अकल्पित भाग -३

Submitted by shilpa mahajan on 25 April, 2012 - 13:20

थोड्या वेळाने सावध होऊन निशाने डोळे उघडले . तिने पहिले तर तिचे डोके त्या तरुणीच्या मांडीवर असून ती अत्यंत मायेने तिच्या केसातून हात फिरवत होती .
तिचं आश्चर्य पुन्हा एकदा उफाळून आलं-" उषा , तू इथे कशी ? तू आणि रवी इथे केव्हापासून आहात ? इतकी वर्ष झाली तुम्हा दोघांना आमची कोणाची आठवण नाही न आली?
आम्ही मात्र तुमची दोघांची डोळ्यात प्राण आणून वाट पहात होतो. तुमच्या आठवणीनी तुमचे आई बाबा कसे झुरत आहेत याची तुम्हाला कदाचित कल्पनाही नसेल कदाचित
नाहीतर तुम्ही दोघांनी आमच्या सर्वांच्या आयुष्यातून स्वतःला असं अलगद बाजूला केलं नसतत. निशा एकदम भडाभडा बोलतच सुटली .
" नाही ग निशा , तू समजतेस तसं काही नाही . उषा म्हणाली
" नाही कसं?" निशा तीव्रपणे उद्गारली ," तिकडे गावात लोक तुमच्याबद्दल काय काय बोलतात ते माहिती आहे का तुला ?"
"अंदाज करू शकते मी ! खेदाने मान हलवत उषा म्हणाली "
"आणि तरीसुद्धा आमच्यापैकी कुणालाही काही कळवाव असं वाटलं नाही तुम्हाला ?"
निशाचा संताप लपत नव्हता .
" असं कसं होईल निशा ? तू आम्हाला कितीतरी वर्षापासून ओळखतेस आणि तरीसुद्धा तुला
आमच्याबद्दल खात्री वाटू नये याचेच मला वाईट वाटते ." उषा म्हणाली
" उपयोग काय खात्री वाटून ? " निशा उद्वेगाने म्हणाली .” प्रत्यक्षात अनुभव काय आला ? गेली दहा वर्षे तुमचा शोध घेण्याचा प्रयत्न चालू आहे. आमचं
एकवेळ जाऊ देत , तुझ्या आई वडिलांची काय अवस्था झाली असेल याचा विचार तुझ्या मनात आला नाही ? तुझ्या काळजीने खंगून खंगून तुझी आई अर्धी झालीआहे. समाजात मिसळणे तर तिने केव्हाच सोडून दिले आहे.
एक गोष्ट मला सांग उषा ,झ्या कोणत्याच निर्णयाला तुझ्या आई वडिलांनी कधी विरोध केला नव्हता . असे असूनही तुम्ही दोघांनी असं कोणाला न सांगता घरातून पळून जाऊन लग्न कराव याची त्यांनी हाय खाल्ली
आहे . "
" आम्हाला एकदा तरी तिने सांगून पहायचं होतं . आम्ही अगदी आनंदाने तिचं लग्न रविबरोबर करून दिलं असतं!" असा उद्गार तोंडातून निघाला नाही असा एकही दिवस जात नसेल त्यांचा “.निशाने कळवळून सांगितले .s
" आईचा विचार रात्रंदिवस छळतो आहे मला . म्हणूनच तर ....."उषा बोलता बोलता थबकली .
" म्हणूनच काय ? म्हणूनच इतके दिवस झाले तरी तुम्ही दोघांनी त्यांच्याशी संपर्क साधला नाहीत? "
" हे बघ निशा , आत्ता तू खूप सैर भैर झालेली आहेस , थोडीशी शांत झालीस की मग तुला मी सर्व काही सविस्तर सांगते हवं तर! " उषा म्हणाली
" मुळीच नाही ! मला आत्ताच्या आत्ता सगळं काही कळायला हवं ! आधीच खूप उशीर झालेला आहे ." निशा तावातावाने म्हणाली .
" दहा वर्ष ! उषा, दहा वर्ष हा काळ वाट पहाण्यासाठी किती मोठा आहे याची तुला कल्पना तरी येते का ? मुलगी घरातून पळून गेली , गुपचूप परस्पर लग्नही केलं आणि
आपल्याला कसलाही पत्ता लागू न देता आपल्यापासून दूर सुखात नांदते आहे हे कळल्यावर त्या माउलीच्या हृदयाला किती घरं पडतील ते तुला कळत कसं नाही ?
आणि हे सगळं कशासाठी? त्यांची बिचाऱ्यांची चूक काय हे तरी कळू देत मला ! " निशा अगदी पोटतिडीकेने बोलत होती .
" तुला कोणी सांगितले की मी सुखात नांदते आहे म्हणून ? " उषाने विचारले
" कोणी सांगायला कशाला हवं? गेले चार दिवस सतत पहाते आहे मी स्वतःच तुम्हाला हसता खिदळताना!
" दिसतं तसं नसतं निशा ! " उषा समजुतीच्या स्वरात म्हणाली . त्यामुळे निशा जास्तच संतापली
" म्हणजे काय म्हणायचं तरी काय हे तुला ? हसणं खिदळने सिनेमे पहाणे बागेत फिरणे ही सर्व सुखात नांदण्याची लक्षणे नाहीत की काय ?

"असं असेल तर तुझी सुखाची व्याख्या काय आहे ते तरी कळू देत मला ! " निशा राग रागाने म्हणाली .
" निशा , तुझा राग समजू शकते मी ! तुला सर्व काही सांगायचं होतं , म्हणून तर तुला इथे आणण्याचा आटापिटा केला आम्ही !" उषा म्हणाली
" एक मिनिट , मला कळलं नाही तुझं बोलणं ! मी इथे माझ्या इच्छेने आले - कोणी सांगितले किंवा बोलावले म्हणून नाही -"
" तसं समज हवं तर ! तू इथे आल्यावर तुला गाठण्याचा खूप प्रयत्न केला पण तो सफल झाला नाही . उषा म्हणाली
" साफ खोटं ! तू मला गाठण्याचा प्रयत्न मुळीच करत नव्हतीस . उलट मीच तुम्हाला गाठण्याचा प्रयत्न करत होते पण तुम्ही मला चकवून पळ काढत होतात -
आत्ता देखील समोर आलाच आहात म्हणून नाईलाजाने बोलत आहात माझ्याशी !
खरं ना ? " बोलता बोलता निशाच्या डोळ्यात पाणी तरारलं .
" नाही निशा , मी खरं तेच सांगते आहे. तू सगळं ऐक आणि मग हवा तो निष्कर्ष काढ.

उषाचे पाणावलेले डोळे पाहून निशा थोडी वरमली . " बरं बाई, सांग मला . गावाकडून निघाल्या क्षणापासून आतापर्यंत सगळं सांग . कधी एकदा तुझ्या आईला सांगेन
असं झालं आहे मला. त्यांना किती आनंद होईल ! सगळी काळजी मिटेल त्यांची! अगं, पण मी कशाला त्यांना काही सांगू ? तुम्हा दोघांना बरोबर घेतल्याशिवाय मुळी मी
जाणारच नाही . आत्तापर्यंत जे झालं ते झालं. इतके दिवसांनी लेक जावयाची खुशाली आणि प्रत्यक्ष दर्शन घडल्यानंतर त्यांचा चेहेरा कसं खुलेल त्याचं चित्र आत्ताच
माझ्या डोळ्यासमोर येते आहे . किंवा आपण असं करूयात का? मी आत्ताच फोन लावते त्यांना . तू स्वतःच बोल त्यांच्याशी ! " आनंदातिशयाने निशाला काय करावे तेच सुचत
नव्हते
" ते पाहू आपण नंतर . आधी मी काय सांगते ते ऐक तर खरी ! " उषा गंभीर[ होऊन म्हणाली
निशा गप्प झाली . बराच वेळ झाला तरी तिला गप्पच पाहून निशाच पुन्हा बोलली ," तू काहीतरी सांगणार होतीस ना उषा ? "
हो , खूप काही सांगायचं आहे , पण सुरुवात कुठून करावी तेच कळत नाही ." उषा म्हणाली
" सांगायचं तर मलाही आहे . विचारायचंही आहे . आधी मी बोलते , मग तू बोल . " निशा म्हणाली
उषाने मान होकारार्थी हलवली .

.

गुलमोहर: 

कथा छान रंगतेय काकू.. मस्त लिखाणशैली आहे तुमची.. Happy

अवांतर - दुसरा भाग खूपच छोटा होता.. जरा उशीरा टाकलात भाग तरी चालतो, पण मोठेमोठेच टाका, अन्यथा लिंक राहत नाही आणि वाचायची मजा कमीकमी होत जाते. Sad