भीकूची वाडी

Submitted by चाऊ on 4 April, 2012 - 10:09

भिकूची वाडी, त्यात रहाते लाडी
आणि ती नेसते, गोल साडी

भिकूच्या वाडीत उंच नारळाचं झाड
फ़ांद्या बिन्द्या काही नाही, नुसताच उंच वाढ

भिकूच्या वाडीत आहेत आंबे हापुस
एक फ़ळ कधी देत नाही, त्याचा खडूस बापूस

भिकूच्या वाडीत पडतो जांबांचा खच
मागायला गेलं तर करतो भिकू, कचकच

भिकूच्या वाडीत ओलाव्याला, अळू, तुळस, केळी
नैवेद्यासाठी पानं आणायला जातो वेळोवेळी

भिकूच्या वाडीत दिवसाही काळोख
झाडं भरल्या जमिनीस नाही उन्हाची ओळख

भिकूच्या घरात कायमच पसारा
धिंगाणा घालतात त्याची पोरं बारा