" सवारी "

Submitted by गारम्बीचा बापू on 30 June, 2012 - 23:49

" सवारी "

जुन्या वस्तू , जुने रेडियो , काय ते म्हणतात ना Antique, अश्या वस्तूंची मला लहानपणा पासून आवड, कॉलेज ला असताना इंटरनेट वर बसून दररोज जुन्या मोटरसायकल चे फोटो खूप आवडीने बघायचो , नंतर कॉलेज पूर्ण झालं नोकरीला लागलो, पण हे जुन्या मोटरसायकलचं भूत काय डोक्यातून कधी गेलं नाही, कंपनीत नाईट शिफ्ट असल्यावर इंटरनेट वर त्या जुन्या मिल्ट्री च्या मोटरसायकल बघायचो , जाम आवडायच्या त्या गाड्या .
ठरलं जुनी गाडी घ्यायची, आठवड्याच्या सुट्टीला घरी यायचो, असाच एकदा ग्यालरीत उभा होतो, समोर एक मोटरसायकल चं ग्यारेज होतं, तिकडे एक माणूस " राजदूत " उभी करून उभा होता, काहितरि बोलत होता त्या ग्यारेज वाल्या जवळ, माझे वडील जायचे त्या ग्यारेज वाल्यासोबत गप्पा ठोकायला, मी वडिलांना पटकन बोलावलं बोललो, ती गाडी बघा ना विचारून तो माणूस विकतो काय ते, वडील संध्याकाळी नेहमी प्रमाणे गेले गप्पा मारायला, मग गाडीचा विषय काढला, असं करता करता दुसऱ्या दिवशी घेतलीच " राजदूत " ५ हजार रुपयात, त्या ग्यारेज वाल्याला बोललो हि गाडी एकदम मिल्ट्री स्टाईल मध्ये बनवून दे, आईकडून हिरव्या रंगाचे सीट कव्हर शिवून घेतले, १२ दिवसांनी माझी "राजदूत " झाली तयार , एकदम चकाचक, ग्यारेज वाल्याला बोललो किती द्यायचे, तर बोलला १० हजार , मी बोललो ठीक आहे, पावत्या दे मला मी पैसे देतो, साला कसला देतोय पावत्या, मग भांडण झालं , बोललो २५ रुपयाची चड्डी घेतली तरी पावती मिळते ,तो तसा होता झोंड माणूसच , पण माझं पण चुकलच होतं, मी अगोदर व्यवहार ठरवायला हवा होता , भांडण झालं , मग वडील बोलले जाऊ दे पैसे देऊन टाक, दिले पैसे वाद संपला.

मग ती गाडी मी खूप आवडीने चालवायचो, लोक एकदम बघत बसायचे ती गाडी, थोड्या दिवसांनी गाडी घेऊन कामावर गेलो, त्या वेळी घरा पासून ७० किलोमीटर वर नोकरीच्या ठिकाणा पासून नजीक च्या शहरात भाड्याने रहायचो, एकटाच, आई वडील गावी असायचे, गाडी चालवली मस्त, पेट्रोल जरा जास्त खायची , जरा काय मजबूत पेट्रोल खायची , पण हौस ना, नंतर नंतर साला बघायचो, बाजारात पोरं नवीन नवीन गाड्या चालवायचे, च्यायला CBZ, PULSAR, PASSSION, आणी त्यात माझा हा नगारा , कधी कधी भर गर्दीच्या ठिकाणी हिचा गियर अडकला कि हा आवाज टार टार टार टार , सगळी पब्लिक माझ्याकडे बघायची ,....आणी रस्त्याला धूर , गाडी घेऊन कुठे थांबलो कि मागून धूर पिच्छा करत यायचा , नंतर नंतर त्या गाडीचा मला कंटाळा यायला लागला, बोललो झक मारली आणी हा नगारा घेतला .
एक दिवस असाच रूम वरून निघालो, मस्त जीन्स प्यांट , टी -शर्ट , टकाटक बूट आणी हा भंगार नगारा, आमच्या गल्लीतल्या रस्त्यातून निघून मार्केट रोड ला आलो, हि गाडी चालवताना मी एकदम सरळ बघायचो, बाजूने PULSAR वर २ पोरं माझ्याच वयाची चालले होते , माझी नजर समोर होती ,पण कान त्यांच्या कडे होते , एकजण मागे बसलेला पटकन बोलला , "ए हि बघ नवीन शाळा, सवारी चाललीय बघ ह्याची " , आयला ते शब्द साला अशे काय लागले ना मनाला , तिथेच गाडी फिरवून रुमवर आलो , गाडी मेन स्टेन्ड वर उभी केली, वर रूम मध्ये गेलो, पाणी पिऊन बसलो, नंतर भावाला फोन केला बोललो गाडी मिळेल त्या किमतीत विकायची, ती गाडी मी घेतली होती ५ हजारात, खर्च केला १० हजार , आणी उरण ला एका आगरी पोराला विकली २ हजारात, साला वजनावर भंगार मध्ये विकून पण जास्त पैसे मिळाले असते , पण गाडी लक्ष्मी असते म्हणून तसे नाही केले , आत्ता पर्यंत सगळी Antique ची हौस फिटली होती.
महिन्या अखेरीस पगार झाला, १० हजार डाऊन पेमेंट करून नवी कोरी Hero Honda Passion घेतली .
आत्ता इंटरनेटवर चुकून एखादी जुन्या मोटरसायकल ची साईट उघडली तर ताबडतोब बंद करून टाकतो .

गुलमोहर: 
शब्दखुणा: