श्री महालक्ष्मी उत्सव, केळशी, २०१२: सचित्र वृत्तांत

Submitted by मंदार-जोशी on 12 April, 2012 - 16:38

लहानपणापासून कोकणात जातो आहे—चिपळूण, दापोली, आडे, पाडले, आंजर्ले, आणि आमचं केळशी. शाळेत असताना वार्षिक परीक्षा संपली की जे पळायचं कोकणात ते थेट जूनच्या पहिल्या आठवड्यात परतायचं हा आमचा उन्हाळ्याच्या सुट्टीतला ठरलेला कार्यक्रम. त्यात मुक्काम आणि म्हणूनच जास्त वेळ घालवला आहे तो अर्थातच केळशीला. कालांतराने फार राहणं जमत नसलं तरी कोकणाबद्दल आणि विशेषत: केळशीबद्दल प्रचंड प्रेम, आकर्षण, आणि जिव्हाळा आहे तो तसूभरही कमी झालेला नाही.

केळशीला घर आणि थोडीफार आंब्याची कलमे, वाडी वगैरे असल्याने अधुनमधून जाणं हे होतंच. पण गेली पाच-सहा वर्ष चुकल्या चुकल्यासारखं वाटत होतं ते महालक्ष्मीच्या यात्रेला जायला जमलं नव्हतं म्हणून. मी तसा फार देव-देव करणार्‍यातला नाही, पण धार्मिक म्हणता येईल इतपत नक्की आहे. त्यामुळे वर्षातून दोन उत्सव जवळ आले की साधारणपणे महिनाभर आधी मनात थोडं अस्वस्थ वाटू लागतं. दर गणेशोत्सवाच्या आधी आणि केळशीच्या महालक्ष्मीच्या यात्रे आधी साधारण महिनाभर मनात विचारांची गर्दी सुरू होते. काय करता येईल, कसं करता येईल, सगळं व्यवस्थित होईल ना, एक ना दोन! अनेक अडचणींमुळे अनेक वर्ष जाणं होत नव्हतं. या वर्षी मात्र निर्धार केला आणि कालनिर्णय मधे उत्सवाची तारीख बघून फेब्रुवारीमधेच ऑफिसात रजेचा अर्ज टाकून मागे लागून लागून मंजूर करुन घेतला.

इकडे फेसबुकवरच्या आमच्या केळशीच्या ग्रूपमधे केळशीतल्याच वैभव वर्तकने तयारीचे, रामनवमीचे फोटो टाकून टाकून आम्हा शहरी केळशीकरांच्या मनातली "कधी एकदा केळशीला पोहोचतो" ही भावना करता येईल तितकी तीव्र करण्यात आपला हातभार लावला होताच.

त्यामुळे केळशीला पोहोचल्या पोहोचल्या जेवण आणि वामकुक्षी उरकून आधी धाव घेतली ती देवळात.
देवळाकडे जाताना प्रथम दृष्टीस पडला तो दिमाखात फडफडणारा भगवा.

आत महिला मंडळाचं भजन इत्यादी कार्यक्रम चालू होते. जोडीलाच सजावट, हनुमान जयंतीच्या दिवशीच्या स्वयंपाकाची, आणि मांडवाची इतर कामे सुरू असलेली दिसली.

KY2012_003_0404_UL.jpg

काही वेळ परिचितांशी गप्पा आणि काही विषयांवर चर्चा करुन घरी परतलो. रात्री कीर्तन असते ते साधारण दोन ते पाच या वेळात.
एरवी कुणाचं "प्रवचन" ऐकलं की दिवसाढवळ्या झोप येते, पण महालक्ष्मीच्या देवळात कीर्तन म्हटलं की मी टक्क जागा! अगदी लहानपणापासून कीर्तन सुरू असताना मला कधीही झोप आल्याचं आठवत नाही!!

कीर्तनाला जायचं म्हणजे नुसतंच जाऊन बसायचं असं कधीही होत नाही. आणि मुख्य म्हणजे आपण स्वतः गेल्याशिवाय "तुला अमुक काम करायचे आहे" असं कुणीही सांगत नाही. आपण कधीही गेलो तरी दिसेल त्या कामात हातभार लावायला सुरवात करायची - मग पुढे काय अपेक्षित आहे ते आई अंबाबाईच्या कृपेने कळतंच. मांडवात दिवे लावायला मदत करणे आणि इतर पडेल ती कामं करायला मदत करणे हे असतंच. यावर्षी एका हातात/कडेवर चिरंजीव होते तरी दुसर्‍या हाताने मी एकाला स्टूल(घोडा) हलवायला मदत करत होतोच. देवीच्या सेवेत आपोआप हात रुजू होतात.

कीर्तनाला जमलेला महिलावर्ग:

सजवलेली रथपुतळी:

कीर्तनापूर्वी सुरू असलेली तयारी:

KY2012_017_0405_UL.jpg

गोंधळींचे आगमन:

गोंधळ:

कीर्तनकार: रत्नागिरीचे श्री. नाना जोशी

देवळाबाहेरचे दृश्य:

त्या दिवशी घरी परत आल्यावर देवळात वाहायला निवडलेले एक पुष्प:

चैत्र पौर्णिमेच्या आदल्या दिवशी सकाळी साधारण अकरा वाजता रिकामा रथ रथागारातून देवळात नेण्याचा कार्यक्रम असतो. अर्थात हे म्हणजे फक्त उचलून नेऊन ठेवणे हे नाही. गावातल्या विविध आळ्या यांच्यात गट पडतात आणि मग खेचाखेची करत प्रचंड धमाल करत कुठल्याही बाजूने रथ खाली टेकू न देता देवळापर्यंत नेणे हा एक खडतर पण त्याच वेळी अत्यंत मजेशीर कार्यक्रम पार पडतो. बर्‍याच वर्षांनी जातो आहे यात्रेला, त्यामुळे रथाखाली लगेच जायचं नाही असं ठरवलं होतं, पण "सर्वा मुखी जगदंबेचा उदोssss" अशा लांबूनच सामूहिक आरोळ्या ऐकू आल्या आणि मला एकदम चेव आला. आमचे साठीच्या पलिकडे पोहोचलेल्या तीर्थरूपांच्या चेहर्‍यावरील आवेशयुक्त भाव वेळीच ओळखून "तुम्ही माझे पाकीट आणि मोबाईल सांभाळा, मी जातो पुढे" असं सांगून रथाला खांदा लावायला धावलो. रथाला खांदा लावण्यामागे काय झिंग असते ती नुसतं सांगून कळणार नाही. त्यासाठी जन्माने केळशीकर असायला हवं. तरच ती झिंग अनुभवता येते आणि दुसर्‍या कुठल्याही गोष्टीशी, अनुभवाची त्याची तूलना होऊ शकत नाही.


(वरील तीन छायाचित्र - सौजन्य: अमोल केळकर)

यात केलेले विनोद, थट्टा, आणि टिप्पण्या ऐकण्यासारख्या असतात.

"अरे टेकू देऊ नका, उचल रे ए ए"

"अरे सिस्टिम एरर देती रे"

कुणाला बाजूच्या घरात पाणी पिताना आणी उसासे टाकताना पाहून कुणी ओरडतो "अरे बायको आलीये बघायला म्हणुन उगाच हा हू करु नको दोन मिनिटं रथाला लागल्यावर, चल पळ लाव खांदा लवकर". हास्याच्या धबधब्यात न्हाऊन निघालेला तो मग पुन्हा ताजातवाना होऊन खेचाखेचीला सज्ज होतो.

खेचाखेची ज्या पद्धतीने चाललेली असते त्याबद्दल कुणी नाराज होतो, मधेच तावातावाने भांडणाचा पवित्रा घेतो, डेसिबल प्रचंड वाढवत ओरडतो. अननुभवी असलेले चमकून बघतात पण मग अचानक मधेच त्याच्या चेहर्‍यावर हसू उमटतं आणि "सर्वा मुखी जगदंबेचा उदोssss" असा गजर होतो आणि रागावलेला आणि रागवून घेतलेले दोन्ही मंडळी नव्या जोमाने रथ उचलतात.

नव्याने डांबरीकरण केलेल्या रस्त्यावरुन खेचाखेची करताना प्रचंड हाल होतात. नुसता मातीचा कच्चा रस्ता फार तापत नाही. त्यामुळे पाय भयानक भाजून निघाले. मंडळी दमली ती यामुळे. नाही तर देवी आईच्या रथाच्या वजनाचे कष्ट ते काय?

अशा रीतीने खेचाखेची करत रथ देवळासमोर ठेवला की असा जल्लोष व्यक्त केला जातो.

रथ ठेवल्याठेवल्या मंडळी पळतात ती गावजेवणाची तयारी पूर्ण करुन वाढायच्या तयारीला लागायला:

जेवण सुरू असताना:

KY2012_027G_0405_UL.jpg

गावजेवण संपलं की मंडळी दुपारी उशीरा घरी परततात आणि दुसर्‍या दिवशीच्या पहाटे कीर्तन आटपल्यावर मग गावातून रथ फिरायला सुरवात होते. आधी वर्णन केल्याप्रमाणे रथ हा उचलून न्यायचा असतो. वेगवेळ्या ज्ञातींना हा मान मिळतो.

रथ उचलल्यावर:

ही आमची उभागर आळी:

कागदोपत्री हे नाव असलं तरी ह्या आळीला टिळक आळी असेही म्हणतात, कारण या आळीतल्या आमच्या या घराला लोकमान्य कधीकाळी भेट देऊन गेले होते.

रथाच्या प्रतीक्षेत:

KY2012_032_0406_Rath_UL.jpg

रथावर पूजेसाठी चढताना अस्मादिकः

रथपुतळीची पूजा करताना:

रथावरुन उतरताना:
KY2012_037_0406_Rath_UL.jpg

यावर्षीचे भालदार चोपदार:

रथावरील सजावट, इत्यादी:

गावातून रथ फिरवून झाल्यावर अर्थातच तो आणला जातो पुन्हा देवळात:

पण त्या आधी देवी (रथपुतळी) "सोडवून" ती देवळात पुन्हा नेली जाते:

मग रथावर चढतो तो उठबर्‍या. इतका वेळ देवीचा वास असल्याने 'हलका' असलेला रथ, देवी जाताच 'जड' होतो. कारण देवी जाताच रथावर असंख्य भुतंखेतं आणि दुष्ट शक्तींचा प्रादुर्भाव होतो असे म्हणतात.

देवीच्या सेवेत रुजू असलेली सुरक्षाव्यवस्था:

काही मिनिटांच्या अंतराने होत असलेले सूर्यास्त आणि चंद्रोदय:

रथाच्या प्रतीक्षेत देवळाभोवताली जमलेली मंडळी:
KY2012_063_0406_Rath_UL.jpg

रथ आला:

रथ ठेवताना:

रथावरची सजावट काढली जात असताना:

दुसर्‍या दिवशी पहाटे लळित असते. यावेळी बुवा म्हणाले "लळित म्हणतात ते चुकीचे आहे. आज वर्षाचा नवीन दिवस. त्यामुळे सुंदर दिवस. जे जे सुंदर ते ललित. त्यामुळे यास ललित असे म्हटले पाहीजे" (हे ऐकून माझ्या पोटात गोळा आला. इथेही ललित?). म्हटलं असते एकेकाची पद्धत!

सगळ्या दिवशी कीर्तनात सहभाग असलेले तबलजी आणि पेटीवाले:

अशा रीतीने या वर्षीचा श्री महालक्ष्मीचा उत्सव अत्यंत उत्तमरित्या पार पडला!

दरवेळी यात्रेला जाऊन आलं की सुरवातीचे दोन-तीन दिवस ऑफिसच्या कामावर लक्ष केंद्रित करणं जरा कठीण जातं. आता उत्सव संपून जवळजवळ आठवडा होत आला आहे आणि ऑफिस आणि घर हा रोजच्या रामरगाडा एव्हाना पुन्हा सवयीचा झालाय. खेचाखेची करुन झाल्यावर दिवसभर "आम्ही दुखतो आहोत" असं वारंवार जाणीव करुन देणारे खांदे आता दुखत नाहीत, पाठ उत्तम आहे, कंबरेनेही तक्रार केलेली नाही. मात्र खेचाखेची करताना पायाला पडलेले वितळलेल्या डांबराचे आता थोडे विरळ झालेले डाग पाहून आजही बाहू फुरफुरतात, आणि सर्वा मुखी जगदंबेचा उदोssss असं मनातल्या मनात म्हणत कामाच्या रथाला मी स्वत:ला जुंपतो.

----------------------------------------------------------------------
एक केळशीकर श्री. सतीश वर्तक यांनी काढलेले देवळाचे रेखाचित्रः

----------------------------------------------------------------------

गावाकडची काही इतर प्रकाशचित्रे:

कोकणचा मेवा:

आम्ही जायच्या आदल्या दिवशी आमच्या तिथल्या काळजीवाहू कर्मचार्‍याने (caretaker) पाळलेल्या गुरांपैकी एक गाय व्यायली. तिचे हे गोजिरवाणे वासरू:

एरवी आपल्याला फोटो काढायचा असला की प्राणी लहरीपणा हमखास करतात.....पण गुरे कोकणातली असल्यामुळे......

........त्यांनी ही अशी सुंदर 'पोझ' दिली!!

माळ्याचा मळ्यामंदी, पाटाचं पाणी जातं.....:

~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~

केळशी गाव व श्री महालक्ष्मीच्या यात्रेविषयी असलेला अन्य एका लेख इथे वाचायला मिळेल.

संपूर्ण पिकासा अल्बम पहायला पुढील चित्रावर टिचकी मारा:

~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~
ब्लॉगवर पूर्वप्रकाशित.
~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~

गुलमोहर: 

मंद्या... ! तुझा गावं त्याहीपेक्षा कोकणात अजुनही परंपरा टिकुन आहेत हे खुप समाधान वाटलं! Happy
उत्सवाच्या तयारीपासुनचे फोटो मस्त आहेत. उत्सवात सहभागी झालेले परंपरागत वेषातील गावकरी, किर्तनकार, भालदार, चोपदार सगळेच समरसतेने हे देवीचं कार्य पुर्ण करतांना दिसत आहेत. उगाच उरकायचं म्हणुन उरकलं असा कुणाच्याच चेहर्‍यावर भाव नाही. हे बघुनही खुप बरं वाटलं!

शहरातल्या बाजारु उत्सवांपेक्षा खरच सुंदर उत्सव. पुढच्या वर्षी केळशीच्या यात्रेला गगोकरांची वर्णी लागो ही अपेक्षा! Happy

खुपच सुंदर मंदारदा...खुप आवडल..
तु अथ पासुन इथ पर्यंत घेतलेल्या फोटोच खुप कौतुक आहे..विशेषतः मंडप बांधणारी लोक्,,जेवण बनवणारी,तबलजी इ. Happy
पण तु कुठल काम केलस(फोटो व्यतिरिक्त) ???? Wink

खुपच सुंदर मंदारदा...खुप आवडल..
तु अथ पासुन इथ पर्यंत घेतलेल्या फोटोच खुप कौतुक आहे..विशेषतः मंडप बांधणारी लोक्,,जेवण बनवणारी,तबलजी इ.
पण तु कुठल काम केलस(फोटो व्यतिरिक्त) ????
>>>>
मेरा भी सेम कॉपी पेस्ट.......

अनु आणि प्रिया, यंदा मुलांची जबाबदारी होती म्हणून काम फारसे जमले नाही करायला. काय केलं थोडंसं ते वर लिहीलं आहेच. आणि एक सांगू का? मी खूप काम केलं असतं तरी इथे सांगितलं नसतंच. देवीच्या सेवेत केलेल्या कामाची जाहीरात नाहीच!

मंदार
अगदी उत्सवालाच उपस्थित असल्यासारखं वाटलं. वर्णन आणि प्रचि.....दोन्ही मस्तच!
आमच्य कशेळीच्या कनकादित्याच्या उत्सवाला दर वर्षी जायचं म्हणते पण काय होतं......कामासाठी आधीच जाऊन आलेलो असतो.मग परत होत नाही. पण कधी तरी नक्की जमवणार!
काय भारलेलं वातावरण असतं ना!

मंदारदा श्री महालक्ष्मीचा उत्सवाची अतिशय सुंदर सहल घडवून आणलीत आम्हा सगळ्यांना. मला वाटत मी आधी सुधा एकदा केळशी गाव आणि तिथे साजरा होणारा हा उत्सव ह्याचा वृतांत वाचला होता. तेव्हा सुधा तो धागा माझ्या निवडक दहात होता आणि आज सुधा हा धागा माझ्या निवडक दहात आहे.
केळशी हे गाव नक्की सुंदर असणार. स्थानिक लोकांनी किती साधेपणाने त्यांच्या परंपरा जपल्या आहेत. तुम्ही भाग्यवान अशा सुंदर गावाबरोबर तुमचे नाते जोडले गेले आहे.
नवीन वासराचा आणि गुरांचे प्रची सुधा मस्त आहेत.

अतिशय छान माहिती आणि फोटो दिलेस मंदार

वाचताना जणू काही आपण तिथेच आहोत अस वाटत होत

रोजच्या रहाटगाडग्यातून असे क्षण अनुभवायला मिळणं खरच भाग्याच आहे

मंदार,
केळशी यात्रेचा सचित्र वृत्तांत..फार आवडला !!
गावाकडे गेलं कि आपली पावले पुन्हा इकडे परतायला बघत नाहीत ..!

अप्रतिम! उत्सव, मग तो कोठलाही असुदे, सुंदरच. खूप दिवसांनी पायपेटी पाहिली.

एरवी आपल्याला फोटो काढायचा असला की प्राणी लहरीपणा हमखास करतात.....पण गुरे कोकणातली असल्यामुळे......(असुनही! म्हणायचं आहे का?)

फोटो मस्तच!!!!!!!!!!!!!!!!!!!

Pages