मी मायबोलीकर कसा झालो - भाग १ / ३

Submitted by बेफ़िकीर on 20 June, 2012 - 08:38

तो दिवस आजही आठवतो. हाय!

दिवस पावसाळ्याचे होते. कर्मधर्मसंयोगाने रात्रीही पावसाळ्याच्याच होत्या. नुकतेच जमलेले एक प्रेम शाबूत असूनही विरहाची भावना मनात यावी तसा तो ऋतू. स्वतःच्या शर्टला सिगारेटच्या धुराबरोबरच 'वैवाहीक जीवनातील दहशतवादी कारवायांचाही' वास यावा असा तो काळ होता. ऑफीसमध्ये कामाशिवाय इतर सर्व गोष्टी करणे आवश्यक असल्याने मी शून्यात पाहात होतो. या हरकतीस शून्याची हरकत नव्हती. उजव्या हाताचे पहिले व मधले आणि डाव्या हाताचे मधले अशी तीन बोटे त्यांना लागलेल्या सवयीनुसार की बोर्डावर अस्ताव्यस्तपणे पडत होती. निरर्थकातून सार्थ हा ग्रंथ लिहिण्यास घ्यावा इतकी त्या बोटांची जादू. नुकतीच अफगाणिस्तानातील जमीनीखाली गाडली गेलेली संस्कृती आपला धर्म कसा एक अडगळ आहे हे सांगताना बोटे गूगलवरून हार्मोनियमवर फिरावे तशी फिरली. 'एम' या अक्षरापासून मी नेमके काय शोधत होतो हे आज आठवत नाही. माझी त्या काळातील आवडती अभिनेत्री मनीषा कोईराला. जाड झाली बिचारी पुढे. तर 'एम' आणि 'ए' टाईप करतोय तर काय. गूगलने स्वतःचा आगाऊपणा करत काही नको ती सजेशन्स दिली.

GOOGLE SEARCH

M A

MARATHI KAVITA - SITE IS UNDER MAINTENANCE SINCE INCEPTION

MANISHA KOIRALA HOT PICS

MANISHA KOIRALA CHHOTISI LOVE STORY

MADHURI DIXIT HOT KISS IN DAYAVAN

MATERIAL SCIENCE ORGANISATION SURVEY

MAAYBOLI.COM - A SITE FOR MARATHI POETS, WRITERS AND NONQUALIFIED CRITICS

मला बिघडवण्यात गूगलचा सर्वाधिक हात आहे.

मी मुळचा सभ्य असल्याने शेवटचा पर्याय आधी क्लिक केला. गूगल हे प्रोफेसरांच्याही आधी पर्याय देते याची मला तेव्हा कल्पना नव्हती.

किस घेताना ओठ 'विसण न घातलेल्या बंबातील पाण्याप्रमाणे' तापलेले असल्यास कसे वाटेल हे मी 'माधुरी दीक्षित हॉट किस' हे वाचून विचारात घेतले. पण तोवर मायबोली डॉट कॉम उघडली होती. त्यामुळे संकटे विनोद खन्नावर सोपवून मी गुलमोहराकडे वळलो. खरे तर वळलो नाहीच, कारण गुलमोहर हा एकमेव विभाग मला दिसला आणि त्यावर क्लिक केले. पण 'वळलो' असे म्हंटल्याशिवाय कारकीर्दीचा आरंभ महान ठरत नाही म्हणून तसे म्हणालो इतकेच. नवरा बायको दोघांनाही ताप आल्यावर त्यांनी (एकमेकांचा) किस घेतला तर त्यास हॉट किस म्हणत असावेत.

अशा रीतीने या युगाचा एक महान लेखक एका साईटकडे वळला आणि वळला तो कायमचाच.

=====================

एक मान्य करायलाच हवे की गोठ्यातील गुरे सोडावीत आणि त्यांना हवे तिथे उधळू द्यावे असे धोरण असलेल्या चंद साईट्सपैकी ही एक आहे. येथे मॉडरेशन नाही. तक्रार केल्यास ते कार्यान्वित होते. हेच ते वैशिष्ट्य ज्यामुळे मी आजही येथे चिकटलेलो आहे. माझ्या लेखनातील 'लेखनाखालचे प्रतिसाद' सोडले तर बाकी सर्व 'कारवाई' करण्यायोग्य असते.

====================

मला येथे दोन पावलेही चाललेलो नसताना 'केवढे चालणे हे मजल दरमजल' ही गझल सुचली ते काही जणांचा सदस्यत्वाचा कालावधी पाहून. कीबोर्डवर फिरणारी सोडून इतर सर्व बोटे तोंडात घालून मी 'बारा वर्षे तेरा आठवडे', ' चौदा वर्षे एक्कावन्न आठवडे' हे कालावधी पाहात होतो. आधी मी 'या स्थळाला सदस्यांची वाळवी' अशा मिसर्‍याची गझल करणार होतो. पण वाळवी म्हंटल्यावर आपल्याला झुरळासारखे झटकण्यात येऊ शकेल याचा अंदाज काही कवितांवरील प्रतिसाद पाहून आला. खरे तर कवी, यादवी, माधवी (दारूचे उदात्तीकरण), लाघवी ( येथल्या संदर्भात एक दुर्मीळ स्वभाववैशिष्ट्य), हवी, नवी या सर्व यमकांना त्या 'वाळवी'मध्ये स्थान मिळाले असते. पण मोहावर नियंत्रण ठेवले.

केवढे चालणे हे मजल दरमजल ही गझल मी 'सेव्ह' या बटनावर प्रचंड दाब देऊन विसरून गेलो. खरे तर मी त्या बटनावर उभा राहणार होतो. याचे कारण बहुतांशी संकेतस्थळांवर मी ते बटन कितीही जोरात दाबले तरी व्यवस्थापक, विश्वस्त, प्रशासक या मंडळींना माझे लेखन मिळायचेच नाही. त्यामुळे मी त्या गझलेखाली दिसलेल्या सेव्ह या बटनावर बुक्क्या मारल्या आणि काही होईना म्हणून नेहमीच्या स्थळावर झेपावलो. सामान्य माणसे उडत जातात, असामान्य झेपावतात.

रात्री नैराश्याचे कांबळे अंगावर ओढून झोपल्याचे नाटक करून बायको झोपल्यावर मी हळूच बाहेर येऊन पुन्हा लॅपटॉप ऑन केला. पण हाय रे दुर्दैवा, बायको मागे येऊन उभी राहात गोड आवाजात मात्र संतप्त चेहर्‍याने म्हणाली...

"आपले आयुष्य आधी वृत्तात बसवायचे का?"

भल्याभल्यांना 'गालगागा' शिकवणारा मी 'अगाअगा' करत आत गेलो. त्या भयाने मात्र खरी झोप लागली हा एक साईड इफेक्ट.

स्वप्नात मला दृष्टांत झाला. (बरे झाले, बरेच दिवस मी एकांत, शांत आणि भ्रांतला यमक शोधतच होतो - दृष्टांत).

स्वप्नात काही अप्सरा आणि कार्तिकस्वामी यांचे शिष्टमंडळ माझ्यासमोर येऊन म्हणाले.

"उद्यापासून तुझ्या आयुष्याला एक संपूर्ण वेगळे वळण लागत आहे. हे अत्यंत सुखद वळण असून त्यावर चाललास तर तू महान होशील"

त्या शिष्टमंडळाला मी बाणेदार उत्तर दिले.

"मी महान नाहीच्चे तर स्वतःला महान का म्हणू?"

"महान नसणार्‍यांनाच महान म्हणणारे ते वळण आहे वत्सा... आम्ही आधी तिथेच होतो..."

"म्हणजे? तुम्ही महान नव्हतात?"

"छे?... आम्ही कसले महान? आम्ही आमचे चेहरे प्रत्यक्षात कसेही असले तरी अवलोकनात मधुबालाचे फोटो टाकायचो... ठरलो महान"

"हे पहा... शेजारी माझी बायको आहे... ती आधीच कावलेली असते.. तुम्ही निघा..."

"तिला आता तू भेटणारही नाहीस... तिला ओळखणारही नाहीस आणि महिनोनमहिने तिची आठवणही तुला येणार नाही अशा एका वळणावर उद्या तुझे पाऊल पडणार आहे... तेव्हा खुशाल झोप..."

मी खाडकन घामेजून जागा झालो. ही माझ्याकडे टक लावून पाहात होती. तिचा संशय असा की मी पुन्हा नाटक करत असणार झोपण्याचे. मी विचारले.

"काय झाले गं?"

"तुझ्या गझलेला एखादा प्रतिसाद मिळाला असेल"

हे भीषण वास्तव ऐकून मी पुन्हा पाठ टेकली. हिचे आणि माझे विश्व वेगळे आहे. बेड फक्त एक आहे.

सकाळी उठलो आणि पवित्र चेहरा करून देवाला आणि आई वडिलांना नमस्कार केला. (आधी आंघोळ केली होती).

दोघांनी आशीर्वाद देताना 'सुखी राहा' असे दोन शब्द फेकले. मी सुखी राहणे हे हिने दु:खी राहणे आहे याची त्यांना फारशी कल्पना नव्हती. हिला अचानक स्वयंपाक घरात बघून हात पुढे करून मी शेकहॅन्ड केला. तिनेही हात हातात दिला. एकंदरच जगात, हात हातात देताना लाजण्याचे प्रमाण घटल्याची चिंता मला नव्याने जाणवली.

"काय झालं?"

हिचा रुक्षपणा गगनभेदी असतो.

"मला काल दृष्टांत झाला "

"चहा घे"

मी सात्विक भाव आणून 'हो तर' म्हणत चहा भुरकला. ती कॉफी घेत होती.

"कसला दृष्टांत"

"आज... आजपासून माझ्या साहित्य कारकीर्दीला नवीन वळण लागणार आहे..."

दोन तास सहा मिनिटे झालेल्या ड्यु आयडीकडे कुत्सितपणे बघावे तसे माझ्याकडे बघत ती म्हणाली...

"त्या कविता लिहून काय मिळतंय??.. तो परवाचा कार्यक्रमही तुझ्याच पैशांनी केलास... बाकीच्यांना मोठं करायला आपण काय सयाजीराव गायकवाड आहोत?"

सयाजीरावांनी त्यांच्या आयुष्यात नेमके काय केले होते हे मला माहीत नसल्याने मी काऊंटर करू शकलो नाही.

"ऐक ना?.. मला खरंच स्वप्न पडलं... कार्तिकस्वामी आणि काही अप्सरा असे एक शिष्टमंडळ आले होते..."

"आपल्या घरात आहेत की दोघेही... तू कार्तिकस्वामी आणि मी अप्सरा..."

"काय बोलतेस... "

"काय काय बोलतेस???"

हिचा फणकारा असा असतो की पूर्वी दत्तप्रसाद रानडेंनी गझल गाताना वैभव जोशींचा एक तरल काफिया आईबहिणीवरच्या शिवीप्रमाणे उच्चारताना मान हालवली होती त्याची आठवण झाली. वैभव जोशी शेजारीच बसलेले होते त्या रानड्यांच्या. नंतर त्यांच्यात काय झाले हे माझ्यापर्यंत पोचलेले नाही.

ते पूर्वी एक गाणे होते एका सिनेमात. लष्कारा, लष्कारा तेरे कंगना का लष्कारा. आमच्याकडे त्यात किंचित बदल करून 'फणकारा, फणकारा तेरा सुबहका फणकारा' असे गीत गातात.

रात्री तडजोड अन सकाळी हिरमोड अशा अनंत कुटुंबांपैकी आमचेही एक कुटुंब आहे.

सावरकरांच्या धाग्याप्रमाणे तिच्या चेहर्‍यावरचे ते तापट भाव सारखे वरवर येत राहिले आणि मी ऑफीसला निघण्याची तयारी केली.

वाहत्या पानासारखे आई वडिलांना हाय बाय करून मी निघालो तो थेट ऑफीसलाच पोचलो. ऑफीसलाच चाललेलो होतो, पण समेवर येण्याचा आनंद काही औरच म्हणून 'निघालो तो थेट' हा शब्दप्रयोग.

आयुष्यही असेच थेट असते तर कोण मजा आली असती. आयुष्याला लागलेली वळणे आणि मला लहानपणी लावण्यात आलेली वळणे यांच्यात एकुण फारच फरक पडला.

ऑफीसला येऊन लॅपटॉप ऑन करून नेट ऑन करून नेहमीचे संकेतस्थळ उघडून पाहतो तर काय?

.........काहीही नाही

मी लिहिलेली गझल तर मॉडरेटर्सना दिसलेलीच नव्हती, पण मी इतरांच्या गझलेवर दिलेले प्रक्षोभक प्रतिसादही छापण्यात आलेले नव्हते.

मग पुन्हा काही इतर धाग्यांवर प्रतिसाद देऊन पाहिले. मग नेहमीचेच आणखी एक संकेतस्थळ पाहून झाले. तेथे तर जैसे थे च होते. म्हणजे गेले सहा दिवस पहिले पान तसेच्या तसे होते. मी तर सर्वत्र इतका नकोसा झालेला होतो की मला शंका आली की आपल्याला ते पान नेहमी तसेच दिसावे अशी यंत्रणा लावलेली आहे की काय.

मग मात्र ऑफीसचे थोडेसे काम करावेच लागले.

ऑफीसमधून निघताना मला कार्तिकस्वामी आणि अप्सरांचा दृष्टांत आठवला. तो आठवण्याचे कारण म्हणजे ऑफीसमधून सहज खाली रस्त्यावर पाहिले तर एक सुंदर ललना चाललेली होती. कार्तिकस्वामी केवळ अप्सरांमुळे आठवले हे मान्य करण्याचा प्रामाणिकपणा माझ्यात आहे.

धाडकन मी लेखाजोखा का काय म्हणतात तो घेतला. आज अशी कोणती घटना घडली की बुवा ज्याला वळण बिळण म्हणावे? च्यायला काहीच नाही. सरळच तर झाले सगळे. नेहमीचाच वैताग, नेहमीचीच धांदल.

मग पार्ल्यात नवीन सदस्य शिरावा तसा तो विचार माझ्या मनात शिरला.

'काल ल्येका तू एक गझल त्या तिकडेही टाकलीवतीस की राव? आँ? ते पाहिलंच नाहीस की तू?'

झालं. ते पान उघडलं. तेही गूगलवरून उघडलं. पुरुषाला सुखी करण्याचा मार्ग त्याच्या पोटातून जातो त्याप्रमाणे मायबोलीवर येण्याचा मार्ग गूगल असावा असे माझे त्यावेळेसचे मत होते. गुलमोहरात काहीच्या काही कविता असा एक विभाग पाहून मी संयोजकांच्या चातुर्याला सलाम केला. इतरत्र ज्याला नुसती कविता म्हणतात त्याला काहीच्या काही कविता म्हणण्याची हिम्मत येथे होती. मग आपली गझल प्रकाशित करण्याची हिम्मतही असेल की कसे, हे तपासून पाहावे म्हंटले.

केवढे चालणे हे मजल दरमजल..... हं... च्यायला????? ही आपली गझल आहे का काय आहे??? विडंबन तर नाही????? २७ प्रतिसाद???? आपल्या गझलेला??? नक्कीच वाद झालेला असणार काहीतरी...

बघू बघू????

१. गझल आवडली.

२. वा

३. गझल छान आहे. स्वागत

४. आय हाय, कातील, गाठ तळ गाठ तळ बेफिकीर आत चल

५. आवडली

६. स्वागत, गझल छान आहे.

इत्यादी इत्यादी इत्यादी...

म्हणजे आपल्या... आपल्या गझलेला... प्रतिसाद??? तेही २७??? एका दिवसात??? कोणताही वाद न होता????... तेही गझल ज्या दिवशी 'सेव्ह' करण्यासाठी बुक्क्या मारल्या त्याच दिवशी प्रकाशित होऊनही???

मुंग्यांनी मेरूच काय सगळे पर्वत गिळले. सूर्य दक्षिण, उत्तर अशा वाट्टेल त्या दिशांनी उगवला.

माझ्या अंगाला मुंग्या आल्या. (ह्या मुंग्या वेगळ्या, वरील पर्वत गिळणार्‍या नव्हेत).

मी हतबुद्ध झालो. दहा वेळा पान रिफ्रेश केलं. सहाव्यांदा आणि नवव्यांदा करताना तर एकेक प्रतिसाद वाढलाच. कर्मभूमी मिळाल्यासारखा मी 'येडबाडलो' (या शब्दाचा अर्थ शंकर पाटलांना विचारावा, अन्यथा स्वतः अनुभव घेता येतोच कधी ना कधी).

मी गुलमोहर धबाधबा वाचला. एकही माहितीतले नांव नव्हते. गझलेच्या नावाखाली काही छापून आलेले होते त्यावर आसूड उगारणार तोच एक लाडीक अप्सरा मंजूळ आवाजात कानात म्हणाली...

"इथे भांडण नाही हं करायचं???... नाहीतर इथेही तेच होईल... "

काय सांगू महाराज? मी चक्क मायबोलीकर होणार होतो. केवळ काहीच दिवसात.

बाकीचं उद्या परवा...

=============================

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

मस्त. :खोखो::फिदी:

अरेरे!
एकंदर गूगलमुळे तुमचे पाऊल वाकडे पडले अन तुम्ही माधुरीच्या विसाणापासून माबोच्या बंबात येऊन पोहोचलात तर!
(विसाणाचे पाणी अन आंघोळीचा बंब अशी फडतूस उपमा आहे. बाकी इथे आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी, अन नको तिथे सरपण घालून शिळ्या कढ्यांना उकळी आणणे जोरात चालते.)

:दिवे:
लेख नेहेमीप्रमाणे झक्कास.

मायबोलीचे सभासदत्व घेतल्यापासूनचे आत्मचरित्र लिहायला घेताय का?
रंजकतेसाठी कल्पनेचा आणि अतिशयोक्तीचा आधार घ्यायची गरज का भासावी.
मजल दरमजल वर आलेली दिसली तर पहिल्या २४ तासांत २७ प्रतिसाद नाहीत. लेखात दिलेले प्रतिसादही काल्पनिक आहेत.
(मूळ गझलेवर मी गझल आवडल्याची दिलखुलास दाद दिलेली असल्याने माझे प्रतिसाद पूर्वग्रहदूषित नसतात हे सिद्ध होते)
हा वरचा (पहिल्या कंसातल्या मजकुराआधीचा) प्रतिसाद लेखकाच्या साक्षेपी (म्हणजे सतत आक्षेप घेणार्‍या की काय?) वृत्तीला ध्यानात घेऊन लिहिला आहे. Wink

पुरुषाला सुखी करण्याचा मार्ग त्याच्या पोटातून जातो त्याप्रमाणे मायबोलीवर येण्याचा मार्ग गूगल असावा असे माझे त्यावेळेसचे मत होते>> माझे आत्ताही हेच मत आहे Happy

दिवस पावसाळ्याचे होते. कर्मधर्मसंयोगाने रात्रीही पावसाळ्याच्याच होत्या

काय सुंदर वाक्य आहे , कमाल