सूररात्र

Submitted by सिद्धार्थ राजहंस on 19 April, 2012 - 02:55

रात्रीचे सव्वा नऊ वाजले आहेत. ऑफिसमधून येऊन दमून जेऊन मी असच घड्याळाची टिकटिक ऐकत आहे. छान वाटते ऐकायला. आता झोपायचं. पण दोन-तीन दिवस डोक्यात काहीतरी चालूच असत, ते मग ती शांत टिकटिक ऐकू देत नाही. बरेच दिवस गेलो नाही. आपोआप अंगावर कपडे चढवले जातात. चावी घेऊन जिन्यावरून रस्त्यावरून घूssघुss, हॉर्न, सिग्नल, काय वाट्टेल ते सव्वा नऊ नंतर एव्हडी गर्दी! पण सवयीच्या रस्त्यांवरून दोन्ही बाजूंची दृश्ये चपापत शेवटी मी त्या वास्तूच्या आवरत शिरतो. पार्किंग रिकामच असत.

मग तिकीट खिडकीपाशी पोचतो, प्लान सगळा रिकामाच आहे.
‘धी व्होल वावर ईज आवर!’ - मी.
एक तिकीट बरोब्बर मध्यभागी दोनशे रुपये.
‘त्यापेक्षा दीडशेच तिकीट घेऊन नंतर पुढे येऊन बसू, नाहीतरी रिकामच आहे सगळ.’ हा विचार माझ्या डोक्यात आलाच नव्हता अस मी स्वत:ला मनोमन पटवतो. मलापण ते पटत.

मी थोडावेळ इकडे तिकडे घुटमळतो. मग घंटा होते. मी आतमध्ये खुर्चीवर. थोडावेळ काहीच होत नाही. पडदा बंद. कुरतडलेल्या खुर्च्या, जळमाटे, छ्परावरची भोकं बघण्यात वेळ जातो.
खूप’’ कमी लोकं आहेत पुढचा कुजबुजतो. मी पुढे नजर फिरवतो पहिल्या चार रांगा भरल्यात! मी खुश होतो. मागे बघण्याचे मी धाडस करत नाही.
‘मजाक मजाकमे बहोत लोग जम गये’ - मी.
समोर एक पालक आपल्या कार्ट्याला घेऊन आलेत. ते कार्टेपण उगाच शाणपणा करते आहे. नशिबच फुटक.
हळूहळू पडद्यामागची ठोकाठोक वाढते, पेटी तंबोरा हळूहळू सुरात जुळतात किंवा सुरात जुळलेले पुन्हा दूर होतात नक्की कळत नाही.

एकदम आठवते पहिल्यांदा कार्यक्रम पाहिला होता तेंव्हा काहीच अपेक्षा नव्हत्या. कार्यक्रम बघताना माझा जबडा खुर्चीच्या खालपर्यंत आ वासून सांडला होता. अप्रतिम. अदभूत. सुरावरी जीव तरंगतच घरी पोचला होता. तेंव्हापासून बऱ्याच वेळा हि संधी घेतली होती. साध्याच बरेच दिवस जमले नव्हते. ‘काम असते ना, व्याप असतात बरेचसे’. हे तर मनोमन पटवायच्या आधीच पटले.
पेटी, तंबोरा, तबला. सूर जुळून विरून जातात. पडदा बंद.
रिकाम्या खुर्च्या.
‘एखाद्या सर्वसामान्य माणसाची बौद्धिक कुवत, कलेची जाण आणि संयम याचा विचार करता कोणतीही महान कलाकृती हि लोकप्रिय असूच शकत नाही. इथे गर्दी नाही म्हणून हे महान आहे’ - माझ्यातला पहिला.
‘पण महान म्हणजे काय कोण ठरवणार? तुला आवडतय म्हणून महान म्हणण्यात काहीच अर्थ नाही. बऱ्याच लोकांना हे सगळे रटाळ वाटत इतकच नव्हे तर फालतूसुद्धा वाटत’ - माझ्यातला दुसरा.
पहिल्याच रक्त खवळत, तो तुटून पडतो ‘त्यांची गाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचली आहेत. अनेक समीक्षकांनी त्यांना गौरविले आहे. त्यांच्या संगीताचा अवका प्रचंड मोठा आहे. हजारो लोकं त्यांच्या गाण्यांचे चाहते आहेत. एव्हडी लोकं काय मुर्ख म्हणून..’ – पहिला स्वत:हूनच गप्प.
‘एक तर ते स्वत:साठी गातात किती लोकं आलेत याने त्यांना काहीच फरक पडत नाही’ - पहिला.
‘मग तुला का पडतोय? तुला वाटतय ना हे महान आहे? बास न मग’ - दुसरा.
पहिला पुन्हा विषय छेडतो ‘तुम्ही लोकांना सामान्य गोष्टी दिल्या तर लोकं अतिसामान्य बनतात. तुम्ही लोकांना असामान्य गोष्ठी दिल्या तर लोकं सामान्य बनतात. अस तेच एकदा म्हणाले होते. माझ्या जाणिवांच्या कक्षा त्यांच्यामुळे रुंदावल्या आहेत. आणि हे खुपच महत्वाच आहे. त्यांनी असामान्य गोष्टी दिल्या आहेत. आता जर अस पाहिलं कि त्यांच कुठलाही गाणं आणि साध्याच कुठलही ‘कोलावारी’ वगैरे घेतलं तर खूप जास्त लोकांना ‘कोलावारी’च माहिती असणार उलट आवडतही असणार. म्हणून अर्थहीन गाणी चांगली होत नाहीत. म्हणजे..’ - पहिला स्वत:हूनच पुन्हा गप्प.
दुसरा पहिल्याने स्वत:चे केलेले अध:पतन पाहून आणखी खुश.
पहिल्याला नंतर वाटत हे नवं विरुद्ध जुनं असेल. नवलाईला कधीही जास्त भाव असणार. किंवा जगण्याचा वेग बदलला आहे वगैरे म्हणून लोकांना वेळ नाही. पहिला इकडे तिकडे बघतो त्याला नाही म्हणायला थोडीबहुत ‘तरुणाई’ आणि चक्क ‘हिरवळ’सुद्धा दिसते. पहिला लगेच काहीतरी बोलयच म्हणतो पण स्वत:ला आवरतो.
‘अतिपरिचयात अवज्ञा. कालाय तस्मै नाम:’ दुसरा म्हणतो.
पहिला काहीच म्हणत नाही.

अजून रंगमंचावर काहीच हलचाल नाही. मी शांतपणे बसलो आहे. खरतर जर कार्यक्रम उशिरा चालू झाला तर मी दरवेळी चीडचीड करतो. आम्ही पैसे भरून आलोय. वेळ आणि पैसा फुकट चाललाय वगैरे.
हा कार्यक्रम दरवेळी उशिरा चालू होतो. पण मला हे चालत. गरज कोणाला आहे? त्यावरती असत ते.

प्रेक्षकांमाधली चुळबुळ वाढते. तेव्हड्यात घंटा होतो. पडदा उघडतो. टाळ्या वाजतात.
नेपथ्य शून्य. कार्यक्रमाचे नाव सुद्धा नाही. डावीकडे एक ढोलकीवाला, त्याच्या पुढे एक तबलावाला, मागे एक तालवाद्यवाला, उजव्या बाजूला एक पेटीवाला. आणि मध्ये पांढऱ्या सदरयात पेटीवरती ‘तो’.
त्याला तो म्हणायचं?
त्यांना तो म्हणायचं?
कस असत, ‘तो’ हा एक अवलिया असतो. आणि एद्खादी व्यक्ती आदराच्या पलीकडे गेली कि ती अधिक जवळची होते. त्यामुळे इतरांसामोर बोलताना अर्थातच ‘ते’ पण मनातल्या मनात ‘तो’.

‘तो’ नेहमीची सुरुवात करतो. “कार्यक्रमास थोडासा उशीर झाला आहे. पण हरकत नाही. आपण अधिक गाऊन वेळ ‘भरून’ काढू”. थोडावेळ ‘त्या’ची बोटं नुसतीच पेटीवरती फिरत राहतात. सूर थोडे चीतपरिचित वाटतात, पण नाही. दुरवर कुठेरती नजर लावत ‘तो’ एक आलाप सुरु करतो. आलापिचे सूर ओळखीचे वाटतात एकदम गाणं आठवल्यासरख होत तेव्हड्यात, तेच गाणं सुरु होत. गाण्याची चाल लयकारी थोडी बदलेली असते.
कस आहे, गाण्याची चाल बदलेली मला चालत नाही. संगीतकाराने चाल बांधताना काहीतरी विचार केला असतो उगाच गाणं ‘सोप’ करून म्हणण्यात काही अर्थ नसतो, ‘सारेगमप’ सारख. आणि दुसर म्हणजे पु.लंच्या रावसाहेबमध्ये नाही का ‘चाल बदलायला तुमच तेव्हड, अधिकार नको का रे’. ‘त्या’ने चाल बदलेली चालते कारण मुळात ती ‘तो’ सोपी करून म्हणतच नसतो आणि अर्थातच ‘अधिकार’. भावसंगीतात भाव पोचण महत्वाच. किती प्रकारे तो भाव तुम्ही पोचवू शकता, लयीच्या किती गमती जमती करू शकता हे महत्वाच. ‘तो’ या सगळ्यातून लीलया पार जात असतो. समेवर येऊन गाणं संपत.

पुढच्या गाण्याची तयारी तबल्याची ठोकाठोक. पुढे ‘तो’ म्हणतो, “हा कार्यक्रम तुमचा आहे. तुम्ही फरमाईश करा मी म्हणतो. कार्यक्रमाच्या वेळेत शक्य होतील तेव्हडी गाणी आपण इथे म्हणायचा प्रयत्न करू.”
कोणीतरी एक फरमाईश सांगत. अजून एक लांबून कोणी दुसरी फरमाईश सांगत. मग कोणीतरी तिसरी. तिसरी फरमाईश जोर पकडती आहे. ‘तो’ शांतपणे तिन्ही फरमाईश ऐकून घेतो. पुन्हा पेटीचे सूर आळवतो आणि चौथंच गाणं सुरु करतो. मी आनंदाने टाळ्या वाजवतो कारण त्यातल कोणातच गाणं डाव-उजव करण्यासारखं नसत. दुसऱ्यामागून तिसरे अशी गाणी सुरूच राहतात. मधून-मधून 'तो' खरच फरमाईशीपण घेत असतो. गाण्याची कथा, गीतकाराचे त्याच्या अर्थाविशयीचे मत हे मधून मधून येत असते. गाण्याची मूळ बंदिश त्यातून गाणे त्यातून पुन्हा बंदिश असा प्रवास सुरु असतो. मधूनच एसी वाढतो आणि थंडी जाणवते.

मग एकदम अत्यंत परिचित गाणं सुरु होत. अशी खुपच जवळची गाणी आपल्याला एक विशिष्ठ वेळी घेऊन जातात. हि गाणी त्या वेळी आवडलेली असतात. नंतर आपण मोठे होतो, अधिक अधिक चांगल ऐकत जातो तस चांगलची व्याख्याहि बदलत जाते. आपल्याला नवीन कान फुटतात. आधी न जाणवणाऱ्या गोष्टी आता जाणवायला लागतात. मग कधीकाळी त्या ‘वया’मुळे आवडलेली गाणी आता तद्दन फालतू वाटतात. पण ‘त्या’ची तीच गाणी त्या नवीन कानांनासुद्धा आवडतात. नवीन कानांनापण यात बरच काही आधी न गवसलेलं सापडत.
मग मध्यंतर होते. अचानक मघाचच्या कार्ट्याचा आवाज वाढतो. मध्यंतरापर्यंत त्या कार्ट्याने काहीही आवाज केलेला नसतो.
'त्यालाही आवड निर्माण झाली असावी' - माझ्यातला पहिला.
'झोपमोड झाली असावी' - माझ्यातला दुसरा.

मी लवकरच परत येऊन जागेवर बसतो. कुरतडलेल्या खुर्च्या, जळमाटे, छ्परावरची भोकं पुन्हा एकदा.
मध्यंतरानंतर काही लोकं गळतात. पण मध्यंतरानंतर अजून बहार येते. आता तर बंदिशीतून गाण्यात, गाण्यातून दुसऱ्या बंदिशीत आणि त्यातून आणखीन एका वेगळ्याच गाण्यात प्रवास सुरूच राहतो. अजून एसी वाढतो आणि थंडी वाजते. खोलातून गाणं सुरूच राहत, आवाज घुमतो. ऐकताना आपोआप डोळे मिटले जातात.
अजून थंडी वाजते.
एक मिनिट सारखी कशी थंडी वाजेल ? ती पण उन्हाळ्यात? बहुतेक याला अंगावर काटा येणं म्हणतात. ठरल, इथून पुढे थंडी वाजण्याऐवजी काटा येणे. Ctrl + C -> Ctrl + H -> Ctrl + V -> Enter.

साडेबारा वाजत आलेले असतात. काही चाणाक्ष प्रेक्षकच्या ते लक्षात येते. ‘वेळ संपली’ म्हणून ते उठून चालू लागतात. उद्या ऑफिसला जायचे असल्याचे माझ्या लक्षात येते. मी वेळ बघतो. पण याने काहीच फरक पडत नाही ‘शेवटचे गाणे’ सुरु होते. वेग-वेगळी अनवट वळणे घेत लयकारी उत्तरोत्तर बहरत जाते. 'तो' पेटीवरचे दोन्ही हात सोडून देऊन, हातांनी एका अदृश्य वस्तूशी खेळू लागतो. एकदम दोन्ही मुठी घट्ट आवळून घेतो, पुन्हा सोडून देतो. मी आ वासून बघत असतो. हृदयाची धडधड थांबलेली असते. श्वास आपोआप घेतला जात असतो. ‘त्या’च्या हातातील ती अदृश्य वस्तू एक प्रवाह बनून माझ्या कानात शिरत असते.

हळू हळू रंगांची उधळण व्हायला लागते. प्रथम सभोवताल प्रकाशून जातो. हळूहळू वेगाने पिवळ्या सोडियमचा प्रकाश काळ्या रंगात वाहवत जातो. लाल हिरव्या निळ्या रंगात लिहिलेली नियॉनची अक्षरे आडव्या रेषांमध्ये रुपांतरीत होऊन रंगाची बारीकशी छटा काळ्या रंगात मिसळू देतात. प्रकाश कमी जास्त होत जातो. आता पांढऱ्या प्रकाशाच्या उभ्या रेषा खाली खाली जात राहतात. पांढऱ्या रेषा थांबतात. मी किल्लीने दरवाजा उघडतो. बुट काढतो. पंखा लावतो आणि बेडवरती अंग टाकून देतो. माझे लक्ष घड्याळाकडे जाते.
घड्याळाचा काटा कधीच मोडून पडला असतो.

गुलमोहर: 

अतिशय तरल लिहिलं आहे, मेघवेडा. गाणं ऐकताना असा दृश्यं... कर्णेंद्रियांनाच काय पण इतरही इंद्रियांना भेटेल असा अनुभव येणं... हे आगळं आहे, खास आहे. तुम्ही ते खरच छान मांडलय.

हे भावसरगम कार्यक्रमाविषयी असेल तर, माझा अनुभव अगदिच वेगळा. मी बघितलेले तीनही कार्यक्रम अगदीच ठीक ठाक होते.
पहिल्या कार्यक्रमात तावडे(??) नामक ढोलकीवादक सोडल्यास अगदीच कसातरी कार्यक्रम झाला. फर्माइशींचे कागद घेत होते पण गाणी त्यांची आधीच ठरलेलीच म्हटली. तिसर्‍या कार्यक्रमाला राधा मंगेशकर लहानपणीच्या लताबाईंसारखा खणाचा परकर्-पोलका अन दोन वेण्या घालून आली... वाईट्टं गायली.
हृदयनाथांच्या संगीत दिग्दर्शनासाठी, शब्दं अन सूर कसेकसे एकत्रं नांदू शकतात ह्य त्यांच्या प्रगल्भ दृष्टीसाठी माझे साष्टांग दंडवत... अनेकदा. पण प्रत्येक गाणं त्यांनी स्वतः गाण्याचा अट्टाहास केला.
माझ्याच वाट्याला आलेले तीन कार्यक्रम वाईट असणार बहुतेक असं मी गृहीत धरून चालतेय.... नाहीतर इतके कार्यक्रम कसे होतील?
असो.. लेख छान जमलाय.

कळल.

अमृतवल्ली,शँकी, जाईजुई,नंद्या,निशदे,दिनेशदा,दाद प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

@दाद: मी किमान १०-१२ वेळा तरी कार्यक्रम पाहिला असेल मला तरी दरवेळी तो आवडला. मला असे लक्षात आले आहे कि जेंव्हा ते सांस्कृतिक सोहळे किंवा उदघाटने अशा ठिकाणी ते कार्यक्रम करतात तेंव्हा ते बऱ्याच वेळा रटाळ होतात. तसेच लोकपण त्याचत्याच फरमाइशा करतात. इतर वेळी कार्यक्रम खुपच जास्त रंगतो.