मदत

Submitted by बेफ़िकीर on 26 April, 2012 - 06:57

"घर तुमच्या नावावर होतं? मग कशाला त्याच्या नावावर केलंत? सरळ हाकलून द्यायचंत सगळ्यांना घरातून"

बाबा वाकणकर चेहर्‍याच्या घडीत सूक्ष्मही बदल न करता जमीनीकडे पाहात बसले होते. आधार वृद्धाश्रमात आठ दिवसांपूर्वीच आले होते ते. आठ दिवसात जरूरीपुरते संवाद सोडले तर एकाशी अक्षराने बोललेले नव्हते. आपल्या खोलीत जायचे आणि काहीतरी लिहीत बसायचे. वृद्धाश्रमाचे टायमिंग मात्र अतिशय व्यवस्थित पाळायचे. पाच वाजता उठायचे, साडेपाचला चहा पिऊन तयार. मग साडे सहापर्यंत फिरून यायचे. एक सहा जणांचा ग्रूप फिरायला जायचा. फक्त त्या सहाजणांनाच बाहेर पडायची परवानगी होती कारण त्यांच्यातला एक वृद्धाश्रमाचाच सहव्यवस्थापक होता. त्यांना वैद्यकीय सल्ल्यानुसार बाहेर फिरायला पाठवले जायचे. बाकीचे वृद्ध वृद्धाश्रमातच फिरायचे. बरीच जागा होती. त्या सहाजणांनी बाबांना दुसर्‍याच दिवशी विचारले फिरायला येता का असे. खरे तर ही सवलत नव्हती कोणाला. पण बाबा आल्या क्षणापासून एक अक्षरही बोललेले नव्हते कोणाशी. बरेचसे वृद्ध आल्याच्या दिवशी असेच वागायचे हे माहीत असल्यामुळे जरा सामावून घेण्याच्या हेतूने बाबांना त्या सहाजणांनी विचारले. बाबांना हे माहीत नव्हते की ही सवलत आहे, त्यांना तो नियम वाटला होता. तसेही ते दिवसातून तीन वेळा चक्कर मारायचेच पायी. सकाळी उजाडण्याआधी, दहा ते पावणे अकरा देवळात आणि संध्याकाळी पावणे सहा ते साडे सहा नुसतेच रस्त्यावरून फिरून यायचे. त्यामुळे त्यांना ही नियम वाटलेली सवलत बरी वाटली. तेही निघाले चालायला. त्यांना अनेक प्रश्न विचारले गेले. पण आश्चर्य म्हणजे बाबा एक अक्षरही बोलले नाहीत. सगळे जण पुलावर थोड वेळ थांबल्यावर बाबाही थांबले आणि सगळ्यांबरोबर परतही आले. हा माणूस फारच डिस्टर्ब्ड वाटतो असे वाटल्याने दुसर्‍या दिवसापासून आजपर्यंत कोणीही त्यांना काहीही विचारले नाही. पण हा माणूस अत्यंत शिस्तीने वागत आहे आणि वृद्धाश्रमात जमेल तितका मिसळतही आहे हे पाहिल्यावर मात्र या सहाजणांनी आज जेवणानंतर बाबांना एका बागेच्या कोपर्‍यात गप्पा मारायला नेले. बाबा वाकणकरांचे मन येथे रमावे या उद्देशाने प्रमुख व्यवस्थापक निर्मलाबाईंनी या सात जणांना उशीरा झोपायची परवानगी दिली होती. भरपूर गप्पा मारा आणि मग झोपा म्हणाल्या.

त्यानंतर या सहा जणांनी त्यांना बोलते करायचा प्रयत्न केला तेव्हा समजले की या बाबांचे घर आधी त्यांच्या स्वतःच्या नावावर होते आणि ते एकदाचे मुलाच्या आणि सुनेच्या आग्रहावरून मुलाच्या नावावर केल्यानंतर अचानक घरातल्यांच्या वागण्यात फरक पडला होता. मुलगा अजित येताजाता त्यांच्यावर ओरडू लागला होता. सून नेत्रा त्याच्याकडे चहाड्या करू लागली होती. स्वतःही टोमणे मारू लागली होती. नातू रोहन चांगला आठ वर्षाचा होता. आजवर आजोबा आजोबा म्हणून नुसता त्यांच्या मागे मागे असायचा. पण आता घरातले बदललेले वारे पाहून त्यानेही आजोबांची टिंगल करायला सुरुवात केली. त्याला धपाटा द्यायच्या ऐवजी नेत्रा खुदकन हासत होती. आणि आठवड्यातून एकदा या रेटने मोठी भांडणे व्हायला लागली. बाबांचे कपडे, त्यांच्या वस्तू, त्यांची दिनचर्या, त्यांची नसलेली उपयुक्तता, त्यांचे फुकट खाणे हे सगळे आता स्पष्टपणे निघायला लागले. या सर्वावर बोचरी टीका होऊ लागली. बाबांना स्वतःला तर केव्हाचेच नकोसे झालेले होते. जवळपास गेले आठ महिने हा प्रकार चालला होता. अगदी ठरवून केल्याप्रमाणे घर स्वतःच्या नावावर होताच तिघांनी बाबांना मनस्ताप द्यायला सुरुवात केली होती. आता वारंवार होणार्‍या बहंडणार अधेमधे अजितही बाबांशी कडकडून भांडू लागला होता.

एकदा तर असे झाले की विमलची आठवण येऊन बाबा घरात एकटे असताना खूप खूप रडले. विमल जिवंत असती तर तिने सुनेला असे काही धाकात ठेवले असते की तिचे तोंड उघडायचे धाडस झाले नसते. इतकेच काय, ती असती तर बाबांनी घरही अजितच्या नावावर करण्याची मुळीच घाई केली नसती.

रोहनला मात्र आता नेत्रा स्वतःच शाळेत सोडत आणत असे. तेवढी जबाबदारी तिने का स्वीकारली तर त्या उपकारांखाली या म्हातार्‍या सासर्‍याबाबत चार चांगले शब्द बोलायला लागू नयेत आणि उद्या त्यांना एकदा वृद्धाश्रमात पाठवल्यानंतर आपले काही अडायला नको.

जुने कपडे मोलकरणीच्या नवर्‍याला देऊन टाकावेत तसे बाबांना अजितने आणि नेत्राने आधार वृद्धाश्रमात आणून सोडले. निर्मलाबाईंशी मात्र दोघे इतके गोड वागले की असे वाटावे हा माणूसच भांडणे करत असावा घरात. पुन्हा पैसेही बाबांचेच वापरले तिथे प्रवेश घ्यायला. दु:खातिरेकाने थरथर कापत बाबा आपल्या खोलीत निघून गेले तेव्हा अजितने कारमध्ये बसताना फक्त वळून त्यांना हात केला.

ऋणानुबंध संपले. आपलं घर नावाचे आता जगात काहीच नव्हत. पोटचा मुलगाच हाकलून देत होता. विमलचा एक फोटो, घरातल्या आणि बाहेरच्या कपड्यांचे असे मिळून एकंदर चार जोड, बॅन्केचे पासबूक, काही वस्तू आणि देव एवढे घेऊन बाबा वाकणकर आपल्या खोलीच्या आढ्याकडे मृतवत नजरेने पाहात त्या खोलीत राहू लागले.

आणि आत्ता देवधर विचारत होते..

"घर तुमच्या नावावर होतं? मग कशाला त्याच्या नावावर केलंत? सरळ हाकलून द्यायचं सगळ्यांना घरातून"

"तसं नाही होत देवधर.. तुम्हीही बाप असाल कोणाचेतरी.. तुमचेही कोणी नातेवाईक असतील.. आपल्या पोटच्या गोळ्याची मागणी नाकारता येत नाही.. असं वाटतं की इतके प्रेमाने वागतायत.. आपल्याला काय कमी आहे? बायको गेली इतकेच दु:ख.. पण.. नंतर रंग कळतो तेव्हा नाही काही करता येत हो..."

"बाबा.. आपल्या जमान्यात बापापुढे... बापाचे वय शंभर झाले असले तरी तोंड उघडायची हिम्मत नव्हती..."

"खरंय देवधर.... जमाना बदलला.. माणसं बदलली.. विचार, संस्कार, संस्कृती... सगळं बदललं.. असं वाटतं की जाऊन त्याच्या बायकोदेखत त्याच्या चार थोबाडात लावून विचारावं की हे शिकवलं का आम्ही तुला??? .. तुला खांद्यावर बसवून रस्त्यात फिरून सगळे दाखवायचो... आता मला कोण आधार देणार? पण.. आता ती ताकदही नाही राहिली देवधर... आणि ती इच्छाही...काय होणार आहे समजा मी त्याला झापले तर?? लोकलज्जेस्तव मला ठेवेलही घरी... पण असे वागतील... असे हासतील माझ्या देवधर्माला आणि वागण्याला की नको होईल.. मग असे वाटेल की आठवडाभरच आधार वृद्धाश्रमात राहिलो पण शांत वाटले.. तिथेच जाऊ... मग आत्ता तुम्हा सगळ्यांना सोडून कशाला जावे?"

हा बाबा नावाचा म्हातारा इतका बोलतो हे त्या सहाजणांना आत्ताच कळले.. बाबांचे विचार ऐकून भडभडून येत होते सगळ्यांना... पण जवळपास सगळ्यांचेच अनुभव तसेच होते... स्वेच्छेने वृद्धाश्रमात फक्त दोन तीन जण आलेले होते.. तेही स्वतःचे कोणीच नसल्यामुळे.. बाकी सगळ्यांना घरी राहावेसे वाटत होते... नातवंडांशी खेळावे, घरातल्या प्रश्नात, चर्चेत सहभागी व्हावे, हसून खेळावे राहावे असे सगळ्यांनाच वाटत होते.. पण ते शक्य नव्हते... त्यांना आता त्यांच्या घरात स्थानच नव्हते.. असलेच तर ते अडगळीचे..... अडगळ होण्यापेक्षा येथे निदान काम करून का होईना आदर मिळतोय हे अधिक भावत होते बिचार्‍यांना..

कामतकाका जरा धीट होते त्यातल्या त्यात! ते सरळ म्हणाले..

"आपापली मुले सणासुदीला घ्यायला आली किंवा गोडाचे द्यायला आली ना? की सरळ शिव्या घालायच्या त्यांना... लाज वाटली पाहिजे त्यांना..."

"काही उपयोग नाही कामत... इथे लाज वाटेल आणि घरी गेल्यावर हासत बसतील... कसे म्हातारे सगळे भडकले म्हणत..."

"लाथा घालायला पाहिजेत..."

तेथे एक आजी होत्या बसलेल्या.. विचारे आडनांव त्यांचे... त्यांनी पदराला डोळे पुसले.. एकेकाचे ऐकून रडूच येत होते.. म्हणाल्या...

"मुलांना जन्मच नको द्यायला.. "

हळूहळू एकेकजण उठू लागला.. पण बाबा तसेच बसलेले होते.... त्यांनी नुकतीच त्यांची सगळी कहाणी सांगीतली होती... त्यामुळे थोडे मन मोकळे झालेले असले तरी असे वाटत होते की आपल्या घरातल्या भानगडी आज या परक्यांना सांगाव्या लागल्या.. शाळिग्राम हे तेथील सहव्यवस्थापक होते... त्यांना सगळे उगाचच सर म्हणायचे... अनेकांपेक्षा ते वयानेही लहान होते... पण थोडे अधिकार होते त्यांना... ते बाबांना म्हणाले...

"बाबा.. तुम्हाला वाटत असेल आम्ही कोण कुठले... कशाला यांना आपण सगळे सांगितले... पण लक्षात ठेवा.. इथे सगळेच तसेच आहेत... मीही... आपल्यातचमन मोकळे करून टाकायचे असते इथे...लाजायचे नाही... चला.. निजा आता...बरेच वाजले..."

पण कामत विचार करत होते... ही परिस्थितीच का यावी... प्रेम का नसावे मनामनात??? का म्हणून मुलांनी असे करावे??? हा विचार ते नेहमीच करायचे... नवीन सदस्य आला की त्याची कहाणी ऐकताना पुन्हा तोच विचार त्यांच्या मनात यायचा... पण आज त्यांना जरा जास्तच वाईट वाटले होते... याचे कारण बाबा वाकणकरांनी जे सांगितले... कामतांच्या बाबतीतही जवळपास तसेच झाले होते... घर मुलाच्या नावावर केल्यावर लगेच भांडणे काढण्यात आली होती.. त्यामुळे भडकलेले कामत म्हणाले...

"या मुलांना शिक्षा काय द्यायची ?? हे समाजात उजळ माथ्याने वावरत असतात... त्यांच्या वर्तुळातील कित्येकांना हेही माहीत नसेल की त्यांचे आईबाप हाकलून दिले गेल्यामुळे वृद्धाश्रमात पडलेले आहेत... काय शिक्षा मिळणार यांना??"

सर पुढे झाले आणि त्यांनी कामतांना थोपटले..... आजींनी पुन्हा डोळे टिपले..

.. एक लांबलचक टप्पा सुरू झाला होता बाबांच्या जीवनात... एकांताचा... अगतिकतेचा.. तिळ तिळ तुटण्याचा... जुन्या आठवणी आल्या की रडवेले होण्याचा... आणि या टप्प्याच्या शेवटी एकदम मृत्यूच होता...बाकी काहीच नव्हते.. आशेचा किरण नव्हता.. सुटका नव्हती... कोणते पाप केले म्हणून हा तुरुंगवास मिळाला हे समजत नव्हते...

त्यांना उठते करून आजी जायला निघाल्या.. कोण या आजी??? बाबांपेक्षा पंधरा वर्षांनी मोठ्या असतील.. आईसारख्या किंवा मोठ्या बहिणीसारख्या... पण त्यांनी आणि देवधरांनी थोपटल्यावर कोणता आनंद मिळाला??? फारफार पूर्वी... पन्नास एक वर्षांपूर्वी आपला रघू नावाचा मित्र होता... अगदी घट्ट मित्र... एकमेकांच्या घरी गेलो की आपण अशीच मिठी मारायचो एकमेकांना... जणू भरतभेट.. त्या स्पर्शात याच स्पर्शाची भावना वाटली...

हा अंत आहे की सुरुवात?

"बाबा.. तुम्ही रोज काय लिहिता???"

"अं??.. रोज काय झाले ते लिहितो... डायरी लिहितो मी... "

"किती वर्षांपासून???"

बाबा थबकून देवधरांकडे पाहू लागले तसे सगळेच थबकून थांबले...

"एकटा झाल्यापासून... इथे आल्यापासून डायरी लिहितो...कारण त्या आधी लिहिण्यासारखे काहीच नव्हते.. उलट डायरी लिहिणे विसरूनच जाण्यासारखे वातावरण असायचे... नातू खेळायचा... त्याचे मित्र येऊन धिंगाणा घालायचे... मी पूजा करायचो.. सून चांगला स्वयंपाक करायची... मात्र मला हाकलून दिले... इथे आणले आणि... मग लिहावेसे वाटले... "

".... काय लिहिता... डायरीमध्ये???"

"सगळं लिहितो... ही झाडं... हा वारा माझ्याशी बोलतो... इथली माती माझ्या तब्येतीची चौकशी करते...इथले नियम माझी काळजी घेतात.. मुलासारखे वागतात.. इथली कामे माझे मन रमवतात.. नातवासारखे.. इथले जेवण मला अगदी सुनेच्या हातचे वाटते.. आणि.. तुम्ही सगळे जण मला... सख्खे भाऊबंद वाटता असे लिहितो..."

"तुम्ही लेखक आहात??"

"नाही.. पण प्रत्येकजण लेखक असतो... प्रत्येकात कवी असतो... नाटककार असतो.. गायक असतो.. वादक असतो.. नट असतो.. माणूस असतो... आणि एक प्रेतही असते प्रत्येकात..."

"तुम्ही.. कुठे नोकरी करायचात???"

"शाळेत शिक्षक होतो... हे असले संस्कार हजारो मुलांवर केले.. माझ्या मुलावर करायचे राहून गेले असावेत..."

"शिक्षक होतात?? मग... तुमचे तर..."

"नाही... माझा कोणताही विद्यार्थी मला सांभाळणार नाही... याचे कारण शिक्षकाची भूमिका त्यांच्या पारतंत्र्याच्या वयापर्यंतच त्यांच्यासाठी महत्वाची असते.. एकदा ते स्वतंत्र झाले की लोढणी कशी घेतील आमची??"

"हो पण ते विद्यार्थी.. निदान तुमच्यासाठी आवाज तरी उठवतील????"

"माझ्या मुलाला बदनाम करायला?? सुनेला जगाच्या दृष्टीने नालायक ठरवायला??.. कामत काका.. हे सगळे कशासाठी??? मुलाने घरी न्यावे म्हणून??? अहो आता तो विनंती करत आला तरी मी जाईन का घरी??? "

"का नाही जाणार?"

" का जावे? एकदा हाकलेल्या ठिकाणी का जावे पुन्हा? "

"हे चूक आहे बाबा.. प्रेमाने बोलावले तर परत जायला इथले कितीतरी सदस्य एका पायावर तयार आहेत.."

"कारण ते इथे रमलेले नाहीत... मी गेल्या आठ दिवसात एक अक्षरही न उच्चारता पहिल्याच दिवशी इथे रमलो आहे.. याचे कारण परिस्थिती आपल्या हातात असावी यासाठी मी कधीच झगडत नाही... परिस्थिती आपल्याला जसे ठेवेल तसे जगण्यात आनंद मानतो.. "

"मग... मुलाबद्दल एवढे पोटतिडकीने तरी का बोलताय???"

"कारण तुम्ही सर्वांनी माझी कहाणी विचारलीत म्हणून.. तुमच्यापासून मनाने दूर राहून मी इथे टिकू शकणार नाही म्हणून हे सगळे सांगितले.. आणि माझा मुलगा आहे म्हणून बोलण्यात चीड येतीय माझ्या... कारण हजारो विद्यार्थ्यांवर चंगले संस्कार करणार्‍याच्या पोटचा गोळा त्याच्या उलट वागतो यासारखी दुसरी मानसिक शिक्षा मी अजून पाहिलेली नव्हती..."

रात्री बराच वेळ बाबांच्या खोलीतला दिवा चालू राहिला. पण म्हातारा गुरखा घुले त्याची उद्या तक्रार करणार नव्हता. कारण त्यानेही हे सगळे ऐकलेले होते. दुसर्‍या दिवशी पहिल्यांदाच बाबांना उठायला अर्धा तास उशीर झाला, पण कोणी अवाक्षर उच्चारले नाही त्याबद्दल.

===========================

सहा महिन्यांनी एक पत्र आले बाबांच्या नावावर... निवृत्त शिक्षकांचा सत्कार होता... रोख एक हजार रुपये आणि मानपत्र मिळेल असे लिहिले होते.... पाकीट फुटलेले कसे काय म्हणून बाबांनी क्लार्ककडे चौकशी केली... तो म्हणाला एक जण येऊन हे पाकीट असेच देऊन गेले.. म्हणाले आधी यायला वेळ झाला नाही.. सॉरीही म्हणाले म्हणे.. कोण आले होते आणि कसे दिसत होते हे विचारल्यावर मिळालेले वर्णन अजितशी जुळत होते.. बाबांनी सत्कार समारंभाची तारीख पाहिली... कालच समारंभ होऊन गेला होता..

बाबा आधार वृद्धाश्रमात त्या प्रसंगामुळे अधिकच मिक्स झाले...

==========================

एकवीस डिसेंबरला सकाळी सहा जणांबरोबर नेहमीपमाणे फिरायला गेलेले बाबा सगळ्यांबरोबर परत आले नाहीत.. पुलावरच बसून राहिले.. सरांनी ऑफीसमध्ये तसे सांगितले.. पण सकाळचे चक्क साडे आठ वाजले तरीही ते आले नाहीत म्हंटल्यावर निर्मलाबाईंनी सेवकाला सायकलवरून शोधायला पाठवले... त्याला ते पुलावर तसेच बसून राहिलेले दिसले.. त्याने त्यांना डबलसीट आणले.. निर्मलाबाईंनी संतापून त्यांना ऑफीसबाहेर अर्धा तास बसवून ठेवले.. आत त्या काय करत होत्या हे बाबांना माहीत नव्हते... अचानक अजित आणि नेत्रा आले... बाहेर बसलेल्या बाबांकडे बघत आणि 'काय हो, काय केलेत' असे विचारत आत गेले.. मग निर्मलाबाईंनी बाबांना आत बोलावले.. म्हणाल्या..

"हे आजोबा आज फिरायला गेले आणि आलेच नाहीत.. एक पंधरा वीस मिनिटे ठीक आहे... पण दोन तास उशीर??? इथे हे चालणार नाही.. जबाबदारी आमच्यावर असते... तुम्ही यांना घरी घेऊन जाणार नसाल तर यांना लेखी माफीपत्र लिहून द्यायला सांगा...

अजित विनवण्या करत होता निर्मलाबाईंच्या... की त्यांना ठेवून घ्या.. घरी नका पाठवू... नेत्रा एखादेच वाक्य बोलली तरी असे बोलत होती ज्यात बाबांच्या मागच्या कोणत्यातरी चुकीचा उल्लेख होता..

अपराधी नजरेने बाबा दोन्ही हात बांधून खाली बघत उभे होते.. अजित आणि नेत्रा खुर्चीवर बसलेले होते...

शेवटी बाबांनी माफीपत्र लिहून दिले.. पण निर्मलाबाई म्हणाल्या का थांबला होतात त्याचे कारण लिहा आणि ते आम्हालाही सांगा...

बाबांनी कारण लिहिले आणि रडवेल्या चेहर्‍याने पुटपुटत खाली बघत म्हणाले..

"माझ्या आणि विमलच्या लग्नाचा आज वाढदिवस असतो... तिला जाऊन आता सहा वर्षे झाली.. त्याच पुलावर आम्ही गप्पा मारत थांबायचो अजित व्हायच्या आधी... माफ करा.. पुन्हा नाही जाणार असा बाहेर.."

निर्मलाबाईंनी खुण करून त्यांना खोलीत जायला सांगितले.... खालीमान घालून बाबा आपल्या खोलीत परतले.. विमलच्या फोटोला बंडीत लपवून आणलेले एक फूल वाहिले..

या प्रसंगामुळे ते वृद्धाश्रमात आणखीन सामावून गेले..

================================

दहा जानेवारीला रोहन पडल्याचा फोन आला.. बाबा घरी जाऊन आले.. फोन शेजारच्यांनी केलेला होता.. रोहन तसा ठीक होता... आजोबांना पाहून भारावलाही थोडा त्या वयात.. नेत्राने चहा केला.. केळी खायला दिली.. पाहिले तर बाबांच्या खोलीत आता रोहनची स्टडी बनवलेली होती... विमलचे जुने शिवण मशीन, हार्मोनियम आणि बाबांनी स्वतःच्या लग्नानंतर घेतलेले एक जुने कपाट कुठे गेले म्हणून बाबांनी नेत्राला विचारले.. घरात अडचण होत होती म्हणून सगळे विकले म्हणाली.. आत जाऊन साडे आठशे रुपये घेऊन आली आणि बाबांच्या हातात दिले.. म्हणाली हे त्याचे पैसे.. आम्हाला पैसे नको आहेत..

मग ते सगळे माझ्याकडे का नाही धाडले विचारले तर म्हणे ट्रान्स्पोर्टचा खर्चच सहाशे येणार होता..

वृद्धाश्रमाच्या वातावरणाचा बाबा आता एक घट्ट भाग बनले..

===============================

आता बाबा इथेच राहतात.. दोन वर्षे झाली..

आज अजित येणार असा निरोप आला.. का येणार ते कळले नाही.. काय सांगायला येतोय हे बघायला बाबांबरोबर देवधर, कामत, सर आणि आजी चौघेही हॉलमध्ये बसले... तो सहाऐवजी पावणे सातला आला....

" काही नाही.. ऑफीसमध्ये सोशल कार्य करण्याची टूम काढलीय साहेबाने.. वृद्धाश्रम तरी बघायचा किंवा तुमच्यातील काही जणांचे भाषण ठेवायचे आहे ऑफीसमध्ये.. कोणी आहे का असे .. भाषण वगैरे देऊ शकेल असे? म्हणजे स्टाफपैकीही चालेल... किंवा जे लोक इथे राहतात त्यांच्यापैकीही... बाहेरच्या जगातले लोक कशी कशी मदत करतात... इथले अनुभव... कौटुंबिक अनुभव.. "

"अजित... आपले वडील भाषण देऊ शकतात हे विसरलास?"

"बाबा... तुम्ही दिलेत तरी चालेल.. पण असे सांगायचे आहे की या समाजकार्यात अजित वाकणकर नेहमी सहभागी होतात.. मागचा सगळा मनातला राग वगैरे बाजूला ठेवून बोलाल ना? कारण यामुळे मला एक चांगले इन्क्रिमेन्ट मिळू शकेल.. मी तशीही वृद्धाश्रमाला देणगी द्यायला आत्ताही तयार आहे.. पण त्यात पर्सनल काही बोलायचे नाही आहे.. मी आणि माझे दोन सहकारी यात सहभागी आहेत असे दाखवायचे आहे.."

"हे माझे चार सहकारी आहेत... हे आणि आणखॉन दोघे येतील त्या भाषणाला.."

"एवढे जण नाही आणता येणार.. त्या गाडीत चौघे बसतात.. तुम्ही, मी आणि ड्रायव्हर म्हंटल्यावर आणखीन एकच येऊ शकेल कोणीतरी.."

"हे सर्वजण स्वावलंबी आहेत.. सक्षम आहेत.. स्वतःचे स्वतः येतील.. "

"ठीक आहे.. चांगलंच होईल.. फक्त यांच्या अल्पोपहाराचे बघतो होते की नाही..."

"अल्पोपहार मलाही नको आहे.. वृद्धाश्रमाचा नियम म्हणून बाहेरचे काही घेता येत नाही..."

"ओके..."

अजित उठला. दारापाशी गेला. परत वळून मागे आला. बाबांना वाकून नमस्कार केला आणि म्हणाला..

"मनात काही ठेवू नका हां...इथे असलात तरी आमचेच आहात तुम्ही..."

ओठ दाबून बाबांनी आशीर्वादासाठी हात वर केला.. निघून चाललेल्या अजितला एक वाक्य ऐकवावेसे वाटले त्यांना..

'समाजकार्य करतोस हे सुद्धा दाखवावेच लागते का रे तुला ? एका म्हातार्‍याला छान वृद्धाश्रमात ठेवलेस हे समाजकार्य आहेच की'

पण बाबा बोलले नाहीत. बरेच वर्षांनी अजितने एक संस्कार पाळलेला होता..... की खूप खूप दिवसांनी जेव्हा मोठ्या माणसांना भेटतो तेव्हा वाकून नमस्कार करावा.. मग ते ... 'कोणीही' असोत..

'समाजकार्य करतो असे दाखवायचे आहे' या वाक्यामुळे बाबा वृद्धाश्रमाचा एक अविभाज्य भाग बनले.... आता त्यांना घर नको होते.. मुलेबाळे, कुटुंब काहीच नको होते... तसेही त्या घरात आता त्यांचे काही राहिलेलेही नव्हतेच..

================================

"सभ्य स्त्री पुरुषहो,

नमस्कार. मी ज्ञानेश्वर वाकणकर. मला बाबा याच नावाने सगळे ओळखतात. फक्त शाळेतले विद्यार्थी मला सर म्हणायचे. बाकी सगळ्यांसाठी मी बाबा. अगदी माझ्या वडिलांनाही हीच हाक मारता यायची.

मित्रांनो. वृद्धाश्रमाबदल समाजात अनेक समज गैरसमज असतात. तेथे सगळे बिचारे राहतात. वृद्ध असतात. त्यांना हाकलून दिलेले असते. त्यांना कोणीही नसते. तेथे त्यांना खूप कष्ट होतात. मग ते रडतात. एकटे एकटे वाटते.

हे सर्व गैरसमज आहेत. आजच्या या समाजात आम्ही वृद्धाश्रमीय लोक अतिशय सुखात असतो. आमच्या वृद्धाश्रमात बाग आहे, देऊळ आहे , लहानसा दवाखाना आहे, जवळच दोन अ‍ॅम्ब्युलन्स असलेले एक ऑफीस आहे, आमच्या वृद्धाश्रमात भजनाचा आणि ध्यान करण्याचा हॉल आहे, सांस्कृतीक कार्यक्रम करण्याचा हॉल आहे. जेवण उत्तम असते. सगळे जण मिळून मिसळून वागतात एकमेकांशी. नियम कडक असले तरी ते आमच्याच भल्यासाठी असतात.दर महिन्याला डॉक्टर तपासणी करून जातात. राहण्याचे शुल्क अत्यल्प आहे. छान छान वनस्पतींनी नटलेला आमचा वृद्धाश्रम एखाद्या रमणीय स्थळासारखा आहे. मागून नदी वाहते. पक्षी आहेत. व्यायामासाठी लहानसे मोकळे क्रीडांगण आहे. आमच्यात खूप सांस्कृतीक कार्यक्रम असतात. सणासुदीला गोडधोड मिळते. स्पर्धा असतात. बक्षीसे असतात.

हे सगळे झाले वृद्धाश्रमाचे. पण आमच्या वृद्धाश्रमात बाहेरून तर प्रचंड मदत मिळते. कोणी मेला तर त्याचे नातेवाईक आम्हाला प्रसाद आणून देतात. एकदम पन्नास पन्नास माणसांचे जेवण असते ते. मग आम्ही मेलेल्याला श्रद्धांजली द्यायला एक मिनिट गप्प उभे राहतो आणि मग आडवा हात मारतो जेवणावर. कोणाचा वाढदिवस असतो, कोणाचे सहस्त्रचंद्रदर्शन असते. आम्हाला जेवणच जेवणच मिळते. कोणी आमच्याइथे येऊन कार्यक्रम करतात. विनोद ऐकवून हासवतात. नृत्य करून रमवतात. नाटक करून अचंबीत करतात. गाऊन धुंद करतात.

कोणी देणगी देतात. कोणी वापरलेल्या, जुन्या वस्तू आणून देतात. कोणी नवीन वस्तू देतात. कोणी काही साधने देतात. कोणी पुस्तके देतात.

अनेक जण तर नुसते गप्पा मारायला येतात.

आयुष्याच्या संध्याकाळी, कातरवेळी, वेळ कसा घालवावा हा प्रश्न आमच्यापुढे पडतच नाही. वेळ कुठे गेला हे कळाले नाही असेच सारखे होते. या जगाच्या आत एक तटबंदी असलेले असे अत्यंत सुंदर जग आहे वृद्धाश्रम म्हणजे. तेथे भरदुपारीही संध्याकाळच असते आणि अंधारलेल्या रात्रीही संध्याकाळच असते.

मित्रांनो, अजित वाकणकर हा माझा मुलगा, तुमच्याकडे सिनियर मॅनेजर आहे. त्याचे हे दोन सहकारी. मल्हार भार्गव आणि रॉबीन कुरुप.

या दोघांनी आमच्या वृद्धाश्रमाला अत्यंत मोलाची मदत केलेली आहे आजवर "

या वाक्यावर टाळ्या वाजल्या. नेत्रानेही वाजवल्या. आपला सासरा आपल्या नवर्‍याबद्दल काय बोलतो ते बघायला आली होती.

"भार्गव आणि दाते, हे आम्हाला आजच भेटले. त्यांनी केलेली मोलाची मदत ही, की ते आम्हाला त्यांच्या सुदैवाने आजच दिसले. या आधी जर ते वृद्धाश्रमात दिसले असते, तर आम्ही त्यांचे हातपाय मोडून परत पाठवले असते. याचे कारण या निर्लज्ज दोघांना वृद्धाश्रम हा शब्द कसा लिहायचा हेही माहीत नसताना माझ्या भाषणातून प्रसस्तीपत्रके हवी आहेत. मगाशी स्वागत समारंभात मला भेटून हे दोघे हिंदी आणि इंग्लिशमध्ये बोलले. मला दोन्ही भाषा येतात त्यामुळे मी त्यांच्याशी बोलू शकलो. त्यातून समजले की एक वर्षापूर्वीच दोघे या शहरात आले आहेत आणि त्यांना माझ्याकडून फक्त त्यांच्या नावाचा उल्लेख हवा आहे. आत्ताही त्या दोघांना हे समजत नसेल की मी त्यांच्याबद्दाल काय बोलतो आहे. त्यांना फक्त इतकेच हवे आहे की या म्हातार्‍याने आपल्या नावाचा उल्लेख करून आपल्या मदतीबद्दल दोन शब्द नीट बोलावेत. पण खरे सांगायचे तर यांना उलटे लटकवून वृद्धाश्रमातल्याच लोकांकडून फटके द्यायला हवेत, कारण ह्यांनी ह्यांची थोबाडे आजवर आम्हाला एकदाही दाखवलेली नाहीत. हे कोण आहेत आणि ह्यांना हे श्रेय का हवे आहे हेही आम्हाला माहीत नाही"

सभागृहात सन्नाटा पसरला. एक तर या लोकांना प्रमुख निमंत्रीत म्हणून बोलावले होते. आता ते बोलतील ते ऐकून घ्यायला लागणार होते. त्यांना गप्प बसवले तर आयोजकांच्याच हेतूतील पारदर्शित्वावर प्रश्नचिन्ह उमटले असते. त्यामुळे गहन सन्नाटा पसरला.

"तर हे दोघे आम्हाला कसे माहीत झाले? का माहीत झाले? केव्हा दिसले? आज दिसले. आज पहिल्यांदा! विचारा या म्हातार्‍या आजींना की या दोघांची थोबाडे कधी पाहिली होतीत का म्हणून. नव्हती पाहिली. मग आज का पाहावी लागली? येथे का यावे लागले? कारण आमचा हा दिवटा. हिरवा शर्ट घालून या इथे बसलाय तो. अजित ज्ञानेश्वर वाकणकर. सिनियर मॅनेजर. कर्तबगार, कर्तृत्ववान, हुषार, ध्येयवादी दिवटा. याने आम्हाला सांगितले की आज इथे या आणि मी आणि माझ्या या दोन सहकार्‍यांनी तुमच्या वृद्धाश्रमाला कशी कशी मदत केली ते वर्णन करून सांगा. का तर त्यातून याला एक पगारवाढ मिळेल. अरे नालायका,बसलायस काय बघत? ये इथे आणि या माईकवर सांग की तू आणि तुझ्या या तितक्याच नालायक बायकोने मला घरातून हाकलून वृद्धाश्रमात पाठवलेत. अरे एक साधा शिक्षक मी, कधी कुणाच्या अध्यात मध्यात नाही. आपल्या मुलाला भरपूर शिकवून, त्याच्यावर उत्तमोत्तम संस्कार करून एकदा त्याला त्याच्या पायावर उभा केला की जपजाप्य करायला मी मोकळा होईन इतके साधे ध्येय माझे. तुला शिकवताना तीन तीन नोकर्‍या केल्या. शाळेची, एक देशमुख म्हणून होते त्यांच्या अकांउटींगची पार्टटाईम आणि तीन घरी क्लास घ्यायला जायचो ती तिसरी. घरी यायला साडे नऊ वाजायचे मला रोज. सकाळी सहा वाजता बाहेर पडलेला मी. आणि मी आलो की झोपेतून उठून तू विचारायचास आज हे आणलेत का आणि ते आणलेत का. त्याचवेळी तुझा गळा दाबला असता तर या असल्या सभेला येऊन दोनशेजणांसमोर स्वतःच जन्माला घातलेल्या आणि स्वतःच्याच संस्कारात वाढलेल्या मुलाला शिव्या द्यायची वेळ आली नसती माझ्यावर. ये इथे? बोल? का ग नेत्रा? माझी बायको केव्हाच मेली आणि आता मीही घराबाहेर गेलेलो आहे हे पाहून जुन्या आठवणी असलेल्या वस्तू विकून टाकल्यास आणि माझ्या हातात त्याचे पैसे टिकवलेस मी विचारल्यावर? तुझ्या आईबापांना तुझ्या भावाने घराबाहेर काढल्यावर आणशील ना सासरी त्यांना? आणि तेव्हा परवानगी घ्यायला द्यायला मीही नसणारच घरी. कारण मला तर तू आधीच वृद्धाश्रमात धाडलेले आहेस. माझे घर तुमच्या नावावर करायच्या ऐवजी तुम्हाला हाकलून द्यायला हवे होते. माझा सत्कार करणार होती जुनी शाळा. आज कितीतरी वर्षांनी त्या शाळेत सत्कार स्वीकारायला जाता आले असते. पण तारीख माहीत असून या हलकट मुलाने ते पाकीट बरोब्बर दुसर्‍या दिवशी मला मिळेल अशी व्यवस्था केली. व्यवस्था कसली आलीय. स्वतःच आला होता नालायक. पण मला न भेटता गेला. ऑफीसमध्ये ते आमंत्रण टाकून पळून गेला. का? का ते माहितीय मला. कारण मी भेटलो असतो तर मी जाब विचारला असता ना की हे पत्र आज का आणलेस? कालच सकाळी का आणले नाहीस? त्यातून सुटका म्हणून पळून गेला हा, आणि हा कसली वृद्धाश्रमात येऊन मदत करणार? वृद्धाश्रमाच्या दारावर याच्या फोटोला शेण फासून पाटी लावणार आहोत आम्ही, की याने पुन्हा आत पाय टाकायचा प्रयत्न केला तर तंगडे मोडून हातात द्या म्हणून. नातू पडला आणि त्याला लागले हे मला यांनी नाही कळवले. शेजारच्या पवारांच्या मुलाने कळवले. म्हणून परवानगी काढून नातवाला बघायला गेलो तर माझ्या हातात चहाचा कप ठेवते. अगं ज्या घरात तू नांदते आहेस ते दोन दोन कर्जे काढून आणि तीन तीन नोकर्‍या करून मी बांधलेले आहे आणि वर तुझ्या नवर्‍याला फुक्कट दिले आहे भीक देतात तसे. तू मला चहा देतेस हातात? माझ्यासारखा माणूस म्हणून थोबाड फोडले नाही. हे कामत असते तर हाताला धरून माहेरी पाठवले असते सुनेला आणि मुलाला शिव्या घालून त्याच्या तोंडावर घराचे दार बंद केले असते. मला चहा देतीय. घर नावावर करून घेताना यांच्या तोंडात साखर असायची. नरमाईचे पुतळे असल्यासारखे वागायचे दोघं तेव्हा. अरे रक्ताच्या नात्याला, स्वतःच्या बापाला फसवणारी औलाद तुमची. वृद्धाश्रमातल्या लोकांना मदत? अरे असे लोक तुम्हाला मदत करतात म्हणून तुम्हाला फुकटची राहायला घरे मिळतात. ह्यांना इन्क्रीमेन्ट द्यायच्या ऐवजी ढुंगणावर लाथ मारून नोकरीतून काढून टाका ह्यांना. आमच्यासारख्या साध्यासुध्या शिक्षकाच्या घरात असले हरामखोर जन्माला आले की लाज वाटते बाप म्हणवून घ्यायची. कधी आलावतास रे तू मदत करायला? पैशाची मदत केलीस वृद्धाश्रमाला? नालायका माझ्या पैशांनी मी तिथे जगतोय. माझी तुझा बाप होण्याची इच्छा नाही आणि तुझी माझा मुलगा होण्याची लायकी नाही. तुझ्या साहेबाला तरी मराठी कळते का? तुम्ही दोघे पाय धरून म्हणालात म्हणून माझे घर तुमच्या नावावर केले, तसे माझ्या नावावर करतोस पुन्हा?? अरे अजून पंचवीस वर्षे सर्व्हीस असेल की तुझी? सहज दोन घरे बांधशील ऐटीत. हे घर करतोस माझ्या नावावर? मग खरी मदत होईल वृद्धाश्रमाला. तू ते घर माझ्या नावावर केलेस की मी ते विकून ते पैसे वृद्धाश्रमाला देईन आणि तुला हाकलून देईन घरातून. करतोस माझ्या नावावर? घे अजित पाहिजे तेवढी इन्क्रिमेन्ट्स, पण येथे भाषण द्या म्हणण्याआधी नमस्कार करताना फक्त इतके म्हणाला असतास कीबाबा माझी चूक झाली, परत घरी चला.. अजित..मी तरीही आलोनसतोच... पण निदान आज तुझ्याबदल चांगले बोललो असतो... सर्वांचा आभारी आहे... या नालायकाला आणि त्याच्या सहकार्‍यांना पैशाची पगारवाढ देऊ नका अशी माझी म्हातार्‍यची विनवणी आहे.... आमची मदत करायचीच असली तर या असल्या थर्डक्लास माणसांना शिक्षा करा...यांनी आम्हाला एकच मदत करावी... पुन्हा आम्हाला भेटायला वृद्धाश्रमात येऊ नये"

हे भाषण देऊन सर्वांना स्टन्ड ठेवून वृद्धाश्रमात परतले तेव्हा बाबा वृद्धाश्रमात पूर्णपणे मिसळून गेलेले होते.

=================================================

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

तुमचे लेखन नेहमीप्रमानेच 'स्ट्न्ड' करणारे आहे.
आवडले.करूणामय वाटले . पण हे सत्य आहे ही वस्तुस्थिती आहे हे स्विकारायला हवे इथून पुढे - सर्वानीच !

इतकी निर्लज्ज, स्वार्थी मुलं कशी काय असू शकतात जगात? खरोखर, कोणाही आई-वडिलांनी आपली संपत्ती मुलांच्या नावावर अजिबात करु नये. ज्याला त्याला आपले आपण स्वावलंबी होऊ द्यावे.

बेफि, खुपच प्रभावित करणारी कथा होती. बाबांनी मस्त भाषण केले. त्यांचा संताप अगदी मुद्देसुदपणे, योग्यवेळी आणि योग्य ठिकाणी बाहेर काढला. शाब्दिक चपराक मारली एकदम... आवडली मला ही कथा. सर्व आई वडिलांनी धडा घ्यावा यातून... डोळ्यासमोर नटसम्राट घडतांना पहायला नको वाटते.

तुमचे लेखन नेहमीप्रमानेच 'स्ट्न्ड' करणारे आहे..>>

माझे आई वडिल यांच्यावर ही वेळ कधीच येणार नाही येवढेच म्हणु शकतो.........

वाह....... आज वृद्धाश्रमातला म्हातारा आवडला...... असे कडक आणि कणखर राहिले पाहिजे.... जाताना त्या पोराच्या एक कानाखाली ठेवून जायला पाहिजे होते.....
उत्तम कथा बेफि.....

बेफाट मस्त झालीय.
बरेच व्रुद्ध लोक आपल्या पश्चात मुलाना त्रास होउ नये (फ्लॅट नावावर करायला वगैरे)
म्हणुन व्यवहारी विचारानेच असे निर्णय घेतात आणि फसले जातात.

बेफिकिर, छान कथा! सिनेमा निघू शकेल अशी छान मांडली आहेत तुम्ही.
कल्पना करा..बाबा वाकणरांच्या भूमिकेत नाना पाटेकर. शेवटच्या भाषणाने तरुणाई हेलावली आहे.

माझी मुल शाळेमार्फत वृद्धाश्रमात मदत करायला जातात. घरी येउन डिप्रेस झालेल्या आजी-आजोबांच्या गोष्टी सांगतात आणि आत्ता म्हणतात तरी की म्हातारपणी तू आणि डॅडी आमच्या घरी राहायच. तुम्हाला कधिही असिस्टेड लिव्हिंग मधे ठेवणार नाही. असो.

आणखी एका संवेदनशील विषयाला हात घातल्याबद्दल अभिनंदन बेफीजी. Happy

पण कथेबद्दल बोलायचे तर फारशी नाही आवडली, आता आपणच आमच्या अपेक्षा वाढवल्या आहेत हे ही त्यामागे कारण असू शकते. जुनेच कथाबीज होते, सादरीकरण नवे अपेक्षित होते, ते होतेही पण किंचित फिल्मीस्टाईल वाटले आणि वाचताना तेच कथेत हायलाईट झाले.

असो, हे वैयक्तिक मत आहे, या कथेपुरते मर्यादीत,

तुमच्या इतर लिखाणाचा चाहता,

...तुमचा अभिषेक

बेफिकीर,

कथा थोडी भावनाप्रकोपी (मेलोड्रमॅटिक) वाटली. विशेषत: शेवटी. मात्र अशा तर्‍हेची गोष्ट प्रत्यक्षात बघण्यात आलेली आहे.

आमच्या एका परिचित बाईंनी त्यांच्या दोन्ही सुनांना स्वत:चे दागदागिने दिले. तसं करण्यापूर्वी आमच्याकडे सल्ला घ्यायला आल्या होत्या. माझ्या आईबाबांनी सरळ सांगितलं की तुमचे दागिने कोणालाही देऊ नका. नाहीतर त्या सुना तुम्हाला कच्च्या खातील. त्याकाळी घरभाडी आटोक्यात होती. याच्या जोरावर सुना आजींवर दादागिरी करीत. त्यांना माहीत होतं की सासूबाई आपल्याला घराबाहेर काढणार नाहीत. आणि जरी हाकललंच तरी नव्या घराचं भाडं आपापल्या नवर्‍यांच्या आवाक्यातलं असणार आहे.

पुढे आजीबाईंनी आमचा सल्ला मानला नाही. आणि दागिने देऊन बसल्या. सुदैवाने घर त्यांच्या नावावर होतं म्हणून वाचल्या. नाहीतर सुनांनी त्यांना विकून खालं असतं. पुढे आजीबाई शहाण्या झाल्या आणि घर मुलांच्या नावावर आजिबात केलं नाही. Happy

आ.न.,
-गा.पै.

सुंदर कथा...... वाचताना मुलगा व सुनेविषयी खुप राग येत होता....... व त्या आजोबांची खुप दया........ साध्या माफक अपेक्षा होत्या त्यांच्या आपल्या मुलगा व सुनेकडुन पण त्या देखिल पुर्ण होत नव्हत्या...... एवढा सिनियर मेनेजर पोस्टवर काम करनारया माणसास बापाची शेवटची पुंजी देखिल खोटेपणाने हडप करण्यात लाज वाटली नाही.......वडिलांच्याच बोलण्यानुसार स्वताच्या पगारातच अशी दोन घरे मोठ्या एटीत घेता आली असती व हे वडिलांचे घरदेखिल शेवटी वडिलांच्या पश्चात मुलालाच मिळाले असते पण शेवटी वडिलांचे शाप घेणेच नशिबात असेल तेथे तो करंटा मुलगा काय करणार..........:(

थोडे नाट्यीकरण आहे पण कथा मनाला भिडते.
सुनेने 'हातात चहाचा कप ठेवण्याबद्दल' इतके भडकणे पटले नाही, याला मागचा वाईट वागण्याचा कंटेक्स्ट आहे हे माहिती असूनही.मेबी दुसरी एखादी घटना वापरता आली असती राग दाखवायला.