एका स्कूल सायकॉलॉजिस्टची डायरी (शाळेची डायरी) : ३

Submitted by मितान on 8 April, 2012 - 09:15

(या लेखात आणि यापुढेही ज्या केसेस् लिहीत आहे त्यातली नावे बदलली आहेत. त्यांच्या खाजगीपणाचा पूर्ण आदर राखण्यासाठी आवश्यक ते संदर्भही बदललेले आहेत. समस्या सारख्या किंवा अनुभवाच्या वाटल्या तरी त्यावरील उपाय मात्र व्यक्ती, वय, समाजिक, सांस्कृतिक स्तर, परिस्थिती यानुसार वेगवेगळे असू शकतात.)

विभागाची रचना छान झाली आहे. शाळेच्याच एका इमारतीतला एक कोपरा मिळालाय.स्वतंत्र समूपदेशन कक्ष ! एक टेबल, तीन खुर्च्या, एक बंद कपाट आणि अशीच अडगळीला आणून टाकलेले दोन डेस्कटॉप्स !! ( बंद तर बंद ! आमच्या हापिसात संगणक बघून बघणारे इंप्रेस होणारच की हो ! Wink ) इंटर्नी म्हणून काम करत होते तेव्हाचे दिवस आठवले.इन्स्टिट्यूटकडून पत्र घ्यायचं.कोणत्याही शाळेत जायचं, त्यांना काम करू देण्याची ( अर्थात फुकट ! ) विनंती करायची. मग ते विनंतीला मान देऊन काम तुम्हीच शोधा म्हणणार. मग काम ( व्यक्तिगत समस्या किंवा गटसत्र ) ठरले की जागेचा प्रश्न यायचा. मग कधी रसायनशास्त्राची प्रयोगशाळा, कधी चित्रकला वर्ग कधी स्टाफरूमचा कोपरा कधी एखादा रिकामा वर्ग, कधी मैदानावरच्या झाडाखाली तर कधी व्हरांड्यात सत्र घ्यायचो आम्ही सगळे. अर्थात गटसत्र घेताना फार अडचण यायची नाही पण व्यक्तिगत सत्राला मात्र स्वतःची नि सल्लार्थीची एकाग्रता अक्षरशः दोरखंडांनी बांधून ठेवावी लागायची. त्यामानाने आता एवढ्या सुविधा म्हणजे अहाहा !

माझ्यासोबत अजून दोन समूपदेशक आहेत. टीम म्हणून काम करताना मजा येतेय.

पाच वर्षात किती बदलल्यात गोष्टी ! पूर्वी आणि आता असे दोन रकानेच करायला हवेत असं वाटतंय.
पूर्वी पालक आमच्याकडे यायला तयारच नसायचे. मानसतज्ञ म्हणजे वेड्यांबरोबर काम करणारे ही धारणा खूप खोलवर रुजलेली आहे. तिची तीव्रता आता खूप कमी जाणवते. पालक स्वतः मुलांच्या अडचणी घेऊन येतात.
६वर्षांपूर्वी हाताळलेली एक केस आठवली -

एक आई आपल्या ८ वर्षाच्या मुलाला घेऊन आली. कॅम्पातल्या एका चांगल्या शाळेत शिकणारा अवि अभ्यासात मागे पडत होता. एकाग्रता कमी आहे. आळस आहे अशा तक्रारी पालक सांगत होते. अवि मजेत असल्यासारखा खोलीतली चित्र बघत होता. नजर भिरभिरत होती. हाताच्या अस्वस्थ हालचाली चालू होत्या. आई अखंड तक्रारी सांगत होती. थोड्या वेळाने मी अविशी एकट्याशी बोलले. शहाण्या मुलासारखी पूर्ण वाक्यात उत्तरे देत होता. अर्धा तास गप्पा झाल्यावरही मला नेमकी समस्या कळली नाही. नवशिकी असल्याने थोडी खट्टू झाले.

आपण आता काउन्सेलर, मग समोरच्या व्यक्तीचं मन आपल्याला लगेच कळलं पाहिजे असं वाटायचं तेव्हा. खरं तर समोरच्या व्यक्तिला विश्वास वाटणं, सुरक्षित वाटणं यासाठी लागणारा वेळ द्यावाच लागतो. तो काहीजणांसाठी एक सत्र म्हणजे ४५ मिनिटांचा असतो तर काही लोक ३-४ सत्र तुमचीच परीक्षा घेत असतात. मग मन मोकळं करतात. मुलं तर या बाबतीत जास्त चिकित्सक असतात. त्यांना तुमच्याबद्दल कशामुळे विश्वास वाटेल याचे लॉजिक तुम्ही कधीच मांडू शकत नाही...

तर अवि. अविला मी दोन दिवसांनी पुन्हा बोलवले. अखेर त्याच्या परीक्षेत मी पास झाले नि तो घडाघडा बोलायला लागला. त्यातून समजलेली माहिती धक्कादायक ( तेव्हातरी ! ) होती. त्याच्या आईबाबांचे आंतरजातीय लग्न होते. त्यामुळे सगळे नातेवाईक तुटलेले. स्वता:ला सिद्ध करण्याच्या नादात वडील पैशाच्या मागे लागलेले. आई कमी शिकलेली म्हणून आर्थिक रित्या नवर्‍यावर विसंबून. एकामागे एक झालेली ही दोन मुलं. मुलांना बाबा आठवड्यातून एखादेवेळी भेटायचे.महागडी खेळणी, बाहेर खाणं असे लाड (?) करायचे. घरात भरपूर पैसा खेळत होता. पण हळूहळू व्यसनंही खेळू लागली. भांडणं वाढली. मारहाण सुरू झाली. त्याचा राग मुलांवर काढला जाऊ लागला. अवीला त्याच्या धाकट्या बहिणीबद्दल खूप माया. आई तिला मारायला लागली की हा आईला मारायला लागला. हिशोब चुकता करण्याच्या नादात बाबा अवीचं समर्थन करू लागले. मग काय.. मुलांना २-२ तास बाथरूम मध्ये कोंडणं, स्वयंपाक न करणं, बाबांनी घरीच न येणं, आले तरी बायकोला मारहाण करणं सुरू झालं. या सगळ्याचा परिणाम म्हणून अविला घरात प्रचंड असुरक्षित वाटू लागले. बाबा मारतात ते बरोबर असेल तर मी मारतो ते चूक का ? असा प्रश्न त्याला पडला.

मार खाऊन अवि एवढा कोडगा बनला की शाळेतल्या शिक्षांचे त्याला काहीच वाटेनासे झाले. मग एक दिवस अवि दिवसभर आणि अर्धी रात्र होईपर्यंत घरी आलाच नाही.

मग जाग येऊन आई त्याला आमच्याकडे घेऊन आली.

या केस मध्ये पहिल्यांदा त्याला होणार्‍या शारीरिक शिक्षा बंद करण्याची गरज होती. मग आईवडिलांच्या नात्यातल्या समस्यांचा मुलांवर होणारा परिणाम त्यांना सकारण पटवून देणे. त्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न करणे. अविच्या मनातली असुरक्षितता कमी करण्यासाठी पूर्ण कुटुंबाने काम करणे, त्यासाठी वेळ देणे, आई-अवि, बाबा-अवि, आई-बाबा-अवि, आणि चौघे एकत्र करण्याच्या काही गोष्टींची एक यादी तयार केली.तो त्यांचा गृहपाठ होता.शिवाय त्याच्या शाळेत देण्यासाठी एक रिपोर्ट, शिक्षकांकडून हवी असणारी मदत असा एक पेपर तयार केला.

प्रत्यक्षात वेगळंच झालं. बाबा मला भेटायला यायलाच तयार नाहीत असे अवि म्हणाला. आईची वाटेल ते करण्याची तयारी असली तरी एकटीने काम करून होणार नव्हतेच.
मला खूप असहाय वाटले. समस्या काय आहे ते नेमकेपणाने समजले होते. उपाय स्पष्ट होते. पण बाबा ते स्वीकारायला आणि त्यात मदत करायला तयार नव्हते. शेवटी बाबांचा असहकार ध्यानात घेऊन जमतील त्या गोष्टी करूया असे अविच्या आईने ठरवले आणि त्या डोळे पुसत गेल्या ! इथे एक धडा शिकले. आपल्या कामाला मर्यादा आहेत. त्या स्वीकारायच्या.

त्यामानाने आता विभागात येणारे पालक बरेच सहकार्य करतात. चुका असतिल तर सुधरवण्याचा प्रयत्न करतात. अगदी शहराच्या वेगवेगळ्या भागातल्या शाळांमधून आता केसेस यायला लागल्या आहेत. हा बदल खरंच आशादायक आहे.

काही वेळा मात्र गंमत वाटते. मुलांच्या अती काळजीपोटी येणारे पालकही बरेच असतात. ४ वर्षाच्या मुलाला अंथरुणात शू होणं हा एका आईला फार गंभीर प्रकार वाटला होता. मुलगा एका जागी बसून अभ्यास करत नाही ही तक्रार ८०% पालक करतात. मुलगी ऐकत नाही, वाद घालते, डबा खात नाही, मुलगा सतत टीव्ही बघतो, घरी सगळे येते पण परीक्षेत लिहिता येत नाही, खोटं बोलतो, अमुक एक विषयात गतीच नाही, खूप हुशार आहे पण मार्क्स पडत नाहीत अशा तक्रारी घेऊन पालक येतात.यात खरी समस्या असणारी मुलं फारतर ५ % असतात.

आधी मनात हसू यायचं. पण अनुभवाने ( प्रत्यक्ष आई म्हणून सुद्धा ) कळलं. समस्या कितीही छोटी असली तरी ती खूप प्रामाणिक असते. मी त्या प्रामाणिकपणाचा आदर करायला शिकले. त्या किरकोळ वाटणार्‍या समस्येचे निराकरण लवकर झाले नाही तर पालक म्हणून ताण वाढत जातो. खरं म्हणजे प्रत्येक शाळेने पालकांचे प्रशिक्षण वर्ग घेतले पाहिजेत. त्यात मुलांच्या वाढीचे टप्पे, त्या त्या टप्प्यावर होणारे शारीरिक, भावनिक, सामाजिक, बौद्धिक-भावनिक बदल, कोणत्या टप्प्यावर कोणत्या प्रकारच्या अपेक्षा कराव्या, मुलांच्या पाल्कांकडून काय अपेक्षा असतात या विषयांची माहिती दिली पाहिजे. ही माहिती असलेले पालक खूप कमी असतात कारण आपल्याला हे माहीत असायला हवं हेच त्यांना माहीत नसतं. आणि अजून एक म्हणजे माहिती नसणं हा गुन्हा नाही हे पण मान्य करावं. मग पटकन मदत मागता येते. बदलता येतं.
सहकार्‍यांसोबत होणार्‍या चर्चेत असे विषय अनेकदा येतात तेव्हा पालक प्रशिक्षण हा शालेय व्यवस्थेचा भाग झाला पाहिजे ही निकड जाणवते.

अशा केसेस मध्ये पालकांना माहिती देणं, त्यांच्या शंकांना उत्तरं देणं एवढं केलं की कोडं सुटतं. प्रत्येक केस काही सहा सहा महिने चालत नाही. अगदी किरकोळ गोष्ट न कळल्यामुळे मोठी समस्या उभी राहते.

एक उदा: सांगते.
शिशुवर्गात असणारी नीतू सुरुवातीला खूप आनंदात शाळेत जायची. अचानक एक दिवस शाळेत जायचं नाही म्हणून रडायला लागली. असे आठ दिवस झाले, एक महिना झाला तरी रडणे चालूच. शाळा म्हटलं की खूप गप्पा मारणार पण प्रत्यक्ष जायची वेळ आली की भ्यां.....

आई हवालदिल ! बाबा परदेशात. आई समोर बसून रडायलाच लागली !!! प्रत्यक्ष नितूशी बोलताना लक्षात आले की तिचा डबा रोज एक मुलगा खायचा ! आणि ३० मुलांच्या गोंधळात ताईंच्या हे लक्षात आले नव्हते. त्या मुलाला नीतूच्या डब्यावर असलेले चित्र फार आवडायचे म्हणून तो डबा घ्यायचा. स्वतःचा डबा तिला द्यायचा ! पण त्याचा स्टीलचा डबा हिला अज्जिबात आवडायचा नाही !!!! हे समजल्यावर आई, वर्गताई आणि मी कपाळाला हातच लावला ! आता तो मुलगाही रंगीत डबा आणतो. आणि सगळी मुलं आपापला डबा खातायत ना हे नवशिक्या वर्गताई न चुकता तपासतात.... Happy

गुलमोहर: 

विलक्षण अनुभव.
आम्हाला वाचताना जाणवत नाही, पण त्या काळात पालक, ती मुले आणि समुपदेशक पण
खुप तणावातून गेले असतील.

खूप छान लिहिलयं.

खरं म्हणजे प्रत्येक शाळेने पालकांचे प्रशिक्षण वर्ग घेतले पाहिजेत. त्यात मुलांच्या वाढीचे टप्पे, त्या त्या टप्प्यावर होणारे शारीरिक, भावनिक, सामाजिक, बौद्धिक-भावनिक बदल, कोणत्या टप्प्यावर कोणत्या प्रकारच्या अपेक्षा कराव्या, मुलांच्या पाल्कांकडून काय अपेक्षा असतात या विषयांची माहिती दिली पाहिजे. ही माहिती असलेले पालक खूप कमी असतात कारण आपल्याला हे माहीत असायला हवं हेच त्यांना माहीत नसतं. +१
मितान याबाबत माबोवर लेखमालिका सूरु कर ना प्लीज! खुप उपयोग होईल सर्वांनाच.

उत्तम...... सर्वप्रथम तुम्ही लेखमाला सुरू ठेवल्याबद्दल धन्यवाद.
इथल्या अनुभवाने काही तरी बदल घडेल अशी अपेक्षा ठेवूयात....... Happy
पुलेशु

मितान !! किती नेमकं ! खूप अवघड तितकंच नाजूक आहे काम तुमचं, हे अगदी जाणवतंय ! सलाम तुम्हाला ! अजून खूप लेख येउदेत या विषयावर Happy

सर्वांना धन्यवाद Happy

स्वाती२, आधी तशीच लेखमाला सुरू करणार होते पण ती थोडी अ‍ॅकॅडमिक होईल असं वाटलं म्हणून डायरी.... तू म्हणतेस ते लिहायचंय पण अजून फॉर्म सापडला नाहीये.

खरं म्हणजे प्रत्येक शाळेने पालकांचे प्रशिक्षण वर्ग घेतले पाहिजेत. त्यात मुलांच्या वाढीचे टप्पे, त्या त्या टप्प्यावर होणारे शारीरिक, भावनिक, सामाजिक, बौद्धिक-भावनिक बदल, कोणत्या टप्प्यावर कोणत्या प्रकारच्या अपेक्षा कराव्या, मुलांच्या पाल्कांकडून काय अपेक्षा असतात या विषयांची माहिती दिली पाहिजे. ही माहिती असलेले पालक खूप कमी असतात कारण आपल्याला हे माहीत असायला हवं हेच त्यांना माहीत नसतं. >>>

१००% अनुमोदन !

माझ्या धाकट्या मुलीसाठी (वय ५ वर्षे) आम्हाला शाळेत बोलावले तेव्हा खूप आश्चर्य वाटल होत. दुसरं मूल असल्यामुळे मी स्वतःला अनुभवी समजत होते. पण प्रत्येक मुलाची बौध्दिक, भावनिक गरज वेगळी असते हे शाळेतील समुपदेशनानंतरच लक्षात आले आणि मी शहाणी झाले.

हल्ली early stage ला अशा गोष्टी होत आहेत हीच खूप दिलासा देणारी बाब आहे.

मितान,
मस्त लिहिते आहेस. पालकांसाठी काही वाचुन शिकण्या सारखं असलं तर सांग आ. किंवा तुच लिहि.. Happy

मस्त लेख...

त्या नीतु वरुन माझीच मजा आठवली.

आम्ही मी ५ वर्षांची असताना दुसर्‍या शहरात रहायला आलो. माझी माँटेसरी बदलली. नव्या बाई आवडल्या होत्या, पण त्या ज्या मावशी होत्या त्या आवडत न्हवत्या. कारण त्यांच्या अंगाला विचित्र वास यायचा. आम्ही डबा खायला बसलो, की त्या सगळ्यांच्या डब्यावर देखरेख करायच्या. माझ्या पोळीचे तुकडे करुन द्यायच्या. त्यांचा हात पोळीला लागला की मी डबा खात नसे. घरी चिड्चिड करत असे.

आईने खुप शोध घेतला, की डबा न खाण्याचे कारण काय. मग मी एकदा हळुच तिला सांगीतलं. तिने मग मला तुकडे करुन द्यायला सुरुवात केली. प्रॉब्लेम संपला.

मितान छान लिहिलं आहेस.... खूप गरज आहे अशा व अ‍ॅकॅडमिक लेखांचीही.... वाटलं तर वाटू देत अ‍ॅकॅडमिक. पण त्यातून किमान आवश्यक गोष्टी तरी कळतील.... तू लिहित राहा गं बायो! ते महत्त्वाचं. Happy

पालकांच्या प्रशिक्षणाच्या मुद्द्याला खूप अनुमोदन.

लिहित रहा... स्वाती२ने सुचवलेला विषय या लेखमालिकेत कव्हर होईलच ना, काही प्रमाणात?

आवडला. पुढच्या लेखांच्या प्रतिक्षेत.
हा लेख सार्वजनिक आहे का/ याची लिंक घरी आई बाबांना वाचायला पाठवली तर चालेल का?

आधी मनात हसू यायचं. पण अनुभवाने ( प्रत्यक्ष आई म्हणून सुद्धा ) कळलं. समस्या कितीही छोटी असली तरी ती खूप प्रामाणिक असते. मी त्या प्रामाणिकपणाचा आदर करायला शिकले. त्या किरकोळ वाटणार्‍या समस्येचे निराकरण लवकर झाले नाही तर पालक म्हणून ताण वाढत जातो. खरं म्हणजे प्रत्येक शाळेने पालकांचे प्रशिक्षण वर्ग घेतले पाहिजेत. त्यात मुलांच्या वाढीचे टप्पे, त्या त्या टप्प्यावर होणारे शारीरिक, भावनिक, सामाजिक, बौद्धिक-भावनिक बदल, कोणत्या टप्प्यावर कोणत्या प्रकारच्या अपेक्षा कराव्या, मुलांच्या पाल्कांकडून काय अपेक्षा असतात या विषयांची माहिती दिली पाहिजे. ही माहिती असलेले पालक खूप कमी असतात कारण आपल्याला हे माहीत असायला हवं हेच त्यांना माहीत नसतं. आणि अजून एक म्हणजे माहिती नसणं हा गुन्हा नाही हे पण मान्य करावं. मग पटकन मदत मागता येते. बदलता येतं.
सहकार्‍यांसोबत होणार्‍या चर्चेत असे विषय अनेकदा येतात तेव्हा पालक प्रशिक्षण हा शालेय व्यवस्थेचा भाग झाला पाहिजे ही निकड जाणवते.

>>>>> एकदम योग्य लिहिलयस. छान चाललीये मालिका.

मित्तान,
अस्वस्थ करणारा अनुभव लिहिलास. मुलांना वाढवणं म्हणजे नुसतं वाढवणं नाही तर माणूस म्हणून त्यांची वाढ करणं. आणि ते एक प्रचंड अवघड काम आहे. तुझं प्रत्येक न प्रत्येक वाक्य पटलं.
तुला येणार्‍या अडचणी सुद्धा माझ्या चांगल्या परिचयाच्या आहेत. (कारण मैत्रिण एका प्रसिद्ध शाळेत कौन्सिलर आहे) सुदैवाने एक वर्षात तिने शाळेत कौन्सिलर आणि कौन्सेलिंगचे महत्व व्यवस्थित पटवून देऊन शाळेत एक स्थान मिळवले आहे. बाकी भौतिक अडचणींवर मात करता येते, पण पालकांपैकी एकजण कुणितरी जेव्हा मुलाचा प्रॉब्लेम सिरियसली घेण्यास तयार नसतो तेव्हा कौन्सिलरची असहाय्य मन:स्थिती मी समजू शकते.

तुला ऑल द बेस्ट! Happy

छान लेख....आधीच्या लेखांची लिंक इथे किंवा तुमच्या प्रोफाईलमध्ये द्या ना. म्हणजे वाचायचे राहिले तरी नंतर वाचता येतील.

अप्रतिम लिहिले आहे!
आपल्या कामाला मर्यादा आहेत. त्या स्वीकारायच्या.>>
समस्या कितीही छोटी असली तरी ती खूप प्रामाणिक असते. मी त्या प्रामाणिकपणाचा आदर करायला शिकले.>> शिक्षण-समुपदेशन क्षेत्रात काम करणार्‍या वा करु इच्छीणार्‍या सर्वांनी कायम लक्षात ठेवावी अशी वाक्ये.

समस्या कितीही छोटी असली तरी ती खूप प्रामाणिक असते. मी त्या प्रामाणिकपणाचा आदर करायला शिकले >> हे आवडलं.
मितान, तुमच्यासाठी हे अनुभव कथन असले तरी, माझ्यासारख्या बर्‍याचजणांसाठी हे तुमचे लेखन म्हणजे शिक्षणच आहे. असेच लिहीत रहा.

Pages