उद्या म्हणजे ५ मे २०१२ ला नौशादजींना जाऊन ६ वर्षे होतील. ईस्लाम धर्मात पुण्यतिथी वगैरे असते की नाही ते माहिती नाही पण मी आणि माझे काही मित्र दरवर्षी जितक्या श्रद्धेने ३१ जुलैला रफींची पुण्यतिथी साजरी करतो तितक्याच श्रद्धेने गेली ४ वर्षे नौशादजींची पुण्यतिथीही साजरी करतो. साजरी करतो म्हणजे काय, एकत्र जमतो. त्यांची गाणी पहातो, ऐकतो, काही प्रमाणात म्हणण्याचाही प्रयत्न करतो. वैयक्तिक आयुष्यात माझ्यावर नौशादजींच्या संगीताचा जास्त पगडा आहे. मी जे काय थोडं-बहूत (लोकांच्या मानाने थोडं, माझ्या दृष्टीने बहूत :फिदी:) शास्त्रिय संगीत शिकलो त्याला नौशादजींची गाणी (मुख्यतः रफीने गायलेली) गाण्याचा अट्टाहास कारणीभूत ठरला.
हिंदी चित्रपटसंगीताचा सुवर्णकाळ ज्याला म्हटलं जातं त्याची सुरवात नौशादजींनी केली. तांत्रीकदृष्ट्या सांगायचं झालं तर १९४२ च्या शारदा पासून १९६८ च्या संघर्ष पर्यंत २६ वर्षात ५ हिरक महोत्सवी (१९४४ - रतन, १९४६ - अनमोल घडी, १९५२ - बैजू बावरा, १९५७ - मदर ईंडीया आणि १९६० - मुघल-ए-आझम), १२ सुवर्णमहोत्सवी आणि तब्बल ३५ रौप्यमहोत्सवी चित्रपटांचं संगीत नौशादजींचं होतं. त्यांच्या हिरक महोत्सवी चित्रपटांची नावं बघीतली तर पहिले दोन चित्रपट आणि बैजू बावरा हे केवळ आणि केवळ नौशादजींच्या संगीताने तारले होते.
हिंदूस्थानी शास्त्रीय संगीतातला असा एकही राग नाही ज्यावर आधारित नौशादजींचं एकतरी गाणं नाही असं म्हटलं जातं. ही कदाचित त्यांच्या (माझ्यासारख्याच) चाहत्यांची अतिशयोक्तीही असू शकते. पण त्या मागे नौशादजींच्या अलौकीक प्रतिभेचे कौतूक आणि आदर आहे. रफी आणि नौशाद यांच्या स्नेहबंधाबद्दल मा.बो. वरील काही रसिक आणखी प्रभावीपणे लिहू शकतील. म्हणून मी तो भाग शक्यतो टाळतोय. पण नौशादजींच्या संगीतातून रफीला वेगळा काढणे केवळ अशक्य आहे. रफीच्या आवाजाच्या रेंजचा, त्याच्या क्लासिकल वरील हुकुमतीचा, वेगवेगळे प्रयोग करण्याच्या तयारीचा सर्वात जास्त आणि अप्रतिम वापर जर कुणी केला असेल तर तो नौशादजींनीच.
हिंदी चित्रपट संगीतातले काही ठळक आणि वेगळे प्रयोग करण्याचं श्रेय मात्र नौशादजींकडेच जातं. खरंतर शास्त्रिय संगीत हाच त्यांचा पाया असला तरी याही क्षेत्रातले बर्मनदादा, शंकर जयकिशन यासारख्या समांतर संगीतकारांची स्पर्धा त्यांना होतीच. पण या सर्वातूनही आपला बाज न बदलता वर्षानू वर्ष टिकून रहाणे या साठी मेहनत आणि सृजनशिलतेची आवश्यकता असते. पं. पलूस्कर आणि खाँसाहेब आमिरखान यासारख्या दिग्गजांना बैजू बावरा साठी केवळ साडे-सहा मिनीटांच्या जुगलबंदीसाठी ( आज गावत मन मेरो झुमके) तयार करणे, हिंदी चित्रपट संगीतकारांना दारातही उभे न करणार्या खाँसाहेब बडे गुलाम अली खान यांच्याकडून मुघल-ए-आझम साठी चक्क दोन बंदिशी गावून घेणे, महेंद्र कपूर सारख्या गुणी गायकाला पहिली संधी देणे (सोहनी-महिवाल) ही आणि अशीच काही नौशादजींची ठळक योगदानं.
बैजू-बावरा हा चित्रपट तर त्यांनी अक्षरश: निर्धाराने (विडा उचलल्यासारखा) केवळ आपल्या संगीताच्या जोरावर हिरक-महोत्सवी केला. या चित्रपटाचे निर्माते जरी प्रकाश भट असले तरी या चित्रपटाची खरी निर्मीती नौशादजींचीच होती. आपल्या मित्रासाठी त्यांनी दिलेले हे योगदान होते. त्यांनी काही चित्रपटांची निर्मितीही केली. उडन खटोला हे त्यातले ठळक नाव. गुलाम मोहम्मद यांनी काही काळ त्यांच्या सहाय्यकाची भुमिका केली होती. त्यामुळेच पुढे स्वतंत्र संगीतकार म्हणून गुलाम मोहम्मद यांनी संगीत दिलेल्या पाकिजाचे पार्श्वसंगीत गुलाम मोहम्मद यांच्या निधनानंतर नौशादजींनी पुर्ण केलं. पाकिजा न पाहिलेल्यांना (माबो वर असा माणूस विरळाच) या पार्श्वसंगीताची गंमत कदाचित कळणार नाही. कारण चित्रपटाच्या संगीताच्या एल.पी. रेकॉर्डस, कॅसेटस, सी.डी.ज वर जितकी गाणी आहेत तितकीच किंबहून थोडी जास्तच गाणी (लताच्या स्वर्गिय आवाजात) या पार्श्वसंगीतात लपली आहेत जी केवळ चित्रपट पाहतानाच ऐकायला मिळतात.
पण नौशादजींच्या प्रयोग करण्याच्या हौसेमुळे काही वेळेला त्यांचं संगीत हे केवळ ऐकायला छान आणि म्हणायला कठिण बनलं. सामान्य संगीतरसिकांना काहीसं अडचणीचं भासू लागलं. रफीला देखील याचा काही वेळेला त्रास झाला. उदा. बैजू बावरा मधलं "ओ दुनिया के रखवाले" गाताना ताण असह्य होऊन रफीच्या नाकाचा घुळणा फुटला आणि रक्त वाहू लागलं. पण त्याही स्थितीत त्याने ते गाणं पुर्ण केलं. तिच गोष्ट मुघल-ए-आझम मधल्या "जिंदाबाद ऐ मुहोब्बत जिंदाबाद" या गाण्याची. त्या गाण्याच्या तिसर्या कडव्यातली शेवटची ओळ - जिसके दिलमें प्यार न हो, वो पत्थर है ईन्सान कहाँ - हे म्हटल्यानंतर रफी अक्षरशः ओरडलाय.
नौशादजींचं निधन जरी २००६ साली झालं असलं तरी १९६८ नंतर त्यांचं संगीतक्षेत्रातलं योगदान नगण्यच होतं. एकाएकी प्रतिभेचा झरा असा कसा आटू शकतो हे एक कोडंच आहे. पण जेवढं काही त्यांनी त्या २६ वर्षात दिलयं ते आणखी १०० वर्षं तरी आनंद देत राहील हे नक्की.
०५.०५.२०१२
मला आज लिहायचं आहे ते नौशादजींच्या आणखी काही वैशिष्ट्यांबद्दल -
१. एखादे गाणे जर ३ कडव्यांचे असेल तर पहिल्या आणि तिसर्या कडव्याची चाल सारखी ठेवून मधले कडवे वेगळ्या चालीत ठेवण्याचा ट्रेंड बर्याच गाण्यांमधून आपल्याला दिसतो. याची पहीली सुरवात करण्याचं श्रेय नौशादजींना जातं.
२. नौशादजींच्या हसर्या, नर्मविनोदी स्वभावाचा उल्लेख वर एका प्रतिसादात आलाय. "कोहिनूर" च्या चित्रीकरणाच्या वेळी नौशादजींचा हा पैलू पाहीला मिळाला. हा चित्रपट (आणि आझाद - सं. सी.रामचंद्र) हा दिलीपकुमार यांना त्यांची ट्रॅजेडीकिंग ह्या त्यांच्या ईमेजमधून बाहेर पडण्यासाठी उपयोगी पडला. हा एक पोशाखी चित्रपट होता (राजे-रजवाड्यांच्या काळातला). पण याच्या संवादांमधे ईंग्लीश शब्दांचा, वाक्यांचा सर्रास वापर केला गेला आहे. त्यामुळे पहिल्या फ्रेमपासून एक हलका-फुलका चित्रपट बनला. यामागे प्रेरणा नौशादजींचीच होती. निर्माता आणि दिलीपकुमार हे दोघेही त्यांचे मित्र असल्याने त्यांनीही ही कल्पना उचलून धरली होती. या चित्रपटातली सगळीच गाणी अप्रतिम. पण त्यातही "ढल चुकी शाम-ए-गम" मला जास्त आवडतं ते त्यातल्या ताल आणि चालीच्या प्रयोगामुळे. तिनही ड्युएट्स, रफीची तीन सोलो आणि उस्ताद विलायतखान यांची सतार - सगळंच दैवी. या चित्रपटासाठी दिलीपकुमार सहा महिने सतार वादन शिकत होते.
३. मुगल-ए-आझम मधले "जिंदाबाद जिंदाबाद" हा एक असाच प्रयोग होता. या गाण्याच्या रेकॉर्डींगचा एक सुंदर फोटो माझ्याकडे होता. तर चाळीस स्त्री-पुरुषांचा कोरस आणि रफी यांच्यासाठी केवळ एकच हँगीग माईक लावून या गाण्याचं रेकॉर्डींग केलं होतं. या गाण्याच्या शेवटी कोरसच्या वरच्या आवाजात रफी जेव्हा "जिंदाबाद जिंदाबाद" म्हणतात तेव्हा अक्षरशः अंगावर शहारे येतात. नौशादजींकडे रफी जेवढा "ओरडलाय" ना तेवढा शम्मी कपूरसाठीही ओरडला नसेल. याचं आणखी एक उदाहरण - गंगा जमनातलं "नैन लड जई है" चा शेवट.
४. "पालकी" हा चित्रपट नौशादजींची स्वतःची निर्मीती होती. या मधे मात्र त्यांनी प्रायोगीकतेचा अतिरेक केला आहे (हे माझं वैयक्तिक मत आहे). याचं उदाहरण म्हणजे रफींचं कधीही न विसरता येणारं सोलो - कल रात जिंदगी सें मुलाकात हो गयी. चाल किती अनवट असावी की ध्रुवपद सोडलं तर एकही ओळ दुसरीसारखी नाही.
५. "आदमी" हा त्यांच्या उतरतीच्या काळातला चित्रपट (असावा). या मधे त्यांनी रफी आणि तलत च्या आवाजात एक अप्रतिम ड्युएट रेकॉर्ड केलं होतं - कैसी हसीन आज यें, तारोंकी रात है. पण दुर्दैवाने शुटींगच्या वेळी काहीतरी गडबड झाली (कोणी म्हणतात की मनोजकुमार ने केली) आणि प्रत्यक्ष पडद्यावर हे गाणं रफी आणि महेंद्र कपूर यांच्या आवाजात आहे. अर्थात महेंद्र कपूरने ही ते चांगलंच म्हटलं आहे. पण मी जेव्हा ओरीजीनल ऐकतो तेव्हा मला तलतचं जास्त चांगलं वाटतं.
६. राजेंद्रकुमार आणि वैजयंतीमाला-सिमी गरेवाल यांचा "साथी" हा मात्र त्यांची प्रतिभा त्यांना सोडून जात असल्याचा पुरावा देतो. याही चित्रपटातली गाणी चांगलीच होती. पण राजेंद्रकुमार साठी मुकेशचा वापर आणि केवळ शंकर-जयकिशनच्या स्पर्धेत टिकून रहाण्यासाठी वापरलेलं अतिरिक्त ऑर्केस्ट्रेशन - ऐका "मेरा प्यार भी तु है, ये बहार भी तु है" हे ड्युएट. एके काळी अगदी कमी वाद्यवापर करून केवळ आपल्या चालींनी रसिकांना खिळवणार्या या प्रतिभावंताची काळाच्या ओघात टिकण्यासाठी केलेली ही धडपड होती.
बाकी नौशादजी स्वतः शायरी करत. त्याचं एक उदाहरण म्हणजे रफींच्या निधनानंतर त्यांनी रचलेले शेर. त्यातला एक साधारण असा होता - गायकी था हुस्न-ए-फन तेरा रफी, तेरे फनपें हमें नाज है, मेरी सांसोमें तेरी आवाज है, मेरे गीतोंमे तेरी आवाज है !
०७.०५.२०१२
चित्रपटसंगीतातील (पडद्यावरील सादरीकरणातील) एका आणखी गोष्टीचा पहिलटकराचा मान नौशादजींकडे जातो. हिंदी चित्रपटातील नायक पहिल्यांदा पियानोवर बसला तो नौशादजींच्या संगीतामध्येच. चित्रपट होता मेहबूबखान यांचा "अंदाज" आणि गाणे होते "तु कहें अगर जिवनभर मै गीत सुनाता जाऊं". अर्थात या मागे मेहबूबखान यांचीच कल्पना होती. पियानोचा त्या चित्रपटातील एका पात्रासारखा वापर केला गेला आहे. ईतके त्याला महत्व आहे. तर सांगायची गोष्ट अशी की त्यापुर्वीही संगीतामधे पियानोचा वापर झालाही असेल. पण या चित्रपटाच्या लोकप्रियतेमुळे पियानो वाजवणारा नायक आणि पियानोच्या दर्शनी भागाचा स्टँड सारखा वापर करत त्यावर दोन्ही हाताची कोपरे टेकवून नायकाकडे कौतूक + प्रेमाने बघणारी नायिका हा रोमँटीसिझमचा नवा फॉर्म्युला एवढा लोकप्रिय झाला की त्यानंतर अनेक वर्षे कोणीही ऐरागैरा नत्थुखैरा उठायचा / उठायची आणि सरळ पियानो "बडवत" सुटायचे. पियानो हे खरंतर कष्टसाध्य वाद्य आहे. पण हिंदी चित्रपटात त्याचा उपयोग ९९% वेळा "सुरवाद्य" नसून "तालवाद्य" असल्यासारखा तो "बडवला" गेला आहे. (पहा - गाणे "दिल का सुना साज तराना ढुंढेगा" - सादरकर्ते श्री. शत्रुघ्न सिन्हा :फिदी:) ! आणि हे अगदी आता-आता पर्यंत चालत आले आहे.
नौशादजींची आणखी एक देणगी म्हणजे गाण्यांमधे त्यांनी अॅडलीब चा केलेला प्रभावी वापर. याची सुरवात झाली "दिदार" मधल्या "हुवे हम जिनके लिए बरबाद" ने. त्या गाण्याच्या सुरवातीचा "असिर पंजाए, अहदे शबाब" ही अॅडलीब गाण्याईतकीच लोकप्रिय ठरली होती. (विषयांतर होईल, पण ऑर्केस्ट्रात गाणार्या कलाकारांसाठी ही एक मोठी देणगी ठरली. साधारणतः व्हॉईस ऑफ रफी म्हणून गाणारे बहुतांश कलाकार एंन्ट्रीला अशी गाणी निवडतात. म्हणजे स्टेजवर काळोख आणि विंगमधूनच वर दिलेली किंवा "चले आज तुम जहांसे" ही "ओ दुरके मुसाफिर" ची अॅडलीब गायची आणि मग स्टेजवर पुढचे गाणे गात-गात यायचे - हमखास टाळ्या वसूल) 
आभार अशोक, हे अभी तो मै जवां
आभार अशोक,
हे अभी तो मै जवां हू, पाकिस्तानी गायिका, (फरिदा खातूम ??? ) च्या आवाजात ऐकल्यासारखे आठवतेय.
मुगले आझम मधे बाकी पण अनेक गाणी होती,
ये दिल की लगी कम होगी, हि जयजयवंति मधली रचना, माझ्या खास आवडीची.
अभी तो मैं ज्वां हूं -
अभी तो मैं ज्वां हूं - मल्लिका पुखराजने गायले.
दिनेशद, तुमच्याकडे लताचे रेअर जेम्स आहे म्हणालेलात ना? त्यात पहिलेच गाणे 'अभी तो मैं जवां हूं' आहे.
होय दिनेश..... फार वेगवेगळ्या
होय दिनेश..... फार वेगवेगळ्या गायिकांनी ती रचना वेळोवेळी सादर केली आहे. फरीदा खातूमप्रमाणेच मलिका पुखराज या तर त्यांच्या हरेक मैफिलीत 'अभी तो मै जवाँ हूं....' सादर करीत. तिच गोष्ट ताहिरा सय्यद यांची.
नौशादजींच्या अनेक आवडत्या रागापैकी 'जयजयवंती' एक. तुम्ही वर उल्लेख केलेले मुघले आझममधील 'ये दिल की लगी क्या कम होगी....' प्रमाणेच त्यांची याच रागातील 'मोहब्बत की राहो मे चलना संभलके' ही 'उडन खटोला' तील आणि "जिंदगी आज मेरे नाम से शर्माती है !" ही 'सन ऑफ इंडिया' मधील आणखीन् एक रफीसाहेबांच्या आवाजातील.....दोन्ही नौशादजींच्याच रचना.
मात्र व्यक्तिगतरित्या पाहिल्यास मला जयजयवंतीमधील "मारे गये गुलफाम अजी हॉं मारे गये गुलफाम...." हे लतादीदींचे 'तिसरी कसम' मधील गाणे खूप खूप आवडते. वहिदाने पडद्यावर केलेला गाण्याच्या भावातील अभिनयही तितकाच तोडीस तोड.
सर्वप्रथम सर्व नविन
सर्वप्रथम सर्व नविन प्रतिसादकर्त्यांचे आभार ! नौशादजीं जाऊन आज सहा वर्षं झाली असली तरी रसिकांच्या मनात आजही ते त्यांच्या संगीतरुपाने जिवंतच आहेत हे या सर्व प्रतिसादांवरून स्पष्ट कळतयं. गाण्यांच्या बाबतीतले किस्से हे अशोकजींनी सांगीतल्याप्रमाणे कदाचित केवळ मनोरंजनासाठी निर्माण झाले किंवा केले असणे शक्य आहे. कारण त्यावेळी रेकॉर्डींग स्टुडीओ मधे हजर असणारी मंडळीच केवळ याबाबत जास्त अधिकाराने सांगू शकतात. हे जे काही आहे ना ते मला पुराणातल्या देव-देवतांच्या कथांसारखं वाटतं. त्या कथांवर भाविक ज्याप्रमाणे विश्वास ठेवतात ना तसाच विश्वास आम्ही या अशा किश्श्यांवर ठेवतो. रफींचा घुळणा फुटणे ही दंतकथा असू ही शकेल पण म्हणून "ओ दुनियाके रखवाले" हे गाणं उच्च प्रतीचे नाही असं म्हणणं अतिशयोक्ती आहे. तीच गोष्ट लताजींनी "मोहे भुल गये" च्या चाली बाबत असे हिणकस उद्गार काढले असं म्हणण्याच्या बाबतीतली आहे.
नौशाद यांच्यासाठी भांडायला
नौशाद यांच्यासाठी भांडायला तयार असणारे फॅन्स आहेत हे बघून छान वाटले.
हिंदीचित्रपटसंगीतात मोठा वाद्यवृंद आणण्याचे श्रेय बहुधा नौशाद यांचे (श्री अशोक किंवा स्वतः ट-ओ अधिक सांगू शकतील).
जब दिल ही टूट गया या गाण्याच्या उल्लेखाशिवाय नौशाद-स्मरण पूर्ण कसे होणार?
या गाण्याबद्दलची आख्यायिका अशी की सैगलनी हे गाणे आपल्या अंतिम यात्रेच्या वेळा वाजवायला सांगितले.
पुढचा किस्सा मात्र मी स्वतः गायिकेच्या तोंडून अलीकडेच एका एफेम वाहिनीवर ऐकला (अर्थात ही गायिका विनोदी अभिनेत्री म्हणून जास्त प्रसिद्ध असल्याने यातही तिखत मीठ असू शकते). उमादेवी यांना चित्रपटांसाठी गायचेच होते. त्यांनी नौशाद यांच्या घराबाहेर बसून आमरण उपोषण करायची धमकीच दिली. नौशाद यांनी मग त्या गायिकेच्या मर्यादा लक्षात घेऊन तिच्या आवाजाल शोभतील अशी गाणी दिली...अफसाना लिख रहीं हूं, काहे जिया डोले ही त्या गायिकेची गाजलेली गाणी.
अतिशय सुरेख लेख अशोकजी आणि
अतिशय सुरेख लेख
अशोकजी आणि दिनेशदांचे प्रतिसादही तेव्हढेच सुरेख.
श्री.मयेकर म्हणतात
श्री.मयेकर म्हणतात त्याप्रमाणे खरोखरीच मोठा वाद्यवृंद चित्रपट संगीतक्षेत्रात आणण्याचे श्रेय नौशादजी यांच्या नावाकडे जाते. 'आन' हा तो पहिला हिंदी चित्रपट जिथे प्रथमच मोठ्या संख्येने वादकवृंद नेमस्त करण्यात आला होता. पुढे शंकर-जयकिशन यानी नेहमीच अशा १०० हून अधिक वादकांची साथ आपल्या संगीतासाठी घेतली होती...नंतर अन्य संगीतकारांमध्येही तो प्रघातच पडला. नौशादजींच्या काळात "साऊंडप्रूफ" स्टुडिओच अस्तित्वात नसल्याने गाण्यांचे रेकॉर्डिग मध्यरात्री नंतर शांत बागेत केले जायचे. 'प्यार किया तो डरना क्या' गाण्यातील एका विशिष्ठ ठिकाणी ईको इफेक्ट येण्यासाठी त्यानी तो पीस लतादिदीकडून चक्क बाथरूममध्ये रेकॉर्ड करून घेतल्याची नोंद आहे.
पुढे तंत्रज्ञानात कमालीची सुधारणा झाल्यावर ते ज्ञानही त्यानी आपलेसे करून तदनुषंगाने आपल्या संगीताच्या नोटेशन्स त्यानी करवून घेण्यास सुरुवात केली.
समोरासमोर गप्पासाठी बसले की अशा खूप जुन्या आठवणी सांगण्यात ते रमत असत [वाढत्या वयामुळे त्यांच्या खणखणीत आवाजाला कसलाही उपसर्ग झाला नव्हता हे एक विशेष]. थेट त्यांच्या तोंडातूनच त्या स्मृतीगंधाच्या खुणा येत असल्याने त्या प्रमाण मानणे भागच आहे.
अशीच त्यांची १९९७ मध्ये बीबीसीच्या हिंदी विभागाने घेतलेली १५ मिनिटांची आठवणीची मुलाखत खालील लिंकवर इथल्या नौशादप्रेमींनी जरूर ऐकावी अशीच आहे :
http://www.bbc.co.uk/hindi/multimedia/2012/05/120504_naushad_audio_pkp.s...
अशोक पाटील
प्रतिसादकर्त्यांच्या सुंदर
प्रतिसादकर्त्यांच्या सुंदर प्रतिसादांमुळे हा धागा समृद्ध होत चालला आहे ! मी ही जसं सुचेल तश्या आठवणी, किस्से यांची भर घालण्याचा प्रयत्न करतो आहे ! पुन:श्च धन्यवाद !
एका प्रकट मुलाखतीत नौशादजींनी
एका प्रकट मुलाखतीत नौशादजींनी पाश्चात्य संगीत व भारतीय रागदारी यासंबंधीत काढलेले उद्गार खूप मार्मिक आहेत -
"पाश्चात्य संगीताने शरीर डोलते तर आमच्याकडील संगीताने मन डोलायला लागते" - असे काहीसे उद्गार होते ते.
अगदी वृद्ध झाल्यावरही नौशादजींच्या मुखावरील झळकत रहाणारे सदाबहार निरागस हास्य आठवत रहाते.......
परवा विविधभारतीवर एक
परवा विविधभारतीवर एक कार्यक्रम झाला.
त्यात उडन खटोला म्धल्या, हो मोरे सैंयाजी उतरेंगे पार हो, नदीया धीरे बहो.. मधल्या कोरसच्या अनोख्या
वापराबद्दलचा उल्लेख होता.
लेख आणि सगळ्याच प्रतिक्रिया
लेख आणि सगळ्याच प्रतिक्रिया वाचनिय.
महंमद रफीचा घुळणा फुटणे हीही अशीच बनवलेली कहाणी असावी. >> माझ्यकडे असलेल्या कॅसेटमधे गाण्याच्या शेवटी उपस्थित सगळे वादक रफी साहेबांना "रोक दो, रोक दो" असे ओरडुन सांगताना ऐकु येते. मी चित्रपट पाहिलेला नाही, पण रेकॉर्डींगमधे ऐकु येणार्या त्या आवाजा बद्दल विविध भारतीने पण दुजोर दिल्याचे आठवते.
असो.
रफी + नौशाद जोडी अजरामर
रोक दो रो हे चित्रपटातले
रोक दो रो हे चित्रपटातले संवाद आहेत; बैजूला उद्देशून महालातल्या रक्षकांनी म्हटलेले. वादकांनी म्हटलेले नव्हे. गाण्याची दृकश्राव्यफीत पहा.
>>रोक दो रो हे चित्रपटातले
>>रोक दो रो हे चित्रपटातले संवाद आहेत; बैजूला उद्देशून महालातल्या रक्षकांनी म्हटलेले. वादकांनी म्हटलेले नव्हे.<<
सहमत. असेच आहे. तानसेनच्या घराच्या आसपास गाऊन तानसेनच्या संगितसाधनेत हा कोण व्यत्यय आणतो आहे अशासाठी बैजूला आवरण्यासाठी रक्षकांनी केलेला तो प्रयत्न आहे असे आठवते.
श्री.मयेकर आणि श्री.दामोदरसुत
श्री.मयेकर आणि श्री.दामोदरसुत यांचे निरीक्षण योग्य आहे. बैजूने त्या गाण्यासाठी लावलेला वरच्या पट्टीतील सूर ऐकून तानसेन यांच्या वाड्यावरील रक्षक ते संबंधित आदेश देतात असा कथानकातील तो एक भाग.
केवळ 'रोक दो....' इतकेच नव्हे तर, दुसरा "बंद कर दो," तिसरा "जान खानी है क्या?", तर चौथा "पकडा जायेगा" अशाही धमक्या देत आहे.
वा! अशोक यांनी तर सर्वच्या
वा! अशोक यांनी तर सर्वच्या सर्वच तपशील अचूक दिला आहे त्यामुळे आता या अवांतरावर पडदा पडायला हरकत नसावी.
महंमद रफीचा घुळणा गातांना फुटला असेल वा नसेल. त्याला फारसे महत्व नाही.
महत्वाचे हे की नौशादजींनी दिलेले लाजवाब संगित व रफीजींसकट नौशाद्जींनी निवडलेल्या सर्वच गायकांनी त्याचे केलेले सोने हे आपल्याला स्वर्गीय आनंद देते आहे आणि यात दुमत नाही.
अशोक, ती चीज आणि त्यानंतरचे
अशोक, ती चीज आणि त्यानंतरचे संवाद यू ट्यूबवर आहेत. चित्रपटाच्या श्रेयनामावली वेळीच ती चीज आहे.
लेख सुरेख आणि प्रतिक्रियाही
लेख सुरेख आणि प्रतिक्रियाही छानच. नौशाद यांच्या बहुतेक सर्व आवडत्या गाण्यांचा उल्लेख झालेलाच आहे. अधिक लिहिले तर द्विरुक्ती होईल. रविवार ६ मे रोजी मुंबईत त्यांच्या स्मृतीनिमित्त एक अप्रतिम कार्यक्रम 'सरगम' तर्फे सादर झाला. अनेक जुनी गाणी मूळ स्वरूपात ऐकायला मिळाली. केवळ गाणीच नव्हे तर त्यासंबंधीच्या आख्यायिका,गाण्यांची पूर्वपीठिका म्हणजे चालीचे मूळ कोणत्या चीजेत आहे, कोणता राग आहे,गायकाने कुठल्या जागा,मुरक्या कश्या घेतल्या आहेत इ. रसग्रहणही सांगितले गेले. सादरकर्ते अमरेंद्र (नंदू) धनेश्वर स्वतः तयारीचे गायक. त्यात त्यांना नौशाद यांच्याविषयी परम आदर आणि प्रीती. त्यामुळे कार्यक्रम न रंगता तरच नवल. तीन साडेतीन तास श्रोते खुर्चीला खिळून बसले होते.
दिनेश....धन्यवाद. जरूर पाहतो
दिनेश....धन्यवाद. जरूर पाहतो मी ती लिंक आत्ता.
@ दामोदरसुत : "महंमद रफीचा घुळणा गातांना फुटला असेल वा नसेल. त्याला फारसे महत्व नाही" ~ सहमत.
रेकॉर्डिंगच नव्हे तर प्रत्यक्ष शूटिंगच्या समयी अशा कित्येक घटना घडत असतातच, त्याचे महत्व तेवढ्या कालापुरतेच.
कोल्हापूरनजीकच्या मुडशिंगी गावात देव आनंदच्या 'प्रेमपुजारी' चे शूटिंगच्यावेळी 'शोखीयोंमे घोला जाये फुलोंका शबाब....' गाण्यादरम्यान शेतातून अनवाणी पळत असताना वहिदा रेहमानच्या पायात काटा घुसला. वेदनेने ती थांबली तिथेच. शूटिंगही. आणि मग तिच्या पाठोपाठ येणार्या देव आनंदने वाकून हलक्या हाताने तो काटा काढला....गळ्यातील रुमालाने ते रक्त पुसले....झाले. थोड्या विश्रांतीनंतर दृष्य पूर्ववत चित्रीत सुरू झाले.
ही एक साधी नेहमी घडणारी घटना. पण तिथे हजर असलेल्या सो-कॉल्ड 'सिनेपत्रकारांनी' आपल्याकडील नित्याचा मालमसाला लावून आपापल्या मॅगेझिन्समध्ये अशी खुमासदार छापली की सर्वांना देव आनंद हा अभिनेता नसून एक मसिहाच वाटावा.
मात्र ते दृश्य आम्ही सर्वांनी प्रत्यक्ष जागेवर पाहिले असल्याने त्या बातमीतील फोलपणा चटदिशी समजला. अर्थात या जगताशी संबंधित अशा घटना रंगवून वा बाऊ करून सांगणे हा नित्याचाच प्रकार.....रफीचा घुळणा गाण्याच्यावेळी फुटला हा प्रसंगही अशाच पोतडीतील.
अशोक पाटील
नौशाद - एक असा संगितकार
नौशाद - एक असा संगितकार ज्याची फारच कमी गाणी मला आवडत नाहीत.
त्यांच्या अजरामर संगीताशिवाय इतर काही गोष्टींमुळेही मला त्यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे -
१. लताच्या गाण्याचे एक ठळक वैशिष्ठ्य म्हणजे तिचे अस्खलित हिंदी/उर्दू उच्चार. आणि ते तिच्या गळ्यात उतरवण्यात ज्यांचा वाटा होता त्यातले एक नौशादमियॉ. त्यांच्याच संगितात लताने गायलेले 'उठाये जा उनके सितम' ऐका. त्यात तिचे मराठमोळेपण जाणवते अघून-मधून. पण मग नंतर मदनमोहनकडे गायलेल्या सगळ्या गझला ऐकल्यावर लता उर्दूभाषीक नही हे सांगूनही खरे वाटणार नाही.
२. आज सुरय्याची जी काही गाणी आहेत त्यातली बरीचशी गाणी अस्तित्वातच नसती जर नौशाद नसते. सुरय्याला तिचा स्वतःचा आवाज खास वाटायचा नाही आणि वर गायचा कंटाळाही यायचा. पण तिला सतत प्रोत्साहन देऊन नौशादनी गाते ठेवले.
३. आज अनेक जूनी गाणी ऐकताना त्यांचे रेकॉर्डींग कमी दर्जाचे असल्याचे जाणवते. त्यामुळे ती गाणी ऐकताना काहीसा बेरंग होतो. पण नौशादनी काय क्लृप्ती केली काय जाणे - पण त्यांच्या झाडून सगळ्या गाण्यांचे रेकॉर्डींग खणखणीत होते अगदी त्या काळातही. (ऐका नूरजहॉची अनमोल घडीमधली गाणी).
नौशाद परफेक्शनीस्ट होते. गायकांना एक-एक जागा गळ्यातून अचूक काढावी लागायची. अर्थातच त्याकरता भरपूर तालमी व्हायच्या. पण त्यामुळे कधीकधी गाण्यातला उत्स्फुर्तपणा निघून जायचा. मला लताचा आवाज नौशादच्या संगीतात हिर्यासारखा वाटतो - पैलू पाडलेला, लखलखीत पण काहीसा यांत्रिक. याच कारणामुळे का काय पण अनारकलीच्या संगीताची उंची मोगल-ए-आझमला गाठता आली नाही. मोगल-ए-आझममध्ये बाकी सगळ्या बाजू उजव्या होत्या - मधुबालाचे जिवंत सौंदर्य बीना रॉयच्या निर्जीव सौंदर्यापेक्षा कैक पटीने भारून टाकायचे, सेटच्या भव्यतेच्या बाबतीत अनारकली कैक योजने पाठी होता. पण गाणी? अण्णा चितळकरांकडे लताचा आवाज मधात बुडून यायचा. 'मुझसे मत पुछ मेरे इश्क मे क्या रखा है' च्या तोडीचे एकही गाणे नाहीये मोगल-ए-आझममध्ये हे माझे वै.म.
रफीसाहेब आणि नौशाद म्हणजे दुग्धशर्करा योग. रफीसाहेबांच्या आवाजातील ताकदीचा सर्वांगसुंदर वापर नौशादनीच केला. त्या जोडीची खूप आवडती गाणी वरती आलेलीच आहेत.
किशोर त्यांच्या पठडीत बसणारा नव्हता पण आशा, तलत यांच्याकडूनही त्यांनी फारशी गाणी गाऊन घेतली नाहीत. रेकॉर्डीगच्या वेळेला एकदा तलत त्यांच्यासमोर सिगरेट प्यायला आणि अशा शुल्लक कारणामुळे तो त्यांच्या मनातून उतरला.
लता आणि नौशादची गाणी म्हणजे एक खजीनाच आहे. मला प्रचंड आवडणारी गाणी पहिली १० -
१. उठाये जा उनके सितम - अंदाज
२. खामोश है खेवनहार मेरा - अमर
३. तुझे खो दिया हमने - आन
४. ये कौन आया - साथी (एकदम हटके गाणे आहे हे. मियाँच्या पोतडीतले तर अजीबात वाटत नाही.)
५. ना मानू ना मानू - गंगा जमुना
६. ढुंढो ढुंढो रे साजना - गंगा जमुना
७. तू कौन है मेरा केह दे बालम - दिदार
८. तकदीर जगाके आयि हू - दुलारी
९. मरना तेरी गली मे - शबाब
१०. घुंघट नही खोलू - मदर इंडिया
टवाळ, लेखाबद्दल धन्यवाद.
फार सुंदर लेख.
फार सुंदर लेख.
अनारकली आणि मुगल-ए-आझम
अनारकली आणि मुगल-ए-आझम बद्दलच्या माधव ह्यांच्या मताशी सहमत.
अण्णा चितळकर आणि लता मंगेशकर हे काँबीनेशन म्हणजे नौशाद आणि रफी ह्या काँबीनेशन इतकेच डेडली होते. अण्णांचे माझ्या जीवनाची सरगम हे आत्मचरीत्र वाचायचे भाग्य मिळाल्यामुळे त्यांच्या केमिस्ट्रीबद्दल बरीच माहीती मिळाली.
'ए मेरे वतन के लोगो' बद्दलही त्यात एक मस्त किस्सा आहे पण तो इथे सांगणे संयुक्तिक नाही.
मला तर अनारकलीतील फक्त
मला तर अनारकलीतील फक्त मोहोब्बत मे ऐसे कदम डगमगाये आणि ये जिंदगी ही दोनच गाणी भावली.. मोहोब्बत मे ऐसे हे तर केवळ ऐकण्यालायक आहे म्हणून बघण्यालायक वाटते. अकबराचा दरबार हा दरबारच वाटत नाही.. तो अकबर फार्फार तए कोल्हापूरकडचा एखादा सरपंच वाटतो आणि बैठकीला बसल्यागत वाटतो... त्या गाण्यात त्याचे हावभाव असेच एक्साइट झाल्यासारखे आहेत.
आणि प्रदीपकुमार म्हणजे सरपंचाचं पोरगं !
खानदाअनी राजेशाही त्यात कुठल्याही पात्रात किंवा सेटमध्ये जाणवतच नाही. सगळ्या गाण्यांची स्टाइअल्ही एक्सारखी.. आधी एक शेर मग रिदम चालू होतो, मग गाणे.. मुघले आजमचे प्रत्येक गाणे वेगळे आहे.
जामोप्यांशी सहमत आहे. परंतू
जामोप्यांशी सहमत आहे.
परंतू ही दोनच गाणी इतकी उच्च दर्जाची आहेत की मन वेडावून जाते.
भव्यता, अभिनयाची उंची ह्यांचा विचार केला तर अनारकली मुगल-ए-आझमच्या तुलनेत काहीच नाही हे खरे आहे.
के. असिफला त्यासाठी सलाम!
रोक दो रो हे चित्रपटातले
रोक दो रो हे चित्रपटातले संवाद आहेत; बैजूला उद्देशून महालातल्या रक्षकांनी म्हटलेले. वादकांनी म्हटलेले नव्हे.>>
धन्यवाद मंडळी.
अनेक वर्ष हाच (गैर)समज बाळागुन होते
अर्थात त्याने रफीबद्दलच्या आदर भावना जराही बदलत नाहीतच.
नौशादांचे आणखी एक वैशिष्ट्य
नौशादांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हनजे त्यांची उर्दू आदब.दिलिप कुमार जसा उर्दू भाषेच्या लहेज्यासाठी ओळखला जातो तसे नौशादही....मेहदी हसन यांच्या भारतातल्या पहिल्या कार्यक्रमाचा इब्तेदा त्यानी जो केलाय तो केवळ अप्रतिम आणि खानदानीच....
"अर्थात त्याने रफीबद्दलच्या
"अर्थात त्याने रफीबद्दलच्या आदर भावना जराही बदलत नाहीतच...."
~ हे आवडले.
एखाद्या कलाकाराकडे आपण स्नेहाचा आदराचा जो चष्मा लावून पाहतो, त्याच्या संदर्भात कसल्याही खर्याखोट्या वदंता पसरत असल्यास त्याकडे वेळीच काणाडोळा करणे हाच सर्वोत्तम मार्ग. हिंदी चित्रपटसृष्टी भाकड चमत्कारांच्या गोष्टींनी अक्षरशः बुजबुजलेली आहे. लोकही जातो बरा वेळ म्हणूनही असल्या पुरावा नसलेल्या कथा चघळत असतात. त्यावर कुणी विश्वास ठेवो वा ना ठेवो, आपल्याला त्या कलाकाराच्या कलेशी मतलब.
Pages