कवितेवरील प्रतिसादासाठी १७ नियम (खुलाश्यासकट)

Submitted by धुंद रवी on 27 May, 2012 - 03:23

झेलतो छातीवरी तो... बोचरे प्रतिसाद सारे
टायीपले घाव ज्यांनी... विसरुनी माणुसकी !

ह्या माझ्या निवृत्त ओळी समस्त नवकवी माबोकर्स मित्रमैत्रिणींना अर्पण.... !

माबोकर्स हे संबोधन ‘अनेक माबोकर’ या अर्थाने आहे, ‘माबो Curse’ असे नव्हे. जगाला कितीही ‘शाप’ वाटला तरी कोणताही नवकवी हा फक्त ‘देवाने दिलेले वरदान’च असतो. फक्त तो गेल्यावर जगाला तसे वाटायला लागते.
हा एक Poetic Injustice आहे. (Poetic Injustice हा गंभीरतेने घ्यायचा विषय आहे. वरवर चाळुन फाडाफाडी करायला ती काही कविता नव्हे.)

आणखिन एक.. हे विनोदी लिखाण नाही. ही काही सळसळत्या कवींची भळभळती जखम आहे. पण तरिही इथे विनोदी लेखन विभागात पोस्ट केलीये. कारण कवीनी लोकांना जखम दाखवल्यावर वाचकांनी त्याची थट्टा मस्करी विनोद करण्यापेक्षा, आपली जखम विनोदी लेखन विभागात पोस्टणे अधिक सुसह्य. निदान प्रशंसेला आसुसलेल्या आयुष्याच्या गझलेमध्ये अपेक्षाभंगाचे फसलेले मतले तरी येत नाहीत. सबब माझ्या ‘वृत्तातल्या गोटीबंध जखमे’ला अनावृत्त करतोय.

बालमनाच्या वाचकांनी आणि संस्कृती रक्षकांनी हा धागा इथेच सोडून द्यावा ही विनंती. म्हणजे ‘अनावृत्त करतोय’ ह्या शब्दांमुळे नाही, तर जखमा ह्या शब्दामुळे. हिंसा (जर ती शारिरीक असेल तर) आपल्या संस्कृतीत बसत नाही, म्हणे.

असो... आज मी माझ्यासकट सर्व नवकवींच्या खपलीवरची जखम काढतोय.

(‘जखमेवर खपली’ तुम्हां सामान्य माणसांसाठी. आम्हां नवकवींसाठी ती खपलीवरची जखमच. म्हणजे एकदा जखम झाल्यावर त्यावर अलगद खपली धरली जावी आणि ती बरी होतीये हे पाहुन जगानी त्यावर आणखी जखमा कराव्यात, मग धरणारच ना खपलीवर जखम?
काही कविघ्नसंतोषी माणसे या वाक्याचा अर्थ ‘एखादी कविता झाल्यावर त्यावर हलकट प्रतिसाद धरले जावेत आणि त्यातुनही कवी बरा होतोय हे पाहुन जगानी आणखिन प्रतिसाद टाकावेत’ असाही घेतील. पण काय करणार? बोलणा-याचं तोंड धरता येतं, पण डूआयतून टायपणा-याचा कीबोर्ड कसा धरणार? व्हॉट डू आय डू फॉर धिस?
ही Non-Poetic Liberty आहे आणि त्याचा आम्ही नवकवी निषेध करतो.)

बघा... कवीमनाचा असल्यानं असं होतं.
भावनांचा जलाशयात कल्पना तरंगायला लागतात, आशय बुडुन जातो आणि दिसायला लागतात नुसतेच शब्दांचे बुडबुडे. मग साचलेल्या शेवाळ्याकडे बघुन नाकं मुरडायला तुम्ही मंडळी मोकाट. पण त्या शेवाळ्याखाली एक गळ नि तळ शोधणारा नितळ मनाचा कवी तडफडताना तुम्हाला दिसतच नाही. तुम्ही वाटेल तो प्रतिसाद टायपून जखमा करायला मोकळे होता आणि त्या जखमेतून बाहेर पडायला त्याला दुसरी कविता करण्यावाचुन पर्यायच राहत नाही.
तुमचे हे वर्तन आक्षेपार्ह आहे. म्हणुनच आम्ही ‘कवितांवरील प्रतिसादांसाठी’ एक नियमावली जाहिर करत आहोत. जास्तीत जास्त प्रतिसाद यावेत म्हणुन अवघड नियमांना फाटा मारुन बहुतेक सर्व नियम शिथील करण्यात आले आहेत. आवश्यक तिथे खुलासा करुन मोजकेच राहिलेले १७ नियम खालीलप्रमाणे.

१. खरे प्रतिसादच द्यावेत.
खुलासा : प्रतिसाद हे दोनच प्रकारचे असु शकतात.
एक - कवीचं अफाट कौतुक करणारे खरे प्रतिसाद
दोन - कवीच्या भावना दुखवणारे प्रतिसाद.
पैकी खरे प्रतिसाद द्यावेत.

२. गद्य माणसांनी प्रतिसाद टायपु नयेत.
खुलासा : ‘गझल मतला’ याचा अर्थ (मुद्दामुन हिंदीत) "गझल मत ला" (मराठीत गझल आणुच नकोस) असा काढणारी माणसे आमच्या दृष्टीनी ‘गद्य’ या प्रकारात मोडतात. तसेच,
का पुन्हा नापास केले ?
का फिया भरतो आम्ही ?
‘या ओळीतला काफिया मनाला भिडला’ हे म्हणणारी माणसं तर निःसंशय गद्य. काफिया या शब्दामध्ये श्लेष वगैरे शोधणा-या मंडळींना धाग्यावर आजीवन बंदी घालण्यात येईल.

३. ‘अ’प्रिय प्रतिसाद टायपु नयेत.
खुलासा : अस्वच्छ, अशुद्ध, असभ्य, अगम्य, अश्लील, अतर्क्य, अवली, अळणी, अधाशी, आळशी, अघोरी, आंबुस, आजारी, आपुरे, अवांतर, अवास्तव, आचरट, अंदाधुंद, आक्षेपार्ह, अवलक्षणी आणि अस्थिपंजर प्रतिसाद चालणार नाहीत. तसेच वाचण्याआधीच संपणारे अतीसुक्ष्म प्रतिसाद टायपु नयेत. कंटाळा येऊन जीव जाईल असे अतीपाल्हाळ प्रतिसाद टायपु नयेत.

४. कवितेला प्रतिसाद म्हणुन दुसरी कविता पोस्टू नये.
खुलासा : जलाशयाचे स्वतःचे शेवाळे असताना जर इतर शेवाळी आली तर कोणाचे कुठले आहे हे ठरवणे अवघड जाते. त्यात मूळ शेवाळ्यावरचे शब्दांचे बुडबुडे बाजुला पडून इतर शेवाळ्यांच्या आशयांच्या वादांची आणि त्यावरच्या प्रतिसादांची गिचमिड होते. शिवाय एखाद्या प्रतिसादाला उत्तर म्हणुन मूळ कवीला कवितेतून प्रतिसाद द्यायचा असेल तर त्या शेवाळ्यासाठी जागाच उरत नाही.
सबब, कविता कितीही घशाशी आली तरी एकच धागा तुंबवण्यापेक्षा नविन धागे उघडावेत.

५. दुस-यांच्या प्रतिसादाला प्रतिसाद म्हणुन प्रतिसाद देऊ नये.
खुलासा : कवितेचा अर्थ कळाला असल्यास चर्चेची गरज नाही. अर्थ कळाला नसेल तर तुम्हाला चर्चेचा अधिकार नाही. ‘अर्थ कळालाय का नाही?’ या संभ्रमात असाल तर कविता चार वेळा पुन्हा वाचावी. संभ्रम तसाच राहिला तर ‘छान आहे’ इतकेच म्हणुन धागा वर आणावा आणि खाली बसावे.
चर्चेमध्ये ताटात काही पडत नाही. नुसतेच वड्याचे तेल वांग्यावर पडून मूळ कृतीचे भजे होते असा आमचा अनुभव आहे. यावर पुढे चर्चा केली जाणार नाही.

६. शुद्धलेखन न तपासता प्रतिसाद टायपु नयेत.
खुलासा : शुद्धलेखन तपासताना तत्सम उपान्त्यी दीर्घ इकारान्त शब्दांचा उपान्त्य ईकार उभयवचनी सामान्यरुपांच्या वेळी -हस्व लिहावा. (अपवाद - दीर्घोपान्त तत्सम शब्द). तसेच स्पष्टोच्चारीत अनुनासिकाबद्दल शीर्षबिंदु देताना विकल्पाने परसवर्ण लिहण्यास हरकत नाही पण मधल्या ‘म’पूर्वीचे अनुस्वाररहित अक्षर उभयवचनी सामान्यरुपांच्या वेळेस अनुस्वाररहित करावे.
हा नियम पाळला गेला नसेल तर प्रतिसाद टायपु नयेत.

७. शब्दशः प्रतिसाद टायपु नयेत.
खुलासा : शब्दबंबाळ, शब्दुपेक्षित, निशःब्द प्रतिसाद... तसेच शब्दजनक होऊन प्रतिसाद टायपु नयेत. ‘कवीने जर निरर्थक शब्दांच्या ओळींना ओळी जोडून कविता प्रसवली आहे, तर मी अक्षराला अक्षर जोडून शब्द का जन्मवु शकत नाही?’ असले वाद घालु नयेत.

८. असांसदिय प्रतिसाद टायपु नयेत.
खुलासा : अचकट-विचकट बाहुल्या, पानचट टोमणे, बोच-या सुचना, अपमानास्पद टिका, द्विअर्थी टिपण्या, हिणकस शेरे चालणार नाहीत. तुमच्या प्रतिसादावर मूळ कवीला लिहावसं वाटलं तर ते त्याला समजेल आणि पचेल असेच तुमचे प्रतिसाद हवेत.
अगदी शिव्या सुद्धा सुबोध आणि नादुनुकारी असतील तरच लिहा. अर्थांशिवाय शिव्या घातल्या असतील तर असे प्रतिसाद टायपु नयेत.

९. प्रतिसादात वाङमयांतर करु नये.
खुलासा : मूळ रचनेत कितीही विषयांतर झाले तरी तुम्ही विषय सोडू नये. तसेच मूळ रचना कविता असली तरी गद्द्यातुनच मुद्दे मांडावेत.
काव्य शोधायला लागेल अशा कविता, अर्थ शोधायला लागेल असे लेख, वाद होतील असे अनुवाद, विचित्र वाटतील अशी व्यक्तिचित्र, ‘कधी संपणार’ अशी वाटणारी प्रवासवर्णन, घेता येणार नाही असे आस्वाद, सुटणार नाहीत अशी कोडी असले न लागणारे संदर्भ देऊ नयेत. कवितेबाहेरील लिंका पेस्टू नयेत. त्याने वाचकांची लिंक तुटते.

१०. पूर्वग्रहदुषित प्रतिसाद टायपु नयेत.
खुलासा : केवळ कवीचे नाव बघुन कवितेकडे दुर्लक्ष करत प्रतिसाद लिहणे चालु करु नये. "आला का हा परत?" किंवा "काय तेच तेच लिहतो?" असले अपमानास्पद प्रश्न टायपुच्चारु नये. आपल्या दारातली रातराणीसुद्धा रोज उमलते आणि एकाच प्रकारचा वास सोडते. पण आपण तक्रार करतो का ??
कविता ही सुद्धा कवीच्या मनातील रातराणीच असते.

११. ध चा मा करणारे प्रतिसाद टायपु नयेत.
खुलासा : कवीला काय म्हणायचे हे महत्वाचे आहे आणि ते तो म्हणाला आहे. तुम्हाला काय म्हणायचे आहे हे महत्वाचे तर नाहीच, पण आवश्यकही नाही. सबब, मूळ रचनेमध्ये काहीही बदल करु नयेत. डोळ्यातल्या काजळाचा उपयोग कवितेला दृष्ट लागु नये म्हणुन तीट लावण्यासाठी करावा, ‘ध’ चा ‘मा’ करण्यासाठी नको.
जर मूळ रचनेमध्ये "आली अप्सरा... अशी वाटली" असे असेल तर तसेच ठेवावे. त्यात उशी फाटली, बशी चाटली, तशी लाटली, जशी गाठली असे बदल सुचवु नयेत.

१२. बेहिशोबी प्रतिसाद टायपु नयेत.
खुलासा : ‘ह्याने मागच्या वेळेला मला फाडला होता, आता मी पण त्याला गाडून टाकतो.’ ह्या ‘हिशोब करुन टाकायच्या’ भावनेतून प्रतिसाद टायपु नयेत. कवीनी कधी तुम्हाला मोकळा आणि स्वच्छ प्रतिसाद दिला असल्यास त्याचा राग कवितेवर काढु नये.
‘तुमचा कवितेवरचा प्रतिसाद आणि कवीवरचा राग’ ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्या वेगवेगळ्या जागेवर ठेवाव्यात. कौतुकाचा प्रतिसाद इथे द्यावा आणि राग तुमच्या मनात(च) ठेवावा.

१३. मूळ रचनेचे विडंबन करणारे प्रतिसाद टायपु नयेत.
खुलासा : स्वतःच्या मुलाचे माकड करुन तुम्ही त्याला चौकात चेष्टायला बसवाल का..? मग दुस-यांच्या बाळाचे का करता..? सबब, कितीही खुमखुमी असली तरी परवानगीशिवाय विडंबन करु नये. केल्यास हकलुन देण्यात येईल आणि असे हकलल्यावर परत येऊ नये.

कसं डूआय डुआय
नव काव्यातलं ढोरं
किती हाकलं हाकलं
फिरी येतं धाग्यावर
...............................असे करु नये.

१४. कवितेचे शवविच्छेदन करणारे प्रतिसाद टायपु नयेत.
खुलासा : सगळ्याच कवितेत गर्भित अर्थ दडलेले नसतात. काही कविता (फक्त) बाहेरुन सुंदर असतात. अशा कवितांचं सौंदर्य शोधण्यासाठी त्याची चिरफाड करु नये.
उदाहरणार्थ - "मी रागात गरजली... बदला लुंगी."
यावरुन ‘मी रागात’ आहे का ‘मीरा गात’ आहे? गरजली हा शब्द पचकली याप्रमाणे चालतोय का गरजवंत झाली या अर्थाने..? बदला लुंगी म्हणजे सूड घेईन असे, का नव-याला लुंगी बदलण्याचा आदेश असेल? हे असे विच्छेदन करु नये.
त्यानी लुंगी बदलली नाही तर ती फाडेल किंवा फाडणार नाही. कविता फाडायचा तुम्हाला अधिकार नाही, हे नक्की.

१५. कविता न वाचताच प्रतिसाद टायपु नयेत.
खुलासा : कविता न वाचता आधीच आलेल्या नऊ प्रतिसादांवरुन दहावा प्रतिसाद फेकु नये. अगदी ‘आवडलं’ असे सुद्धा म्हणु नये. हे म्हणजे न जेवताच स्तुती करुन खोटा ढेकर दिल्यासारखे आहे. असे करुन कवीचा अपमान करत आहात. म्हणजे ढेकर देऊन नव्हे, खोटा प्रतिसाद देऊन.
असे करु नये.
प्रेमभंग पचवलेले कवी अनुल्लेखही पचवु शकतात, पण खोटे प्रतिसाद नाही.

१६. प्रतिसाद कवितेवर द्यावेत, त्याच्या विभागावर टिपणी करु नये.
खुलासा : इथले (आणि कुठलेही) बहुतेक कवी हे साक्षर असतात आणि आपण कुठली कविता कुठे पोस्टलिये याची त्यांना जाणिव असते. त्यामुळे एखाद्या रचनेवर ‘ही काहीच्या काही कविता विभागातली कविता इथे कशी आली?’ असले बोचरे प्रश्न विचारु नये. हे विचारताना प्रतिसादात भाबडे भाव आणल्यास त्या प्रतिसादकर्त्यावर एक काहीच्याकाही नवकविता करण्यात येईल.
कवी हळवा असतो, बावळट नव्हे.

१७. सर्व नियम पाळल्याच्या पुराव्याशिवाय प्रतिसाद टायपु नयेत.
खुलासा : तो प्रतिसादकर्त्याने करायचा... पुरावा देऊन.

आपले नमर,
एकसदस्सीय नवकवी नि यमक मंडळ
पुणे शाखा.

ता. क. - कवितांवर नियमात बसलेले शेकडो प्रतिसाद आल्यास त्यातल्या दर्जेदार प्रतिसादासच प्रसिद्धी दिली जाईल.

ता. नि. - रसग्रहणाशिवाय प्रतिसाद टायपु नयेत.
खुलासा : आधी कवितेचे रसग्रहण करावे आणि मगच आपला प्रतिसाद लिहावा. उदाहरणार्थ - हा लेख संपवताना मी माझी एक जुनी नवकविता इथे पोस्टत आहे. जर हा लेख भावला असेल, (अनुल्लेखानी मारल्यामुळे) मागे पडूनही घावला असेल किंवा फिरणा-या रिक्षानी ‘कुठे आहे तो’ दावला असेल तर ह्या माझ्या नवकवितेचं रसग्रहण करा आणि मगच तुमचा प्रतिसाद टायपा.

" घुबडाचे डोहाळजेवण "

वटवाघुळाला आलय आमंत्रण
त्या पर्णहीन झाडाकडुन
ज्याच्या हापापलेल्या पारंब्या व्यभिचार करतात आकाशगंगेशी
आणि जन्माला घालतात चिघळलेल्या जखमा
अन मागे उरतं एक बेवारशी शुन्य !
मग पोटातल्या पोटात ओका-या होतात सुरवंटाला आणि
अस्पृश्य मातीच्या वासानी शहारुन जातो आसमंत..... गवतीचहा सकट.
चुरगाळलेला चंद्र लागलाय भिकेला इथे
आणि
तिथे क्षितिजाच्या कुशीत मात्र चाललय घुबडाचं डोहाळजेवण
तिथे क्षितिजाच्या कुशीत मात्र चाललय घुबडाचं डोहाळजेवण. (समाप्त)

तुमच्या रसग्रहणाच्या प्रतिक्षेत...

धुंद रवी

डिस्क्लेमर :
हलकेच घ्या.
प्लीज हलकेच घ्या.
प्लीज प्लीज प्लीज हलकेच घ्या.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

Lol

नियम क्र.१५ ला "पर्यायी" नियम

प्रतिसादकांनी कविता/गझल वाचू नये.

प्रथम दोन याद्या बनवाव्या. कुणाला प्रतिसाद द्यायचे त्यांची एक आणि ज्यांना प्रतिसाद द्यायचेच नाहीत, त्यांची दुसरी. कोणत्याही परिस्थितीत प्रतिसादकांनी कविता/गझल वाचू नये. प्रथम केवळ मथळा वाचावा. त्यानंतर कवीचे नाव वाचावे. त्यावरूनच कवितेचा दर्जा किंवा गझलेची गझलियत ठरवावी. तेथून उड्डाण घेउन थेट प्रतिसादात लॅन्डींग व्हावे. कविता/गझलेचा उपयोग धावपट्टीसारखा सुद्धा करू नये. Wink

Rofl

Happy

<<<< या नियमांना पर्यायी नियम सुचवू नयेत असाही एक नियम लिहा. >>>

तुम्ही लाख नियम बनवा. आम्ही पाळू तेव्हा ना? Wink

हहपुवा....... Proud
प्रचंड धमाल.............:D
अगदी मनन करण्याजोगे प्रतिसाद आहेत...............

Happy

> ‘एखादी कविता झाल्यावर त्यावर हलकट प्रतिसाद धरले जावेत आणि त्यातुनही कवी बरा होतोय हे पाहुन जगानी आणखिन प्रतिसाद टाकावेत’

माझे दु:खः
एका नवकवितून बरा होतो (बाफ डावलून) |
तोवर दूसरा उगवतो नवी जखम बनून ||

Pages