नुसत्या विचाराने किंवा चर्चेने लोकांची मानसिकता बदलेल का???

Submitted by दिपीका... on 10 May, 2012 - 02:18

गेल्या रविवार पासून आमीरच्या 'सत्यमेव जयते' कार्यक्रमात त्याने उचलून धरलेल्या 'स्त्री भ्रुण हत्ये' विरोधासंबंधातील अनेक पोस्ट वाचायला मिळत आहेत. मी सुद्धा हा शो पाहिला आहे, त्याबद्दल आमीरचे करावे तितके कौतुक थोडेच..पण प्रश्न हा रहा...तो कि यामूळे खरंच काही साध्य होणार आहे काय..??

केवळ पावसाळी वातावरण निर्माण होणे आणि प्रत्यक्षात पाऊस पडणे यात जसा फरक आहे अगदी तसाच फरक या प्रकारणातसुद्धा दिसून येतो. म्हणजे टि.व्ही. सारख्या घराघरांत पोहोचलेल्या प्रभावी माध्यमाचा वापर करून आमीर 'स्त्री भ्रुण हत्ये'विरोधी वातावरण निर्माण करण्यात नक्कीच यशस्वी झाला आहे; परंतु याचा समाजावर प्रत्यक्षात कितपत प्रभाव पडलाय हे पहाणं जास्त महत्त्वाचं ठरेल..कारण आमची 'पुरूषप्रधान' मानसिकताच या मार्गातील मोठी आडकाठी आहे यात कुणाचंही दुमत नसावं.

'सत्यमेव जयते' च्या पुढील एपिसोड पर्यंत लोक आवडीने व कदाचित 'काळजीने' हा विषय चघळतीलही; पण पुढील रविवारच्या नव्या विषयानंतर कदाचित उठलेल्या या वादळाची तीव्रता कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण याच कार्यक्रमाचा पुढला भाग येईल तो एक नविन विषय घेवून आणि मग आधीचा विषय आपसुकच मागे पडेल.. हळूहळू लोकही विसरतील.. परत नवा विषय आणि नवी चर्चा येवढच उरेल का??

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हाच प्रश्न मलाही पडला आहे......... आमिरचं वेगळेपण कसं दिसणार आहे हे पाहायची उत्सुकता आहे.

काही अर्षांपूर्वी हुंडाबळी हा असाच एक प्रश्न होता. अजूनही पूर्ण सुटलेला नाही. पण कायदा, समाजप्रबोधन, आणि असे कार्यक्रम (तेव्हा टीव्हीचा प्रसार इतका नव्हता) यांनी परिस्थितीत फरक पडला आहे ना?

स्त्रीभ्रूणहत्येबाबत आपल्याला वाटते त्यापेक्षा परिस्थिती खूपच जास्त गंभीर/भयंकर आहे ही जाणीव मला हा कार्यक्रम पाहून झाली. अनेकांना झाली असेल.

आधी स्त्रीभ्रूणहत्या म्हणजे केवळ दर हजार मुलग्यांमागे घटत चाललेली मुलींची संख्या हा एक आकडा होता. दूर कुठेतरी झालेल्या एखाद्या गोष्टीची बातमी होती.
चार वर्षांत सहा/आठ गर्भपातांना सामोरे गेलेल्या स्त्रीचा चेहरा तोवर पाहिलेला नव्हता.
ह्युमन ट्रॅफिकिंग हे एक राक्षसी वास्तव आहे हे माहीत नव्हते.

कार्यक्रमाचे स्वरुप कितीही वास्तववादी असले तरी कार्यक्रम प्रकाशित करण्यामागचा हेतू व्यावसायिक असणार असे वाटत आहे. (मी अजून पाहिलेलाच नाही, त्यामुळे नचिकेत यांच्या धाग्यावर काहीच लिहू शकलो नाही)

(अवांतर - हेतू व्यावसायिक असूनही संदेश प्रामाणिक असणारा असा मला सध्या एकच कार्यक्रम वाटतो व तो क्राईम पेट्रोल दस्तक. त्यात 'कोणत्या मानसिकतेत माणूस असताना गुन्हा व्हायची शक्यता आहे' याबाबतचे काही रोखठोक ठोकताळे दिलेले असतात व घटना सत्य असल्यामुळे त्यातील व्यावसायिक हेतू घटतो)

धन्यवाद

सगळे प्रश्न एका रात्रीतुन सुटने दुरापास्त आहे. टीव्हीतुन लोक चांगल्याचा कमीच स्विकार करतात, वाईट/विकॄतीकडे लवकर वळतात.

बंडोपंत,

आपण जे म्हणताय त्यात एक अ‍ॅड करावेसे वाटले. चांगले लोक चांगल्यासाठी पाहतात व वाईट लोक वाईट कारणांसाठी असे

आपण जे म्हणताय त्यात एक अ‍ॅड करावेसे वाटले. चांगले लोक चांगल्यासाठी पाहतात व वाईट लोक वाईट कारणांसाठी असे

बेफी सहमत

>>परंतु याचा समाजावर प्रत्यक्षात कितपत प्रभाव पडलाय हे पहाणं जास्त महत्त्वाचं ठरेल<<

सहमत.
पण त्यामुळे या प्रयत्नाचे महत्व कमी होत नाही. नाहीतरी समाजावर टिकाऊ परिणाम अत्यंत मंद गतीने होत असतो. असे हजारो प्रयत्न झाल्यावर कांहीना कांही परिणाम दिसायला लागतो. परिस्थितीच्या रेट्याने मात्र बदल झपाट्याने घडून आल्याचे दिसून येते.
महाराष्ट्रात संतांनी शेकडो वर्षे प्रबोधन चालवले आहे. त्याचा समाजावर पडलेल्या प्रभावाचा वस्तुनिष्ठ अभ्यास केला तर अमिरच्या एपिसोडकडून वा अण्णांच्या आंदोलनाकडून अवाजवी अपेक्षा ठेवण्याची चूक आपण करणार नाही.

>>परंतु याचा समाजावर प्रत्यक्षात कितपत प्रभाव पडलाय हे पहाणं जास्त महत्त्वाचं ठरेल<<

मि तर आशावादि आहे Happy

कुठलाही बदल होण्याची एक प्रक्रिया असते

  1. माहिती- इंफर्मेशन
  2. ज्ञान- नॉलेज
  3. अभ्यास- इंक्विजिटिव्ह स्टडी
  4. अंगिकार- इंटर्नलायझेशन
  5. कृती- अ‍ॅक्शन
  6. -सवय- प्रॅक्टिस
  7. जीवनशैलीचा हिस्सा बनणे- लाईफ स्टाईलमध्ये बदल

अशा अनेक व्यक्तींचा समूह अशा प्रकारे वागण्यात व कृतीत बदल आणतो तेव्हा परिवर्तन होते
या मानदंडाप्रमाणे आपण सध्या तरी १ वा २ क्रमांकावर आहोत.
पण मार्ग मात्र हाच आहे.
शुभस्ते पंथान सन्तु

अशा गोष्टीकडे 'नकारार्थी' भूमिका घेत राहिलो आपण तर मग श्वास घेणेही मुश्किल होऊन बसेल. वर्तमानपत्रे, नियतकालिके, रेडिओ, दूरदर्शन ही समाजसुधारणेसाठी प्रभावी माध्यमे आहेत. ज्या काळात यापैकी काहीच नव्हते त्यावेळीही "मुलींनी शिक्षण घेतले पाहिजे....' यासाठी प्रसंगी आपल्या जीवाला धोका असलेल्या वातावरणातही जे कुणी प्रयत्नशील होते त्यांच्या प्रयत्नांना 'मुलीनी शिक्षण घेऊन काय उपयोग ? शेवटी त्यांचे जीवन म्हणजे चूल आणि मूलच ना?" अशी "न" भूमिका घेणारे खंडीने होतेच, पण त्याना पुरूनही आशावाद जिवंत राहिला आणि आज त्या ज्ञातअज्ञातांच्या त्या अमोल अशा प्रयत्नांची फळे इथल्या मुलींना मिळाली आहेतच ना ?

एकेकाळी सांप्रत देशात बेकारीने थैमान मांडले होते....आजही परिस्थितीत तसा फार फरक पडलेला नाही. पदवीधरांच्या फौजाच्या फौजा अर्जांची भेंडोळी घेऊन नोकरीच्या शोधासाठी रस्त्यावर हिंडत होती.....(हा काळ मी पाहिलेला आहे). पण अशावेळी 'काय या विद्यापीठांचा उपयोग ? नुस्ती बेकारांचे कारखाने चालविणार्‍या या संस्था !" असे म्हटले जात होते म्हणून शाळाकॉलेजीस ओस पडली नाहीत. समस्येचा अभ्यास करून तज्ज्ञांनी पारंपारिक शिक्षणाला व्यावसायिक शिक्षणाची जोड देण्यात आली आणि मग नवनवीन कल्पनांनी शिक्षणक्षेत्र बहरून गेल्याचे आज आपण पाहतोच आहे....नोकरी व्यवसायांच्या मुबलक संधी समोर येत आहेत.

आमीर खान हा अशाच 'होकारार्थी' विचार करणार्‍या जनतेचा प्रतिनिधी बनणार असेल तर "....होते ते चांगल्यासाठी' असे समजून त्याला पाठिंबा (तोही प्रोत्साहनपर शब्दांचा...पैशाचा नव्हे) दिला तर देशाच्या सामाजिक जडणघडणीत तो एक चांगलाच पायंडा पडेल.

स्त्री-भ्रूण हत्या ही एक सामाजिक कीड असून ती "सत्यमेव जयते' मुळे संपूर्णतः नष्ट होईल या भ्रमात आमीर खानही राहणार नाही; पण रविवारी तो कार्यक्रम पाहून एखाद्याने सोमवारी अल्ट्रासाऊंड प्रॅक्टिशनरची घेतलेली अपॉईन्टमेन्ट रद्द केली तरी ती एक अभिनंदनीय घटना होईल....आणि मला खात्री आहे की कुठेतरी या देशात तसे घडलेही असेल.

अशोक पाटील

परमेश्वरही खल संहारासाठी अवतार घेतो.. पण तो अवतार संपला की पुन्हा ते सुरु होतेच ना? मग देवाला निरुपयोगी असे म्हणून भजायचे सोडत का नाही?

परमेश्वरही खल संहारासाठी अवतार घेतो.. पण तो अवतार संपला की पुन्हा ते सुरु होतेच ना? मग देवाला निरुपयोगी असे म्हणून भजायचे सोडत का नाही?
>>>> परमेश्वराचे अवतार घ्येण्याचे काम म्हणजे सॄष्टीचा समतोल राखणे आहे. जसा परमेश्वर आहे, तसा यम आहे , यम आहे दुराचार वाढविणे लोंकाच्या मना वासना निर्माण करणे इ. कार्य तो करतो यात जो अडकला तो दुराचारी होऊन समाजाला त्रास देत राहतो. काही अशा गोष्टी पासुन दुर राहतात. ते जिवनातुन मुक्त होतात.

असो विषयांतर होईल.

यम आहे दुराचार वाढविणे लोंकाच्या मना वासना निर्माण करणे इ

आजच ऐकले हे.. यमाचा हा जॉब चार्ट तुम्हाला कुठे मिळाला? यमरावांची या डिपार्टमेंटला बदली झाली की काय?

( ऋग्वेदात तरी यमाचा मृयुत्युचे नियंत्रण करणारा देव असा जॉब चार्ट आहे.. शिवाय विवाह संस्थेतील नियम यमाने ठरवले असे दिले आहे. वाचा यम यमी संवाद)

सतीची प्रथा कशी बंद झाली ?
स्त्री शिक्षणाची सुरूवात करताना महात्मा फुलेंनी असाच विचार केला असता तर ?
भारतात लोकशाही कशी रूजली ?

सतीची प्रथा बंद करायची सुरुवात अकबराने केली आणि भ्रूण हत्येविरुद्ध देशव्यापी आवाज उठवायची सुरुवात आमीर खानने केली. सब खुदा की मर्जी है ! Proud

आमीरला कामधंदा नसावा. राष्ट्रीय समस्या कुठली हे त्याला समजत नाही.

१. समलिंगी व्यक्तींना विवाहासाठी परवानगी
२. लिव्ह इन रिलेशनशिपला कायदेशीर मान्यता
३. विधान बरुआचा स्त्री बनण्याचा मुलभूत हक्क

या ज्वलंत समस्या सोडून स्त्री भ्रूण हत्या, बालकामगार अशा बिनमहत्वाच्या समस्या लोळगे सराफांच्या रविवारच्या दिवशी दाखवून वामकुक्षी खराब करण्याबद्दल त्याचा शनिवारवाड्यावर धिक्कार करायला हवा.

कुठलाही बदल होण्याची एक प्रक्रिया असते
1.माहिती- इंफर्मेशन
2.ज्ञान- नॉलेज
3.अभ्यास- इंक्विजिटिव्ह स्टडी
4.अंगिकार- इंटर्नलायझेशन
5.कृती- अ‍ॅक्शन
6.-सवय- प्रॅक्टिस
7.जीवनशैलीचा हिस्सा बनणे- लाईफ स्टाईलमध्ये बदल

अशा अनेक व्यक्तींचा समूह अशा प्रकारे वागण्यात व कृतीत बदल आणतो तेव्हा परिवर्तन होते
या मानदंडाप्रमाणे आपण सध्या तरी १ वा २ क्रमांकावर आहोत.
पण मार्ग मात्र हाच आहे.
शुभस्ते पंथान सन्तु

किरण , तुमचा प्रतिसाद वाचून खेद वाटला. तुमच्या बहुतांश लेखनातून तुम्ही डोळ्याला झापडे न लावणार्‍या, संतुलित, उदार, सहृदय मनोवृत्तीने संयमित शब्दांत आपली मते /विचार मांडता असे जाणवले.
हे निमित्त साधून, तुम्हाला अन्य काही प्रश्नांची टर उडवाविशी वाटली. मुलीला जन्माला येण्याचा हक्क नाकारणार्‍या आणि समाजातल्या काही लोकांना त्यांच्या आंतरिक इच्छेप्रमाणे जगण्याचा हक्क नाकारणार्‍या मनोवृत्तींत फार फरक नाही असे म्हणावे लागेल.
आपले आईवडील आपले नाव टाकतील एवढी मोठी किंमत चुकवायची तयारी ठेवून लिंगपरिवर्तनाचा आग्रह धरणार्‍या विधान बारुआचे ते फॅड आहे असे तुम्हाला वाटते का?
तुमच्या माहितीसाठी : आपल्या राजकीय भवितव्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो हे माहीत असूनही बराक ओबामा यांनी कालच समलिंगी विवाहाच्या हक्काला पाठिंबा जाहीर केला.
लिव्ह इन रिलेशनशिप ठेवणारे सगळे मज्जा करण्यासाठीच तसे करतात की लग्नव्यवस्थेबद्दल विचार करून पर्याय शोधू पहातात?
यापूर्वीही तुम्ही एड्सग्रस्तांबद्दल संवेदनाहीन मजकूर लिहिला होता.
हे प्रश्न एकंदरित समाजासमोर स्त्रीभ्रूनहत्येसारखे व्यापक भयंकर रूप घेऊन उभे ठाकले नसतील. पण समाजातल्या काही लोकांकरिता, अगदी ते अल्पसंख्य असले तरी , तो जगण्याचाच प्रश्न असतो.
अर्थात आपली संवेदनशीलता कुठे पुरवून वापरायची आणि कुठे संवेदनाहीनतेने दगड मारायचे याचे स्वातंत्र्य तुम्हाला आहेच. पण या दोन्ही गोष्टींमधली विसंगती काहींनातरी जाणवेल.

भरत

हा प्रतिसाद उपहासाने लिहीलेला आहे. एखादा चांगले काम करतोय आणि सर्वांना स्पर्श करणारे मुद्दे उचलतोय ते सोडून अमूकच मुद्दा का नाही घेतला, पैसेच का घेतले यासाठी तसे लिहीले होते.

तुमचे म्हणणे मान्य आहेच

तुम्ही जो अर्थ काढला तो संदेशा जाऊच शकतो.

पण जो मुद्दा आमीरने आज उचलला आहे त्याचं महत्व पाहता आरूषी हत्याकांड, तंदुरी जळीत प्रकरण अशा पद्धतीने तो धसास लावला गेल्याचं आढळलेलं नाहि. याचा अर्थ आरूषी हत्याकांडाबद्दल असंवेदनशीलता दाखवतो असा काढता येणार नाही. जे प्रश्न हे खरे इश्शू आहेत त्याला बगल मारून अशा विषयांना राष्ट्रीय अजेंडा बनवण्याला माझा विरोध आहे. वर्षानुवर्षे वाढत चाललेली महागाई हा इश्शू दो टूक या ईटीव्हीच्या राजस्थान वाहिनीवरून दाखवला गेला. त्याला प्रादेशिकतेची सीमा आहे. हा विषय विधान बारूआच्या हक्कापेक्षा महत्वाचा वाटतो. या विषयांचा पाठपुरावा करून जर बारूआ, समलिंगी संबंध अशा विषयांना त्यांचा कोटा मिळाला तर स्वागतच आहे.

पावसाळ्यात गरिबांच्या झोपड्या तोडल्या जातात त्याबद्दल कुणालाच खेद नाही. हेच लोक आपल्याकडे कामासाठी येतात. त्यांनी रहायचे कुठे ? शिक्षणाची फी वाढत चालली आहे. आहे का कुणाला आस्था ? या प्रश्नांपेक्षा मी वर दिलेले प्रश्न हे प्राधान्यक्रमाचे असावेत असं वाटतं का ?

राष्ट्रीय अजेंडा बनण्याबाबत/न बनण्याबाबत सहमत.
पण एकावेळी एकच प्रश्न हाताळावा असे काही बंधन आहे का? सगळ्यांनी एकच प्रश्न हाताळावा असे बंधन आहे का? असे केल्याने तो प्रश्न सुटून मग पुढच्या प्रश्नाकडे वळता येईल असे होणार आहे का? प्रत्येक व्यक्ती आपल्याला जिथे भिडावेसे वाटते तिथे भिडेलच. सगळ्यांच्या प्रायॉरिटीज सारख्या कश्या असतील? प्रत्येक प्रश्नाला पुरेशी मिळावी इतकी जागा खचितच आहे.
हा प्रश्न विषय सगळ्या जास्त महत्त्वाचा आहे तो सोडविल्याशिवाय अन्यत्र वळायचे नाही असे करायला आपण शालान्त परीक्षेचा अभ्यास करीत नाही आहोत. तिथेही ही पद्धत योग्य असेल का याबद्दल शंकाच आहे.

टीवीं/सिनेमातल्या अभिनेत्यांचं वर्तन बघुन समाजमनावर परिणाम होतो अशी ओरड कायमच होते. त्यांच्या जहिराती पाहुन प्रॉड्क्टस खरेदी होतात, त्यांना स्मोकिंग करताना पाहुन तरुणवर्ग स्मोकिंग करतो असा समज आहे. आणि हा समज इतका ठाम आहे कि सिनेमा/सिरियलमधे स्मोकिंग दाखवण्यावर बंदी आहे. जर अभिनेत्यांच्या वाइट वर्तणुकीने, त्यांच्या सांगण्याने वाईट परिणाम होतो तर त्यांच्या सांगण्याने पॉझिटीव बदलही दिसेलच की.

बॉर्डर, हकिगत, राजा शिवाजी पहाताना देशप्रेम उफाळुन येतंच ना? खेड्यातले लोक तर भाबडे असतात, पण तुमच्या-माझ्या मनातही असा सिनेमा पाहिल्यावर थोड्या वेळासाठी भावना उचंबळुन येतातच. लाख लोकांच्या मनात त्या १ तास टिकत असतील, १००० लोकांच्या मनात महिनाभर टिकत असतील पण एक व्यक्ती तरी बदलत असेलच की. तसंच हे. अमिरखानचा कार्यक्रम म्हणुन खेड्यापाड्यातले त्याचे फॅन्स हा कार्यक्रम पहातील. त्यातल्या थोड्या लोकांवर असर झाला तरी जिंकला ना आमिर. B + Happy

<खेड्यातले लोक तर भाबडे असतात<> गोड अन्यायकारक गैरसमज. त्यांना माहिती कमी असेल पण भाबडे?
बाकी अरिणाम होवो न होवो योग्य दिशेने प्रयत्न करीत राहणे इतकेच हाती असते. आमीर ते करतोय.

भाबडे असणं म्हणजे कमी लेखणं कसं बरं? माझं मराठी चुक आहे बहुतेक. माझ्या दृष्टीने भाबडे म्हणजे भोळसट, छक्केपंजे माहित नसणारे किंवा निरागस मनाचे. यापेक्षा दुसरी वेगळी छटा असेल भाबडेपणाला तर मी माझी पोस्ट एडिट करते.

हे फारच अवांतर होतं आहे या धाग्यावर. सॉरी दिपिका.

प्रतिक्रिया देणाऱ्या आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार..!!
आपल्या आशावादी प्रतिक्रिया वाचून बर वाटलं...

खरंच आहे लोकांची मानसिकता किंवा त्यांचे विचार चटकन बदलणार नाहीत ते बदलायला नक्कीच वेळ लागेल. आज या शोच्या माध्यमाने थोडे लोक जरी सुधारले, त्यांची मानसिकता बदली तर आपसुकच बदलाला सुरवात झाली म्हणता येईल... मात्र आपल्या सुशिक्षित समाजातील मानसिकरित्या अशिक्षित असनाऱ्‍यांनी मनावर घ्यायला हवं आणि शासनानेही कडक कायदे करून त्यावर अंमलबजावणी करायला हवी...

आजवर याच विषयासंदर्भात गावपातळीवर व वर्तमानपत्रांतही बर्याचदा जनजागृती झालीये पण आपले विचार उडणार्या वावटळीसोबतच केवळ उडतात वावटळ शांत झाली कि आपले विचारही शांत होतात तसे उद्या होऊ नये हिच इच्छा आहे... निदान या शोच्या माध्यमाने आमीरने सुरूवात तर केली समाजप्रबोधनाला पण याची दुसरी बाजूही तपासून पहायला हवी म्हणून हा प्रश्न विचारावासा वाटला..

धन्यवाद...!!!