नव्या आर्थिक वर्षाचे साहीत्यिक संकल्प..

Submitted by Kiran.. on 6 April, 2012 - 19:50

णमस्कार्स

या नव्या आर्थिक वर्षात प्रसवायच्या साहीत्याचे संकल्प सोडलेले आहेत. आर्थिक वर्ष हे धर्मनिरपेक्ष असल्याने संकल्पासाठी हा मुहूर्त सोडला आहे.

काल मायबोलीचर येता आलं नाही. कारण सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंतची वेळ पुण्यातल्या सिंहगडाजवळच्या वॉटर स्पोर्ट्स मधे घालवली (या दरम्यान बोटं किबोर्डसाठी शिवशिवत होती) . मायबोली सोडून मुलं, बायको, पुतण्या यांच्याबरोबर कसंबसं एण्जॉय तर केलं. खरं तर असं काही केलं कि लेख लिहायची एक पद्धत आहे. पद्धत नसती तरी आपण जे काही केल ते आख्ख्या मायबोलीस कळावे म्हणून एक लेख लिहावाच लागला असता (कसं असतंय, असं नुसतं येण्जॉय करून चालत नाही). म्हणूनच लेख लिहायचा संकल्प सोडलेला आह. कदाचित जास्त लेख पण होतील. वॉटर पार्क पर्यंतचा प्रवास हा एक लेख, वॉटर पार्कमधले वेगवेगळे विभाग यावर प्रत्येकी एक लेख, जेवणाची व्यवस्था यावर एक लेख आणि परतीचा प्रवास हा शेवटचा लेख. ( क्रमशः टाकल्यास किमान १० - १२ लेख होतील आठ तासांचे... )

तिकीटं स्कॅन करून ठेवली आहेत. भाड्याने घेतलेल्या स्विमिंग कॉस्च्युम्सचे फोटो घेऊन ठेवले आहेत. प्रत्येक विभागात अनेक प्रचि घेता आलीत. म्हणजे लेख ते लेख आणि प्रवासवर्णनसुद्धा टाकता येईल. हीच बोंब फेबु वर पण मारावी म्हणतोय.

गेल्या महिन्यात वीकेंडला पाहीलेल्या सिनेमांचं परीक्षण लिहायचं डोक्यात आलं नाहि याबद्दल स्वतःचा णिशेध. इतका कसा गहाळ राहीलो बरं ? ते काही नाही, हाऊसफुल्ल २ चं परीक्षण लिहायचंच आता. इंटर्व्हलला विकत घेतलेल्या पॉपकॉर्न आणि कोल्ड्रींक्सचा उल्लेख खुबीने करायला विसरणार नाही.

ऑफीसला जातानाच्या तासभराच्या प्रवासात येणारे विचार यासाठी एक सदर सुरू करायचं आहे. मुलांना दिलेला वेळ मुलांचे संगोपन या सदरात मांडता येईल. यात मी कसा एक विचारी आणि आगळावेगळा पालक आहे हे लक्षात आणून द्यावे म्हणतोय.

वहीत लिहून ठेवलेली यमकं वाया जाऊ नयेत म्हणून नियमित गझला पाडण्याचे नव्या आर्थिक वर्षात ठरवले आहे. वाहत्या पानांवरच्या घडामोडींवर केवळ पाच मिनिटात विनोदी लेख लिहीण्याचे योजले आहे. त्यासाठी वाहत्या पानांवर २४ तास मी स्वतः किंवा माझे दूत असतील अशी व्यवस्था करण्याचे ठरवले आहे.

मधे मधे वाया जाणा-या वेळात काही कवितांवर विद्वत्तापूर्ण समीक्षण लिहावं असा विचार आहे (माझ्या कविता, गजला, कथा, कादंब-या वाचूनही लोकांना माझी विद्वत्ता कशी लक्षात येत नाही ?). समीक्षण करताना मला आवडेल तसंच सर्वांनी लिहावं हे मी सुचवणार आहे. त्यासाठी माझी आवड आग्रहाने नवकवींच्या काव्यावर कळवणार आहे. सगळ्या कळ्या उमलल्यानंतर त्याचं एकच फूल व्हावं असं मला वाटत आलेलं आहे. गुलाब, मोगरा, जाई, जुई, रानफुलं या सर्व वेगवेगळ्या फुलांचं अस्तित्व मला मान्यच नाही. मला फक्त धोत-याचं फूल आवडतं. जगात सर्वत्र धोत-याचीच फुलं असावीत. तसंच सगळ्या कविता एकसारख्याच असाव्यात असं मला वाटतं. या विषयावर एक अभ्यासपूर्ण लेख पाडता येईलच.

फक्त स्त्रियांसाठीच असलेल्या केस लांब ठेवू कि कापू, साडी कशी नेसावी ? नऊवारी नेसवण्यासाठी मार्गदर्शन हवे आहे अशा धाग्यांवर किमान एक तरी पोस्ट टाकायचा विचार आहे. पहिली पोस्ट टाकताना या विषयावर खरं तर मी लिहायला नको अशी सुरूवात करून क्षमस्व असा शेवट केलेली पोस्ट टाकायची. नंतर भीड चेपली कि त्या संवादात मुक्तपणे विहार करता येतो. संध्याकाळचा मेक अप, पार्टी मेक अप अशा कोतबो वर ( त्यातलं कळतंय असं दाखवणारं) माझं मत आलंच पाहीजे असं मला वाटतं.

एखाद्याचा अभ्यासपूर्ण लेख गाजल्याबरोबर मला देखील अभ्यासपूर्ण लेख लिहीणे भाग आहेच. कुणाची रहस्यकथा गाजली कि माझी रहस्यकथा देखील या आर्थिक वर्षात येईल हे खात्रीने सांगू शकतो. क्रमशः लिहीली कि २० एक भागांची निश्चिंती ! शेवटच्या भागाआधी शेवट काय करावा असाही एक लेख लिहीता येतो हे माझ्या नुक्तेच लक्षात आलेले आहे.

मागोवा आणि चालू घडामोडी हे तर आमचे हातचे मळ आहेतच. याशिवाय लिंगपिसाटता या विषयावर एक खळबळजनक लेख लिहायचा विचार आहे.

मा़झा हा प्रचंड आवाका पाहता माझ्यासाठी वेगळा गुलमोहर काढून त्याला माझे नाव देण्यात यावे अशी वाचकांची इच्छा आहे असं समजतं. वाचकांना संयोजक निराश करणार नाहीत अशी आशा आहे. माझं इथं असणं हे मायबोलीचं भाग्य हे ब-याच जणांना पटलेलं असलं तरी काही जण ते मान्य करीत नाहीत असं माझ्या लक्षात आलेलं आहे. मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचे ठरवलेले आहे. देव त्यांना माफ करो.

कळावे
आपला नम्र

किरण बोंबमारे

( टीप : सदर लिखाण हे खरं तर वाहत्या पानासाठी होतं. पण माझे लेख याच कॅटेगरीतले असल्याने एका लेखाची संधी हुकायला नको म्हणून शेपरेटली पोस्ट करीत आहे. कुठल्या विभागात टाकावे हे न समजल्याने विनोदी या विभागात पोष्ट करीत आहे. समऊन उमजून स्मायल्यांचा वापर करावा..ही नम्र विनंती )

गुलमोहर: 

Happy Happy Happy

युरी, वेगळा आयडी घे रे बाबा. तूच लिहायला लागल्यावर प्रतिसाद कोण देणार ?
आता वरच्या वाक्याचा अर्थ तूला कोण प्रतिसाद देणार, असा नसून तूझ्याशिवाय
इतरांना प्रतिसाद कोण देणार असा आहे, हे तू चाणाक्ष असल्याने तूला समजले असेलच.

शेवटी व्याधाला फाट्यावर मारलेस तर .... Rofl
तरीही काही पिंड आपल्या काकनजरेतून सुटले आहेत. त्या संकल्पांचे सुद्धा आपण तेरावे घालावे ही नम्र विनंती. Proud
वाट पहातो आपल्या नव्या बोंबांची. Lol

आणि जमल्यास रेडिफ, क्रिकैन्फो वगैरे वरची आकडेवारी घेउन अधूनमधून एक्स्पर्ट पिंका टाकत रहा... तुझ्या विद्वत्तापूर्ण इमेजला चार चांद लागतील Proud

हा हा.. मस्तच.. काही नाही तरी ३६५ भागिले ७ या हिशोबाने दर आठवड्याला एक असा विनोदी लेख नक्केच अपेक्षित तुमच्याकडून.. Happy

बाकी ते आपल्या नावाचे वेगळे गुलमोहर टाकायचे आवडले आपल्याला.. पण त्यासाठी संयोजकांकडे विनंती करायची गरज नाही.. मी माझे स्वताचे एक ईंटरनेट सुरू करतोय तिथे नक्की काढू.. Happy

@ दिनेशदा : -सूचनेचा आदरपूर्वक विचार करून कार्यवाही सुरू करत आहे.
@कौतुक : -एव्हढीच बोंबाबोंब करताना धाप लागली ( सोप्प नाही ब्वॉ ! हळूहळू प्रयत्न करतो. आशिर्वाद असू दे Wink ) जस जसं अति वैयक्तिक व्हावं तसं तसं ते वैश्विक होत जातं असं आइकलंय कुठंतरी

आभार Happy

लै भारी Lol

समीक्षण करताना मला आवडेल तसंच सर्वांनी लिहावं हे मी सुचवणार आहे. त्यासाठी माझी आवड आग्रहाने नवकवींच्या काव्यावर कळवणार आहे. सगळ्या कळ्या उमलल्यानंतर त्याचं एकच फूल व्हावं असं मला वाटत आलेलं आहे. गुलाब, मोगरा, जाई, जुई, रानफुलं या सर्व वेगवेगळ्या फुलांचं अस्तित्व मला मान्यच नाही. मला फक्त धोत-याचं फूल आवडतं. >>> Rofl

Lol

lolsss