मी आणि माझी पत्नी कुसुम, पहिल्यांदा जीवनात परदेश प्रवास केला दिनांक २३.०३.२०१२ ते २७.०३.२०१२ असा ५ दिवसाचा थायलंडचा प्रवास केसरी टूरच्या माध्यमातून केला.
मार्च महिन्याच्या कालावधीत वातावरण दिवसा थोडं गरम तर रात्रीला आल्हाददायक असते. मध्येमध्ये पावसाचे तुषार येऊन जात असल्याने वातावरणातील गरमपणा काही प्रमाणात कमी होत असतो. त्यामुळे केसरीने आम्हाला रेनकोट पण दिले होते. आम्ही ट्रॅव्हल बसमध्ये असतांना एकदा पट्टायाला पाऊस पडला होता. परंतु प्रत्यक्षात रेनकोटची तशी पूर्ण प्रवासात गरज पडली नाही.
येथील वेळ भारतीय वेळेपेक्षा दीड तासाने पुढे आहे. आम्ही तेथे गेल्यावर तेथील वेळेप्रमाणे घडाळ्याच्या वेळा लाऊन घेतल्या होत्या.
१९९९ च्या जनगनणे्नुसार या देशाची एकूण लोकसंख्या ६ कोटी १० लाख असून ६८ टक्के जनता खेड्यात व उरलेली शहरात राहते. हा देश मुळात बौध्द धर्मिय असून येथील राजा पण बौध्द आहे. ९५ टक्के लोक बौध्द, ३.९ टक्के मुस्लिम, ०.५ टक्के ख्रिचन व ०.६ इतर धर्मिय आहेत.(संदर्भ-केसरी टूर)
केसरीने आमचा व्हिसा काढून दिला. हा प्रवासाचा व्हिसा ९० दिवसासाठी लागू असतो. पासपोर्ट फार जपून ठेवायला पाहिजे असते., जर हरविला, चोरीला गेला तर भयानक त्रास होतो. पोलीस तक्रार करणे, तेथील राजदुताला भेटणे किंवा माहिती देणे इत्यादी कामासाठी जवळपास ५०,००० रुपये खर्च येतात. अशी माहिती केसरी टूर ने दिली होती. त्यासाठी त्यांचा टूर मॅनेजर न थांबता, आपल्यालाच पुढील सोपस्कार करावे लागतात. म्हणून पासपोर्टची खूप काळजी घ्यायला पाहिजे असे सांगितले होते.
हॉटेलमध्ये सेफ्टी लॉकर एकतर रुममध्ये किंवा रिसेप्शन कॉउंटरला असते. त्यात पासपोर्ट व इतर किंमती वस्तू ठेवता येतात. प्रवासात पासपोर्ट घेऊन फिरण्याची गरज नाही. सेफ्टी लॉकरला कोड नंबर असते. त्यामुळे काही धोका नसतो. फक्त कोड नंबर लक्षात ठेवणे आवश्यक असते, नाहीतर दंड पडते. रुमची चाबी रिसेप्शन कॉउंटरला द्यावी. जर जवळ ठेवली व हरवली तर दंड पडते,
शक्यतोवर विमा काढून घ्यावा. म्हणजे त्यात हरवलेले किंवा उशिरा मिळालेले सामान, पासपोर्ट व औषध-पाण्याच्या खर्चाच्या जोखमीचा अंतर्भाव होतो.
जातांना सोबत कॅमेरा, जास्तीची बॅटरी व मेमरी कार्ड घेऊन जावे. मोबाईलची बॅटरी रिचार्जसाठी युनिव्हर्सल चार्जर २२० व्होल्टचा सोबत घेऊन जावे.
या देशात प्रवास करतांना एका व्यक्तीसाठी दहा हजार बाथ किंवा कुटुंबासाठी विस हजार बाथ सोबत असणे आवश्यक असल्याचे केसरीने आम्हाला सुचित केले होते. त्यामुळे सहलीवर जाण्यापूर्वी त्यांच्या ठाणे येथील कार्यालयातून रुपये बदलवून थायलंडचे बाथ हे चलन विकत घेतले. त्यावेळी एका बाथला एक रुपया पंच्याहात्तर पैसे असा विनिमयाचा दर होता.
विमान सुटण्यापूर्वी ३ तास आधी जावे लागते. कारण टीम मॅनेजरला भेटणे, त्याच्याकडून केसरीच्या टोप्या, तिकीट, पासपोर्ट व खाण्याचे पदार्थ घेणे, कॉउंटरवर बोर्डींग पास घेणे, सामान व स्वताची तपासणी करुन घेणे, इमिग्रेशन फॉर्म भरुन प्रोसिजर पूर्ण करणे, डिपार्चर गेटवर जाणे, विमानात बसणे इत्यादी कामासाठी इतका वेळ लागतो. विमानात बसण्याची जागा आधिच तिकिटवर लिहिलेली असते. त्यानुसार आपापल्या जागेवर बसावे लागते. विमानात पाणी, नास्ता व जेवण दिल्या जाते. विमानात एसी मुळे थंडी लागते. तेव्हा ज्यांना थंडी सहन होत नाही, त्यांनी शाल किंवा स्वेटर घेऊन जावे लागते.
विमानात कॉर्गो बॅग २० किलो व कॅबिन बॅग ६ किलो वजनापर्यंत नेण्याची सवलत आहे. कॅबिन बॅगमध्ये टुथपेस्ट, केसाचे तेल, जेल, क्रीम, शांम्पू, हेअरड्रायर, शेव्हिंग कीट, द्रवपदार्थ, कॉस्मेटिक्स, परफ्युम्स, बॅटरीज, टिस्युज, बेबी मॅपकिंग ह्या वस्तू नेता येत नाहीत. तथापी ह्या वस्तू कॉर्गो बॅगमध्ये ठेवता येतात.
आम्ही मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्टीय विमानतळाहून कथाय पॅसिफीक (Kathay Pacific) या विमानाने दि. २३.०३.२०१२ ला सकाळी ५.१० वाजता निघून सकाळी ९.३० च्या दरम्यान बॅंकॉकला पोहचलो. आमच्या सोबत ८० प्रवासी असल्याने आम्हाला फिरण्यासाठी केसरीने दोन टॅव्हल बसची व्यवस्था केली होती.
आमच्या बसमध्ये टिफीन नावाची गुटगुटीत दिसणारी स्थानिक महिला गाईड होती. तिने आम्हाला नमस्कार करतांना थायी भाषेत एका वेगळ्याच ढबमध्ये ’सव्वादिखा’ असे म्हणून स्वागत केले. तेथे आदरातिथ्याला फार मान देतात. ती इंग्रजीमध्ये बोलायची. थायलंडमध्ये थायी व इंग्रजी भाषेचा वापर करतात. ती व टीम मॅनेजर बिपीन सावंत हे दोघेही स्थळाची व पुढिल प्रवासाची आवश्यक ती माहिती वेळोवेळी देत होते. केसरीचा झेंडा घेऊन ठिकठिकाणी ते थांबत. तसेच केसरीच्या टोप्या डोक्यावर घातल्याने हरवण्याची शक्यता जवळपास नसायची.
तिच्याकडूनच आम्ही तेथील मोबाईलसाठी स्थानिक सिमकार्ड १०० बाथमध्ये घेतले. त्या दिवशी म्हणजे दि. २३.०३.२०१२ ला आम्ही पट्टायाला गेलो. रस्त्यात टायगर हॉटॆलमध्ये दुपारचं जेवण घेतलं. त्या हॉटॆलच्या तिन्ही बाजूला वाघाच्या गुहा कृतिमरित्या तयार केल्या होत्या. त्यात सात-आठ जीवंत वाघ मस्त इकडे-तिकडे फिरत असतांना आम्ही काचेतून पाहत होतो. आम्ही त्यांचे फोटोपण काढले.
पट्टायाला संध्याकाळी अल्काझार शो (Alcazar show) पाहिला. ही थायलंड देशाचा सांस्कृतीक शो पाहिला. यात गौरवर्णिय, कमणिय बांध्याच्या सुदर मुली व तसेच मुले सुध्दा रत्नजडीत मुकूटे घालून सामुहिकरित्या विविध नृत्याचे प्रकार सादर करुन तेथील संस्कृतीचं प्रदर्शन करीत होते. त्यांचा विविध रंगातील आकर्षक पेहराव, लयबध्द संगितावर नृत्य, भव्य स्टेज, आकर्षक सजावट, रोषनाई पाहून वेगळाच आनंद होत होता.
जरी या कार्यक्रमाला सांस्कृतीक शो म्हटल्या जात होते, तरी प्रत्यक्षात हा मौज मजेचा कार्येक्रम वाटत होता. शो संपल्यावर ह्या नृत्यांगना प्रेक्षकांसोबत पैसे घेऊन फोटो काढून देत होत्या.
असे म्हणतात की, प्रत्यक्षात त्या मुली नसून लेडीबॉय आहेत. म्हणजेच त्रुतिय पंथी किंवा किन्नर. प्लास्टीक सर्जरीने त्यांना मुलींचं शरीर आणि कमनिय बांधा दिलेल्या आहेत. थायलंड सरकाराने अशा पद्धतीने या लोकांना रोजगार पुरविला आहे.
रात्रीला समुद्राच्या किनार्याजवळ ( Pattaya Beach) २०० मिटर दूर असलेल्या सनशाईन हॉटेलमध्ये आम्ही मुक्काम केला होता.
दि. २४.०३.२०१२ ला सकाळी आम्ही चालतच जवळच्या बिच वर समुद्रात पॅरा सेलींग (Parasailing करण्यासाठी एका जहाजावर गेलो. तेथे मी व कुसुम असे दोघांनी इतर सहकार्यांसोबर स्पीडबोटने हवेत उंचावर उडणार्या पॅराशुटने फिरुन आलो.. पाण्यात बुडवायचे की नाही ते आधी विचारत होते. आपण जर ’हो’ म्हटले तरच ते पाण्यात बुडवित. मी तसे म्हटल्यामुळे मला एकदा पाण्यात बुडविले होते. वर आकाश, खाली समुद्र व त्याचे अथांग पाणी असा हा एक चित्तथरारक अनुभव होता. तेथे आम्ही फोटो काढले. तेथील फोटोग्राफरने फोटो काढून आम्हाला १०० बाथला एक फोटो असे दोघांचेही फोटो जेवणाच्या वेळी आणून दिले.
तेथून आम्ही बोटीने समुद्राच्या आत जाऊन फिरतात अशा ठिकाणी गेलो. आमच्या सोबतचे काही लोक खाली समुद्राच्या तळाशी फिरुन आले. तेथून कोरल आयलँड (Coral Island) नावाच्या दुसर्या बिचवर गेलो. या बोटीवर दुर्बिनसारख्या काचेतून समुद्र तळाचा भाग अगदी जवळ असल्यासारखा दिसत होता. हा बीच पट्टाया किनार्यापासून १६ किलोमीटर दूर आहे. तेथे आराम खुर्च्या व वर उन्ह लागू नये म्हणून छत्र्या ठेवल्या होत्या. येथे समुद्रात पोहणे, स्पिडबोट व बणाना बोटने फिरणे अशी व्यवस्था आहे. या समुद्राच्या पाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे ते पाणी अगदी नितळ स्वच्छ व निळेशार असल्याचे दिसले.
दुपारी आम्ही नॉंग नुक विल्हेज ( Nong Nooch Village ) येथे गेलो. येथे निरनिराळ्या आकाराचे, रंगाचे फुलांचे खूप सूदर वनस्पती व झाडं आहेत. देखणे (Decorative) वनस्पती आहेत. आमच्या गाईडने या बगिच्याचा जवळपास ६०० एकराचा परिसर असल्याचा सांगितला. तेथे, ऑर्चिडगार्डन, ट्रोपिकलगार्डन व पॉटरी गार्डन (पामगार्डन, बेडगार्डन इत्यादी) मध्ये निरनिराळ्या बाया-माणसाच्या, प्राण्यांच्या, वाहनाच्या मुर्त्या-खेळणे आहेत. लहानमुलासाठी खेळायच मैदान, लहानसा झू, वाटरफॉल, इत्यादी अनेक रमणिय स्थळं आहेत.
येथे सुध्दा थायी नृत्याचा सांस्कृतीक शो दाखविला. त्यानंतर हतीचा शो दाखविला. हत्ती हा या देशाचा राष्टीय प्राणी आहे. येथेच आम्ही दुपारचं जेवण घेतले.
संध्याकाळी परत येतांना आम्ही एका मसाज केंद्रात गेलो. एकाला ३०० बाथ म्हणजे आपल्याकडे जवळपास ५४० रुपये होतात. आपल्याकडे जर कोणी मसाजचे ऎवढे पैसे मागितले असते तर कदाचित कोणी तयार झाले नसते. पण तेथे ऎवढे पैसे खर्चाला काही वाटले नाही. मी शाळेत असतांना आमच्या शाळेच्या समोरील मैदानात विदेशी लोक असलेली एक बस थांबलेली होती. त्यावेळी ज्या केळी एक रुपया डझनाने मिळत होत्या, त्या केळेवाल्यांनी दहा रुपये डझानांनी विकल्याचे मी पाहिले होते. जसे त्या विदेशी लोकांना महागाईबद्द्ल त्यावेळी काही वाटले नाही, तशीच मानसिकता आमची सुध्दा परदेशात गेल्यावर झाली होती.
थायलंड जसे निसर्गसौंदर्यासाठी पर्यटन स्थळ म्हणून प्रसिध्द आहे. तसेच पारंपारिक पध्द्तीच्या थाई मसाजसाठी सुध्दा प्रसिध्द आहे. मन आणि शरिराचा समतोल साधून सुमारे २५०० वर्षापासूनची येथील मसाज शास्त्रशुध्द व कलात्मक पध्दतीने केल्या जात असते. ऍक्युप्रेशर पॉईंटचा वापर करुन मसाज केल्या जातो त्यामुळे हा मसाज सुखावह वाटतो. मसाज करतांना ’बाऊ बाऊ’ म्हणजे हळूवार करा व ’नाक नाक म्हणजे जोर देऊन करा, अशा दोन शब्दाचा वापर करतात. असाही एक अनोखा मसाजचा अनुभव आम्ही येथे घेतला.
साधारण पाऊन तासापर्यंत हा मसाज केल्या गेला. सर्वठिकाणी स्त्रियाच मसाज करतात असे समजले. आमचा मसाज पण स्त्रियांनीच केला. त्यासाठी येथे पर्यटकाची खूप गर्दी होत असते, असे आमचे गाईड सांगत होत्या.
रात्री आम्ही सनशाईन हॉटेलमध्येच मुक्काम केला. रात्रभर येथील रस्ते गजबजलेले होते. असे म्हणतात की, येथील रस्ते रात्रीला जागेच असतात.
दि. २५.०३.२०१२ ला सकाळी नास्ता करुन आम्ही बॅंकॉकला जाण्यासाठी निघालो. बॅंकॉक थायलंड देशाची राजधानी आहे.
रस्त्यात हिर्यांचं दुकान असलेलं ज्याला जेम्स गॅलरी म्हणतात, ते पाहिलं. येथे हिर्याची खाण कशी असते. तेथे कामगार कसे काम करतात, हिर्यांना कसे पैलू पाडतात इत्यादी प्रात्यक्षीक दाखविलं. नंतर दुकानात आम्ही हिर्याच्या अंगठ्या तर इतरांनी. हिर्याचे दागिने विकत घेतल्या दुपारी बॅंकॉकला अशोका हॉटॆलमध्ये जेवण घेतलं. येथील काही कर्मचारी हिंदीत बोलत होते. त्यानंतर हॉवर्ड स्केअर या हॉटॆलमध्ये गेलो. येथे दोन रात्री मुक्काम होता. त्यानंतर आम्ही एम.बी.के. व टोकीओ मॉल मध्ये खरेदीसाठी गेलो.
सकाळी आम्ही सफारी वर्ल्डला (Safari World) गेलो. हा एक मोठा जवळपास २०० एकराचा पार्क असून त्याचे दोन भाग आहे. एक सफारी पार्क जेथे प्राणी आहेत, दुसरा मरीन पार्क जेथे प्राण्यांचे खेळ दाखविले जातात.
सफारी पार्क मध्ये आफ्रिका व आशिया खंडातील प्राणी आहेत. आम्ही बसमधूनच निरनिराळ्या प्रकारचे पक्षी - मोर, शहामृग, बगळे तसेच प्राणी –जंगली म्हैशी, गायी, उंट, गेंडे हरीण, काळविट, झेब्रा, जिराफ वाघ, सिंह, चित्ता, अस्वली. हे प्राणी, पक्षी अगदी जवळून पाहता येत असल्यामुळे त्यांचे फोटो अगदी जवळून घेत होतो. येथे एक मोर पंखाचा पिसारा पसरवून नाचत असल्याचं दुर्मिळ असं दृष्य मला पहिल्यांदा पायायला मिळाल.
सफारीच्या बाजूला मरीन पार्क आहे. तेथे आम्ही माकडाचा (Orang Utan Show) बॉक्शिंग शो, सील माश्यांचा (Sea Lions show ) व डॉल्फीनचा खेळ पाहिला. तसेच सिनेमात मारामारी, बॉंबस्फोट, लुटमार अशा सारखे जे स्टंट शो असतात, ते पाहिलं. त्याच परिसरात असलेल्या हॉटेलमध्ये आम्ही दुपारचं जेवण घेतलं.
रात्रीला आम्ही नदीवर फिरत्या जहाजावर जेवण घेतले. त्याला क्रुज डिनर म्हणतात. तेथे भारतीय व थायी पध्दतीचं निरनिराळ्या प्रकारचं शाकाहारी व मासाहारी जेवण होतं. मांसाहारीमध्ये मासे, मोठे झिंगे व चिकनचे डिशेस होते. तेथे जेवणासोबतच नाच, गाण्याचा कार्यक्रम होता. आम्ही तेथील एका स्त्री गायिकेसोबत जी हिंदी भाषातील सिनेमाचे गाणे म्हणत होती, तिच्यासोबत नाच-गाण्यात भाग घेतला. क्रुजच्या वरच्या मजल्यावर जाऊन नदीकाठावर अनेक सुंदर इमारती व बुध्दविहार रात्रीच्या वातावरणात चमचम करीत असल्याचे दिसत होते. ते विहंगम दृष्य मी माझ्या कॅमेरात कैद केले. या देशात पन्नास हजारापेक्षा जास्त बुध्दविहार असल्याचे समजले.
सकाळी सोनेरी बुध्दविहार (world's largest golden seated Buddha ) पाहायला गेलो. या विहारातील बुध्दाची मुर्ती ७०० वर्षापूर्वीची जगात सर्वात मोठी बसलेली सोनेरी मुर्ती आहे. तिची उंची ५ मीटर, चवडी ४ मीटर आणि वजन ५.५ टन आहे.
ही मुर्ती सुकोथाय (Sukhothai ) या काळातील असून सुरुवातीला ब्रम्हदेशाच्या आक्रमनापासून संरक्षण करण्यासाठी प्लॅस्टरने झाकून ठेव्ली होती. ४० वर्षानंतर या मुर्तीचा शोध लागला
बाजूलाच दुसरं बुध्दविहार असून तेथे बुध्दाची निर्वांणपदाची मूर्ती (Reclining Buddha) आहे. येथे ९५ पगोडे असून बँकॉकमध्ये सर्वात ऊंच आहे. ह्या विहाराचं आकर्षण म्हणजे यातील मूर्ती १५ मीटर ऊंच, ४६ मीटर लांब आहे. या विहारात अग्रभागी राजाचे तैलचित्र होते. या देशात राजाला फार मानतात.
थायलंड देशातील बॅंकॉक मधील सर्वात उंच इमारत बाययोक स्काय हॉटेल (Baiyoke Sky Hotel ) आहे. या हॉटेलला ८८ मजले आहेत. ८४ व्या मजल्यावर फ़िरता मजला (revolving) आहे. तेथून बॅंकॉक शहर पूर्णपणे दिसते. तेथून एकावर एक असलेले अनेक उड्डानपुल (ओव्हरब्रिज) दिसत होते. बॅंकॉक शहरात जिकडे-तिकडे उड्डानपुल असल्याने या शहराला उड्डानपुलचे शहर म्हणून ओळखल्या जाते. एक पूल ५८ किलोमिटरचा असल्याचे कळले.
नंतर या हॉटॆलच्या बाजूलाच इन्द्रा मार्केट आहे. तेथे आम्ही शॉपींग केले. येथे थायी सिल्क व कॉटन कपडे तसेच लॅपटॉप व टिव्हीसारख्या इलेक्टॉनिक वस्तू स्वस्त मिळतात. पण एखादी वस्तू २५००० रुपयापेक्षा जास्त किंमतीची असेल तर भारतातील विमानतळावर कस्टम ड्युटी भरावी लागते.
रात्रीला त्याच परिसरात असलेल्या भारतीय पध्दतीचे जेवण बनविणार्या स्वागत हॉटॆलमध्ये जेवण करुन सुवर्णभुमी (Suvarnabhumi Airport, New Bangkok ) विमानतळावर गेलो. तेथून रात्री १२.५५ वाजताच्या विमानाने भारतात मुंबईला परत आलो.
थायलंड हा देश फक्त आणि फक्त पर्यटनावर जगतो. त्यांचा इतर कुठलाच उद्योग नाही. जे काही व्यवसाय किंवा उद्योग आहेत ते सगळे पर्यटनाला पुरक असेच आहेत, असेही कळले.
थायलंडमधील लोक कष्टाळू व प्रामाणिक असल्याचे दिसले. प्रत्येक कामामध्ये महिला आघाडीवर असल्याचे दिसत होत्या..
येथील स्वच्छ चकाकणारे रस्ते, शिस्तीत जाणारी वाहणे, एकावर एक असे अनेक उड्डानपुल, त्यावरुन धावणारे वाहणे व रेल्वे, दोन्ही बाजूला दिसणारी हिरवळ, बुध्दविहारे पाहून मन कसं थक्क होवून गेले होते.
या सहलीतील नानाविध स्थलदर्शन, आलिशान हॉटेल्स, चविष्ट शाकाहारी-मासाहारी जेवण-नास्ता, लोकदर्शन, त्यांची वेगळीच वेशभुषा-भाषा-राहणीमान, अफलातून प्राण्यांचा खेळ, करमणूकप्रधान नाच-गाण्याचा कार्यक्रम, आरामदायक गाडीतून फिरणं असं हे सगळंच्या सगळं रोजच्या तणावग्रस्त जीवनात काही सुखाचे क्षण वेचण्यासाठी खरोखर मस्त उपयोगात पडतो, यात वाद नाही.
थायलंडची सहल
Submitted by rkjumle on 25 June, 2012 - 09:23
गुलमोहर:
शेअर करा
थायलंड सहल तर सुंदर झाली पण
थायलंड सहल तर सुंदर झाली पण प्र.ची. हवेत अन तेही असेच सविस्तर , धन्यवाद !
छान सहल. पहिल्यांदा प्रवास
छान सहल. पहिल्यांदा प्रवास करु इच्छीणार्यांसाठी चांगली माहिती.
अगाऊपणा:
कोरल इजलॅंड > स्पेल्लिन्ग Island असलं तरी उच्चार आयलँड असा करतात.
कमणिय बांध्याच्या सुदर मुली >>
सर्वठिकाणी स्त्रियाच मसाज करतात असे समजले. > सांभाळून हो.. यात बहुतेक लेडीबॉय्ज पण असतात.
ललिता प्रीतींचा थायलंड प्रवास
ललिता प्रीतींचा थायलंड प्रवास आठवला.
http://www.maayboli.com/node/4292
मलाही कधीतरी जायचे आहे. मुले थोडी मोठी झाली की जमवु.
पट्टायाला संध्याकाळी अल्काझार
पट्टायाला संध्याकाळी अल्काझार शो (Alcazar show) पाहिला. ही थायलंड देशाचा सांस्कृतीक शो पाहिला. यात गौरवर्णिय, कमणिय बांध्याच्या सुदर मुली व तसेच मुले सुध्दा रत्नजडीत मुकूटे घालून सामुहिकरित्या विविध नृत्याचे प्रकार सादर करुन तेथील संस्कृतीचं प्रदर्शन करीत होते. >>>>
त्या मुली नसतात तर लेडीबॉय असतात. म्हणजेच त्रुतिय पन्थी. किंवा किन्नर. प्लास्टीक सर्जरीने त्यांना मुलींचं शरीर आणि कमनिय बान्धा देतात. हा थायलंड चा 'सांस्कृतीक शो" नाही. हा एक मौज मजेचा कार्येक्रम आहे.
थायलंड हा देश फक्त आणि फक्त पर्यटनावर जगतो. त्यांचा इतर कुठलाच उद्योग नाही. जे काही व्यवसाय किंवा उद्योग आहेत ते सगळे पर्यटनाला पुरक असेच आहेत.
प्रिय मोहन की मीरा, आपण
प्रिय मोहन की मीरा,
आपण सुचविलेले बदल मी लेखात केले आहे.