"तो दिवस"

Submitted by मोहन की मीरा on 21 June, 2012 - 03:07

मी त्या वेळेस आर्टीकल शीप करत होते. आमचे एक काम मुंबई शेअर बाजारात होते. मोठ्ठ्या ब्रोकर चे खूप काम आमचे सर करायचे. त्यामुळे खूपशी मुलं नेहेमी त्यांच्या ऑफिसला जायचो. एकदा गेले की ३-४ महिने आम्ही रोटेशन ने तिकडेच असायचो. मला तिकडे जाणं आवडायचं. याच कारण मला तो फोर्ट आणि आजूबाजूचा परिसर खूप आवडायचा. त्या ब्रोकरची दोन ऑफिसे होती. एक मोठ्ठ शेअर बाजाराच्या इमारती मध्ये आणि दुसरे त्याच्याच मागच्या बाजूला कर्‍हाड बँकेच्या इमारती मध्ये. आम्ही बर्याचदा कर्‍हाड बँकेच्या इमारती मध्ये बसायचो. शेअर बाजाराची इमारत आणि आमची इमारत ह्यात एक अगदी छोटा रस्ता होता. जेमतेम एक गाडी जाऊ शकेल एवढा. त्यावर असंख्य खाण्याचे स्टोल आणि गाड्या लागायच्या. आम्ही बर्‍याचदा तिकडे खादाडी करायला जायचो. समोरच शेअर बाजाराच्या इमारतीचा तळमजला होता. तिकडे तळ मजल्यावर एक बँकेची शाखाही होती. बहुदा बँक ऑफ बडोदा.

तो दिवस होता १२ मार्च १९९३. आम्ही नेहेमी प्रमाणे सगळे ऑडीट करत, आमच्या कर्‍हाड बँकेच्या इमारती मध्ये बसलो होतो. १ल्या मजल्यावर ऑफीस होत. साधारण रोज सव्वा किंवा दीड वाजता जेवायला बाहेर जायचो. घरून डबा आणला असेल तर खालच्या दुकानातल प्रसिध्द "मसाला छास " नाहीतर " गंगा जमुना " ज्यूस प्यायला जायचो. त्या दिवशी मी, मोना, सुभाष आणि आनंद, असे चारजण होतो. चौघांची भंकस चालू होती. मोनाला कशा वरून तरी ते दोघे जाम पिडत होते. कोनीच सीनीयर्स न्हवते. मी पण त्या दोघांना प्रोत्साहन देत होते. मजा येत होती. नेहेमी प्रमाणे आधी घराचा डबा खायचा की खाली जाऊन खायचं ह्यावर जोरदार चर्चा झाली. तेवढ्यात काहीतरी जोर्रात आवाज आला.

आनंद खुर्ची वरून फेकला गेला. शेल्फ वरची काही पुस्तके पडली. भयानक किंकाळ्या यायला लागल्या. काहीतरी भयंकर घडल्याची जाणीव झाली. आम्ही सगळे कोरिडोर मध्ये धावलो. बघतो तर काय सगळी कडे प्रचंड धूर, करपट वास. नक्कीच बाजाराच्या इमारतीला काहीतरी झालं. माझी एक मैत्रीण तळ मजल्यावरच्या बँकेत काम करायची. बापरे काय झालं असेल??? डोकं फुटायची वेळ आली.

आमची वयं काही जास्त न्हवती. २०-२१ वर्ष. बरोबर कोणी सिनियर नाही. काही कारणास्तव ते आमच्या दुसर्या ऑफिसला गेले होते. आम्ही चौघं घाबरून चक्क रडायला लागलो. काही काळात न्हवत. डोक्यात घण पडत होते. आमच्या इमारतीमधली इतर माणसे पण गटा गटाने चर्चा करत होते. त्या वेळेस मोबाईल फोन असे प्रत्येका कडे असायचा जमाना न्हवता. आम्ही सगळे जण फोन मशीन कडे धावलो. त्यातल्या त्यात सिनियर मी !!! आम्ही आमच्या कल्याण ऑफिसला फोन केला. किती तरी वेळा प्रयत्न केला तरी फोन लागेना. आनंद म्हणाला " अरे लायनी तुटल्या असतील" ...खरच असतील... काय माहित. आता काय करायचं. समजेना....

शेवटी सर्वानुमते आम्ही स्टेशनवर चालत जायचं ठरवलं. चौघेही खाली जायची तयारी केली. त्या ऑफिसची चावी आमच्या कडे असायची. आधी दार बंद केल. सगळ्यांना भीतीने घेरले होते. खाली आलो, तर अक्षर्शः हाहाकार उडाला होता. रस्त्यावर आलो, आणि भीषण दृश्य दिसलं. रस्त्यावर तुटलेले हात पाय, इतर अवयव पडलेले होते. मला भडभडून उलटी झाली. जवळचं पाणी पिऊन चालायला सुरुवात केली. माणसे सैरावैरा धावत होती. आम्ही ज्या दुकानात नेहेमी खायचो प्यायचो त्याच्या दुकानात काचांचा खच पडलेला होता. समोर बाजाराची इमारत म्हणजे युद्ध भूमी झाली होती. रक्त, वेदना, किंकाळ्या.

घाबरतच, बाजाराच्या पुढच्या बाजूला आलो. तिकडे तर भयानक गर्दी होती. सुभाषने आम्हा दोघींना बाजूला उभे केले. तो आणि आनंद नक्की काय झाले ते विचारायला गेले. ते आले ते रडतच. "अरे बॉम्बस्फोट झालाय. खूप लोक मेलीयेत. सगळ्या काचा आहेत. रिंग चालू होती ना, त्याच्या खालच्या बेसमेंट मध्येच स्फोट झाला. रिंग चालू असल्याने खूप लोक मेले. गाड्यांचा चक्काचूर झाला. बँकेतले सगळे मेले. रिंग च्या भोवती काचा होत्याना त्या अंगात घुसल्या!!!" सगळा त्रासदायक वृत्तांत कळला.
आता? .... आता काय.
" आपण घरी जाउया!!!" मोना रडायला लागली. "चला ! चला !! तुम्हा दोघींना सोडतो स्टेशन वर. मीरा तिला घरी सोड . पण तू ऑफीस ला जा.. आत्ता पर्यंत बातम्या गेल्या असतील.सगळे काळजीत असतील. चला चला लौकर " सुभाषने सगळी सूत्र हातात घेतली.

आम्ही भराभर स्टेशनच्या दिशेने जाणार्या लोंढ्यात सामील झालो. भराभर चालत. व्ही.टी. ला पोहोचलो. तिकडे स्टेशनवर मरणाची गर्दी होती. स्टेशनवर पोहीचलो तर हवालदार तरुण मुलांना पकडून रक्तदाना साठी आव्हान करत होते. मोनाची हालत खूप वाईट होती. ती डोम्बिवालीला रहायची. मला रक्तदान करायचे होते. पण तिला एकटीला कसे सोडणार? सुभाष आणि आनंद दोघे सरळ पोलिसांनी थांबवलेल्या taxit बसून हॉस्पिटलला गेले. मी आणि मोना कशा बाशा एका गाडीत चढलो. तिकडे तिच्या शेजारची मुलगी भेटली. ती एल. आय. सी. मध्ये काम करायची. तिच्या कडून कळले की एअर इंडिया च्या बिल्डिंग मध्ये आणि जव्हेरी बाजारात पण स्फोट झाले होते . बाप रे !! हे काय नवच!!!

सगळी कडे ह्याच गप्पा. आम्ही दादर ला पोहोचलो. तिकडे तर मोठ्ठा लोंढा आत शिरला. अजून दोन स्फोट प्लाझाला आणि सेना भावना जवळ झाल्याचे कळले. सगळा सावळा गोंधळ.

मोना त्या मुली बरोबर डोंबीवलीला उतरली. त्याच तंद्रीत ऑफिसला गेले. तिकडे तर रडून रडून आकांत झाला होता. पहिले आई बाबांना फोन केला. आमच्या काळजीने सगळे वेडे झाले होते. फोन नाहीत काही बातमी नाही !! सगळे खूप काळजीत होते. सरांच्या डोळ्याला धारा लागल्या होत्या. आनंद आणि सुभाष च्या घरी पण कळवले. मुख्य भीती आम्हा दोघींची होती. कारण लंच टाईमला कर्‍हाड बँकेच्या इमारतीमध्ये लेडीज toilet नसल्याने आम्ही स्टॉक एक्शेंज च्या इमारती मध्ये जायचो. नेमकी तीच वेळ असल्याने सगळे सहकारी घाबरून गेले. सरांनी मला घरी जायला सांगितले. त्यांच्या कडूनच कळले की अजून १३ ठिकाणी असे बॉम्बस्फोट झालेले आहेत. मन सुन्न झालं.

मी परत घरी निघाले. कोणतीच सोबत नाकारली. शांत रहावसं वाटत होत.

ठाण्याला उतरले. बाहेर आले, सरळ घरी गेले. घरी आई आणि बाबा दोघेही ऑफीस मधून आलेले होते. त्यांना पाहिल्यावर मात्र हमसा हमशी रडत सुटले. तिघे ह्याच विषयावर गप्पा मारत बसलो.
१२ मार्च, १९९३, मला एक वेगळीच अनुभूती देऊन गेला. मी कशाला घाबरले होते? कान अजूनही सुन्न होते. नीट ऐकायला यायला ३ दिवस लागले. मन बधीर झालं होतं. मृत्यूच दर्शन खूप काही शिकवून गेलं. त्यातलं राजकारण, आरोप, प्रत्यारोप...... कशालाच काहीच अर्थ नाही. मृत्यू हेच अंतिम सत्य. त्या रिंग मध्ये "आपो लीधो" करणार्याने "त्याचं" काय वाईट केलं होत? बँकेतल्या माझ्या मैत्रिणीने उगाचच जीव गमावला. तुमची भावना, देशप्रेम, सगळ खड्ड्यात जाउदे. त्यांचा तर जीव गेला ना !! अंतिम सत्य तेच.

ही तर सुरुवात होती. त्या नंतर मग अशा घटनांची आवर्तने होतच राहिली. आपण निबरपणे म्हणतच राहिलो " मेरा देश महान"

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

बापरे! किती भयानक अनुभव...वाचताना अंगावर सरसरुन काटा आला.

हो ना !! आणि लँडलाईन बंद!!! कारण अफवा पसरु नयेत म्हणुन. अगं माझ्या त्या (मोना) मैत्रीणीच्या वडिलांची तर वाईट परिस्थीती होती. त्यांना तिचं ऑफीस स्टॉक एक्श्चेंज जवळ आहे येवढ्च माहित. परत आम्ही काय आज इथे ऑडीट, उद्या तिथे! घरी थोडीच सगळे पत्ते माहित असतात!!! ते बीचारे पोर्ट ट्रस्ट ला होते. ते धावातच शेअर बाजारा जवळ आले आणि त्यांनी तर काळजीने सगळी प्रेतं सुध्धा तपासली.

मग घरी फोन केल्यावर समजलं की ती घरी आली.

भयानक अनुभव.

मीरा, मला तो दिवस अजुनहि तस्साच आठवतोय. मी नविन ऑफिस जॉईन करुन अवघे २ च दिवस झाले होते. EROS जवळ माझे ऑफिस होते. तिसरा महिना नुकताच लागला होता. अचानक काय झाले माहित नाहि, माझ्या मागची एक फ्रेम धाडकन खाली पडली, आणि बाहेर मोठा आवाज पण झाला, पण तो कसला माहित नव्हते. पुढच्या १०मि. बातमी आली काय झालय ते. सगळे घरी जायला निघाले, माझ्याबरोबर व्ही.टी. ला जाणारे कुणीच नवह्ते. सगळे म्हणाले चर्चगेट हुन दादरला उतर आणि जा. पण रस्त्यावरची गर्दी बघुनच व्ही.टी. ला जायचे ठरवले. तिथे २ तास झाले तरी ट्रेन मधे चढायला मिळाले नाहि. शेवटि मनाचा हिय्या करुन प्रयत्न केला, तर तोल जावुन दारातच पोटावर पडले. पण नशिब खाली आपटले नाहि, कुणा एका काकुंच्या अंगावर पडले. पण नशिब कुणीतरी आत खेचुन घेतले. ठाण्यात पोचले तर रिक्षा, बस काहिच नाहि. आणि गर्दिच गर्दि. तेव्हा फोन हि बंद होते, त्यांमुळे कसलीच खबर नाहि. नशिबाने दिर, नवरा दोघेहि घरात होते, सगळेच काळजीत. कसेबसे घरी पोचले. घरात पाय टाकल्याबरोबर नवरा म्हणाला, पटकन आवर आपण आईकडे (माझ्या) जावु, तुला समोर बघितल्यावर तीला समाधान वाटेल. घरी गेले तर काय, आई रडुन रडुन अर्धी झालेली.
खरच नको त्या आठवणी.

अंगावर काटा आला अगदी! माझ्या आईच्या ओळखीत कुणी एक स्त्री (बहुदा तिची मैत्रीण होती. आता नक्की आठवत नाही!) त्यावेळी गर्भवती असताना शेअर बाजाराच्या इमारतीच्या आसपासच तेव्हा कुठेतरी कामाला होती. तिच्या काळजीने सर्व अस्वस्थ होते हे आठवतंय! पण सुदैवाने सुखरुप होती!

रिंग चालू होती ना, त्याच्या खालच्या बेसमेंट मध्येच स्फोट झाला. रिंग चालू असल्याने खूप लोक मेले. >>>
रिंग म्हणजे काय ते कळलं नाही.

खरच!! काय भयानक दिवस....

वाईट अशाचं वाटतं की असे भयानक दिवस खुप वेळा आले आपल्या नशीबात!!!!

रिंग म्हणजे काय ते कळलं नाही.>>>

शेअर बाजार पुर्वी अत्ता सारखे इलेक्ट्रोनीक आणि ऑन्लाइन न्हवते. तिकडे प्रत्यक्ष व्यवहार होत असत. जे ब्रोकर खरेदी विक्री करायचे, ते एका रींगच्या आत असायचे. तिकडे जोरजोरात ओरडुन व्यवहार चालायचे. त्या जागेला रींग म्हणत. ती जागा बाहेरुन पुर्ण काचेची होती.

भयानक दिवस खुप वेळा आले आपल्या नशीबात!!!!>>>>> आणि सगळ्यात वाईट म्हणजे कुणीच काहि करत नाहि ह्याबाबतीत. ह्यात ज्यांच नुकसान झाले त्याना मदत मिळाली का कुणास ठावुक कि कागदावरच सगळे झाले. पण त्या सरकाच्या जावयाला (पाकड्याला) आजुन्हि आम्हि पोसतो आहोत.

बाप रे !!!!!!!!!! खुपच भयानक अनुभव... वाचताना अंगावर काटा आला.... तुम्ही त्यादिवशी कुठल्या परिस्थीतीतुन गेला असाल याची कल्पना पण करणं कठिण आहे......

त्या दिवसाचा अनुभव मी पण घेतला आहे. त्या वेळी माझे office Century बझार च्या जवळच्या गल्लीत होते. बाहेरची ऑफिसची कामे संपवून दु. २ वाजता मी Century बझार च्या बस-स्टोप ला उतरलो. त्या दिवशी काय वाटले कोणास ठावूक पण हॉटेल मध्ये (जे बॉम्ब स्फोटात उद्वस्त झाले ) चहा न पिताच ऑफिसमध्ये गेलो. आणि त्यानंतर १० मिनिटा मधेच तेथे स्फोट झाला. जेव्हा संध्याकाळी जेव्हा घरी जाताना ती जागा बघितली आणि काळजाचा ठोका चुकला. ते हॉटेल संपूर्णतः उद्वस्त झाले होते. २ रात्री झोप नाही. आज हि त्या कटू आठवणी अस्वस्थ होतो.

बापरे पुन्हा त्या आठवणी नकोत.
आमचे ऑफिस तेव्हा चर्चगेटला जमशेटजी टाटा रोडवर, सम्राट हॉटेलसमोरच्या इमारतीत होते. ऑफिसात आलेला एक माणूस सांगत होता की स्टॉक एक्स्चेंजमध्ये स्फोट झालाय आणि काही क्षणांतच आमच्या ऑफिसच्या जवळूनही फटाके फुटल्यासारखे आवाज येऊ लागले. काचा थरथरल्या. बाहेर जाऊन पाहिले तर एअर इंडिया इमारतीत स्फोट झाला होता.
एअर इंडिया इमारतीतल्या टीसीएसच्या कार्यालयात आमच्याच ऑफिसातल्या काही लोकांना मीटिंगला जायचे होते. पण काही कारणाने टीसीएसवाल्यांनी आमच्या ऑफिसात यावे असे ठरले. त्या मीटिंगसाठी येणारे ब्रिगेडियर नटराजन आणि दुसरे एक अधिकारी स्फोटाच्या क्षणी लिफ्टमध्ये होते. दुसर्‍या दिवशीच्या पेपरांत मुखपृष्ठांवर ब्रि. नटराजन यांचाच फोटो होता. त्यांच्याबरोबरचे अधिकारी अनेक दिवस कोमामध्ये होते. Sad

बापरे भरत... एकेकाच्या काय आठवणी आहेत !!!! तो दिवस मुंबईच्या इतिहासात काळ्या शाईने लिहिण्या सारखा आहे. गुंड्गीरी मुंबईला नवी नाही. पण १९९३ साली "दहशदवाद" ह्या नव्या इतिहासाला सुरुवात झाली.

त्या जानेवारीतल्या चर्चगेट-बोरिवली लोकल प्रवासातले प्रसंग अजून डोळ्यासमोर लख्ख दिसतात. जोगेश्वरी स्टेशनला काही दिवस ट्रेन्स थांबायच्या नाहीत. ऑफिसेस अनेकदा वेळेआधी सोडली जायची. गाड्याही बर्‍यापैकी रिकाम्या असायच्या.
एकदा दुपारी ३-४च्या सुमारास गाडी अंधेरीच्या आधी काही अंतर थांबली होती. पश्चिमेला ट्रॅक्सच्याच बाजून धावणारा एक माणूस आणि हातात लोखंडी सळ्या घेऊन त्याच्या मागे धावणारे आणखी काही.
अंधेरीला गाडी थांबताच एक धट्टाकट्टा पण व्यवस्थित कपड्यांतला माणूस डब्यात शिरला आणि त्याने सगळ्या खिडक्या-दरवाजे बंद करायला सांगितले. ते गोरेगाव आल्यावरच उघडले. पण तोवर जीवर मुठीत धरणे म्हणजे काय ते कळले होते. आपण आपल्या पायांनी गाडीच्या बाहेर पडणार नाही असेच तेव्हा वाटले होते.

लहान होतो तेव्हा मी बराच, शाळा सोडली याचा आनंद व्हावा या वयात...

पण ट्रेन सिरीअल ब्लास्टच्या वेळी बोरीवलीला कामाला होतो.. जवळून पाहिलाय तो अनुभव, जळालेली ट्रेन आणि भाजलेली प्रेते.. नको त्या आठवणी आणि असहाय्यतेची भावना मनात घेऊन रात्री २ वाजता घरी पोहोचलो होतो..

बापरे मीरा.
मी त्यावेळी लहानच होते. पण मित्राच्या घरी नोट्स घ्यायला गेले तेव्हाच हि न्युज आली. त्याचे बाबा स्टॉक मार्केटला काम करत. तर त्यांच्याकडे टेन्शन होतं फार. सुदैवाने ते सुखरुप होते. माझे बाबा चर्चगेट ऑफिसात होते पण त्यांच्या ड्युट्या कुठेही असायच्या, घरी फोन नव्हता त्यामुळे काहीच कळत नव्हते. रात्री उशीरा बाबा आले तेव्हा म्हणाले कि ते ही स्टॉक एक्सेंजहुन टॅक्सीने निघाले आणि ५/७ मिनीटात झाले हे स्फोट.
बापरे कसले टेन्शन होते.

जे ब्रोकर खरेदी विक्री करायचे, ते एका रींगच्या आत असायचे. तिकडे जोरजोरात ओरडुन व्यवहार चालायचे. त्या जागेला रींग म्हणत. ती जागा बाहेरुन पुर्ण काचेची होती.
>> अच्छा त्याला रिंग म्हणायचे काय. तो दिवस अत्यंत दुर्दैवी होता. मी तेंव्हा चौथीमध्ये होतो. पण मला आजही आठवतयं सर्व. शाळा सोडुन दिली होती लगेच.

मागे कुठेतरी ह्या संदर्भात लिहिल्याचं आठवतंय. पण पुन्हा एकदा इथे लिहिते.
ह्या दिवशी माझ्या बा/बेयरमधल्या नोकरीचा पहिलाच दिवस होता. ही कंपनी तेव्हा एअर इंडियाच्या शेजारी एक्स्प्रेस टॉवरमध्ये होती. एअर इंडियात स्फोट झाला तेव्हा आमच्या १९ व्या मजल्यावरच्या खिडकीच्या काचा फुटल्या होत्या. नक्की काय झालं हे तेव्हा लक्षात आलं नाही पण बस, टॅक्सी सगळंच बंद झालं त्यामुळे नरिमन पॉईंट ते व्हिटी सगळ्या गर्दीबरोबर चालत आलो होतो ते आठवतंय.