मी मायबोलीकर कसा झालो - भाग २ / ३

Submitted by बेफ़िकीर on 21 June, 2012 - 01:43

पुंडलीक वरदे हाआआआरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाआआआराम

पंढरीनाथ महाराज क्क्क्क्की ज्ज्ज्ज्ज्ज्जय

संक्रांतीला छाटला गेलेला पतंग दिवाळीला नीट अवस्थेत त्याच मालकाला मिळावा, चाळिसाव्या वर्षीही लग्नच ठरत नसलेल्या मुलीला प्रिन्स चार्ल्सने मागणी घालावी आणि सोमवारी सकाळी ऑफीसला पोचल्यावर कळावे की आज सुट्टी आहे तसे झाले...

काय वर्णावा माझ्या मनातील आनंद मायबापा?

असे क्षण फार कमी येतात... मागे एकदा माझ्या कडेवर बसलेलं एक निर्व्याज परकं बाळ त्याच्या बापाच्या हातात टेकवल्या टेकवल्या मुतलं होतं आणि माझा शर्ट पवित्र राहिला होता तेव्हा असा आनंद झाल्याचे आठवते...

मला नांवे न ठेवणारा माणूस जन्माला यायचा आहे... अख्खे जग मला शिव्या घालते.... कारण माझा स्वभावच तसा... अती शहाणपणा जेथेतेथे......आपल्याशिवाय दुसर्‍या कोणाला काही कळतच नाही हे मनात ठसलेलं... आणि प्रसिद्धीलोलुपता आकाशाला टेकलेली...

पण माझ्या स्वभावातील हे कटू आणि तिरस्करणीय कंगोरे ज्ञात नसताना मायबोलीने मला भरपूर प्रतिसाद आणि पुढील लेखनासाठी भक्कम प्रेरणा प्रदान केली...

आता बघा... मायबोली डॉट कॉम हे वेब अ‍ॅड्रेसमध्ये टायपताना फिरंगी भाषेतच टायपावे लागते की नाही???? की आपण मराठीत लिहितो ??? डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट मायबोली डॉट कॉम असे? नाही

मग काही काही गोष्टी जर विशिष्ट भाषेतच करणे शोभनीय असेल तर सोलापूर सेक्स स्कॅन्डल यातील सेक्स आणि स्कॅन्डल या शब्दांना मराठी पर्याय काढून मी दिलेल्या धाग्याचे शीर्षकच बदलून मलाही न कळवता प्रकाशित करण्यात काय अर्थ आहे? काय तर म्हणे सोलापूरमधील कामविकृतीचा लोकापवाद. बकवास भाषांतर. कोणी वाचले तरी असते का? मायबोलीचे तसे नाही. मायबोलीने मराठीचा यथोचीत आदर करतानाच जेथे भाषांतर करणे वेडेपणाचे ठरेल तेथे अजिबात भाषांतर केले नाही. यातून त्या त्या माणसालाही विश्वास वाटला आणि मायबोलीचे मराठीपण तर अजिबातच कमी झाले नाही.... मायबोलीने 'सोलापूर सेक्स स्कॅन्डल' हे शीर्षक तर तसे ठेवलेच, पण त्या कादंबरीत (कदाचित) झालेले आजवरचे पहिलेच बोल्ड उल्लेखही उडवले नाहीत आणि उलट ती कादंबरी प्रकाशित झाल्यावर तर त्या बातमीला मुखपृष्ठावर स्थानही दिले आणि या कमकुवत मनाच्या माणसाला भरभक्कम पाठिंबा दर्शवला... हा भाग वेगळा की मऊ लागले म्हणून कोपरापासून खणा या उक्तीनुसार मी अधिकाधिकच बोल्ड लिहीत गेलो... ज्याला काही अमेरिकन वाहत्या पानांवर विचारी भासणारे सवंग लेखन असे दर्जेदार व भारदस्त विशेषण देण्यात आलेले आहे..

शब्दकोष घेऊन लेखकांच्या लेखनातील परभाषिक शब्दांचे टुकार भाषांतर करून ते प्रकाशित करणे हा मराठीचा अभिमान वाहणे नक्कीच नाही... तो विषय जेव्हा असेल.. की बुवा या या शब्दांना मराठी शब्द कोणते??... तेव्हा ते जरूर लिहावे... पण एखाद्याने कवितेत पेन शब्द वापरला (मात्रा ३) तर तो खोडून स्वतःच तेथे झरणी (मात्रा ४) किंवा लेखणी (मात्रा ५ ) हे शब्द घालून बट्याबोळ कशाला करायचा????

मायबोलीने हे कधीही केले नाही... माझ्याच असे नव्हे... तर जे काही मी वाचले त्यात कोठेही प्रशासकांनी 'मराठीत लिहा' असे उगीचच म्हंटलेले वाचलेले नाही... अपवाद वेगळे... जसे गुलमोहरात उगीचच हिंदी, इंग्रजी कविता टाकणे किंवा प्रताधिकार न पाहता परभाषिक कविता, साहित्य यांचा साठा, उल्लेख वगैरे करत राहणे...

स्वभाव दिलदार असला की समुदाय सतत बरोबर राहतात व वाढत राहतात... खडूसपणा केला की माणसं निघून जाणार... असो...

तर गद्य लेखन घाबरत घाबरत टाकलं... शीर्षक वाचूनच एकांनी प्रतिसादात दम भरला... ओ बेफिकीर... पहिलं ते सोलापूरचं नाव काढा आमच्या... नंतर वाचू काय लिहिलंय ते.... ससा घाबरावा तसा मी दुसर्‍या नेहमीच्या संकेतस्थळावर उभा राहून डोकावून मायबोलीवर पाहू लागलो... पण काही भली माणसेही असतातच सर्वत्र... सुजा आणि जुयी या दोन सदस्यांनी मला आधार दिला... त्यांनी माझ्या लेखनाला मनापासून प्रामाणिक ते प्रतिसाद दिल्यामुळे पुढचा भाग टाकण्याची माझी हिम्मत झाली...

त्याच सुमारास सुमेधा पुनकर आणि सानी यांनीही बहुधा 'नवोदितांना सांभाळून घ्या' ही पॉलिसी अंगिकारली असावी... त्यामुळे रोज ऑफीसला आलो की एकही काम न करता मनाला येईल तसा पुढचा भाग लिहायचा आणि मग गुलमोहराचे पान रिफ्रेश करत राहायचे एवढेच करू लागलो... मायबोलीवरील लेखनाला 'धरणातून पाणी सोडावं' तसे प्रतिसाद येतात... यामुळे माणूस उमेद टिकवून ठेवतो... नकारात्मक प्रतिसाद असल्यास भांडणाची आणि सकारात्मक असल्यास लिखाणाची...

सोलापूर या कादंबरीच्या दरम्यान मला तरी एकदाही कोणी 'हे काय लिहिताय' असा विरोध केला नाही... लेखनाबाबत आवश्यक वाटेल तशी जेन्युईन टीका जरूर झाली... पण हे बंदच करा.. असे कोणी म्हणाले नाही... कोणी तक्रारी केल्या नाहीत.. सुदैवाने ती कादंबरी पूर्ण झाली आणि लगेच दुसरे कथानक लिहायला घेतल्यावर आपला तर बाप्पा वट लय वाढला.. पण एके दिवशी पिकलेलं पान गळावं तसा तो सगळा वट धाडकन खाली कोसळला...

एक तर गझल आणि कादंबरी व्यतिरिक्त मी आता इतरांना प्रतिसाद देऊ लागलो होतो आणि माझा स्वभाव हरामखोर असल्यामुळे माझे प्रतिसादही तसेच येऊ लागले.. (अजूनही येतात हे वेगळे - भारतीयांनी दोन अडीचपर्यंत जागून पाहावे... सकाळी उठल्यावर मी ते सपादीत तरी करतो किंवा ते गळलेले तरी असतात.. कालाय तस्मै नमः)

कवितांवर वाद सुरू झाले तोवरच मला असा शोध लागला की येथे फक्त गुलमोहर हा विभाग नसून 'नवीन लेखन' असेही काही आहे... ते काय आहे हे पाहताना मला असे दिसले की आपण जे गुलमोहरात लिहितो ते इथेही दिसते राव.... असे दोन्हीकडे का दिसते हे समजेना... तेवढ्यात... अगंगं.. कामाच्या ठिकाणी होणार्‍या शोषणाबाबतच्या कायद्यांचा धागा आला आणि तो पाहून मी त्यावर एक पिंक टाकताच मी एकीकडे आणि उरलेली मायबोली दुसरीकडे असा प्रकार झाला.. एका हरणाच्या मागे सर्व चित्ते धावावेत तशी माझी परिस्थिती झालेली होती..

शेवटी मी जाहीर माफी मागून तेथून आधीच काढलेला पाय आणखीन काढता घेतला..... मात्र मायबोली व्यवस्थापनाने या सर्व प्रकाराला 'नित्य वादसंवाद' या पलीकडे महत्व दिले नाही असे मला वाटते... ज्यामुळे मी पुन्हा एकदा गुलमोहराकडे वळलो... आयुष्यात नवीन लेखनाच्या पानावर जायचे नाही अशी प्रतिज्ञा करून मी हाफ राईस दाल मारके संपवण्याकडे वळलो...

मायबोलीकर आणि मायबोलीचा आणखी एक गुण म्हणजे कोणीही कुठेही प्रतिसाद देऊ शकतो आणि बहुतेकदा ते प्रतिसाद प्रामाणिक असतात... आवडलं आवडलं... नाही आवडलं तर तसं सांगणार..

सोलापूर, हाफ राईस आणि डिस्को या तीन कथानकांनी मला 'य' प्रतिसादक, लेखनाची उर्मी, अभिमान सुखावल्याची जाणीव आणि नोकरीत राम नसल्याची भावना मिळवून दिली... याचे परिणाम माज्या नोकरीवर दिसू लागले..

दरम्यान वाहत्या पानांवरचे स्थिर राजकारण समजू लागले... कोण कुणाचा आणि का दुष्मन आहे हे लक्षात येऊ लागले.. ड्यु आय डी घेतला तर लगेच हाकलत नाहीत असे वाटू लागले.. मात्र आजही एक गंभीर समीक्षक सोडला तर माझा दुसरा आय डी नाही.. तो गुंडुली की काय तो मी त्याचवेळी रद्द करून टाकला..

आपल्याला प्रतिसाद देणार्‍यांना स्वगृही (आपापल्या वाहत्या पानावर) गेल्यावर कोणत्या झोंबत्या टीकेला तोंड द्यावे लागते आणि ती होऊ नये म्हणून ते कसे प्रतिसाद देणे बंद करतात हे समजू लागले..

मायबोली रात्रीही चालूच असते हे मला माहीतच नव्हते.. मी फार तर साडे नऊ दहापर्यंत बघायचो.. नंतर घरगुती वाद सुरू झाल्याने बंद करायचो..

पण या काळापर्यंत मला 'फॅन्स' म्हणजे काय ते समजायला लागले होते..... बहुधा वजन थोडे वाढले असणार त्या काळात... मी काय लिहिलंय ते बाजूलाच राहायचं... प्रतिसाद देणार्‍यांमध्ये भांडणे व्हायची... महान लेखकाप्रमाणे ती मी सोडवायचा प्रयत्नही केला एक दोनदा...

दरम्यान श्रीनिवास पेंढारकरांनी माझी थोडीशी लाज राखली.. तोवरच्या सर्व कादंबर्‍या आमच्या मंडळींनीही वाचलेल्या होत्या.. मी इतका वेळ मायबोलीवर का असतो हे घरी आता नीट समजायला लागलेले होते....

पण मी ओल्ड मंकचा पहिला भाग टाकला.. येथे माझे मायबोलीकर होणे आजवरपेक्षा सर्वात जास्त घट्ट झाले..

ओल्ड मंक...

एकाचवेळी कचरा ठरणे आणि ग्रेट ठरणे हे अनुभवायला मिळणे तसे दुर्मीळच... मला ते रोज अनुभवायला मिळू लागले.. एका प्रतिसाददातीने तर मला देव्हार्‍यात ठेवून चामरे ढाळेन अशी सुखद धमकी दिली... पुढे म्हणाली... बेफिकिरांचे लेखन कधी येते याकडे मी राधेप्रमाणे डोळे लावून बसते... त्यांचे शब्द आणि त्या शब्दांची पूजा हेच माझे कर्तव्य... ते सगळे प्रतिसाद खरे मलाही वाटत नव्हते... पण अगदीच खोटेही वाटत नव्हते... त्यातच तिचे ते प्रतिसाद पाहून एक नवीन आय डी तिचा पती या नात्याने उपस्थित झाला आणि तिला म्हणाला की मी तुझा नवरा असून तू त्या बेफिकिरवर कसली चामरे ढाळतेस????

हे कमी की काय म्हणून डॉक्टरांनी माझा फॅन क्लब काढून येथील इतिहासातील सर्वात मोठ्या यादवीला पाचारण केले...

...... तेव्हा माझ्याशी भांडणारे.. मला हासणारे आता मला नियमीत भेटतात आणि माबोबाह्य अशा कितीतरी विषयांवर मध्यरात्रीपर्यंत गप्पा होतात... तेव्हा चामरे ढाळणारे आणि मी पहिला ती दुसरी करणारे काहीजण आता वार्‍याला उभे राहात नाहीत...

... पण सगळे मायबोलीकर म्हणून मात्र तसेच राहिलेले आहेत... येथेच असतात... दोन्ही टोकाच्या प्रतिक्रियांनी मला कायमचे येथेच अडकवून ठेवले.. इकडचा राग तिकडे काढताना वाटेल तसे प्रतिसाद दिले गेले एकदा माझ्याकडून.. मग मला समजही देण्यात आली... पण कोणताच क्षण... एकही क्षण असा मात्र नव्हता की मनात यावे...

'जाऊ च्यायला इथनं... परत यायलाच नको'

====================================

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

Happy

ही निरवानिरवीची भाषा का बरं ? तुम्ही कुठे चालला आहात का ?
एका म्हराटी सिणेमात हिरवीन मरता मरता म्हणते आपली दोन मुलं आहेत ना, त्यातलं एक मूल तुमचं नाही. इतकं म्हणून ती ही जग सोडून जाते. हा कबुलीजबाब पण तसाच वाटायला लागलाय काहीसा Biggrin

( तळटीप राहीली : हा कबुलीजबाब मी पूर्ण शुद्धीत राहून आणि कुठल्याही जबरदस्तीशिवाय देत आहे. Wink )

किरण शेवटची एकच ओळ वाचलेली दिसतेय तू.. Wink

जसं दाद ने ९.२० ला लेख टाकला आणि ९.२४ ला चांगला प्रतिसाद आला... तो लेख वाचायला मला तरी २० मिनिटे लागली होती...

मजा आली वाचताना
एकदम पडद्यामागचे चेहरे सारखा कार्यक्रम बघतेय असे वाटले.

रावण | 21 June, 2012 - 00:33

मस्त बेफी
सनम २ कधी येणार?

____________________________

१०००% दुसरा रावण पण आला.

तो लेख वाचायला मला तरी २० मिनिटे लागली होती... Uhoh
का बरं इतका वेळ लागला ? मूड नव्हता का ? Proud

@ रच्याकने
दाद, ट्युलिप. कौतुक ही मायबोलीवरची माझी आवडती नावं आहेत ( नाईलाजाने नावं घ्यावी लागत आहेत ) त्यांचं लिखाण निवांत वेळ आनि फ्रेश मूड असतानाच वाचतो. नवल नाही चार मिनिटात वाचून झालं ते :). या लोकांचे कित्येक लेख वेळ नसल्यामुळे वाचायचे राहून गेलेत. असे न वाचता प्रतिसाद दिले असते तर ते प्रत्येक लेखावर दिलेच असते Happy ( कॉलेज संपल्यावर कादंब-या वाचायचा छंद लागला तेव्हां दिवसात तीनदा पुस्तक बदलायला जायचो. प्रत्येकाचा वाचनाचा वेग निराळा असतो )