ब्लू पॅरॅडाईज.
अतीउच्चभ्रूंसाठी अतीउच्चभ्रूंच्या वस्तीपासून वीस किलोमीटर लांब आणि एकंदर शहरापासून तीस ते पस्तीस किलोमीटर लांब असलेले एक हॉटेल कम रेस्टोरंट.
हायवेवर असलेले हे रेस्टॉरंट आतून इतके भारी असेल याची कल्पनाही यायची नाही. कारण ते दिसायचेच नाही. फक्त भल्यामोठ्या गेटवर असलेले दोन साडे सहा फूट उंचीचे शस्त्रधारक गुरखे, एक केबीन आणि दोन अजस्त्र कुत्रे दिसायचे. बाकी सगळी झाडेच! झाडांवर निळे दिवे. बाकी काहीही दिसायचे नाही.
सहा लाखाच्या खालची गाडी गेटपाशी आली तर खोदून चौकशी व्हायची.
स्टाफला आत जायला वेगळे प्रवेशद्वार होते.
खरे तर ते एक रेस्टॉरंट म्हणून सुरू केले होते. पण नंतर सहा रूम्स बांधण्यात आल्या. एकेक रूम महालासारखी. अती उच्च शासकीय अधिकारी आणि अती श्रीमंत अशा लोकांसाठीच त्या खोल्या होत्या, तरीही त्यांचे दिड दिड महिन्याचे बूकिंग झालेले होते.
पण निळ्या नंदनवनाचे प्रमुख आकर्षण वेगळेच होते.
जलमहाल!
जलमहाल हे एक रेस्टॉरंट होते. ही कल्पना कोणत्या सुपीक डोक्यातून निघाली याची स्टाफला कल्पना नव्हती. जनरल मॅनेजर जीवन या पंचेचाळिशीच्या माणसाला केवळ माहीत होते की मालक कोण! आणि अर्थातच अनेक कस्टमर्सना माहीत होते, पण कस्टमर्स स्टाफशी हे कशाला बोलतील?
जलमहाल हे संपूर्ण रेस्टॉरंट पाण्यात होते. भल्या मोठ्या कृत्रिम तळ्यात खालून निळे दिवे सोडले होते. पाण्याची पातळी सहा ते बारा फूट अशी बदलती होती. या तळ्यात एकंदर वीस वर्तुळाकार होड्या होत्या. या होड्यांवरच कस्टमर्स जेवण करायचे. एक होडी बूक करायला पंधरवड्यापासून सांगून ठेवायला लागायचे. होडीत सहा माणसे आरामात बसून जेवू शकायची. होडीत एक लहानसे बेसीनही असायचे, ज्यात गेलेले पाणी होडीच्या तळाशी असलेल्या एका सिलिंडरमध्ये जमा व्हायचे. एक टेबल उरकले की होडी पुन्हा काठाशी आणून स्वच्छ केली जायची. या वर्तुळाकार होडीत वल्ही असण्याचे कारणच नव्हते. ती होडी स्टाफच्या हातात असलेल्या दोरीबरहुकूम तळ्यात सर्वत्र फिरत राहायची. एका कोपर्यात डान्स, एका कोपर्यात बार, एका कोपर्यात एक शो आणि एका कोपर्यात केवळ शांतता! एखाद्याने जर 'सायलेन्ट कॉर्नर'चे बूकिंग केले तर त्याची होडी जी त्या शांतता असलेल्या कॉर्नरला जायची ती टेबल उरकेपर्यंत तिथेच असायची. तीही एकटीच! इतर होड्या फिरल्या तरी तिथे यायच्या नाहीत आणि ही होडी फिरायची नाही.
होडीत एका पॅनेलवर मेन्यूकार्ड आणि त्यासमोर त्या त्या पदार्थाचा किंवा लिकरचा नंबर असायचा. तो दाबला की ऑर्डर बूक व्हायची. जास्तीतजास्त सहाव्या मिनिटाला माश्याचा पेहराव असलेला एक स्टाफ पोहत पोहत आपल्या एका हाताने डिश धरत व एका हाताने पाणी कापत तिथे यायचा आणि होडीला धरून स्थिर होत लिकर सर्व्ह करायचा. खाद्यपदार्थांना फार तर पंचवीस मिनिटे लागायची. जेवण झाले की ऑफचे बटन प्रेस केले की त्या टेबलसाठी एक्स्क्ल्युझिव्ह असलेला एक स्टाफ होडी हळूहळू काठाला आणायचा.
सर्वत्र निळे मंद लाईट असल्याने वातावरण गूढ, रहस्यमय असे भासायचे. दर तीन दिवसांनी तळे साफ केले जायचे. जेवून हात तळ्यातल्या पाण्यात धुवायला सक्त मनाई होती. अर्थात, तसले पब्लिक तिथे येऊच शकत नव्हते.
जलमहाल वॉज अ स्टेटस सिंबॉल! आम्ही महिन्यातून एकदा तरी जलमहालला जेवतोच हे सांगणे म्हणजे आजूबाजूच्या सर्व नजरा आपल्याकडे वळवणे होते.
जलमहाल येथे केवळ होडीत बसून जेवता येते हा आनंद नव्हता. तेथील खरा आनंद होता अत्यंत विनम्र आणि तातडीने दिली जाणारी सर्व्हीस. स्टाफ असा निवडून घेतला होता की तुम्ही म्हणालात तर तुम्हाला डोक्यावर उचलून जलमहालात फिरवून आणतील. टीप हा प्रकारच तिथे नव्हता. म्हणजे टीप द्यायची नाही असा कायदा होता. जलमहाल संध्याकाळी सातला सुरू होऊन पहाटे चारला बंद व्हायचा.
या शिवाय जलमहालमध्ये आणखी एक गोष्ट मिळायची.
कंपनी!
तुम्ही एकटेच आलात तर तुमच्याशी वाट्टेल त्या विषयावर निदान जुजबी तरी बोलू शकणारा असा एखादा पुरुष किंवा स्त्री तुमच्याबरोबर दिली जायची. ती व्यक्ती होडीतच बसायची. अगदी प्रेमभंगापासून राजकारण आणि क्रिकेटपासून रस्त्यांची अवस्था यावर कशावरही बोलणे होऊ शकायचे. ती व्यक्ती कस्टमर्सना असे काही ऐकवायची की कस्टमरही गुंग व्हावा. अनेकदा तर असे व्हायचे की सर्वच विषयांवर बोलणे अशक्यच असल्याने ती व्यक्ती नकळतपणे स्वतःला नीट समजणारा विषय काढून बसायची. विषय कसा आणि कधी बदलला ते कस्टमरला समजायचेच नाही. त्यात पुन्हा तो विषय बर्यापैकी जिव्हाळ्याचा असायचा! क्रिकेटला महत्व आहे तितके हॉकीला का नाही, स्त्रीचे मन किती गुंतागुतीचे असते ते पुरुषांना समजते तरी का इत्यादी! झाले, कस्टमर त्याच विषयावर बोलायला लागायचा आणि कंपनीचे बोलणे ऐकून थक्क व्हायचा.
यामुळे लोक फॅमिली घेऊन गेले तरी काही वेळा कंपनी घ्यायचे. उगाच आपले! आणखी एक स्टेटसचे लक्षण!
मात्र त्या स्टाफचा बाह्य जगतात कस्टमर्सशी काहीही संबंध येऊ शकायचा नाही. स्टाफ कस्टमरशी काय काय बोलला हे जीवनला स्वत:च्या जागेवर बसून ऐकू यायचे. आणि हे स्टाफलाही माहीत होते. एखाद्या कस्टमरने एखाद्या पोरीला अगदी भाव विचारला तरी चालेल, पण तिने त्याला तिचा सेल नंबर देता कामा नये. जो घोळ घालायचा तो निळ्या नंदनवनातच घाला.
जलमहालचा स्टाफ ही खरच चर्चेची बाब होती. ते राहायचे जलमहालातच, म्हणजे निळ्या नंदनवनातच! पण त्यांच्या खोल्या कुठे आहेत, त्यांना पगार किती आणि ते इतके विलक्षण अष्टपैलू कसे हे काही समजायचे नाही.
एखादा कस्टमर गल्लत करायला लागलाच तर त्याची होडी एका वेगळ्याच दिशेने नेली जायची व तेथे अनेक स्टाफच्या उपस्थितीत प्रश्न सोडवला जायचा. जलमहालबद्दल जितके कुतुहल होते तितकीच भीतीही! कोणी शहाणपणा करायचेच नाही तिथे. प्रत्येक स्टाफ हा एक उत्कृष्ट जलतरणपटू होता.
======================
आजही सात वाजता फोन काऊंटरवर आपल्या निळ्या मासळीच्या वेशात जिता स्थानापन्न झाली तेव्हा तिच्या चेहर्यावर तिच्या मनातील वादळाचा अंशही ठिबकलेला नव्हता. तीन दिवसांच्या रजेनंतर आज जीवन पुन्हा रुजू होत होता. जीवन एकटाच बाहेर जाऊ शकायचा. बाकीच्यांना एकदम बॉन्ड संपल्यावर, म्हणजे तीन वर्षांनंतर बाहेर पडता यायचे आणि त्यांचे कोणतेच नातेवाईकही आत भेटायला येऊ शकायचे नाहीत. खरे तर व्यवस्थापनाने बरेचसे ' जगात एकटेच' असलेले असेच स्टाफ निवडलेले होते. मुळात जलमहालमध्ये बेकायदेशीर काहीच नसल्याने आणि जे घडते ते इकडच्या कानाचे तिकडच्या कानाला समजत नसल्याने कोणाचीच नजर वळायचीही नाहीच.
जिताही एकटीच होती. येथील बॉन्ड संपल्यावर तरी बाहेर कशाला जायचे हाच तिच्यापुढे प्रश्न होता. ती ऑपरेटर असल्याने उद्यावर आजचे कोणतेच काम ढकलायचा प्रश्न नव्हता. पगाराचा प्रश्न नव्हता. सुरक्षितताही भरपूर होती. या निळ्याशार तुरुंगातील सर्व स्टाफ एकमेकांशी सलगीनेच वागत होता. कस्टमरशी फोनवर बोलण्याशिवाय जिताचा काहीच संबंध येत नव्हता. जलमहालची माहिती फोनवर देणे, बूकिंग्ज घेणे आणि कॉल्स ट्रान्स्फर करणे इतकेच तिचे काम होते. वयाच्या आठव्या वर्षापासून अनाथ असलेली आणि अक्षरशः शेजार्यांनी वाढवलेली जिता वयाच्या स्वीट सिक्स्टीनमध्येच एका स्टाफच्या नजरेत भरलेली होती आणि सतराव्या वर्षी जीवनने तिला जलमहालमध्ये नेमलेले होते. सुरुवातीला आपल्याला बाहेर जाता येणार नाही याचे वैषम्य वाटत असलेल्या जिताने केवळ सहा महिन्यात जलमहाल हेच आपले घर हे मान्य केलेले होते. जिकडे बघावे तिकडे निळे दिवे असलेला जलमहाल तिला आता खरोखर नंदनवन वाटू लागला होता. त्यानंतर दोन एक वर्षात तिला जलमहालची सगळीच रचनाही समजली होती आणि तेथील खोल्यांमध्ये चाललेले उच्चभ्रूंचे धंदेही समजले होते. अर्थात, तिला त्या गोष्टींशी काहीच घेणेदेणे नव्हते. आजवर अडीच वर्षात तिच्याकडे कोणी तसे पाहिलेलेही नव्हते कारण ती एका कोपर्यात बसून फोन घेत असायची. पन्नास मीटर्सवर असलेल्या तळ्यातील होड्यांवरचे लोक तिच्यापर्यंत नजर पोचवत बसायचेही नाहीत.
पण आज ती खर्या अर्थाने हादरलेली होती. याचे कारण जीवन तीन दिवसांपूर्वी रजेवर गेला त्या संध्याकाळी झालेला प्रकार, केवळ तिसर्या मिनिटाला जीवनची आलेली धक्कादायक ईमेल आणि आज जीवनने पुन्हा कामावर रुजू होणे हा घटनाक्रम तिला बसल्या जागी थरथर कापायला लावत होता. तिला एक माहीत होते, जलमहालच्या स्टाफला जो प्रचंड पगार मिळतो आणि जे डोक्यावर घेतले जाते, त्याच स्टाफची चूक झाली तर मात्र मिळणारी शिक्षा भयानक असते. तिच्या कारकीर्दीत एकदाच तशी शिक्षा एका मुलीला मिळाली होती. तिने जीवन असाच एकदा रजेवर असताना स्वतःचा सेलनंबर एका कस्टमरला दिला आणि त्याचे तिला फोन यायला लागले. कोणा निष्ठावन मुलाने याची तक्रार केल्यावर तिची फोन रेकॉर्ड्स तपासली गेली. त्यात सत्य सापडल्यावर जलमहालच्या कायद्यानुसार ती मुलगी दिसेनाशी झाली. कोणी म्हणे तिला हाकलले. पण हाकलले असते तर तिच्या खोलीतून दिड दिवस कुबट वास का येत होता? त्या खोलीचे दार का बाहेरून बंद होते? तिसर्या दिवशी ते दार उघडे होते तेव्हा आतमध्ये वेगळाच स्टाफ कसा काय राहात होता? तो इतका घाबरलेला का होता? आणि सेलनंबर दिला तर तो गुन्हा कसा काय? स्टाफ पळून का जाऊ शकत नाही? बॉन्ड संपल्यावर बाहेर गेल्यानंतर स्टाफने या पिळवणुकीची तक्रार केली असे एकदाही का झाले नाही? की झाले पण आपल्याला समजले नाही? स्टाफ एकमेकांशी आपापल्या खोलीत बोलत असला तरीही बोलणे रेकॉर्ड का केले जाते? मी टेलिफोन ऑपरेटर असूनही आजवर एकाही कस्टमरला येथील कहाण्या का सांगितल्या नाहीत?
आजवर या प्रश्नांना भीक न घालणार्या जिताला आज हे सर्व प्रश्न डोक्यात घाव घातल्यासारखे मनात येताना जाणवत होते. या प्रश्नांची उत्तरे खरे तर केव्हापासूनची अत्यावश्यक होती हे आता खर्या अर्थाने जाणवत होते.
पहिला कॉल आला, जिताने तो कॉल घेऊन कस्टमरला सांगितले की जलमहालचा 'सायलेन्ट कॉर्नर' पुढचे सदतीस दिवस बूक्ड आहे. त्या कस्टमरच्या स्वरातील निराशा ऐकताना तिला आठवले की अशी निराशा ऐकताना एरवी तिला किती आनंद व्हायचा. एखाद्याला आपण न दिलेले दु:ख आहे आणि ते दु:ख तो आपल्याला सांगतोय असे काहीतरी तिला वाटायचे. पण आज त्याच्या त्या निराशायुक्त स्वराहून निराश स्वतः जिताच झाली होती. कारण तो कॉल ठेवता ठेवता तिला दिसले होते की लांबून आकांक्षा झपझप पावले उचलत तिच्यापर्यंत येत आहे. आकांक्षा ही एरवी कंपनी म्हणून वावरायची, पण इमर्जन्सीमध्ये टेलिफोन ऑपरेटरचे काम करायची.
याचाच अर्थ, जीवनने आपल्याला आत बोलावलेले असणार! आता इथे काही वेळ आकांक्षा बसेल आणि नंतर आतमध्ये आपल्याला जबरदस्त झापण्यात येईल.
आकांक्षा तोंडभरून हासत जवळ आली. तिचे ते हासणे तिच्या मत्सरी आणि घाणेरड्या स्वभावातून आलेले होते. दुसर्याचे वाईट होताना पाहून हसू येणे हा आकांक्षाचा स्वभाव होता. आज जिताचे काहीतरी वाईट नक्कीच होणार होते. याचे कारण 'वकील'!
वकील नावाचा एक साठीचा पण अत्यंत भरभक्कम शरीरयष्टी असलेला गर्भश्रीमंत माणूस हा जलमहालचा आणि मागच्या खोल्यांचा 'डेली' कस्टमर होता. सहसा त्याला कंपनी म्हणून निशा नावाची मुलगी हवी असायची. जेवतानाही आणि नंतर खोलीतही! पण 'वकील'चे महत्व वेगळे होते. आज जलमहालकडे असलेल्या एकंदर धंद्यापैकी जवळपास सत्तर टक्के धंदा वकीलच्या संपर्कामधून येत होता हे जीवनला आणि स्टाफलाही माहीत होते. वकील ज्या कंपनीचा संस्थापक होता त्या कंपनीच्या पार्टीज, बिझिनेस डिनर्स आणि त्या कंपनीचे जे इतर असोसिएट्स होते त्या सर्वांचे बूकिंग वकीलच्या प्रतिनिधीकडून सतत होत राहायचे.
याचमुळे वकील या नावाचा जलमहालमध्ये जबरदस्त दबदबा होता. अन्यथा इतक्या लांब इतक्या महागड्या हॉटेलमध्ये रोज कोण येणार? वकील स्वतः रोज यायचा. मात्र तो होडीत बसायचा नाही. त्याला एक वेगळीच जागा देण्यात आलेली होती. टेरेसवर. खास एकट्यासाठी. लांबवरून हायवेवरचे मस्त आवाज, आकाशात धुंद चांदणे, समोर निशा आणि उंची स्कॉचची व्यवस्था!
निशा त्याची मैत्रीण झालेली होती. जेमतेम बाविशीची निशा वकीलच्या मुलीसारखी असली तरी मोठमोठ्या गप्पा मारायची. म्हातारा वकील स्कॉच चढली की नुसता निशाकडे बघत बसायचा. ती ते जाणवून त्याला आणखीनच खुष करायचा प्रयत्न करत आणखीन स्कॉच पाजायची. जलमहालमध्ये टीपची पद्धत असती तर आजवर निशाने एक खोलीही बांधली असती वकीलच्या टीपमधून! पण खुद्द वकीलला खुष ठेवणारी पोरगी म्हणून जीवन तिला पंचवीस टक्के पगार अधिक द्यायचा. याचा मत्सर अनेकींना होताच. पण वकीलसमोर पाय ठेवायची आजवर एकाही पोरीची हिम्मत झालेली नव्हती. निशा ही वकीलला भेटण्याआधी पार करावी लागणारी अभेद्य भिंत झालेली होती. कित्येकवेळा खोलीत जायचाही प्रयत्न न करता वकील टेरेसवरच निशाला छेडायला लागायचा.
मात्र परवा जर्रासे वेगळे झाले.
काही कारणाने लिफ्ट बंद झाल्यामुळे जिना उतरून खाली आलेल्या वकीलला तिथेच बसलेली जिता ऑपरेटर आज फार फार जवळून दिसली. निशा बरोबर असूनही वकीलने जिताकडे डोळे भरून पाहिले. निशाशिवाय एकाही मुलीचे आजवर इतके भाग्य नव्हते.
खुद्द वकील जिन्याने खाली आलेला पाहून सटपटत निशाने कॉल सोडला आणि ताडकन उभी राहिली. मान झुकवून तिने वकीलला अभिवादन केले. वकील थिजल्यासारखा काही क्षण तिच्याकडे बघत राहिला आणि निशाच्या कपाळावरच्या आठ्यांच्या जाळ्याची पर्वा न करता टेबलपाशी गेला.
"इव्हिनिंग सर... "
"गुड इव्हिनिंग... तुझं नांव जिता... नाही का??"
"हो सर..."
"हं... कंपनी???"
वकील जिताला तू कंपनी म्हणूनही काम करतेसका असे विचारत होता.
आयुष्यातील पहिली चूक केली जिताने! जलमहालच्या स्टाफचे उत्तर असायला हवे होते की 'खुद्द तुम्ही असाल तर कोण कंपनी देणार नाही सर' असे!
जिताने वकीलला भलतेच उत्तर दिले...
"नो सर... आय अॅम जस्ट अ टेलिफोन ऑपरेटर.. "
वास्तविक आत्ताच निशाबरोबर ड्रिंक्स आटपून मागच्या रूममध्ये चाललेला वकील काही जिताला ये म्हणणार नव्हता. आणि नंतर वकीलची नजर जितावर पडू नये यासाठी जीवनने काहीही केले असते. हे जितालाही माहीत होते. पण तिला वाटले की जीवन तर आजच रजेवर गेलेला आहे आणि आत्ता या म्हातार्याने काही मागणी केली तर आपल्याला कोण वाचवणार? जलमहालच्या ज्या चार मुली कोणत्याही प्रलोभनाला आजवर बळी पडलेल्या नव्हत्या त्यांच्यापैकी एक जिता होती.
एक प्रकारे तिच्या त्या उत्तराने निशाला बरेच वाटले होते. याचे कारण तिला मिळणारा पंचवीस टक्के अधिक पगार वाटून घ्यायला एक मुलगी निर्माण होणार नव्हती. पण निशा सिनियर तर होतीच, वर वकीलला असे उत्तर मिळाल्यावर तिच्यातील जलमहालवरील अत्याधिक निष्ठा जागृत झाली.
"जिता... यू शूड बी ऑफरिंग द कंपनी टू द क्लाएन्ट्स"
निशाच्या स्वरातील जरबयुक्त धमकी ऐकून जिता हादरली होती. 'कंपनी' म्हणून काम करणे हा चॉईस नसला तरी शरीरसुख देणे न देणे हा स्त्रीचा चॉईस होता जलमहालमध्ये! अचानक या नियमाची आठवण होऊन जिता निशाकडे पाहात तीव्र पण दबक्या स्वरात उद्गारली.
"आय अॅम नॉट अ कंपनी... नॉर अ बेड पार्टनर... "
हे वाक्य ऐकून निशाच्या मनात जी संतापाची लाट उसळली तिचा प्रभाव ती आज नाही, तीन दिवसांनी दाखवणार होती ती जिताला! मात्र त्या आधी वकीलला स्वतःलाच त्या विधानाचा भयानक राग आला. जिताच्या निळ्या मासळीच्या पोषाखातून दिसणार्या देहाचे पायाच्या अंगठ्यापासून ते डोक्यापर्यंत निरिक्षण करत वकील हक्काच्या स्वरात म्हणाला...
"कम ऑन... आय वॉन्ट यू... राईट नाऊ.. "
जीवन रजेवर गेलेला पाहून निशाने मुद्दाम या म्हातार्याला जिन्याने खाली आणले असेल असे जिताला वाटले. वकीलच्या आवाजातील अधिकार तिला संतापजनक व किळसवाणा वाटला. जलमहालचे कायदे धाब्यावर बसवून ती खणखणीत आवाजात म्हणाली.
"आय अॅम नॉट अ कमोडिटी मिस्टर वकील... माईन्ड यूअर लॅन्ग्वेज.. "
"कोणाशी बोलतीयस समजतंय का?" - वकील घुसमटत्या आवाजात बोलला.
तेवढ्यात तिथून एक खाद्यपदार्थांची ट्रॉली घेऊन एक बॉय गेला. क्षणभर संभाषण थांबले. पुन्हा जिता म्हणाली..
"हे पहा सर.. मी कंपनी म्हणून कामही करत नाही आणि काहीच करत नाही.. माझे काही अधिकार आहेत.."
"तू इथे आहेस ती माझ्यामुळे आहेस.."
"सॉरी सर... मी जलमहालचा जॉब करते... मला जलमहालकडून पगार मिळतो.. "
निशा चवताळली आणि जिताला म्हणाली...
"तुला काही अक्कल आहे का कोणाशी कसं बोलायचं याची??? डू यू हॅव एनी आयडिया व्हॉट यू आर डूईंन्ग?"
"हे निशा.. यू डोन्ट हॅव टू टेल मी दॅट... आय नो माय राईट्स... टेक हिम अवे.. राईट नाऊ"
मूर्ख जिताने निशाला आणि वकीललाही तुच्छ लेखत सरळ समोरचा कॉल घेतला. निशाला जलमहालचे कायदे माहीत असल्यामुळे हेही माहीत होते की जिताला ती जबरदस्तीने वकीलबरोबर पाठवू शकत नाही.
पण झालेला अपमान क्षणभर गिळून वकीलला घेऊन निशा मागच्या खोल्यांकडे निघाली.
अक्षरशः तिसर्या मिनिटाला पीसीवर 'यू हॅव अ न्यू मेल' असा मेसेज आला आणि जीवनची ईमेल पाहून जिता जागच्याजागी थिजली... त्याने रिटन एक्स्प्लनेशन मागीतले होते झालेल्या प्रकाराचे... आणि त्याने एक साधा फोनही केलेला नव्हता झापण्यासाठीही... याचा अर्थ सरळ होता.. जिता वॉज फिनिश्ड...
आणि त्या क्षणापासून ते आत्तापर्यंत... जलमहालचा एकही स्टाफ जिताशी तीन दिवसात अक्षरही बोललेला नव्हता..
विचार करकरून जिताने शेवटी एक एक्स्प्लनेशन लिहून काढले होते... त्यात तिने जलमहालमधील कंपनी होण्याचा कायदा, क्लाएंट्सना किती मर्यादेपर्यंत जाऊ द्यायचे याबाबत स्त्रियांना असलेल्या स्वातंत्र्याचा कायदा इत्यादीचा हवाला दिला होता. झालेला प्रकार केवळ वकील यांनी मला केवळ एक विकत मिळणारी वस्तू समजल्यामुळे झाला हे लिहिले होते. मी कधीही शरीरविक्रय करणार नाही हे तिने पुन्हा त्यात ठासून लिहिले होते. वर हेही लिहिलेहोते की जलमहालच्या रेप्यूटसाठी ती वकील यांची माफी मागायला तयारही आहे. शेवटी विनंती केली होती की तिच्यासारख्या एका निष्ठावान महिला स्टाफबाबत जलमहालच्या व्यवस्थापनाने दयाळू दृष्टिकोन ठेवून या प्रकरणात तिला दोषी समजू नये.
जिताने हे लेटर जीवनला ईमेल केले. दहा मिनिटे, अर्धा तास, दोन तास, अर्धा दिवस, एक दिवस, जीवनचे मेलला अक्षराचे उत्तर नाही.
आणि आज जीवन येऊन आपल्या केबीनमध्ये गेल्याचे कळण्याला केवळ दोन मिनिटे होत आहेत तोवर आकांक्षा तोंडभरून हासत आपल्याकडे येत आहे याचा अर्थ समजून जिता जागच्याजागी घामाने भिजली होती.
"कॉन्ग्रॅट्स.. जी एम वॉन्ट्स टू सी यू फर्स्ट.. तीन दिवसांचा उपास काढणार बहुतेक तुझ्यावर... "
यंत्रवत हालचाली करत आकांक्षाला आपली जागा देत जिता मान खाली घालून जी एम'स ऑफीस या जीवनच्या केबीनकडे चालू लागली. यच्चयावत स्टाफ तिचे ते दर्शन घेत होता. कोणास माहीत, ही पोरगी पुन्हा दिसते की नाही.
दारावर नॉक करून हिरवा दिवा लागताच मान खाली घालून जिता आत गेली. जीवनकडे पाहायचीही हिम्मत तिच्यात उरलेली नव्हती. चुकून एकदाच नजरानजर झाली तेव्हा जीवनचा चेहरा आणि त्यावरचे भाव पाहून जिताला पळून जावेसे वाटू लागले. पण आणखीन वाईट बाब म्हणजे... जळजळीत नजर रोखून निशा जीवनच्या समोरच बसलेली होती...
खुर्चीचा आधार घेऊन जिता कशीबशी उभी राहिली. डोळ्यात आत्ताच पाणी जमा होऊ लागले होते.
"तुझा जॉब काय आहे इथे?"
अत्यंत जरबयुक्त स्वरातील जीवनचा हा प्रश्न जिताला सटपटवून गेला.
"स... सर... ऑपरेटर..."
"आणि???"
"सर... मी कं.. कंपनी नाहीये..."
"हे तू ठरवलंस??? तू काय आहेस ते तुला विचारलंय मी... काय नाहीयेस ते नाही.. "
जिताची मान पुन्हा खाली गेली. कंपनी व्हायचे की नाही हे स्टाफच्या हातात नव्हते.
"काय आहेस तू???"
"सर.. ऑपरेटर आणि... बूकिंग ऑफीसर..."
जिताला स्वतःचा आवाज स्वतःलाही ऐकू येत नव्हता...
"आणि मी कोण आहे???"
"ऑ.. ऑफकोर्स सर.. जी एम..."
"आणि मिस्टर वकील???"
"ही इज... अवर मोस्ट... मोस्ट व्हॅल्युड क्लाएन्ट सर.."
"आणि आपला रूल ४३ सी काय आहे???"
"फॉर... फॉर्टी थ्री नं?... सर.. क्लाएंट इज एव्हरीथिंग फॉर अस..."
"आणि तू तो पाळलास??"
"सर.. ते मला सरळ.. म्हणजे.. सरळ बोलावत होते..."
"तू साध्वी आहेस??? चरित्र शुद्ध ठेवायला जलमहालला घेतलंय तुला तुझं???"
"पण सर..."
"नॉट अ वर्ड आय वॉन्ट फ्रॉम यू..... "
"....."
"आज वकील येतील.. आठ वाजता... आठ ते पहाटे पाच... चार नाही... पहाटे पाच... त्यांची कंपनी तू आहेस.."
"........"
"आणि... उद्या पहाटे पाच वाजून पाच मिनिटांनी जर वकीलांच्या बोलण्यात तुझ्याबद्दल थोडीही नाराजी दिसली... तर यू विल लूज..... नॉट द जॉब... धिस लाईफ... सो... स्टार्ट गेटिंग रेडी... "
जलमहालचे खरे, जळजळीत आणि महाभयंकर स्वरूप जिताच्या लक्षात आलेले होते... जन्मठेप किंवा फाशी... सुटका नाही..
क्लाएंटसाठी काहीही... या एकाच तत्वावर जलमहालचा मालक खोर्याने पैसे ओढत होता..
दोन्ही हात ओठांवर गच्च दाबत जिता प्रचंड त्वरेने केबीनबाहेर धावत सुटली. चुकून तोंडातून हुंदका बाहे पडला तर जीवन आत्ताच काहीतरी शिक्षा करेल असे वाटत होते तिला.
एका कोपर्यातील डान्सचा आणि म्युझिकचा आवाज नकोसा वाटत होता पळताना... आकांक्षाकडे बघणे भीतीदायक वाटत होते..
सगळे जग आपली विवशता आणि अपमान पाहून खदाखदा हासत आहे असे वाटत होते..
... अतिशय लगबगीने आकांक्षापाशी येत तिने स्वतःचे कार्ड, सेलफोन आणि मेक अप बॉक्स उचलली तेवढ्यात आकांक्षाचा हात तिच्या हातावर पडला...
"नो सेल फोन परमिटेड एनी लाँगर बेब.... यू लॉस्ट इट लॉन्ग बॅक..."
सेलफोनही जप्त झाला होता. काहीही प्रतिक्रिया चेहर्यावर न दाखवता जिता आपल्या बॉक्सकडे धावत सुटली. प्रत्येकाच्या रूमला जलमहालमध्ये बॉक्स म्हणायचे. बाह्यजगाला माहीत नव्हते... सर्व बॉक्सेस बेसमेन्टमध्ये होत्या... फक्त जीवनचा स्वीट वर होता.. त्याच्या स्वतःच्या केबीनच्या मागे..
बॉक्समध्ये एक पोरगेलासा तरुण तिच्या बॉक्समधील इन्टरकॉम हालवत होता.. आता मात्र तिला खरेखुरे रडू फुटले... निर्विकार चेहर्याने तिचे ते रडणे पाहून तो तरुण निघून गेला..
संपले... जगाशी संपर्क संपलेला होता... सेलफोनवर असलेल्या मोजक्याच नंबर्सशी संपर्कही संपला होता... काही नंबर पाठ असले तरीही त्यांच्याशी संपर्क करण्यासाठी फोनच नव्हता..
तिने घड्याळात पाहिले... सात वाजून नऊ मिनिटे...
एक्कावन्न मिनिटे उरलेली होती... सर्वनाशाला..
आपण आधीच बाहेरच्या काही लोकांशी संपर्क करून आपल्या मनातील भीती का व्यक्त करून दाखवली नाही??? कोणी ऐकले असते का पण आपले? कोणी विश्वास ठेवला असता का? गेल्या अडीच दिवसात आपण किमान सहाशे कॉल्स रिसीव्ह केले असतील...मूर्खासारखे आपण बूकिंग्ज घेत राहिलो... आपल्याला काय वाटले?? की जीवन फक्त झापेल??? आता तो तर आपल्याला मारायची तयारी करू शकतोय हे समजायला लागले आहे.. हेच आधी माहीत असते तर आपण कॉल्सवरूनच कित्येकांना ते सांगितले असते... म्हणजे आजवर ऐकलेल्या गोष्टी खर्या आहेत तर... पण लोकांनी विश्वास ठेवला असता का? की कॉल्सही रेकॉर्ड होतात??? आणि जीवनने आणि वकील म्हातार्याने ते सगळे पैशाच्या जोरावर दाबले असते तेही खरेच...
कीव... आपली आपल्यालाच कीव येत आहे... पण बाकी कोणालाही येत नाही आहे... बॉन्ड संपायला सात महिने राहिले आहेत... काय झालेअसते त्या म्हातार्याखाली झोपले असते तर?? जीव तरी वाचला असता?? कुठून हे सुचले त्याला नाही म्हणायचे... मुख्य म्हणजे इथे कोणाशी संपर्कच करता येत नाही... लेक??? लेकमध्ये जेवणार्यांना ओरडून सांगितले तर??? काय होईल??? धावपळ ?? आपल्याला उचलून आत नेतील??? पण काही लोकांना तरी ते दिसेलच की...????
वर जाऊन पाहावे का एकदा???
जिता पुन्हा वर गेली.. तर तिला दारातच रक्षकाने अडवले..
"ए... मला जाऊदेत.. क्लाएंट येणार आहेत मला भेटायला... "
रक्षक तुच्छपणे म्हणाला..
"ते माहीत आहे... वकील ना?? ... माहीत आहे वकील येणारेत हे... पण ते तुला रूम्समध्ये नेणार नाहीयेत...ते तुझ्याच बॉक्समध्ये येणार आहेत..."
खलास!
सर्व काही संपलेले आहे आता... जिताला जाणीव झाली...
वकील बॉक्समध्ये येणार याचा अर्थ आपण लेकमध्ये बसलेल्यांचे लक्ष ओरडाआरडा करून वेधून घेऊन शकतो हे त्या नालायक जीवनलाही ठाऊक आहे तर... प्लॅनिंग... सगळे प्लॅन झालेले आहे...
जिता धीर करून रक्षकाला म्हणाली...
" मला जी एम ना भेटायचंय..."
"जी एम आता तुला कधीच भेटणार नाहीयेत..."
भीतीची एक लहर जिताच्या सर्वांगावरून फिरली...
... मारणार आहेत की काय मला??? तो म्हातारा निघून गेल्यावर??? नक्कीच मारणार असतील..... का पण???
तिने काकुळतीला येऊन रक्षकाला विचारले..
"सुदेश... वुइ हॅव्ह बीन फ्रेन्ड्स ना?"
तो आधीपेक्षाही तुच्छपणे म्हणाला..
"तुझी चूक झाली आहे... जलमहालमध्ये चुकलेल्या स्टाफला मित्र नसतात... तो एकटाच असतो..."
"मला... मला फक्त एक ... एक सांगतोस का प्लीज??? अरे... अरे ते मला मारणार आहेत का रे???"
सुदेशने जिताच्या डोळ्यांना क्षणभर डोळे भिडवले... आणि तिच्याकडे पाठ करून दारावर आपले दोन्ही हात दाबून तिचा मार्ग बंद करून उभा राहिला...
भयाने थरथर कापत असलेल्या जिताने आपले दोन्ही हात आपल्या तोंडावर झाकले आणि दुसर्याच क्षणी ती आपल्या बॉक्सकड धावू लागली..
बरोबर.... दोन दिवस आपल्याला का दिलेले होते??? दोन्ही दिवस वकील का आला नव्हता??? आता समजले.. आपण त्याची माफी स्वतःहून मागणे अपेक्षित होते त्यांना.. जे आपण केले नाही... आता ते आपल्याला असेच वागवणार... किती क्षणार्धात फोन काढून घेतला... इन्टरकॉमचा सेट उचलला... वर जाणे बंद केले... कोणाला सांगू की मी इथे अडकलेली आहे???? हवे तर माझा उपभोग घ्या... काय वाट्टेल ते करा.. पण जिवंत ठेवा... का मारताय मला????? का?? काय चुकल माझे??? मी जे केले ते इतके चुकीचे होते??? त्या वकीलच्या पायावर डोके ठेवून माफी मागते म्हणाव... पण एक त्या वकीलला नाही म्हणाले म्हणून ....आणि तेही आयुष्यात पहिल्यांदाच असा प्रसंग आल्यावर पहिलीच चूक झाल्यावर इतकी मोठी शिक्षा????
जिताला घेरी येत होती... बेडवर कोसळली ती... आवरायला सांगितले आहे आपल्याला... आवरायला.. काय आवरू??? हे शरीर??? जे उद्या पहाटे तो नालायक म्हातारा निघून गेल्या गेल्या मरणार आहे???? किती वेळ उरलाय त्याला यायला??? पस्तीस मिनिटे... पस्तीस मिनिटांत काय आवरू मी??? आणि काय करू???
आत्महत्या??? आत्महत्या करावी का??? कशी पण??? पंख्याला ओढणी गळ्यात लावून लटकावं तर पंखा नाही आणि ओढणीही... इथे चोवीस तास बारा महिने जलमहालचा पोषाख... संध्याकाळी मासळी आणि एरवी नाईट गाऊन किंवा शर्ट पँट...
काय तो वकील आहे?? काय करणार तो?? त्याच्यासाठी अख्खं जलमहाल मला का मारतंय??? का मारायला उठलंय?? तो येईनासा झाला तर लक्षावधी रुपये देणारी काही गिर्हाईके येईनाशी होतील इतकेच ना? मग काय झालं??? काय झालं काय मग??? आणखीन नवी गिर्हाईके येतील... अरे मीच रोज दोनदोनशे कॉल्स घेते... कितीतरी शेकडो जणांना यायचंय इथे...
जिताने बाथरूममध्ये जाऊन शॉवर सुरू केला आणि कपड्यांसकट शॉवरखाली उभी राहिली... तिचे अश्रू त्या पाण्याबरोबर वाहात होते...
एक पोरगी??? एक साधी विशीची पोरगी हवी म्हणून हे??? हे सगळं एवढं??
जिताने स्वतःच्याच थोबाडात लगावून घेतल्या... भिंतीवर हात आणि लाथा आपटल्या... कोणाला मारतोय आपण हेही तिला कळेनासे झाले होते...
आयुष्यातील पहिलावहिला शरीरसंबंध बळजबरीने.. तीही एका म्हातार्याकडून होणार... आणि दिव्य म्हणजे त्यातून सुटल्या सुटल्या हे आयुष्यही सोडायचे...
किती वाजले??? सात चाळीस... श्शी... वीस मिनिटे... वीस मिनिटे जिवंत आहेस तू जिता.. पळ... वर्जा आणि त्या सुदेशला धक्का मार आणि लेककडे पळ... अश्शीच पळ... ओले कपडे असूदेत... नाहीतरी लेकमध्ये उडी घेतली की भिजणारच आहोत... शॉक??? शॉक घेता येईल का आपल्याला आपल्या या बॉक्समध्ये??? साले बटनेही ठेवत नाहीत.. सेन्ट्रलाईझ्ड एअर कंडिशनिंग आणि आपोआप मंद आणि प्रज्वलीत होणारे दिवे.. सगळे टायमिंगवर.. कैद... कैदेत होते मी आणि आज मला फाशी आहे... त्यापूर्वी अत्याचार आहेत..
पळ जिता.....पळ...
ओल्या कपड्यांमधून निथळणारे पाणी जमीनीवर सांडत सांडतच जिता बाथरूममधून धावत धावत बाहेर आली आणि बॉक्सच्या दरवाज्याचे हॅन्डल हाताने फिरवायला गेली तर....
... लॉक!
बाहेरून लॉक्ड!
संपले... शेवटची दहा बारा मिनिटे... दॅट्स इट...
अक्षरशः कोसळली ती बेडवर... तश्शीच... आता सर्दी झाली तरी किती टिकेल??? फार तर बारा पंधरा तास...
कसे मारणार असतील??? तरीच त्या खोलीत कुबट वास यायचा...
देवा... सुरा खुपसणार असतील...
... कसं वाटेल?? पोटात सुरा जाताना?? आई.. ओरडू शकू का आपण???
विस्फारलेल्या डोळ्यांनी डार्क निळ्या भिंतीकडे निर्हेतूकपणे बघत जिताने आपले हात आपल्या पोटावर दाबून धरले...
त्यांना म्हणाव पोटात नका खुपसू सुरा... झोपेच्या गोळ्या द्या... आनंदाने घेईन मी... झोपेत मरेन.. वेदना नकोत मला... प्लीज...
आवाज... आवाज आला.. लिफ्टचा... की पायर्यांवर कोणीतरी उतरून येतंय????...
कोपर्यात बस जिता... एका कोपर्यात बस... तितकाच त्यांना तुझ्यापर्यंत यायला अधिक वेळ लागेल... नंतर आहेच मृत्यूनाट्य...
दार... खड... क्लिक... उघडले... कोण?????? कोण आलंय???
भयाण कर्कश्श आवाजात जिता कोपर्यातूनच किंचाळली...
"कोण आहे?????? कोण आलंय??? नका येऊ..."
एक बूट! तोही निळा! ज...जीवन?????????? जीवन आला??? जीवन कसा काय आला?????
चेहरा... जीवनचा... हासरा... क्रौर्याची परिसीमा... असे काही करताना हासतोय म्हणजे क्रौर्याची परिसीमा...
"उठ गं... इकडे ये..."
ऑर्डर सोडली आपल्याला... उठायलाच हवं... मारणार आहेतच.. निदान छळ होऊ नये... उठायलाच हवं...
जिता उठली आणि जीवन आणखीन दोन पावले आत आला...म्हणाला...
"ते बघ.. दाराबाहेर...."
आपला मृत्यू दाराबाहेर आहे हे जिताला समजले... कशीबशी ती दाराबाहेर पाहायला पुढे झुकली...
सुदेश.... सिक्युरिटी... दणदणीत शरीराचा सुदेश दारात उभा होता...
आणि हे काय???
त्याने तर चक्क.... हे काय पाहतीय मी???
त्याने तर चक्क ... वकीललाच पकडलंय की....?????
वकीलला सुदेशने पकडलंय????
सुदेश वकीलला आत ढकलत आत आला...
वकील किंचाळला...
"आय विल किल यू गाईज..."
सुदेशची एक खणखणीत थप्पड वकीलच्या गालावर बसली आणि तो सुदेशच्या दुसर्या हाताच्या पकडीत अडकला म्हणून नाहीतर जवळपास कोसळलाच होता...
सुदेशने त्याला उचलून नीट उभे केले त्या क्षणी जीवननेही एक खाडकन दिली म्हातार्याला ठेवून...
... जिता ते दृष्य समजूच शकत नव्हती..
अचानक जीवन म्हणाला...
"जिता.. तूही दे एक ठेवून... हा वकील आपल्या या जलमहालचा खरा मालक आहे... सगळा रंगेलपणा करता यावा म्हणून रोज येतो इथे... आम्हालाही सहन झाले नाही... फारच वाढली होती याची खाज... आता यालाच इथे अडकवून टाकू... एकेक प्रकार मी उघड करणार आहे याचा... तूही दे एक सणसणीत ठेवून याला... "
रूल नंबर ४३ सी
कस्टमर इज एव्हरीथिंग..
बट बॉस इज नॉट...
खण्ण...
जिताचा पंजा अमानुष ताकदीने वकीलच्या गालफडावर बसला... पाचही बोटे उमटली... सुदेशने वकीलला आत ढकलले तसे जीवनने जिताला बाहेर घेतले...
जलमहालचा मालक जलमहालमध्येच बंदिस्त झाला होता..
पण जिताला हा सिक्वेन्स समजला नव्हता.. ती आश्चर्याच्या धक्क्याने जीवनकडे पाहात होती...
जीवन हासत हासत म्हणाला...
"म्हातारा सात वाजताच येऊन बसला होता... क्लोज सर्किटवर आम्ही तुझ्याशी कसे वागतोय आणि तुला काय शिक्षा देतोय ते सगळे ऐकत होता... माझे, निशाचे, आकांक्षाचे आणि सुदेशचे ठरलेले होते... आज म्हातार्याला अडकवायचाच... तो बेसावध झाल्या झाल्या त्याला धरला आणि तुझ्या बॉक्समध्ये टाकला..."
मोजून चाळिसाव्या मिनिटाला नवा कोरा मासळीचा पोषाख धारण करून ऑपरेटरच्या टेबलवर बसलेली जिता तिसर्याच कॉलला अॅन्सर देत होती...
"मिस्टर वकील??? नो?? ही डिडन्ट कम हिअर टूडे?? ओह येस.. ही कम्स एव्हरीडे.. बट टूडे ही हॅजन्ट सो फार"
==============================
-'बेफिकीर'!
आवडली, झकास आहे. भुक्कड चे
आवडली, झकास आहे.
भुक्कड चे काय झाले?
क्रमशः नाही ना ते पाहिले.
क्रमशः नाही ना ते पाहिले.
आता वाचते.
मस्त आहे .........धक्कादायक
मस्त आहे .........धक्कादायक वळण
भुक्कड बोंबलली काय???
भुक्कड बोंबलली काय???
खूप इंटरेस्टिंग!!! आवडलीच!!
खूप इंटरेस्टिंग!!!
आवडलीच!!
आवडली. छान आहे.
आवडली. छान आहे.
भुक्कड बोंबलली काय???
भुक्कड बोंबलली काय??? >>>>>>>> भुंगा, भुक्कड बोंबलला काय असे म्हण
हॉटेलची कल्पना
हॉटेलची कल्पना नावीन्यपूर्ण..
कथानक थरार आणणारे आहे.
शी.... फालतू. हीराइन ची वेळ
शी.... फालतू. हीराइन ची वेळ आली ......अन जीवन एकदम हीरो झाला की?
छान आहे. सुरवात वाचून
छान आहे.
सुरवात वाचून लहानपणी वाचलेल्या सुशींच्या कादंबर्या आठवल्या.
खुद्द वकील जिन्याने खाली
खुद्द वकील जिन्याने खाली आलेला पाहून सटपटत निशाने कॉल सोडला आणि ताडकन उभी राहिली. मान झुकवून तिने वकीलला अभिवादन केले. वकील थिजल्यासारखा काही क्षण तिच्याकडे बघत राहिला आणि निशाच्या कपाळावरच्या आठ्यांच्या जाळ्याची पर्वा न करता टेबलपाशी गेला.>>>>>>>> इथे घोळ घातलाय...
छान आहे
छान आहे
जमलीय! पण भुक्कड पण येऊ द्या
जमलीय!
पण भुक्कड पण येऊ द्या आता! खूप वाट पाहायला लावताय!
आवडली... एकदम वेगळीच वाटली
आवडली... एकदम वेगळीच वाटली
धक्का देणार शेवट, पण कथा
धक्का देणार शेवट, पण कथा अतिरंजीत वाटली.
भुक्कडलापण जलमहालात नोकरी
भुक्कडलापण जलमहालात नोकरी लागली. म्हणून तो नॉट रिचेबल आहे
आवडली कथा मस्तच....
आवडली कथा मस्तच....
वकीलच भुक्कड होता की काय?
वकीलच भुक्कड होता की काय?
खुद्द वकील जिन्याने खाली
खुद्द वकील जिन्याने खाली आलेला पाहून सटपटत निशाने कॉल सोडला आणि ताडकन उभी राहिली. मान झुकवून तिने वकीलला अभिवादन केले. वकील थिजल्यासारखा काही क्षण तिच्याकडे बघत राहिला आणि निशाच्या कपाळावरच्या आठ्यांच्या जाळ्याची पर्वा न करता टेबलपाशी गेला.>>>>>>>> इथे घोळ घातलाय... >>>>>>>> निशा ऐवजी जिता हवंय
छान गोष्ट .....शेवटी शेवटी
छान गोष्ट .....शेवटी शेवटी खरोखर भीती वाटली कि आता जीताचे काय होईल? ...
बेफिकीर जी भुक्कड चा पुढचा भाग येवून दे.. I shared the link with couple of my friends....now they too got adicted to u r story....आता मला ऐकून घ्यावे लागते कि कुठे गेला भुक्कड..
आवडेश!
आवडेश!
झकास!!
झकास!!
>>>>>>>जास्तीतजास्त सहाव्या
>>>>>>>जास्तीतजास्त सहाव्या मिनिटाला माश्याचा पेहराव असलेला एक स्टाफ पोहत पोहत आपल्या एका हाताने डिश धरत व एका हाताने पाणी कापत तिथे यायचा आणि होडीला धरून स्थिर होत लिकर सर्व्ह करायचा.<<<<<< हा हा हा हा..............
मस्तच होती.. फटक्यात वाचून
मस्तच होती.. फटक्यात वाचून काढली.. स्वताच्या कल्पनेने जलमहाल कसा असेल आणि त्या हिरोईनी किती सुंदर दिसत असतील हे रंगवायला जाम मजा आली..
व्वा मस्त रंगवल्ये कथा
व्वा मस्त रंगवल्ये कथा
जामोप्या: :D =D
जामोप्या:
=D
स्टोरी में
स्टोरी में ट्वीस्ट.....आवडलाच!
बेफिकिर...... कालजात धस्सच
बेफिकिर...... कालजात धस्सच झाल.... जब्राट लिहिलेय बघा ........ इतके twist बाबारे ......
खर तर कल्पना शक्तिच्या बाहेरचेच ...... हॉटेल बद्दलचि कल्पना अवदलि .. छान
sahi aahe.
sahi aahe.
नेहमीप्रमाणेच सुरेख रंगवली
नेहमीप्रमाणेच सुरेख रंगवली आहे कथा.. आवडली.
Pages