हमने देखी हैं उन आंखोकी मेहकती खुशबू..

Submitted by भारती.. on 18 July, 2012 - 13:32

''हमने देखी है..'' - गुलझारजी- एक पद्यानुवाद

पाहिली आहे मी त्या दिठीतली परिमळणारी गंधकळा
हातांनी स्पर्शून देऊ नये कुणी नात्यांचे संदर्भ हिला
आकळते अंतर्यामाला अनुभूती ही तरलाविरला
प्रीतीला प्रीतीच राहू दे का नावाचा उपसर्ग तिला..

प्रीती म्हणजे उच्चार नसे किंवा ध्वनीची कंपना कुणी
मौनाची ही तर संवादिनी सांगे ऐके ही मूकपणी
ना विझते,थबकत नाही कुठे,कुंठित होईना एकक्षणी
शतशतकांतून वाहत येते ही चैतन्याची दिव्यकणी

एक हसू दबल्या हर्षाचे डोळ्यांमध्ये अस्फुट उमले
अन झोत प्रकाशांचे झुकल्या पापणीत ओठंगून आले
ओठांनी काही न सांगितले.. का मग कंपित ते झाले
किती अनुच्चारले कथाकाव्य त्या ओठांपाशी अडलेले..

आकळते अंतर्यामाला अनुभूती ही तरलाविरला
प्रीतीला प्रीतीच राहू दे का नावाचा उपसर्ग तिला..

-भारती बिर्जे डिग्गीकर

--------------------------------------------------------------------------------------

हमने देखी है उन आँखों की महकती ख़ुशबू
हाथ से छू के इसे रिश्तों का इल्ज़ाम न दो
सिर्फ़ एहसास है ये रूह से महसूस करो
प्यार को प्यार ही रहने दो कोई नाम न दो

प्यार कोई बोल नहीं, प्यार आवाज़ नहीं
एक ख़ामोशी है, सुनती है, कहा करती है
न ये बुझती है, न रुकती है, न ठहरी है कहीं
नूर की बूँद है सदियों से बहा करती है

मुस्कुराहट सी खिली रहती है आँखों में कहीं
और पलकों पे उजाले से झुके रहते हैं
होंठ कुछ कहते नहीं, काँपते होंठों पे मगर
कितने ख़ामोश से अफ़साने रुके रहते हैं

सिर्फ़ एहसास है ये रूह से महसूस करो
प्यार को प्यार ही रहने दो कोई नाम न दो

''हमने देखी हैं..''मूळ गीतकार गुलझार,चित्रपट खुशबू- १९६९

गुलमोहर: 

meant to dedicate this to the late great Rajeshjee,but oh,this turns out to be a tribute to Gulzarjee..

ही रचना मुळातच एवढी सुंदर, तरल, उत्कट आहे की बस्स.....
तुम्ही केलेला अनुवादही सुंदरच - छान जमलाय...

खूप आभार शशांकजी,भरतजी. जिप्सी,योगुली..

पण हे तर गुलझारजींसाठी झालं म्हणून राजेशजींसाठी ही श्रद्धांजली काल बेफिकिरजींच्या धाग्यावर टाकलेली इथे देतेय..

खार दांड्याचा पावसाळी समुद्र क्षणकाल स्तब्ध झाला का
ओस ओसाड आशिर्वाद मधून तुझा आवाज गुंजला का?

मायानगरीचे वाहते रस्ते तसेच वहाताहेत वरवरून
खोटी स्मिते,खोट्या प्रशंसा एकमेकांवर उधळत भरभरून..

तुझी सद्दी संपली होती तशी पूर्वीच ,की कधीच नाही?
'I hate tears..' असे म्हणालास की स्मरणातून जात नाही.

तुझे दिसणे तुझे हसणे तुझ्या लकबी तुझे असणे
तुझ्यासारखा तूच राजा तुलाच जमले प्रेम करणे

जादूच्या कथा धुक्याच्या व्यथा मधाच्या नायिका गाण्यांचे गारुड
महानायक तुझ्यासारखा..बदलले सारे..बदलले बॉलिवूड.

बदलतेच सारे,हवे-नको तेही. बदलांपलिकडे पण काही उरले
शाश्वत सुंदर अमर प्रेम व्यक्त केलेस जे ,जिव्हारी राहिले..

भारती.

अनुवाद खूप आवडला
राजेशजींसाठीची श्रद्धांजली अजूनच भावुक करून गेली