..... आर्ट एग्झिबिशन ......

Submitted by मिलिंद महांगडे on 24 March, 2012 - 14:24

-- " मला यायला उशीर तर झाला नाही ना...? " मी घाबरत घाबरत नान्याला विचारलं... त्याने माझ्याकडे तुच्छतेचा कि काय म्हणतात तसा कटाक्ष टाकला. त्याची छोटीशी वेणी घातलेली दाढीही रागाने नकारार्थी हलल्याचा मला भास झाला .
-- " तुला किती वाजता यायला सांगितल होतं ?? "
-- " ३ वाजता..."
-- " आणि आता किती वाजलेत....??" माझ्यापुढे हातातलं घड्याळ नाचवीत त्याने विचारलं .
-- " साडेतीन ..." मी अपराध्यासारखा त्याच्यापुढे उभा राहिलो.
-- " तुला वेळेचे महत्व नसेल , पण मला आहे ." नान्या माझ्यावर चांगलाच डाफरला. काय करणार...?? मला उशीर तर झालाच होता. चूक माझीच होती. त्यामुळे मी आपला गप्प राहिलो. एरवी जर नान्या मला असं काही बोलला असता तर मी पहिला त्याच्या पाठीत एक गुद्दाच घातला असता... नान्या.-- माझा लहानपणा पासूनचा मित्र ...! आम्हा दोघांनाही चित्रकलेत पहिल्यापासून रस होता . परंतु फरक इतकाच होता कि तो चांगली चित्र काढायचा आणि मी माझ्या चित्रकलेतून लोकांच्या कल्पनाशक्तीला चालना द्यायचो. बऱ्याचदा मी काढलेलं चित्र नक्की कशाचं आहे ह्यावर अनेकांमध्ये मतभेद व्हायचे , पैजा लागायच्या , हे चित्र कसलं आहे त्याच्यावरून....!! असंच एकदा मी फुटबॉल खेळणाऱ्या दोन मुलांचं चित्र काढलं होतं , ते आमच्या ड्रोइंगच्या मास्तरांना दाखवलं... चित्र बघितल्यावर मास्तरांना काय झालं कुणास ठाऊक ? ते भलतेच भडकले , आणि मला बेदम मारलं... मी काढलेल्या चित्रातील वळणांवरून आमच्या मास्तरांना ते अश्लील चित्र काढल्यासारखं वाटलं अन त्यामुळे मला फटके पडले हे मला नंतर कळलं .... पण ते तितकंसं महत्वाच नाही ... तो भाग सोडला तरी मला लहान असताना कुणी विचारलं कि तुला मोठेपणी कोण व्हायचं आहे तर मी चित्रकार व्हायचं , असंच सांगायचो ....पण नंतर मी चित्रकलेचा नाद सोडला आणि घासून गुळगुळीत झालेल्या वहिवाटीवरून वाटचाल सुरु केली. नान्याने मात्र त्यातच करियर केलं. आणि आता तो चांगला आर्टीस्ट झालाय ... त्याने केलेलं काम बघून मलाही मी पूर्वी मारत असलेल्या रेघोट्यान्बद्दल उमाळा यायचा... आज नान्याने बोलावलं होतं ते, तो पूर्वी शिकत असलेल्या आर्ट कॉलेज मधलं लागलेलं प्रदर्शन पाहायला... आणि ते पाहण्यासाठी जातानाच मला अर्धा तास उशीर झाल्याने नान्या माझ्यावर चांगलाच उखडला होता.
-- " जाऊ दे ना बाबा, आता जीव घेतोस का माझा...? " मी त्याला म्हणालो... तोही दिलखुलास पणे हसला. आम्ही आत गेलो. ते कॉलेज म्हणजे नान्याचं अभयारण्य होतं. तो तिथल्या प्रत्येकाला ओळखत होता आणि त्याला प्रत्येकजण...! सरांपासून ते शिपायापर्यंत ...! कॉलेजच्या कॅन्टीनवाल्याने आम्ही घेतलेल्या २ फुल चहाचे , फक्त २ कटिंग प्रमाणे पैसे घेतले ह्यावरून नान्याच्या कॉलेजमधल्या प्रसिद्धीची एक झलक मला बघायला मिळाली . कॅम्पस मधलं एक कुत्रंही त्याच्याकडे येऊन लाडात त्याला चाटत असलेलं बघून तर मी ' चाटच ' पडलो. आम्ही चालत जात असताना दर दोन पावलांगणिक त्याला कुणी न कुणी ओळखीचा भेटत होता आणि तोही मोठ्या उत्साहाने त्यांच्याशी बोलत होता .अशीच मजल दर मजल करीत आम्ही शेवटी आत गेलो . आत गेल्यावर मात्र मी स्वतःला हरवून गेलो . रेखीव चित्रे.... मुक्तपणे केलेली रंगांची उधळण ..., नवीन नवीन प्रकारच्या जाहिरातींसाठी केलेली कॅम्पेन्स...... , अफलातून आईडियाज......, लक्षवेधी मॉडेल्स..... , मन गुंगवून टाकणारी फोटोग्राफी......, जाहिरातीची निरनिराळी स्लोगन्स बघून तर मला तिथे शिकणाऱ्या मुलांचा हेवा वाटू लागला.
-- " नान्या , हे बघ , मस्त आहे रे ...!!" एका सुंदर नर्तिकेच्या स्केचकडे बघत मी नान्याला म्हणालो .
-- " हे काही तितकंसं खास नाही..." नान्या बेफिकीरीने म्हणाला .
-- " हे मॉडेल मस्त आहे ना...?." एका मिनी थिएटरच्या मॉडेलकडे बघत मी म्हणालो .
-- " छे .... त्यात काही दम नाही.... " नान्याला त्यातही विशेष असं काही दिसेना .... मला जे चांगलं वाटत होतं , त्यात नान्याला काही तथ्य वाटत नव्हत. आणि मला जे कळत नव्हतं त्या चित्रासमोर , मॉडेलसमोर उभा राहून नान्या त्याचं बारीक निरीक्षण करत होता . मी त्याला विचारलं तर म्हणाला , कि हि नवीन कल्पना आहे म्हणून... मला मात्र त्यात काही कळत नव्हत.. असाच नान्या एका स्टुलासमोर उभा राहिला.... त्या स्टुलावर एक घमेलं ठेवलेलं , त्यात एक बादली , आणि बादलीत एक मग ठेवलेला.... नान्या त्या स्टुलाकडे एकटक पाहत होता. मधेच मान तिरकी करून , लांब जाऊन वगैरे बघत होता . एखाद्या डिटेक्टिव सारखा .... मला कळेना त्या स्टुलावर ठेवलेल्या त्या घमेल्यात , आणि बादलीत एवढं काय बघण्यासारखं आहे ??
-- " नान्या .... नान्या ... हे काय बघतोयस ? काय आहे त्यात....?? " मी शेवटी न राहून त्याला विचारलं..
-- " शु ssss , " करून त्याने मला गप्प केलं . आणि आणखी ५ मिनिट त्या स्टुलावर ठेवलेल्या मॉडेलकडे एकटक पाहत बसला.
-- " मला सांगशील का आता...??" मला वैताग आला होता.
-- " हे काय आहे ते तुला कळलं नाही...?? " असं म्हणू त्याने माझ्या अल्पमतीची खिल्ली उडवली .
-- " आयला , काय आहे त्या घमेल्यात आणि बादलीत...?? " माझ्या ह्या बोलण्यावर ' किती अज्ञानी माणूस ' अशा अर्थाने त्याने माझ्याकडे बघितलं. आणि म्हणाला , -- " अरे हि एक नवीन संकल्पना आहे ... , बघ..., असा विचार कर , कि हे घमेलं म्हणजे आकाशगंगा आहे , त्यात असलेली बादली म्हणजे आपली पृथ्वी , आणि त्यात हा मग म्हणजे माणूस....!!" एखादं विश्वाचं कोडं सोडवल्याच्या आविर्भावात नान्या माझ्याकडे बघू लागला. मला तिरमिरी येईल कि काय असं वाटू लागलं.... घमेलं म्हणजे आकाशगंगा , आणि बादली म्हणजे पृथ्वी हे माझ्या सामान्य बुद्धीला काही केल्या पटेना .... इतक्यात एक सफाई कामगार तिथे आला आणि " ए तुक्या , हे तुझं घमेलं न बादली घे ... झाडांना पाणी टाक भायेरच्या ...." असं म्हणून त्याने आमच्या दोघांसमोर स्टुलावर ठेवलेली ती 'आकाशगंगा आणि पृथ्वी ' सहजपणे उचलली .. आणि त्याच्या बरोबर आलेल्या तुक्याच्या हातात दिली. मी नान्याकडे बघितलं. , तर तो पुढचं चित्र बघायला आधीच सटकला होता . -- अरे , ती आकाशगंगा आणि पृथ्वी तो सफाई कामगार घेऊन गेला कि रे....!! " मी मिश्किलपणे त्याला एक टोमणा मारला.
-- " होतं असं कधी कधी .... पण ती कन्सेप्ट बरोबर होती ..." नान्या म्हणजे अशक्य आहे अगदी... ! हे म्हणजे ' गिरा तो भी टांग उपर ' असं झालं....नंतर आम्ही पुढे गेलो . नान्या एखाद्या परीक्षकासारखा हात मागे बांधून इकडे तिकडे बघत चालला होता . ' आमच्या काळात कसे विविध प्रकारचे , कल्पक बुद्धीचे लोक होते आणि आता अगदीच सुमार प्रतीची पोरं आहेत , ' ' मला कॉलेजला असताना प्रत्येक वर्षी बक्षीस मिळाले होते' वगैरे वगैरे नान्या चालता चालता मौलिक माहिती देत होता . मी ," हो का , अरे वा " करत त्याच्या मागून फिरत होतो. आम्ही प्रदर्शन बघून बाहेर आलो तोच एखादा जंगलातून किंवा वेड्याच्या इस्पितळातून पळून आलेला वाटावा अशा एका त्याच कॉलेजच्या विद्यार्थ्याने नान्यावर झडप घातली..
-- " नानू , कधी आलास...?? बघितलस का प्रदर्शन...?" तो विचारात होता.
-- " हम्म .... पण आपल्यावेळ्ची मजा नाही " नान्याने तोंड वाकडं करून उत्तर दिलं.
-- " तुझ्यासाठी हे प्रदर्शन पाहणं म्हणजे फक्त १० मिनिटांचे काम .... काय नान्या...?? " समोरच्या त्या मित्राने नान्याची स्तुती केली कि खिल्ली उडवली ह्या संभ्रमात मी असतानाच नान्या ओरडला , " अरे तो बघ , अनुराग ..." आम्ही सगळ्यांनी तिकडे पाहिलं तर एक मनुष्यप्राणी आम्हाला येताना दिसला . त्याला मनुष्यप्राणी म्हणण्याचं कारण म्हणजे त्याचा भयानक असा अवतार ...! वाढलेली दाढी ... पिंजारलेले केस ....डोळ्यांवर जाड फ्रेमचा चष्मा ....अंगात सर्वत्र ' ओम नमः शिवाय ' लिहिलेला शोर्ट कुडता ... असल ध्यान बघून तर मला त्याच्या जवळही जाऊ वाटत नव्हते ...नान्या मात्र गाईपासून ताटातूट झालेलं वासरू तिला पाहिल्यावर ज्याप्रमाणे हंबरत , बागडत जाईल तसा पळत त्याच्याकडे गेला . मला कळेना कि एखाद्या वेड्यासदृश दिसणाऱ्या माणसाशी नान्या इतक्या सलगीने कसा काय वागतोय ? तो झिपऱ्या बोलत असताना नान्या श्रीकृष्णाच्या तोंडून गीता ऐकणाऱ्या पार्थासारखा अतीव भक्तिभावाने ऐकत होता . थोड्या वेळाने तो त्याच्याशी बोलून परत आला.
--" कोण होता रे तो ..?? " मी नान्याला विचारलं...
-- " अरे तुला माहितीये का ? बाप माणूस आहे .... ad world चा अनभिज्ञ सम्राट ....!! " नान्याने मोठ्या कौतुकाने त्याचा परिचय करून दिला ,तोही चुकीच्या शब्दात....!!
-- " तुला , अनभिषिक्त सम्राट म्हणायचं का ? " मी दुरुस्ती केली .
-- " तेच ते रे ..." नान्या काहीही ऐकायच्या पलीकडे गेला होता .
-- " त्याने असा अवतार का केलाय रे ?? " मी त्याला विचारलं
-- " अरे , आर्टीस्ट लोक असेच असतात.... सामान्य माणसापेक्षा ते वेगळा विचार करतात .... तो फाईन आर्टला होता , आमच्याच कॉलेज मध्ये...... त्याची फोटोग्राफी जो बघेल तो वेडाच होतो... " नान्यावरही त्याच्या फोटोग्राफिचा काहीसा परिणाम झालेला दिसत होता... थोड्याफार फरकाने नान्याही त्या झिपऱ्याच्या जमातीतला वाटत होता... बोलता बोलता नान्याने खिशातून एक बिडीचं बंडल काढलं , आणि त्यातली एक बिडी शिलगावली ... हि त्याची एक नवीन तर्हा ...... सामान्य माणसे सिगारेट वगैरे पितात .... पण आर्टीस्ट लोक बिडी पितात .... वेगळा विचार .... दुसरं काय...?? नंतर तो बराच वेळ मला फाईन आर्ट , Advertaising , फोटोग्राफी बद्दल सांगत होता जे माझ्या डोक्यावरून गेलं .
" नान्या , मला भूक लागलीय ..." माझे हे शब्द ऐकल्यावर ' पालथ्या घड्यावर पाणी ' असा चेहरा करून त्याने मला शेजारच्या इराण्याच्या हॉटेलात नेलं . तिथे नान्याच्या पैशाने मावा केक आणि भरपूर चहा ढोसला तेव्हा मला वाटलं कि दिवस सत्कारणी लागला....

गुलमोहर: 

<<< परंतु फरक इतकाच होता कि तो चांगली चित्र काढायचा आणि मी माझ्या चित्रकलेतून लोकांच्या कल्पनाशक्तीला चालना द्यायचो >>> Happy

छानच लिहीलंय .
जे.जे.मधल्या विद्यार्थ्यांच्या कलाकृतिंचं वार्षिक प्रदर्शन पहायला मीं पूर्वी नियमितपणे जायचों. हळू हळू त्या प्रदर्शनांत 'अमूर्त' [अ‍ॅबस्ट्रॅक्ट] शैलीवरच भर वाढायला लागला, हें मलाही खटकायचं; प्रतिभावान मुलानी विद्यार्थीदशेत अशी झेंप घेऊं नये ,असं वाटायचं. पण कलेच्या क्षेत्राचे मापदंड आपल्यालाच कळत नसतील, असं म्हणून फार विचार नाही केला त्यावर ; तें बरंच केलं याची खात्री लेख वाचून वाटली ! Wink

मिलिंद,

कथा आवडली! Happy

>> अरे , ती आकाशगंगा आणि पृथ्वी तो सफाई कामगार घेऊन गेला कि रे....!!

माझा एका मित्र एकदा (मुंबईतल्या) जहांगीर आर्ट गॅलरीत प्रदर्शन पाहायला गेला होता. तिथे तक्तावरुन (सिलिंग) काही गोणपाटाची कापडं खाली टांगलेली दिसत होती. आजूबाजूला कसलेसे फरशीचे की दगडांचे तुकडे पडले होते. त्याला वाटलं काहीतरी काम चाललं होतं, म्हणून परत फिरला आणि चर्चगेट स्थानकात आला. दुपारची वेळ असल्याने मिडडे विकत घेतला. मग अंधेरीची गाडी पकडली आणि प्रथम वर्गाच्या डब्यात शिरून निवांतपणे मिडडे उघडला. आतल्या पानावर बघतो तर काय, 'एम.एफ.हुसेन यांचे जहांगीर आर्ट गॅलरीत प्रदर्शन'.असा ठळक मथळा!

Lol

आ.न.,
-गा.पै.

>>>> अरे , ती आकाशगंगा आणि पृथ्वी तो सफाई कामगार घेऊन गेला कि रे....!! " <<<< ह्हा ह्हा ह्हा....
अगदी अगदी अचूक वर्णन केलय हां !
हा लेख कसा काय सुटला वाचायचा कायकी! गामामुळे इकडे आलो.

Happy येथील आर्ट गॅलरीत गेले कि असेच काहीतरी नविन नविन बघायला मिळते... हे काय आहे विचारले कि त्या आर्टबद्द्ल माहिती सांगणारी व्यक्ति असेच छान छान वर्णन सांगते.

कॅम्पस मधलं एक कुत्रंही त्याच्याकडे येऊन लाडात त्याला चाटत असलेलं बघून तर मी ' चाटच ' पडलो.
थोड्याफार फरकाने नान्याही त्या झिपऱ्याच्या जमातीतला वाटत होता.. >>>>>:D