - Pushpa, I hate tears.

safar.jpg

लाखो तरुणींच्या गळ्यातला ताईत असलेल्या ह्या सुपरस्टारचं लग्न टिकू नये हा नियतीचा खेळ अजब खरा पण अगदीच अनोळखीही नाही. एका हाताने भरभरून देत असताना एखाद्या सावकारासारखं दुसरा हात पुढे करून त्याची भरमसाठ किंमत वसूल करायची हा तिचा जुना खाक्या आहे. 'आनंद' मधला ज्याचा पहिला शॉट बघून 'माझ्यानंतर कोणी सुपरस्टार होऊ शकत असेल तर हाच' असं ज्या अमिताभबद्दल तो म्हणाला त्याने लवकरच राजेशच्या सुपरस्टारपदावर आपला हक्क सांगितला. राजेश खन्नाच्या आईने 'आनंद' कधीच पाहिला नाही. कारण 'सफर' पाहिल्यावर ती आजारी पडली होती. म्हणून मग राजेश खन्नाने तिला शपथ घातली होती की ज्यां चित्रपटात त्याची व्यक्तिरेखा मरणार आहे तो चित्रपट तिने पहायचा नाही. त्याच्या चाहत्यांनी सुध्दा त्याला धमकी दिली होती की पुन्हा कुठल्याच चित्रपटात मरायचं नाही. पण शेवटी कर्करोगाचं निमित्त करूनच मृत्यू त्याला घेउन गेला. क्षणात होत्याचं नव्हतं कसं करायचं ते आयुष्याला बरोब्बर ठाऊक आहे. राजेश खन्नालासुध्दा हे माहीत असणार. त्याच्याच गाण्याचे बोल आहेत ना - 'जिंदगी इक सफर है सुहाना यहा कल क्या हो किसने जाना'.

anand.jpg

तो गेला त्या दिवशी सकाळपासून निरभ्र असलेलं आकाश संध्याकाळी एकदम् कोसळायला लागलं. घरी जाताना खिडकीच्या काचेतून बाहेर बघत मी सगळी एफएम चॅनेल्स धुंडाळत त्याची गाणी ऐकत होते. आधीच संध्याकाळ कातरवेळ. आभाळ भरून आलेलं. त्यातून कुठल्याश्या चॅनेलवर आनंद मधलं 'कही दूर जब दिन ढल जाये' लागलं. एरव्ही हे माझं आवडतं गाणं. पण त्या दिवशी ऐकवेना. तशी मी त्याची फॅन नाही. पण कुठेतरी चित्रपटाच्या शेवटचा 'बाते करो मुझसे' चा अमिताभचा आक्रोश ऐकायला यायला लागला. टेपचा शेवटचा तुकडा वाजून संपताना दिसायला लागला. कोणा अज्ञात शक्तीच्या हातात असलेल्या दोरीच्या तालावर नाचणार्‍या तुम्हा आम्हा कळसूत्री बाहुल्यांची दया यायला लागली. आणि पोटात कुठेतरी खोल खड्डा पडला. मग म्हटलं 'अरे, हे चुकीचं आहे. जितकं आयुष्य देवाने आणि दैवाने दिलंय ते पुरेपूर जगायचं असं बाबुमोशायचा आनंद सांगून गेलाय. मग माझी काय टाप आहे दु:खी व्हायची?' जगणं नावाच्या धबडग्यात हे कितपत लक्षात राहील काय माहीत पण एक आहे 'राजेश खन्ना' चं नाव काढलं की पुस्तकातलं सुकलेलं फूल अलगदपणे उचलणारा, बोलक्या डोळ्यांचा, भावुक चेहेर्‍याचा हसरा आनंदच आठवेल.

कारण.......

क्या जानू सजन होती है क्या गमकी शाम
जल उठे सौ दिये जब लिया तेरा नाम

-------
आठवणींचे मूळ स्त्रोत:

१. रेडिओ मिर्ची वरचा 'पुरानी जीन्स' हा कार्यक्रम.
२. ईंडिया टीव्ही वरील '६९ अनसुनी कहानिया' हा कार्यक्रम.
३. लोकसत्तातला लेख
४. आंतरजालावरील लेख Rajesh Khanna's leading ladies share their memories
५. छायाचित्रं - आंतरजालावरून घेतलेली आहेत.

वि.सू. - तपशीलातल्या चुका कृपया निदर्शनास आणून द्याव्यात ही विनंती.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

अप्रतिम....___/\___
फार छान, ओघवतं लिहिलं आहे.

"संध्याकाळी ऑफीसमधून निघाले होते. गाडीच्या प्लेयरवर जी सीडी लावली होती त्यात 'आनंद' आणि 'सफर'ची गाणी होती. .........."
हा पूर्ण परिच्छेद अफलातून Happy
धन्यवाद लेखासाठी.

मस्त लिहिलयस गं. मी राजेश खन्नाची चाहती कधीच नव्हते,पण का कोण जाणे तो गेल्यावर एवढं उदास वाटु लागलेलं,मग आनंद बघत बसले,आणि त्याच्या पहिल्या सीन पासूनच डोळे वहायला लागले Sad दुसर्‍या दिवशीहि पेपर वाचताना रडत होते. का ते माहित नाहि. असं कधीच झालं नव्हतं Sad

ओह!! राजेश खन्ना ! खरं तर पहील्यांदाच त्याला पाहीलं आराधनात तेंव्हापासुन एकदम खुप आवडला.
हँडसम नाही तर खुप क्युट होता - तरुणपणी.
पिच्चरमधल्या हीरवीणींबरोबर पाहुन फार हेवा वाटायचा त्यांचा Happy

तो गेल्यावर वाईट वाटलंच पण बरंही वाटलं - त्याने ओढवुन घेतलेल्या नार्सिसिझम पासुन त्याला शेवटी मुक्तता मिळाली.

छान लिहिलाय.

रजेश खन्ना माझ्या आईचा एकदम हार्टथ्रोब. तिच्या कॉलेजच्या दिवसातला भयंकर आवडीचा नट. कितीतरी त्याचे मूवीज आईने डबल पाहिले.

मला कळले तेव्हा हसायला आले.. छ्या.. हा आवडायचा?... (आमिर खान ची त्यावेळी क्रेझ होती मला.. व आवडत्या नटावर चर्चा चाललेली तेव्हा आई सहजच पहिल्यांदा बोलल्ली पटकन की आमिर खान काय तो.. राजेश खन्नाची सर नाही त्याला. आईल ईतका आवडतो हे तेव्हा कळले.)

राजेश- किशोर ह्यांची सर्वच गाणी बाकी मला भन्नाट आवडतात.
का कुणास ठावूक मला सुद्धा उगाच काहीतरी वाटले..त्याची न्युज एकली तेव्हा. त्याची सर्व गाणी एकत बसले... मलाच नाही कळले का?

माझी खूप खूप आवडती गाणी त्याच्या इतर गाण्यांमध्ये,
कोर कागज था..
क्या जनु सजन...
वोह श्याम अजीब थी
ये श्याम मस्तनी
जिंदगी के सफर मे..
कही दूर......
मैने तेरे लिये..
जय जय शिव शंकर..
अन्खो मे हम्ने आपके..
ह्मे तुमसे...
ओ मेरे..
एक अजनबि
अगर तुम न होते
बाकी बरीच आवडतात पण ही खास.

भान अगदी अगदी मला पण असेच झाले.. वडलांनी त्यांचा आवडता हीरो रा.ख. सांगितलेला तेव्हा मी अगदी भुवया उंचावलेल्या पण त्याच्या जाण्याने खुपच वाईट का, कोण जाणे Sad

अप्रतिम लेख..
एकच त्याच्या अनुरोध पिक्च्ररचा कोणीच उल्लेख केला नाही.. अप्रतिम गाणी असलेला ... Sad

किती सुरेख लिहिले आहे...
खर तर माझा पण राजेश खन्ना काही खूप आवडता हिरो नाही. पण तो गेला त्यादिवशी फारच हळहळले. दुसर्‍या दिवशी टीवी पाहताना रडू सुध्दा आले..

का ह्या माणसाने असा चटका लावला जाताना आपल्याला?

एका 'खन्नी' ने करोडो हृदयांवर अधिराज्य केलेल्या एका 'खन्ना' बद्दल भावूकपणे तसेच सविस्तरपणे लिहिलेला हा लेख म्हणजे त्याच्या चाहत्यांच्या मनातील त्याच्याविषयीची आपुलकीच्या भावना झंकारच होय.

परवा परवा परलोकवासी झालेले शम्मी कपूर देव आनंद. यांच्याबद्दल बातम्या झळकल्या, लोकाना वाईट वाटले, वर्तमानपत्रांनी छोटेमोठे लेख लिहिले त्यांच्या कारकिर्दीबद्दल....संपला तो विषय. पण राजेश खन्ना नावाने तमाम भारतीयांच्या हृदयावर असे काही गारुड घातले होते की ज्या ज्या ठिकाणी त्याच्याबद्दल मौखिक वा लेखी चर्चा घडल्या, त्या प्रत्येक ठिकाणी 'मी रडलो....मी रडले' असा जो भावस्पर्शी सूर लागला तो पाहताना या व्यक्तीने या दुनियेत काय मिळविले असेल तर रसिकांचे असे हे अगाध प्रेम. किमान एवढ्या एका कारणासाठी का असेना तो सर्वार्थाने "सुपरस्टार" ठरतो.

स्वप्नाराज यानी लेखाच्या शेवटी केलेली एक विनंती "तपशीलातल्या चुका दाखवून द्याव्यात...' त्या अनुषंगाने काही बाबी इथे द्याव्याश्या वाटतात [चुका नव्हेत, पण काहीशी देणे गरजेचे होती अशीही पूरक माहिती] :

१. राजेश खन्नाचा जन्म पाकिस्तानात झाला नव्हता तर तो पंजाबमधील 'अमृतसर' गावी झाला होता. फाळणीनंतर या जिल्ह्याचा काही भाग जरूर पाकिस्तानमध्ये विलीन झाला होता, पण त्याचा अर्थ राजेश खन्नाचा जन्म पाकिस्तानचा असे कृपया समजू नये.
२. 'जतीन' चा 'राजेश' केला तो त्याच्या नात्यातीलच दत्तक पालकांनी आणि त्याला सिनेमात जाण्याचेही प्रोत्साहन मिळाले त्या या लक्षाधिश दत्तक पालकांकडूनच. मुंबईत एक वेळ उपाशी राहून सिनेसृष्टीत चमकण्याची धडपड करणारे हजारो तरुण असून त्यांच्या कहाण्या वेळोवेळी प्रसृत होत असतातच, पण पहिल्याच चित्रपटाच्या शूटिंगला स्वत:च्या महागड्या कारमधून स्टुडिओत येणारा राजेश खन्ना हा तिथल्या कामगारांच्या कुतुहलाचा विषय झाला होता.
३. लेखात अंजू महेन्द्रूचा उल्लेख आवश्यक होता. देवयानी चौबळसमवेत ज्या कुणी 'काका'च्या करीअरला सुरुवातीला खतपाणी दिले त्यात फॅशन डिझायनर अंजू महेन्द्रुचा अग्रक्रम होता. दोघेही सतत एकत्रच हिंडतफिरत. अंजूला चंदेरी पडद्यावरही चमकायचे असल्याने तिनेच राजेश खन्नाच्या लग्नाबाबतच्या प्रस्तावावर त्यावेळी गंभीरपणे विचार केला नाही आणि मग डिंपल समवेतच्या विवाहानंतर ते नाते विरुनही गेले.

अन्य :
एक विलक्षण योगायोग -
राजेश डिम्पल विवाह जरी रुढार्थाने यशस्वी ठरला नसला तरी त्याचे रुपांतर कायदेशीर घटस्फोटात झाले नाही. दोन मुली जरी आईकडे वाढल्या आणि लग्नानंतर आपापल्या संसारात रमल्या तरी राजेश खन्ना त्यांच्या संपर्कात सतत असायचाच. त्यानाच काकाने आपल्या इस्टेटीचे ट्रस्टी केले आहे.

विशेष म्हणजे : २९ डिसेम्बर हा जसा राजेश खन्नाचा जन्मदिवस, नेमक्या याच तारखेला (२९ डिसेम्बर) प्रथम कन्या ट्विन्कल खन्नाचा जन्म झाला, तर रिंकीचा जन्म जरी जूनमध्ये झाला असला तरीही योगायोगाने तारीख २९ च.

असो.

अशोक पाटील

छान लेख.
अंजू महेंद्रु चा उल्लेख हवा होता (अलिकडे ति एका चित्रपटात दिसली होती ना ) पण नंतर कधी हा विषय निघाला नाही. अमिताभ रेखा प्रकरण अजून चघळले जाते, तसे या प्रकरणात झाले नाही.

राजेश खन्ना ने मीनाकुमारी (दुष्मन), नूतन (अनुराग) अशा अभिनेत्रीसोबतही, नायकाच्या नसल्या तरी खास भुमिका केल्याच. बावर्ची मधली, नायिका नसलेल्या नायकाची भुमिका, इत्तेफाक मधली, सदा संशयित वाटणारी भुमिका, रेड रोझ मधली नकारात्मक भुमिका पण त्याने लिलया निभावल्या.

छान लिहीलय!!!
जसा राजेश खन्नाचा जन्म १९४२, तसा आमिताभ बच्चनही १९४२.
राजेश खन्नाचा विवाह १९७३, तसा आमिताभ बच्चनचाही १९७३ चा.

सगळ्यांना मनापासून धन्यवाद! Happy राजेश खन्नाला श्रध्दांजली वाहणं आणि त्याच्या आठवणी सर्वांसोबत शेअर करणं हा ह्या लेखाचा हेतू होता. लोकसत्तच्या रविवारच्या अंकात अमिताभ, सचिन आणि सीमा देव ह्यांनीही काही आठवणी दिल्या आहेत. लोकसत्ताची साईट सध्या डाऊन आहे. परत चालू झाली की लिंक्स इथे शेअर करेन.

अजून एक आठवण शर्मिला टगोरने 'पुरानी जिन्स' मध्ये सांगितली. राजेश खन्नाची एका पिक्चरची फी त्यावेळी २० लाखाच्या घरात होती. हृषिकेश मुकर्जींच्या एका पिक्चरचं बजेटच ७-८ लाख होतं आणि ज्या भूमिकेसाठी ते राजेश खन्नाचा विचार करत होते ती त्या मानाने लहान होती म्हणून त्यांनी त्याचा विचार सोडून दिला. पण गुलजारने राजेश खन्नाला ती भूमिका ऐकवली आणि तो पिक्चर करायला तयार झाला. ह्या पिक्चरचं नाव मला कळलं नाही. आणि ते गेस करण्याइतकं चित्रपटांचं ज्ञान मला नाही. कोणाला माहित आहे का ह्याबद्दल?

Pages