अन्नानंद कि ब्रम्हानंद

Submitted by gajanan moreshw... on 18 July, 2012 - 03:59

साधारण ५५-६० साल असेल मी इंदिरा डॉकमधे कामास होतो, राहाण्यास गिरगावात होतो. एकदा रात्रपाळीला निघालो पान सुपारीच्या गादिवर पान घेतले व पुढे झालो. तो दिवाळीचा आदला दिवस होता. दुस-या दिवशी सर्वांनाच घरी जायची घाई. म्हणून आम्ही तडजोड करायचो. जवळ राहाणारे ४ वाजता घरी जाऊन फराळ करुन ६ वाजता कामावर परत येणार. त्या दिवशी कामावर निघताना गादि जवळ एक माणूस पटकन पुढे आला, व हात जोडून गयावया करू लागला. साहेब काहितरी द्या ना. मी त्याला झिडकारल म्हंटल तू पैसे घेणार आणि जाऊन दारू पिणार चल जा असे भीकारी रोजच भेटतात.
अस म्हणून मी कामावर गेलो. पहाटे ४ वाजता कामावरुन परत यायला निघालो. घरी येऊन आंघोळ व फराळ करुन परत ६ वाजता कामावर जायचे होते, म्हणून मी जोरातच चालत होतो. नाना शंकरशेट वाडीजवळ रात्रीचा तोच माणूस परत पटकन पुढे आला हात जोडून उभा राहिला. साहेब नाही अजून घरी गेलो पोरांना सांगून आलोय काहितरी घेऊनच येईन, कालपासून घरात काही नाही. आज दिवाळी आज काही मिळाल तर घरी जाणार, नाहीतर हे तोंड घरी दाखविण्यापेक्शा चौपाटी जवळ करावी लागेल. असे म्हणून तो रडायला लागला. त्यावेळी गिरगावात दुकाने लवकर उघडत दिवाळीला.
मी दुकानाजवळ गेलो तोही माझ्या मागे दुकानाशी आला. तांदूळ, गहू, रवा, गूळ, डालडा असे काही पदार्थ मी घेतले वाण्याने पिशवी माझ्या हातात दिली. ( होय त्यावेळी ५ रू. हे सर्व सामान येत असे.) मी ती पिशवी तशीच त्या माणसाच्या हातात दिली, आणि म्हटले जा आता घरी.
त्याने पिशवी हातात घेतली " सगळ, सगळं मी नेऊ " मी हो म्हटले. पणं त्याने काही एकल असेल असं नाही. तो जोरात म्हणत होता आज आम्ही जेवणार, आज आम्ही पोटभर जेवणार,
आज आम्ही गोडधोड जेवणार. असे बडबडत नाचत नाचत उड्या मारित गेला. त्याने माझ्याकडे एकदा पाहिले, पण माझे साधे आभार मानायचेही त्याल भान नव्हते.
त्याच्या डोळ्यातला चेह-यावरचा तो आनंद अवर्णनीय होता. असा आनंद क्वचितच अनुभवायला मिळतो. हाच का तो ब्रम्हानंद का अन्नानंद.

गुलमोहर: 

दुसर्‍याला अन्नानंद दिला की आपल्याला ब्रह्मानंद मिळतो. भुकेल्याला अन्न नि तहानलेल्याला पाणी देणे ही देवाची सर्वात मोठी भक्ती. देव कुणि का असेना, शंकर, विष्णू, ख्राईस्ट, अल्ला इ. कुणिही.

खूपच छान. देणार्‍याने देत जावे असे म्हणतात ना..

माबोवर स्वागत. जुनी पुराणी, गोड-कडु अशी अनुभवाची शिदोरी आमच्याबरोबर वाटा, म्हणजे ती पण वाढेल.

तो जोरात म्हणत होता आज आम्ही जेवणार, आज आम्ही पोटभर जेवणार,
आज आम्ही गोडधोड जेवणार. असे बडबडत नाचत नाचत उड्या मारित गेला

<<<<<<<

डोळ्यात पाणी आले हे वाचताना...... देवकृपेने रोज पोटभर जेवायला मिळते त्यावेळी अन्नाची किंमत किती मोठी आहे हे लक्षातदेखील येत नाही पण ज्यावेळी एखादा खुप दिवसांचा भुकेला माणुस साधा डाळ्-भात देखील पंचपक्वान्न समजुन खातो त्यावेळी संतानी अन्नाला पुर्णब्रम्ह का म्हतले आहे ते कळते.

<<त्याच्या डोळ्यातला चेह-यावरचा तो आनंद अवर्णनीय होता. असा आनंद क्वचितच अनुभवायला मिळतो.>+१

मी कल्पना करून बघत आहे त्या प्रसंगाची...

मी पण असाच एक अनुभव सांगते.आमचे शेतीला लागणार्या सामानाचे दुकान आहे.तेंव्हा आमचे घर छोटे,दुकानाच्या मागच्या बाजूला होते.एक 45,50 वर्षांचा माणूस अचानक दुकानात येऊन नवऱ्याकडे जेवायला पैसे मागू लागला.ह्यांनी त्याला 2 रु.दिले.त्यानन्तर तो अधून मधून येऊन पैसे घेऊन जाई.तो कुठे राहत होता कुणालाच माहीत नव्हते.एक दिवस तो दुकानात आला असताना मी बाहेरून येऊन आत घरात जाऊ लागले.त्याने मला अडवून म्हणाला आज मला तुझ्या हातचे जेवण हवे आहे.त्या दिवशी नेमके आम्हाला बाहेर जेवायला जायचे होते.मी आत जाऊन पाहिले तर चार पोळ्या उरल्या होत्या.मी घरात जाऊन पिठले बनवले,आणि बाहेर येऊन पिठले,पोळ्या त्याला दिल्या.त्या नन्तर तो आजपर्यंत दिसलाच नाही,पण ह्या घटने नन्तर सहा महिन्यात आम्हाला एक मोठे घर विकत घेता आले तेही कमी दराने.