चिंबोरीचं (खेकड्याचं) कालवण

Submitted by शर्मिष्ठा on 2 April, 2012 - 15:07
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ किलो चिंबोर्‍या (४-५ नग)
१/२ किलो कांदे (४-५ नग)
१ वाटी सुक्या खोबर्‍याचा कीस
१ वाटी आलं-लसूण पेस्ट
२ मोठे चमचे तेल (फोडणीसाठी)
२ टेबल स्पून गरम मसाला
१ टेबल स्पून लाल मिरची पावडर
मीठ - चवीप्रमाणं
कोथिंबीर - बारीक चिरलेली

क्रमवार पाककृती: 

एक मोठा कांदा उभा कापून तेलावर छान गुलाबीसर भाजून घ्यावा. किसलेलं खोबरंही गुलाबीसर भाजून घ्यावं आणि त्याची बारीक पेस्ट करावी.
मध्यम आकाराच्या दोन लसणीच्या कांड्या सोलून घ्याव्यात. एक इंच लांबीचा आल्याचा एक तुकडा घेऊन दोन्हींची बारीक पेस्ट करून घ्यावी.
चिंबोरीचे पाय वेगळे काढून मिक्सर मध्ये वाटून घ्यावेत. त्यामध्ये भरपूर पाणी घालून गाळून घ्यावं.
कांदे बारीक चिरून गरम तेलात लालसर होईपर्यंत परतावेत. कांदा लाल झाल्यावर त्यामध्ये चिंबोर्‍या घालून चांगलं परतावं, मग आलं-लसूणची पेस्ट घालावी व खमंग वास येईपर्यंत परतून घ्यावं. आता गरम मसाला, मिरची पावडर, हळद व मीठ घालावं. त्यानंतर कांदा व खोबर्‍याचं वाटण घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यावं. आता गाळून घेतलेलं चिंबोरीचं पाणी घालून कालवण उकळावं. कोथिंबीर घालून सजवावं.

crab_masala.jpg

वाढणी/प्रमाण: 
५ ते ६ जणांसाठी
अधिक टिपा: 

कालवण तयार झाल्यावर थोडा वेळ मुरू द्यावं आणि नंतर सर्व्ह करावं.
चिंबोरीचं कालवण चवीष्ट तर असतंच, तसंच ह्यात कॅल्शियमही भरपूर असतं.

माहितीचा स्रोत: 
माझी सुगरण आई
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच!

चिंबोरीचे काढून पाय
मिक्सरमध्ये वाटले जाय
कांदा लाल झाला काय
मस्साल्याचा नादच नाय
खमंग वास सुटल्यावर
कोथिंबीर भुरभुरल्यावर
सहीच लागेल मुरल्यावर
भेटू आता पोट भरल्यावर Happy

चिंबोरीचे पाय वेगळे काढून मिक्सर मध्ये वाटून घ्यावेत...
हे अगदी ट्राय केलं पाहिजे...बाकी रेसिपी मस्तच..पण गैरसमज नको फ़ोटोमध्ये काहीच कळत नाहीये मला काय आहे ते...की इथेच अंधुक दिसतंय???

धन्यवाद वेका! चिंबोरीचे पाय वाटून त्याचा वापर केल्यामूळे मसाला छान घट्ट होतो.
माझ्याकडे तर फोटो क्लिअर दिसतोय, दुसरा एखादा अपलोड करून बघते.

खेकड्याचा रस्सा(काळ्या - खास करून खडकाळ भागातल्या पाण्यात सापडणार्‍या) म्हणजे...अहाहा!!

सर्दी गायब............ Proud

खेकड्याचा रस्सा(काळ्या - खास करून खडकाळ भागातल्या पाण्यात सापडणार्‍या) म्हणजे...अहाहा!!

सर्दी गायब............>> +१

शर्मिष्ठा मला वाटते त्यामध्ये भरपूर पाणी घालून गाळून घ्यावं.अगदी गाळणी ने गाळून घ्यावे नाहीतर खुपच कचकचीत लागते. बाकि चव अप्रतीम.............

रुहि, गाळणीने गाळणे योग्य नाही कारण मग त्यातले फायबर्स येणार नाहीत, ज्यामुळे रस्सा दाट होतो आणि अप्रतिम स्वादही येतो. शक्यतो अगदी बारीक पेस्ट करू नये व भरपूर पाणी घालून चांगले घोळून घ्यावे.