तो, ती आणी मी..

Submitted by स्मितहास्य on 20 June, 2012 - 06:10

एक जूनचा कार्यक्रम पार पाडल्यावर आता वेध लागले होते पावसाचे. नाही म्हणायला पेपरात तेव्हढंच छापून येत होतं, मान्सूनचे अंदमानात आगमन वगैरे वगैरे.... पण इथलं काय? म्हणता म्हणता "तो" कोकण किनारपट्टीवरही येऊन पोहोचला... मग बाबा आमच्याइथे येण्यास इतका ऊशीर का रे...

साधारण अशाच काहीश्या भावना प्रत्येकाच्याच मनात होत्या. नकोसा झाला होता जीव. घामानं थबथबणारं अंग, उन्हानं होणारी काहीली..... पार अगदी डोळ्यात प्राण आणून "त्याची" वाट पाहीली जात होती. रस्त्याने बर्फाच्या लाद्या वाहून नेणारी ती बैलगाडी पाहिली की वाटायचं, सरळ धावत जावं अन् लोळावं त्या बर्फावर.

असाच त्या दिवशी, रविवार होता बहुतेक. घरात एकटाच होतो. दुपारचं जेवण झाल्यावर सहज खाली चक्कर मारायला उतरलो. रखरकाट होता नुसता. रस्त्यांच्या बाजूला पार्क केलेल्या गाड्यांचे पत्रे गरमजाळ ओकत होते. मधेच एखादी आईबापडी आपल्या मुलाला त्याच्या डोक्यावर स्वताचा पदर धरून सावलीतून चालवत होती. रात्र नकोशी करणारे कुत्रे कुठे गाडीच्या खाली तर कुठे ओली रेती ऊकरून उगाच पहुडले होते. गुरं सावलीला रवंथ करत होती. मधेच एखादी ललना कोक पीत जात होती. भाजीवाले गाड्यांवर कापडं अंथरून बाजूलाच आडवे झाले होते. इतर आयांनी मात्र लेकरांना बुकलून, उन्हांत बाहेर जायचं नाही याची तंबी दिली असावी. कारण कोणीच दिसलं नव्हतं.

असाच झाडाच्या सावलीत बसलो असतांना, धूळवड माजली. वारा बेभान रूप धारण करायला लागला. त्याचा तो कोमट स्पर्शही सुखावहं वाटून गेला. पालापाचोळा आसमंताशी साद घालू लागला. सगळा परिसर धूळीने माखला गेला. भाजीवाले गाड्यांवरचे कापडं सावरण्यात गुंतले, रद्दीवाल्यांनी पेपरांचे गठ्ठे आत घेतले, आया त्यांच्या पोरांना घेऊन पटापटा चालू लागल्या, कुत्री काना-कोपर्‍यातून बाहेर आली. दोरीवरचे कपडे आत घेतले गेले. घरांच्या काचा बंद झाल्या....
दूरवर काळी रेघ दिसू लागली. आणि मनात एक आनंदाची लकेर उमटली.

घरांत झोपी गेलेली पोरं जागी झाली, वार्‍याच्या त्या जोरानं गुरांच्या गळ्यातल्या घंटा किणकिणल्या. कासावीस झालेले जीव बाहेर आले. आता वावटळ जाऊन सोसाट्याचा सुटला होता. मधेच कुठेतरी कुण्याच्यातरी घराचा दरवाजा धाड्कन बंद झाला. आसमंत काळा होऊन राहीला होता. ढग भरून आले होते. घरात झोपलेले आजोबा, टीव्हीसमोर रमलेली पोरं, जरा आराम मिळेल म्हणून नुकता अंग टाकलेली ती.. असे सर्वजण बाहेर आले. प्रत्येकाच्या चेहर्‍यावर एक आनंद दिसत होता. "त्याच्या" आगमनाचा.

कुठूनतरी ओल्या मातीचा गंध आला. काय वर्णावा तो क्षण.. आज्जीबाई मग दळायला बसली. नुसत्या त्या क्षणाने सर्वांग मोहरून गेलं. अचानकशी “कडाड…काड”करुन वीज कडाडली. ती दचकली आणि सावरलीही. तिने माझ्याकडे पाहिले. दोघेही मनातल्या मनात काहीतरी आठवून एकदम हसलो. बाकावरचा उठून तिच्याकडे जाईस्तोवर हातावर पाण्याचा थेंब पडल्याची जाणीव झाली. तसाच धावत तिच्याजवळ गेलो, तिचा हात हातात घेऊन गच्च धरला. एक मोठ्ठा श्वास भरून मग तिने आभाळाकडे पहिलं.. आणि टप् कन एक थेंब तिच्या गालावर पडला. आणि मग एकापाठोपाठ एक असे पडू लागले.

पहिला पाऊस. पोरं नाचायला लागली. आया एका कोपर्‍यात बसून न्याहाळू लागल्या. आजोबा उगाच आपले हात मागे बांधून फेर्‍या घालायला लागले. आम्हीपण मग एका कोपर्‍याचा आडोसा घेतला. तिच्यासोबत पावसात भिजायचं होतं, कडाडणार्‍या विजा कानाचे पडदे फाटेपर्यंत ऐकायच्या होत्या, टपरीहून ओघळणारे पाणी हातात झेलायचे होते, साचलेल्या पाण्यात हळूच एकमेकांवर पाणी उडवायचं होतं, भुट्टे खायचे होते, बाईकवर कोणाच्या अंगावर पाणी उडतंय याची तमा न बाळगता उंडारायचं होतं (आम्हीही कोणाच्यातरी मागे असूच ना). आणि मग घरी आल्यावर फक्कड आल्याचा चहा घेत बाल्कनीत तिच्या आवडीची गाणी ऐकत बसायचं होतं....

मग दुसर्‍या दिवशी हट्कून ऑफिसला टांग द्यायची. परत घराबाहेर कुठेतरी पडायचं. कीतीही सावरलं तरी तो ओलं करणारंच.. मग कशाला सावरायचं. अशाच मग एखाद्या लेक पॉईंटवर जायचं, चिंब भिजलेल्या तिच्या खांद्यावर हळूच आपला हात ठेवावा.... ती मग लाजेल. पण तो स्पर्शही एक सुखद उबदार असेल.
तिच्या नजरेत नजर अडकवून मग तो क्षण मनसोक्त जगावा... बास्.
याच तर थोड्या अपेक्षा आहेत माझ्या, आणि त्यासाठीच तर त्याचं आगमन झालंय.

चला तर मग. चार महिन्यांसाठी साहेब आलेत. मुक्काम जोरदार असेलंच यात शंका नाही.
घ्या मनसोक्त भिजून.....

गुलमोहर: 

मस्त. ओलचिंब वाटल वाचून.. आमच्याकडे नस्तो बुवा ४ म्हनै. मुश्किलीने १-१.५ म. तेही अधुन्मधून.. असो.

किती सुंदर वर्णन केलंस रे.......
पण किती दिवस झालेत, या बाबानं कुठे दडी मारलीये कळत नाहीये.........

घरांत झोपी गेलेली पोरं जागी झाली, वार्‍याच्या त्या जोरानं गुरांच्या गळ्यातल्या घंटा किणकिणल्या. कासावीस झालेले जीव बाहेर आले. आता वावटळ जाऊन सोसाट्याचा सुटला होता. मधेच कुठेतरी कुण्याच्यातरी घराचा दरवाजा धाड्कन बंद झाला. आसमंत काळा होऊन राहीला होता. ढग भरून आले होते...

>>>>

मस्तच.. घेऊन गेलात त्या वातावरणात.. Happy

धन्यवाद मंडळी.
अभिषेक, तुमची : "......... परत हीचा फोन" काही दिवसांपूर्वीच वाचून झालिये.
अप्रतिम लेखन बादवे. Happy