काय करत होता गा देवा....?

Submitted by rkjumle on 13 July, 2012 - 09:00

माझा मोठेबाबा-पांडूरंग याच्या घराकडे जातांना त्याच्या घराजवळ कोपर्‍यात चिंचेचं झाड लागत होतं. या झाडाचं खोड भारीच जुनाट व वयस्कर झालं होतं. त्याच्या फांद्या चांगल्या भोवताल पसरलेल्या होत्या - जणू काही एखाद्या पक्षाने पंख पसरल्यासारखे दिसत होत्या. हे झाड हिरव्याकंच बारीक पानाने गच्च भरलेले दिसायचं.
हे झाड म्हणजे आम्हा मुलांना खेळण्याचं व लोकांना बसण्याचं एक सार्वजनिक ठिकाणच होतं, म्हणा ना...! मस्त करमत होतं तेथे !
या झाडापासून पांढरी या गावाकडे बैलगाडीचा रस्ता जायचा. पांदण होती ती ! मोठेबाबा गावचा कोतवाल होता; तेव्हा तो मेलेलं ढोरं याच पांदणीने ओढत नेत होता. दशरथ-मामाच्या गोटाळी वावराच्या एका कोंट्यात त्याचं कातडं सोलून विकत होता. त्याचं काम आटोपेपर्यंत भोवताल कुत्रे, कावळे व गिधाडे तेथे जमा होत. हे सर्व आगंतूक पाहूणे आधाशीपणे खाद्यावर ताव मारण्यासाठी वाट पाहात राहत होते.
पूर्वी आमच्या मोहल्ल्यातील लोक सुरे, टोपले घेऊन जायचे, म्हणे...! मेलेल्या ढोराचं मांस आणण्यासाठी...! जेवढ्या डल्ल्या घरात खाता येईल तेवढ्या खात. ऊरलेल्या दोरीवर वाळवत ठेवत. नंतर खुला करुन खात. आता ही पध्दत बंद झाली. बाबासाहेबांनी सांगितलं की, ‘मेलेलं ढोर ओढू नका. मेलेल्या ढोराचं मास खाऊ नका.’ म्हणून आता मोहल्ल्यातील लोकांनी मेलेलं ढोर ओढणे व त्याचं मास खाणे सोडून दिले होते. मोठेबाबा कोतवाल होता, म्हणून त्याला गावकीचे कामे करावे लागत असे. त्यालाही ही कोतवालकी सोड म्हणून लोक भायच दबाव आणीत होते. दुसर्‍या वर्षी त्यानेही कोतवालकी सोडली होती. बरबड्याच्या काशा- होलारांनी आमच्या गावची कोतवालकी धरली होती.
चिंचेच्या झाडाजवळच त्रिकोणी आकाराचं एखाद्या एकराची लांडग्याची खारी होती. उन्हाळ्यात उलंगवाडी झाली, की आम्ही मुले या खारीला खेळायचं मैदान बनवित होतो. तेथे गिल्ली-दांडू व इतर मैदानी खेळ खेळत होतो. आम्ही मुले घणमाकड गाडून त्यावर दिवसभर फिरत राहात होतो.
या चिंचेच्या झाडाच्या खोडाजवळ खाली तीन-चार दगडाला तेल-शेंदूर माखून एका रांगेमध्ये ठेवलेले होते. मध्ये इतर दगडापेक्षा एक मोठा दगडं होता. हे दगडं म्हणजेच आमच्या गावची देवी ‘मातामाय’ होती ! या मातामायच्या भोवताल हिरव्या, लाल, पांढर्‍या रंगाचे सुताचे धागे, लहान लहान लाकडाच्या बाहुल्या, कुंकवाचा लाल रंगाचा बुक्का, ज्वारीच्या अक्षदा असे काही-बाही नेहमीच पडलेले असायचे. कोणीतरी सकाळी येऊन त्याच्या आजूबाजूला सडा व सारवण करुन जात असायचे. वातीचा दिवा आणि दह्या-बोण्याचं ताट कोणी ना कोणीतरी बाई रोज येथे घेऊन येत होती.
आम्ही मुले या झाडाच्या खाली व झाडाच्या फांद्यावर दमछाक होईपावेतो खेळत राहायचो. चापडुबल्याचा खेळ खेळायला आम्हाला मस्त मजा यायची. या झाडाला बार म्हणजे फुलोर आला, की आम्ही तोडून त्याची चटणी करुन खात होतो. ही चटणी स्वादिष्ट आणि आंबसूर लागत असे. या झाडाला चिंचा धरल्यावर पूर्ण झाड लदबदून जायचं. ते पाहून आमच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नव्हतं. मग झाडावर चढून गाभुरलेल्या चिंचा खाण्यात वेगळीच मजा यायची.
एकदा माझा लहान भाऊ-अज्याप तापाने खूप फणफणला होता. त्याला गोवर निघाला होता. आई ताटात पूजेचं सामान म्हणजे हळद, कुंकु, हिरव्या बांगड्या पिवळा कपडा, पिवळा दोरा, लाकडाची फणी, लाकडाचं बाहुलं, नारळ, दह्या-दुधाचं बोणं व कापसाच्या वातीचा दिवा घेऊन या मातामाय जवळ गेली होती. सोबत बाई पण होती.
तेथे पूजा करतां करतां आईने एक बांगडी कचकण फोडली. त्या फुटलेल्या काकणाने आईने स्वत:च्या छातीला ओरपली. त्या चिरलेल्या जागेतून रक्त वाहू लागलं. ते रक्त बोटावर घेऊन आईने मातामायच्या दगडावर शिंपडून त्याला चोपडलं.
लोक दगडाला देव समजून त्याच्या अंगाला शेंदूर व कपाळाला कुंकू लावत. शेंदूर व कुंकू, दोन्हीही लाल रंगाचं असल्याने ते रक्ताचं प्रतीक होतं. आईने तर स्वत:चं रक्तच देवीला अर्पण केलं होतं. देवीला रक्ताची चटक लागली होती. तिला कोंबडे-बकर्‍याचं रक्त पाहिजे होतं. आईने मातामायची भूक भागवली होती. ते दृष्य खरोखर अंगावर शहारे आणणारं होतं ! माझ्या डोळ्यापुढे अंधारीच आली होती ! आपला मुलगा आजारातून बरा व्हावा म्हणून स्वत:ला जखमी करुन घेणं हे कृत्य खरोखरंच आईच्या जगतात अनोखं असच उदाहरण असेल, नाही का ? देवीचं व्रत धरलं, की केस विचरता येत नव्हतं. अंगणात सडा टाकता येत नव्हतं. अशी कशी ही देवी जिला स्वच्छतेचं इतकं वावडं होतं !
आई कधी कधी आम्हाला बर्‍याच गोष्टी सांगायची. तिने एकदा सांगितलेली गोष्ट मला चांगली आठवते. ती म्हणाली,
‘तू अगदी दूधपिता असतांना पोलिसांनी आम्हाला दारुच्या बाबतीत पकडले होते. तुझे बाबा त्यावेळी वाडीतल्या लवणात घरी पिण्यासाठी मोहाची दारु काढत होते. त्यांनी काढलेल्या दारुच्या दोन शिश्या नहाणीतल्या नांदीमध्ये ठेवल्या होत्या. त्यात माझी नवीन चोळी असल्याने नांदीत भिजवत ठेवली होती.
तेवढ्यात पोलिसांची अचानक धाड पडली. त्यांनी त्या दारुच्या शिश्या व माझी चोळी जप्त केली. कोर्टात केस सुरु झाली. तुझ्या बाबाने शहरातला फाटक नावांचा ब्राम्हण वकील लावला होता. त्याकाळी ब्राम्हण जातीचेच वकील राहत होते.
त्या केसमध्ये तारखेवर हजर होण्यासाठी आम्ही सकाळीच तुला कडेवर घेऊन यवतमाळला निघालो होतो.
पावसाचे दिवसं होते. एकाएकी आभाळात ढग जमा झाले. सर्वदूर काळोख पसरत चालला होता. क्षणातच भल्या मोठ्ठाले थेंब अंगावर पडू लागले. आम्ही शेतातल्या मोहाच्या झाडाचा आसरा घेतला. तुला पोटाशी धरुन मी शेवाने लपेटून घेतलं. घोंघावणार्‍या वार्‍याचा आवाज मी म्हणत होता. जोर्‍याचा थंड वारा वाहत होता. कानशिलं थंडगार पडत चालले होते.
त्या धुवांधार पावसाचा सामना करीत आम्ही जीव मुठीत घेऊन; त्या मोहाच्या खोडाजवळ एकमेकांना धरुन बसलो. मनात देवाचा धावा करीत होतो.
‘देवा आम्हाला वाचव - सोडव या केसमधून. मी तुला नारळ फोडीन.’ अशी देवाला प्रार्थना करीत होती.
विजांच्या कडकडाट व ढगांचा गडगडाट कानठळ्या बसवित होत्या. आम्हाला चांगलं पावसाने झोडपलं होतं. पावसाने ओलचिंब झालो होतो.
पाऊस थांबला. तुझ्या तोंडावरच शेव मी हळूच काढून पाहिला. तू निपचित पडून होता. हालत नव्हता की डुलत नव्हता. मला धक्काच बसला. मग मी जोरात हंबरडा फोडला. मला वाटलं, ‘माह्या रामरावने जीव सोडला.’ माझा कळवळा पाहून तुझ्या बाबाचंही काळीज कापायला लागलं.
तुझ्या बाबाने पाहिलं, की तुझी दातखूडी बसली होती. अंग थंडगार पडलं होतं. त्यांनी तुझ्या दातात बोटं घालून तोंड उघडले. तुझ्या तोंडात जोराने फुंका मारल्या. तू हळूच हालचाल करु लागला. ते पाहून आमच्या दोघांच्याही जीवात जीव आला. मग आम्ही चिखल तुडवत रस्त्याने लागलो. धो-धो कोसळणार्‍या पावसाने नदी-नाले गढूळ पाण्याने तुडुंब भरुन वाहायला लागले होते.
यवतमाळच्या संकटमोचन देवस्थानच्या मारुती देवळाच्या पायरीवर आम्ही दोघांनीही माथा टेकवला व कोर्टात गेलो. तेथे सुनावणी झाली. आम्हा दोघांनाही पन्नास पन्नास रुपये दंड ठोठावला. घरी येतांना आम्ही मारुतीच्या पायरीवरच नारळ फोडलं. कारण देवळात जाऊन आम्हाला त्या देवाचे तोंड पाहण्याची बंदी होती ना !’
एकदा गावातल्या चिंचेच्या झाडाजवळ बाबाला दारुच्या बाबतीत पोलिसांनी पकडले होते. जनाबाई पण तेथे होती. ती लहान होती. पोलीस बाबाला मारत असल्याचे पाहिल्यावर बाई, खूप रडायला लागली होती.
तसेच एकदा बाबा वाडीजवळच्या लवणात रात्रीच्या वेळेस दारु काढत असतांना पोलीस एकाएकी आल्याचे बाबाने पाहिले. तसाच बाबा पळत सुटला. वाडीच्या काट्याच्या कुपावरुन उडी मारुन पोलिसांना चकमा दिला. अशा बिकट प्रसंगी काय काय धाडस करावे लागत होते ? अशा त्या कहाण्या ऎकून आम्ही सुन्न होत होतो.
आईने दुसरी एक गोष्ट सांगितली.
‘माहा शामराव पोटात होता. मी व तुझे बाबा कोटेश्वरच्या यात्रेला पायी-पायीच निघालो. त्यावेळी यात्रा-जत्राचं भारीच वेड होतं. देवाचं दर्शन घ्यायचं. त्याला कबूल केलेलं नवस फेडायचं. यात्रेतल्या बाजारात खरेदीची हौस भागवायची. शेतातला माल-टाल निघाल्यावर हातात दोन पैसे खुळखूळत होते.
कोटेश्वर हे देवस्थान आपल्या गावापासून आठ-दहा कोस होतं. मधात वाकी या गावला धुरपताबाई म्हणजे तुझी आका, हिच्या घरी मुक्काम केला. ही तुझ्या बाबाची चुलत बहीण होती. आम्ही कोळंबी या गावला आमराई विकत घेतली होती, तेव्हा त्यांनी पण शेजारची आमराई विकत घेतली होती.
कोटेश्वरला पोहोचलो तेव्हा अंधार पडला होता. मंदिराच्या आवारात टिनाच्या खाली जेवणाच्या पंगती बसल्या होत्या. आम्हीही त्या पंगतीत बसलो होतो. कुणीतरी येऊन आम्हाला कोणत्या जातीचे आहांत म्हणून विचारीत होते. आम्ही ‘महार’ असल्याचं सांगितल्यावर हातातली काठी उगारुन, दरडाऊन म्हणाला, ‘महारड्यानो, तुम्ही पंगत बाटवली. ऊठा येथून नाहीतर पाठ सोलून काढीन.’ त्याच्या भीतीने आम्ही मंडपाच्या बाहेर आलो.
थोड्यावेळाने धुवांधार पाऊस सुरु झाला. मग आमचे हाल पाहवत नव्हते. त्या भरपावसात उपासीपोटी ती रात्र कसी-बसी आम्ही जागून काढली. थंडीने अंगात हुडहुडी भरली होती. पण त्या कोटेश्वरच्या कोटी ईश्वर असलेल्या एकाही देवाला आमची किव कशी आली नाही ?’ ही गोष्ट ऎकल्यावर आम्ही गहिवरुन आलो होतो.
याच कोटेश्वरच्या यात्रेत माझी बहीण-जनाबाई हरविल्याची आणखी एक गोष्ट आई सांगत होती. ती म्हणाली,
’त्यावेळी जना लहान होती. देवदासला खायच्या पेरकांड्या आणायला सांगितल्या होत्या. ती त्याचं लक्ष नसतांना त्याच्या मागे मागे गेली व भुलली ! एका बाईने तिला रडतांना पाहून उचलून घेतले. देवदास परत आला; पण जना त्याच्या सोबत नव्हती. सारेजण चिंतेत पडले. मी आकांत मांडला. मग तिला शोधायला मी, तुझे बाबा, देवदास, सावळा या गावला राहणारी तुझी आका - तिच्या पोराचं नाव लोडबा होतं, असे सगळेजण भरयात्रेत तिला भिरभिर पाहायला लागले. ती एका अपरिचीत बाईच्या कडेवर रडत असलेली दिसली. पण ती बाई जनाला देत नव्हती. मग मी तिच्या जवळून फणकार्‍याने: हिसकावून घेतली. जना सापडल्यामुळे सार्‍यांचे चेहरे आनंदाने फुलून आले होते.’
त्यावेळी खेड्यात कॉलरा, पटकी, देवी, प्लेग असे अनेक साथीचे रोग यायचे. त्यात लोक. पटापट मरायचे.
बाबा अशीच एक गोष्ट सांगत होता.
‘त्या वर्षी गावात मरगड आली होती. उलटी हागवणीने लोक पटापट मरत होते. एकाला उचललं की दुसरा मरुन तयार राहायचा. मयती उचलायला लोक घाबरत असत. त्यातच पांड्याची नवरी म्हणजे माही भावजय पण मेली.’
गावामध्ये एकदा देवीची साथ आली होती. हा रोग लागट होता. पूर्ण गावात पसरला होता. त्या साथीत आमच्या घरामागे राहत असलेल्या दादारावचे दोन मुले मेले होते. अनुसया वहिनी - तुळशीराम-दादाची बायको; हीला पण देवीच्या आजाराने घेरलं होतं. तिला यवतमाळच्या सरकारी दवाखान्यात नेले होते. ती वाचली. पण लभान तांड्यामध्ये तर ह्या साथीने बरेच मुलं मरण पावले होते. कारण हे लोक दवाखान्यात इलाज न करता देव-देवींच्या मागे लागले होते. आमच्या घराच्या समोरील देवळात कोंबडे, बकर्‍याचा सर्रास बळी देत होते.
एकदा आमच्या मोहल्ल्यातील लोक बंजार्‍याच्या तांड्याकडे जात होते. एका बाईच्या अंगात भूत आल्याचं लोक सांगत होते. मी सुध्दा उत्सुकतेपोटी तिकडे गेलो. पाहतो तर आमच्या गावातला गोविंदा - वार्धक्याकडे झुकलेला, पांढरी लांब दाढी वाढलेली, त्याला दाढ्यासाधु म्हणत होतो, तिला पळसाच्या फोगाने मारत तोंडाने काहीतरी बडबड करीत होता. ते दृष्य पाहून अंगावर काटे आले. ती बाई जीवाच्या आकांताने रडत होती. तिचे हातपाय थरथर कापत होते. माराच्या भीतीने ती अंग चोरुन घ्यायची. तिला काहीतरी आजार झाला असावा. पण भूत-खेत उतरवण्याच्या पायी तो तिचे हाल न हाल करीत होता. ते न पाहवल्यामुळे मी घरी आलो होतो.
असंच एकदा एका लभान बाईला साप चावला होता. ती केशवच्या पलीकडील वावरातून पायवाटेने येत होती. त्या रस्त्यात टोंगळभर गवत वाढलेले होते. त्यामुळे रस्ता झाकून गेला होता. अंदाजा-अंदाजाने ती एक-एक पाय ऊचलून चालत असतांना तिच्या पायाला साप चावला. ती घरी आली. त्यांनी गावातील त्या दाढ्यासाधुला साप ऊतरविण्यासाठी बोलावीले. त्याने साप उतरविण्याचा प्रयोग सुरु केला. परंतु त्याच्या मंत्राला काही यश आले नाही. कारण तिचा पाय सुजला होता. तिचे शरीर काळे-निळे पडत चालले होते. तोंडातून फेस येऊ लागला होता. मी घरी आलो न आलो, तर रडण्याच्या करुण किंकाळ्याचा आवाज माझ्या हदयाला येऊन भिडल्या. ती बाई आता मरण पावली, हे आम्हाला कळून चुकलं. खोट्या गोष्टीवर विश्वास ठेवल्यामुळे तिचा घात झाला होता. तसंही तिला दवाखान्यात न्यायची सोय नव्हती, म्हणा...! योग्य उपचाराअभावी तिचा अनाठायी जीव गेला. ही गोष्ट माझ्या तरल मनाला फार चाटून गेली होती.
एकदा बाबा रात्रीला बरबड्याच्या शेतातून घरी आला होता. तो घरात शिरल्यावर मी त्याला घामाघून झाल्याचं पाहिलं.
मी त्याला विचारलं. ‘बाबा, तुम्हाला एवढा घाम का आला?’
‘अरे, मला बरडाजवळ एक आगिचा मोठा लोळ उठलेला दिसला. म्हणून मी घाबरुन पळत आलो.’
त्यादिवशी भयान रात्र होती. बहुतेक अमावसेचे दिवसं असावेत. दिवसा सूर्य आग ओकत होता. म्हणून दिवसभराच्या उष्णतेने ती जमीन किंवा जमिनीत असलेले धातू तापले असावेत. त्यामुळे अधार्‍या रात्रीत ती उष्णता बाहेर पडत असल्याने कदाचित आग दिसत असावी, असं काहीतरी वैज्ञानिक कारण असावं; असे मला वाटत असल्याचे मी बाबाला सांगितले होते.
त्या वर्षी आमच्या शेतात भुईमूंग पेरला होता. भुईमूंगच्या शेंगा चांगल्या भरल्या होत्या. त्यादिवशी संध्याकाळी दादाने शेतात मळ्याजवळ शेंगा भाजल्या होत्या. एक अनोळखी व्यक्ती धनपाल सोबत त्या भाजलेल्या शेंगा खात असतांना मी पाहिलं. शेंगा खाऊन झाल्यावर मी हळूच धनपालला त्या अनोळखी व्यक्ती बद्दल विचारले. त्याने सांगितले की, ‘तो भगत आहे. माझ्या मामाच्या वाफगाव या गावावरून आला. आपल्या गावात एक बाई करणी करते नं. म्हणून त्याला आणलं.’
ही बातमी त्या दिवशी घरोघरी पोहचल्यामुळे दुसर्‍या दिवशी सकाळी धनपालच्या घरी जत्राच भरली होती. मी पण त्याच्या घरी कुतूहलापोटी गेलो होतो.
. त्याच्या घरी वसरीत देव्हारा मांडला होता. तो एका लाकडी पाटावर उभा राहून डोळे वटारुन वटारुन पाहत होता. धोतर नेसलेला व अंगात बंडी घातलेला होता.. त्याच्या डोक्याला एखाद्या बाईसारखे लांब केस होते त्याने. ते मोकळे सोडले होते. कपाळाला त्याने कुंकू व हळद लावली होती. मी आदल्या दिवशी त्याचे पाहिलेले रुप व आताचे रुप काही वेगळेच दिसत होते.
तो अचकट-विचकट तोंड करुन अख्खा निंबू तोंडाने फोडून रस पीत होता. तोंडाने ‘जय मातामाय’ असा ओरडून कमरेचा वरचा भाग एका लयीत घुमवत होता. त्याचं ते रौद्ररुप भयानक वाटत होतं. त्याच्या भोवताल बाया जमल्या होत्या. प्रत्येकीकडे जर्मनच्या ताटात आरती, त्यात कुंकू, तेलाचा दिवा, उदबत्त्या व चिल्लर पैशाची नाणी ठेवलेले होते. कोणी म्हणत मुल-बाळ होत नाही; तर कोणी म्हणत बिमारी बसत नाही. असं काहीतरी प्रत्येकजणी आपापले गार्‍हानी घुमणार्‍या देवासमोर मांडीत होत्या.
माझ्या वहिनीने वणिताला तेथे नेले होते. वणिता - माझी पुतणी अगदी लहान होती. नुकतीच चालायला लागली होती. तिचे पोट फुगले होते. हातपाय बारीक झाले होते. तिला बाबाने गावठी झाड-पाल्याचं औषधपाणी देऊन पाहिले. तिला बाबानेच यवतमाळच्या सरकारी दवाखान्यात नेले होते. तरी तिचा आजार काही केल्या बसत नव्हता. म्हणून वहिनी त्या भगताकडे घेऊन गेली होती. भगताने सांगितले की, ‘गावातल्या बाईने तिला ‘करणी’ केली आहे. मातामायला दहीबोणं घेऊन जा, उपवास कर व कोंबडं काप.’ असाच इलाज तो इतर बायांना सुध्दा सांगत होता.
सुरेभानने मोईतूराची बायको केली होती. जवान होती. त्याच्या पहिल्या बायकोच्या नावाने तिला सुध्दा लोक हाका मारीत. गावात अशीच प्रथा होती. पहिल्या बायकोचं नाव दुसरीला मिळत असे. तशी ती नखरेल व चावट चालीची वाटत असल्याचे; बाया तिला नावे ठेवित होत्या. ती सुरेभान सारख्या गरीब व भोळ्याभाबड्या माणसासोबत खरेच संसार करील काय, असं कुणाला वाटत नव्हतं. म्हणूनच ती अंगात देवी येण्याचं नाटक रचून ढोंग तर करीत नव्हती ना ?
ती जेव्हा घुमायला लागायची, तेव्हा आम्ही तीचे ते घुमणे मोठ्या कुतूहलाने पहात होतो. तिच्या भोवताल गावातल्या बाया जमा होत व काहीबाही विचारीत. ती मग अशीच घुमता घुमता हिंदी भाषामध्ये काहीतरी उत्तरे द्यायची. आम्हा मुलांना तिची अनामीक भीती वाटायची पण मजा सुध्दा यायची. खरोखरच, एका दिवशी ती निघून गेली. परत कधी आलीच नाही. गावातील लोकं म्हणूनच तिला ’पिसी’ म्हणून चिडवित होते.
आमच्या गावात दसर्‍याच्या दहा दिवस आधी गावात कोतवालाच्या घरी ‘इनाई’ बसवत. ही एक गावदेवी होती. ही इनाई म्हणजे शहरातील दुर्गादेवीच रुप होतं.
शेतातून बाया गाणं म्हणत म्हणत माती आणायच्या. त्याची इनाईदेवी, हत्ती किंवा वाघ, राक्षस अशा मुर्त्या बनवित असत. कधी ही देवी हत्त्यावर बसायची तर कधी वाघावर बसायची. दहा दिवस रोज तिची बाया पूजा करीत. दहाव्या दिवशी तिला नदी-नाल्यात शिरवायला घेवून जात.
‘माही लाडाची गवरा,
थालीभर पाणी नेजाजी...
‘माही झोपेची गवरा,
तिला उशी मांडी देजाजी...
‘माही भुकेची गवरा,
संग शिदोरी नेजाजी...
असे गाणे म्हणत असत. म्हणजेच त्यावेळच्या अज्ञानी समाजात काव्य किती प्रगत होतं याची प्रचिती येते. शिवाय शहरात या इनाईदेवीच्या हातात विणा हे वाद्य सुध्दा दाखविलेलं असायचं. या विण्याचे भोक्ते म्हणजेच त्याकाळचा हा कलावंत असलेला महार-मांग समाज होता; असंही म्हणता येईल...!
दसर्‍याच्या दिवशी मी लहान असतांना त्याकाळी भयानक असा एक प्रकार पाहिला होता. कोतवालाच्या घरी एक हल्या बांधून ठेवत. त्यावेळी भग्या कोतवाल होता. त्या हल्याच्या मानेची शीर सुर्‍याने कापत. त्याला मग घरोघरी फिरवत. त्याच्या मानेतून निघणार्‍या रक्ताने हात माखून घेत व त्या हाताच्या पंजाची छाप घराच्या भिंतीवर उमटवित. त्यामुळे घरात रोगराई येत नाही; असा त्यांचा समज होता. नंतर कोतवालाच्या घरी आणून त्या हल्याला कापत व त्याचे हिस्से पाडून लोक ते मास शिजवून खात. किती हा अघोरी प्रकार होता, नाही का ?
अशाप्रकारे गावातील लोक अंधश्रध्देमध्ये आकंठ बुडालेले असल्याचे मला दिसत होते.
मी लहान होतो. त्यावेळची ही गोष्ट आहे. मला चांगलं आठवते...! ते उन्हाळ्याचे दिवसं होते. गावातील लोक रात्रीचे जेवण आटोपून नुकतेच झोपेच्या आहारी गेले होते. काळाकुट्ट अंधार पसरला होता. मध्येच कुत्र्यांच एका सुरात ओरडणं सुरु झालं होतं. इतक्यात जिकडे तिकडे गलबला उठला. आम्ही अंगणात झोपलो होतो. तो लोकांचा कल्ला आणि विस्तवाचा तडतड आवाज ऎकून आम्हीही खडबडून जागे झालो. पाहतो तर घराच्या पाठीमागे आगीचे लोंढेच्या लोंढे वर ऊठलेले दिसत होते. आगीच्या ठिणग्या आकाशाला जाऊन भिडत होत्या. गवताचे घरं भुरुभुरु जळत होते. लक्ष्मण मावसाच्या घराच्या पलीकडील सर्व घरांना आगीने लपटले होते. आधिच पाण्याची टंचाई, त्यात ही आग...! आग विझवायला पुरेसं पाणी नव्हतं. तरीही काही माणसे, बाया व पोरं हातात जे मिळेल ते, बालट्या, गुंडं, चरव्या, मडके, पिपे, गंजं, घागरी, टमरेल, चिंपटं, यात होतं नव्हतं तेवढं पाणी घेऊन आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्‍न करीत होते. कुणी उगीचच आगीवर माती फेकत होते. तरीही आग काही केल्या आटोक्यात येत नव्हती. वार्‍याच्या झोताने आग आणखीनच वाढत होती. आमचा अर्धा मोहल्ला तरी आगीच्या कचाट्यात सापडला होता. आगीपासून आमच्या दोन-तीन घराच्या रांगेपासून उरलेला मोहल्ला तेवढा वाचला होता. त्यात माझं घर पण वाचलं होतं.
सकाळी जिकडे तिकडे राख, जळलेला लाकूडफाटा, फुटलेले कवेलू, वाकलेले टिनं इतस्तत: पडलेले होते. ते दृष्य पाहावल्या जात नव्हतं. जे काही किटूक-मिटूक घरात होतं, ते सारं जळून खाक झालं होतं.
‘लोग टूट जाते है, एक घर बनाने मे
तुम तरस नही खाते, बस्तियां जलाने में’
असं कोणत्यातरी शायराने म्हटले आहे, ते खरंच आहे. जिवाचं रान करुन बांधलेलं हे घर कोणी आगिच्या भक्षस्थानी घातलं तर काय होईल ? मरणप्राय यातना ! दुसरं काय ?
ही आग आमच्याच समाजाच्या मोहना नावाच्या माणसाने लावली होती; अशी चर्चा गावात होती. तो दिसायला उंचापूरा, धिप्पाड व चार-चौघात उठून दिसणारा होता.
तो गावात कधी कधी काहीतरी नवीनच घेऊन यायचा. त्याने आणलेल्या वस्तू नवलाईने पाहायला, आम्ही मुले त्याच्या घरी जात होतो. आम्हाला मोठं कुतूहल वाटायचं. एकदा त्याने गाणे वाजवायचा ग्रामोफोन एका पेटीत बंद करुन आणलं होत. एका आकोड्याच्या काडीने फिरवून हवा भरायचा. त्यात असलेल्या काळ्या रंगाच्या तव्यावर सुई ठेवायचा. मग त्या भोंग्यातून गाणे उमटत असे. आम्हाला मोठी गंमत वाटायची.
पण तो समाजासोबत न राहता डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या बुध्द धर्माला विरोध करीत असल्याचे लोक सांगत असत. त्यामुळे त्याला समाजकंटक म्हणून लोक मानीत असत. तो लभानलोकांना साथ द्यायचा, असेही म्हणत असत. कारण समाजातील लोकांनी गावकीचे मेलेल ढोरं ओढण्यासारखे अपमानजनक कोणतेही कामे करणे सोडल्यामुळे लभान लोक आधिच चिडून होते.
एक दिवस पंचशील झेंड्याजवळ जात-पंचायत भरली होती. त्यात त्याला समाजविरोधी कृत्यामुळे जातीच्या बाहेर टाकले होते. म्हणून तो गावातून निघून गेला होता. तो असा का वागत होता काय माहिती ? पण मी यवतमाळला शाळा शिकत होतो, तेव्हा कधीकाळी भेटला, की माझी मोठ्या आस्थेने विचारपूस करायचा.
माझ्या मोठ्याबाबाचे पूर्ण घर जळलं होतं. त्याच्या घरी चौरंग पाटावर शेंदूर, तेल लाऊन तुकतुकीत व गोलगोल असलेले पांच दगडं ठेवले होते. ते दगडं तसेच तेथे पडून होते. त्याला पाच पांडवाचा देव म्हणत. आमच्या जुमळे घराण्याचे पूर्वज त्या दगडाला पुर्वापार पूजत आलेले होते. त्या दगडाला पाहून मोठ्याबाबाचा मुलगा, बापुराव-दादा म्हणाला, ‘आमचं घर जळत होतं, तेव्हा तू काय करत होता गा देवा....? तू का नाही आमच्या घराला वाचवलं...?’ असं म्हणून दादाने ते दगडं उचलले. एका टोपल्यात टाकले व वाघाडी नदीत जावून बुडवून आला. तेव्हापासून आमच्या घरातील सर्व देव पळून गेले, ते कायमचेच ! बाबासाहेबांची शिकवणच होती तशी !
डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, ‘हजारो वर्षापासून आमचे पूर्वज देव पूजत आले. पण कोणत्याही देवाने आमची सुधारणा केली नाही. म्हणून तुम्ही हे देव सोडून द्या व आपल्या मुलांना शिकवा.’ बाबासाहेब म्हणजे आमच्या गावच्या लोकांचा ‘जीवकी प्राण’ होता ! त्यांच्या शब्दाखातर गावातील लोकांनी देव पूजने नेहमीसाठी सोडून दिले. त्यामुळेच अंधाराचे जाळे फिटून प्रगतीच्या वाटा मोकळ्या झाल्यात.

गुलमोहर: 

विलक्षण अनोखे लिखाण आहे हे. वाचून अंगावर काटा आला.
हे सगळे एकत्रित लिहून पुस्तक काढण्याचा विचार नाही का भविष्यात ?

आवडली,,,, Happy काही काही शब्दांचा अर्थ नाही समजला पण Sad
इतक्या भयंकर प्रथा होत्या आणि थोड्याफार प्रमाणात आता पण असतीलच ना..
बाकी मस्त लिहल आहे ..

विलक्षण.
हल्या म्हणजे काय? बैल का?

कितीही तळमळीने एखाद्या नेत्याने काम केलं, लोकजागृती केली अन लोकांनीसुद्धा त्यांचं म्हणणं ऐकुन आचरण केलं तरी नंतरचे राजकारणी सगळ्याचाच कसा खेळखंडोबा करुन आपआपल्या तुंबड्या भरतात याचे आंबेडकर हे प्रभावी उदा. आहे. असो.

लेख आवडला.

मस्त

छान