साक्षात्कार

Submitted by UlhasBhide on 31 May, 2012 - 11:04

ही कथा पूर्णत: काल्पनिक आहे. कथेतील पात्रेही काल्पनिकच आहेत हे वेगळे सांगणे नलगे.

साक्षात्कार

हिमालयाच्या पायथ्याजवळच्या सुखद, रम्य, शांत वातावरणात वसवलेला स्वामीजींचा विशाल मठ आणि त्याला शोभेसं सुंदर मंदिर. मार्बल-ग्रॅनाईटचं फ्लोरिंग, गुळगुळीत खांब, संपूर्ण परिसरात जोपासलेल्या सुंदर बागा ..... अतीशय रम्य वातावरण.

स्वामीजी : प्रकांड पंडित. वेद, प्राचीन अर्वाचीन साहित्य, इतकंच नव्हे तर प्रगत विज्ञान, आंतरराष्ट्रीय घडामोडी इ.इ. चे गाढे अभ्यासक, जाणकार असं अत्यंत तल्लख बुद्धीमत्तेचं एक वलयांकित व्यक्तिमत्व.

आज स्वामीजींच्या वैयक्तिक भेटीचा दिवस. भविष्य, अडचणींवर उपाय इ.इ. गोष्टींसाठी आज मोठ्या संख्येने भक्त जमा झाले होते. स्वामीजींनी सांगितलेलं भविष्य खरं ठरतं, त्यांनी सुचविलेल्या उपायांमुळे अडचणी दूर होतात यावर भक्तांचा प्रचंड विश्वास. स्वामीजींच्या भेटीनंतर भक्तांनी मठ, मंदिर इ. साठी भरघोस देणगी द्यायचा अलिखित प्रघात.

मुख्य प्रवेशद्वारापाशी सुरक्षारक्षकांनी तपासणी केल्यानंतर समीरची टुरिस्ट बस भल्यामोठ्या पार्किंग लॉटमध्ये गाड्यांच्या गर्दीत उभी राहिली. बसमधून उतरून आवारातील साधकांची वर्दळ, भक्तांच्या रांगा ओलांडत तो स्वामीजींच्या मठाकडे निघाला.

जागोजागी लावलेले सुरक्षारक्षकांचे आणि शिष्य, साधकांचे फिल्टर पार करत; समीर भेटीच्या कक्षापर्यंत पोचला. कक्ष कसला, एक प्रशस्त दिवाणखानाच तो. मंद प्रकाश, सुगंधी उदबत्त्यांचा दरवळ असं काहीसं भारलेलं वातावरण आणि एका सुशोभित उच्चासनावर भगवी वस्त्रं परिधान करून बसलेली स्वामीजींची तेजोमय मूर्ती. आजूबाजूला मोजकेच शिष्य.

एका शिष्याने समीरला स्वामीजींसमोर आणून उभं केलं आणि विचारलं,
"काय समस्या आहे तुमची ?"
"भविष्य विचारायचंय." .... समीर.
"ठीक आहे. देणगी आणि कुंडलीचा कागद स्वामीजींच्या पायापाशी ठेवा" ... शिष्य.
समीरने स्वामीजींच्या पायावर डोकं ठेऊन देणगीदाखल आणलेली नोटांची पुडकी त्यांच्या पायापाशी ठेवली.
"कुंडलीचा कागदही तिथेच ठेवा".... शिष्य.
"तो तिथे नाही ठेऊ शकत." .... समीर.
"तिथेच ठेवायला हवा, नाहीतर...." समीरने त्या शिष्याच्या दिशेने हात उंचावून ’थांब’ अशी खूण करत, एका लिफाफ्यातून तो कागद काढून स्वामीजींसमोर धरला.
समीरच्या तशा वागण्यामुळे स्वामींची चर्या क्रोधित झाली होती; परंतु त्या कागदाकडे नजर जाताच त्यांच्या चेहर्‍यावरचे भाव बदलत गेले.... खरं तर चर्या उतरलीच म्हणा ना ! चेहर्‍यावर पुनश्च शांत-गंभीर भावांची कशीबशी जमवाजमव करत स्वामीजींनी तो कागद हातात घेतला आणि समीरला “खाली बस” असं हातानं खुणावलं. भक्ताने उभं राहूनच स्वामीजींशी चर्चा करायची हा अलिखित दंडक स्वत: स्वामींनीच मोडला !!
सर्व शिष्य गोंधळात पडले. काही क्षण शांतता पसरली.

"नांव काय तुझं ?" ... स्वामीजी.
"समीर. समीर विक्रांत भोसले"
"व्यवसाय ?"
"अमेरिकेतील एका सॉफ्टवेअर MNC मधे इंजीनिअर आहे मी.”
"विवाहित ?"
"हो. मी, बायको आणि ५ वर्षांची मुलगी अमेरिकेत असतो. महिनाभर रजा घेऊन भारतात आलोय."
"तिथेच रहायचा विचार आहे ? की ..."
"नाही. शक्य तितक्या लवकर भारतात परत यायचंय."
"बरं..... इथे कोण असतं तुझं ?"
"आई"
"आणि वडिल ?"
"कारगिल युद्धात शहीद झाले."
…… एखादी प्रतिक्षिप्त क्रीया व्हावी तसे स्वामीजी ताड्क्न उठून उभे राहिले.
ते पाहून समीर देखील उभा राहू लागला.... स्वामीजींनी त्याला “बसून रहा” असे खुणावले. स्वामीजींच्या हातात कुणाची कुंडली आहे या उत्सुकतेने शिष्यांच्या डोक्यातल्या गोंधळाला पारावार राहिला नाही.

"ईश्वर मानतोस ?" .... काही क्षणांच्या शांततेचा भंग करत स्वामीजींनी विचारलं.
"हो तर. अमेरिकेत देखील आम्ही गणेशोत्सव साजरा करतो. तिथेही रोज थोडक्यात का होईना पण पूजा करतो देवाची."
"देव्हार्‍यात याचीही प्रतिमा आहे तुझ्या ?" .... त्या कागदाकडे निर्देश करत स्वामीजींनी विचारलं.
"नाही. बाकी देव दिसत नाहीत, त्यामुळे प्रतिमेत पहावे लागतात. पण हा तर दिसतो, सदैव मनात वसतो.... प्रतिमेची काय गरज ?" ….. मंद स्मित करत समीर उद्गारला.
स्वामीजींच्या चेहर्‍यावरचे भाव सतत बदलत होते. आश्चर्य, गहन प्रश्न, एक प्रकारची बेचैनी भंडावत असल्यासारखी त्यांची मुद्रा आणि डोळ्यात तरळलेलं पाणी लपवू शकत नव्हते ते.

"हं..... पण घरातल्या कुणाच्या भविष्याबद्दल न विचारता, याचंच भविष्य तुम्हाला का विचारावसं वाटलं ?" ..... काहीशा रुद्ध स्वरात स्वामीजींनी विचारलं. त्यांच्याच नकळत त्यांनी समीरला ’तू’ ऐवजी ’तुम्ही’ संबोधलं हेही त्यांच्या लक्षात आलं नाही.
"स्वामीजी ! आम्ही अतिसामान्य. आमच्या भविष्याचं काय हो ? असलो/नसलो काय फरक पडणार आहे ? तसाही भविष्यावर माझा फारसा विश्वास नाही. आणि त्यातून आमच्यासारख्या अतिसामान्यांचं भविष्य सांगायला, अडचणींवर उपाय सुचवायला गल्ली-बोळातले कुडबुडे पुरेसे आहेत. पण याच्या भविष्याची चिंता वहायला तुमच्यासारखाच कोणी हवा ना !" …. स्वामीजींच्या चेहर्‍यावरचे भाव वाचत समीर उद्गारला.

……. स्वामीजी नि:शब्द !!!!! .......

"बरं.... येऊ मी ?" .... अचूक शरसंधानाची खात्री पटल्याने समीरने विचारले.
"अहो पण.... ते .... भविष्याचं.... काय ?" .... समीरकडे पहात शिष्य चाचरत चाचरत पुटपुटला.
"भविष्य ! भविष्य आपण सर्वांनी मिळून घडवायचंय" असं म्हणत समीर स्वामीजींच्या पायावर डोकं टेकायला वाकला..... स्वामीजी झटकन दोन पावलं मागे सरकले.

त्यांना दुरूनच वंदन करून समीर वळला आणि बाहेर चालू लागला.....

पाठमोर्‍या समीरकडे आणि हातातल्या भारताच्या नकाशाकडे पाह्ताना स्वामीजी दिग्मूढ झाले होते.
डोळ्यातून घळघळा वाहणारे अश्रू त्यांना थोपवणं शक्य होत नव्हतं; किंबहुना त्यांना ते थोपवावे असं वाटतच नव्हतं.

जीन्स आणि टी-शर्टातल्या एका सामान्य कर्मयोग्याने भगव्या वस्त्रातल्या संन्याशाला खर्‍याखुर्‍या देवाचा साक्षात्कार घडवला होता......समाधिस्थ होऊन, अंधारात देव चाचपडण्यापेक्षा डोळे उघडे ठेऊन देशात, समाजात देव पहावा; समाजाभिमुख होऊन स्वतःत आणि समाजात सामाजिक जाणीवा रुजवाव्यात ही दीक्षा दिली होती.

.... उल्हास भिडे (३१-५-२०१२)

गुलमोहर: 

उल्हासजी

कथा खरोखर खिळवून ठेवणारी आहे. कशाचं भविष्य ही उत्कंठा राहते.

पण एक शंका आहे. (कथेत घेतलं जाणासं स्वातंत्र्य मान्य करूनही ) जर भविष्यावर विश्वास असेल तर अशा प्रकारे भारताचा नकाशा घेऊन जाण्याने स्वामीजींचा उपमर्द होत नाही का ? त्यासाठी त्याने इतक्या लांब यावं का ?

छान लिहिले आहे.. पण.....
ते सुरुवातीला काल्पनिक टाकायची गरज नव्हती.. आज एखाद्याला असा साक्षात्कार होणे ही गोष्ट नक्कीच कवीकल्पनाच आहे हे समजू शकतो आम्ही..

सर्वांना धन्यवाद.
--------------------------------------------------------------------------------------------------------------
आश्विनी,
स्मायली हा प्रतिसाद एखाद्या स्वामीच्या गूढ स्मितासारखा वाटतो.... Proud
नक्की काय म्हणायचंय ते कळत नाही.
---------------------------------------------------------------------------------------------------------------
किरण,
स्वामीजींमध्ये घडणारे बदल पाहून समीर भविष्य न विचारताच निघून गेला.... यातचं सर्व आलंय.
ही गूढ कथा नाही.... Happy

उल्हासकाका Happy
कथेतले स्वामींच्या मठाबद्दलचे तपशील ( मार्बल फ्लोअरिंग, देणग्या वगैरे ) वाचून समीर उपहासाने/ स्वामींची फिरकी घ्यायला पत्रिका दाखवतोय का असं वाटलं. पण त्याने काय साध्य होणार ? शिवाय कथा पुढे वाचताना तसं वाटलं नाही. त्याचा भविष्यावर विश्वास असावा असं वाटलं. शेवटच्या वाक्याचा अर्थ नीटसा कळला नाही. एकंदरीत कथेत गोंधळ वाटला पण कल्पना चमकदार वाटली म्हणून ती स्माईली.
स्पष्ट प्रतिक्रियेबद्दल राग नसावा ही विनंती Happy

अगोला अनुमोदन.

मात्र अशी कथा घडू शकते. बंकिमचंद्रांच्या आनंदमठ कादंबरीत एक संन्यासी दुसर्‍या (वयस्कर) संन्याशाला आपण संन्यासी कसे बंधविरहित आहोत ते वर्णन सांगत असतो. तो म्हणतो की आपल्याला आई, बाप, भाऊ, बहीण कोणी नाही. तर दुसरा संन्यासी म्हणतो की, अरे, आपल्या सर्वांची एक आई आहे. तिचं नाव भारतमाता. आणि वंदे मातरम्‌ गाणं सुरू होतं.

साधारण अशीच घटना इथे दाखवलीये. मात्र इथे भारताचा संबंध येत नाही. गुरूकडे जाणारा तरुण स्वत: उच्च कोटीतला आहे.

-गा.पै.

उल्हास, "स्वामीजींमध्ये घडणारे बदल पाहून समीर भविष्य न विचारताच निघून गेला.... यातचं सर्व आलंय." हे तुमचं स्पष्टीकरण आणि "आमच्यासारख्या अतिसामान्यांचं भविष्य सांगायला, अडचणींवर उपाय सुचवायला गल्ली-बोळातले कुडबुडे पुरेसे आहेत. पण याच्या भविष्याची चिंता वहायला तुमच्यासारखाच कोणी हवा ना." आणि "जीन्स आणि टी-शर्टातल्या एका सामान्य कर्मयोग्याने भगव्या वस्त्रातल्या संन्याशाला खर्‍याखुर्‍या देवाचा साक्षात्कार घडवला होता" ही कथेतली वाक्ये मेळ खात नाहीत.
देशाच्या भविष्याची चिंता...... ही चमकदार कल्पना म्हणजे शेवट आधी सुचला आणि त्यासाठी हा प्रसंग योजला, जो तितकासा जमला नाही असे वाटले.

"स्वामीजी : प्रकांड पंडित. वेद, प्राचीन अर्वाचीन साहित्य, इतकंच नव्हे तर प्रगत विज्ञान, आंतरराष्ट्रीय घडामोडी इ.इ. चे गाढे अभ्यासक, जाणकार असं अत्यंत तल्लख बुद्धीमत्तेचं एक वलयांकित व्यक्तिमत्व."हे सुरुवातीचे वाक्य फारच अतिरंजित वाटलं, पण कथेच्या शेवटाशी त्याचा संबंध जुळला तरी अशी व्यक्ती पैशाच्या थप्प्या घेऊन भविष्य सांगायचा धंदा, तेही कुंडली पाहून, का करेल ते कळले नाही.
कथा वाचत असताना त्या तरुणाचे वडील कारगिल युद्धात शहीद झालेले नसून लापता झाले असावेत आणि तेच स्वामीजी असावेत असे वाटत होते. तर पुढे भलतेच वळण आले.

आधी 'संगमरवर' हा सुंदर मराठी शब्द न वापरता मार्बल लिहून पुढे 'भेटीचा कक्ष' हे कृत्रिम मराठी कसे लिहिलेत?

आवडली Happy

कल्पना छान आहे.
पण हिमालयातला संगमरवरी मठ किंवा पैसे घेऊन भविष्य सांगणे आणि प्रकांडपंडीत असणे हे एकमेकांशी मेळ खात नाहीये असे वाटते.

उल्हासकाका

पहिलीच कथा आहे तुमची. आशय पोहोचला. सादरीकरण खूपच उत्कंठावर्धक होतं. तुम्ही लिहीत रहा काका... मी वाचणार नक्की