किस्सा कुर्सीका !

Submitted by श्यामजी कुल on 13 May, 2012 - 00:53

आरामखुर्ची हा प्रकार बहुतेक कालबाह्य झाला आहे. कदाचित आराम करायला कुणाला वेळच नाही हे असेल किंवा खुर्ची उत्पादकांच्या मते हल्ली तयार होणाऱ्या सगळ्याच खुर्च्या आरामदायी असतात.आमच्या लहानपणी पण आरामखुर्च्यांचे फार वेगवेगळे प्रकार उपलब्ध होते अशातला भाग नाही.एकच सर्वमान्य प्रकार होता आणि तोच बहुतेक बऱ्याच घरात पहायला मिळे.या खुर्चीला जागा बरीच लागत असे. तिचा सांगाडा दोन लाकडी चौकटी गुणाकाराच्या चिन्हाप्रमाणे एकमेकात अडकवून तयार होत असे.त्यातील एक चौकट बरीच मोठी असे.तिच्या दोन बाजूना आडव्या फटी असत .त्यातून ज्यावर बसायचे ते कापड घालून दोन बाजूना दोन दंडगोलाकृती दांडे अडकवण्यासाठी त्या कापडाला शिवणी मारलेल्या असत ही खुर्ची इतकी आरामदायक असे की एकदा बसणारा बऱ्याच प्रयत्नानेच उठू शके. त्याचबरोबर एकीकडचा दांडा काढून कापड पडू दिले नाही तर बसणाऱ्यास त्याची कल्पना नसल्यामुळे तो ऐटीत बसायला जाऊन भुइसपाट होत असे. आम्ही या तिच्या गुणधर्माचा आपापसातील सूड उगवण्यासाठी किंवा वेळीअवेळी घरी येऊन कठीण मराठी (कारण इंग्रजीचे भूत त्यावेळी पालकांच्या मानगुटीवर बसले नव्हते) शब्दार्थ, किंवा पाढ्यातील एकोणतीस सत्ते किंवा पावकी दीडकी ( आताच्या पिढीला ही नावे तरी माहीत आहेत की नाही कुणास ठाऊक) सवायकी असले क्लिष्ट प्रश्न विचारून आम्हाला छळणाऱ्या पाहुण्याना पाडण्यासाठी करत असू.
त्यावेळी मला नुकतीच नोकरी लागली होती आणि वडील सेवानिवृत्त झाल्यामुळे मीच कुटुंबप्रमुख झालो होतो.पहिल्या पगारात आईसाठी साडी घ्यावयाचे मी ठरवले अर्थात वडिलांसाठी धोतरजोडी खरेदी करणेच योग्य ठरले असते.पण त्यावेळी त्यांची वापरातील धोतरजोडी पुरेशी फाटली नाही असा त्यांचा दावा होता.आणि एक वस्तु वापरात असताना दुसरी पर्यायी म्हणूनसुद्धा आणण्याचा प्रघात ( आणि मुख्यत्वे ऐपत)त्यावेळी नव्हता. साध्या चप्पलजोडीचा विचार केला तर वापरातील जोडी झिजल्यावर प्रथम तळाला जोड लावले जायचे,नंतर मग बहुतेक अंगठ्याची पाळी असायची. अशा प्रकारे प्रत्येक चपलेचे सगळे अवयव जमतील तितक्या वेळा बदलल्यावरच दुसरा जोड घेतला जायचा (म्हणजे सुश्री जयललितांच्या चप्पलजोड्या आमच्या गावातील सगळ्या स्त्रियानी चप्पल वापरण्याचे ठरवले असते तर त्याना जन्मभर पुरल्या असत्या.)आणि ही केवळ आमच्यासारख्या त्या काळातील मध्यमवर्गीय ( म्ह. आजच्या कनिष्ठ मध्यम वर्गीय पक्षी दरिद्री)लोकांचीच पद्धत होती असे काही नव्हते.आमच्या संस्थानचे एक राजपुत्रसुद्धा अगोदर हाफ पँटच घालायचे पण तिलाही नवीन शिवतानाच पार्श्वभागावर आतल्या बाजूने दोन ठिगळे लावायचे असे आम्ही ऐकले होते (खरेखोटे त्यांचा शिंपी आणि धोबीच जाणोत) तर अशा तालमीत तयार झालेल्या वडिलानी धोतरजोडी घेण्यास विरोध केल्याने त्यांच्या सेवानिवृत्त जीवनात आराम मिळावा म्हणून बसण्यासाठी आरामखुर्ची घ्यावी या उद्देशाने मग आम्ही घराबाहेर पडलो.
या 'आम्ही'त मी व माझी व्यवहारकुशल भगिनी यांचा समावेश होतो. खरे तर माझ्या तुलनेत कोणीही व्यवहारकुशलच ठरेल याची मला खात्री होती ( आणि आहे पण). शिवाय ती व्यवहारकुशल आहे असा तिचा दावाही होता. मात्र तिने आणलेली कोणतीही वस्तु एकदा तरी बदलून आणावीच लागे.पण दुकानदार कोणतीही सबब न सांगता निमूटपणे तिला वस्तु बदलून देत हाच फार तर तिच्या व्यवहारकौशल्याचा पुरावा मानता येईल.एकदातर तिने आणलेली साडी काही वेळा नेसून धुतल्यावरही केवळ तिच्या मैत्रिणीनी साडीवर केलेली टीका सहन न झाल्यामुळे तावातावाने परत केली होती.
त्यावेळी बाजारात नुकत्याच येवू घातलेल्या लोखंडी फर्निचरमध्ये मिळणारी आरामखुर्ची घ्यावी असे आम्ही ठरवले अर्थात हा निर्णय एका दुकानात शिरल्यावर व दुकानदाराकडून त्या खुर्चीची प्रशस्ती व अर्थातच किंमत ऐकूनच केला होता ही पूर्वीच्या लाकडी खुर्चीचीच लोखंडी आवृत्ती होती फक्त यात कापडाच्या दोन्ही बाजू वरच्या आणि खालच्या दाड्यावरून घेऊन शिवूनच टाकल्या होत्या म्हणजे दांडा काढून पाडण्याची सोय यात नव्हती.मात्र ते कापड फाटले तर काय ही मूलभूत शंका माझ्या व्यवहारकुशल बहिणीस आलीच.यावर त्या दुकानदाराने कापड फाटले तर बदलून देण्याची जबाबदारी घेऊन फक्त कापडाची किंमत गिऱ्हाइकाने द्यायची असे सांगितले.या दुकानदाराचा मूळ व्यवसाय कलालाचा म्हणजे दारू तयार करून विकणाराचा होता.मधल्या काळात दारूबंदीमुळे ( त्यावेळी आपल्या राज्यात दारूबंदी होती)पिढिजात व्यवसाय सोडून हे दुकान त्याने टाकले होते.पूर्वीच्या व्यवसायात गिऱ्हाइकाना काहीही आश्वासन दिले तरी विकलेल्या पेयाच्या अमलाखाली गिऱ्हाईक व कधीकधी तो स्वत: पण असल्यामुळे त्या आश्वासनाची आठवण दोघानाही रहात नसल्याने त्याची पूर्तता क्वचितच करावी लागे हे आश्वासनही त्या संवयीचाच भाग असावा पण हे आमच्या नंतर लक्षात येणार होते. अर्थात आमच्या हा शब्द वापरणे हा केवळ औपचारिकतेचाच भाग आहे कारण मी नेहमीप्रमाणे पूर्णपणे बरोबरच्या व्यक्तीच्या निर्णयकौशल्यावर विसंबून होतो अशावेळी एकादी गोष्ट माझ्या ध्यानात आली तरी मी तिकडे दुर्लक्ष करतो आणि अर्थातच त्याचा पुढे मलाच पश्चाताप करावा लागतो हे वेगळे! आताही या खुर्चीच्या बाबतीत मला एक गोष्ट खुपत होती ती म्हणजे लोखंडी चौकट करताना दोन बाजूमधील अंतर सगळीकडे सारखे रहावे म्हणून मध्ये एक आडवी लोखंडी पट्टी बैठकीच्या भागाकडे वेल्ड केली होती. तिच्यावर बैठकीचे कापड आपण बसल्यावर घासू लागे.त्यामुळे खुर्चीचे कापड त्या जागी लवकरच फाटण्याची शक्यताच नव्हे तर निश्चितीच होती.पण खरेदी तज्ञ बहिणीची मान्यता आणि कापड बदलून देण्याचा दुकानदाराचा वायदा या दोन गोष्टींनी या शंकेवर मात केली व खुर्ची आम्ही खरेदी केली.
कुठल्याही क्षुल्लक खरेदीने आनंद वाटण्याचे ते दिवस असल्यामुळे तेवढ्या खरेदीचेही कौतुक झाले.वडिलानी तिच्यावर बसून तिजे उद्घाटन केल्याचे जाहीर केले (कारण तसे पहाता तिचे उद्घाटन केल्याशिवाय तिच्यावर बसता येतच नसे.)वडील सेवानिवृत्त झाले असले तरी घरात बसून रहाण्याचा पिंड नसल्यामुळे आरामखुर्चीवर क्वचितच बसत,भावंडांना तिच्यावर बसून अभ्यास करणे शक्य नव्हते.आई तर तिला हातही लावत नसे.येऊन जाऊन एवढा गाजावाजा करून तिला खरेदी करणारे आम्ही दोघेच कधी बसलो तर बसत असू तिच्यावर ,नाहीतर ती कोपऱ्यात घडी केलेल्या अवस्थेत उभी असे.म्हणजे घरातील व्यक्तींपेक्षा जास्त आराम तिचाच चालू होता म्हणाना ! पण मूळ तोळामासा तब्येत असणाऱ्या व्यक्तीस कितीही आराम मिळाला तरी थोड्या दगदगीनेही मूळ रोगाने उचल खावी तसेच तिच्याही बाबतीत झाले आणि अगदी मोजक्या व्यक्तीनी तिच्यावर आराम करण्याचे सौख्य उपभोगल्यावर माझी भीती खरी ठरून तिला पट्टीवर घासणाऱ्या भागास प्रथम छोटे भोक आणि छिद्रेश्वनर्था: बहुलीभवंति या उक्तीस जागून ते भोक वाढून तिच्यावर बसणे लवकरच अशक्य झाले.आणि मग खुर्चीविक्रेत्याच्या आश्वासनाच्या सत्यतेचा पडताळा घेण्याची वेळ लवकरच आली.
खुर्ची घेऊन आमची वरात त्या दुकानात पोचल्यावर मालकाने पहिल्यावेळी दाखवलेल्या उत्साहानेच आमचे स्वागत केले. हसतमुद्रेने स्वागत करणे हा त्याच्या विक्रयशास्त्राचा भाग होताच पण आमचे आगमन त्याला अपेक्षितही असावे असाही भाव त्याच्या हास्यातून सूचित होत असल्याचा भास मला झाला.खुर्ची आमच्याबरोबर असल्याने आमच्या येण्याचे कारण त्याला समजल्यातच जमा होते. पण तरीही आपल्या खुर्चीचे अवमूल्यन आपणच केले असे व्हायला नको म्हणून एक औपचारिकता पुरी करण्याच्या हेतूने त्याने विचारले" काय साहेब,आज कशासाठी येणं केलत ?" खुर्चीच्या दुरुस्तीसाठी इतक्या लवकर त्याच्याकडे जावे लागणे ही गोष्ट माझ्या मनात डाचत असली तरी त्यात माझ्या ज्ञानाचेही दिवाळे निघाल्याची जाणीव मला जास्त क्लेशदायक वाटत होती.पण माझ्या बहिणीला अशी खंत बाळगण्याचे काही कारण नव्हते शिवाय तिने यापूर्वी अशा अनेक विक्रेत्याना लोळवले होते.त्यामुळे कठिण प्रसंगातही धैर्य न सोडण्याच्या आपल्या वृत्तीला जागून तिने ," अहो कसली खुर्ची गळ्यात घातलीत आमच्या ,लगेच कापड फाटलेसुद्धा" असे म्हणत त्याच्यावर हला केला. अशा हल्ल्याची संवयच असल्यामुळे आपली मन: शांती मुळीच ढळू न देता त्याने " अहो ताई अशा रागावता कशाला, कापड बदलून देण्याची बोली आहे ना आपली ? उलट तुम्हाला परत नव्या खुर्चीत बसण्याचा आनंद मिळेल,हव तर कापडाचे पैसेही देऊ नका मग तर झाल ?"म्हणून तिच्या रागाचा पारा उतरवण्याचा प्रयत्न केला पण अशा गोड शब्दांना बळी पडणाऱ्यापैकी ती नव्हती.त्यामुळे "ते कापड किती टिकणार की घरी नेतानेताच फाटणार ?"असे विचारून त्याला नामोहरम करण्याचा प्रयत्न तिने केलाच.पण असे शेकडो हल्ले दररोज पचवण्याची संवय असल्याने त्याने तिला शांत करण्याचा आणखी एक प्रयत्न करत म्हटले," काय बोलताय ताई,आता खुर्ची तुटली तरी फाटणार नाही असे कापड बसवून देतो मग तर झाल?" तस होण हे तर आणखीच त्रासदायक होत पण मी मध्ये बोलण्याचा मोह टाळला.या आमच्या दुकानभेटीची फलश्रुती खुर्चीच माहेरी आगमन येवढीच होण्याची शक्यता असल्याने मी तेथून बाहेर पडण्याची तयारी दर्शवीत " मग खुर्ची नेण्यास आम्ही परत केव्हां येऊ?"असे विचारले, त्यावर त्याने " याकी साहेब,दोनतीन दिवसात,आणि तसच जायच नाही बरका चहा मागवलाय" अस म्हणून आमच्या रागाच्या आगीवर चहाच पाणी मारण्याचा प्रयत्न केला
दोन तीन दिवसांच्या वायद्याचा अर्थ माहीत असल्यामुळे व आरामखुर्चीवाचून कुणाच काही अडत नसल्यामुळे तब्बल एक आठवड्याने मी दुकानात डोकावलो. आरामखुर्ची आमच्या मागच्या भेटीत ज्या ठिकाणी ठेवली होती त्याच जागी आराम करत होती. अर्थातच तिच्यावर बरेवाईट कसलेच संस्कार झालेले मव्हते. मला पाहिल्यावर आश्चर्य वाटल्यासारखे दाखवून दुकानदार म्हणाला," अरे साहेब तुम्ही?" त्याच्या या उद्गारामुळे आपलीच काही चूक झाली नाही ना असा संशय मला आला. शिवाय माझी पाठराखीण माझ्याबरोबर नसल्याने माझ्या मनोधैर्याची पातळी म्हणावी तितकी उच्च नव्हती उलट तिच्या गैरहजेरीमुळे तेंडुलकराविना खेळणाऱ्या भारतीय संघासारखीच माझी अवस्था आहे हे त्या चतुर गृहस्थास पुरेपूर माहीत होते. त्याने मला बसण्याची विनंती करून लगेच पोऱ्याला चहा आणण्यास पाठवले. आपल्या स्वरात जेवढा कडकपणा आणता येईल तेवढा आणण्याचा प्रयत्न करीत मी म्हणालो,"हे पहा चुनिलाल, मी चहा पिण्यासाठी तुमच्या दुकानात आलो नाही." असे कडक बोलण्याचा प्रयत्न मी करतो तेव्हा समोरच्या व्यक्तीला मात्र मी विनोद करण्याचाच प्रयत्न करतो आहे असे का वाटत कुणास ठाऊक. आताही तसेच झाल्यामुळे चुनीलालने त्याच्या अगोदरच विनोदी शैलीचा वापर करत,"हे काय बोलण झाल साहेब ? आता पूर्वी आमच्याकडे ह्याच्यासाठीच लोक आमच्याकडे यायचे ते वेगळ !" असं ओठाला मूठ टेकत दारू पिण्याचा अभिनय करीत म्हटले.त्याच्या विनोदामुळे मी रागावणार नाही अशी त्याची जी कल्पना होती ती मात्र खरी ठरली.कारण माझ्या कडक बोलण्याने समोरच्या व्यक्तीपेक्षा मलाच जास्त वाईट वाटतं आणि हा माझा दुबळेपणा याही वेळी वर उसळून आल्यामुळे तो सहीसलामत सुटला.
मग गुळमुळीत शब्दात मी " मग आमच्या खुर्चीच काय झाल ?" असं विचारल.खर तर खुर्चीच काहीच झालेलं नाही हे मला स्पष्ट दिसत होते.मात्र मी प्रश्न विचारल्यावर चुनिलालला एकदम जोर आला,आणि तो म्हणाला," काय सांगू साहेब,खुर्चीला कापड लावून दुसऱ्या दिवशीच तयार ठेवायला सांगितल होत पण तो टेलरचा बच्चाच तेव्हापासून गायब झालाय."
" मग तो केव्हा येणार ?"मी उगीचच काहीतरी विचारायच म्हणून विचारल.कारण या प्रश्नाच उत्तर त्या टेलरच्या बच्चालाच माहीत असण्याची शक्यता होती‌ शिवाय त्या उत्तरावर माझ्या खुर्चीच भवितव्य अवलंबून नाही याचीही पूर्ण कल्पना मला होती..
" तो केव्हा यायचा असेल तेव्हां येऊदे " चुनिलाल मोठ्या औदार्याने उत्तरला,"पण आता तुमच्या खुर्चीच काम मात्र उद्या तो नाही त्याच्या बापाकडून करून घेतल्याशिवाय माझ समाधान होणार नाही.तुम्हाला अशा चकरा मारायला लावायला बर वाटत नाही साहेब"
त्यच्या या आवेशाने जरा बरे वाटून ,"ठीक आहे ,मग उद्या येतो" असे म्हणून मी दुकानाबाहेर पाय ठेवत होतो तेवढ्यात एक पोरगेलासा दिसणारा माणूस माझ्या पाठीकडून चुनिलालला उद्देशून " शेट, आजतरी कापड आणून द्या म्हंजे त्या खुर्चीचा निकाल लावता येईल"म्हणत असताना ऐकू आल्यावर हाच तो टेलरचा बच्चा असावा आणि तो गायब वगैरे झाला नसून ते चुनिलालच्याच कल्पनाशक्तीच चातुर्य आहे हे माझ्या लक्षात आले. पण चुनिलाल मात्र काहीच घडले नसल्याच्या थाटात म्हणाला," बघा साहेब,हा आला आमचा टेलर,आता तुमचे काम झालेच समजा ! उद्या केव्हाही तुमच्या सोयीन या आणि खुर्ची घेऊन जा."
या वेळी मात्र उद्याचा वायदा टाळण्याचा प्रयत्न चुनीलाल करणार नाही अशी खात्री असल्याने मी स्वस्थ चित्ताने दुसऱ्या दिवशी त्याच्या दुकानात जायच ठरवल,तरीही प्रत्यक्ष दुकानात शिरताना माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकतच होती. पण चुनिलालच्या चेहऱ्यावरील आश्वासक हास्यातून " सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज ।" असे अर्जुनास बजावणाऱ्या श्रीकृष्णाचाच भास मला झाला.
"या साहेब खुर्ची तयार आहे " या त्याच्या उद्गारानी तर उरल्यासुरळ्या सर्व शंकांचे समाधान झाले आहे असे अर्जुनाप्रमाणेच म्हणाव असं मला वाटू लागलं आणि दुसऱ्याच क्षणी खुर्चीवर दृष्टीक्षेप टाकताच आता अर्जुनाप्रमाणे मला लढायलाही तयार व्हाव लागणार असं वाटू
कारण पूर्वी खुर्चीच्या ज्या भागाला कापड लावल्याने तिला आरामखुर्चीपद प्राप्त झाले होते त्याच्या बरोबर उलट्या आणि छोट्या भागास त्या शिंप्याने कापड लावून त्याला तान्ह्या बाळाची झोळी करूब टाकले होते.या झोळीचा वापर करण्यासाठी मला लग्नापासून तयारी करयला लागली असती.खुर्ची चुनिलालपुढे उघडून ठेवूम शक्य तितक्या चढ्या स्वरात मी म्हणालो, " हे काय करून ठेवलेय तुम्ही ?" खुर्चीकडे पाहून त्यालाही हसू आवरेना. आपल्या हसण्याचा गिऱ्हाइकावर काय परिणाम होईल याचीही त्याला काळजी नसावी किंवा त्या खुर्चीकडे पाहून त्याला बाकी कुठल्याच गोष्टीचे भान उरले नसावे.
" त्या टेलरच्या बच्चाचा हा सगळा प्रताप"अगदी हसत हसत तो म्हणाला," हो पण त्यावेळी तुम्ही काय करत होता ?" अस विचारण्यापूर्वीच गिऱ्हाइकासाठी नसली तरी तो स्वत: पुरती तरी गाळत असावा याची मला खात्री पटली.तरीही चुनिलाल पूर्वीच्याच उत्साहाने मला त्याची नवी योजना ऐकवू लागला."काळजी नको साहेब" खर तर काळजी करण्याचा पूर्ण भार माझ्यावर टाकून काळजी न करण्याची बाजू त्याने उत्तम रीतीने संभाळली असल्याने असा सल्ला मला देण्यास त्याच्याइतका लायक माणूस शोधूनही सापडला नसता.
" आत्ताच्या आत्ता त्या टेलरची मान पकडून नवे कापड टाकायला लावतो."चुनिलाल उवाच.
" पण त्यापूर्वी हे कापड काढायला सांगा" आता कुठलाही धोका पत्करण्याची माझी तयारी नव्हती.त्यामुळे मी म्हणालो.
" काय साहेब, हे काय सांगायला पाहिजे का?" इति चुनिलाल. खर तर आता त्याला काहीही सांगण्याची माझी इच्छा नव्हती.भर्तृहरीच्री चुकून गाठ चुनिलालशी पडली असती तर या माणसाला कुठलीही गोष्ट समजावण्याचे शिरसि मा लिख मा लिख मा लिख ! असा श्लोक त्याला लिहावा वाटला असता.
"मग मी आता उद्या येतो" व्याधाशी परत येण्याचा वायदा करणाऱ्या हरिणीच्या व्याकुळतेने मी म्हणालो.फक्त व्याध हरिणीची वाट पहाणार होता तर चुनिलाल मला वाट पहायला लावण्याचा विक्रम प्रस्थापित करून आपले नाव गिनीच्या पुस्तकात येण्याची वाट पाहात होता. " अगदी बिनधास्त या साहेब आणि समजा मी जरी येथे नसलो तरी खुर्ची येथे तयारच राहील आणि येथे बसणाऱ्या माणसाला मी सांगून ठेवीन" आता चुनिलालने नकळत दुसऱ्या एका संकटाची म्हणजे पुढील वेळी त्याच्या दुकानात नसण्याच्या शक्यतेची घंटा वाजवून ठेवली.आणि खुर्चीही त्याच्याच तालमीत तयार झाल्यामुळे तिनेही समझनेवालोको इशारा काफी होता है या न्यायाने त्याच्या पावलावर पाऊल ठेवण्याचे ठरवले असावे.त्यामुळे दुसऱ्या दिवशी मी दुकानात गेलो तेव्हा दुकानात चुनिलाल व खुर्ची दोन्हीचा पत्ता नव्हता.एवढेच काय त्याच्या गैरहजेरीत तेथे बसणारा माणूसही त्याला उपलब्ध झाला नसावा.खरे तर त्याचे दुकानही तेथून बेपत्ता झाले असते तरी आता मला आश्चर्य मुळीच वाटले नसते.
पण शेजारच्या दुकानदाराचे माझ्याकडे लक्ष गेले.खुर्चीसाठी त्या भागात आम्ही इतक्या चकरा मारल्याने आम्ही आणि आमची खुर्ची यांनी त्या भागात बऱ्यापैकी प्रसिद्धी संपादन केली होती.त्यामुळे त्या दुकानदाराने चुनिलालचे घर जवळच असून तेथे कसे जायचे याविषयी बहुमोल मार्गदर्शन मला केले. त्याला अनुसरून मी त्याने सांगितलेल्या जवळच असणाऱ्या इमारतीत गेलो.तेथील चिंचोळ्या आणि अंधाऱ्या जिन्याच्या पायऱ्या चढताना हैदराबादच्या चार मिनारच्या पायऱ्या चढल्याचा भास मला झाला.त्या एकूण चौसष्ठ पायऱ्या होत्या हे पुढे बऱ्याच वेळा त्या चढाव्या लागल्यामुळे मला पाठ झाले.पुढेपुढे तर त्या मी डोळे मिटून चढू शकेन येवढा आत्मविश्वासही मला आला.अर्थात पहिल्याच वेळी मी घरी गेल्यावर चुनिलाल घरी नव्हता हे सूज्ञांस सांगणे नलगे !
चुनिलालच्या घराचा पत्ता लागल्यावर एका घूंघट सावरत येणाऱ्या स्त्रीन " सेठ बाहर गये है" हे शुभवर्तमान मला दिल.ती अर्थातच त्याची बायको असावी. तेवढ्यात चुनिलालचा दहा बारा वर्षाचा मुलगा तेथे आला. त्याच्याकडून अधिक माहिती मिळाली तर पहावी म्हणून बाबा कुठे गेले आहेत असे विचारल्यावर त्याने बाबा आठ दिवसासाठी बाहेरगावी गेल्याची बातमी मला दिली.त्यामुळे खर तर माझ्या पोटात गोळा यायला हवा होता पण तसे काही न होता उलट आठ दिवस आपल्याला चकरा माराव्या लागनार नाहीत व चुनिलालचे तोंड पहावे लागणार नाही या कल्पनेने मला बरेच वाटले.
पण माझ्या लढाऊ बहिणीस मात्र हा आमच्या संपूर्ण खानदानचा अपमान आहे असे वाटून तिने चुनिलालचा पिच्छा पुरवण्याचे ठरवले.तिचा महाविद्यालयास जाण्याचा रस्ता तिच्या सुदैवाने आणि चुबिलालच्या दुर्दैवाने बराचसा त्याच्या दुकानावरून जात असल्याने तिला त्यासाठी स्वतंत्र वेळ काढावा लागणार नव्हता .थोडक्यात दुसऱ्या दिवसापासून माझा कार्यभार तिच्यावर सोपवून फक्त आता चुनिलालचे कसे होणार एवढी काळजी सोडता मी निश्चिंत झालो. खरतर या चुनिलाल प्रकरणात थोडी विश्रांती घ्यावी असे मला वाटत होते.मालिकेचा भाग दाखवण्यापेक्षा ब्रेकमध्येच जास्त वेळ घालवणाऱ्या दूरदर्शनचे या बाबतीत माझ्याशी चांगले जमते.पण माझ्या अवतीभवतीच्या लोकाना माझे असे ब्रेक घेणे आवडत नाही. चुनिलाल आठ दिवस गावालाच गेल्यामुळे तो काळ तरी शांततेत जाणार असे मी गृहित धरले होते पण माझी ही शांततेची आवड इतरेजनाना मानवत नाही. माझ्या बहिणीने कुठुनतरी बातमी काढली की चुनिलाल गावाला वगैरे कुठे गेला नसून आपल्या मुलाला त्यान तशी थाप मारायला सांगितले होते. अर्थातच आता पुन्हा एकदा चुनिलालच्या दुकानाची आणि तो घरी मसल्यामुळे त्याच्या घराची पायरी ( नव्हे बऱ्याच पायऱ्या) चढणे पुन्हा माझ्या नशिबी आलेच.खरतर आमच्या खुर्चीसाठी नाही तर निदान स्वत:च्या धंद्यासाठी तरी त्यान दुकानात रहाव अस मला वाटू लागल.पण खुर्ची प्रकरण त्यान फारच मनाला लावून घेतल्यासारख दिसले.त्यासाठी त्यान स्वत: च्या धंद्यावरही पाणी सोडायच ठरवल्यासारख वाटू लागल.त्याच्या वागण्यातही पूर्वीचे अगत्य राहिले नाही.खर तर येवढ्या क्षुल्लक गोष्टीसाठी त्यान आपली इभ्रत का पणाला लावावी हे अनाकलनीय होत हल्ली ती खुर्ची त्याच्या दुकानात वा घरी कुठेच दिसत नसे‌ शेवटी कंटाळून त्याच्या दुकानात एक गार्डन चेअर पडली होती तीच घेऊन जाण्याची धमकी मी त्याला दिली आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे मुळीच आढेवेढे न घेता त्याने माझी मागणी मान्य केली,बहुतेक तीही खुर्ची खपणार नाही अशी त्याची खात्री असावी.
अशा प्रकारे घरात गार्डन नसताना गार्डन चेअर माझ्या घरात आली,पण त्या खुर्चीचा उपयोग बागेत फक्त शोभेची वस्तु म्हणून ठेवण्यासाठी व्हावा असा चुनिलालचा दृष्टिकोन असावा त्यामुळे तिचा पाया त्यान इतका कमी ठेवला होता की तिच्यावर बसणारी व्यक्ती थोडे पाठीकडे रेलून बसू लागली की ती पाठीकडे कलंडत असे. थोडक्यात जुन्या पद्धतीच्या लाकडी आरामखुर्चीत बसणाऱ्या व्यक्तीस पडण्याची जी शक्यता होती तिला चुनिलालने या खुर्चीचा गुणधर्मच बनवले होते.त्यामुळे आमच्याकडे येणाऱ्या नव्या माणसास त्या खुर्चीवर बसण्याचा मोह झालाच तर प्रथम त्याला या खुर्चीचे हे वैशिष्ट्य समजावून सांगणे हा त्याच्या स्वागताचा महत्त्वाचा भाग असे ,नाहीतर त्याचे स्वागत फारच वेगळ्या प्रकारे होऊन एक मित्र आम्हास कायमचा दुरावत असे. अजूनही जुन्या वस्तु जपण्याच्या भारतीय परंपरेनुसार ती खुर्ची माझ्या घरात आहे.तिच्यावर बसून माझे बहुतेक मित्र,घरातील एकूणएक माणसे पडलेली आहेत.आता तिचा उपयोग माझी मांजरी करते.आणि फक्त तीच त्या खुर्चीवरून पडण्याची धास्ती न बाळगता आराम करू शकते.

गुलमोहर: 

छान लिहिलेय... आवडले.

चुनिलालने चुना लावला तर...>> Lol