यशटी

Submitted by RISHIKESH BARVE on 28 March, 2012 - 00:03

यशटी

जगातलं सगळ्यात अलिशान वाहन... प्रवाश्यांच्या सेवेस (?) सदैव तत्परतेने हजर... या वाहनाने करायचा प्रवास काही मुख्य टप्प्यांतून पार पडतो. तसच एकदा प्रवासाचा निर्णय घेतल्यावर तुम्हाला अनेक कसोट्यांना सामोरे जावं लागतं आणि त्यासाठी तुम्ही स्वतःला विशेष पद्धतीने develop केलं पाहिजे.
टप्पा १ – बसची वाट पाहणे
वाट पाहत बसण्यासाठी तुमचं घ्राणेंद्रिय अतिशय कमकुवत हवंय... म्हणजे तुम्हाला कसलेही वास येवू नयेत (जर तसं नसेल तर सर्दी झालेली असताना प्रवास करण्याचा निर्णय घ्यावा). त्याचबरोबर हायजीन वगैरे सगळं विसरावं लागेल, मळकट बाकड्यांवर बसायची तयारी हवी. बसायचं नसेल तर या बसचा धूर पीत उभे राहण्याची तपश्चर्या करता यायला हवी.
टप्पा २ – बसचे आगमन
बसचं आगमन अतिशय दमदार होतं. बस स्लो होते तेव्हा बसची वातप्रकृती दिसून येते, मग ब्रेक दाबला कि ३-४ वेळा बसला उचकी लागते, शेवटी येन-केन प्रकारेण ती बस स्थानकावर स्थिरावते आणि जोरात एकच स्फोट करते. या आगमनाच्यावेळी देखील एक वेगळाच वास येतो.
टप्पा ३ – बसमध्ये चढणे
हे अतिशय जोखमीचं काम.. जोरदार धक्के खावे लागतात, त्याचबरोबर आजूबाजूने आवाज येत असतात “अग कमले ते पोरग पकड बाई.... बै बै काय चाललंय... हं गणप्या दे ढुशी... असंच चढायचं... अर्र्र्र्र्र्र्र्र जागा नाय ना मिळायची..” अश्या कोलाहलात तुम्ही बस मधे कसेबसे चढता. आता स्थानकाच्या वासात बस मधला वास मिसळून एक अलौकिक वास निर्माण झालेला असतो.
टप्पा ४ – बसमध्ये बसणे
रिझरव्हेशन असलेली गाडी असेल तर ठीक, नाहीतर बसमध्ये जागा मिळेलच याची शाश्वती नाही. समजा जागा मिळाली तर अनेक गोष्टी घडू शकतात. तुमच्याबरोबर लहान मुल आहे का? असेल तर एखादी बाई येवून जवळपास खेकसत तुम्हाला म्हणेल “मांडीत घ्या कि पोराला, ए चिंके चल बस हिथ”. तुम्ही एकटे आहात का? मग तुमच्या बाजूला कोण बसेल यावर तुमचा काहीही कंट्रोल नाही. तुमच्या शेजारी कोण बसतं यावर तुमचा प्रवास कसा होणार हे अवलंबून आहे.
टप्पा ५ – प्रत्यक्ष प्रवास
हा या तपश्चर्येतला सर्वात अवघड टप्पा. खिडकीजवळ बसला असाल तर खिडकी उघडेल कि नाही सांगता येत नाही, जर उघडलीच तर ती कमालीचा कर्कश आवाज संपूर्ण प्रवासभर करते. एव्हाना तुम्हाला अख्या बसमध्ये भरलेले वास येवू लागलेले असतात. तुम्ही अनेक वर्ष जपलेली तुमची हाडे खिळखिळी झालेली असतात. अश्यातच घाटाचा रस्ता येतो, तुम्ही सकाळपासून खाल्लेले पदार्थ तुमच्या पोटापासून घशापर्यंतचा प्रवास सुरु करतात. सुदैवानं तुम्हाला गाडी लागत नसेल तरी खुश होवून जाऊ नका. घाटाची वळणं बरोब्बर आपला डाव साधतात आणि कोणाला तरी गाडी ‘लागते’. लागते म्हणजे अशी लागते कि अख्खी बस सुगंधित होते (अश्यावेळी भरपूर अत्तर लावलेला किंवा सेंट मारलेला रुमाल जवळ असेल तर उत्तम). आता जर तुम्हाला गाडी ‘लागण्याचा’ त्रास असेल तर तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी एका कोणाला ‘लागलेल्या गाडीच्या’ वासाने तुम्हाला पण चांगली जोरात गाडी लागते. सगळ्यात वाईट प्रकार म्हणजे शेजारच्याला गाडी लागणं. जर प्लास्टिक ची पिशवी नसेल आणि अचानक आपल्या शेजारच्याला गाडी लागली तर हमखास काही शिंतोडे तुमच्या अंगावर उडणार यातून सुटका नाही. त्यातच आजूबाजूला असलेली पोट्टीसोट्टी भूक लागली म्हणून गळा काढतात, पार तारसप्तकातला सूर लावतात. जर बस विनाथांबा असेल तर उत्तम, जर थांबत जाणारी असेल तर एव्हाना अनेक लोक मधल्या पेसेज मधे लटकलेले असतात, तुम्ही खिडकीजवळ असाल तर जास्त चिंता नाही, फक्त बाजूला थुंकलेल्या पान किंवा तंबाखूच्या पिचकारीच्या डागापासून तुम्ही दूर राहू इच्छिता, पण कधी न कधी आपण जपलेली ड्रेस/शर्ट ची भाईला त्या डागाचे काही व्रण तुमच्या आठवणीखातर तुम्हाला बहाल होतात. जर तुम्ही पेसेज जवळच्या सीट वर असाल तर लटकणार्या लोकांची ब्याग, कोपरे यांच्या धड्कांने तुम्हाला किमान एक – दोन टेंगुळ येतातच. त्यात कोणी स्फोटक पदार्थांचं सेवन केलेलं असेल तर होणारे बॉम्बस्फोट ही तुम्हाला अतिशय धीराने पचवावे लागतात. जर तुम्ही चाकावर किंवा मागच्या सीट वर बसला असाल तर एव्हाना तुम्हाला पाठदुखीचा त्रास जडलेला असतो. प्रवास साधारण मध्यावर येतो आणि तुमच्या शेजारची व्यक्ती निद्रादेवीच्या आधीन होते आणि तुमच्या खांद्याचा चक्क उशी म्हणून वापर सुरु होतो. तुम्हाला झोप आली आणि खिडकीत बसला असाल तर तुमच्या डोक्याला अनेकदा मार लागतो.
टप्पा ६ – इच्छित स्थळी बस मधून उतरणे
तुम्ही लास्ट स्टोप ला उतरणार असाल तर ठीक आहे, पण मधे आधे उतरायचं असेल तर तुम्हाला पेसेज च्या गर्दीतून मार्ग काढावा लागतो तसच आपलं समान, पोरंबाळ सगळं नीट घेवून उतरावं लागतं. पुन्हा एकदा जर तुम्हाला गाडी लागण्याचा त्रास आहे आणि बस मधे उलटी झाली नाही तर उतरल्यावर उलटी हमखास होणार त्यामुळे पाण्याच्या बाटल्या पुरेश्या प्रमाणात जवळ बाळगण गरजेचं आहे.
टप्पा ७ – पुनःप्रवास किंवा परतीच्या प्रवासाची मानसिक तयारी व actual प्रवास
अनुभवातून मिळणारं शिक्षण हेच खरं शिक्षण. त्यामुळे परतीच्या प्रवासाची तयारी आपापल्या अनुभवानुसार करा आणि नवीन अनुभवांसाठी तयार राहा.

जरी अतिशय वाईट असली ही बस सेवा तरीही आज याच बसने अनेक गावं आणि शहर जोडली आहेत. तसेच माणुसकीची उत्तम शिकवण याच प्रवासात मिळू शकते, अनेक ओळखी होतात, सहप्रवाशांबरोबर गप्पा होतात. त्यामुळे वरील सगळे वाईट अनुभव येत असले तरीही एकदातरी या बसने प्रवास करून पहाच. आयुष्यातला एक थोडा खट्टा थोडा मिठा अनुभव नक्की मिळेल.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

खरं आहे. Happy लहानपणी कोणीही जायचं असलं तरी आमची जागा पकडायच्या कामावर नियुक्ती व्हायची...एखादा रुपयासुद्धा मिळुन जायचा कधी कधी.

त्या डागाचे काही व्रण तुमच्या आठवणीखातर तुम्हाला बहाल होतात >>>

त्यात कोणी स्फोटक पदार्थांचं सेवन केलेलं असेल तर होणारे बॉम्बस्फोट ही तुम्हाला अतिशय धीराने पचवावे लागतात>>>> Lol Lol Lol मस्त झालाय लेख