मनात येते देव बनावे

Submitted by निशिकांत on 27 March, 2012 - 08:03

छोट्या मोठ्या नको अपेक्षा ध्येय जरासे भव्य असावे
पुरे माणसाचे जगणे हे मनात येते देव बनावे

अनादि काळापासुन पत्नी श्रीविष्णूंचे पाय चेपते
भुजंग देई सदा सावली ऊन कधी ना तिथे कोपते
मस्त शेषशाही नारायण होउन आकाशात जगावे
पुरे माणसाचे जगणे हे मनात येते देव बनावे

खून, दरोडे,बलात्कार अन् लाच फरेबी जीवन झाले
काय जगाया आयुष्यात या? दु:ख वाहते भरून प्याले
स्वर्गलोकच्या मस्त अप्सरा नाच बघूनी होश उडावे
पुरे माणसाचे जगणे हे मनात येते देव बनावे

निवडणुकीची हवा न स्वर्गी, ईंद्र कधीचा आहे राजा
पक्ष विरोधी? छे! ईंद्राचा सदैव वाजत असतो बाजा
चिर-सिंहासन हेच बसाया माझ्यासाठी योग्य असावे
पुरे माणसाचे जगणे हे मनात येते देव बनावे

नैवेद्यावर ताव मारते श्वान, गप्प का ईश्वर दुबळा?
तोच जगाचा म्हणे नियंता, मार्ग दावतो आम्हा सकळा
माझ्या कर्तृत्वाचे(?) कौतुक उभ्या जगाने नित्त्य करावे
पुरे माणसाचे जगणे हे मनात येते देव बनावे

पाय चेपणार्‍या लक्ष्मीने लाथ मरुनी मला उठवले
उशीर झाला आज केवढा! सुंदर माझे स्वप्न भंगले
लोकल धरण्या आठ तीनची जीव तोडुनी चला पळावे
पुरे माणसाचे जगणे हे मनात येते देव बनावे

निशिकांत देसपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com