निद्रेचा तुरूंग..........

Submitted by jayantckulkarni on 3 July, 2012 - 12:27

१९६६, १९६७ अणि १९६८ साली पावलो कोएल्होला मानसिक रुग्ण ठरवून समाजाला घातक ठरण्याची शक्यता आहे असे सांगून द्वाखान्यात भरती करण्यात आले. त्यावेळी त्याने लिहीलेली ही काही पाने..........
ही पाने ब्राझीलच्या सिनेटमधे वाचून दाखवण्यात आली आणि या संदर्भातील बरेच कायदे बदलण्यात आले व अशा रुग्णांकडे माणूसकीच्या दृष्टीकोनातून विचार करण्याची पद्धत रूढ झाली.

निद्रेचा तुरूंग. – स्वैर भाषांतर.

२० जुलै, बुधवार.
८.००
रक्तदाब घेण्यासाठी मला त्यांनी उठवले तेव्हा मला कळाले की मी स्वप्नात नव्हतो. हळुहळू माझ्या डोक्यात वास्तव शिरायला लागले. त्यांनी मला लगेच कपडे करायला सांगितले. बाहेर दवाखान्याची पांढरी शुभ्र गाडी उभी होती. त्याच्यावरची अक्षरे मला ओळखीची वाटली. चायला यांना दूसरी नावे नाहीत का ? एखाद्या मनोरुग्णाचे नाव ठेवायला काय हरकत आहे ? मी मनाशी म्हटले. अशा गाडीत स्वत: चालत जाऊन बसायचे ही काही एवढी सोपी गोष्ट नाही.

आसपासच्या खिडकीतून नजरा माझ्याकडेच रोखलेल्या मला कळत होत्या. एक केस वाढलेला तरूण खाली मान घालून या गाडीत बसलेला त्यांना दिसत असणार. हो ! खाली मान घातलेला. पराभूत.

९.३०
सगळे सरकारी कागद त्या घाणेरडया वास येणार्‍या शाईने भरल्यावर सगळे सोपस्कार झाले असे मला सांगण्यात आले. आज परत त्याच तिसर्‍या मजल्यावर मी बसलोय. हे सोपस्कार वगळता सगळ्या गोष्टी कशा पटापट घडल्या. कोणाचा विश्वास बसणार नाही इतक्या पटापट. हा नऊ आकडा फारच धोकादायक. नऊ महिन्यानंतर मी या जगात आलो ना. सालं ग्रहणच असावे तेव्हा. कालच मी माझ्या मैत्रिणीबरोबर आनंदाने फिरत होतो. थोडा काळजीत होतो, पण हे असे होईल असे काही मला वाटले नव्हते. मी जर घरी गेलोच नसतो तर बाबांशी भांडणाचा तो तमाशा झालाच नसता.
मधून मधून मी माझ्या मैत्रिणीचा विचार करतो. तिची खूपच आठवण येते.
इथे सगळे कसे उदास आहे. भिंतीवर एक कार्टून लावलेले आहे, फक्त त्याच्याच चेहर्‍यावर हास्य आहे. बाकी सगळे डोळे कुठेतरी शून्यात काहीतरी शोधत असतात. बहूदा ते स्वत:लाच शोधत असतील. माझ्या रूम पार्टनरला मृत्यूचा विचार छळतो आहे. त्याला चिडवण्यासाठी मी मगाशी मुद्दामच माझ्या छोट्याशा बासरीवर रडकी गाणी वाजवली. आमच्या गावात नदीकाठी झाडाखाली बसून मी वाजावायचो, तीच बासरी. बासरी आहे ते बरे आहे. या उदास आणि दु:खी वातावरणात तेवढेच जरा बरे वाटते. आयुष्याकडे काहीच न मागणार्‍यांचे दु:ख फार भयानक असते. काहीच मागणे नाही. नशीब त्यांना अजून स्वर आणि गाणे कळते.

दुपारी ३.००
येथे तीन वर्षे काढलेल्या एका तरूणाबरोबर बोलत होतो. मी त्याला सांगितले की मी इथे विटलो आहे आणि मला बाहेर जायचे आहे.
गंभीरपणे तो म्हणाला “का ? चांगलं आहे की इथे. कशाचीही काळजी नाही. कशाला स्वत:शी झगडायच ? तसे कोणाला काय पडलंय म्हणा इथे ?” ते ऐकून मी हादरलो. हादरलो कारण उद्या मी पण असा विचार करायला लागलो तर ? हा विचार करताना मला खरच यातना होताएत. कधी या जाळीतून जगाकडे बघायचे थांबणार आहे कोणास ठावूक ! एखाद्या माणसाला फाशीची शिक्षा झाल्यावर त्याला माहीत असते की तो एक दिवस दयेच्या अर्जावर बाहेर येणार आहे, पण तो दिवस केव्हा येणार ? आज ? का उद्या का एका महिन्यानंतर का पुढच्या वर्षी? का कधीच नाही ?
कधीच का नाही ?

संध्याकाळी ५
कधीच नाही का ?

संध्याकाळी ७.२०
हा मजला सोडून मला जाता येत नाही, मला कोणाला फोन करता येत नाही ना कोणाला पत्र लिहता येते. थोड्याच वेळापूर्वी मी माझ्या मैत्रिणीला गुपचूप फोन करायचा प्रयत्न केला पण बहूदा तिला तो घेता आला नाही. पण घेतला असता तरी मी काय बोललो असतो तिच्याशी ? मी तक्रार केली असती का, स्वत:लाच दुषणे दिली असती ? मी बोलूच शकलो असतो का ? मला अजूनही बोलता येते ?

ज्या शांतपणे लोक येथे स्वत:ला कोंडून घेतात याचे मला फार आश्चर्य वाटते. त्यात काय आश्चर्य वाटायचे? मीही एक दिवस याचा स्विकार करेन का ? एवढ्याच शांतपणे ? माणूस विसाव्या वर्षी क्रांतीकारक असतो आणि चाळीसाव्या वर्षी तो विझतो, असे म्हणतात तर माझे वय काय ? बहूदा ३९ वर्षे आणि ११ महिने असावे. मी पूर्ण पराभवाच्या उंबरठ्यावर उभा आहे याची जाणीव, मला मी, मला आई भेटायला आली, तेव्हा तिच्या डोळ्यात बघितले तेव्हा झाली. तिच्या नजरेत तिला माझ्याविषयी वाटणारी घृणा मला स्पष्ट दिसली. आज पहिलाच दिवस आहे आणि मला अर्धी लढाई हरल्यासारखे वाटते आहे. हे बरोबर नाही. काहीतरी केले पाहिजे.

२१ जुलै गुरवार.
८.००
साला काय दिले होते मला कोणास ठाऊक. जी झोप लागली ते आत्ता उठलो. त्यात त्याने रात्रीच मला झोपेतून उठवून मला प्रश्न विचारला की हस्तमैथून करणे पाप आहे का नाही. मी नाही म्हणालो आणि कूस बदलली. त्याने मला हा प्रश्न का विचारला असेल ? का मलाच तसे स्वप्न पडले ? काहीही असले तरी विचित्रच साला ! हा माझा सोबती, दिवसभर गप्पच बसलेला असतो. जेव्हा बोलतो तेव्हा एकच प्रश्न विचारतो. “ बाहेर कसं काय आहे ?” जणू काही तो आजच बाहेर जाणार आहे. बिच्चारा. त्याला त्याच्या जातीचा भयंकर अभिमान आहे पण तो आता आत आहे आणि त्याला हे पटलेले आहे की त्याला कसलातरी आजार झालेला आहे.
मी मात्र हे कधीच मान्य करणार नाही
कधीच नाही !

११.३०
आत्ताच पाकीट बघितले तर ते त्यांनी रिकामे केलेले आहे. आता काही विकत घ्यायचा प्रश्नच मिटला. आज माझी मैत्रीण भेटायला येणार आहे. तिने तसे वचनच दिले आहे मला. मला माहिती आहे मला कोणाशीही बोलायला परवानगी नाही, पण मला तिच्याशी फार महत्वाचे बोलायचे आहे म्हणून मी चोरून तिच्याशी फोनवर बोललो. मीही तिला मी किती उदास आहे याचा पत्ता लागून दिला नाही. उगचच हलके फुलके विनोद मारत होतो मी.

सगळ्यांना मला काहीतरी दाखवायचे असते. एकजण मला जादू दाखवतो आणि शिकवतो. आजच त्याने मला दुसर्‍याचे वय कसे ओळखायचे हे शिकवले. माझे ३९ आहे का ? असा प्रश्न माझ्या मनात येऊन मी परत उदास झालो. रूम पार्टनरला कायम मोठ्मोठ्या लोकांची ओळख वाढवायचे वेड आहे. खरे खोटे त्याला माहीत पण त्याची ज्या लोकांशी ओळख आहे असे तो सांगतो, त्या ओळखीने, तोच काय आम्ही सगळे इथून बाहेर पडू शकतो. एक एक नमुने भरलेत इथे. एकजण सारखे त्याचे अन्न हुंगत असतो तर दुसरा जाडे होण्याच्या भीतीने कित्येक दिवस जेवतच नाही. एकाला तर सेक्स सोडून दुसरा विषयच माहीत नाही तर दुसर्‍याला सेक्सचे दुषपरिणाम या विषयात गोडी आहे.
रूम पार्टनर त्याच्या कॉटवर आढ्याला डोळे लावून पडला. रेडिओवर एक युगूल गीत लागलेले दिसते. पण याच्या मनात काय चालले आहे ? त्या आढ्यात काय शोधतोय तो ? का त्या मोठ्या शुन्यात तो भरकटत चाललाय ? का त्याने त्या शून्यापूढे शरणागती पत्करलीए ? त्याच्याकडे नकोच बघायला, नाहीतर मलाच वेड लागेल.
मी बाकीच्या रोग्यांशी बोलायचा प्रयत्न केला. काही येथे तीन महिने आहेत तर काही कित्येक वर्ष ! येथे रहाणे माझ्या सहनशक्तीच्या पलिकडचे आहे.
उजेड कमी होत चालला आहे. रस्त्यावर बाजूच्या उंचा इमारतींच्या सावल्या बघून आता अंधार पडणार आहे हे समजते. अरे देवा ! मला या अंधारापासून वाचव !

१०.००
हंऽऽऽऽ काल रात्री मी माझ्या मैत्रिणीला फोन केला. तिने माझ्यावर तिचे अजून प्रेम आहे हे सांगितल्यामुळे मी एकदम खूष आहे. त्या आनंदाच्या भरात बहूतेक मी काय काय बडबडलो देवाला माहीत. भावना न आवरता येणार्‍या माणसाला काय म्हणतात बरे...... मूर्ख...मूर्ख... तिने आता सोमवारी यायचा वादा केलाय. माझा स्वभाव कटकट्या तर झालेला नाही ना? मी एक क्षूद्र माणूस आहे असे मला का वाटते आहे आज ?....

रविवार २४ जूलै
रविवार सकाळ.
मी रेडिओ ऐकतोय. मला आज एकटे एकटे वाटतय. ही एकटेपणाची भावना माझा जीव घेते आहे. रविवार सकाळ, एक उदास, कंटाळवाणा रविवार. इथे मी या जाळीच्या दरवाजाच्या मागे माझ्या एकांतात बुडालेला बसलोय. हंऽऽऽ एकांतात बुडालेला... हे आवडले मला..
रविवार सकाळ, कोणी गात नाही. रेडिओ वर एक प्रेम आणि वेदना यावरचे गाणे लागले आहे. नेहमीसारखाच एक भवितव्य नसलेला दिवस. असाच लोंबकाळणारा दिवस.
ती तर खूप दूर आहे. माझे मित्रही दूर आहेत. रात्रीच्या पार्टीनंतर जागरणामुळे अजून झोपलेले असणार. मी आपला इथे एकटा.. रेडिओवर एक जूने गाणे लागले आणि मला माझ्या वडिलांची आठवण झाली. मला त्यांची कीव आली. माझ्यासारखा मुलगा असणे म्हणजे कीव येण्यासारखेच नशीब म्हणायचे !
काय झाले आहे मला आज ? आज तिच्याबद्दल वाटणारे प्रेम पूर्वीसारखे राहिले नाही असे का बरं वाटते आहे मला ? तिलाही असच वाटत असणार. मी तिला काहीच देऊ शकत नाही... एखाद्या चिमणीला पंख नसतील तर कसे वाटेल तसे वाटते आहे... हतबल..एकटा.
या जगात एकटा....
सगळं कसं अचानक एकसूरी वाटायला लागले आहे. नकळत मी आमच्या फोटोवरची आणि सिगरेटच्या पाकिटावरची पकड घट्ट केली. हे नको निसटून जायला...

सोमवार २५ जूलै.
तुला भेटायची वेळ जशी जवळ येते तसे माझ्या छातीतील धडधड अजूनच वाढते. शनिवारी फोनवर मला तू अजून तुझा मित्र मानतेस असे म्हणालीस तेव्हापासून मी किती आनंदात आहे..तू माझी अजूनही माझी मैत्रीण आहेस हा विचारच मला धीर देतो. या तुरूंगातूनही हे जग जरा आपले वाटायला लागते. तू आल्यावर ते अजूनच सुंदर भासेल यात शंका नाही. आज सकाळी तू आलीस की मी माझे ह्र्दय तुझ्याजवळ मोकळे करणार आहे. तू माझ्याजवळ नाहीस म्हणून मला वाइट वाटते खरे पण मी आता मोठा झालो आहे आणि हे सगळे मलाच सहन करायला पाहिजे नाही का ?

रविवार ३१ जुलै.
दूपारी १ वाजता
आत्ताच बातमी कळली की कवितांच्या एका स्पर्धेमधे एकूण २५०० कवितांमधे माझ्या कवितेची निवड झाली आहे. ते आता माझ्या कवितांचे पूस्तकही छापणार आहेत म्हणे. पण मला कुठे भेटतील ते ? मी बाहेर असायला पाहिजे होतो आत्ता. मला खूप आनंद झालाय हे कशाला नाकारू मी ?

आज माझ्या पहिल्या प्रेमाची का आठवण येतेय मला ? तिच्यावरच कविता केल्या होत्या त्या.... आता कुठे आहे कोणास ठावूक. कशी असेल ती ? जाड झाली असेल, का आहे तशीच सडसडीत असेल ? लग्न केले असेल का तिने ? कदाचित एखाद्या मोठ्या श्रीमंत घरात पडली असेल ती. त्या दिवशी मी तिला फोन लावला होता...पण तिचा आवाज ऐकल्यावर ठेऊन दिला.

शनीवार ६ ऑगस्ट.
डॉक्टरांनी आज मला विजेच्या झटक्याचे उपचार द्यायचे सुतोवाच केले. ते मला व्यसनीही म्हणाले. मला एखाद्या कोंडलेल्या हिंस्र श्वापदासारखे वाटते आहे आज. कोणाच्यातरी नरडीचा घोट घ्यावासा वाटतोय. पण काय करणार मी हतबल आहे. काहीच करू शकत नाही. म्हणूनच मला तुझ्याशी बोलावेसे वाटतय. थोड्याच वेळात माझे व्यक्तीमत्व, जो मी आहे तो, नष्ट करायची क्रिया चालू होईल त्याच्या अगोदर एकदा तरी माझ्याशी बोल. पाया पडतो तुझ्या. हा अत्याचार सहन करताना तू माझ्या जवळ असलीस तर फार बरे होईल.

जगातील अतीसामान्य गोष्टींबद्दल सामान्य गप्पा मारूयात आपण. फार भव्य दिव्य असे काही नाही ग....साध्यासुध्या गप्पा. बघ मी तुला खात्री देतो तुला येथे परत यावेसे वाटेल. काही घडलेलेच नाही असे तू भासवशील आणि मी तुला सगळे ठीक चालले आहे असे... निरोप घेताना माझे डोळे हळव्या अश्रूंनी भरून आलेले तुला दिसतील. पण मी ते लपवेन. तू अगदीच विचारलेस तर डोळ्यात काहीतरी गेल्यामुळे पाणी आले असेही खोटे खोटे सांगेन. जाताना तू सारखे मागे वळून बघशील आणि या जाळीतून बाहेर आलेल्या माझ्या हाताकडे बघून हात हलवशील. तू गेल्यावर मात्र मी ढसढसा रडेन आणि काय झाले, काय व्हायला पाहिजे होते, काय व्हायलाच नको होते आणि काय होणारच नाही याचा विचार करत बसेन. थोड्याच वेळात डॉक्टर त्यांची ती काळी बॅग घेऊन येतील व माझ्या शरीरात ती वीज खेळायला लागेल.

रविवार ७ ऑगस्ट
डॉक्टरांबरोबरचे माझे संभाषण.
“ तुला स्वाभिमानच नाही. तू पहिल्यांदा येथे आलास तेव्हा तू येथे परत येणार नाहीस असे मला वाटले होते. तू स्वतंत्रपणे काहीतरी करशील असे मला वाटले होते. पण नाही, तू आपला परत इथेच ! या मधल्या काळात काय मिळवलेस तू ? काहीऽऽऽऽ नाही. ते घेऊन काय मिळवलेस तू ? असे तुझ्यात काय कमी आहे की तू काहीच करू शकत नाहीस ?”

“कोणीच एकटे काही मिळवू शकत नाही”. मी.

“नसेलही. पण तू त्या तेथे कशाला गेला होतास मरायला ? काय मिळवलेस तू ?”

“अनुभवासाठी”

“तुम्ही लोक असे आहात ना, सगळे आयुष्य असल्या घाणेरड्या अनुभवासाठी पणाला लावाल”

“डॉक्टर प्रेमापोटी एखादी गोष्ट केली तर ती करण्यायोग्य असते असे माझे तत्वज्ञान आहे. आवडले आपल्याला तर ते करण्यासाठी तेवढे कारण पुरेसे आहे असे आपले मला वाटते”

“मी खालच्या मजल्यावरून सिझोफ्रेनियाचे दोन चार रुग्ण आत्ता जर इथे आणले तर ते सुद्धा या पेक्षा तर्कशूद्ध उत्तर देतील याची मला खात्री आहे.”

“माझे काय चुकले, ते सांगा ना !”

“काय चुकले ? तू सगळा वेळ स्वत:ची एक खोटी प्रतीमा तयार करण्यात घालवतोस. आपण काय आहोत याचा सुद्धा तू विचार करत नाहीस. तू आता काय आहेस ? एक पोकळी ! ज्यात काहीच नाही......

“कल्पना आहे मला. मी कितीही सांगितले तरी मला माहीत आहे माझी किंमत शून्य आहे”

“मग काहीतरी कर ना ! पण तू नाही करू शकणार. कारण मला माहिती आहे तू आहेस त्याच्यात खूष आहेस. हे बघ तू जर असाच वागलास तर मला तुला विजेचे धक्के देण्यावाचून दुसरा उपाय नाही. तू ठरव काय ते. ही सुधारायची शेवटची संधी समज. जरा विचार कर आणि माणसासारखा वाग”

रविवार १४ ऑगस्ट – फादर्स डे.
गुड मॉर्निंग डॅड ! आज तुमचा दिवस.
गेली अनेक वर्षे या दिवशी तुम्ही हसतमुखाने मला सकाळीच समोर यायचात.
आणि मी आणलेली भेट स्विकारायचात.
आणि हसत मला मिठीत घ्यायचा, आशिर्वाद द्यायचा.

गुड मॉर्निंग डॅड, आजही तुमचा दिवस पण मी आज तुम्हाला काही देऊ शकत नाही.
काही म्हणूही शकत नाही.
तुम्ही तरी आता ते कुठे राहिलात ?
तुमच्या ह्र्दयापर्यंत आता माझे शब्द पोहोचत नाहीत कारण तुमचे मन आता कडवटपणाने भरले आहे.
थकलात तुम्ही आता.
तुमच्या ह्रदयाला वेदना होताएत. पण नशीब तुम्ही अजून रडू शकता ते. आत्ताही तुम्ही रडत असाल.
एका बापाचे करूण अश्रू.
तुम्ही रडत आहात कारण मी आज एका खोलीत बंद आहे.
तुम्ही रडत आहात कारण आज फादर्स डे आणि मी येथे एकटा पडलो आहे.
तुमच्या मनात आज कडवट आठवणी आणि दु:ख या शिवाय काय असणार ?

गुड मॉर्निंग डॅड ! तो पहा सुंदर सूर्य उगवतोय.
आज सगळीकडे आनंदी आनंद असेल पण तुम्ही दु:खी असाल. ते दु:ख मीच आहे याची मला कल्पना आहे.
माझ्यामुळेच तुमचे ह्रदय रक्तबंबाळ झाले आहे.
याच क्षणी माझी बहीण तुमच्या खोलीत एखादी भेट घेऊन आली असणार. तुम्ही हसून तिला दाद द्याल पण मला माहिती आहे आतून तुम्हाला ती भेट स्विकारताना वेदना होत असणार पण तिला वाईट वाटू नये म्हणून तुम्ही वरवर हसणार.
मी तुम्हाला भेट म्हणून अजून त्रासच देऊ शकतो.
अश्रू आणि “कशाला याला जन्माला घातला” हा विचार भेट देऊ शकतो.
खरेच मी नसतो तर तुम्ही सुखी असता. शांत आयुष्य जगायची इच्छा असणार्‍या माणसाला अजून काय हवे असते ?
पै पै जमवून, त्याला हातही न लावता तुम्ही ते पैसे आमच्यासाठी एखादी वस्तू आणण्यासाठी जपून ठेवले असतील. ही वस्तु देताना कुठल्याही बापाच्या ह्र्दयात आनंद मावत नसतो.
आज फादर्स डे आहे आणि माझ्या वडिलांना मला इथे भरती करावे लागले. मी त्यांना पाहू शकत नाही भेट तर लांबच.
मला माहीत आहे जेव्हा इतर माणसांची मुले आज त्यांच्या भोवती तुम्हाला दिसतील तेव्हा तुमच्या पोटात मोठा खड्डा पडेल पण काय करणार मी येथे आहे आणि कित्येक दिवसात मी सूर्य बघितलेला नाही.
तुम्हाला आत्ता मी अंधारच देऊ शकतो. हो अंधार अशा माणसाचा ज्याला आता आयुष्याकडून काहीही नकोय.
म्हणून मी काहीच करत नाही. म्हणूनच मी तुम्हाला या दिवसाच्या शुभेच्छाही देत नाही.
एका रात्री तुम्ही मला या जगात आणले आणि आईने मला कळा सोसत जन्म दिला. मला जीवनाची भेट देणार्‍या बाबा, मी फक्त तेच तुला परत देऊ शकतो.
मी कसलीही हालचाल करू शकत नाही. त्या हालचालीने तुला माझ्या वेदना कळाल्या तर तुला जास्त दु:ख होईल. मला निस्तब्धच जगायला हवे.
माझ्या सारखा मुलगा असणे यासारखे दुसरे दु:ख नाही.

गुड मॉर्निंग डॅड.
माझे हात रिक्त आहेत. पण आज मी तुम्हाला उगवत्या सूर्याची भेट देतो. सोनेरी आणि सगळीकडे असणारा. त्याने तुमचे दु:ख थोडे हलके होईल.
कदाचित तुमचे बरोबर आहे हे तुम्हाला कळाल्यानंतर
मला आनंद होईल.

मंगळवार, २३ ऑगस्ट.
आज माझ्या वाढदिवसाची पहाट. आज मला माझ्या वहीत आशा आणि समजुतदारपणा दाखवला पाहिजे. म्हणूनच मी पहिली लिहिलेली पाने फाडून टाकली. माझ्यासारख्या माणसाला एक महिना सूर्य न बघता राहणे अवघड आहे. खरंच अवघड आहे. पण मला माहीत आहे की माझ्यापेक्षाही कमनशिबी माणसे येथे आहेत. माझ्या धमण्यातून तरूण रक्त वाहते आहे आणि मी अनेक वेळा परत सुरवात करू शकतो.

वाढदिवसची संध्याकाळ.
आज पहाटेच या ओळी खरडल्या त्याने मी माझा आत्मविश्वास परत मिळवू पहातोय.

“हे बघ तू परत पुढच्या वर्षी विद्यापिठाची परीक्षा देऊ शकतोस. अजून तुझ्यापुढे कितीतरी आयुष्य पडले आहे. याचा उपयोग फालतू विचार करण्यासाठी न करता लिहिण्यासाठी कर. तुझा सगळ्यात जवळचा मित्र तुझा टाइपरायटर तर तुला सोडून गेलेला नाही ना ? तुझे अनुभव शब्दबद्ध कर. कदाचित पुढेमागे ते कोणालातरी उपयोगी पडतील. फक्त स्वत:चा विचार करू नकोस. सुरवातीला तुझे मित्र तुझ्या उपयोगी पडले ते लक्षात ठेव. एखादा तुला सोडून गेला असेल तर त्याला क्षमा कर. विसरणे ही देवाने तुला दिलेली सगळ्यात मोठी ताकद आहे हे विसरू नकोस. मित्र आता तुला सोडून गेले असतील तरी त्यांचा राग मनात धरू नकोस. त्यांना जे शक्य होते ते त्यांनी केले. ते तुला कंटाळले आणि तुला सोडून गेले. कदाचित तू त्यांच्या जागी असतास तर तेच केले असतेस.”

गुरवार १ सप्टेंबर
जुलैपासून मी येथे आहे आणि मी आता घाबरलोय. सगळा दोष माझ्याच माथी आहे. कालच मी शरण जाऊन सगळी इंजेक्शने स्वत:हून घेतली आणि शांत झोपलो. बाकिचे मात्र हातपाय झाडत विरोध करत होते. एका नर्सला माझी मैत्रिण आवडत नाही त्यामुळे तिला आता मला भेटायला परवानगी देत नाहीत. मी माझे सगळे सामान एका दुसर्‍या रुग्णाला विकणार आहे याची कुणकूण त्यांना लागल्यावर त्यांनी ते सगळे काढून घेतले. पैसे मिळवायची संधी गेली....पण मी माझ्या एका मित्राला पटवले आहे आणि तो माझ्यासाठी एक पिस्तोल आणणार आहे....गरज पडल्यास मी त्याचा उपयोग करेन.....

केस कापण्यासाठी बोलवून माझी विचारशृंखला तोडली साल्यांनी.
गेले सगळे केस. मी आता एखाद्या बाळासारखा दिसतोय. लोकांवर अवलंबून.....
मी का घाबरलो आहे ते मला आता उमगले आहे... मला येथेच रहायची इच्छा झाली तर ?.... हाच, हाच विचार मला सारखा छळत असतो.
सगळं संपलय आता. बाहेर तरी कशाला जायचं ?
मी फेब्रूवारी नंतर केस कापलेच नव्हते. शेवटी या लोकांनी मला केस कापले नाहीत तर येथेच रहावे लागेल असे सांगितल्यावर मी तयार झालो.
याचा अर्थ काय ? मला अजून बाहेर जायचय? केस गेले म्हणजे माझी शेवटची वस्तू गेली असा विचार आता मनात यायला लागलाय... ही पाने मी बंडखोर विचारांनी भरणार होतो पण आता माझी इच्छाच मेली आहे लिहायची.
मी आता वेडाही आहे आणि शहाणाही आहे. काय करू ?
मी आता या पोकळीतून निवृत्त व्हावे हे बरे.

या इथे मी संपलो.
मला आता एकही निरोप पाठवायचा नाही
काहीच मिळवायचे नाही आणि जिंकायचेही नाही.
माझ्या इच्छेची आतडी माणसांच्या घृणा भरलेल्या नजरांनी टरा टरा फाडलेली मला आता दिसतात.
मस्त मोकळे वाटतय आता हा संपूर्ण पराभव स्विकारल्यावर.

हंऽऽऽऽऽ चला आता पहिल्यापासून सुरवात करू या हं.......

स्वैर भाषांतर : मी.

गुलमोहर: