एकटेपणा व स्वातंत्र्य

Submitted by SuhasPhanse on 2 June, 2012 - 03:49

एकटेपणा व स्वातंत्र्य
स्वातंत्र्य आणि एकटेपणा म्हंटलं की मला निर्जन बेटावर अडकलेल्या खलाशाची आठवण होते. पण एकटेपणा अनुभवण्यासाठी निर्जन बेटावर जायला नको. लोकांनी वेढलेला माणूससुद्धा एकटा असू शकतो कारण एकटेपण ही मानसिक अवस्था आहे.
स्वतंत्र म्हणजे बंधनमुक्त! कोणावरही अवलंबून नसणे म्हणजे स्वतंत्र! कशाचीही जबाबदारी नसणे म्हणजे स्वतंत्र! काहाही बांधिलकी नसणे म्हणजे स्वतंत्र! स्वतंत्र माणूस टांग्याचा घोडा नसतो; खुंट्याला बांधलेला बैल नसतो. नोकरदार माणूस स्वतंत्र नसतो का? नऊ ते पाच जबाबदारी संभाळली की उरलेला वेळ स्वतंत्र असतो. कुटुंबवत्सल माणूसही जबाबदारी पार पाडली की स्वतंत्रच असतो. थोडक्यात म्हणजे निर्विवाद स्वातंत्र्य असूच शकत नाही. जिवाला शरीराचं बंधन स्वीकारावंच लागतं.
स्वातंत्र्यवीर अंदमानमध्ये शरीराने बंदी होते पण मनाने स्वतंत्र होते. एकटॆपणासारखी स्वातंत्र्य ही पण मानसिक अवस्था आहे. स्वातंत्र्याचा आणि एकटेपणाचा आपण संबंध जोडतो तेव्हां आपण परस्पर विरोधी मानसिक अवस्थांचा उल्लेख करीत असतो.
एकटेपणाच्या विरुद्ध दुकटेपणा आहे. एकटेपणा घालविण्यासाठी आणखी एका व्यक्तीची आवश्यकता असते. इंग्रजी म्हण सांगते की ’टू इज अ कंपनी ऍन्ड थ्री इज अ क्राउड’ एकटेपणा जाण्यासाठी दोन व्यक्ती नुसत्या एकत्र येऊन चालत नाही तर त्यांच्या मनाच्या तारा जुळाव्या लागतात. ही क्रिया दोनहीकडून व्हावी लागते. साखर आणि वाळूच्या मिश्रणात दोनही घटक एकटेच राहतात. मनाच्या तारा जुळणे म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजन अणूंनी एकत्र येऊन पाण्याचा मॉलिक्युल बनणे होय. रसायन शास्त्रात अशा बांधिलकीला केमिकल बॉन्ड म्हणतात. बांधिलकी शिवाय मनाच्या तारा जुळणे शक्य नाही. एकटेपणा नको असेल तर दुसऱ्याच्या मनाशी जुळवून घ्याव लागतं. स्वातंत्र्याच्यी व्याख्या थोडी संकुचित करावी लागते. व्यवहार साधावा लागतो. काही दिल्याशिवाय काही मिळत नाही, हे सत्य पचवावे लागते.
या देण्या-घेण्याच्या व्यवहारातूनच प्रजननाची क्रिया घडावी, या हेतुने परमेश्वराने प्राणिमात्रात नर-मादी असे परस्परपूरक लिंगभेद निर्माण केले. प्रजनन व्हावे म्हणून शारीरिक आकर्षणाचीही व्यवस्था देवाने केली. शारीरिक दुकटेपण काही क्षणांचे. मानसिक मिलन ही वैयक्तिक आवश्यकता असे समजूने देवाने ही बाब प्रत्येक व्यक्तीवर सोडून दिली.
स्वत:च्या अस्तित्वासाठी मानवाने देवाने दिलेल्या बुद्धीचा उपयोग करून ’एकतेमध्ये शक्ती’ या म्हणीला जन्म दिला. सामाजिक शांतीसाठी विवाहसंस्था निर्माण केली. नर-मादीने एकत्र येऊन प्रजनन करण्यासाठी कायदेशीर व्यवस्था केली. पण संरक्षण आणि उदरभरणासाठी लागणारी शारीरिक शक्ती पुरुषाकडे असल्यामुळे स्त्रीला पुरुषाचे दास्यत्व पत्करावे लागले. गुराढोरांप्रमाणे स्त्री पण पुरुषाची संपत्ती समजण्यात आली. पुरुष श्रीमंत झाला पण एकटा पडला. एकटेपणा घालविण्यासाठी तो आपले स्त्रीधन वाढवू लागला. बहुपत्नीत्वाची प्रथा एकटेपणातूनच निर्माण झाली. स्त्रीचं मन जिंकण्यामध्ये जीवनाचा खरा आनंद आहे, हे समजलेला पहिला पुरुष प्रभु रामचंद्र असावेत. एकपत्नीव्रतामागचं रहस्यही यातच दडलेलं असावं.
एकटेपणा घालविण्याने मिळणारा आनंद किती आणि केवढा मोठा आहे हे समजण्याइतका शहाणपण सर्वांनाच असतं असं नाही. अर्वाचिन युगातल्या लोकशाहीमध्ये स्त्री पुरुषासमानच लेखली जात असतांनाही आर्थिक परावलंबत्वामुळे स्त्रीला उपभोग्य संपतीच समजल्या जाते. असे समजणारे पुरुष एकटेपणाच भोगीत असतात. तो घालविण्यासाठी दारू, छंद, आणि कामामध्ये बुडून जाण्याचा अयशस्वी प्रयत्न करतात.
पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रीला समजून घेणाऱ्या पुरुषाला ’जोरू का गुलाम’ म्हणून हिणविल्या जाते. पण जीवनाचा खरा आनंद मिळवायचा असेल तर काही किंमत तर मोजायला पाहिजे, नाही का!

गुलमोहर: