समजा तुमच्या अंगात आलं....

Submitted by धुंद रवी on 30 May, 2012 - 00:48

विसंगती जोपर्यंत विसंगती असते तोपर्यंतच मजा असते,
ती वास्तवाकडे सरकली की शोकांतिका होते.

चाळीत खालच्या मजल्यावरुन कोणीतरी कोणालातरी बदकल्याचा आवाज झाला आणि त्यानंतर "आई..आई..आई.... ओय..ओय..ओय" असे व्हिवळोद्गार ऐकु आले. कोणी नवरा आपल्या बायकोला मारत होता असं तुम्हाला सांगितलं तर काही प्रतिसाद न देता तुम्ही पुढे ऐकायला लागाल. तुम्हाला त्यात विशेष काही वाटत नाही. पण बायकोनी नव-याला हाणला असं म्हणालो तर लगेच दात काढाल. कारण विसंगती.
बोंबलेच्या घरात ही विसंगती वास्तवाच्या जवळ सरकली असावी... नव्हे, ते व्हिवळणं ऐकता त्या विसंगतीनी वास्तवाच्या पेकाटात लाथ घातली असावी बहुतेक.

बोंबल्याला कोणीतरी कुदलावं, अशी माझी फार दिवसांपासुनची इच्छा होती आणि ती मी ब-याच जणांकडे बोलुन दाखवली होती. मागे एकदा तो कुत्र आहे असं वाटत असताना (म्हणजे त्याला वाटत असताना, मला नाही) त्यानी माझ्या चपला पळवुन नेल्या होत्या आणि चिंध्या करुन आणून दिल्या होत्या.) त्याच्या बायकोचीही हीच सुप्त इच्छा असणार. म्हणजे माझ्या चपलांच्या चिंध्या कराव्यात ही नाही, तर बोंबल्याला कुदलण्याची.

पण इच्छा आणि सुप्त इच्छा यात फरक असतो. इच्छा कोणालाही सांगता येतात आणि त्या पुर्ण होऊ शकतात.... पण एखादं माणुस आपल्या कितीही जवळचं असलं तरी ते जवळंच असतं, आपल्या आत नसतं. त्यामुळे आतल्या सुप्त इच्छा त्यांनाही सांगता येत नाहीत आणि पुर्णही होत नाहीत. तरीही ते मनातल्या मनात जगत राहण्यात पण एक आनंद असतो. सुप्त आनंद.

कोणाला काय सुप्त इच्छा असतील सांगताच येणार नाही.
‘फुसपांगे काकांना दारु पिऊन सरळ रेषेत चालायचय’ हे त्यांनी बाटलीला सांगताना मी ऐकलय.
एकदा ढमढेरे बाईंना त्यांच्या घराबाहेरच्या डालडा तूपाच्या डब्यातल्या निवडुंगाशी बोलताना ऐकलं की ‘त्यांना चवळीच्या शेंगेसारखं सडापात्तळ व्हायचय.’
‘हिंदी पिक्चरची होरॉईन व्हायची इच्छा असल्याचं’ अडनावाला साजेशा भोपळे वहिनींनी देवानंदला सांगितल्याचं मी पहायलय. (देवानंदला म्हणजे मायापुरी मासिकातल्या.)
पण ह्या अशा किरकोळ इच्छांसोबत काही भयावह ईषणा असणारे पण चाळकरी पाहिले. म्हणजे आगलावे आज्जींना त्यांच्या यजमानांना चाळेच्या गच्चीवरुन खाली ढकलायचय... डोईफोडेंच्या कार्ट्याला गादीच्या दुकानात फटाक्याचा बाण सोडायचाय वगैरे...
हे आणखी असं बरंच काही.

उगाच कशाला कोणाला नावं ठेवा. माझी पण एक सुप्त इच्छा आहेच की. मला याची देही याची तोंडी एकदा देवाशी बोलायचय. हो डायरेक्ट देवाशीच. आणि बोलायचय म्हणजे काय तर एक विचारायचय. हेच की.... बायको बदलायची काही शक्यता आहे का? (बदलायची म्हणजे स्वभाव बदलायची, व्यक्ती नाही.) तर अशा काही इच्छा आणि सुप्त इच्छा एकाच वेळी पूर्ण होण्याचा एक जोरदार योग माझ्या आयुष्यात आला.

नुकताच कुठे बोंबल्याचं बोंबलण्याचा आस्वाद घेत पडलो होतो तर बायको पळत पळत आली आणि म्हणाली की "लवकर चला.... लवकर चला.... बोंबले वहिनींच्या घरी देवी आलीये."

कसल्याही बातम्यांवर विश्वास ठेवायला मी काही बोळ्यानं दुध पिणारा नाही. पण एकदा गणपती बाप्पांना फुसपांगे काकांकडुन दुध पिताना पाहुन मी कशावरही विश्वास ठेवायला लागलोय. त्यामुळे म्हंटल आली असेल देवी बोंबल्याच्या घरी. त्या बोंबलेसूराचा वध करायला आली असेल तर त्या आनंदाला मुकायला नको म्हणुन बायकोसोबत जोडीनी दर्शनाला गेलो. बोंबल्याच्या घरातुन पिवळा प्रकाश बाहेर पसरला होता. पिवळी हवा, पिवळी जमिन, पिवळे ढग.... सगळं सोन्याहुन पिवळं. मनात म्हंटलं की देवीच्या आभुषण आणि दागिन्यांचा प्रकाश असणार. आत घरात जायला लागलो तर घाबरुन माझी बोबडीच वळली. कारण दरवाज्यातुन एक बिबट्याच एकदम बाहेर यायला लागला. हो.... बिबट्या !!!

थोडा धक्क्यातुन सावरल्यावर बघितलं तर चाळीतला ‘सुक्या बोंबील’ त्या बिबट्याला पकडून पुन्हा घरात नेत होता. मला पहिल्या धक्क्यापेक्षा हा धक्का जास्त बसला. (सुक्या बोंबील हे त्याला चाळीनी प्रेमानी दिलेलं नाव. त्याचं खरं नाव सुकेश बाबेल आहे. पण त्याची तब्येत पाहुन चाळीनी त्याला ‘हिंदकेसरी सुक्या बोंबील’ अशी पदवी बहाल केलीये.)
देवीचा पाळीव बिबट्या असणार असं मानुन आत गेलो. सगळीकडे हळदीचे लोट, हळदीचे ढग, हळदीचा वास.... नुसता हळदीघाट झालेला.

त्या बिबट्याकडे पाहिलं तर तिसरा धक्का बसला. त्या हळदीच्या पिवळ्या थरामध्ये, आपल्या मुळच्या काळ्या रंगावर आणि उघड्या अंगावर मधे मधे काही जागा सुटल्याने बोंबल्याच बिबट्यासारखा दिसत होता. तो पळून चालला होता पण त्या हळदीच्या ढगातून एक आकाशवाणी झाली की "पकडा त्या चांडाळाला आणि माझ्यासमोर बसवा." चाळीतल्या उत्साही मंडळींनी त्या चांडाळ बिबट्याला उचलुन एका पाटावर आपटला. मग क्षणात एक हात आला आणि त्या हातानी मुठभर हळद बोंबल्याच्या तोंडावर उधळली.
(चाळीतल्या कोणीतरी आगाऊपणा करुन त्या हळदीत मोठी मोठी हळकुंड पण टाकलेली होती. ती टणाटण बोंबल्याच्या डोक्यात आदळली आणि तो पुन्हा व्हिवळला. त्याच्या डोळ्यात हळद गेलीये पाहुन कोणीतरी त्याला दोन गुद्दे घालुन वाहत्या गंगेत हात पिवळे करुन घेतले.)

तो वर गेलेला हात खाली आला त्याच बरोबर हळदीचा धुराळाही आणि मला चक्क देवीचं दर्शन झालं. काय वर्णन करु महाराजा...? सुमारे एक क्विंटल वजनाची... केस मोकळे सोडलेली एक बाई.... कपाळभर कुंकु, केसात गुलाल, तोंडात शिव्या, डोळ्यात राग, पोटात आग, हातात हळद, पायात बोंबल्या अशा अलौकीक अवस्थेत झुरळ अंगावर चढल्यासारखं सगळं अंग घुसळवत, जोरजोरात पिंगा घालत होती. तिच्या केसाचे फटके बोंबल्याच्या तोंडावर बसुन त्याच्या तोंडावरची हळद सगळीकडे उडत होती. त्या बाईच्या चेहरा जरा ओळखीचा वाटला. नीट निरखुन पाहिलं तर आठवलं की ही तर बोंबले वहिनींची आई. बायकोला म्हणालो की ‘देवी कुठय?’ तर तिनी पुन्हा वहिनींच्या आईकडेच बोट दाखवलं. म्हणजे बोंबले वहिनींच्या आईच्या अंगात देवी आली होती.

‘पण कशाला?’ असा प्रश्न मला पडतो-न-पडतो तोच बोंबल्याकडे हात दाखवुन देवी म्हणाली,
"ह्या चांडाळामुळेच सगळ्या चाळीवर संकट कोसळलय. भूकंप, ज्वालामुखी, वादळवारे, महापूर, ढगफूटी, वणवा, वादळ, दुष्काळ, महागाई, नळाला पाणी नाही... सगळं सगळं ह्या पाप्यामुळे. हा सुधारला तरच परिस्थिती सुधारेल." चाळीतल्या लोकांनी देवीचे पाय धरले आणि ‘काय दिलं’ म्हणजे देवीचा कोप होणार नाही, असं विचारलं. देवीच्या तीन मागण्या होत्या.
१. बोंबल्यानी माणसासारखं वागावं.
२. बोंबल्यानी मित्रांशी मारतो तितक्या गप्पा बायकोशी पण माराव्या.
३. बोंबल्यानी दारु, बिडी, थापा, आळस आणि स्वतःच्या आईच्या स्वैपाकाचं कौतुक सोडुन द्यावं.

चाळीच्या सर्व स्तरातून आणी घरातून आलेला सामाजिक दबाव... आणि हळकुंडाबरोबर ह्यावेळेस कोणीतरी ठेवलेल्या सुपा-यांचे घाव... यामुळे बोंबल्या आधीच पिवळा पडला होता. बोंबले वहिनींनी आईला दिलेली सुपारी त्यांच्या कामी आली आणि बोंबल्यानी सगळं करण्याचं बिनशर्त कबुल केलं. मी बायकोबरोबर जोडीनी देवीचं दर्शन घेऊन घरी निघालो. देवीजवळ बायको बदलण्याचा विषय काढला नाही.
ठीक आहे म्हणा.... तसंही इच्छा पूर्ण होत नाहीत तोपर्यंतच जिवंत राहतात.

आवाजात जरब आणुन "फार दिवस आई भेटली नाही" असं बायको म्हणाली तर कोणीतरी डोक्यात सुपारी मारल्यासारखं वाटलं. मी आता सुधारलोय... बदललोय.

तुमच्या अंगात आलं तर तुमच्या तीन मागण्या काय असतील असं ढमढेरे वहिनींना विचारलं तर म्हणाल्या,
१. कोणीतरी गरमागरम जेवणाचं ताट रोज हातात आणुन द्यावं.
२. साखरपुडा ते लग्नाचा पहिला वाढदिवस ह्याकाळात जसं मिस्टर ढमढेरे वागायचे तसंच त्यांनी कायम वागावं.
३. आईनी अधुनमधुन हळद घेऊन माझ्याकडे राहायला यावं.

ढमढेरे वहिनींचं तर ठरलय. पण तुमचं काय?
तुमच्याही मनात असं काही आहे का हो... जे बोलायचय पण बोलता येत नाही? करायचय पण करता येत नाही ? मागायचय पण मागता येत नाही? आणि आलीच देवी अंगात तुमच्या वतीनी बोलायला, करायला, मागायला तर काय कराल?

बोलुन घ्याल मनातलं.... जे होतं कधीचं बोलायचं?
का ठरवुन टाकाल मनामध्ये... कोणाला धरुन ठोकायचं?
पोहचवाल म्हणणं हळदीतून... जे शब्दातून नसतं कळालं?
मागाल असं खास काही... जे एरवी नसतं मिळालं?

कसं वागाल ? काय मागाल?
विचार करा. बघा.... काही सापडतय का उत्तर ते. माझा विचार अजुन चालुच आहे आणि तो पक्का झाला की कळवेनच....!

धुंद रवी.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

छान Happy
>>> बोलुन घ्याल मनातलं.... जे होतं कधीचं बोलायचं?
>>> का ठरवुन टाकाल मनामध्ये... कोणाला धरुन ठोकायचं?
>>> पोहचवाल म्हणणं हळदीतून... जे शब्दातून नसतं कळालं?
>>> मागाल असं खास काही... जे एरवी नसतं मिळालं?
>>> कसं वागाल ? काय मागाल?
>>> विचार करा. बघा.... काही सापडतय का उत्तर ते.

सोप्पे हे, मी मायबोलीवर येऊन खरडतो फक्त! Happy Wink

>>> विसंगती जोपर्यंत (अपवादात्मक) विसंगती असते तोपर्यंतच मजा असते,
>>> ती (नित्याच्या) वास्तवाकडे सरकली की शोकांतिका होते.
हे वाक्य महत्वाचे Happy
पण हेच वाचून लेखाच्या गाम्भिर्याची, विद्वत्ताप्रचुर शब्दच्छलाची खात्री (अन अर्थात भिती) पटून मी हा धागा सोडून निघुन जाणार होतो......! Proud

@ महेश..
मित्रा.. हे लिखाण विनोदी लेखन विभागात पोस्ट केलं नाहीये, हे ललित आहे. आणि ते विनोदाच्या अंगाने गेलं तरी तु म्हणतोस तसं त्याचा हेतु थोडा वेगळा आहेच. माझे जे लेख केवळ विनोदी आहेत त्याच्याशी याची तुलना होणारच नाही.
यासाठीच मागच्या लेखावर हे विनोदी लिखाण नाही असे स्पष्ट लिहले होते. हसत खेळत जाऊन थोडा विचारही देणारं ललित म्हणु शकशील.

सद्ध्याचे घेतलेले 'समजा...' या सदरातले प्रश्न टाईमपास आहेत पण पुढे खरच हलवुन जाणारे असु शकतील. उदा. समजा तुम्हाला तुमची मृत्युतारीख समजली किंवा समजा तुम्हाला आयुष्यातली एक चूक बदलायची झाल्यास.. आणि ह्याही प्रश्नात हसत्खेळत जाताना विचार द्यायचा विचार आहे.

मी विनोदी सोडून पण लिहतो मित्रा आणि ते जुन्या लेखांशी तुलना न करता वाचलस तर कदाचीत आवडतीलही. Happy

मस्त आहे.
Happy

सिरियस विचार पण विनोदाच आवरण चढवुन.

बाकि लोकहि त्याचा अशोक सराफ आणि लक्ष्या करु नका. Happy

व्वा! मजा आ गया.. तुमचं लिखाण फार भावतं.. त्यात निरिक्षण, विनोद बुद्धी, एक मस्त आणि विचार करायला लावेल असा विचार अशा सगळ्याचं उत्तम मिश्रण असतं... असेच लिहित रहा आणि आम्हाला आनंद देत रहा! मन:पूर्वक धन्यवाद!

तुमचा लिखाणाचा एक प्रामाणिक चाहता- नानुभाऊ Happy
==================

ठीक आहे म्हणा.... तसंही इच्छा पूर्ण होत नाहीत तोपर्यंतच जिवंत राहतात. >>

या वाक्या साठी उभं राहुन टाळ्या! Happy

>>मी विनोदी सोडून पण लिहतो मित्रा आणि ते जुन्या लेखांशी तुलना न करता वाचलस तर कदाचीत आवडतीलही.
ओके, आमचे बहुतेक येथेच चुकले. विपुमधेदेखील उत्तर लिहिले आहेच. धन्यवाद !

आवडलं हे ही.. Lol
एकदम लहानपण ची एक गोष्ट आठवली..एका मैत्रीणीच्या चुलत काकू च्या दरवर्षी अंगात येई.. त्या दिवशी ती (एरवी खाष्ट असलेल्या) सासू कडून पाया पडून घेई,त्यांना अद्धातद्धा बोलून घेई.. आम्ही त्या दिवशी हीच गंमत पाहायला त्यांच्या घरी जायचो..
इतर गर्दीही याचसाठी जमत असावी..अशी दाट शंका आली आता तुझं ललित वाचून !!

धुंद रवी,

काय वर्णन करु महाराजा...? सुमारे एक क्विंटल वजनाची... केस मोकळे सोडलेली एक बाई.... कपाळभर कुंकु, केसात गुलाल, तोंडात शिव्या, डोळ्यात राग, पोटात आग, हातात हळद, पायात बोंबल्या अशा अलौकीक अवस्थेत झुरळ अंगावर चढल्यासारखं सगळं अंग घुसळवत, जोरजोरात पिंगा घालत होती>>>>>>> मि तुमचा लेखनाचि खुप फ्यान झाले आहे, खुप छान लिहिता, धन्यवाद.

मस्त Happy

या विशयासि निगडीत एक अनुभव

गावि गेले असता काहितरी उत्सव होता, जवळ्पास १०-१५ बायकांच्या अंगात आले होते
सर्वजणी एकत्र देवळात जात होत्या तस्याच, मध्येच एकजण जागीच थांबली काहीकेल्या पुढे सरकेना
कोणालाच कळत नव्ह्ते काय झाले, सगळे टेंशन मध्ये कि देवी कोपलि कि काय
मध्येच कुणाचेतरी लक्श गेले कि जि एका जागी थांबुन झुलत होती तिच्या पायातील जोडवे निसट्ले होते व ति त्यावरच उभी होति
एकीने पुढे होउन ते उचल्ले तेव्हा ति चालु लाग्लि.

<< कसं वागाल ? काय मागाल? >> -
१] माबोवर अशा लिखाणाची रेलचेल होवो !
२] तिला लाखात एक नवरा मिळालाय हें माझ्या बायकोला
आतां तरी उमजो [ लग्नाला तीन तपं उलटलीं !]
३] चाळीच्या जीवनाची खमंग लज्जत कधीतरी 'फ्लॅट'वाल्यानाही
चाखायला मिळो.

Pages