माळरानी खड्कात जेव्हा रुजते बियाणे

Submitted by अनिल तापकीर on 10 July, 2012 - 06:59

यंदा पावसाने ताण दिला नि आख्या पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले. कुठून कुठून पैदा केलेले बियाणे ज्याने त्याने घाई करून पेरले होते. पालख्या पंढरपुरात पोहचल्या कि हमखास पाऊस लागतो असा आजपर्यंतचा अनुभव होता. परंतु यंदा पालख्या परत फिरल्या तरी पाऊस जोर धरत नव्हता. दिवसातून एखादी सर यायची पण अंगावरील कपडे देखील भिजायची नाहीत. कमी ओलीमुळे दाणा पीठाळला नि उगवण चांगली झालीच नाही. उगाच कुठतरी फुटा दोन फुटावर मोड दिसत होता.
अर्ध्या एकर शेतात पेरलेल्या भुईमुगाच्या विरळ मोडांकडे हताशपणे पाहत रायाजी बसला होता. वीस किलो बी त्याने बाराशे रुपयांचे घेतले होते.अजून जगुनानाचे पैसे दिले नव्हते. एवढं मोलाम्हागाइचे बी आणून ते उगवले नाही तर रायाजीचे अवघड होणार होते. भाताच्या खाचरातील दाढ सुध्दा नीट नव्हती. आणि जरी दाढ चांगली आली असती तरी भात लावायला पाणी तर पाहिजे. ह्या पावसाला कुणी धरलाय कुणास ठाऊक.
रायाजी असा कपाळाला हात लाऊन बसला होता. विचार करत होता कि काय करावं पिक चांगल नाही आलं तर कर्ज पाणी कसं फेडावं, पोरीच्य कलासची फी भरायची हाय आख्ख्या घराण्यात कॉन एवढं शिकलं नव्हतं पर माही पोर औन्दा दहावीला गेली लय हुशार हाय सगळी म्हणत्यात तिला शिकीव पर हा खर्च आपल्याला झ्यापल का? शिवाय तिला आता सोळावं लागलं म्हंजी दोन वर्सात तिचं लगीन बी कराया पाहिज
रायाजी असा विचार करत तेवढ्यात त्याची बायको सरू भाकरी घेऊन आली. आणि आल्या आल्या रायाजीवर कारवादली आवं असं काय भरल्या शेतसरीत कपाळाला हात लावून बसलाय.
तिच्या येण्याने रायबाची तंद्री भंग पावली नि कसनुस हसून तो म्हणाला काही नाही ग, उगा आपलं बसलो हुतो.
मला माहित हाय तुम्ही काय करत हुता ते.
म्हंजी.
आवं कितींदा तुम्हाला सांगितलं कि झुरत जाऊ नका जे व्हायचं असल ते हुईल काळजी करण्याने का आपली गरिबी जाणार हाय?
नाही ग सरू काळजी करत न्हाय पर थोडासा इचार येणारच ना डोस्क्यात, एवढं आपुन कष्ट करतो पर हाती काही लागताच न्हाई कधी पाऊस ताण दिल, तर कधी बाजारच मिळणार न्हाय आणि सगळं यवस्थित झालं तर कीडच सगळ पिक खाऊन जातीय.
काहीबी काळजी करू नका जे जगाच हुईल ते आपलं हुईल दुष्काळ का आपल्या एकट्याच्याच घरावर ईल व्हय.
बोलता बोलता दोघा नवरा बायकोने जेवण उरकले. हात धुवत असताना सरू म्हणाली -धनी पोरीच कलास च पैकं भरायला पाहिजे. सकाळीच साळत जाताना पोर म्हणत हुती.
हो ना तिच तर काळजी करत हुतो आपली गरिबी च एवढी फाटलेल्या आभाळा वाणी हाय कि कुठं कुठं टाकं घालावं तेच समजत न्हाय.
मी काय म्हणते आपण माझ्या पाटल्या मोडू म्हंजी ब्याच पैसं नि कलास च पैसं मिटवता ईल
आगं पर तो डाग न्हाय मोडू वाटत उभ्या आयुष्यात म्या तुला काय डाग केला न्हाय आणि तेवढा एकच हाय तो मोडायचा व्हय.
आवं पर आपल्या मुक्ताच्या शिक्षन्या साठीच करतोय ना हे सगळ, आणि मला बाई न्हाई सोन्यानाण्याची हौस.
बर बघू संध्याकाळी घरी गेल्यावर.

पाऊसाने उशिरा का होईना सुरुवात केली परंतु तो एवढा ढासळला कि आले होते तेवढे सगळे पिक धुवून नेले. ओढ्या नाल्यांना पूर आले पुराचे पाणी शेतांनी घुसले आणि शेतकऱ्यांची दैना उडविली.
साऱ्या शिवारातील पुरासारखा पूर शेतकऱ्यांच्या डोळ्यातही आला.
ह्या अश्या हातघाई च्या पावसात मुक्ता अंगावर प्लास्टीकचा कागद घेऊन चार किलोमीटर चालत हायस्कूलला जायची तिच्या बरोबरीच्या साऱ्या मुलींच्या जवळ छत्र्या असायच्या पण तिने कधीच आपल्या आई वडिलांकडे छत्रीसाठी हट्ट धरला नव्हता. तिला घरच्या ओढाताणीची जाण होती. आपण शिकून खूप मोठे व्हायचे नि आपल्या आईबापाला सुखी करायचे हेच तिचे ध्येय होते.
अंगावरचा कागद थोडा फाटलेला असूनही तिने नवीन घेण्यासाठी वडिलांकडे पैसे मागितले नव्हते. राहिलेला महिना दीड महिन्याचा पाऊस काळ ह्याच कागदावर काढू असा तिचा विचार होता. परंतु पाऊस एवढा पडायचा कि शाळेतून घरी येईपर्यंत ती ओलीचिंब व्हायची. दफ्तर मात्र कोरडे ठेवायची. बहुतेक कागद ती दफ्तारावरच धरायची. सलग सहा सात दिवस भिजल्यामुळे एक दिवस रात्री तिला ताप आला.
तिला ताप आला नि रायाजीचे नि सरुचे धाबे दणाणले. लग्नानंतर आठ वर्ष्यांनी मुक्ता झालेली तिच्या नंतर मात्र त्यांना अपत्य झाले नाही. त्यामुळे एकुलती एक मुक्ता त्यांना जीव कि प्राण होती.
एक दोन दिवस घरगुती औषधावर काढले परंतु काही फरक पडला नाही. म्हणून तिला तालुक्याच्या गावी दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी तपासल्यानंतर टायफायीड झाला आहे अडमिट करायला सांगितले.
दवाखान्यात पंधरा दिवस काढूनही म्हणावा तसा ताप थांबला नाही. रायाजीने गावभर हिंडून ज्याच्या त्याच्या पुढे हातपाय पसरून पैश्याची कशीबशी सोय केली.
डॉक्टरांनी शहरातून मोठ्या डॉक्टरांना बोलावून घेतले. पुन्हा आठ दिवस वेगवेगळे उपचार केले तेव्हा कुठे ताप थांबला. ताप थांबला परंतु मुक्ताला एवढा अशक्तपणा आला होता कि, पुढचे चार सहा दिवस तिला उभे राह्यला देखील आईची मदत लागायची.
जवळ जवळ दीड महिना मुक्ता आजारी होती. शाळेचे, क्लासचे खाडे झाले होते. अभ्यासाचे प्रचंड नुकसान झाले होते. खाटेवर पडल्या पडल्या ती विचार करत होती कि, आपल्या आईवडिलांवर खूप वाईट परिस्थिती ओढवलीय,माझ्या आजारपणामुळे त्यांच्यावर खूप कर्ज वाढलंय आता आपणच नव्या जोमाने अभ्यासाला लागायला पाहिजे. मी शिकले तरच त्यांना सुख लागेल आणि त्यांची ह्या काबाड कष्टातून मुक्ती मिळेल.
असा विचार केला नि मुक्ताने अभ्यासात स्वताला झोकून दिले. तिच्या नजरेसमोर एकच ध्येय होते. दहावीला जास्तीत जास्त मार्क्स पाडायचे.
परीक्षा झाल्या मुक्ताला पेपर अतिशय चांगले गेले. परीक्षा झाल्यानंतर मुक्ता आईवडिलांच्या मदतीसाठी रोज शेतात जाऊ लागली.
पावसाने दगा व नंतर तडाखा दिल्यामुळे त्या काळात केलेले अपार कष्ट फुकट गेले होते. एवढं राब राब राबूनही शेतकऱ्यांच्या हाती काहीही लागलं नव्हतं. आता हा दुसरा हंगाम हाताचा जायला नको म्हणून रायाजीने सगळ्या शेतात ज्वारी पेरली. व जिथे जमिनीला ओल होती तिथे हरभरा टाकला. हा हंगाम थोडा चांगला गेला. हवामान चांगले राहिल्यामुळे ज्वारी चांगली आली. नि बाजारही बरा मिळाला रायाजीचे अर्धे कर्ज फिटले.
रायाजी, सरू नि मुक्ता शेतातील तण काढत होते. भयंकर उकाड्यामुळे अंगाची नुसती लाही लाही होत होती. अजून एकही वळीव पडला नव्हता. आणि तो पडल्याशिवाय उकाडा कमी होणार नव्हता. आणि रायाजीला वळीव पडायच्या आत रान निर्मळ करायचे होते. म्हणूनच एवढ्या उन्हात ते तिघे काम करत होते.
तेवढ्यात रायाजीचा लहान भाऊ शिवाजी ओरडत आला -
दादा, ये दादा, वाहिनी, मुक्ता असे नुसते नावानेच ओरडत तो गावाकडून पळत येत होता. तिघांनीही माना वर करून पहिले हा का पळतोय हे न कळल्यामुळे तिघेही घाबरले.
काय झाले कुन्हास ठाऊक भावजी का येव्हडे पळत येत्यात मागं वाघ लागल्यावणी -सरू म्हणाली
आता मला तरी काय माहिती का पळत आलाय तो -रायाजी
ह्या दोघांचा संवाद होई पर्यंत शिवाजी जवळ आला नि सांगू लागला खरं तर त्याला दम लागल्यामुळे बोलताही येत नव्हते तरी तो सांगू - दादा, वाहिनी आपली मुक्ता पास झाली. आणि तालुक्यात पहिली आलीय हे बघा पेपरात फोटो आलाय आपल्या मुक्ताचा.
आपल्या पोरीचा पेपरात आलेला फोटो पाहून रायाजी नि सरूला भरून आले आनंदाचे अश्रूंनी दोघांनीही मुक्ताला जणू आंघोळच घातली. आपल्यासारख्या अडण्याच्या पोटी मुक्तासारख रत्न जन्माला घातलं म्हणून दोघांनीही देवाचे आभार मानले.

गुलमोहर: 

खूपच सुरेख लिहिलंय..... प्रभावी लेखनशैली.....
खूप आवडली ही कथा....
धन्यवाद अनिलजी - पु ले शु

धन्यवाद्,गामा पैलवानजी.
लेखातलं वास्तव अगदी ऊलट समझलो नाही.

सध्या विविध संस्थांच्या वतीने गुणवंत विध्यार्थ्यांचे सत्कार चालू आहेत . ही कथा मि पुन्हा वाचली सर्व विध्यार्थ्यांसाठी ही कथा खुपच प्रेरक आहे

Happy
सुरेख..
अजुन फुलवता आली असती.
happy ending अपेक्षीत होतं, म्हणजे ती नोक री ला लागते आणि कर्ज फीटतं असं...

पण मस्त जमली आहे.