भटकंती-२

Submitted by इन्ना on 5 June, 2012 - 01:41

भटकंती आणि टूर ह्या दोन शब्दांत एक फरक आहे.

कुठे जायचं? कसं जायचं? किती दिवस? काय काय करायचं? खाण्यापिण्याची सोय काय? आधी जाऊन आलेलं आहे का कोणी? थोडक्यात, परीटघडीचा प्रवास म्हणजे टूर.

अस्मादिक भटकंतीवर जास्त विश्वास ठेवणारे. एकदा कुठे जायचं आणि किती दिवस ते ठरलं, की बाकीचं जसं समोर येईल तसं. माणसं भेटायला हवीत, तिथलं खाणं पिणं, गाणं, इतर कल्चर, इमारती, त्यावरुन होणारी त्या गावाची ओळख, सार्वजनिक ठिकाणं, पार्क्स, म्युझियम्स, रेल्वे, ट्राम, त्यामधे दिसणारी तिथली जनता, त्यांचा पेहराव , लोकल ते ग्लोबल फुटट्टीवर त्यांचा नंबर शोधणं हे माझे आवडते विषय.

नशिबाने माझ्या कामाचं स्वरुप असं आहे की भटकण्याची हौस पुरेपूर भागते. ह्या सगळ्या भटकंतीमध्ये बरेच चित्रविचित्र, मजेशीर, उद्बोधक(?) अनुभव आलेत, येतात. ते सगळं लिहावं असं ठरवलं. अर्थात, माझ्या भटकण्यासारखंच लिखाणही परीटघडीचं नाही, गबाळं आहे. माझा, "अबकचा प्रवास" या थाटात लिहिण्यापेक्षा आडवे छेद देऊन, मला जगभर (माझं जग बरंका, हे फारच लहान आहे.) भेटलेली माणसं, माझी खाद्ययात्रा, विविध छोट्या मोठ्या गावातले चौक, अनुभव असं मांडते.
______________________

या भागात, तुमच आणि आमच सेम असत.

_______________________

१० -१२ वर्षांपूर्वीची गोष्ट. पुणे हैद्राबाद प्रवास, ट्रेनमधून. सहप्रवाश्यांमध्ये एक पुणेकर आज्जी, त्यांची सून, नातू - वय वर्ष १४-१५, एक कानडी कुटुंब. इतर सोलापूरला उतरणारी गर्दी. माझी ३ वर्षांच्या लेकाला सोडून प्रवास करण्याची पहिलीच खेप. दौंडपर्यंत पोचेतो तुम्ही कोण, आम्ही कोण, कुंडल्या मांडून झाल्या होत्या. रीतसर गप्पा रंगल्या होत्या. बराच वेळ गप्प असलेल्या आज्जींनी एकदम रॅपिड फायर सुरु केलं.

"तू आर्किटेक्ट आहेस ना?"

"हो आज्जी, ४ वर्षं झाली, आता माझी प्रॅक्टीस करते"

"किती दिवस आहे काम?"

"दोन दिवस काम आहे, मग मी जुनं हैद्राबाद पहाणार आहे एक दिवस जास्त थांबून"

"कामासाठी ठीक आहे पण भटकायला पण जातेस बाहेरगावी? पोराला, नवर्‍याला टाकून?" पोराला, नवर्‍याला टाकून??? मी थक्क!!

मग आजी म्हणाल्या, "तसं कौतुक वाटतं तुम्हां आजकालच्या पोरींचं, आमच्या वेळी नवर्‍यावर मुलांची जबाबदारी टाकून बाहेरगावी जाणं अशक्य होतं."

मग पुढे रीतसर सासू काय करते, मुलाला सांभाळते का? हैद्राबादला एकटीने जायला घरची परवानगी असते का? -हैला! अशी परवानगी मागायची असते, हे पण माझ्या डोक्यात आलं नव्हतं! - नवरा काय करतो, मुलगा किती वर्षांचा, घरी अजून जबाबदारी काय? -म्हणजे गोतावळा किती मोठा, असं विचारायचं होतं बहुतेक! - सणवार करतेस का नाही? असा इंटरव्ह्यू झाला.

मला झाल्या गप्पांची मौज वाटली. आजीबाईंना भोचक चौकशा करायच्या होत्या. थोडं कौतुक, थोडी असूया होती, आमच्यावेळी आणि आजकाल अशी तुलना होती. कामासाठी ठीक आहे, पण भटकण्यासाठी एकटं जाण्यावर चक्क आक्षेप होता.

***

गेल्या वर्षी मी आणि माझी मैत्रीण बेल्जियम आणि नेदरलॅंड पहायला गेलो होतो. फक्त मुंबई ते ब्रुसेल्स आणि परत, ह्या प्रवासाच्या तारखा नक्की होत्या. बाकीचं आवडेल तसं पहायचं असं ठरवलं होतं. यूथहोस्टेलमध्ये रहायचं, सायकली भाड्याने घेऊन गावभर फिरायचं. त्या त्या गावात खास, ते खायचं, वगैरे. तिचा आणि माझा नवरा टूर कॅटॅगरीत मोडणारे, त्यामुळे त्यांना आणि मुलांना न घेता आम्ही दोघीच प्रवासाला निघालो होतो.

अ‍ॅंटवर्प ते ब्रुसेल्स, ट्रेनचा प्रवास. समोर एक बेल्जियन आज्जी. माझी मैत्रीण फ्रेंच उत्तम बोलते, त्यामुळे हळूहळू गप्पा सुरु झाल्या .

पहिला प्रश्न. "तुम्ही दोघी मैत्रिणी.. म्हणजे..?"

"नाही, आमच्या दोघींचे आपापले नवरे आणि मुलं आहेत. फक्त इथे बरोबर नाहीत."

मग आजीबाईंची कळी खुलली. पुढच्या गप्पा सुरु. ह्या शेतकरीणबाई लेकीकडे निघाल्या होत्या. शेतकरी काका मागच्या सीटवर .

"मग अश्या मुलाबाळांना सोडून दोघीच का फिरताय... ?"
घरी कोण कोण असतं? नवर्‍याने स्पॉन्सर केलं का तुम्ही कमावता? मुलं काय करतात... ?"

मैत्रिणीला म्हटलं, त्यांचं आणि आपलं अगदी सेम असतं नै? Happy

ॠनि- माबोकरिण शैलजा चे मुशो बद्दल आभार.

गुलमोहर: 

.

अस्मादिक भटकंतीवर जास्त विश्वास ठेवणारे. >>>> ही भटकंती भारी दिस्तेय.....
हे छानच आहे, पण अजून वाचायला आवडेल....

मस्तच लिहिलं आहेस Happy
त्यांचं आणि आपलं अगदी सेम असतं नै? >> अगदी अगदी. जपानी आज्ज्यांचं आणि आपलं पण सेमच असतं असा अनुभव आलाय.
एकटीने जायला घरची परवानगी असते का? नवरा काय करतो? मुल किती वर्षाचं? घरी जेवण कोण करणार? Wink टिपिकल प्रश्न संच .

शैलजा शेवटच्या वाक्याचं मुशो केलेलं नाहीयेस ते कळतय.... Happy

पुढील भागांच्या प्रतिक्षेत...

लेखात आधीच्या आणि पुढच्या लेखाची लिंक द्यावा की.. शोधाशोध कमी करावी लागते..

धन्यवाद लोक्स!
हिम्स्कुल , कळल ना कित्ती काम कराव लागलय शैलजा ला.
दाद , तुझी दाद पाहुन अपुन तो खुश ! आपुन पंखा है तुम्हारा! Happy

मस्तच इन्ना. ही लेखमाला राहुनच गेली होती.
आणि हो, सईचे धन्यवाद, कशासाठी ते वेगळे सांगायला नकोच ! Wink