बोम दिया अंगोला - भाग १

Submitted by दिनेश. on 12 July, 2012 - 08:39

अंगोला ला यायचा निर्णय घ्यायला मी बराच वेळ घेतला. आफ़्रिकेला तसा मी नवा नाही.
चांगली ८ वर्षे काढलीत या खंडात. पण इथला प्रत्येक देश वेगवेगळा. भारताप्रमाणेच
युरोपीयन वसाहतवाद्यांनी विस्कटून ठेवलेला. आता आता कुठे जरा हे देश सावरायला
लागले आहेत.

यातले बहुतांशी देश, निसर्गसंपन्न आहेत, पण त्या साधनसंपत्तीचा योग्य तो उपयोग
करुन, देशांचा सर्वांगीण विकास करणारे नेतृत्व त्यांना लाभलेले नाही. जिथे नैसर्गिक
साधनसंपत्ती आहे तिथे आताआता कुठे प्रगतीचे वारे नव्हे तर झुळूक यायला लागली
आहे.

इजिप्त ला पुर्वापार पर्यटकांचा राबता असतो. पण त्यापेक्षा सुंदर पिरॅमिडस असूनही,
सुदानकडे कुणी ढुंकून बघत नाही. केनया, युगांडा, टांझानिया, रवांडा आदी देशांनी
इस्ट आफ़्रिकन युनियन करुन, पर्यटन आणि शेती उद्योगात बरी प्रगती केली आहे.
मध्य आफ़्रिकेतील झिंबाब्वे आणि झांबिया खनिजाने समृद्ध आहेत. मॉरिशियस, अगदी
चिमुकले बेट असूनही, साखर आणि पर्यटन याने समृद्ध झालेत. मादागास्कार, मालावी,
मोझांबिक पण प्रगती साधताहेत. इजिप्त सोडला तर हे बहुतेक पुर्व आफ़्रिकेतले देश
आहेत. पण आफ़्रिकेच्या पश्चिम किनाऱ्याला, खनिज तेलाचे वरदान लाभलेले आहे.

अल्जीरिया, नायजेरिया, घाना, लिबिया सारखे देश खनिज तेलाने समृद्ध आहेत.
नायजेरियात बरीच वर्षे तेलाचे उत्पादन घेतले जात असले तरी, दळणवळणाच्या
सोयी अजून तितक्याश्या नाहीत. तिथे बरीच वर्षे भारतीय लोक स्थायिक झालेले
आहेत.

अंगोला मधे खनिज तेलाबरोबरच हिरे पण आहेत. असे असूनही हा देश, जवळ जवळ
२० वर्षे, यादवी युद्धात होरपळला गेला. यादवी युद्ध हे अनेक प्रकारे नुकसान करते.
त्या काळात शिक्षणासकट सर्वच संस्था कोलमडून जात असल्याने, त्याकाळात
वाढत असलेली पिढी, कुठल्याही कौशल्यापासून वंचित राहते. आणि हे युद्ध संपल्यावर
देखील, नवीन उद्योग व्यवसायात या तरुणांना काम करणे अवघड जाते.

एक उदाहरण बघा, या युद्धापुर्वी, अंगोला कॊफ़ीसाठी प्रसिद्ध होता. पण आता ते सर्व
मळे वाया गेले आहेत. चहा आणि कॉफ़ी हि नगदी उत्पादने असली तरी त्या झाडांचे
तंत्र आणि उत्पादन प्रक्रिया फ़ार जिकिरीची असते. या काळात परदेशी तंत्रज्ञ
देश सोडून गेले आणि स्थानिक लोकांना ते तंत्र जमले नाही. आता परत ते मळे
जोपासणे अवघडच आहे.

आफ़्रिकेतल्या प्रगतीसाठी धडपडणाऱ्या देशात, व्यावसायिकांना नेहमीच मागणी असते.
माझ्या दक्षिण आफ़्रिकेतील मित्राने, मला ही ऑफ़र दिली होती. पण मी होकार
द्यायला बराच वेळ घेतला.

माझ्यातर्फ़े मी या देशाचा अभ्यास करायला सुरवात केली. त्यासाठी मी काही ब्लॊग्ज
चाळले. त्यांनी केलेले बहुतांशी लेखन हे निराशाजनकच आहे (जरी ते लोक इथेच
स्थायिक झाले असले तरी ) काहीजणांशी प्रत्यक्ष बोललोदेखील, पण त्यांनीदेखील
निराशेचाच सूर लावला.

अंगोलाची राजधानी लुआंडा हे जगातील सर्वात महागडे शहर अशी ख्याती आहे.
( हो तोक्यो आणि न्यू यॉर्क पेक्षाही ) यू ट्य़ुबवर तशा काही क्लीप्स पण आहेत.
इथे काहिही निर्माण होत नाही, सगळे आयात करावे लागते, त्यामूळे ते प्रचंड महाग
असते, असे लिहिलेले आहे. पण तरीही... मी निघालोच.

माझा व्हीसा, मी केनयात असतानाच, प्रिटोरिया ( दक्षिण आफ़्रिका ) येथून आला होता.
इथे यायला भारतातून थेट विमान नाहीच. माझे तिकिट इथिओपियन एअरलाईनचे होते.
या विमानकंपनीचा देखील मी फ़्रिक्वेंट फ़्लायर असल्याने, शाकाहारी जेवण आणि खिडकी
यांची सोय आपोआपच होते. आता दोनचार ओळी या देशाबद्दल.

सर्वात प्राचीन असा मानवी सांगाडा, या देशात सापडला आहे. त्या स्त्रीला अखिल मानव
जातीची माता, मानले जाते. सध्या तसा हा देश गरीबच आहे. ९० % लोकसंख्या शेती
करते. पण पर्यटक इथे येतात. एकतर हवामान खुप थंड आहे आणि निसर्गसौंदर्य अप्रतिम
आहे.

या विमानकंपनीने आफ़्रिकेत चांगलाच जम बसवला आहे. बुर्किना फ़ासो सारख्या अनेक
छोट्या छोट्या देशात हि विमाने जातात. ( बुर्किना फ़ासो हा देश घानाच्या उत्तरेला आहे.
तिथला कोको फ़ार प्रसिद्ध आहे आणि या उद्योगात त्याच देशातले लोक राबत असतात.)
त्यामूळे अदीस अबाबा हे आफ़्रिकेचे हब झालेले आहे. मुंबई, दिल्ली आणि हॉंगकॉंग वरुन
प्रवासी आले कि त्यांना बाकीच्या देशात पाठवायची लगबग इथे असते.
(या विमानतल्या हवाई सुंदऱ्या पण खुप स्मार्ट असतात. रंगाने सावळ्या असल्या तरी
नाकी डोळी भारतीय चेहरेपट्टीच्याच वाटतात.)

अदीस ते लुआंडा विमानात मात्र भारतीय असा मी एकटाच होतो. बहुतेक प्रवासी चिनी
दिसत होते. आफ़्रिकेच्या मध्य भागावरुन, म्हणजे लेक व्हीक्टोरिया, कॉंगोचे घनदाट
जंगल असे पार करत आम्ही लुआंडावर घिरट्या घालू लागलो.

आफ़्रिकेच्या दक्षिण पश्चिम किनाऱ्यावर अनेक मोठी जहाजे वाळून रुतून बसलेली आहेत.
*नामिबीया च्या एका बीचला तर त्यामूळे स्केलेटन बीच असे नाव पडलेय. अंगोलाच्या
किनाऱ्यावर पण अशी जहाजे दिसली.

विमानतळ छोटासाच होता, तरी दोन तीन विमाने नुकतीच उतरलेली होती. त्यामूळे
इमिग्रेशनला खुप मोठी रांग होती. साधारण २ तास लागले मला या रांगेत. पण कुठलाही
फ़ॉर्म वगैरे भरावा लागला नाही. ( असे देश फ़ारच कमी आहेत. काही देशात तर निबंधच
लिहावा लागतो.) बाहेर आलो तर रिकाम्या ट्रॉलीज कुठे दिसेनात. पोलिसाला विचारले तर
म्हणाला, बाहेर आहेत. मी कस्टम्स पार करुन बाहेर जाऊन ट्रॉली आणली. हे पण नवलच !
(लेगॉसला ट्रॉलीसाठी १ डॉलर द्यावा लागतो, आणि क्वांटास च्या फ़्रिक्वेट फ़्लायर प्रोग्रॅमसाठी
पैसे भरावे लागतात.. किती ती नवलं !! )

ते ग्रीन चॅनेल, रेड चॅनेल प्रकरण होतेच. पण त्यातून कसे पसार व्हायचे, हे मला आता चांगलेच
माहीत आहे. विमानतळावर न्यायला गाडी आलीच होती.

शहरात शिरताना प्रचंड कोंडी असणार याची कल्पना होती, पण तेवढी नव्हती. माझे राहण्याचे
ठिकाण, व्हियाना हे लुआंडापासून १५ किमीवर आहे. पण तेवढे अंतर मोठ्या हायवेवरून
पटकन पार पडले. हायवे सोडल्यावर मात्र कच्चे रस्ते होते. कुशल चालकामूळे त्यावरूनही
लवकर आलोच.

माझे राहते घर हा प्रचंड मोठा फ़्लॅट आहे. घरात सर्व सुखसोयी आहेत, पण वीज मात्र जनरेटरचीच.
घरासमोरूनच वीजेचे खांब गेले आहेत, पण वीजेची परिस्थिती नायजेरियासारखीच.
(नायजेरिया एलेक्ट्रीकल पॉवर ऑथोरिटी म्हणजेच नेपाचे टोपण नाव आहे, नेव्हर एक्स्पेक्ट पॉवर
अगेन )

घराच्या आजूबाजूला मात्र खेडेगाव आहे (असे वाटले होते, आधी ) लुआंडाबद्दल भयानक
ब्लॉग्ज वाचून, कुणी तिथे रस्त्यावर येणार नाही. पण या गावात मात्र मी बिनधास्त फ़िरतो.
हा कोण नवा पाहुणा, म्हणून लोक अजिबात वळून बघत नाहीत. नायजेरियात आणि केनयात
मात्र छोट्या गावात, लहान मूले माझ्या मागे लागत असत.

सगळीकडे रेतीचेच रस्ते आहेत पण बरीच छोटीमोठी दुकाने दिसतात. प्रत्येक दुकानात जनरेटर
आहेच. आंतराराष्ट्रीय बाजारात मिळणारे बहुतेक पदार्थ (लेज, ट्वीक्स, कॉर्नफ़्लेक्स) उपलब्ध
असतातच. (ब्लॉग्ज लेखकांनी इथे काहिच मिळत नाही असे लिहिलेय )

मोठ्या सुपरमार्केट्समधे तर बहुतेक सगळे मिळते. अर्थात भारतीय पदार्थ मिळतील अशी अपेक्षा
नव्हतीच. पण अनेक कडधान्ये दिसली. डाळींपैकी फक्त मसूर डाळ दिसली.

या देशात काही आयात करायचे म्हणजे प्रॉब्लेम आहे. लुआंडा बंदर जरा लहान असल्याने
जास्त प्रमाणात कार्गो हाताळू शकत नाही. शेजारी देश नामिबीयाची परिस्थिती, उघड्यापाशी
गेलं वाघडं अशी आहे. त्यामूळे रस्त्याने काही आणायचे तर ते दक्षिण आफ़्रिकेतून आणि अर्थातच
वेळखाऊ. त्यामूळे नाशिवंत पदार्थ आणणे कठीणच. नाही म्हणायला झिंबाब्वे मधून ताजी फ़ळे
आलेली दिसताहेत. त्यामूळे भडक रंगाची संत्री, पेअर्स आणि सफ़रचंदानी बाजार भरलेले आहेत.
मी मुंबईत या भेटीत चांगली सफ़रचंदे १४० रुपये किलो या भावानी घेतली होती. त्यामानाने
इथे जर ती १६० रुपये, असली तर महाग नाही म्हणता यायची.

आयात पदार्थांपेक्षा स्थानिक उत्पादनांत मला नेहमीच रस असतो. फ़ळांपैकी सध्या संत्री, मोसंबी,
अननस, पपया, केळी यांनी बाजार भरलेले दिसतात. अर्थातच ती जास्त चवदार असतात.
इतकेच नव्हे तर बोरे, पेरू, अवाकाडो, काटेफ़णस आणि करमळे पण दिसतात.
नैरोबीचा भाजी बाजार म्हणजे स्वर्ग होता इथे तेवढ्या भाज्या मिळतील अशी अपेक्षा नव्हतीच.
तरीपण कांदे, बटाटे, टोमॅटो याशिवाय कोबी, वांगी, भेंडी, सिमला मिरची, गाजरे आणि स्थानिक
पालेभाज्या दिसल्याच. रताळी, भोपळा, कसावा आणि काही स्थानिक कंद पण दिसतात.

इथले शेंगदाणे फ़ार चवदार वाटले, रंगाने लाल आणि गोडसर चवीचे. स्थानिक तांदूळ पण
छान लागला (सध्या तोच खातोय.) वेगवेगळ्या बीन्स पण चाखून बघतोय.

आणखी बरेच लिहायचे आहे, लिहितो पुढच्या भागात.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

दिनेशदा, मस्त माहिती. इथे बसून तिथली सफत करतेय. धन्यवाद!
आणखी भागांच्या प्रतिक्षेत. दिनेशदा कृपया माझ्या विपूत लिंक द्याल? Happy

दिनेशदा, टायटल एकदम झांसू आहे, आपल्या काही हिंदी सिनेमांवरुन (जाग उठ्ठा इन्सान, गुंज उठी शनाई सारखं)की काय असं वाटल. Happy
मस्त माहिती. फोटो येऊ द्यात.

खूप चांगली माहिती देत आहात दिनेशदा. अजूनही येणार आहे त्याची वाट पहात आहे. त्यात फोटो पण असतील ही अपेक्षा.>> +१

दिनेशदांचे लेख म्हणजे माहितीची मेजवानीच >>>> अगदी अगदी
दिनेशदा पुढील भागाच्या प्रतीक्षेत

मस्त लिहिलयत. अजूनही इथल्या लोकांबद्दल, भाषा संस्कृती बद्दल वाचायला आवडेल Happy
पुढच्या भागांची आणि फोटो-रेसिप्यांची वाट पहात आहे.>>>> अगदी अगदी

मस्त लिहिलयत. अजूनही इथल्या लोकांबद्दल, भाषा संस्कृती बद्दल वाचायला आवडेल
पुढच्या भागांची आणि फोटो-रेसिप्यांची वाट पहात आहे.>>>>>>>

+१

जाग उठ्ठा इन्सान, गुंज उठी शनाई सारखं >> Lol

फोटोसहित तुमचं लिखाण वाचायची सवय झाली आहे त्यामुळे पुढचा भाग तसाच हवा Happy नेहमीप्रमाणेच छान लिहिलंय.

लेख आवडला... अशा देशांबद्दल कधी वाचले नव्हते आधी.
जाम उत्कंठा आहे पुढचे भाग वाचण्याची. लवकर लिहा. Happy

मस्त लिहिलयत. अजूनही इथल्या लोकांबद्दल, भाषा संस्कृती बद्दल वाचायला आवडेल
पुढच्या भागांची आणि फोटो-रेसिप्यांची वाट पहात आहे.>>>>>>> +१

खूप आवडली ही सगळी माहिती. मला खूप नवल वाटतं; की सहसा एखाद्या ठिकाणी घडी बसलेली असली की ती मोडून दुसरीकडे बसवणं लोकांना नको असतं. आणि तुम्ही तितक्याच उत्साहाने, कुठेही नकाराचा सूर न लावता, आहे ती परिस्थिती, माणसं, परिसर सगळंच सामवून घेता. शिवाय तिथे उपलब्ध असलेल्या गोष्टी वापरून स्वयंपाक करता. तुमच्या कुठल्याही लेखनातून कुठल्याच गोष्टीबद्दल तक्रारीचा पुसटसा वासही येत नाही. दा........तुस्सी ग्रेट हो!!

दिनेशदा

<<(नायजेरिया एलेक्ट्रीकल पॉवर ऑथोरिटी म्हणजेच नेपाचे टोपण नाव आहे, नेव्हर एक्स्पेक्ट पॉवर
अगेन

ह्या कम्पनीचे नाव आता बद्लले आहे Power Holding Corporation of Nigeria (PHCN)
चतुर लोकान्नी लगेच त्याचाही फुल फॉर्म केलेला आहे
PHCN
Problem Has Changed name

जेके, नेपाच्या आधी त्या नावात पी एल सी पण होते, त्याला फुल फॉर्म, प्लीज लाईट अ कँडल.. असा करायचे लोक.

शोभा बोंद्रे यांच्या लेगॉसचे दिवस या पुस्तकात तर याहून मजेशीर कहाण्या आहेत !

>>>>बुर्किना फ़ासो हा देश घानाच्या उत्तरेला आहे

अरे बाप रे! ह्या नावाचा देश आहे? हे नव्हतं माहित. नव्या जॉबसाठी शुभेच्छा दिनेशदा! मस्त लेख. पुढल्या लेखात मात्र फोटो आणि रेसिपीज पाहिजेत हं Happy

छान लिहिलयत न्दिनेशदा Happy

>>>अजूनही इथल्या लोकांबद्दल, भाषा संस्कृती बद्दल वाचायला आवडेल
पुढच्या भागांची आणि फोटो-रेसिप्यांची वाट पहात आहे.>>>> ++१००

Pages