जनगणना - एक अब्ज सतरा कोटी सदुसष्ठ लाख पंच्चाण्णव हजार नऊशे त्रेचाळीस अधिक एक.

Submitted by धुंद रवी on 15 May, 2012 - 05:11

एका कोंकणी माणसाने तेलगुत अनुवाद केलेला संस्कृतमधला असा एक हिब्रु श्लोक आहे की,
माजलेला ढग गडगडत राहतो, जोपर्यंत तो पर्वताला धडकत नाही.
माजलेला झेंडा फडफडत राहतो, जोपर्यंत तो पावसाला धडकत नाही. आणि...
माजलेला माणुस बडबडत राहतो, जोपर्यंत तो पुणेकराला धडकत नाही.

विक्रमादित्य अंबिलढगे असाच एक माजलेला ढग होता जो पुण्यातल्या पर्वताला धडकला आणि हवेतच विरुन गेला. तो असाच एक माजलेला झेंडा होता जो पुणेरी पावसात फाटुन गेला. शेवटी पुण्यात पाऊल टाकताना कोणाच्याही जिवाचा थरकाप होतो, ते उगीच नाही !

अंबिलढगे पेशानी शाळामास्तर. गाढवाचं पिल्लु लहानपणी कमालीचं गोंडस दिसतं आणि जरा मोठं झाल्यावर लाथा झाडायला लागतं, असंच ह्या अंबिलढगेचं झालेलं. हेडमास्तरांना सुरवातीला अगदी चुणचुणीत वाटणा-या ह्या अंबिलढगेनी नंतर नंतर असे काही कामचुकार रंग दाखवले की हेडामास्तराचे डोळे पांढरेच झाले. खरं तर हेडमास्तर त्याला उगाचच घाबरायचे. "गंजलेला पत्रा आणि माजलेला कुत्रा यापासुन दूरच राहवं", असं काहितरी म्हणायचे ते.

अर्थात मास्तर व्हायची अंबिलढगेची लायकी नसली, तरी पात्रता नक्कीच होती. तो पात्र असण्याची ५-६ कारणे पुढिलप्रमाणे...

१. अंबिलढगेला दया, माया, प्रेम, क्षमा, करूणा, सहानभूती, जिव्हाळा, आपुलकी ह्या असल्या कुठल्याही भावनेनी स्पर्श केला नव्हता. त्यामुळे कितीही मुलं दिली तरी जीवाला त्रास न करुन घेता तो हाकु शकत होता.... सर्व शिक्षा अभियान अंबिलढगे कोळुन प्यायला होता. (सर्व मुलं शिक्षा केली की सरळ होतात असे त्याचे अभियान होते.)

२. तो मराठी सोडून कोणताही विषय शिकवु शकत असे. (‘शिकवु शकत असे’ असे म्हणणे चुकीचे ठरेल. मराठी सोडून कोणत्याही विषयाचा तास घेऊ शकत असे, असे म्हणणे रास्त होईल. आणि खर तर पुर्वी तो मराठीचाही तास घ्यायचा पण एकदा हेडमस्तरांनी त्याला "अरे गनु, मानसातला न म्हन रे" असं म्हनताणा ऐकलं त्याचं व्याक्रनाचं ज्ञाण बघुन ते णतमस्तक झाले. आणि मराठी भाषा एका महान मराठी शिक्षकाला पारखी झाली.
(पारखी झाली म्हणजे काय ते अंबिलढगेच जास्त छान सांगु शकेल. ‘लग्नानंतर ती आईच्या वेड्या मायेला पारखी झाली’ ह्या वाक्याचा अर्थ त्यानी, मायाच्या आईनी तिचं लग्न गुजराथी माणासाशी लावुन दिल्यामुळे लग्नानंतर ती ‘माया वेडे’ ची ‘माया पारखी’ झाली, असा काढला होता. हे हेडमस्तरांनी ऐकलं असतं तर त्यांना वेड लागले असते... आणि मग विक्रमादित्य हेडमास्तर झाला असता. पण असे होणे नव्हते. त्यामुळे शाळा एका महान हेडमास्तरला अंबिलढगे झाली.)

३. मान इकडे-तिकडे न वळवता, एकाच वेळेस अंबिलढगे आख्या वर्गाकडे पाहु शकत असे. मास्तरचं लक्ष नाही असं पाहुन वर्गातला कोणताही उर्मट कार्टा काहीही खोड्या करुच शकत नसे, कारण मास्तर आपल्याकडेच बघतोय ह्याची प्रत्येक मुलाला खात्रीच असायची. (तिरळेपणा म्हणजे काही दोष नव्हे. आणि तो दोष असेलच तर पहाणा-याचा आहे, कारण पहाणा-याला तो तिरळा दिसतोय, त्याला नाही. त्याला तर सरळच दिसतय. म्हणजे तिरळे पाहणारेच....... - असं अंबिलढगे म्हणायचा.)

४. अंबिलढगेची शाळेत पडेल ते काम करायची तयारी असायची. (अर्थात, तो कामाची नुसती तयारीच करतो, प्रत्यक्षात ते काम करतच नाही, हे हेडमास्तरांच्या ब-याच उशीरा लक्षात आलं.)
उपकंस - (एखादी गोष्ट जमणार नसेल तर त्याला स्पष्टपणे नाही म्हणणं ही कला आहेच, पण त्याहीपेक्षा जास्त कला ’हो’ म्हणुन ते काम न करण्यात आहे, असा कलाकार अंबिलढगेचा सिद्धांतच होता.)

५. त्याचा मामा संस्थेच्या समितीवर संचालक होता. (मामा म्हणजे मानलेल्या आईचा आडनाव बंधु.)

६. भाग्य एकेकाचं ! (सदरचं भाग्य हे अंबिलढगेचं सौभाग्य नसुन विद्यार्थी आणि हेडमास्तर यांचं दुर्भाग्य ह्या अर्थानी घेण्यात यावं....)

अंबिलढगे कामचुकार होता हा हेडमास्तरांचा प्रॉब्लेम नव्हताच, पण त्याचं काम दुस-याच कोणी तरी केल्यानंतरही, ‘ते कसां वाईट झालय आणि आपण केलं असतं तर कसं चोख झालं असतं’ ह्याच्या फुशारक्या तो इतक्या मारायचा की हेडमास्तरांना त्याच्या गळ्यात शाळेची घंटा बांधुन त्याला नदीत ढकलुन द्यावं, असं वाटायचं. पण अंबिलढगेच्या द्वेषानी भरलेल्या मनाच्या फळ्यावर संयमाचा बोळा फिरवुन ते खडु गिळुन गप्प राहायचे.
पण त्या दिवशी तर कहरच झाला. आधिच निवडणुक आयोगानी लादलेल्या जनगणनेच्या कामानी ते त्रस्त होते. कसल्याही मोबदल्याशिवाय, उन्हातान्हात, दारोदारी "माहितीची भीक वाढा" अशा विनवण्या करत फिरुन त्यांना विलक्षण निराशा आली होती. आणि त्यात अंबिलढगे त्यांच्या काळ्या नशिबाच्या फळ्यावर अकलेचा गिरगोटकाला गिरवत बसला होता. पहिल्यांदाच त्यांचा तोल सुटला आणि त्यांनी सरळ अंबिलढगेला आव्हानच दिलं....
"वर्गाबाहेर बसुन भाषण देणं सोप आहे. इतका स्वतःबद्दल गर्व असेल तर मी पत्ता देतो तिथं जाऊन जनगणनेची माहिती गोळा करुन या. तसही तुमची जनगणनेची काम दुस-यांनीच केलीत. निदान एका वाड्यात तरी जाऊन या. माहिती काढुन यशस्वी परत आलात तर उपमुख्याध्यापक करेन. पण तसेच आलात तर नोकरी गेली म्हणुन समजा.....! "

खरं तर अंबिलढगेला या ही कामाचा कंटाळा आला होता पण हेडमास्तरांची हि ऑफर त्याला एकदम आकर्षक वाटली आणि तो तयार झाला. तोपर्यंत त्याला माहित नव्हतं की हेडमास्तरांनी दिलेला पत्ता हा पुण्यातल्या एका वाड्याचा आहे. (ह्या वाड्याचा आणि जनगणेच्या कामाचा काहि एक संबंध नव्हता. पण ४७ वर्षांपुर्वी हेडमास्तरांना इथे एक अविस्मरणीय वाईट अनुभव आला होता आणि काट्यानं काटा काढावा असं ठरवुन मास्तरांनी अंबिलढगेचा काट्यानं गळा कापला.)
दिलेल्या पत्त्यावर अंबिलढगे पोहचला आणि वाड्याच्या दारातच त्याचा कचरा झाला कारण तिथे एका पुणेरी पाटीनी त्याचं स्वागत केलं.....

"आपली पायधुळ आमच्या वाड्यात झाडण्यापुर्वी हे वाचा.
• फिरते विक्रेते, वर्गणी/मदत मागणारे, रस्ता चुकलेले, पत्ता विचारणारे, चोर, भामटे, राजकारणी, मोलकरणी, बोहारणी, भिकारी, डोंबारी, नातेवाईक, पोस्टमन, सेल्समन, मुंग्या/झुरळं आणि रातकिडे यांना आत येण्यास सक्त मनाई.
• फक्त पार्कींगसाठी वाड्यात आल्यास वाहनाची आणि वाहन चालकाची हवा काढुन घेतली जाईल.
• पुर्वपरवानगीशिवाय आत येऊ नये. फक्त परवानगीसाठी आत येऊ नये. (अपमान करुन बाहेर हकलण्यात येईल.)
• ह्यानंतरही आत येण्यास आपण लायक असल्यास/ येण्याची गरज पडल्यास/ आत येऊ शकल्यास गाडी आत आणु नये, पाणी मागु नये, पावलांचा आवाज करु नये, माज करु नये, वाड्याच्या आवारात बसु नये, कामाशिवाय उभं राहु नये, गुटखा खाऊ नये, विनाकारण हसु नये, अवांतर गप्पा मारु नये, घंटी वाजवु नये, अंग खाजवु.................. "
(ह्या पुढेही नियम लिहले होते पण हेच वाचुन अंबिलढगेच्या जीवाचा इतकाच संताप संताप झाला की तो पुढचे नियम न वाचताच आत शिरला. आजपर्यंत त्यानी बायको, हेडमास्तर किंवा विद्यार्थ्यांचे पालक, ह्यांचंही कधीही ऐकुन घेतलं नव्हतं आणि इथे हा एवढा अपमान ?)

अंबिलढगेनी पहिलाच बंद दरवजा ठोठावला. आतुन अस्मानी कुचेष्टेनी भरलेला माणुसघाणा आवाज आला.
आवाज : बाहेर जा.... बाहेरचा सुचना फलक वाचा आणि मग बाहेरच रहा.
अंबिलढगे : दार उघडा.
आवाज : तुम्ही बहिरे आहात का अशिक्षित ? का बाहेरचा फलक वाचुनही तुम्हाला आत यायचय ?
अंबिलढगे : आधि दार उघडा, मग सांगतो.
आवाज : (आतुनच) अच्छा, म्हणजे तुम्ही ऐकु शकता, वाचु शकत नाही. कोण आपण ?
अंबिलढगे : मी विक्रमादित्य.
आवाज : मग हट्ट सोडु नका आणि तिकडे जंगलात जा वेताळाची गोष्ट ऐकायला..... इथे माणसं राहतात.

(काहिही भांडण वैर राग नसताना, कारण नसताना, संबंध नसताना समोरच्या माणसाला उगाचच कोणी इतकं टाकुन बोलु शकतं ह्यावर अंबिलढगेचा विश्वासच बसला नसता. कुठे ती आपली शाळेतली शान आणि कुठे हा घोर अपमान ?? हा अपमान विसरुन, "मी ब्रह्म आहे" या चालीवर अंबिलढगे म्हणाला.......
अंबिलढगे : मी विक्रमादित्य अंबिलढगे.
आवाज : मग अंबिलओढ्यात जा.
(हे टोनिंग इतकं घाण होतं की खरा ब्रह्म ज्या कमळावर बसलाय त्या कमळाच्या पाकळ्याही कोमेजुन गेल्या असत्या आणि ब्रह्मानी आपली तिनीही तोंड झाकुन घेतली असती..... असो...)
अंबिलढगे : अंबिलओढा? काय बोलताय तुम्ही?
आवाज : तुम्हाला अंबिलओढा माहित नाही?? म्हणजे तुम्ही पुण्याचे नाही. तरीच दुपारी ह्या भागात आलात. पत्ता तपासुन पहा जरा.

(खरं तर अंबिलओढा माहित असायला तो काही नायगरा धबधबा नव्हता, पण आतला माणुस जिथं कारणाशिवायही हिडीसफिडीस करत होता, तिथं ह्यावेळेस निदान त्याच्याकडे कारण तरी होतं !! )
अंबिलढगे : माझा पत्ता बरोबर आहे. तुमच्या वाळीत टाकलेल्या लोकांच्या यादीत मी नाही. दार उघडा.
आवाज : संध्याकाळी या. मी गाढ झोपलोय.
अंबिलढगे : हे सरकारी काम आहे. तुम्ही सरकारी कामात अडथळे आणताय.
आवाज : मी माझ्या गादीवर झोपुन सरकारच्या कामात अडथळे आणतोय? सरकारनी स्वतःच्या गादीवर झोपावं.... माझ्या गादीवर झोपायचं काय कारण?
(आतला डॅम्बिस माणुस टक्क जागा होता, काही झोपला वैगेरे नव्हता, त्यामुळे अंबिलढगे जरा वैतागलाच. थोडा वेळ तो तिथंच दार वाजवत उभा राहिला. पण दार उघडलंच नाही म्हणुन दुस-या दरवाज्याकडे निघाला आणि त्या क्षणीच दार उघडलं. म्हणजे आतला माणुस दरवाज्याच्या फटीला डोळे लावुन बाहेरची गंमत बघत बसला होता. सुमारे ७० वर्षांचे एक आण्णा नामक आजोबा बाहेर आले.)

आण्णा : ओ सरकार... थांबा.... या इकडे.... आता आमच्या झोपेत अडथळा आणलाच आहात तर बोला.
अंबिलढगे : मी जणगनणेच्या कामासाठी आलोय.
आण्णा : कसलं काम ??
अंबिलढगे : ज ण ग न णा
आण्णा : तुम्हाला ज न ग ण ना म्हणायचय का ?
अंबिलढगे : तेच ते...
आण्णा : असं कसं ? खून आणि खूण एकच काय ?
अंबिलढगे : ओ काका... तुमचा मराठीचा तास नंतर घ्या. हि माहिती भरुन द्या आधि. नाव सांगा....
(आण्णा अचानक बेंबीच्या देठापासुन केकाटले....) .......वासुनानाऽऽऽऽऽऽ !
अंबिलढगे : अहो ओरडताय काय ? मी बहिरा नाही.
(अचानक पलिकडच्या घरातुन "काय आहे ?" असा आण्णांच्या कुचेष्टेनी भरलेल्या माणुसघाण्या आवाजाला भेदुन जाणारा एक तुच्छतेनी भरलेला माणुसद्वेष्टा आवाज आला.)
आण्णा : गि-हाईक !!
वासुनाना : थांबवुन ठेवा..... मी आलोच चहा घेऊन !
(न ण चा घोळ, वासुनाना, गि-हाईक हे सगळं अंबिलढगेच्या डोक्यावरुन गेलं. अर्थात त्याला काहि देणं घेणं ही नव्हतं. त्यामुळे त्यानी आपलं संभाषण पुढे चालु ठेवलं.)

अंबिलढगे : घ्या हा फॉर्म आणि हि माहिती भरुन द्या.
आण्णा : थांबा..... आपण जरा बसुन बोलु.
(इथे आल्यापासुन अंबिलढगेला पहिल्यांदाच बरं वाटलं. त्याला दिला गेलेला हा पहिला आदर होता. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. आण्णा अंबिलढगेच्या तोंडावर दार आपटुन आत गेले आणि बराच वेळ आलेच नाहीत. आण्णा घर आवरुन मग आपल्याला आत घेतील असा अंबिलढगेचा अंदाज होता, पण तो साफ चुकला. आण्णा बाहेर आले ते एका हातात एकच खुर्ची आणि दुस-या हातात मक्याची दोन उकडलेली कणसं आणि एक रिकामा कप घेऊन.... त्या दोन कणसांपैकी एकाला जोरदार साजुक तूप लावलेलं होतं..... दरम्यान आण्णांच्याच वयाचे वासुनाना त्यांची खुर्ची आणि थर्मास घेऊन आले होते...)

उपकंस आणि थोडं अवांतर - (पुणेकर चहा पण विचारत नाहीत हि धादांत खोटी माहिती आहे. वासुनाना थर्मासमध्ये आण्णांसाठीसुद्धा चहा घेऊन आले होते. तो पावकप चहा त्यांनी आण्णांच्या कान तुटलेल्या रिकाम्या कपात ओतला. मग आण्णांनी त्यांना तूप न लावलेलं छोटसं बेबीकॉर्न दिलं... मग नानांनी खिशातुन एक छोटी डबी काढुन त्यातलं साजुक तूप आपल्या कणिसाला लावलं.... असो...)

मुळ कंस पुन्हा चालु - (आता वासुनाना, आण्णा दरवाज्यात बसुन कणिस खात आणि अंबिलढगे उभा दात-ओठ खात असा तो संवाद पुन्हा चालु झाला....)
अंबिलढगे : घ्या हा फॉर्म आन माहिती भरुन द्या.
आण्णा : काय आहे हे? वधुवर सुचक मंडळात नावनोंदणी करायचा अर्ज? थोडा उशिर झाला तुम्हाला....
वासुनाना : ह्यॅ...ह्यॅ...ह्यॅ...
अंबिलढगे : अहो काहिही काय ?. जणगनणेचा फॉर्म आहे.
आण्णा : म्हणजे ज न ग ण ने चा फॉर्म आहे.
अंबिलढगे : तेच ते... त्यानी काय उत्तर बदलनार आहेत का तुमची ?
आण्णा : णक्कीच णाही बदलनार.
वासुनाना : ह्यॅ...ह्यॅ...ह्यॅ...
आण्णा : तुम्ही काय करता?
अंबिलढगे : ते तुम्हाला काय करायचय ?
आण्णा : व्वा.. हे बरं आहे... तुम्ही आम्हाला २३६ प्रश्न विचारणार आणि आम्ही काही विचारायचं नाही?
अंबिलढगे : हे बघा उगाच वेळ वाया घालवु नका. पटकन उत्तर द्या, मी जातो.
आण्णा : मी रीटायर्ड आहे.
अंबिलढगे : मग ?
आण्णा : मग काय? गेला तर गेला वेळ वाया. वेळ वाचवुन राहिलेल्या वेळात मी काय वेताळाची गोष्ट ऐकु की काय, विक्रम??
वासुनाना - ह्यॅ...ह्यॅ...ह्यॅ...
(विक्रम-वेताळ हि असली कोटी अंबिलढगेच्या डोक्यावरुन गेली. पण आण्णांचा विनोद फुकट गेला नाही कारण वासुनानांनी दात काढले होते.)

अंबिलढगे : तुमच्या प्रश्णाला उत्तर द्यायला मी बांधिल नाही. सहकार्य करा. जनगणना हे राष्ट्रीय कार्य आहे.
आण्णा : तुम्हाला जणगनणा म्हणायचय का ? तुम्ही चुकुन जनगणना असं बरोबर म्हणालात.....
वासुनाना - ह्यॅ...ह्यॅ...ह्यॅ... ह्यॅ...ह्यॅ...ह्यॅ... ह्यॅ...ह्यॅ...ह्यॅ...

(आण्णांच्या ह्या विनोदावर बेहद्द खुष झालेले वासुनाना इतके हसले की ते खुर्चीवरुन घसरलेच. मग आण्णांनी दिलेलं ते कणिस त्यांच्या हातातुन खाली पडलं आणि वाया गेलं. मग त्याबदल्यात त्यांनी आण्णांचं लक्ष नाही असं पाहुन त्यांना दिलेला पावकप चहा उचलुन पिउन टाकला. आण्णा गि-हाईकाशी बोलण्यात गुंतले होते..... )

आण्णा : ठीक आहे, देतो तुम्हाला उत्तरं पण आधि सांगा तरी की आपण कोण आहात ? हल्ली खुप भामटे असे फिरतात आणि लुटतात हो....
अंबिलढगे : मी तुम्हाला भामटा दिसतोय का ?
आण्णा : समजा.... मी हो म्हणालो तर काय पोलिसंच्या स्वाधिन व्हाल का? आणि दुसरं, जर भामटे भामट्यांसारखे दिसत असते तर त्याला जागेवरच ठोकला नसता का? तुम्हाला सांगतो, मागं असाच एक सभ्य दिसणारा भामटा................
अंबिलढगे : बास..... ! मी शाळा शिक्षक आहे.
आण्णा : तो पण असंच म्हणालेला की मी शिक्षक आहे.
अंबिलढगे : कोण ?
आण्णा : तो भामटा.
वासुनाना - ह्यॅ...ह्यॅ...ह्यॅ...
अंबिलढगे : तुम्ही अपमान करताय माझा. मी इथे फुकटात काम करतोय आणि तुम्ही काय हे भामटा-भामटा लावलय?
आण्णा : फुकटात म्हणजे? आम्ही तुम्हाला दर प्रश्नामागे ५-५ रुपये द्यायचे की काय? म्हणजे एक तर आमची खाजगी माहिती तुम्हाला द्यायची आणि....
अंबिलढगे : खाजगी महिती ???
आण्णा : हो मग. हे काय इथे आमचा पिनकोड विचारलाय की.....!
वासुनाना - ह्यॅ...ह्यॅ...ह्यॅ...
अंबिलढगे : पिनकोड ?????????????????????

आण्णा : .......आणि हे बघा, चक्क चक्क बायकोचं नाव घ्यायला सांगितलय. बरं, नुसतच घ्यायचय की घास वैगेरे पण भरवायचा आहे.
(आपण चुकुन मेंटल हॉस्पीटलमध्ये आल्याची शंका अंबिलढगेच्या मनाला चाटुन गेली. खरंच आपला पत्ता चुकला तर नसेल असं त्याला (उभं) राहुन राहुन वाटायला लागलं, कारण शब्दाशब्दाला लाज काढणारा एक म्हातारा आणि वाक्यावाक्याला दात काढणारा दुसरा. त्याला हे काहि बरोबर वाटेना..... तरीही धिरानं टिकुन तो बोलत राहिला....)

अंबिलढगे : तुम्हाला नाव लिहायला सांगितलय, उखाणा घ्यायला नाही. खाजगी काय आहे यात ?
आण्णा : वा रे वा.... एखाद्याच्या घरात घुसुन त्याला त्याच्या बायकोचं नाव, वय विचारणं हे खाजगी नाही ? चला, तुम्ही सांगा तुमच्या बायकोचं नाव आणि वय.... उखाण्यात पण चालेल....
अंबिलढगे : ओ काका, उगाच डोकं नका फिरवु... द्या पटकन १० मिनिटात फॉर्म भरुन किंवा काकुंना बोलवा....
आण्णा : माझी काकु तर माझ्या लहानपणीच वारली ...
अंबिलढगे : तुमची काकु नाही हो.... म्हणजे तुमच्या बायकोला बोलवा हो.... नाहीतर मी तुमची तक्रार करेन....
आण्णा : तक्रार? का बरं..... मी बायकोला बोलावलं नाही म्हणुन? तिला बोलावयाचं असेल तर प्लॅन्चेट करावं लागेल. आत्मे येतात म्हणे प्लॅन्चेट करुन बोलावल्यावर. वासुनाना मी पाट आणतो, तुम्ही वाटी आणा. तसही तिनी मरण्यापुर्वी माझी ‘बर्ड-वॉचींग’ची दुर्बीण कुठे लपवुन ठेवली आहे, ते विचारायचंच आहे मला......
अंबिलढगे : बास झाली तुमची बडबड.... मी तक्रार करेन की तुम्ही माहिती देत नाही म्हणुन...
आण्णा : असं मी कधी म्हणालो.
अंबिलढगे : मग द्या ना हा फॉर्म...
आण्णा : घ्या.
अंबिलढगे : अहो, म्हणजे भरुन द्या....
आण्णा : तुम्हीच भरा, मी सांगतो...
अंबिलढगे : अशी परवानगी नाही आम्हाला... खाडाखोड पण चालत नाही
आण्णा : मग खाडाखोड न करता भरा
वासुनाना - ह्यॅ...ह्यॅ...ह्यॅ... काय हो, तुम्हाला जनगणनेचं ट्रेनिंग देत नाहित का हो?

(पहिल्यांदाच वासुनानांनी तोंडातुन दात सोडुन शब्द काढले होते. जनगणनेच्या कामाचं ट्रेनिंग आपण टाळलं याचं अंबिलढगेला पहिल्यांद वाईट वाटलं....)

अंबिलढगे : फॉर्म भरुन द्यायची आम्हाला परवानगी नाही !!!
आण्णा : मग निरिक्षरांचं काय करता तुम्ही ? (अंबिलढगेनी कधी कामच न केल्यामुळे खरच निरिक्षरांचं काय करतात हे त्याला ठाऊकच नव्हतं)
अंबिलढगे : तुम्ही निरिक्षर आहात का ?
आण्णा : नाही. मी पीएचडी झालोय. ‘अंबिलओढ्यात पडणारं ढगांचं पाणी’ हा विषय घेऊन.
वासुनाना - ह्यॅ...ह्यॅ...ह्यॅ...
आण्णा : पण आज मला लिहता वाचता येणार नाही.
अंबिलढगे : का ?
आण्णा : कारण माझा चष्मा दोरी बसवयला दुकानात टाकलाय. मिळेल महिन्यानी. तुम्ही विचारा काय काय हवीये माहिती ? (पटापट प्रश्न संपवुन काम संपवुन टाकावं ह्या विचारानी अंबिलढगेनी प्रश्न वाचयला सुरवात केली. अंबिलढगेला कामाला लावणारा हा जगातला पहिला इसम होता.)
अंबिलढगे : पूर्ण नाव, आईवडलांची पूर्ण नावे, पत्ता, जात, जन्मतारीख, जन्मस्थान, शिक्षण, व्यवसाय, घरातल्या वस्तू , वाहने, खोल्यांची संख्या, फोन, इंटरनेट, भ्रमणध्वनी.....
आण्णा : जात??? हि जनगणना जातीनिहाय नाही, हे तुम्हाला सागितलं नाही का निवडणूक आयोगानी? जाती वरून कोणी हाक मारली तर कोर्टात केस दाखल होते आणि तुम्ही मला जात विचारताय?
वासुनाना - तुम्हाला प्रश्नोत्तरांचं ट्रेनिंग देत नाहित का हो?
आण्णा : अहो सरकार, जाती-विरहीत समाज घडविण्याची ही पहीली पायरी आहे. शेवटी माउंटबेटन देश सोडून जाताना जे म्हणत होता ते तुम्ही खरे करून दाखवित आहेत. तुमचा दांभिकपणा बंद करा आता.

(अंबिलढगेला कोण माउंटबेटन हे जसं कळालं नाही तसंच ते ‘दाम-भीकपणा’ हा काय प्रकार आहे ते समजलं नाही. पण काहितरी बंद करायचय इतकच त्याला कळालं. ते मुळीच बंद न करता तो पुढे भांडायला लागला.)

अंबिलढगे : कोण भीक मागतय? द्यायची तर द्या माहिती, नाहीतर फाडुन टाका हा फॉर्म..... माझं काही जात नाही.... मी काढलाय काय हा फॉर्म...? आणि कोन कुठला माउंटबेटन तुम्हाला कुठतरी जाताना काहितरी बोलला तर माझ्यावर कशाला चिडताय ?
आण्णा : कोण कुठला माउंटबेटन?? शिक्षकच आहात ना तुम्ही ?
वासुनाना : तुम्हाला इतिहासाचं ट्रेनिंग देत नाहित का हो? (वासुनाना फक्त दातच काढत होते तेच बरं होतं. अंबिलढगेला आत्तापर्यंत कोणत्याही प्रश्नाचं उतर मिळालं नव्हतं. वर अपमानच जास्त. बरं, असंच काम न करता जावं तर हेडमास्तरांचं आव्हान... ! सगळी उत्तर ठोकुन देऊ असा विचार करुन अंबिलढगे रागारागात परत निघाला)

आण्णा : ओ सरकार. कुठे निघालात. तुमच्या माहितीसाठी सांगतो, जनगणना प्रगणकाने खोटी माहिती लिहल्यास किंवा काम पूर्ण न केल्यास जनगणना अधिनियम १९४८ उपनियम २(ब) अन्वये फौजदारी गुन्हा दाखल केला जातो. दोषींना ३ वर्षांची कैद व १ हजार रुपये दंडाची कारवाई केली जाऊ शकते. तेंव्हा तुमची मनगणना बंद करा आणि जनगणना चालु करा.

(ह्या धमकीने अंबिलढगे तर हदरुनच गेला. काम टाळल्यामुळे एकदा त्याला ३ दिवस बिनपगारी रजा आणि १०० रुपये दंड झाला होता. पण ३ वर्षांची कैद व १ हजार रुपये दंड हे ऐकुनच त्याला घाम फुटला आणि आपला शाळेतला माज किती बिनबुडाचा असतो हे त्याला समजलं आणि तो व्यथाच मांडायला लागला.)

अंबिलढगे : साहेब, थोडं समजुन घ्या हो... आमचं रोजचं काम सांभाळुन आम्ही हे करतोय. सरकारचे नोकर आम्ही, ते जे सांगतिल तसं करावं लागतं आम्हाला. जनगणना करणरे शिक्षक सुद्धा आपलीच माणसे असतात. त्यांना होणार त्रास कोणी समजुनच घेत नाहीत.
आण्णा : खरं आहे मास्तर तुमचं..... मी वाचलय पेपरात की खुप विचित्र अनुभव येतात तुम्हाला. लोक नीट बोलत नाहीत, साधं घरात सुद्धा बोलवत नाहीत, दहा मिनिटांच्या कामाला उगाचच तास-तास लावतात, चेष्टा करुन उगाचच हसतात.....
छे! काही कौतुकच नाही लोकांना... मध्ये तर मी पेपरात वाचलं की एक जनगणना प्रगणक माहिती घ्यायला एका घरी गेला. त्या घरामध्ये एकटी महिला होती. मी जणगणना कर्मचारी आहे असे सांगुनही तिने दार उघडले नाही. नंतर शेजारी कळले की तिचा नवरा घरी आल्यावर विशिष्ट त-हेने दोनदा शिट्टी वाजवतो, मग नंतर ती दार उघडते. बोला आता ?
वासुनाना : तुम्हाला शिट्टी वाजवायचं ट्रेनिंग देत नाहित का हो?

(ह्या वेळेला लाज वासुनानांनी आणि दात आण्णांनी काढले होते. नक्की काय करावं ते अंबिलढगेला सुचत नव्हतं. तब्येत बरी नाही, पुन्हा येतो अशी थाप मारुन पळुन जावं, असा विचार तो करायला लागला. जान सलामत तो नोकरी पचास....)
अंबिलढगेनी "मी जातो" असं म्हणताच आण्णा एकदम पिसाळलेच.....
आण्णा : खबरदार इथुन हललात तर..... ह्या वाड्यात भर दुपारी पाऊल टाकुन परत जाणारी पावलं अजुन उठायचीयेत.... अजिबात सोडाणार नाही तुम्हाला... मी म्हणत होतो की नंतर या, पण तुम्ही सरकारी कामाची धमकी दिलीत आणि मला गाढ झोपेतुन उठवलंत... आता तुम्हाला हे काम पुर्ण करावंच लागेल.....

अंबिलढगेला त्या दोन्ही म्हाता-याच्या घा-या डोळ्यात भिती वाटावी अशी एक वेडसर झांक दिसत होती. (‘घा-या डोळ्यात’ ह्या शब्दांवरुन काहिही अर्थ काढुन नये. घा-या म्हणजे घार जसं आपल्या सावजाकडे बघते तशा डोळ्यात असा त्याचा अर्थ आहे.) तर त्या घा-या डोळ्यांना घाबरुन तो तिथेच खिळुन राहिला. त्यानी खिशातुन पेन काढला आणि गुपचुप तो फॉर्म भरायला सुरवात केली, ते सुद्धा आण्णांच्या कोणत्याही उत्तराला आक्षेप न घेता.... प्रश्नोत्तरं संपल्यानंतर दिसणारा आण्णांचा फॉर्म खालीलप्रमाणे............
नाव : नावात काय आहे ?
सध्याचा पत्ता : इस्पीक गोटु
कायमचा पत्ता : बदाम राजा
लिंग : किलिंग
जन्मतारीख : = भाज्य १००, हार ६३ क्षेप ९०. मसावि १, अपवर्तन + उत्तरात येणार्या लब्धीला १० ने गुणावे /१०० भागिले ६३, लब्धि १ बाकी ३७; ६३ भागिले ३७, लब्धि १, बाकी २६ वगैरे करून मिळालेली संख्या
जन्मठिकाण : ऑपरेशन टेबल
राष्ट्रीयत्व : कदाशीव पेठीय
जात - अजातशत्रु
शैक्षणिक पात्रता : फुलपात्र
कुटुंबप्रमुखांशी नाते : ना ते, ना हे, आहे ना ते
घरातल्या सदस्यांची संख्या : १/२

हा फॉर्म घेऊन अंबिलढगे जिवाच्या आकांताने पळत गेला. कुठे? माहित नाही, कारण तो गावापर्यंत पोहचलाच नाही. सदरच्या फॉर्मचं अंबिलढगेनी काय केलं? - माहित नाही, कारण तो आयोगापर्यंत पोहचलाच नाही. जनगणनेचं पुढं काय झालं? ते ही माहित नाही.

पण एक नक्की जी काही भारताची लोकसंख्या असेल त्यात एक आकडा नक्कीच कमी असेल.... आण्णांचा नाही.... अंबिलढग्याचा...! कारण त्यानी स्वतःचाच फॉर्म भरला नव्हता आणि तो ज्या मेंटल हॉस्पीटलमध्ये भरती झाला तिथली जनगणना आधिच झाली होती.!

धुंद रवी.

गुलमोहर: 

अरे वा धुंद रवी तुम्हाला पुन्हा ईथे पाहून आनंद झाला. कसे आहात? लिखते रहो. लेख वाचला नाही अजून वाचते सवडीने Happy

‘घा-या डोळ्यात’ ह्या शब्दांवरुन काहिही अर्थ काढुन नये. घा-या म्हणजे घार जसं आपल्या सावजाकडे बघते तशा डोळ्यात असा त्याचा अर्थ आहे.>>>> हे खास आहे Wink

ह.ह.पु.वा. ......
आजूबाजूचे (ऑफिसमधले) लोक माझ्याकडे संशयाच्या नजरेने बघत होते.. की ह्याला काय झालं खिदळायला ..!

यू मेड माय डे!!

Pages