एका पप्पूची वार्षिक डायरी

Submitted by बेफ़िकीर on 4 May, 2012 - 04:31

पप्पू या एका अर्भकाने वयाच्या आठव्या वर्षापर्यंत प्रत्येक वाढदिवशी लिहिलेल्या या डायरीतील काही भाग प्रकाशित करताना अजिबात आनंद होत नाही आहे. आनंद होत आहे असे म्हणण्याची प्रथा मोडून काढणे या एकाच हेतूने असे म्हणालो आहोत. वास्तविक पाहता आनंद होतच आहे की आजही आपल्याला काहीतरी सुचले व आजही आपण सर्वांसमोर ते टाकून छान छान प्रतिसाद मिळवू शकलो. आमच्या मनात प्रतिभा इन्स्टॉल करणार्‍या सुदैवाला आम्ही नमस्कार करत आहोत.

तर वाचा डायरी पप्पूची.

===================================

वर्ष पहिले:

आज एक वर्षाचा झालो. खरे तर एक वर्षं नऊ महिने झालेले आहेत. पण ते कोणाला दिसत नाही. वास्तव जग भीषण आहे आचे प्रत्यंतर वयाच्या याच पातळीला यावे हे दुर्दैवी. अल्लेल्लेल्लेल्लेल्ले करताना आज आजीची कवळी हालली. मला पुरेसे दात आल्यावर मीही ते हालवून पाहणार आहे. चांगले पप्पू असे भारदस्त नांव असताना 'अल्लेल्लेल्लेल्ले' असे म्हणण्यामागची भूमिका समजत नाही. मी ध्येयाच्या दिशेन आजच पहिले पाऊल उचलले. आजवर कडेवर बसून अथवा रांगून ध्येयाकडे प्रवास करत होतो. स्वावलंबन हा आपला साथीदार हेच खरे. आपल्याला ज्या दिशेला जायचे आहे त्या दिशेला आपण फक्त स्वतः चालूनच जाऊ शकतो हे नवे तत्व समजले. अन्यथा कोणत्याही राकट व चार चार दिवस आंघोळीचा विचार मनात न आणणार्‍या माणसाच्या कडेवर बसून त्याला हव्या त्या दिशेला प्रवास करावा लागतो. फ्रीजवर जेम्स गोळ्या असाव्यात असे काही दिवस वाटत आहे. पण तेथपर्यंत आपण पोचत नाही याची जाणीव झाल्यापासून मोह टाळलेला बरा हे तत्व शिकलो. आज आई आणि आजी कडकून भांडल्या. हे वाक्य रोजच्या डायरीतही लिहिता येईल, पण मी फक्त वार्षिक डायरी लिहीत असल्याने त्यात लिहिले इतकेच. बाबा ऑफीसमधून आल्यावर मला उचलून घेतात. परवा मात्र या नियमात थोडा बदल आढळला. बाबांनी माझ्याऐवजी आईला उचलले. यामागची भूमिका एकदा समजून घ्यायला हवी. 'अहो तो बघतोय' असे आई जोरात म्हणाली. यावर बाबा 'त्याला काय कळतंय' असे म्हणाले. मला दोन डोळे असून त्यांनी माझ्याऐवजी आईला उचललेले आहे हा अन्याय मी पाहू शकतो हे त्यांना माहीत नसावे. पण एक प्रकारे बरे झाले. बाबांनी उचलल्यावर ते पापी घेतात तेव्हा त्यांच्या मिशा आणि अर्धवट वाढलेली दाढी टोचते. मला जन्माला घालण्याची शिक्षा म्हणून आईलाच त्या टोचलेल्या बर्‍या. आई परवा मला जोजवताना रडत रडत 'तिचे नशीब फुटल्याचे' म्हणत होती. नशीब हे काय असते हे एकदा बघायला हवे. राजकारणाचे काही खरे नाही. आता मी आलोच आहे जगात, तर सुधारणा करेन म्हणतो. हॅप्पी बर्थ डे पप्पू.

वर्ष दुसरे:

आजोबा फरशीवर एक सतरंजी टाकून निवांत पडलेले आहेत. बराच वेळ झाला आहे. उठलेले नाहीत. हे आश्चर्य पाहण्यासाठी आजूबाजूचे अनेक जण जमलेले दिसत आहेत. आजी भोकाड पसरून रडत आहे. आई आतमध्ये इतर बायकांकडून पाठ थोपटून घेत रडत आहे. बाबा आजोबांजवळ बसलेले आहेत. अनेक उदबत्या लावलेल्या आहेत. वातावरण प्रसन्न आहे. आजोबांचे झोपण्याचे रेकॉर्ड असावे हे. येणारा प्रत्येकजण लिंगानुसार बाहेर बसायचे की स्वयंपाकघरात जायचे हे ठरवत आहे. आजोबांच्या पायांवर अनेक फुले वाहिली जात आहेत. मी झोपल्यावर कोणीही रडत नाही. या अन्यायाला एकदा वाचा फोडायला हवी. 'कधी?', 'आज पहाटे', 'कशाने?', 'हार्ट अ‍ॅटॅक' अशी प्रश्नोत्तरे ऐकून कंटाळा आलेला आहे. कुंच्याची काडी नाकात घालून या म्हातार्‍याला ताडकन उठवावे असा विचार मनात येत आहे. अरे? हे काय? उचलले की आजोबांना? इतका ढिम्म माणूस पाहण्यात नाही. चार जणांनी उचलूनही हा घोरतोय. झोपलेल्या माणसाला उचलल्यावर कर्कश्श रडायची कारणे काय यावर एकदा संशोधन करायला लागेल. योगायोग म्हणजे आज मी दोन वर्षांचा झालो. मुलाचे वय वाढले की त्याचे वडील त्याच्या आईला त्याच्यासमोर उचलत नसावेत असा निष्कर्ष काढून थांबतो.

वर्ष तिसरे:

आज आजूबाजूच्या अनेक जणी संध्याकाळच्या नाश्त्याला आल्या होत्या. मला खेळणी आणायच्या ऐवजी आईसाठीच काहीबाही आणत होत्या. स्त्री नालायक असते याचे पुनर्प्रत्यंतर आले. आई किंचित जाड झालेली असून पोट प्रमाणाबाहेर वाढू लागलेले आहे. याही कृत्यात बाबांचाच हात असावा असा संशय असल्याप्रमाणे सर्व बायका बाबांना हसून काहीतरी बोलताना दिसत आहेत. कोणीतरी मला विचारले भाऊ हवा की बहिण? इतर काहीच पर्याय उपलब्ध नसणारे असे हे अत्यंत मर्यादीत स्वरुपाचे विश्व आहे म्हणून या विश्वाचा धिक्कार! कठड्यावरचा पारवा व सोसायटीतील पिवळी मांजर हे मला घाबरणारे पहिले दोन सजीव अशी नोंद करावी लागेल. आपल्याला कोणी घाबरणे ही भावना सुखद असते. आजोबा मेले असावेत. आजी त्यावरून आईला म्हणत आहे की हे तुझ्या पोटी येणार. 'येणार' असे भविष्यवाचक क्रियापद का वापरण्यात येत आहे हे समजले नाही. जे कोणी येणार ते आधीच आलेले असणार की? असो. आईच्या पोटाच्या मानाने हे विश्व प्रगत व अधिक सह्य तसेच मनोरंजक आहे हेही कमी नाही. ते नऊ महिने आठवून आजही अंगावर काटा येतो. तेंडुलकरच्या एकाही शतकाचा भारतीय संघाला उपयोग होत नाही हे काल पुन्हा सिद्ध झाले. तेंडूलकर हा भारतीय क्रिकेटला लागलेला शाप आहे हे माझे मत आज सगळ्यांना समजले. काल सोसायटीमागे खणलेल्या एका खड्ड्यात मला फेकावे असे बाबा आईला सतत म्हणत होते. त्यांना मला प्रिन्स समजले जावे अशी इच्छा होती. पण आईचे मत वेगळे असावे. बहुधा बायकोचे पोट वाढले की बापाला पहिल्या मुलाचा राग येऊन प्रसिद्धीची हाव त्याच्या मनात निर्माण होते असा निष्कर्ष नोंदवून थांबतो.

वर्ष चौथे:

या वर्षी म्हणावे असे काही झाले नाही. नाही म्हणायला एक लहान बाळ निर्माण झालेले असून आई माझ्याकडे आता लक्ष देत नाही. ते बाळ माझी बहिण असल्याचे नुकतेच समजले. बाबा हल्ली मला आणि आईला सोडून त्या बाळाला उचलतात. ते बाळ मी अजून नीटसे पाहिलेले नाही. बाबांवर गेल्याचे समजते. मी कोणावर गेलो आहे हे विचारायला हवे. अत्यंत मत्सरी स्वभावाचे असे ते बाळ असावे. क्षणभरही आई माझ्याशी बोलली की ते आर्त टाहो फोडते. मला बालवाडीत घालायच्या बाजारगप्पा चालू आहेत. मी जणू एक ठेवलेला गुलामच. 'तुझ्यायला' ही एक नवी शिवी समजली. खरे तर ही पहिलीच शिवी समजली. या वर्षी वर्ल्ड ट्रेड सेंटर पडले. मोठी इमारत होती. बांधकामात भ्रष्टाचार झालेला असावा. सोसायटीत गॅन्ग वॉर सुरू झाले आहे. कदमांचा पोपट वाट्टेल तेव्हा निल्याला धोपटतो. बहिण झाल्याने आजोबा काही आईच्या पोटी आले नाहीत हे नक्की झालेले असावे. ज्यावर आपला कंट्रोल नाही त्यावर मी आता विचार करणे सोडलेले आहे. शू लागली असे म्हणायचे नाही हे नवीन शिक्षण मिळाले. मग काय म्हणायचे यावर काही म्हणायचेच नाही, सरळ बाथरूमला जायचे हेही एक कळले. शू लागण्यात माझा अपराध काय हे विचारायचे राहिले आहे. आजी संसारात विष कालवते असे आई बाबांना म्हणाली. संसार नावाची एकही भाजी मी आत्तापर्यंत खाल्लेली नाही. आई फेकत असावी.

वर्ष पाचवे:

नमिता एक वर्षाची झाली यात तिचे कौतुक करण्यासारखे काय आहे देवाला ठाऊक. मी आता अडगळीची वस्तू झालेलो आहे. बालवाडीत धमाल येते. मिनीचे गाल गोबरे असून तिच्या डब्यात सॅन्डविच असते. पण तिच्यापेक्षा छाया टीचर मादक आहे. हे खरे की खोटे हे बाबांना विचारल्यावर माझे थोबाड फोडण्यात आले. आईनेही उपाशी ठेवले. आजी भयाण रडली. पण प्रेमात हे सहन करावेच लागणार. हे ऐतिहासिक सत्य आहे. खर्‍या प्रेमाला नेहमी समाजाचा विरोध असतो. 'कदमांचा पोपट' असे म्हणायचे नाही असे आम्हा मुलांना निक्षून सांगण्यात आले. त्यापेक्षा कदमांना मुलाचे नांव पोपट ठेवू नका असे सांगणे सोप्पे होते. पण अवघड वळसा अन गावात कळसा ही म्हण खरी असावी. केबल बंद केली आहे. केबल बंद करणे हा व्यक्तीस्वातंत्र्यावरील घाला आहे यावर काल संध्याकाळी सोसायटीतील मुलांमध्ये मी व्याख्यान केले. अनेकांचे अनुमोदन मिळाले. चारूलता ही आमच्यापेक्षा मोठी असूनही आमच्यात खेळत असल्याने आमचा विरस होतो. कारण प्रत्येक डाव तीच जिंकते. शारिरीक ताकद वाढवायला हवी. त्याशिवाय या जगात टिकून राहणे अवघड आहे.

वर्ष सहावे:

आई हलकट आहे. बाबा नालायक आहेत.

छाया टीचरने तक्रार केली. मी दंगा करत असताना तिने मला धरून बाजूला केले की मला कसेसेच होते हे मी तिला सर्वांदेखत म्हणाल्याची. निसर्गाने प्रत्येकाच्या मनात भावना पेरलेल्या आहेत. मला बेदखल की काहीतरी करण्यात आलेले आहे. आता मी बालवाडीत जात नाही. मला रोज खुराक असल्याप्रमाणे दहा धपाटे मिळतात. मी म्हणजे चुरमुर्‍याचे पोतेच जणू. कोणीही येता जाता पिटावे. सत्याला आवाज नाही हे खरे. विरह सहन होत नाही. पण सांगणार कोणाला? कदमांचा पोपट चारूलता या सिद्दी जौहरशी बाजीप्रभूंसारखा लढला. दोघांचे रक्त वाहिले. सोसायटी पावन झाली. मी दोघांत समेट केल्याबद्दल मला दोन गोळ्या मिळाल्या. माझे वय काय आणि खाऊ देतात काय! मला पहिलीत घालणार आहेत. या प्रस्तावाला माझा विरोध आहे. अजून बालवाडीचे सिलॅबस क्लीअर झालेले नाही माझे. प्रगतीसाठी माणूस वाट्टेल ते करतो हेच खरे. आज अनेक वर्षांनी आजी हासली. त्यामागे एक विशिष्ट कारण आहे. बाबा आईला आजीच्या देखत 'गेली सहा वर्ष छळतीयस की मला' असे म्हणाले. आई रडली. रडणे आणि स्वयंपाक करणे हे विरुद्धार्थी शब्द असावेत. कारण आईने आज स्वयंपाक केला नाही. बाबा बाहेर जाऊन खाऊन आले. हा माणूस लवकर सुधारणार नाही. आजीने पेज केली होती. मी त्या कृत्यावर सायलेंटली थुंकलो. प्रत्यक्ष हुंकलो असतो तर शरीराला अपाय होण्याची शक्यता होती. नमिताला मात्र हवे तेव्हा हवे ते मिळत असते. मला आज बरेच वर्षांनी आई आणि बाबांच्या मध्ये झोपवण्यात आले. त्यामुळे रात्री ते दोघेही केवळ झोपतात हे मला आता नीट समजलेले आहे. कदमांचा पोपट काय वाट्टेल ते फेकत असावा. मानवनिर्मीतीची प्रक्रिया रात्री आई वडील यांच्या माध्यमातून होते म्हणे. पोपट वयानुसार वागत नाही असे मी म्हणालो. त्यावर कॉलेजला जाणारी सहा मुले का हासली हे समजले नाही.

वर्ष सातवे:

पहिली ते चौथी अशा शाळेत आपण कितवीत असावे हे कशावरून ठरत असावे हे लक्षात येत नाही. फक्त मुलांची शाळा आहे. त्यामुळे शाळेवर लिहिण्यासारखे काहीही उरलेले नाही. आज अ ब क ड शिकवले. आजवर आपण जे बोललो ते लिहायचे कसे हे शिकवण्याचा या लोकांचा मनोदय असावा. येथे बिनडोक मास्तर भरलेले आहेत असे मत शेजारच्या राघव आपटेने व्यक्त केले. तो काही वर्षे या वर्गात असल्याने त्याच्या मताला नक्कीच वजन असणार हे मी समजू शकतो. बाबा हल्ली रोज चकाचक दाढी करतात. माझे स्पष्ट मत आहे की नमिताला बोचू नये म्हणून करतात. पण आईला शेजारी नवीन जोडपे आल्याचा हा परिणाम वाटतो. अतर्क्य वागणे हा बायकांचा प्रथम अधिकार असावा असे वाटू लागले आहे. आज आजोबा आजीच्या स्वप्नात आले होते. 'मेलेलेच आले होते का' असे मी विचारले. माझा स्पष्टवक्तेपणा नेहमीच महाग पडतो. मला पहिलीतून काढून बालसुधारगृहात पाठवावे असा प्रस्ताव समोरच्या अण्णा पटवर्धनांनी आमच्या घरी मांडला. त्यावर चर्चा झाली. चर्चेत शेवटी मीही सहभागी झालो. आपल्याचबद्दल आपण नाही बोलणार तर कोण बोलणार? मी अण्णांना 'तुमच्या बापाने पहिलीची फी भरली आहे का' असे नम्रपणे विचारले. अण्णांना बाप आहे की नाही हे माझ्या पाहण्यात नाही. पण प्रत्येकाला एक बाप आणि एक आई असतेच असे कदमांच्या पोपटचे म्हणणे पडते. त्यानुसार मी तो प्रश्न विचारला होता. दोन्ही गाल सुजलेले आहेत. अण्णांची दहा वर्षाची पिटू आता माझ्याशी बोलत नाही. मुंबईत बॉम्ब स्फोट झाले. हे एकदा होणारच होते. लांगूलचालन केल्याचे परिणाम आहेत. लांगूलचालन हा एक नवीन शब्द समजला व एका वाक्यात योजता आला याचा आनंद व्यक्त करून थांबतो.

वर्ष आठवे:

बालसुधारगृहातून मला काढावे असे ठरत आहे. येथे खरे तर बरे चाललेले होते. मारामारी हा एक प्रकार शिकायला मिळाला. येथून काढून कुठे ठेवणार असा प्रश्न बापाला पडलेला आहे. बाबांना बाप म्हणणे ही प्रगती येथे झाली. जगात बालसुधारगृहासारखे ठिकाण नाही. अत्यंत शिस्तीचे वातावरण असते. पण ते पाळायलाच हवे असा नियम नसतो. मास्तरांना उद्योग नसतो. ते बिड्या पीत बसतात. पॉकेटमारी हा उदयास आलेला एक चांगला व्यवसाय असावा. कशाततरी करीअर करायलाच हवे. शेवटी स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी दुसर्‍याच्या तरी खिशावर अवलंबून असायलाच हवे. इतक्यात लग्नाचा विचार नाही. आधी मुंज करणार आहेत असे ऐकत होतो. मुंजीचा परिणाम चांगला होतो असे एक म्हातारा भट बापाला म्हणाला. मी जोरात 'हाड' असे म्हणाल्यावर तो पळून गेला. कबूतर व मांजराव्यतिरिक्त काही माणसेही घाबरू लागली आहेत. स्वतःचे स्थान निर्माण करायला आठ वर्षे लागली. स्ट्रगल कोणाला चुकलीय? कदमांचा पोपट निवळल्याचे ऐकले. माझ्यापोटी असा मुलगा कसा जन्माला आला असे ओरडत आई अभद्र स्वरात रडल्याचे समजले. कसा यायला हवा होता हे मात्र कळत नाही. आठ आठ वर्षे या जगात राहून आम्हाला पुरेसे महत्व नाही असे नोंदवून थांबतो

=====================================

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

'वर्ष पहिले' वाचताना 'बटाट्याची चाळ' मधल्या 'काही वासर्‍या' वाचत आहे असा पाव सेकंद भास झाला. नंतरचं फारसं आवडलं नाही.

बेफि़, तुम्ही भव्य (ग्रेटचा मराठी अर्थ) आहात ! तुमचे दिव्य साहित्य यज्ञात हव्य म्हणून वापरता येण्याईतके सव्य आहे ! Proud

अगदीच 'निरागस' बालक आहे. त्याच्या घरी कुणी दारू पित कसे नाहीत याबद्द्ल आश्चर्य वाटले.

बेफि़, तुम्ही भव्य (ग्रेटचा मराठी अर्थ) आहात ! तुमचे दिव्य साहित्य यज्ञात हव्य म्हणून वापरता येण्याईतके सव्य आहे !
>>>>
Rofl

बेफि़, तुम्ही भव्य (ग्रेटचा मराठी अर्थ) आहात ! तुमचे दिव्य साहित्य यज्ञात हव्य म्हणून वापरता येण्याईतके सव्य आहे !
<<
तुम्हाला बंबात म्हणायचे होते का?