हिर्‍याची अंगठी

Submitted by मानुषी on 10 May, 2012 - 09:13

( खरं म्हणजे हे मला अमेरिकेत भेटलेल्या "आसेफ़ा"चं हे व्यक्तीचित्रण आहे. पण तिला भटल्यानंतर तिचं आयुष्य, तिचं अष्टपैलू व्यक्तिमत्व, हे सगळं इतकं नाट्यमय वाटलं की असं वाटलं की हे कथेच्या रूपातच सादर करावं. मात्र नावं बदललेली आणि शेवट काल्पनिक आहे.)

// हिर्‍याची अंगठी //
नेहेमीचा पाच मैलांचा कोटा पूर्ण करून आभा पार्कमधल्या बेंचवर टेकली. घोटभर गेटोरेड प्यायली. जरा जीव थंडावला.
समोर नेहेमी क्रॉस होणारा रनर्सचा ग्रूप दिसत होता. आजही त्याच्यांत "ती" सुद्धा होतीच. दोघींची ब़र्‍याच वेळा या पार्कमधे गाठ पडायची. नजरानजरही व्हायची पण कधी बोलण्याचा प्रसंग आला नव्हता.
अरे, आज ती आभाच्याच दिशेने येत होती.
"हाय, डिड् यू फ़िनिश?"त्या देखण्या तरुणीने अचानकच सामोरी येत, स्मितहास्य करत आभाला विचारलं! आणि तिच्या सुंदर शुभ्र धवल दंतपंक्तींचं दर्शन झालं. जणू मोत्यांचा सरच! आभा पहातच राहिली.
"या! जस्ट नाऊ! बट इट्स् ह्युमिड टुडे." आभा घाम पुसता पुसता म्हणाली. तिलाही संभाषण चालू ठेवायचं होतं!
आभाला वाटाय़चं कोण असेल ही सुंदर तरुणी? अमेरिकन तर निश्चितच नाही, एशियनच वाटते! असणार एशियनच, म्हणूनच तीही सारखी पहात असते.
"या, टू ह्युमिड!" तिने आपला घनदाट, मोकळा केशसंभार एका हेअर बॅंडमधे अडकवला आणि हात पुढे करत म्हणाली,"आय ऍम आसेफ़ा!"
"ओह्, नाइस टू मीट यू, आय ऍम आभा!" आभाने तिच्याशी हात मिळवला.
आणि मग ही मैत्री स्थल काल सापेक्ष अशी फ़ुलत गेली. या मैत्रीच्या आड धर्म, जात, वंश, वय, शिक्षण,रंग रूप काहीच आलं नाही.
----------------------------------------------------------------------------------------
"हाय आभा, आय विल पिक यू अप् टुडे, आज आपण माझ्या कारमधून जाऊ, तयार रहा, मी पाच मिनिटात पोचते." आसेफ़ाचा मेसेज होता.
आभा शूजच घालत होती. ओजस अजून ऑफ़िसमधून यायचा होता.
दोघी मैत्रिणी एकाच ऑफ़िसमधे वेगवेगळ्या डिपार्टमेंटमधे आणि वेगळ्या बिल्डिंग्जमधे काम करत होत्या. आज दोघी लवकर घरी आल्या होत्या. आणि वेळेचा सदुपयोग करण्यासाठी पार्कमधे रनिंगला जायचं ठरलं.
आभा कारमधे बसली. कार स्टार्ट झाली आणि काय आश्चर्य! गाडीतलं वातावरण यमनच्या सुरावटींनी भरून गेलं!
"येरी आली पियाबिन.......सखी कल ना परत मोहे घडी पल छिन दिन...."
इथे अमेरिकेत, अश्या कातरवेळी, अचानक असा "यमन" उभा ठाकला, आभा एकदम मोहरूनच गेली.
"अरे, तुलाही इंटरेस्ट आहे, शास्त्रीय संगीतात?" तिने एकदम हर्षभरित स्वरात आसेफ़ाला विचारलं.
"अगं, मी शिकतीये. पण मला तशी काहीच पार्श्वभूमि नाही ना संगीताची, त्यामुळे पिकपला जरा वेळ लागतो गं. म्हणूनच जे क्लासमधे चाललेलं असेल तेच सगळीकडे सारखं ऐकायचं, घरी दारी, गाडीत!" आसेफ़ा गाडी चालवता चालवता बोलत होती.
"का गं? पण तिकडे पाकिस्तानात तर शास्त्रीय संगीताचं खूप असेल ना?" आभाचा बाळबोध, भाबडा प्रश्ण!
"नाही गं, अगदी गैरसमज आहे हा. आमच्या लहानपणी, गाणं ऐकणं सुद्धा फ़ारसं शिष्ट संमत नव्हतं. शिकणं तर खूपच लांबची गोष्ट! तेव्हा रेडिओ असायचा घरी, पण लावताना अम्मी अब्बूंची परवानगी घ्यायला लागायची. त्यामुळे कानावर काही फ़ारसं पडलंच नाही गं!" आसेफ़ाने गाडी जॉगिंग पार्कच्या बाहेरच्या पार्किंग लॉटमधे लावली.
अजून हळूहळू ओळख होत होती. त्यामुळे दोघी एकमेकींविषयी जाणून घ्यायला अगदी उत्सुक असत.
"आता चान्स मिळतोय ना, मी शिकून घेतेय. खूप आवडतं गं मला! माझी गुरू बंगाली आहे. पण इथेच आहे गेली कित्येक वर्षं, अमेरिकेतच!" आसेफ़ा म्हणाली.
रनिंगचा नेहेमीचा कोटा पूर्ण करून दोघी मैत्रिणी आपापल्या घरी गेल्या.
-----------------------------------------------------------------------------------------
शनिवारची निवांत, आळसटलेली सकाळ! ओजस चहा करत होता. आभा अजून अंथरुणातच!
"आभा, उठ ना. चहा थंड होतोय. मग आपल्याला "होलफ़ूड्स"लाही जायचंय. ग्रोसरी करायचीये ना? आई येण्यापूर्वी सामान नीट भरून ठेवू या." सासूबाई यायच्या होत्या, म्हणून ओजस चहा करता करता पुढचं प्लॅनिंग करत होता.
"उठते रे! आज तरी झोपू दे ना निवांत!" म्हणता आभानं स्वता:ला पुन्हा नव्याने पांघरुणात गुरफ़टलं.
ओजसचं लक्ष होतंच. त्याने तिचं पांघरूण एका झटक्यात ओढून बाजूला फ़ेकलं. झालं, सकाळीच दोघांची झटापट सुरू झाली. तेवढ्यात आभाचा फ़ोन वाजल्याने आभाने नव़र्‍याकडे सपशेल दुर्लक्ष केलं आणि फ़ोन उचलला.
"हाय आशू" करत तिने परत अंथरुणावर बैठक मारली. आणि गप्पा सुरू!
"आसेफ़ाची आशू झाली का?" ओजस स्वता:शीच पुटपुटला आणि त्याने वैतागलेल्या नाटकी चेहेऱ्याने चहाचा कप खाली ठेवला आणि तो आरशासमोर दाढी करू लागला.
त्याला माहिती होतं की "खालाजान"चा फ़ोन म्हणजे तासाभराची निश्चिंती!
ओजस आणि आसेफ़ा जेव्हा पहिल्यांदा भेटले तेव्हाच तिने जाहीर केलं की ओजस थेट तिच्या इस्लामाबादेतल्या भावाच्या मुलासारखा दिसतो. तेव्हापासून ओजसचा उल्लेख "अपना छोटू" असाच करायची. ओजसच्या तोंडावर नाही, पण त्याच्या अपरोक्ष!
मग ओजसही काही कमी नव्हता! तोही तिचा उल्लेख खाजगीत, आभाजवळ "खालाजान"असा करायचा!
तसंही या दोघांपेक्षा आसेफ़ा चांगली बारा तेरा वर्षांनी मोठी होती. पण नियमित व्यायाम, खाण्यापिण्याबाबतीत अतिशय चोखंदळपणा आणि जीवन असोशीने आणि भरभरून जगण्याची लालसा, ऊर्मी, या सगळ्या गोष्टींमुळे तिचं वय कळायचंच नाही.
"आभा, खूप महत्वाचं काही तरी बोलायचंय." आसेफ़ा म्हणत होती.
"अगं मग आज ये ना तूच घरी. ओजसला आज ऑफ़िसच्या पार्टीला जायचंय. मग बोलू. आणि हो, आई येतेय ना नेक्स्ट वीकेंडला. आशू ..आय ऍम सो एक्सायटेड!" आभाला तिला ही न्यूज द्यायचीच होती.
"हां यार! मलाही भेटायचंय तुझ्या "हाय टेक" आईला! आपला छोटूपण खूष असेल ना आता? बिचार्‍याला आता जरा चांगलं जेवण मिळेल ना आई आल्यावर!" आसेफ़ा हसत हसत मैत्रिणीची खेचत होती.
"हं, आता काय? महिना दोन महिने सासूच्या तावडीत! बिच्चारा ओजस गं!" हे वाक्य आभाने नवर्‍याकडे पहात, त्याला ऐकू येईल असं टाकलं. ओजसने दाढी करता करता ऐकून न ऐकल्यासारखं केलं.
"अगं आणि "हाय टेक" वगैरे काही नाही गं. तिकडे भारतात आईच्या सगळ्या मैत्रिणी कंप्युटर लिटरेट आहेत." आभा पुढे म्हणाली.
"हां यार! वही तो बोल रही हूं मै! याला म्हणतात भारत! इकडे तर आपली संस्कृतीही जिवंत ठेवतात आणि इकडे नवीन टेक्नॉलॉजीही ऍक्सेप्ट करतात. आणि आभा, स्त्रियांना मनासारखं वागता आलं पाहिजे, त्यांना विचारांचं स्वातंत्र्य पाहिजे तरच त्या पुढे जाऊन काही तरी करू शकतात. तिकडे नाही गं एवढं स्वातंत्र्य स्त्रियांना! अर्थातच हळूहळू बदलत्या काळाबरोबर बदलतंय दृश्य!" आसेफ़ाला भारताविषयी फ़ार आकर्षण होतं! ती भारताबद्द्ल नेहेमीच असं बोलायची. आणि तिकडे म्हणजे पाकिस्तानात!
"एवढं मात्र खरं आहे. पण आशू, भारतात सुद्धा खेड्यापाड्यात अजूनही स्त्रियांची परिस्थिती एवढी बरी नाही. तिकडेही खूप अत्याचार होतात स्त्रियांवर. आणि मुळात स्त्री जन्मालाच विरोध आहे समाजाचा......." आभा म्हणाली.
आतापर्यंत ओजसची दाढी झाली होती. त्याच्या कानावर आभाची वरची वाक्यं पडलीच होती. त्याला काय तेवढंच पुरलं!
"अहो मॅडम, सगळी खेडी सुधारणार आहेत आता भारतातली. तुम्ही दोघी नका इथून काळजी करत बसू. सध्या अंथरुणातून उठायला काय घेशील?" ओजस आत्तापर्यंत सगळं आवरून बाहेर पडण्याच्या तयारीत होता.
"एक कप गरम चहा!" आभाने फ़ोनवर हात ठेऊन नवऱ्याच्या प्रश्नाला मिश्किलपणे उत्तर दिलं आणि पुन्हा फ़ोनवरचा हात काढून मैत्रिणीशी संभाषण चालू ठेवलं.
"क्या कह रहा है अपना छोटू? चल फ़िर शामको मिलेंगे!...मैंने बोला था ना कुछ बताना है तुम्हे!" म्हणून आसेफ़ाने फ़ोन बंद केला. तिला ओजस काही तरी म्हणतोय एवढं कळलं. आणि "कुछ बताना था" म्हणजेच वरसंशोधन मोहिमेत काही तरी प्रगती झालेली दिसते हेही आभाला कळलं. ओजसने चहाचा कप बायकोच्या पुढे केला.
-----------------------------------------------------------------------------------------
दोघी मैत्रिणींच्या मैत्रीचा गोफ़ आता घट्ट विणला जात होता. दोघींच्या बर्‍याचश्या आवडी निवडी सारख्या होत्या.
एकेमेकींची किती तरी छोटी छोटी खूप गुपितं दोघींनी मनाच्या कुपीत अलगद जपून ठेवली होती.
आभा तिला, कधी आईने ईमेल करून पाठवलेला वीणाताईंचा एखादा तराणा, तर कधी एखादा विनोदी फ़ॉरवर्ड, कधी आभाच्या भावाचे, विभासचे फ़ोटो, असं काहीबाही सतत पाठवायची. आणि आसेफ़ाही कायम तिला इस्लामाबाद, तिचं बालपण, तिची भावंडं, याविषयी सांगत रहायची, फ़ोटो दाखवायची. काही कमी पडलं तर फ़ेसबुक होतंच! त्यामुळे आता एकमेकींची माणसं फ़क्त प्रत्यक्ष, समक्ष पहायचीच शिल्लक होती.
आसेफ़ाच्या काही काही गोष्टी साध्याभोळ्या आभाच्या कल्पनेच्याही पलिकडच्या असत.
उदा. आसेफ़ाने फ़ेसबुकवरही आपली दोन एकदम वेगळी प्रोफ़ाइल्स बनवली होती. दोन्हीकडची मित्रमंडळी वेगळी. आभाने जेव्हा हे पाहिलं तेव्हा तिला खूपच आश्चर्य वाटलं होतं. पण आसेफ़ाने तिला त्याचंही स्पष्टीकरण दिलं होतं आणि आभाला ते पटलंही.
इथे अमेरिकेतल्या पार्ट्या, पाश्चिमात्य कपडे आणि बाकीच्या ऍक्टिव्हिटीज ...हे सगळं पाकिस्तानातल्या लोकांना काहीच झेपलं नसतं! म्हणून हे सगळं अमेरिकन प्रोफ़ाइलवर आणि संपूर्ण अंग झाकणारे, सुंदर भरतकाम केलेले पाकिस्तानी पंजाबी ड्रेसेसमधले फ़ोटो असलेलं वेगळं प्रोफ़ाइल...... पाकिस्तानी स्नेही, नातेवाईक यांच्यासाठी!
आसेफ़ाची सगळ्यात धाकटी बहिण सबा आणि कुटुंबीय याच शहरात रहात होते. सबाचा नवरा हा पाकिस्तानी इल्लिगल इम्मिग्रन्ट होता. तरी आपल्या तीन मुली आणि एक मुलगा एवढ्या अपत्यांसह हे दोघे नवरा बायको अगदी आनंदात नवलाईचं अमेरिकन आयुष्य जगत होते, बर्‍याच रिस्ट्रिक्शनस् सह! त्यांचीही कधीमधी आभाशी भेट व्हायची.
-----------------------------------------------------------------------------------------
संध्याकाळी ओजस पार्टीला गेला आणि आसेफ़ा आली.
आभाला साधारण अंदाज होता की ती सध्या सलमान नावाच्या मुलाला(!) भेटतेय. आणि त्याबद्दलच तिला आभाला काही सांगायचं होतं! वयाची चाळिशी उलटली तरी अजून तिने स्वता:च्या लग्नाची आशा सोडली नव्हती. वेगवेगळ्या मॅरेज वेबसाइट्सवरून येणार्‍या प्रपोजल्समधून योग्य वाटतील अश्या मुलांना ती भेटत असे. पण तिला टिपिकल पाकिस्तानी नवरा नको होता. आतापर्यंत तिला तसं बंधमुक्त आणि मनासारखं आयुष्य जगायची सवय झालेली होती. त्यामुळे आता तिला नवरेशाही गाजवणारा नवरा चाललाच नसता.
तिचं विलक्षण मनस्वी व्यक्तिमत्व ज्याला झेपेल असा पाकिस्तानी मुलगा तिला आजवर भेटलाच नव्हता.
"आशू, मला वाटतं तुला थोडं तरी कॉंम्प्रमाइज, कुठे तरी थोडी ऍडजस्टमेंट करायलाच लागेल गं. हा सलमान जर खरंच इंटरेस्टेड असेल आणि बर्‍याचश्या गोष्टी जर जुळत असतील तर मात्र हा मुलगा तू हातचा सोडू नयेस असं मला तरी वाटतं." आसेफ़ाचं थोडं ऐकून घेतल्यावर आभाने, लग्नाबाबतच्या स्वता:च्या सिनियॉरिटीचा फ़ायदा घेत मैत्रिणीला मनापासून सल्ला दिला.
"अरे वा! तू काही केलंस का ऍडजस्ट? यार, मुझे तो तुम दोनोंको देखके हमेशा लगता है, आंटीने कैसे ढूंढा होगा छोटूको तेरे लिये! एकदम् परफ़ेक्ट! आभा, ऍडजस्ट कर म्हणायला सोपं आहे गं. पण खूप तडजोडी करत जीवन जगणं कठिण आहे गं. आणि का म्हणून तसं जगायचं?...तडजोडी करत?" आसेफ़ा जरा उसळूनच म्हणाली.
आभाच्या लग्नाचा अल्बम तर किती वेळा पाहिला तरी तिचं समाधानच व्हायचं नाही. "कितनी धूमधामसे कर दी तेरी शादी, तेरे मम्मीडॅडीने! आभा, तू लकी है यार!"
मधेच कधी तरी म्हणायची, "आभा, आंटीजीको बता दे ना, मेरे लिये भी कोई अच्छासा लडका ढूंढे, इंडियाका!"
मग आभा म्हणायची,"आता आई येणारे ना, तूच सांग तिला."
-----------------------------------------------------------------------------------------
आई आल्यानंतर एक दोन दिवसातच तिचा जेट लॅग वगैरे संपल्यावर मायलेकींनी भटकंतीला सुरवात केली होती. ओजसही शक्य असेल तिथे त्यांना कंपनी द्यायचा. पण बऱ्याच वेळा तो त्यांना त्यांची स्पेस देत असे.
"ओजू, आज मी आईला घेऊन जॉर्जटाऊनला चाललीये. तिथेच आसेफ़ाही येणार आहे, ऑफ़िसातून परस्पर. तू येणार का तिकडे संध्याकाळी तुझं ऑफ़िस झाल्यावर?" आभा विचारत होती. पण ओजस ऑफ़िसला जायच्या गडबडीत होता. तरी बायकोला चिडवायची संधी त्याने सोडली नाही.
"ओह्, म्हणजे आईंना आज एक इव्हेंट अनुभवायला मिळणार तर! आई, आमची "खालाजान" आधी, आंटीजीsssss...... म्हणून तुमच्या गळ्यात पडेल. मग थोडा इमोशनल ड्रामा, अश्रुपात वगैरे होण्याची शक्यता आहे बरं का!" ओजस आपल्या सासूला सावध करत होता.
"ए, काय रे ओजू, उगीच चेष्टा करतोस तिची? बिचारी माणसांची, प्रेमाची भुकेली आहे." आभा मैत्रिणीची बाजू घेत नवर्‍याला दटावत होती.
"नाही गं, मी गंमत करतोय! आई, घाबरू नका. शी इज् अ व्हेरी नाइस पर्सन...... पण तुम्ही एन्जॉय करा. मी जाईन जिमला." ओजसने आपली बाजू मांडली. त्याला या बायकांच्या घोळात पडायचं नव्हतं.
संध्याकाळी जॉर्जटाऊनमधील ठरलेल्या एका रेस्टॉरंटसमोर हा सोहळा घडून आला. आभा आईला तिथे घेऊन गेली. दोघी मैत्रिणींचं परत एकदा सेलफ़ोनवर बोलणं झालं आणि दहा मिनिटात समोरून आसेफ़ा येताना दिसली. ऑफ़िसातून परस्परच आलेली असल्याने अंगावर ऑफ़िसवेअरच होतं!
पांढरा, कॉलरचा, शर्ट टाइप स्लीव्हलेस ब्लाउझ आणि ग्रे कलरचा गुढग्यापर्यंतचा स्कर्ट! कोपरात दुमडून पोटाजवळ घेतलेल्या हातावर टाकलेला ग्रे कलरचा कोट! खांद्यांच्याही खाली रुळणारे काळेभोर घनदाट केस. गळ्यात एक ठसठशीत शिंपल्यांची वाटावी अशी माळ! कानातही तसंच शिंपलासदृश काही तरी!
दोन्ही हाताच्या बोटात, नजरेत भरतील अश्या अंगठ्या! आभाच्या आईने, तिचं ती जवळ येईपर्यंत अगदी डोळे भरून निरिक्षण केलं. तीही जशी दृष्टीपथात आली, तशी तिने आपला वेग वाढवला आणि शेवटी पळत पळत येऊन आईच्या गळ्यात पडली. किती तरी वेळ दोघी एकमेकींना जवळून निरखत होत्या.
"आंटीजी, कबसे आपसे मिलनेका मन कर रहा था." आसेफ़ा पाणावलेल्या डोळ्यांनी आईशी बोलत होती.
"हो गं, मलाही भेटायचंच होतं तुला! आभा किती सांगते तुझ्याविषयी! पण फ़ोटोतल्या पेक्षा किती तरी पटीने सुंदर आहेस गं तू!" आई मनापासून म्हणाली.
मग हे त्रिकूट रेस्टॉरंटमधे शिरलं. थोडं च्याऊ म्याऊ करून तीघी परत आभाच्या घरी गेल्या. संध्याकाळ इतकी छान गेल्यावर आसेफ़ाला परत आपल्या घरी लौकर जावसंच वाटत नव्हतं. घरी जाऊन एकटेपणाला कवटाळून छताकडे बघत झोपेची आराधना करण्याची कल्पनाही तिला आत्ता नकोशी वाटत होती.
"तो आंटीजी, बताइये ना वहां आप क्या क्या करती है, कैसा है आपका सोशल लाइफ़ वहां? आपने आभाकी शादी कैसे की?" आसेफ़ाने घरी गेल्या गेल्या आईला पकडलं. तिला खरंच भारतातल्या समाजजीवनाविषयी, रूढी परंपरांविषयी, एकंदरीतच लाइफ़ स्टाइल विषयी जाणून घ्यायची खूप इच्छा होती. तिला खूपच उत्सुकता होती भारताबद्दल!
"आंटीजी, मला तर स्कूटर म्हटलं की इटलीची आठवण होते. ऑफ़िसच्या कामाला मी इटलीत होते २ आठवडे! तिथे रस्त्यांवरून धावणार्‍या स्कूटर इतक्या मस्त दिसायच्या ना! मी आभाला म्हटलं तर ती म्हणाली, तुम्ही पण स्कूटर चालवता. मला तर आश्चर्यच वाटलं!" आसेफ़ा अगदी मनापासून बोलत होती.
"अगं त्यात काय विशेष! तिकडे छोट्या गावातून, शहरातून स्त्रियांनी स्कूटी चालवणं फ़ार कॉमन आहे गं! बायकांना घर, ऑफ़िस, नवरा, मुलं, ग्रोसरी, सगळंच करायला लागतं ना! स्कूटीशिवाय पर्यायच नाही तिकडे. तो काही लक्झुरी ऍटम नाही गणला जात तिकडे!" आईही तिला सगळं समजावून सांगत होती.
मग आईशी बोलता बोलता तीही आपल्या बालपणाबद्द्ल, अम्मी अब्बूंबद्दल, इस्लामाबादेतल्या आपल्या घराबद्द्ल खूप बोलली.
मागचं सगळं आठवताना मधेच खूप भावुक व्हायची ती! इम्रान, उस्मान हे भाऊ आणि धाकट्या बहिणी सना आणि सबा! सर्वांबद्दल अगदी भरभरून बोलत राहिली. तरी सगळी चर्चा परत परत "लग्न" या विषयावर येऊन थबकायची.
"आंटीजी, आपने आभाकी क्या राइट टाईम शादी कर दी! माझ्याही अम्मीने आधी खूप प्रयत्न केला माझ्या लग्नाचा! नंतर मी इथे अमेरिकेत आल्यावरही सुरवातीला ती फ़ोनवर फ़क्त माझ्या लग्नाविषयीच बोलायची. नंतर नंतर ती डिप्रेशनमधेच असायची. आता मात्र तिने बहुतेक माझ्या लग्नाचा नाद सोडून दिलाय!" आसेफ़ा आईला सांगत होती.
सगळ्या भावंडांची लग्नं जमवण्यापासून ते लग्नातल्या कपड्यांचं ड्रेस् डिझाइनिंग करण्यापर्य्ंत सगळ्या गोष्टी हरहुन्नरी आसेफ़ाने केल्या होत्या. सगळ्यांची लग्न कशी जमवली, केली त्याची अगदी रसभरित वर्णनं आसेफ़ाकडून आईला ऐकायला मिळाली.
मग तासभर बसून, आईच्या हातचं टोमॅटोचं सार आणि कैरीच्या होममेड लोणच्याबरोबर गरम गरम मुगाच्या डाळीची खिचडी खाऊन, अगदी तृप्त होऊन आसेफ़ा गेली. जाताना आईला तोंड भरून घरी येण्याचं आमंत्रण देऊन गेली.
ती गेल्यावरही वाटत आईला वाटंत राहिलं, "हिचं लग्न का बरं राहिलं असेल? बरं, हिलाच लग्न करायंच नाही, असंही नाही.
एवढी गुणी मुलगी, आईवडिलांनी, भावांनी लक्ष नसेल का दिलं? की हिला भेटल्यावर मुलं हिच्या व्यक्तिमत्वापुढे दबून जात असतील? नाकापेक्षा मोती जड?
असं झालं असेल का? की हिनेच सगळ्यांचं करायचं, याचीच घरादाराला सवय झाल्याने, हिलाही काही आशा आकांक्षा असतील, हिलाही आयुष्याकडून काही अपेक्षा असतील, हे कुणाला कधी जाणवलंच नाही? ही जे जे देत गेली ते ते सगळे घेत गेले. पण हिलाही काही तरी हवंय, हे कधी कुणाला जाणवलंच नसेल का? पण छे! आई वडील असं लक्ष देणार नाहीत असं होणारच नाही. आपण किती खटाटोप केला आभाच्या लग्नासाठी, तिला योग्य साथिदार मिळावा यासाठी! आताही नाही का आपण साता समुद्रापलिकडून लेक जावयाबरोबर रहायला आलो! लेकीचा संसार डोळ्यांनी बघायला, अनुभवायला आलो!" आई स्वता:शीच अनेक ऑप्शन्स तपासून पहात राहिली. पण तिचं काही समाधान झालं नाही.
आई आणि आभा किती तरी वेळ आसेफ़ाविषयीच बोलत बसल्या होत्या. नंतर रात्री उशिरा भारतातून आभाच्या बाबांचा फ़ोन आला. त्यांना खूप मनात असूनही ऑफ़िसच्या कामामुळे या वेळची ही अमेरिका वारी एन वेळेस रद्द करायला लागली होती.
कधी तरी उशिरा ओजस पार्टी करून परत आला. तोपर्यंत आई झोपून गेली.
-----------------------------------------------------------------------------------------
पुढच्या पंधरवडयात दोन दिवस नायगारा ट्रिप करून, नंतरचे दोन तीन दिवस आभा आईला घेऊन अलाबामाला जायची होती. तिथे बर्मिंगहॅम शहरात आभाची आतेबहिण रहात होती.
तिला भेटायला आणि तिची चार महिन्यांची मुलगी बघायला या मायलेकी चालल्या होत्या. तिथला दोन दिवसांचा मुक्काम संपवून दोघी परत आल्या. तर त्याच दिवशी संध्याकाळी आसेफ़ा हजर झाली. आल्या आल्या दरवाज्यातच गळ्यात पडली.
"आंटीजी आप मुझे इग्नोर क्यूं कर रही हो? बस अपनी बेटीके साथ घूम रही हो! मेरी यादही नही आयी आपको, इतने दिनोमे!" आसेफ़ाने आल्या आल्या आईवर प्रेमळ हल्ला चढवला.
"नाही गं! तुझी तर रोज आठवण येत होती मला." आईने बाकरवडीची बशी पुढे करत म्हटलं.
"ओके! ठरलं तर मग, या शनीवारी रात्री तुम्ही माझ्याकडे यायचं नक्की!" तोंडातली बाकरवडी सांभाळत, बोबड्या भाषेत आसेफ़ा आईला आमंत्रण देत होती.
तेवढ्यात ओजसही आला ऑफ़िसातून!
"आई, कशी झाली अलाबामा टूर?" ओजस सासूची चौकशी करत होता.
"ओह्! हाय आसेफ़ा! हाऊ आर यू? तू आहेस ना? मी आलोच फ़्रेश होऊन!" बाथरूममधे जाताजाता ओजसने आसेफ़ाचीही दखल घेतली.
"टेक युवर ओन टाइम ओजस! मी जात नाही एवढ्यात, सगळ्यांची खबरबात घेतल्याशिवाय!" आसेफ़ाने प्रत्युत्तर दिलं!
आज आईला आसेफ़ाचा "सेन्स ऑफ़् ह्यूमर"ही अगदी जवळून पहायला मिळाला.
"आई, आसेफ़ा मिमिक्री फ़ार छान करते, माहिती आहे?" ओजस बाथरूममधून बाहेर आल्या आल्या आईला सांगत होता.
मग माफ़क आग्रहानंतर आसेफ़ाने जे काही करून दाखवलं ते केवळ अफ़लातून होतं. आसेफ़ाचा, ऑफ़िसच्या कामाच्या निमित्ताने जगातल्या कित्येक वेगवेगळ्या देशातल्या, वेगवेगळ्या वंशाच्या माणसांशी संपर्क असायचा. त्या लोकांच्या बोलण्याचं तिनं अत्यंत बारकाईने निरिक्षण केलेलं दिसत होतं. विशेषत: जी,ती भाषा आणि जोडीने येणारे त्या त्या भाषेतले हेल! चिनी, जपानी, इंडोनेशियन, व्हिएतनामी आणि इतरही कित्येक देशातल्या लोकांची बोलण्याची तिने नक्कल करून दाखवली. ती इतकी परफ़ेक्ट होती की आईसकट सगळे हसून हसून बेजार झाले.
"आता यात मराठीची पण नक्कल इन्क्लूड होणार आहे बरं का.......जाला, गेला, हौ हौ!" सगळे अजून आधीच्या मिमिक्रीतून बाहेर येत नाहीत तोवर आसेफ़ाने जाहीर केलं, आणि बोलता बोलता लगेच मराठीच्या नक्कलेची झलकही दाखवली.
"जाला, गेला कळलं, पण ते "हौ हौ" काय आहे गं?" आईने हसत हसतच विचारलं. थोडक्या वेळात आसेफ़ाने मराठीतलंही जे काही उचललं होतं, तेही अफ़लातून होतं!
"आंटीजी, तुमचा फ़ोन येतो किंवा ही आभा तुम्हाला ऑफ़िसातून फ़ोन करते ना, तेव्हा तुम्ही जे काही बोलता त्यावर ही आभा असंच म्हणते ना, "हौ हौ"! मी ऐकते ना नेहेमी!" मराठीतल्या "हो"चं आसेफ़ाने "हौ" करून टाकलं होतं.
पुन्हा एकदा हसण्याच्या कल्लोळाने घर भरून गेलं!
---------------------------------------------------------------------------------------
आभा आणि आई अखेर आसेफ़ाकडे पोचल्या. आभाने दरवाज्यावर नॉक केलं.
"आइये आंटीजी, वेलकम" आसेफ़ा दार उघडून स्वागताला हजर होती.
घरात गेल्यावर तिने सगळं घर आईला फ़िरून दाखवलं. घरात जिकडे नजर जाईल तिकडे, सुंदर शोभेच्या कलात्मक वस्तू,
फ़ोटो फ़्रेमस दिसत होत्या. बऱ्याच वस्तूंना काही इतिहास होता. प्रत्येक वस्तूची कथाही वेळोवेळी आईला ऐकायला मिळाली. तिच्या बेडरूममधे तिच्या आईवडिलांचा बराच मोठा फ़ोटो लावलेला होता. आणि सगळीकडे तिच्या सर्व भावंडांचे आणि त्यांच्या कुटुंबांचे फ़ोटो होते. इस्लामाबादच्या भावांची मुलं, इथे अमेरिकेतच असणार्‍या धाकट्या बहिणीची, सबाची चार मुलं, सगळ्यांच्या आठवणीत आसेफ़ा अगदी कायम बुडून गेलेली असायची. पोटच्या लेकरांविषयी बोलावं तसं, नेहेमी त्यांच्याविषयी अगदी भावुक होऊन बोलत रहायची.
आईला वाटलं, ही अशी भावंडातच रमली तर हिच्या लग्नाचं काय? हिने जरा तरी स्वता:चा विचार करायला नको का?
आसेफ़ाने बरंच काही बाहेरूनच मागवलं होतं. थोडं खाणं पिणं झाल्यावर एक छोटीशी गाण्याची मैफ़लच झाली. आसेफ़ाने काही गजला म्हटल्या. आईला काही चीजा म्हणायला लावल्या, अगदी रागांची नावं सांगून! आभानेही आईबरोबर आपल्या संगीताच्या ज्ञानाला थोडा उजाळा दिला.
तरी देखील आभा केव्हापासून अस्वस्थ होती. तिला आईला आसेफ़ाचा खजिना दाखवायचा होता.
शेवटी ती म्हणाली,"आई, आता तुला आसेफ़ाचा खजिना बघायला मिळेल. मॅडम आसेफ़ा, कॅन वी?" ही शेवटची नाटकी विनंती आसेफ़ासाठी होती.
"या बेबी, व्हाय नॉट? लेट्स प्रोसीड्" आसेफ़ानेही तेवढ्याच नाटकीपणाने उत्तर दिलं!
"आंटीजी अब मै आपको मेरे जेवर दिखाउंगी." म्हणत आसेफ़ा आईला एका कपाटाकडे घेऊन गेली. आणि नंतर आईचे डोळे विस्फ़ारलेले आणि तोंडाचा "आ" बराच वेळ तसाच राहिला. या कपाटातले कित्येक ड्रॉवर्स दागिन्यांनी भरलेले होते. खरे, खोटे पण खूप महागाचे आणि अत्यंत सुंदर! गळ्यातली, कानातली, बांगडया, ब्रेस्लेटस, आणि कित्येक ऍक्सेसरीज!
"अगं, आमच्या आख्या हॉंन्गकॉंन्ग लेनमधले सगळे दागिने, सगळ्या ऍक्सेसरीज जरी गोळा केल्या तरी त्या कमीच भरतील! बाप रे, आणि काय व्यवस्थित ठेवलंय गं सगळं. पण मला एक सांग हे सगळे दागिने वेळोवेळी आठवतात तुला? आणि कोणत्या वेळी काय घालायंच, यात गोंधळ होत नाही तुझा? माय गॉड! मी तर नुस्तं बघूनच थकून गेले. तू कसं सांभाळतेस हे सगळं?" आई अगदी थक्क झाली होती.
"आई, पहा, आणि तुला वाटतं, फ़क्त मीच अतिरेक करते!" आभा आईला चिडवत होती.
"नाही गं बाई, आभा, मी आता नाही काही म्हणणार तुला!" आईने हसत हसत हात जोडले होते.
नंतर आसेफ़ाने स्वता: डिझाइन केलेले सलवार सूट्सही तिने आईला तेवढ्याच उत्साहाने दाखवले. इम्रानच्या लग्नातला कुठला, उस्मानच्या लग्नातला कुठला, कापड कुठे घेतलं, डिझाइनची कल्पना कशी सुचली, हेही सगळं आलंच पाठोपाठ!
"किती गुणी मुलगी आहे, खरंच! एखाद्याचा संसार किती छान केला असता हिने!" आईच्या मनात आल्याशिवाय राहिलंच नाही.
"आंटीजी, अब आप दिल थामके बैठिये, सिर्फ़ आपके लिये कुछ आ रहा है!" आसेफ़ाने संथ, नाटकी हालचाली करत या कपाटातला एक लॉकर उघडला. त्यातून लाल गोंडे लावलेला, मिररवर्क केलेला, मखमली बटवा बाहेर काढला त्यातून अगदी हळूवार हाताने एक गोल डबा बाहेर काढला. त्यावर सुंदर कोरीव काम केलेलं होतं. त्यामुळे तो ऍन्टिक वाटत होता. पूर्वीच्या ट्र्ंकांना असायची तशी त्याला कडी पण होती.
आसेफ़ाने त्याची कडी काढली. अणि जादुगार जादू दाखवताना करतो, तसे दोन्ही हात हवेत उडवून, तोंडाने, "ढॅंटढॅं" असं म्युझिक मारून, त्यातले सोन्याचे लखलखणारे काही दागिने तिने हातात घेतले आणि आईच्या समोर धरले!
सोन्याचे, मोत्याचे, पाकिस्तानी पद्धतीची कलाकुसर असलेले नाजूक पण चमकदार असे बहुतेक न वापरलेले दागिने!
"यार...आशू, ये तो तुमने मुझे कभी भी नही दिखाया!" आभा म्हणाली. तिच्या चेहेर्‍यावर आणि डोळ्यात अविश्वास दिसत होता.
"आभा, यार तू छोटी है अभी, दुनियादारीकी समझ नही है तुम्हे. ये कबसे मुझे सिर्फ़ आंटीजीको दिखाना था!" आसेफ़ाने आपल्या छोट्या मैत्रिणीला एकदमच खोडून काढलं! आणि पुढे म्हणाली,"जबसे आंटीजीको देखा है, उनसे बहुत कुछ शेअर करनेको मन करता है, जो मैने अबतक किसीको नही बताया, आभा तुझे भी!" आभा तिच्याकडे पहातच रहिली.
"आंटीजी, हे दागिने माझ्या अम्मीने माझ्यासाठी बनवले होते. एक एक करून! आभा, ऐसे आंखे फ़ाडके मत देख!
तुझ्या लग्नात तुझ्या आईने तुला दिले, तेवढे तर हे नाहीतच आणि तेवढे किमतीही नाहीत. येऊन जाऊन एक दोन सेट!
पण त्या काळी माझ्या अब्बूंची जी काही ऐपत होती त्यात हे खूपच होते गं! आणि आंटीजी, तेव्हा अम्मीचा तोरा अगदी बघण्यासारखा होता. दागिने घ्यायला जाताना छोटी मामी, बडी खाला आणि गल्लीतल्या मैत्रिणी, सर्वांना गोळा करून घेऊन गेली होती. जसं काही आता युद्धावरच चालल्यात सगळ्या. इस्लामाबादेतल्या, सराफ़ी बाजारातल्या त्या सोनाराचं पूर्ण होमवर्कच घेतलं गेलं. आणि दागिन्यांची ऑर्डर दिली गेली. आणि असे जेव्हा एक एक दागिने घरी येत गेले तेव्हा अम्मी इतकी खूष, की जणू काही दागिने तय्यार म्हणजे उद्याच माझं लग्न आहे".
आसेफ़ाच्या या बोलण्यावर आईला यावर प्रतिक्रिया द्यावी हेच कळेना. ती ऐकत राहिली.
"नंतर एक एक करून सगळ्यांची लग्नं झाली. अम्मीने माझे दागिने खूप वर्षं स्वता:जवळ जपून ठेवले, जवळजवळ वीस वर्षं! कधी तरी माझं लग्न होईल या आशेने! पण तीन वर्षांपूर्वी अब्बू गेले आणि मी तिला इथे अमेरिकेत आणलं. तेव्हा तिने हे दागिने माझ्या सुपूर्त केले." मनातली खळबळ मोठ्या प्रयत्नाने लपवत, आसेफ़ा अगदी शांत स्वरात हे सगळं आईला सांगत होती.
आईला मनातून खूपच वाईट वाटलं. तिच्या मनात विचार आला," काय वाटलं असेल त्या आईला, असं दागिने परत लेकीकडे देताना! काळजाला घरं पडली असतील! लेकीच्या लग्नाची काळजी २० वर्षं केल्यावर नाद सोडला. खरं म्हणजे असेही हे दागिने लेकीसाठीच बनवलेले, द्यायचेही लेकीलाच पण हे असं पराभूत होऊन, हार पत्करून, आशा सोडून देऊन.........!"
वरवर आईने काहीच दाखवलं नाही तरी एकदम कुणीच काही बोलेनासं झालं. वातावरणातला खेळकरपणा एकदम लुप्त झाला. त्यावर आसेफ़ानेच एकदम आईचे हात हातात घेतले आणि हसत हसत म्हणाली,"अरे, आंटीजी तुम्ही एकदमच गप्पगप्प झालात. डोन्ट वरी आंटीजी, आय जस्ट वॉन्टेड टू शेअर इट विथ् यू. आणि तसंही आता तुम्ही बघणार आहातच ना माझ्यासाठी मुलगा?" हे शेवटचं वाक्य हसत हसत बोलून तिने वातावरणातला ताण हलका केला.
"आसेफ़ा, तुला हिंदू मुलगा चालेल का गं?" आभाचा पुन्हा एकदा भाबडा, हळवा प्रश्न.
"अगं, मला कोणीही चालेल. तुला माहिती आहे आभा, मी टिपिकल मुस्लिम नाहीये. मी ना नमाज पढते, ना रोजे ठेवते. माझा धर्म "माणुसकी"! आसेफ़ा म्हणाली.
"ओके बायकांनो, मुलींनो आता सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात महागाची गोष्ट!" आसेफ़ा परत नाटकी आविर्भावात गेली.
"अरे बाप रे अजूनही काही राहिलंच आहे का?" आभा कोड्यात पडली होती. झालं एवढंच तिला झेपलं नव्हतं!
त्यातही, मनाच्या कोपर्‍यात, आपल्या जिवलग मैत्रिणीने आपल्यापासून बरंच काही लपवल्याचीही एक पुसटशी भावना होती.
त्याच दागिन्यांच्या डब्यातून आता एक अगदी छोटी डबी निघाली. त्यातून एकच चमकणारी हिर्‍याची अंगठी निघाली.
"आंटीजी ये देखिये, आमच्या कुरेशी खानदानातला पहिला वहिला हिरा!" आसेफ़ाला आईला खूप काही सांगायचं होतं. मनमोकळं बोलायचं होतं.
"वा! छानच आहे गं अंगठी!" आईला काय बोलावं कळेना! तिला वाटलं ही अंगठी आसेफ़ाचीच असणार. आई आसेफ़ाकडे पहात म्हणाली.
पण आसेफ़ा भूतकाळात हरवली होती.
"ती आमच्या पलिकडच्या गल्लीत रहायची. "जोया" नाव तिचं! येता जाता बर्‍याच वेळा भेटायची. मला नेहेमी वाटायचं ही जोया आपल्या घरात यावी. नंतर हळूहळू मीच तिच्याशी दोस्ती वाढवली. ती घरी यायला लागली. मग तिच्या घरच्यांशी ओळख वाढवली. इम्रानला जोया पसंत होती, आणि जोयाला इम्रान! मग आम्हीच एके दिवशी इम्रानचा "रिश्ता" घेऊन जोयाच्या घरी गेलो. अब्बूंचा माझ्यावर खूप जीव आणि विश्वासही! कुठेही जायचं असलं की मीच लागायची त्यांना! मग काय? जोयाच्या घरचे खूष झाले. दोघांचा साखरपुडा झाला. त्या वेळपर्यंत कुरेशी खानदानात कुणी हिरा विकत घेतला नव्हता.
मग या साखरपुड्याचं निमित्त साधून जोयासाठी हिर्‍याची अंगठी केली. पहिली सून येणार होती ना घरात! पैशांची खूप व्यवस्था करावी लागली. बरीच ओढाताण झाली. त्यावेळी अब्बूंकडे एवढी रक्कम नव्हती. पण घरात हिरा आला. एंगेजमेंटच्या दिवशी तो हिरा जोयाच्या बोटावर चमकताना बघून मला इतका आनंद झाला की काय सांगू?" आसेफ़ा मधे जरा थांबली. दोन घोट पाणी प्यायली.
"पण मग ती अंगठी तुझ्याकडे............."आईला रहावेना. पण तिचा प्रश्न पूर्ण होण्याआधीच आसेफ़ाने पुढे सुरवात केली होती.
"हां आंटी, तेच तर सांगतेय पुढे. पुढे मी पण इथे अमेरिकेत आले. तिथल्या इस्लामाबादेतल्या ऑफ़िसची मेन ब्रांच इथे असल्याने ऑफ़िसने मला इथे पाठवलं. मला इथे आवडलं. राहिले इथेच! मग इम्रान आणि जोया यांनाही मीच बोलावून घेतलं.
दोघांनाही इथल्या युनिव्हर्सिटीत ऍडमिशन मिळाली. एक वर्षासाठी. वर्ष बघता बघता गेलं. तिकडे अब्बूंची तबियत इतकीशी बरी नसायची. म्हणून मग इम्रानने इथलं शिक्षण संपल्यावर परत जाण्याचा निर्णय घेतला. पण जोयाला इथे इतकं आवडलं, ती परत जाण्याचं नाव काढेना! तिला इथे चांगली नोकरीही लागली. आधी आम्ही दोघी संपर्कात होतो पण नंतर नंतर तिनेच हळूहळू संपर्क तोडला.
इथे ती कुणाबरोबर तरी रहात होती असं कानावर आलं होतं. तिकडे सगळे हवालदिल! शेवटी एकदा ती पाकिस्तानात परत गेली आणि एके दिवशी ती आमच्या घरी गेली आणि तिने ती अंगठी परत केली! आणि अमेरिकेला परत गेली." आसेफ़ाने एक उसासा टाकला.
"कशी असेल गं ती जोया? तू एवढं केलंस तिच्यासाठी, आणि तिने खुशाल, झालेली एंगेजमेंट मोडली?" आभाला जोयाचा खूपच राग आलेला होता.
"आगे सुन आभा. तो आंटीजी, आता ही अंगठी म्हणजे "प्राइड ऑफ़ द फ़ॅमिली" बनली होती. घरातला पहिला वहिला हिरा.
मलाही इथे अमेरिकेत बसून खूप अस्वस्थ व्हायला लागलं. मी सुट्टी काढून पाकिस्तानात गेले. अम्मी, अब्बूंशी मनमोकळं बोलले.
इम्रानला धीर दिला. नाही म्हटलं तरी तो जोयामधे गुंतला होता. सगळ्यांना हेच वाटत होतं की कसं कसं करून आपण सगळं जमवत आणलं होतं, किती चांगल्या मनाने आपण जोयाला आपल्या कुटुंबात आणायचं ठरवलं, आणि आता हे काय होऊन बसलं! अब्बूंची तब्येत जास्तीच बिघडत गेली. पण जेव्हा माझी परत अमेरिकेला जायची वेळ आली तेव्हा, त्यांनी सगळ्यांनी मिळून, अगदी इम्रानसकट, ती अंगठी मला द्यायचं ठरवलं होतं. किती मोठ्या मनाने सगळ्यांनी तो निर्णय घेतला असेल!............. आभा तू का एवढी अस्वस्थ?" बोलता बोलता आसेफ़ाचं आपल्या छोटया मैत्रिणीकडे लक्ष गेलं.
आभाच्या चेहेर्‍यावरूनच आसेफ़ानं ओळखलं!
"पण थांब, मला पूर्ण करू दे! तर आंटीजी, ती अंगठी अब्बूंनी मला सोपवली. मला ती घ्यायची नव्हती, कारण ती कुरेशी खानदानकी बहूके लिये बनायी गयी थी. माझा हक्कच नव्हता त्या अंगठीवर! पण अब्बूंची तब्येत, मानसिक अवस्था पाहता आणि त्यांनी मला घातलेल्या शपथेमुळे मी ती अंगठी, इथे घेऊन आले. पण मी ती कधीच घातली नाही."
"म्हणजे तुझ्या अम्मीने तुझ्यासाठी केलेले दागिने आता एवढ्याच आले तुझ्याकडे आणि ती अंगठी मात्र तुझ्या कपाटात १५/२० वर्षं पडून आहे. तू कशाला घेतली ती अंगठी... आशू? " आभाची कधीची चुळबुळ चालली होती. पण आसेफ़ा बऱ्याच वेळा आपल्या वयाचा फ़ायदा घेऊन तिला गप्प बसवत असे.
"आभा, अब्बूकी बात कैसे नही मानती? आणि नंतर तुला माहिती आहे ना? नंतर इम्रानला जोयापेक्षा किती चांगली मुलगी मिळाली ते? आंटीजी, आता माझ्या दोन्ही भावांचे संसार बहरलेत. माझ्या दोन्ही वहिन्या खूपच छान आहेत. अम्मी अब्बूंना चांगलं पहातात. आता अब्बू नाहीयेत म्हणा." आसेफ़ाने एक क्षण डोळे मिटले.
"कधी गेले तुझे वडील?" आईने विचारलं. आईला वाटलं, ही मुलगी जरा जास्तीच गुंतलीये आपल्या भावंडांमधे आणि त्यांच्या संसारात! म्हणून स्वता:कडे दुर्लक्ष झालं असेल का?
"झाली आता तीन वर्षं! आंटीजी इम्रानचं जसं परत दुसर्‍या मुलीशी लग्न ठरलं, तसं हळूहळू सगळ्या घरात जान आली. अब्बूंचीही तबीयत सुधारत गेली. पण इकडे अमेरिकेत जोया ज्याच्याबरोबर रहात होती त्याच्याशी तिने लग्न केलं आणि तोही दोनच वर्षात ऍक्सिडेन्टमधे गेला......बिचारी!" आसेफ़ाला जोयाबद्द्लही कणव वाटत होती जिने इम्रानचा विश्वासघात केला होता.
"आशू.. इतकं सगळं माहिती असूनही तू ती अंगठी कशी ठेवलीस स्वता:जवळ? वीस वर्ष ही अंगठी तुझ्या लॉकरमधे पडून आहे. आणि ही अंगठी ज्या जोयासाठी बनवली, ती ना तुमच्या घरात आली, ना तिचं पुढं काही चांगलं झालं! सगळ्यांचे आपापले संसार झाले आणि तू मात्र एकटीच राहिलीस! तुला या अंगठीबद्दल कुणाशीच बोलावसं नाही वाटलं?" आभाला काही पटत नव्हतं. ती अगदी तळमळीने बोलत राहिली.
"आभा, बेबी, अब बालकी खाल मतही निकाल तू ! तुला माहिती आहे मी असल्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही. मी कोणताही धर्म पाळत नाही, आणि मी अंधश्रद्धही नक्कीच नाही!" आसेफ़ा असं म्हणाली आभाला, पण तीही जरा गोंधळातच पडली होती. कारण तिच्या सीध्या साध्या, सरळसोट, नाकासमोर विचार करणाऱ्या मनाला त्या अंगठीबद्द्ल असला विचार कधी शिवलाच नव्हता.
गप्पा चालू राहिल्या. आभा मात्र खूपच डिस्टर्ब्ड वाटत होती. खरं म्हणजे आता आसेफ़ाही मनातून गोंधळली होतीच.
घरी जातानाच आभा आईशीही या विषयावर बोलली.
"आई, बघ तिने ती अंगठी वीस वर्षं स्वता:जवळ ठेवली, अगदी जपून. काय हिस्टरी आहे या अंगठीची? सगळं माहिती असूनही.....!" आभाला खूप रुखरुख लागून राहिली.
"आभा मला वाटतं आसेफ़ाने माहेरच्या कुटुंबातून स्वता:ला कधी बाजूला काढून पाहिलंच नसावं. इतकी लांब रहाते तरी जीव सगळा त्या इस्लामाबादेतल्या घरात अडकलेला. अब्बूंच मन मोडायचं नाही म्हणून केवळ तिने ती अंगठी घेतली." आई म्हणाली.
आईही जरा अस्वस्थ झाली होती.
-----------------------------------------------------------------------------------------

"हाय आपा, कैसी हो? अपना दिलावर याद है? कॉलेजमधे होता माझ्याबरोबर? तो ऑफ़िसच्या कामासाठी येतोय तिकडे. मी तुझा नंबर दिलाय त्याला. सनाने तुझ्यासाठी लोकरीचा स्वेटर की जॅकेट, काय ते विणलंय. ते आणि थोडा खाऊही पाठवतोय त्याच्या बरोबर!" ऑफ़िसमधे आल्या आल्या इम्रानचा फ़ोन. त्याने मेल करून दिलावरचा नंबरही तिला दिला होता.
आसेफ़ा अगदी खूष! ही सनाभाभी तर अगदी जणू शोधातच असायची, कुणीही इकडे येणारं भेटलं की काही ना काही पाठवायचीच. विणकामावर तर तिची अगदी मास्टरीच!
मग आसेफ़ाला आपलेही जुने दिवस आठवले. एक क्षण भूतकाळात रमली. इम्रानचा हा मित्र नेहेमी घरी हा यायचा. दोघे बरोबरच शिकत होते.
"हां इम्रान! मै कैसे भूल सकती हूं दिलावरको! एक नंबरचा खादाड! अम्मीच्या हातची बिर्याणी किती आवडायची त्याला!
इम्रान, सुनो तो.......मैं अगर उसके साथ कुछ भेज दूं.........काही महत्वाचं आणि किंमती, तर चालेल ना? अरे आता खूप दिवसात गाठी भेटी नाहीत. माणसांचा अंदाज येत नाही रे, म्हणून विचारते." आसेफ़ा भावाशी बोलता बोलता इकडे इमेल्स पहात होती.
सलमानची मेल......सलमान "वीकेंडला भेटायचं का" विचारत होता. पण तिने त्याला कळवलं की, "काही कामं आहेत, ती झाली की कळवते. मगच भेटू!"
या वीकेंडला दिलावरची भेट महत्वाची होती. आणि जे द्यायचंय ते देऊन टाकल्याशिवाय आता सलमानला भेटायचंच नाही असं तिच्या मनाने पक्क ठरवलं होतं. आभाचा चेहेरा वारंवार डोळ्यासमोर येत होता.
"अगं पण, आपा, एवढं किंमती आणि अर्जंट काय पाठवतीयस?" इम्रान बुचकळ्यात पडला होता.
"बस, इम्रान अब सिर्फ़ इतनाही बताओ की मैं ये दिलावरके साथ भेज सकती हूं या, नही?" आसेफ़ाने मनात काही तरी पक्कं ठरवलेलं होतं!
"हां हां, अरे वो तो मैने बोल दिया है. घरकाही आदमी समझके उसपर विश्वास कर सकती हो! भेज दो जो भी भेजना है! पर बताती क्यूं नही?" इम्रानला कळत नव्हतं की आता आपल्या या आपाचं नक्की काय चाललंय?
"जल्दीही समझ जाओगे!" म्हणून आसेफ़ाने फ़ोन ठेवला.
-----------------------------------------------------------------------------------------
शनिवार सकाळ उजाडली. एरवीही अती उत्साही असणार्‍या आसेफ़ाला आज काही तरी वेगळंच वाटत होतं. उत्साह तर होताच. कसली ते कळत नव्हतं पण कसली तरी हुरहुर लागली होती.
आज तिने खूप मनापासून चविष्ट स्वयंपाक रांधला. बिर्याणीचा सुगंध घरभर दरवळंत होता.
सगळं झाल्यावर तिने शांतपणे कपाटातल्या लॉकरमधून दागिन्यांचा बटवा काढला. त्यातली हिर्‍याच्या अंगठीची डबी काढून, बाकी बटवा परत लॉकरमधे ठेवला. डबीतून अंगठी बाहेर काढून तिने ती आपल्या डाव्या तळहातावर ठेवली. आणि अगदी जवळून तिचं एकदा शेवटचं निरिक्षण केलं. तिला एकदा सर्व बाजूंनी नीट स्पर्श करून ती अंगठी परत डबीत ठेवली. त्या डबीला खूप चांगलं पॅक केलं. चांगले तीन चार लेअर दिले. ते सगळं एका छोटया प्लॅस्टिक पिशवीत ठेवलं. आणि भाचरांसाठी घेतलेल्या एका खाऊच्या पिशवीत, तळाशी हे अंगठीचं अगदी नगण्य असं पार्सल लपवून, नंतर सगळी पार्सलं एका छोट्या पिशवीत बंद केली. आणि अगदी निरिच्छ मनाने ती दिलावरची वाट पाहू लागली. मन अगदी हलकं होऊन गेलं होतं!
दिलावर खूप वर्षांनी आसेफ़ाआपाला भेटून खूष झाला होता. गप्पा मारत पोटभर जेवला आणि आपाने दिलेलं पार्सल घेऊन तिचा निरोप घेऊन बाहेर पडला. तो दुसर्‍याच दिवशी इस्लामाबादला परतणार होता.
लगेच आसेफ़ाने दोन इमेल्स केल्या. एक इम्रानला, ज्यात तिने दिलावरबरोबर कशात, आणि काय पाठवलंय तेही स्पष्टीकरण दिलं. आणि मिळालं की लगेच कळवायलाही सांगितलं. पण हे ती का पाठवतीये हे मात्र लपवून ठवलं.
"ये कुरेशी खानदानके बहूकी अमानत है, वो मैने बहुत देरतक सम्हाली, अब वो अमानत जिनकी थी उनको सौंप रही हूं!, ये बहुत पहलेही होना चाहिये था, लेकिन अब भी देर नही हुवी है, वो कहते है ना देर आये दुरुस्त आये!" एवढा मजकूर मात्र तिने इम्रानला केलेल्या मेलमधे लिहिला.
आणि दुसरी इमेल सलमानला केली, ज्यात तिने आपल्या भावना त्याच्यापर्यंत पोचवल्या होत्या. ज्या आत्तापर्यंत तिने त्याला कधीच उघडपणे बोलून दाखवल्या नव्हत्या. आणि लवकरात लवकर भेटण्याची इच्छाही व्यक्त केली होती.
ही मेल करून झाल्यावर तिला मनावरचं एक ओझं उतरल्यासारखं वाटायला लागलं! मन अगदी पिसारखं हलकं झालं. आणि ते भविष्यकाळात भरार्‍या मारू लागलं!
लगेच आभाला मेसेज केला, "माय स्वीटहार्ट, वुई आर मीटिंग फ़ॉर डिनर टुडे, समथिंग टु टेल यू, व्हेरी इंपॉर्टंट!"
------------------------------------------------------------------------------------------------------------

गुलमोहर: 

mastach aahe katha! Ugachach shevat-paryant kahitari vait tar nahi na honar ashi shanka yet rahili itukii goad hoti!

(bhraman-dhwani yantravrun pratisad det aslyane devnaagarit type karu shale nahi! Kshama asavi)

(bhraman-dhwani yantravrun pratisad >>>>>>>> कळलं भानुप्रिया. क्षमा बिमा काय? उलट पूर्ण कथा वाचून अभिप्राय दिलास म्हणून धन्यवाद. आणि तुला शेवट आवडला म्हणून लिहिते. आपल्या कथेच्या शेवटासारखी "आसेफा"च्या आयुष्याची नवी सुरुवात व्हावी अशी इच्छा मनात आहे.
आबासाहेब.......खूप खूप धन्यवाद.

मस्त! खुपच छान! ओघवती भाषा, पुढे काय याची उत्कंठा वाढवणारे कथानक! सुंदर ... अशाच छान छान कथा येउ देत.

हं.........लाजो लेकीकडे गेले होते तेव्हा ही "आसेफा" भेटली. तर प्रस्तावनेत लिहिल्याप्रमाणे सगळं माझ्या उसगावातल्या मुक्कामात घडलेलंच आहे. फक्त या आसेफाच्या नव्या जीवनाची सुरुवात आपल्या कथेतल्या शेवटाप्रमाणे व्हावी अशी माझी इच्छा आहे.
धन्यवाद!

आसेफाच्या नव्या जीवनाची सुरुवात आपल्या कथेतल्या शेवटाप्रमाणे व्हावी अशी माझी इच्छा आहे.<<< अगदी तसचं होइल मानुषीताई Happy माझ्या खुप सार्‍या शुभेच्छा आसेफाला Happy

Pages