शिल्प

Submitted by बेफ़िकीर on 23 April, 2012 - 05:16

"खरंच सांगतोय.. आय अ‍ॅम डन विथ हर"

'रेवा इन' च्या त्या प्रशस्त आणि सुंदर रोपांनी नटलेल्या गार्डनमधील एका टेबलवर बसलेल्या कुमारने ग्लासमधील एक घोट घेऊन हे वाक्य उच्चारले आणि ग्लास टेबलवर ठेवला. छान सम साधली होती त्याने हे करताना. त्याचे आयुष्यच लयबद्ध होते. चालणे, बोलणे, वागणे, हासणे, क्लाएंट्सना ट्रीट करणे आणि घरच्यांना प्रेम देणे या सगळ्यात एक लय असायची. पेहराव, निवड, स्वप्ने, प्रयत्न हेही सर्व लयीत. लय बिघडलेली चालायची नाही त्याला.

कुमारला भेटणारा माणूस त्याच्याकडे आपोआप खेचला जायचा.

दहा वर्षे झाली होती त्याच्या लग्नाला. असिन हे त्याच्या बायकोचे नांव! दोन मुले, गौतम, यश! महागडा फ्लॅट, दोन गाड्या, एक चोवीस तास असणारी मुलगी अचला आणि शिल्पकार म्हणून मिळालेली प्रसिद्धी, पैसा!

शिल्पकार हे करीअर असते हे अनेकांना माहीत नव्हते. त्याला भेटणार्‍यांना नवल वाटायचे. पण कुमारची शिल्पे, लहान मोठी सगळीच, मोठमोठ्या हॉटेल्समध्ये लागायची. अनेक बंगल्यात विसावायची. अनेक ऑफीसेस आणि अनेक इमारतींमध्ये कुमारने बनवलेली शिल्पे शोभा वाढवत असत. ते पाहून त्या धंद्यात आणखीन चार पाच जण घुसले होते. पण कुमारच्या रेप्यूटपुढे ते आजही नवशिकेच ठरत होते.

कुमारला मदत करण्यासाठी दोन माणसे होती आणि फोन घेण्यासाठी एक मुलगा! चक्क रोज हात मातीत घालून कुमार आठ आठ दहा दहा तास काम करायचा. ऑर्डर्स वाढून अशी अवस्था झाली होती की डिलीव्हरी डेट्स सांभाळता येत नव्हत्या.

या कारभारातच त्याची नीनाशी ओळख झालेली होती. आर्किटेक्ट असलेल्या नीनाला तिच्या कंपनीच्या एका स्कीमसाठी सहा मोठी शिल्पे हवी होती आणि ती कशी असावीत आणि कुठे असावीत यावर दोघांची सुरुवातीला घनघोर चर्चा होऊन शेवटी चॉईसेस मिळतेजुळते आहेत हे लक्षात आल्यावर मैत्री निर्माण झाली होती. हळूहळू या मैत्रीला बाहेर भेटणे, डिनरला जाणे असे स्वरूप प्राप्त झालेले असले तरीही त्यात कोणताही गढूळपणा नव्हता. केवळ आणि केवळ मैत्री!

असिनलाही या मैत्रीशी काहीही देणेघेणे नव्हते. आपण, आपला संसार आणि महिन्याचा महिन्याला मिळणारा पैसा हे पुरेसे होते. तिलाही छंद होते. ती एक दोन संस्थांशी संलग्न झालेली होती. तिच्या दोन भिसी होत्या. त्याशिवाय वाचन करणे हा छंदही होताच.

कुमारशी प्रेमविवाह झाल्याला आता दहा वर्षे झाल्यानंतर एक गोष्ट मात्र प्रकर्षाने दोघांना जाणवत होती. ती म्हणजे सौंदर्यदृष्टी व लय याचे कुमारच्या आयुष्यातील महत्व आणि असिनच्या आयुष्यात त्याला तितकेसे महत्व नसणे हा फरक!

घर नीट ठेवायची असिन, संसारही नीट करायची. पण तिच्या मनात घर हे 'घर' असायला हवे होते. सौंदर्यदृष्टीची व्यापकता मनावर साम्राज्य करणारी नको होती. घरातील सर्व वस्तू जिथल्यातिथे असल्या तरी कुमारला काहीतरी खोट सापडायचीच. अगदी जेवायला किमान सहा पदार्थ असायला हवेत येथपासून ते क्रोकरीमधील नावीन्य कसे मेन्टेन केले जावे या सर्वावर कुमारची ठाम मते होती आणि ती तो सातत्याने व्यक्त करत असल्याने घरात एक प्रकारचा तणाव निर्माण झालेला होता. यात घरात पुरुषाचे किती लक्ष असावे वा असू नये हा मुद्दा नव्हता. कुमारची अपेक्षा एका विशिष्ट घडीची होती, जी घरात कायम असायलाच हवी होती. मुले मोठी होत असल्याने अर्थातच त्यांचे मित्र यायचे आणि पसारा व्हायचा, अनेक बाबी अशा घडायच्या ज्या कुमार यायच्या आधी असिनला मॅनेज करायलाच लागायच्या.

वरवर वाटायला हा क्षुल्लक मुद्दा होता. पण त्याचे परिणाम वेगळे होत होते. असिनच्या मनात ही भावना रुजलेली होती की तिचा कंटाळा आल्यामुळे कुमार सतत बोलतो. वास्तविक पाहता तो तिला कंटाळायच्या आधी त्याच्या मनावर असलेला कामाचा ताण आणि घरातल्या परिस्थितिबाबतच्या त्याच्या अपेक्षा यामुळे तो बोलायचा. पण सहसा त्याच्या बोलण्याचा राग न येऊ देणारी असिन आजकाल चिडू लागल्यामुळे आता कुमार तिला खरच कंटाळू लागला होता.

चक्रवाढ व्याजाप्रमाणे ताण वाढू लागला होता. कुमारने घरी येणे हे जणू नव्या वादाला सुरुवात असे समीकरण ठरलेले होते. वाद सुरू व्हायचा एखाद्या किरकोळ गोष्टीवरून, पण तो घातला जायचा एकंदर वागण्यातील दोषांबाबत! मग त्यात इतिहास निघायचा, धुसफूस व्हायची आणि अबोला धारण करून रात्र सुरू झाली की सकाळी ऑफीसला जाताना कुमारने वर पाहून हात केला की असिनने त्याला हात करायचा येथे तो वाद संपायचा. संध्याकाळी पुन्हा सुरू.

कुमारचे चूक होतेच, पण फक्त कुमारचे चूक नव्हते. असिनला सौंदर्यदृष्टी नव्हतीच असे नसले तरीही ती भांडायला लागली की वाट्टेल ते काढायची. आपोआपच कुमारचा कल जास्तीतजास्त वेळ घराबाहेर काढण्याकडे जाऊ लागला होता. त्याचे बाहेर काहीही लक्ष नव्हते, कोणतीही स्त्री त्याच्या इतक्या जवळ नव्हती जितकी असिन! पण तरीही त्याला घरी जावेसे वाटायचे नाही.

काल संध्याकाळी एक शिल्प फुटले. कुमारने तीन महिने दहा दिवस खपून तयार केलेले एक पाच फूट उंचीचे एका स्त्रीचे शिल्प खाली पडले आणि एक हात तुटला. गौतम आणि त्याचे मित्र खेळत असताना हा प्रकार घडला. ते झाल्या झाल्या असिनला समजले की आज प्रचंड वाद होणार! तिने ताबडतोब कुमारला फोन करून सांगून टाकले की असे असे झालेले आहे. पझेसिव्हनेस तिसर्‍याच गोष्टीबाबत होता कुमारचा. आपल्या मुलाबाळांऐवजी शिल्पाबाबत! शिल्प फुटल्यावर त्याच्या मेंदूतील नस ठणकली. तो रागारागात घरी आला आणि त्याने गौतमला अपेक्षेप्रमाणेच दोन फटके लावले व असिनशी भांडण काढले. ते शिल्प खरोखरच सुंदर होते. तयार केल्यावर ते रंगवून घेतल्यामुळे आता ते रिपेअर करणे अशक्य होते. फेकूनच द्यायला लागले असते. मोठा वाद झाला.

परिणामतः आज कुमार घरीच गेला नाही. त्याने एक एसेमेस करून टाकला असिनला की काम असल्यामुळे तो ऑफीसलाच थांबत आहे. त्याने ऑफीसमध्ये स्वतःसाठी एक अतिशय सुंदर खोली तयार करून घेतलेली होती. यापूर्वीही जेव्हा कामामुळे थांबावे लागे तेव्हा तो तिथे थांबायचा. पण आज पहिल्यांदाच तो घराचा उबग येऊन तिथे थांबणार होता. आणि जेवायला म्हणून त्याने नीनाला इन्व्हाईट केले होते कारण तिच्याशी मन मोकळे करणे हे त्याला त्याच्या कोणत्याही अशा मित्राशी बोलण्यापेक्षा योग्य वाटत होते जो असिनला व्यवस्थित ओळखतो. कारण अशा मित्राने कुमारचीच तासली असती आणि कुमारला तर हवा होता एक असा माणूस जो फक्त कुमारचे ऐकून घेईल आणि असिनला नावे ठेवेल. नीना तशी होती. नीना असिनला फारशी ओळहत नव्हती. असिनही नीनाला विशेष ओळखत नव्हती. दोघींनाही इतके माहीत होते की दुसरीला आपल्याबद्दल बर्‍यापैकी माहिती आहे व कुमारच्या वागण्यात काहीही गैर नाही. मात्र त्यांची मैत्री नव्हती.

आणि आत्ता कुमार नीनाला म्हणत होता की त्याला आता संसार बास करावासा वाटत आहे. त्याला आता असिन ही त्याची लाईफ पार्टनर असावी असे वाटतच नाही आहे.

नीनाला हे धक्कादायक वाटलेले नव्हते, अपेक्षित होते. कुमार आधीही तिच्याशी यावर खूपच बोललेला होता.

"एकदा नीट विचार कर कुमार.. नेमका प्रॉब्लेम काय आहे तुमच्यात? घर कसे ठेवले जात आहे हा?"

"नीना इतकाच प्रॉब्लेम असता तर मी असे बोललो असतो का? आजवर तुला जे मी सांगत आलो आहे ते लक्षात नाहीये का तुझ्या? प्रॉब्लेम फार फार वेगळा आहे. बेसिकली ... बेसिकली आम्ही .. म्हणजे एकत्र राहणे एन्जॉयच करू शकत नाही... आम्ही दोघेही घरात असलो की एक असा... असा ताण असतो एक... नको वाटते एकमेकांशी काहीही बोलायला... "

"पण नेमके असे कशामुळे होते??"

"नीना तू जर मला आत्मपरीक्षण वगैरे करायला सांगणार असलीस तर ते मी हज्जार वेळा केलेले आहे.. माझी चूक नसेल असे नाही हे मलाही माहीत आहे... ठीक आहे की मी काय कुठे ठेवले आहे आणि कसे ठेवले आहे याबाबत बोलतो वगैरे... पण समजा मी ते नाही बोललो तरीही आमच्यात एक प्रॉब्लेम आहेच... तो म्हणजे वुई आर नॉट एबल टू टॉलरेट ईच अदर एनी मोर नीना.. "

"पण का?"

"का म्हणजे वुई कॅन जस्ट नॉट गेट अलॉन्ग..."

"कुमार... तू तेच तेच वाक्य वेगळे शब्द वापरून बोलतोयस... तुमच्या दोघांतला मुख्य प्रश्न काय आहे?"

"हे बघ नीना... मला माहीत आहे की परफेक्शन हे प्रत्येकाला नाही जमत... हेही माहीत आहे की दोन माणसे वेगळी असतात आणि एकमेकांच्या वेगळेपणाचा आदर ठेवूनच एकत्र आयुष्य घालवायचे असते... हेही माहीत आहे की लहान मुले असल्यावर पसारा होणार आणि घोळ होणार.. हेही माहीत आहे की मी तिला यावरून बोलतो हे पुरेसे योग्य नाहीच... घर हे घर असते.. त्यात इकडे तिकडे होऊ शकते... पण मुळात तिच्यात ती जाणीवच नाहीये की माझ्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात यासाठी तिने काही खास असा एफर्ट घ्यायला हवा..."

"का घ्यायला हवा?"

"म्हणजे??? म्हणजे काय??? शी इज मॅरीड टू मी..."

"तुझेही तिच्याशी लग्न झालेले आहे..."

"मग??"

"मग एकदा तू घरात गेल्यावर स्वतःहून भरपूर पसारा करून सगळ्यांना हासवत का नाहीस???"

"क्कॅय??? असे का करू मी???"

"त्यांनाही वाटत असेल की तू स्वतःहून एकदा शिस्त मोडावीस... पसारा करावास.. तुझेच एखादे शिल्प सहा फूटावरून खाली फेकून हासत नाचत सुटावेस...सगळ्यांनी ते पाहून हसावे..."

"धिस इज फूलिश.."

"नाही... हा वेडेपणा नाही... परफेक्शनची व्याख्या स्वतःच्या अस्तित्वात निर्माण होऊन स्वतःच्या व्यक्तीत्वात संपणे चूक आहे.. तिची व्याप्ती अधिक असायला हवी... परफेक्शन म्हणजे एकमेकांना सर्वाधिक समजण्याची पातळी... तसे समजल्यावर आपण जसे वागू तसे वागता येण्याकडे आपला प्रवास आपण करणे.. धिस इज द रोड टू परफेक्शन कुमार..."

"रीपीट..."

काहीच न सुचल्यामुळे कुमारने वेटरला रीपीटची ऑर्डर दिली..

"मला नाही पटत नीना... तू म्हणतेस तसे मग तिनेही परफेक्ट व्हायला हवे ना? तिनेही मला पूर्ण समजायला हवे... तसे वागायला हवे..."

"ती अजिबातच वागत नसेल तशी... हेही मी मान्यकरेन एकवेळ... पण ती तुला, तुझ्या घराला सोडून माहेरी जाऊन राहात नाहीये ना? जसा तू आज ऑफीसला थांबणारेस तशी???"

"उपकार आहे का?"

"नाही का हा उपकार?"

"मुळातच मी असे म्हणतोय की तिने आणि मी वेगळे व्हावेच... त्यामुळे ती तिथेच राहतीय हा मला उपकार वाटूच शकत नाही... "

"मुलांना घेऊन?? की न घेता?"

"मुलांना आईची गरज आहे अजून... आय अ‍ॅग्री... तिने मुलांना घेऊन वेगळे व्हावे हवे तर.."

"मग तुझ्या आयुष्यातील ध्येय काय?"

" सांसारीक समाधान हे एकच ध्येय असते का?"

"मग लग्न कशाला करायचे?"

"पण लग्नच तर मोडतोय ना मी?"

" हो ना, पण मग नंतर काय करणार तू?"

"व्हॉटेव्हर...मी मला गुंतवून घेणार... विसरणार सगळे.. हवा तसा जगणार..."

"आणि तुम्ही लव्ह मॅरेज केलेत..."

"त्या संज्ञेला शून्य अर्थ आहे... त्या वयात शारिरीक आकर्षणापुढे मनाची धाव नसते हेच खरे..."

"आणि सहवासातून आलेले प्रेम?? तुझ्या दोन मुलांच्या जन्मकळा सोसणे??"

"म्हणजे तुला म्हणायचंय की मुले असलेल्या जोडप्यांचे डिव्हर्स होतच नाहीत..."

"तसे म्हणत नाहीये मी.. मी एखाद्या कौन्सेलरच्या थाटात बोलत असले तर सॉरी... पण मला खरच प्रॉब्लेम समजलेला नाहीये अजूनही..."

"ओक्के... आता नीट ऐक.. एक माणूस जेव्हा लग्न करतो तेव्हा त्याच्या लाईफ पार्टनरकडून काही अपेक्षा असतात.. त्या अपेक्षांची पूर्तता होत नाही असे दिसल्यावर तो ते बोलून दाखवतो.. त्या अपेक्षा कोणत्या असाव्यात, कितपत तीव्र वा सौम्य असाव्यात हा मुद्दा येथे नाही... मी एक कलाकार आहे.. कलेवर माझे पोट आहे... जगात असे लोक फार कमी असतात.. आय काऊन्ट मायसेल्फ अ‍ॅज गिफ्टेड अ‍ॅन्ड यू नो दॅट टू.. यू कान्ट डिनाय इट... मी कलाकार आहे.. मी संसारात पडतो तेव्हा माझी बायकोही कलाकार असावी असे मला मुळीच वाटत नसते... पण निदान माझी कलेची उपासना जोपासण्यासाठी ज्या गोष्टी अपेक्षित आहेत व ज्या मी व्यक्त करतो.. ज्यावर सगळ्यांची पोटे भरत आहेत... त्या अपेक्षांची पूर्तता करावी अशी अपेक्षा गैर नाही... मला सौंदर्य दिसत राहणे अत्यावश्यक आहे.. मैत्रीण सुंदर असावी असे नाही... अर्थात तू सुंदर आहेस... पण मैत्री तरी सुंदर असावी.. कुरूप माणसात निदान इतपत तरी वाव असावा की त्याला सुंदर केले जाऊ शकते.. मला आजूबाजूला सौंदर्य असणे ही माझी गरज वाटते असे नव्हे तर ती माझी खरच गरज आहे... नाहीतर त्याचा परिणाम माझ्या कलेवर होतो... अत्यंत संवेदनशील मन घेऊन मी जन्माला आलेलो आहे.. मुले गोड असतात हे खरे... पण सगळी मुले गोड नसतात.. ती धांगडधिंगा करणारीही असतात.. हट्टीही असतात... धडपड आणि पाडापाड करणारीही असतात.. अनेकदा त्यांच्यात अभिप्रेत असलेले सौंदर्य दिसतच नाही... मला तसे नाही चालू शकत... मी आदर्शवादी नाहीये.... पण पसाराच दाखवायचा असेल तर तो असा दाखवला जायला हवा की तो पसारा आहे हे पाहणार्‍याला जाणवायलाच हवे आणि त्यातही सौंदर्य दिसायला हवे... असिनच्या केसांची एक बट हनुवटीपर्यंत उतरली तरी चालेल... पण ती तिने मुद्दाम उतरवलेली असायला हवी... मी आहे हा असा आहे... यात माझा दोष नाही... माझे जीन्सच तसे आहेत... पसाराच दाखवायचा असला तर मी अजून आवरून न झालेल्या स्त्रीचे शिल्प तयार करेन.. पण तेही असे की तिचे अजून आवरून झालेले नाही आहे हे प्रकर्षाने जाणवत राहील असे... असे ते शिल्प असेल... आणि 'अजून आवरून झालेले नसणे' हेही त्यात सुंदर भासेल... हेतूपुरस्पर निर्माण केलेली कुरुपता हे माझ्यामते सौंदर्यच आहे...पण अनियंत्रीत कुरुपता मला मान्य नाही... मला ती सोसतच नाही... एखाद्या ठिकाणी दहा वाजता पोचायचे आहे याचा अर्थ दहा म्हणजे दहा... मी पोचू शकत नसलो तर मी त्या माणसाला पंधरा एसेमेस पाठवतो की अशा अशा कारणामुळे मला उशीर होतोय... त्या माणसालाही कदाचित त्याचे काही वाटत नसेल... पण मला इतके वाटते की मी ते सहन करू शकत नाही... आणि नीना... मुख्य म्हणजे सुंदर बनणे हे माणसाच्या हातात आहे..मग का नाही बनायचे?? आता राहिला प्रश्न अपेक्षापूर्ततेचा... ठीक आहे... एक माणूस दुसर्‍याचा अपेक्षा सतत व पूर्णपणे नाही पूर्ण करू शकत... माझी अपेक्षा अशी आहे की निदान मी जे म्हणतो ते अ‍ॅप्रिशिएट तरी करा? निदान तुमच्या कृतीतून हे तरी जाणवूदेत मला की तुम्हाला माझ्या मतानुसार वागायची इच्छा होती पण तुम्ही काही कारणाने तसे नाही वागू शकलात??... पण ती तसे करत नाही... ती जमेल तितके सगळे सुंदर ठेवायचा प्रयत्न करत असली तरी तो प्रयत्न सुंदर नसतो... त्यातील कुरुपता हेतूपुरस्पर नसते.. ती मला म्हणाली असती की तुझ्या अपेक्षा पूर्ण करणे हे मला आवडत नाही असे माझ्या चेहर्‍यावर मी दाखवणार आहे तर मला तिचे ते वागणे आवडले असते... ते ती सांगतेही की ते तिला आवडत नाही... पण ते सांगणेही कुरुप असते... अनियंत्रीत कुरुप..सौंदर्याची अभिलाषा धरणे गैर आहे का? आजूबाजूचे जग्,वातावरण सुंदर बनवावे ही अपेक्षा धरणे गैर आहे का? समजा माझ्या आणि तिच्या अपेक्षांमध्ये गॅप आहे तर ती गॅप मिटवायचा प्रयत्न ती करत आहे हे तिने सांगावे असे म्हणणे गैर आहे का? तुला माहितीय?? मी काम करू शकत नाही काम! मला सगळे जग घाणेरडे झाल्यासारखे वाटते.. मूड यायला आणि हात सरासरा चालायला खूप वेळ जातो... ऑर्डर्स तर पूर्ण करताना नाकी नऊ येतातच... पण जे मी तयार करतो ते मलाही परफेक्ट समाधान नाही देत... अर्धवट समाधान देते... आणि माझे पोट त्यावर अवलंबून आहे.... स्वतःला जे आवडते ते तयार केले तरच ते जगाला आवडू शकते... माझा संसार माझ्या पोटावर पाय देत आहे... एक दिवस मी माती घेऊन नुसता बसेन ऑफीसमध्ये.. धिस इज द इश्यू"

"तू भयंकर गोंधळला आहेस कुमार.... सुदैवाने तुला काय म्हणायचे आहे हे तुला म्हणता येत आहे हे बरे त्यातल्यात्यात... नोकरीवर सगळ्यांचेच संसार अवलंबून असतात हे खरे आहे...कलाकाराचे जिणे वेगळे असते हेही खरे आहे.... पण त्यांना झालेली हाडामासाची मुले ही कलाविष्कार नसतात.. त्यांच्या निर्मीतीमागे सौंदर्यशास्त्रीय दृष्टिकोन ठेवता येणे अशक्य असते... त्या निर्मीतीत दोन व्यक्तींची भागीदारी असते... अगदी दोघी कलाकार असल्या तरी त्यांची निर्मीती त्यांच्या हातात नसते.. ती हवी तशीच होईल हे अशक्य असते... आता बघ.. शेवटी तू एका अपार्टमेन्टमध्ये राहात आहेस... ती इमारत बांधणार्‍याने तुझ्या दृष्टिकोनातून काहीच बांधकाम केलेले नव्हते... इन फॅक्ट बांधून होईपर्यंत त्यात तू राहायला येशील हे त्याला माहीतही नव्हते... पण तरी त्याने स्वतःच्या सौंदर्यशात्रीय दृष्टिकोनातून एक निर्मीती केली... जी कदाचित लोकेशन, किंमत या घटकांचा नकारात्मक प्रभाव पडल्यामुळे तुझ्या उंचावलेल्या अपेक्षांना खाली ओढून तुझ्या पसंतीस पडली... आता त्या फ्लॅटच्या आत काय करायचे हा चॉईस तुझा... आणि कदाचित एकमेव उत्पन मिळवणारी व्यक्ती किंवा कर्ता पुरुष म्हणून जास्त चॉईसही तुझा असू शकेल.. मला ते मान्य नाही... पण समजा तुला सगळ्यात जास्त व्हॉईस असेल त्या बाबतीत.. त्यानुसार तू काही अटी घातल्यास ज्यांचे पालन घरातल्यांनी करावे अशी तुझी किमान अपेक्षा आहे असे तू म्हणतोस.. ते सगळे त्या अपेक्षांचे पालन करण्याच्या प्रयत्नात कमीजास्त पडतात... जास्त पूर्तता केली की तू घरात शांत असतोस आणि ते कमी पडले की तू वाद घालतोस... एका मर्यादीत अर्थाने हे मला समजू शकेल.. पण याचा परिणाम एक विश्व जे छान बनलेले आहे ते मोडण्यात व्हावा हे कोणत्याच स्टॅन्डर्डने मला पटू शकत नाही... "

"कारण तू त्यातला एक घटक नाहीयेस.. तुला हे मान्य नाहीये की माझ्या या अपेक्षा अतिशय सामान्य आहेत.. घर नीट असावे आणि छान दिसावे ही अपेक्षा, तेही एका कलाकाराच्या मनातील अपेक्षा फारच किरकोळ आहे... आणि संबंध दिवस घरात असलेल्या व्यक्तीला ती पूर्ण करणे शक्य नाही यावर माझा विश्वास नाही... त्या अपेक्षेच्या पूर्ततेमुळे माझी मनस्थिती नीट राहते आणि माझे कामात लक्ष लागते हे तिथे कोणाला आकळतच नाही..मी कधी फारसा आवाज चढवलेला नाही... हात उगारणे तर दूरच... मुलांना काय.. हट्टीपणा केला तर एक दोन धपाटे कोणीही देतोच... पण घरातही मी एखादा संवेदनशील कलाकार आपल्या कलानिर्मीतीच्या क्षणी जसा असेल तसा असतो तरीही वाद घातले जातात.. माझे वागणे अतिशय हळवे असूनही त्याची दखल घेतली जात नाही..."

"फारच चुकीचे बोलतोयस कुमार.. खरे तर तुझी एकट्याचीच दखल घेतली जाते असे दिसत आहे.. तू एखाद्या हळव्या कलाकारासारखा घरात वावरणे हे मुळात चूक नाही का? ज्या घरात कलेबाबत फार जाणिवा नाहीत अशा ठिकाणी आणि तेही स्वतःच्या कुटुंबियात, स्वतःच्या घरात असे वावरणे याचा अर्थ तू एक माणूस आणि एक कलाकार यांच्यातील सीमारेषा कधी ओलांडतच नाहीस.... तू नुसता कलाकारच राहतोस.. हे चुकीचे आहे.. ज्या जगात आपण जन्मलो आहोत त्या जगात अनेक भूमिकांमधून वावरावे लागते.. केवळ एक व्यवसायात मुरलेला माणूस म्हणून तिन्हीत्रिकाळ वावरणे हे बरोबर नाही... "

"तूही असिनच्याच बाजूने बोलत आहेस... माझी ही अपेक्षाच नव्हती... "

"कारण तुला एक कान हवा होता... ज्याच्या आत मेंदू नाही आहे असा कान.. फक्त ऐकणारा... पण असे कान जगात नसतात... एक संपूर्ण माणूस मिळतो फक्त जगात.. एका संपूर्ण माणसाशी डील करावे लागते प्रत्येकाला... त्या माणसाचा जन्म, संस्कार, शिक्षण, सभोवताल, स्वप्ने, आवश्यकता, अपेक्षा, व्यक्तीमत्वातील हजारो पैलू या संपूर्ण युनिटशी एकदम डील करावे लागते... मी तुझे नुसते ऐकावे आणि हो ला हो म्हणावे अशी तुझी अपेक्षा एक मित्र म्हणून बरोबर आहे कुमार, पण मला असा एखादा विषय निघाल्यानंतर माझी मते, माझे अनुभव, माझा रोखठोकपणा हे बाजूला ठेवणे कसे शक्य होईल?"

"पण तुला माझे काहीच पटू नये हे अवघड आहे..."

" नाही... मला तुझे काहीच पटत नाही असे नाही आहे.. एक कुटुंबघटक म्हणून कुटुंबाकडून अपेक्षा ठेवणे हे नैसर्गीक आहे.. तुझ्या अपेक्षा जगावेगळ्या आहेत असे नाही... घर छान असावे... जो कायम घरात असतो त्याला इतके तर जमेलच... माझ्या मनाला त्यामुळे त्रास होत असतो.. माझ्या कामावर परिणाम होतो... त्याची दखल घेतली जात नाही... मी हळवा आहे.. हे सगळे ठीक... इतकेच काय तर घरातल्या गोंधळामुळे कामात लक्ष न लागणारे असंख्य लोक जगात आहेतही... त्यांनी लग्न मोडलेही असेल.. शक्य आहे... पण तुझ्या आणि त्यांच्यात एक सूक्ष्म फरक आहे... सूक्ष्मपेक्षाही खरे तर ढळढळीतच, पण लपलेला असा फरक आहे तो... कुमार तुझे मन कलाकाराचे आहे आणि तुला 'कलाकाराला समजणारे मन त्यांच्यापाशी नको आहे', तुला त्यांचे मन 'कलाकाराचेच' असायला हवे आहे... हा तो फरक... ते कलाकाराप्रमाणेच सौंदर्यदृष्टी असलेले तुला हवे आहेत... ते तसे नसणारच.. कलाकाराचा विक्षिप्तपणा समजून घेणारे लोक कुटुंबात असावेत ही अपेक्षा वेगळी आणि ते माझ्याप्रमाणेच कलादृष्टी असणारे असायला हवेत ही वेगळी... "

"एक मिनिट... माझ्या अपेक्षांवर नियंत्रण कसे असू शकेल माझे?"

"नियंत्रण नसेल... पण त्या व्यक्त न करणे, त्या पूर्ण झाल्या नाहीत तर राग न धरणे हे जमेल ना?"

"पण त्यांच्या सर्व अपेक्षांची पूर्तता केल्यावर माझ्याही अपेक्षांची पूर्तता व्हावी हे गैर कसे काय?"

"त्यांच्या सर्व अपेक्षांची पूर्तता तू करू शकत नाही आहेस... करत नाही आहेस... तुला असे वाटत आहे की एक राहणीमान दिले की संपले.. अधूनमधून प्रेमाने वागवले आणि बाहेर घेऊन गेलो की संपले.. तसे नाहीये.. स्त्रीला हवा असतो हक्काचा आणि विश्वासाचा सहवास आणि वावर.. आजूबाजूला आपले माणूस सतत असणे हे तिला सर्वाधिक आवडते.. तिला ते माणूस नुसते अवतीभवती आहे हेही पुरेसे असते... मग ती त्याच्याशीच भांडेल, वाद घालेल, अबोला धरेल, सगळे करेल.. पण त्या सर्वात तो माणूस केंद्रस्थानी असतो.. आणि हीच तिची किमान अपेक्षा असते... तुझ्या कामाच्या रगाड्यात तू वेळ देत नाहीस असे म्हणत नाहीये मी... तसेही असंख्य लोक जगात आहेत जे मुळात आपल्या घरापासून दूरच असतात कामासाठी... पोटापाण्यासाठी... पण त्यांचा वावर त्या स्त्रीला आपल्या भोवती जाणवत असतो तरीही... एक एसेमेस पुरेसा ठरू शकतो अनेकदा... तुला वाटते तू हळवा आहेस... स्त्री त्याहून हळवी असते.. स्त्री ही नेहमी बरोबरच असते किंवा चांगलीच असते असे नाही मला म्हणायचे... पण ती हळवी असते... तिला आपल्या भावनांची कदर करण्याची एखाद्याची इच्छा आहे इतकेसेही पुरू शकते.. मग बाकी त्रास काही का होईना... गरीबी चालेल.. छळ चालेल.. शिव्या शाप चालतील... पण अ‍ॅट द एन्ड ऑफ द डे... मनातील कोणालातरी सांगितले आणि त्याने पाठीवरून फक्त हात फिरवला किंवा 'मी आहे गं.. कसली काळजी करतेस' असे म्हणाला तरी ती भरून पावते... काही वेळा हलकी स्तुती... काही वेळा धीर.. काही वेळा एखादा सरप्राइझिंग आणि प्लीझिंग एसेमेस... अचानक केलेला एखादा कॉल.. काही वेळा नुसत्या गप्पा.. काही वेळा आपल्या अपेक्षा सांगणे... काही वेळा तिच्या ऐकणे... काही वेळा मुद्दाम तिला स्पेस देऊन थोडे लांब राहणे... या आणि असल्या लहानसहान सुखात स्त्रीचे विश्व असते कुमार... एक सामान्य स्त्री ही कोणत्याही दिग्गज कलाकाराहून श्रेष्ठ कलाकार असते... ती हळवी असते... सुंदर असते.. जे करते ते दुसर्‍यासाठी करू पाहते... अपेक्षा कमी ठेवते... पुनर्निर्मीती करते... प्रेम देते... आणि एवढे सगळे करून जिणे सोसते.. कोणत्याही कलाकारापेक्षा हे श्रेष्ठ आहे... केवळ स्त्री असणे हेच मुळात कोणत्याही कलेपेक्षा श्रेष्ठ आहे कुमार... तू कलाकार आहेस.. पण एक स्त्री मुळातच तुझ्याहून जास्ती चांगली कलाकार किमान असते.. हे तुम्हा पुरुषांना जाणवून दिल्याशिवाय जाणवत नाही आणि जाणवून दिल्यावर मग इगो पुढे येतो... तुला ज्या तुझ्या कुटुंबियांच्या अपेक्षा वाटतात त्या त्यांच्या अपेक्षा नसल्याच तर? त्यांना असे हवे असले तर की एखाद दिवशी बाबा घरी आले आणि म्हणाले चला घरातच क्रिकेट खेळू एक टप्पा कॅच आऊट.. कधीतरी बाबांच्या हातून काहीतरी चुकून सांडले आणि सगळे हासले.. अशी अपेक्षा असली तर??? तू कलाकार, संवेदनशील,हळवा असूनही तुला हे समजत नाही की तू ज्या त्यांच्या अपेक्षा समजतोस त्या त्यांच्या अपेक्षा नसतीलच ही शक्यता तुला पडताळूनच पाहावीशी वाटत नाही आहे..... संसार हे एक शिल्प आहे कुमार... जे तुला काय... कोणालाच कधी अचूकपणे निर्माण करता आले नाही... शेकडो दगडांना तू असिनचा आकार दिला असशील...हजारो दगडांमधून आणि मातीमधून तू गौतम आणि यश यांच्यासाठी खेळणी बनवली असशील... पण संसाराच्या शिल्पाला समजूतदारपणाची माती आणि अंतर मिटवण्याचा दगड आवश्यक असतो.... एकदा तरी असिनच्या गळ्यावर हात ठेवून तो आकार चाचपून तिला सांग की तुझे फुलसाईझ शिल्प तुझ्या या बर्थ डे ला भेट द्णार आहे???.. नाही बनवलेस तरी चालेल ते शिल्प... बनवायला वेळ मिळाला नाही... बनवताना चुका झाल्या... फुटले.. तुटले... बनवण्याचा कंटाळा आला... यातले काहीही जरी झाले ना कुमार??..तरी तिला ते चालेल.. अगदी फुटके तुकडे दाखवलेस तरी चालतील... अग वेळच नाही मिळाला असे सांगितलेस तरी चालेल... पण तिला आनंद कशाचा झालेला असेल माहीत आहे?? तुला ते शिल्प बनवावेसे वाटले याचा... त्या निमित्ताने तू तिला एक वेगळा, कलाकाराचा स्पर्श केलास त्याचा... कलाकाराबरोबर संसार ती रोजच करतीय... पण त्या संसारात त्या कलाकाराची कलावस्तू होणे याचा आनंद तिला सर्वाधिक होईल... तू प्रत्यक्ष शिल्प कोणत्याही कारणासाठी नाही बनवू शकलास तरी तुझ्या मनात ते शिल्प तयार झालेले होते ही जाणीव तिला कित्येक दिवस आनंदात ठेवेल... कुमार.. तू हळवा आहेस यावरचा माझा विश्वास मला काढून घ्यावासा वाटत आहे... या अशा गोष्टी आहेत ज्या एखादया हळव्या माणसाला का सांगाव्या लागाव्यात???"

...................................

बर्‍याचे वेळाने कुमारने एक एसेमेस पाठवला..

"हाय ब्युटी... मुलांना सांग म्हणाव मी येतोय.. आज घरातच क्रिकेट खेळू . आणि तू खिचडी टाक मस्त.. मी आलोच..."

त्याने तो असिनला पाठवलेला एसेमेस नीनाला दाखवला... नीनाचे डोळे लकाकले... पण ते लकाकायच्या आतच एक रिप्लाय आला कुमारच्या सेलफोनवर...

"किड्स आर डान्सिंग आफ्टर आय रेड आऊट यूअर मेसेज... लवकर ये... मी ते फुटलेले शिल्प जवळजवळ जुळवले आहे... "

कुमारने रिप्लाय पाठवला..

"ते शिल्प नको जुळवूस.. तुझे शिल्प तयार करणार आहे मी.. आत्ता मी हॉटेलमधला एक ग्लास चुकून फोडला"

जोरजोरात हासणारी स्मायली रिप्लाय म्हणून आली तेव्हा कुमार कोणाचेही लक्ष नाही हे पाहून नीनाला सांगून एक काचेचा ग्लास खाली फेकत होता...

बहुतेक... फुटलेलेही शिल्प पुन्हा जुळते असे त्याला समजले असावे...

===============================================

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

कथावस्तू कमी आणि तत्वज्ञान जास्त असल्यासारखे वाटले. ही शैली कथा ह्या साहीत्यप्रकाराला कितपत सूट होतेय हे सांगता येणे अवघड आहे.

संदेश आवडलाच! Happy

वाह बेफीजी, मस्तच, असे काही ताणतणाव प्रत्येक जोडप्यात थोड्याफार फरकाने असतातच, कारण परफेक्ट जोडी अशी कधी असणे विरळेच..
नेमके मनातले लिहिलेत, पण आचरणात आणने तेवढेच कठीण असलेले.
बाकी या कथेचा शेवट मला खूप आवडला.

>>>>>>>>>>>>>>
कथावस्तू कमी आणि तत्वज्ञान जास्त असल्यासारखे वाटले. ही शैली कथा ह्या साहीत्यप्रकाराला कितपत सूट होतेय हे सांगता येणे अवघड आहे.
>>>>>>>>>>>>>>
या वरच्या प्रतिसादाशी अंशता सहमत, अंशता यासाठी कारण ही लघुकथा असल्याने तत्वज्ञानाचे पॅराग्राफ कथानकाच्या तुलनेत मोठे वाटत असावे. जर दीर्घकथा किंवा कादंबरीच बनवली आणि प्रसंगानुरूप हे विचार मांडले तर क्या बात.. बेफीजी, मला वाटते आपण खरेच एखादी कादंबरी लिहायचा विचार करावा ज्यात हे आणि असे सारे विचार आपल्या खास शैलीत अलगद पेरता येतील.

अप्रतिम लिहिलं आहे.

>>
बेफिकीर, भावनांचे वादळ अगदी छान शब्दात पकडतात तुम्ही.
>>

पूर्णतः सहमत...

वा बेफि..
तुम्ही आधी गृह शोभिकेचे संपादक होतात काहो ..
कसल्या सेंटी गोष्टी लिहिता
वा

आयला... बेफिजी... सध्या काय 'स्त्री प्रधान' वगैरे लिहायचा पण केलायत वाटतं !

किती सुरेख आणि अचुक शब्दात मांडता हो तुम्हि.. कुठल्या स्त्री लाही जमणार नाही कदाचित!

मजा आली! धन्यवाद ! Happy

मला आवडली खूप!!! Happy
मनात आणले तर प्रयत्नपूर्वक आचरणात आणता येणे अशक्य नसतेच. Happy
नीना मैत्रीण म्हणून मिळो न मिळो ,इंट्रोस्पेक्शन फार महत्वाचं आहे.

खूपच सेल्फ सेंटर्ड माणुस होता हा.>>>>>यावरून आठवलं............. .................................................
बेफीजी ; कसे आहात तम्ही ?..............बराय नं सगळं..........

वाह वाह! सुरेख!
शेवट तसं प्रेडिक्टेबल होता थोडा, पण छान होती कथा!

अहो, आता खरंच भुक्कड टाका पण!!!

बेफिकीर, कथा मस्तच आहे. कथेत बरेच तत्त्वज्ञान आलेले आहे. पुरुषाला अमूर्त दृष्टीने समजावून सांगावे लागते. याअर्थी डोस खपून जातो. I would like to describe her counselling session as sharpening his thoughts. (हे मी बरोबर बोललो का?)

तुम्ही पुरुषासारखे पुरूष असूनही बायकांचं मन फार प्रभावीपणे सादर करता बुवा! फेमिनिस्ट बायका तुमच्यावर ज्याम जळतील, नाही? Wink

आ.न.,
-गा.पै.

छान

>>>>>>>>परफेक्शनची व्याख्या स्वतःच्या अस्तित्वात निर्माण होऊन स्वतःच्या व्यक्तीत्वात संपणे चूक आहे.. तिची व्याप्ती अधिक असायला हवी... परफेक्शन म्हणजे एकमेकांना सर्वाधिक समजण्याची पातळी... तसे समजल्यावर आपण जसे वागू तसे वागता येण्याकडे आपला प्रवास आपण करणे..<<<<<< मान गये बॉस.

भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड

टाका कि आता!!!

मस्त.........................................

भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कडभुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कडभुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कडभुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड भुक्कड

स्त्रीला हवा असतो हक्काचा आणि विश्वासाचा सहवास आणि वावर.. आजूबाजूला आपले माणूस सतत असणे हे तिला सर्वाधिक आवडते.. तिला ते माणूस नुसते अवतीभवती आहे हेही पुरेसे असते... मग ती त्याच्याशीच भांडेल, वाद घालेल, अबोला धरेल, सगळे करेल.. पण त्या सर्वात तो माणूस केंद्रस्थानी असतो <<<
अगदी खरयं! खूप आवडली!

सुंदर लिहिलत.

स्त्रीला हवा असतो हक्काचा आणि विश्वासाचा सहवास आणि वावर.. आजूबाजूला आपले माणूस सतत असणे हे तिला सर्वाधिक आवडते.. तिला ते माणूस नुसते अवतीभवती आहे हेही पुरेसे असते... मग ती त्याच्याशीच भांडेल, वाद घालेल, अबोला धरेल, सगळे करेल.. पण त्या सर्वात तो माणूस केंद्रस्थानी असतो <<< खरंय. पटलं.

तुम्ही पुरुषासारखे पुरूष असूनही बायकांचं मन फार प्रभावीपणे सादर करता बुवा! >>>>>>>>> +१

Pages