बोका - सांगत होतो मी.. विश्वास ठेवू नका

Submitted by बेफ़िकीर on 24 March, 2012 - 05:14

अशी एखादी मीटिंग कुठेतरी चालू असेल हे जर गव्हर्नमेन्टला समजले असते तर शर्मा त्या क्षणाला गजाआड गेला असता. जाताना स्वतःच्या सर्व संपत्तीचा हिशोबही देऊन गेला असता आणि बरोबर मेहतांनाही घेऊन गेला असता.

मेहतांच्या इगतपुरीजवळच्या एका अतिशय नगण्य फार्महाऊसमध्ये हा प्रकार चाललेला होता.

अमन शेख नावाचा अजस्त्र इसम एका बावळट व मध्यम उंचीच्या माणसाला अक्षरशः साखळददंडांनी बांधून त्याच्याजवळ उभा राहिलेला होता. जणू तो बावळट इसम साखळदंडही तोडून निसटणारच होता.

अमन शेखचे तीन साथीदार खवळलेल्या नजरेने त्या इसमाकडे बघत होते. जणू कोणीतरी परवानगी दिली की त्या इसमाला ते भोसकून खलास करणार असावेत.

एक जण थोडा कोपर्‍यात बसून खिडकीतून बाहेरचे दिसणारे अतिशय नयनरम्य दृष्य बघत होता. डोंगरांच्या कड्यांवरून पडणार्‍या चंदेरी धारा, पावसाची भुरभूर आणि गार हवा. सोबतीला खेकडा भजी आणि मसाल्याचा चहा.

या कोपर्‍यातल्या माणसाचे नांव होते जाधव. जाधव असे कॉमन नाव असलेल्या त्या माणसाचा व्यवसाय अनकॉमन होता. सुपारी.

आणखी एक माणूस नुसताच समधानी चेहर्‍याने बीअर घेत होता. तो लवकरच लक्षाधीश या पदवीला सोदून कोट्याधीश होणार हे सर्वांना माहीत होते. त्याचे नांव होते जुनेजा. जुनेजाला जुन्या कडवट आठवणी नष्ट करण्यासाठी सकाळी अकरा वाजताच बीअरची गरज भासली होती.

शर्मा डायरेक्टररेट जनरल ऑफ फॉरीन ट्रेड या शासकीय संस्थेचा असिस्टंट डायरेक्टर होता. एक कोटीपर्यंत आयात करायची असल्यास शासनाकडून मिळणारे ओजीएल म्हणजे ओपन जनरल लायसेन्स एखाद्या कंपनीला द्यायच्या आधी शर्माची सही अत्यावश्यक असायची. त्या सहीपूर्वी किमान दहा जणांच्या नजरेतून आवश्यक ती कागदपत्रे तपासली जायची आणि सह्या होत होत ती फाईल शर्मापर्यंत पोचायची. शर्माचे रेकॉर्ड हा शासनाच्या दृष्टीने एक आदर्शच होता. शर्मा क्लीन होता असे ऑफीससमोरचा पानवालाही बिनदिक्कत सांगायचा. पण खरे काय ते शर्मालाच माहीत होते. दिवाळीत मिळणार्‍या मिठाईवर समाधानी न राहता त्याने त्याचा संपर्क इतका वाढवला होता की शर्मा हे जणू त्या ऑफीसमधले डायरेक्टर जनरलपेक्षाही मोठे प्रस्थ होऊन बसलेले होते. काहीही हवे असल्यास आधी शर्माची सही मिळवा असा प्रकार झालेला होता. त्याचे प्रस्थ का आहे हे न समजल्यामुळे, पण प्रस्थ आहे हे व्यवस्थित समजल्यामुळे आपोआपच वरिष्ठही अनेक जबाबदार्‍या त्याच्यावरच सोपवू लागलेले होते. शर्माने प्रपोझल क्लीअर केले याचा अर्थ ते क्लीअर झाले असाच होत होता. मात्र नुकताच एक असा प्रकार झाला होता जो पाहून डी जी एफ टी च्या स्टाफने तोंडात बोटे घातलेली होती. मेहता नावाच्या अब्जाधीश माणसाच्या नवीन युनिटसाठी चक्क तेहतीस कोटीचे प्रपोजल तेथे आलेले होते. दारावरच्या शिपायानेही ते घालवून लावले असते. पण शर्माने ते आत आणले. इतक्या मोठ्या प्रपोझलसाठी डी जी एफ टी च्या मदतीची शश्पही आवश्यकता नव्हती. असे प्रपोझल सरळ वन टू वन बेसिसवर आणि गव्हर्नमेन्टकडे सर्व डॉक्यूमेन्ट्स सबमिट करून थ्रू झाले असते. बॅन्का मधे पडल्या असत्याच. कस्टम्स होते ते वेगळेच. त्या व्यतिरिक्त आयात निर्यात खात्याने ते प्रपोझल शंभरवेळा एव्हॅल्युएट केले असते. मुळात एक कोटीबाहेरचे प्रपोझल डी जी एफ टी च्या अखत्यारीतलेच नव्हते. पण शर्माचे म्हणणे हे होते की ग्रोथ कशी होते यावर विचार तरी करा. मोठे प्रपोझल जर याच बॉडीने थ्रू करून दाखवले तर तिकडच्या कित्येक माणसांना काम राहणार नाही आणि त्यामुळे त्यांचे ब्रेन्स दुसरीकडे वापरता येतील. डी जी एफ टी वाढणार कधी? की फक्त एक कोटीपर्यंतच्या प्रपोझलसाठीच हे भूत उभारून ठेवलेलं आहे? शिशूविहार वर्गातच कायम राहायचे का?

शर्माचे एक होते. तडफ, कमी वय, प्रामाणिकपणाबाबत सर्वदूर पसरलेली ख्याती आणि मोठे उड्डाण करण्यामागील आत्मविश्वास हे त्याचे गुण त्याला कोठेही लीडर बनवायचे. सतराशे साठ प्रयत्न करावे लागतील तिथे शर्माचा एक अर्ज पुरायचा. त्याने वेगवेगळ्या पातळ्यांना दिलेली प्रेझेन्टेशन्स फ्लॉलेस असायची, वर आणखी स्वप्ने दाखवणारी असायची. या मेहताच्या केसमध्ये एक कोटी ते तेहतीस कोटी ही उडी एकाच झेपेत पार करू पाहात होता तो आणि त्यामुळे डी जी एफ टी ला पंख विस्तारण्याचे स्वप्न पडू लागलेले होते. डी जी एफ टी च्या वरिष्ठ अधिकार्‍यांना मनात एकाचवेळी चलबिचल, मत्सर आणि भुरळ पडणे हे प्रकार अनुभवता येत होते. हे थ्रू झाले तर शर्मा डोक्यावर बसणार यात शंका नव्हतीच. त्यामुळे मत्सर. नाही थ्रू झाले तर वरिष्ठ अधिकार्‍यांना लोकप्रतिनिधींचे टोमणे ऐकावे लागणार असल्याने चलबिचल. आणि थ्रू झाले तर डी जी एफ टी ची कार्यकक्षा कित्येक पटींनी वाढणार आणि सत्ता एकवटता येणार हे नक्की, त्यामुळे भुरळ पडणे.

शर्मा कमालीचा कॉन्फिडन्ट होता. सिंपल गोष्ट आहे. जो माणूस दहा कोटींची उलाढाल करतो त्याला प्रॉफिट रेशिओ तोच ठेवून शंभर कोटींची उलाढाल करायला मिळाली तर तो का करणार नाही? डी जी एफ टी ऐवजी दुसर्‍या बॉडीतर्फे हे झाले तर पुन्हा भ्रष्टाचाराची भीती अधिक होती याचे कारण डी जी एफ टी ही निर्माणच मुळी स्वच्छ आयात निर्यातीच्या हेतूने झालेली होती. आणि उलाढाल वाढवायचे स्वप्न शर्मा दाखवत होता. मग ते शर्मालाच पार पाडायला सांगण्यात गैर काय होते? शासनाचे नियम बासनात गुंडाळून काहीतरी अद्भुत होत असेल तर गैर काय?

वरच्या पातळीला स्पेशल केस म्हणून सबमिट करून एक्सेप्शनल केस म्हणून अ‍ॅप्रूव्हल मिळालेले होते.

या सगळ्यात काय गोची आहे हे कोणालाच माहीत नव्हते.

मशीन्स आणल्यावर मेहता युनिट सुरू न होण्याची अनंत कारणे निर्माण करणार होता. बॅन्का मागे लागल्यावर हात वर करून माफी मागणार होता. मग मशीन्स आणि जे काय असेल ते बॅन्का उचलणार होत्या. मेहताचे मॉर्टगेज त्यात जाणारच होते. केस होणार होती. आणि जजला मॅनेज करून मेहता सुटणार होता. आपलाच माणूस पुढे करून बॅन्कांकडून तीच मशीन्स मेहता स्वस्तात विकत घेणार होता आणि द्सर्‍याच्याच नावे युनिट सुरू होणार होते. मधल्यामधे केवळ पंधरा टक्के हे मुद्दल आणि सेकंड मशीन्सचा पड्ल भाव इतक्यातच मेहताला मशीन्स मिळणार होती आणि बॅन्का मोठ्या कष्टाने अमाऊंट्स राईट ऑफ करता येत नाहीत म्हणून आपल्याच वरिष्ठ कर्मचार्‍यांकडे बोट दाखवू लागणार होत्या. मेहताचे मॉर्टगेज असणार होते तीन कोटीचे. पाच कोटीच्या आसपास मुद्दल असणार होते. आणि शेवटी सेकंड मशीन्सचा भाव ती मशीन्स न वापरताही साठ टक्यावर येणार होता. साठ टक्यांवर का येणार होता तर हे सगळे होण्यात जवळपास दिड वर्ष जाणार होते आणि दिड वर्षांनी न वापरलेले मशीनही ऑपरेशनल करायचे म्हंटल्यावर डीलर पैसे पाडून मागणार यात शंकाच नव्हती. ती इन्डस्ट्री प्रॅक्टिस होती.

केवळ अठ्ठावीस कोटीत मेहताला तेहतीस कोटीची मशीन्स मिळणार होती आणि ती मशीन्स वापरून मिळालेला प्रॉफिट निराळाच. काही न करता दिड वर्षात पाच कोटी कुठे कमवता येतात? आणि अब्जाधीश असला तरी पाच कोटींचा मोह पडणारच की?

मोह पडणारच की याचा अर्थ असा होता की हे प्रपोझल मेहताला शर्माने ऐकवलेले होते. शर्माने जोरजोरात हासत ते मान्य केलेले होते. बॅन्केला मॅनेज करणे यापूर्वी त्याने अनेकदा केलेले होते. शासनाला मॅनेज करणे शर्माने!

आणि अ‍ॅप्रूव्हल मिळाल्यावर महान धक्का बसलेला होता. मिळणार असलेल्या पाच कोटीतले दोन कोटी शर्माला द्यायचे ठरलेले होते. याच इगतपुरीच्या फार्महाऊसवर तो व्यवहास पार पडणार होता. शर्मा एकटा येणार होता. मेहता त्याच्या अमन शेख व तीन माणसांसह दोन कोटी घेऊन येणार होता. ही चार माणसे केवळ पैशांच्या सिक्युरिटीसाठी होती. ती माणसे जाताना शर्माला सुखरूप पोचवणार होती. त्यावेळी मेहता मुंबईत एकटा परत येणार होता.

पण विचित्र प्रकार घडला.

सगळे निवांत गप्पा मारत असताना मेहताने बॅग शर्माकडे सरकवली आणि ती शर्मा उचलणार त्या आधीच छतामधून एक माणूस खाली पडला. तो माणूस पाहून कमालीचे धक्के बसलेले सगळे जेमतेम सावरतायत तोवर तो माणूस ती बॅग उचलून दारातून बाहेरही धावला. इतक्या वेगवान हालचाली कोणीच पाहिलेल्या नव्हत्या. छताकडे पाहिले तर छताला कसलेही भोक वगैरे नव्हते. हा कोठून आला ते समजत नव्हते. कुठे गेला तेही समजत नव्हते. दोन कोटी जर शर्माला मिळाले नाहीत तर शर्मा प्रपोझल सहज अडकवणार होता. आणि ते अडकले तर मेहताकडचे दोन कोटी उगीचच जाणार असा अर्थ होत होता. मेहताला उगीच पैसे गेलेले फारसे आवडायचे नाही. मेजर गोची होती ही.

अमन शेखला स्वतःच्या आकारामुळे धावता यायचे नाही. पण बाकीचे तिघे तुफान धावले. बाहेर पडले. इकडे तिकडे पाहिले तर माणूस गायब. सकाळच्या उजेडात भुते येत नाहीत असे त्यांनी ऐकेलेले होते. ते खोटे असावे हे त्यांना पटू लागले.

ते तिघे गेटमधून बाहेर पडून दिसेल त्या दिशेला सुटले. कोणालाही तो माणूस दिसला नाही. मग त्यांच्या लक्षात आले. हा माणूस बंगल्यातच असणार. म्हणून परत आले तर अमन शेखने एक दुबळा माणूस स्वतःच्या हातांनी धरलेला होता. बॅग शर्माच्या हातात होती. आणि मेहता हासत होता.

हा माणूस इथे कसा हे जफरने विचारले तर अमन शेख म्हणाला

"बंगलेके पीछे गया था.. कोई दिखता कैसे नही करके मै पीछे आया तो ये दीवारसे कूदनेका ट्राय कर रहा था.. इसका पैर पकडके इसको अंदर लाया मै.. बांध इसको.."

त्या माणसाला प्रचंड थोबाडून सगळे एकमेकांसोबत बसून त्याचे निरिक्षण करू लागले.

शेवटी शर्माने विचारले. शर्मा टोटल हबकलेला होता. दोन कोटी गेल्याचा प्रश्न नव्हता. ते त्याचे नव्हतेच. पण ते गेले तर त्यासोबत आपली अब्रूही जाईल की काय हे त्याला समजत नव्हते. पण हिय्या करून त्याने विचारले.

"कोण रे तू?"

"बोका "

हे उत्तर ऐकून शर्मा कधी नव्हे असा हासला. शर्मा हासतोय म्हणून मेहता हासला. अमन शेखचे तीन साथीदार साहेब लोक हासतायत म्हणून हासले... फक्त...

.. फत कमालीचा गंभीर झालेला अमन शेख डोळे फाडून बोक्याकडे पाहात होता..

एक एक पाऊल हळूहळू टाकत तो बोक्याजवळ आला..

"काय नांव म्हणालास???????"

"बो... का..."

हबकलेल्या अमन शेखला पाहून बाकीचेही गंभीर झाल.... या छपराट माणसाला अमन शेख का घाबरतोय हे कोणाला समजेना...

"तू बोकायस??"

"हो.."

अमन शेख तसेच विस्फारलेले डोळे ठेवून मागे वळत मेहता साहेबांना म्हणाला...

"सर... ये बोका है...."

मेहताने क्षणभर गंभीरपणे शेखकडे पाहिले. दुसर्‍याच क्षणी मेहता गडगडाटी हसू लागला. तो हासला म्हणून शर्मा परत हासला आणि बाकीचे तिघे हसू लागले तर शेखची एक जोरदार थप्पड उस्मानच्या कानफडात बसली. तसे मात्र सगळे गप्प बसले.

"काय झालं शेख??? याला का मारलंस???"

"याला महत्व समजलं नाही सर.. आपण कोणाला पकडलंय याचं..."

"कोण आहे हा बोका???"

"बोका माहीत नाही??? बोका फार भयंकर आहे..."

"त्यात काय भयंकर??"

"सर... मी पैज लावतो... हा माणूस इथून जाताना एकटा स्वतःच्या पायांनी जाईल आणि ही बॅगही नेईल..."

" अमन... तू निवृत्त हो... "

"चालेल.. आपलं अकाऊंट क्लोज करा... "

"वेडायस का??"

"साहेब... तुम्ही आता फक्त मजा ऐका.. "

"काय???"

"जुनेजा..३२ लाख.. खंडागळे... १५ लाख... हा बोका पैसे पळवतो.. तो जाताना आपल्याला आपण ठार वेडे असल्याचे मान्य होते..हा कसा दिसतो हे कोणालाही माहीत नाही.... हा आत्ता जसा दिसतोय तसा हा नसेलच... मगाशी छतामधून आला की नाही??? असाच कुठूनही येतो... कधीही येतो... काहीही करतो... कसाही दिसतो... वेगवेगळे आवाज काढतो... जमलेल्यांमध्येच भांडणे लावतो.... मुख्य म्हणजे याच्याकडे आणखी एक कला आहे.. ती म्हणजे हा कितीही मार खाऊ शकतो.. त्यानंतर पुन्हा कामगिरीही करतो.... हा फक्त आपल्यालाच हवा आहे असे नाही... हा खात्यालाही हवा आहे.. हा माणूस आपण पकडला म्हणजे एक तर आपले तरी दुर्दैव किंवा हा मरणार तरी...एक लक्षात ठेवा... तो काहीही बोलला, कसाही वागला, वाट्टेल ती आश्वासने दिली तरी फसू नका.. त्याच्यावर सेकंदाचा लाखाव्वा भागही विश्वास ठेवू नका.. आणि आणखी एक... बोका मिळालाच आहे.. तर त्याला इथेच खलास करून इथेच पुरून टाका... खाते एका अक्षराने विचारणार नाही खून का केला म्हणून... कारण जो मेला तो अस्तित्वात होता हेच ते सिद्ध करू शकत नाहीत.. "

बराच वेळ सगळे पकडलेल्या बोक्याकडे बघत बसले. अमन शेखने केलेले वर्णन अविश्वसनीय होते. पण सांगताना तो इतका गंभीर वाटत होता की विश्वास ठेवावा लागत होता.

अचानक बोका रडू लागला.

खाली मान घालून त्याने काही आसवे ढाळली.

मेहताने विचारले.

"का रडतोस बे??"

पुन्हा अमन मधे पडला.

"सर.. त्याच्याशी अक्षर बोलू नका..."

"थांब शेख.. आता तो बांधलेला आहे.. आता तो काहीही करू शकणार नाही.."

शेखच्या चेहर्‍यावरचे उपरोधिक स्मितहास्य कोणीच पाहिले नाही. पण ते वाक्य ऐकून बोका आणखी रडू लागला.

"का बे??? रडतो का तू???"

"उदित आता आश्रम नाही काढू शकणार... आम्हा भक्तांचे काय होणार आता... हे पैसे उदितला हवे होते.."

मेहताला धक्का बसला. उदित हा त्याचा मोठा मुलगा वयाच्या पंचविशीत अध्यात्माला लागलेला होता. त्याला एक आश्रम काढायचा होता साईबाबांचा.. तो पैसे मागत होता पण मेहता त्याला पैसे देत नव्हता..

तेवढ्यात शेख बोलला..

"सर.. त्याला सगळ्यांचे सगळे माहीत असते... तो तुम्हाला अजून न झालेल्या मुलाचेही नांव सांगू शकेल.."

पुन्हा मेहता भानावर आला. हे बेणं वेगळंच आहे हे त्याला समजलं.

"मी उदितचा बाप आहे... मी बघेन काय ते ... तू का रडतोस बाळ???"

"आज द्वादशी आहे ना???"

अचानक बोक्याने विचारले.

"मग??.. त्याचं काय??"

"कुठे काय?? सहज विचारलं.."

मेहता हसू लागला. तसे सगळेच हसू लागले. आणि सगळ्यांना धक्का बसला. कारण बोकाही हसू लागला.

त्याचे हसणे पाहून भांबावलेले बाकीचे सगळे पाच सात सेकंदांनी पुन्हा हसू लागले.

"हा हसतो का रे शेख???"

"अजून काय बघितलंयत सर तुम्ही???... आता एक एक प्रकार समजू लागेल.. "

"काय रे?? तू का हासतोस??"

"अरे मद्दड मेहता.. मी हसेन नाहीतर रडेन.. तुझा काय संबंध?? .. ओरिएन्टल बॅन्केचा चेअरमन आहे की तुझ्या खिशात???"

मेहता उठला आणि पुन्हा हाली बसला. बोका या प्रकरणात बराच खोल मुरलेला असावा असे त्याला वाटले. एवढे करून बोका घट्ट बांधलेला होता. तरी मद्दड म्हणत होता मेहताला.

इतका वेळ हबकलेला शर्मा अचानक म्हणाला..

"मेहता साहेब... मी निघू का??"

"याला जाऊ देऊ नका.. हा ब्युरोला सांगणार आहे..." बोका किंचाळला...

पुन्हा मेहता उठला. यावेळी शर्माकडे बघत खाली बसला. शर्मा क्लीन होता हे तो ऐकून होता. या प्रकरणात आपल्याला एक्स्पोझ करायला शर्माला प्लेस केला असेल की काय असे त्याला क्षणभर वाटून गेले. तेवढ्यात शेख म्हणाला..

"सर.. अहो तो शुद्ध भांडणं लावतो जमलेल्यांमध्ये ..."

"शेख.. ते फिक्श्चर तू सहा लाखाला विकलेले सांगितले नाहीस का रे मेहता साहेबांना??? ते माडवे मशीन्सचे??"

आता शेख उभा राहिला. ही गोष्ट बोक्याला कशी काय माहीत हे त्याला समजेना..

.. एखाद्या प्रकरणात पडताना बोका एक तर अजिबात तयारी न करता पडतो किंवा पूर्ण तयारी करून पडतो हे त्याला माहीत नव्हते.. बोक्याने आत्ता शेखच्या निष्ठेवर एक डेंजरस घाव घातलेला होता..

मेहता संतप्त नजरेने आपल्याकडे बघतोय हे शेखला माहीतच नव्हते...

"शेख??? हे काय ऐकतोय मी??? माडवेचे फिक्श्चर तू विकलेस??? ते तुला मी त्रिवेदला द्यायला सांगितले होते..."

"सर.. अहो हा काहीही बोलतो.. "

"मेहता... तू त्रिवेदला फोन लाव..."

मेहतासाहेबांना अरेतुरे करणारा एकटा बोकाच होता तिथे.. तोही बांधलेल्या अवस्थेत.. मेहतानेच बांधूनही..

मेहताने त्रिवेदला फोन लावला. त्रिवेदने फिक्श्चर मिळाले नाही हे स्पीकर फोनवर सांगितले. आता शेखने बोक्याच्या दोन कानफटीत लावून मेहतासमोर हात जोडले अन म्हणाला..

"सर... मी ते विकले हे खरे आहे.. तुम्हाला फसवून विकले हेही खरे आहे.. खाल्ले मी शेण.. एक क्षण मी खोटा वागलो... पण... पण या माणसाचे नका ऐकू अहो.. हा इतका भयंकर आहे.. "

"शट अप.. ए बोक्या... तुला कसं माहीत याने ते विकले...??"

"मीच घेतले विकत,.. "

"क्कॅय?? "

आता मेहता आणि शेख दोघेही हादरून एकाचवेळी बोलले...

आता शर्मा निघू पाहू लागला.. तसा घशाच्या शिरा ताणत बोका आक्रोशला..

"शर्मा चाललाय... शर्मा चाललाय.. त्याला धरा.."

अमन शेखची जी बाकीची तीन माणसे होती त्यांना इतकेच समजले होते की या बांधलेल्या माणसाने सांगितलेली माहिती मेहता साहेब आणि अमनला महत्वाची वाटत आहे. त्यामुळे त्यांनी शर्माला धरून ठेवले. त्यांना वाटले की शर्माबाबत हा बांधलेला माणूस जे बोलतोय तेही तितकेच महत्वाचे असणार... शर्मा सुटू पाहात असतानाच मेहता बोक्याजवळ गेला...

"बोका.. तू ते फिक्श्चर विकत घेतलेस??"

"हो... ९९२९०५७३६७ वर विचार हवे तर..."

"हा कोणाचा नंबर???"

"ए .. अरे मला काय धरताय मूर्खांनो???" .... तिकडे शर्मा बोंबलत होता..

मधेच बोका संतप्तपणे ओरड्ला...

"तुझ्यामुळेच ही अवस्था झालीय मेहताची... तूच दिलेस ना अमन शेखला दहा हजार रुपये??"

आता बोका जे विधान करेल ते स्फोटक ठरत होतं... मेहताने अवाक होऊन एकदा शर्माकडे आणि एकदा शेखकडे पाहिलं...

शर्मा जिवाच्या आकांताने ओरडला..

"अबे कसले दहा हजार रुपये???"

तोवर शेखने पुढे होऊन बोक्याला थोबाडले होते.... ते पाहून मेहता सरकला... शेखला म्हणाला..

"माझी फिक्श्चर्स परस्पर विकतोस आणि यालाच मारतोस???"

"माझ्या साखळ्या सोडा..."

बोक्याने उरलेल्या तिघांना शांतपणे आज्ञा केली.. ते तिघे आता शर्माला सोडून बोक्याला सोडायला पुढे सरसावले.. ते पाहून शेखने सरळ उस्मानला पुन्हा एक लगावली अन म्हणाला..

"तुम्ही तुमचे काम करा रे..."

हे ऐकून तिघांनी पुन्हा शर्माला हरले..

शर्मा ऑफिशियल भाषेत भडकला..

"मेहता... आय विल टीच यू अ लेसन... "

बोक्याने ते पाहून मेहताला सुनावले..

"बघ.. बघ तो शर्मा कसा त्याच्या औकातीवर आलाय.. मी हेच सांगत होतो..."

आता हद्द झालेली होती... शेखने मुलाहिजा न बाळगता सरळ मेहताचे खांदे धरून मेहताला गदागदा हालवले..

"अहो मेहता साहेब हा जमलेल्यांमध्ये मारामार्‍या लावतो... आधीपासून सांगतोय मी तुम्हाला..."

गदागदा हालताना मेहता शेखकडे थिजून पाहात होता.. तोवर शर्माला त्या तिघांनी सोडले.. त्यांनाही पटले की हे बांधलेलं बेणं काहीही बोलतंय बहुतेक..

शर्माला सोडताच शर्माने समोर असलेल्या उस्मानच्या कानाखाली वाजवली. गेल्या दहा मिनिटांतली ही तिसरी विनाकारण थप्पड असल्याने आता उस्मानचे टाळके आऊट झालेले होते. पण तो घुसमटत उभा राहिला.

"उस्मान.. तूही दे त्याला एक ठेवून..." .... बोका डोळे संतप्त करत उस्मानला म्हणाला...

बोक्याची तेथील नेमकी पोझिशन काय आहे याबद्दल कोणीच नीट क्लीअर नसल्याने उस्मानलाही जे हवे होते त्याचीच आज्ञा मिळाल्यासारखे वाटले व त्याने मागे वळून डी जी एफ टी च्या असिस्टंट डायरेक्टरला थोबाडात लगावली. शर्माला असल्या सवयीच नसल्याने तो खाली पडला. मात्र ते दृष्य पाहून शेख पुढे झाला आणि त्याने उस्मानला आणखी एक ठेवून दिली.

कोण कोणाला का मारतोय हे मेहताला समजत नव्हते. तो आळीपाळीने सगळ्यांकडे बघत होता.

"सगळे बसा... सगळे बसा..." अचानक शेख बोलला...

प्रत्येकजण मगाचच्या जागेवर बसले.

आता सगळे शेखकडे पाहू लागले.

"जुनेजाशेठ आणि जाधवला बोलवा..."

शेखने आज्ञा केली...

जफरने मेहतासाहेबांच्या फोनवरून दोघांना कॉल करून इगतपुरीला यायला सांगितले. बोका हे नांव ऐकल्यावर वाटेत मुतायलाही न थांबता आम्ही पोचू असे दोघांनी सांगितले. त्यांना यायला सहा तास लागणार होते. सहा तास बोक्याकडे ढुंकूनही न पाहता वेगळ्या खोलीत बसायचे असे ठरले. बोक्याला जरा आणखीच नीट बांधले गेले. अजिबात हालता येणार नाही अशी सोय करून ठेवली. तोंडात बोळा कोंबण्याआधी त्याच्या घशात दोन भांडी पाणी ओतण्यात आले. त्याला सोडून सगळे आज इगतपुरीतच राहायचे असे नव्याने ठरवून आतल्या खोलीत आले.

मेहताने त्याच्या फार्म हाऊसवर बोलावल्यावर येणार्‍या अशा एक कुटुंबाला फोन करून बोलावले. बोक्याची सोडून सगळ्या खोल्या साफ करून घेतल्या. बोक्याचा आवाज बाहेर येणे शक्यच नव्हते. जोडप्यातील नवर्‍याने खाद्यपदार्थ करायला घेतले. जफरने जाऊन बाटल्या आणल्या तासाभरात. आज धमाल येणार याचा आनंद सगळ्यांच्या मनात होता. ज्याअर्थी जुनेजा हातातले काम टाकून इगतपुरीला सुटलाय त्या अर्थी बोका सापडला हे बरेच झाले असे सगळ्यांना वाटू लागले.

सहा तास सगळे जण हासत खेळत गप्पा मारत होते. गैरसमज मिटल्यामुळे शर्माही आज तिथेच थांबतो म्हणाला. सहा तासांनी दोन गाड्यांचा आवाज ऐकू आला तसे सगळे पाहू लागले. बोका झोपलेला होता. जुनेजा आणि जाधव आले.

त्यांचे आगत स्वागत करण्यास वेळच नव्हता. आले ते सरळ सगळे बोक्याच्या खोलीतच आले. आणि बांधलेल्या व झोपलेल्या मरगळलेल्या बोक्याला पाहून जुनेजाने पहिला बॉम्ब टाकला.

"हा कोण?"

चक्रावलेला अमन शेख म्हणाला..

"बोकाय हा.."

"ह्यॅ...फालतू सफर घडवलीत आम्हाला... "

"म्हणजे?? "

"हा कसला बोका??? बोका साधारण पन्नाशीचाय.."

जाधव बोक्याच्या जवळ जाऊन त्याला निरखू लागला.

"साहेब.. हा बोका नाही"

ते ऐकून जुनेजा जोरात म्हणाला...

"जवळ जाऊन तेच सांगतोस होय जाधव??? मी इथून सांगतोय तो बोका नाहीये.."

"मग हा कोण आहे??" ... मेहता पहिलीतल्या मुलासारखा जुनेजाकडे बघत म्हणाला..

"मेहता... जगातला कोणताही माणूस पकडून तू मला काय बोलावतोस बोका पकडला सांगत???"

मेहता आऊट झालेला होता. त्याची नजर शेखकडे वळली. शेख पुढे झाला. जुनेजाला म्हणाला..

"साहेब.. हा बोका नाही कशावरून म्हणताय तुम्ही???"

"तू कशावरून म्हणतोस हा बोका आहे??"

"तो स्वतः म्हणाला..."

"मेहता... तुझी माणसं बदल.. उद्या मी मला बोका म्हणेन... आपण सगळेच बोके आहोत... हा बोका... तो बोका.. तू बोका... मी बोका.. सगळे बोके.. "

आता मेहता शेखकडे वळला...

"काय रे शेख... याला का पकडलं???"

"आँ??? म्हणजे??? अहो हा बॅग घेऊन पळत नव्हता का??"

"का पळत होता??"

"दोन कोटी घेऊन पळत सुटलावता हा साहेब..."

" हो पण ते दोन कोटी शर्माला दिल्यानंतर पळवले ना? मग तुमचा त्याच्याशी काय संबंध?"

कोण बोललं? बोललं कोण??

सगळ्यांनी पाहिले तर तोंडात बोळाबिळा काहीही नसलेला बोका शांतपणे मेहताकडे बघत होता.

आऊट झालेल्या मेहताला हे पटलं..तो शर्माला म्हणाला....

"शर्मासाहेब.. तुमचे पैसे मी का वाचवू???"

"मेहता... डोकं फिरलं का???" शर्मा किंचाळला..

"थांबा थांबा... थांबा सगळे... ए... तू कोण आहेस???"

जुनेजाने सगळ्यांना भानावर आणलं..

"हा म्हणतो म्हणे मी बोकाय"

शेखकडे बघत बोका खिन्नपणे म्हणाला..

शेखने जाऊन त्याच्या कंबरेत अमानवी लाथ घातली.. बोका आर्त किंचाळला...

"भडव्या... तू स्वतःचे नांव काय सांगितलेस???"

"मला बोलू तरी दिलेत का कोणी??"

"ए थांबा... शेख... तुझ्या माणसांना म्हणाव अर्ध्या तासात याचा लगदा बनवा.."

जुनेजाने शेखला सांगताच शेखची माणसे बोक्यावर बुक्यांचा वर्षाव करू लागली. हळूहळू बोक्याचे किंचाळणे बंद होत गेले. शेख, मेहता, शर्मा आणि जुनेजा बाहेर येऊन बसलेले होते. मग उस्मान, जफर आणि पनी असे तिघेही बाहेर आले.

"काय झालं??"

" बेशुद्ध पडला"

सगळे पुन्हा खोलीत आले. बांधलेल्याच अवस्थेत बोका अस्ताव्यस्त पडलेला होता. कोणालाही वाईट वाटले नाही. उलट थोडे बरे वाटले.

आता सगळे निवांत बोलू लागले.

जुनेजाने विचारले.

"मेहता केस काय आहे???"

मेहताने सर्व प्रकार सांगितला. फक्त मेहता युनिट सुरूच होऊ देणार नाहीये हे नाही सांगितले.

"हा खरच स्वतःला बोका म्हणवतोय का?"

"बोकाच आहे तो... एकदम छतामधून उपटलाय तो.." शेख बरळला..

जुनेजा शांतपणे बोक्याकडे पाहात होता. नंतर जाधवला म्हणाला..

"जाधव.. बोल... किती घेणार??"

"आता काय बोलायचं आम्ही?? दोन खोकी तर शर्मासाहेबांनीही उचलली..."

"म्हणजे???"

"माणूस जिवंत असताना दोन खोकी मिळतायत साहेबांना.. मेला तर किती मिळायला हवीत.."

"जाधव.. शर्मासाहेबांचा याच्याशी संबंध नाही.. तू तुझी किंमत बोल..."

"वीस लाख.."

बोक्यासाठी एकशे वीस लाखही हसत दिले असते जुनेजाने... पण नाटक ते नाटक आणी जाधव चढून बोलणे त्याला आवडत नव्हते....

"जाधव... याला आम्ही उडवतो... निघ तू..."

खलास... विषयच संपला जाधवचा...

"साहेब.. मला इथे बोलावलं कशाला मग??"

"मेहता.. त्याला येण्याजाण्याचे पैसे आणि दोन हजार दे..."

मेहताने जाधवसमोर पैसे धरले तसा जाधव खिडकीतून बाहेर बघत थुंकला..

"जाधव.. नीट वाग..."

"मी माझ्या पैशाने येतो जातो जुनेजासाहेब... मला फक्त कामगिरीचे पैसे हवे असतात... हरामचे नाही.. मात्र एक ठरले.. यापुढे तुमचे आणि मेहतांचे काम आपण नाही करणार..."

"जाधव.. तू अवाच्या सवा किंमत मागीतयावर काय करणार???"

"साहेब माझ्या डोळ्यांदेखत खोकी फिरतायत अन तुम्ही मला अडवताय..."

"जाधव.. फायनल... एकच माणूस आहे... दोन लाख देतो..."

"सॉरी जुनेजासाहेब.. मी जे ऐकले आहे त्याप्रमाणे... मी जर याला न मारता गेलो.. तर हा बोका तुम्हा सर्वांना आवरायचा नाही..."

हे अमन शेखला रुचले नाही..

"ए जाधव... तू तुझं काय ते बोल... आमचं बघू आम्ही...."

आता जाधव सरकला..

"ऐ.. कोणाशी बोलतो??? माझे आणि जुनेजासाहेबांचे पाच वर्ष संबंध आहेत..हा तुझा मेहता दोन हजार रुपये देतोय मला.. "

"ऐ..."

"ए अरे थांबा रे जरा.... जाधव .. फायनल ऑफर.. तीन लाख.."

"जुनेजाशेठ... दहा... लास्ट बोलतोय.. "

"पाच..."

"सॉरी.."

"ओके.. सात ???"

"आठ..."

"आठ... ओके.. आम्ही बाहेर जातो..."

"मला कामगिरी करायला आधी खंबा लागतो ड्राय.. नाहीतर मन करत नाही..."

"मेहता.. याला दारू मिळेल ना???"

"नक्की... उस्मान... आतली बाटली आण.."

उस्मानने खंबा आणून फोडून जाधवला दिला..

सगळे बाहेर निघून आले..

किती वेळ लागेल हे कोणालाच माहीत नव्हते.. सगळे जण चूपचाप बसले होते... आतला कानोसा घेत.. तसा बोका बेशुद्ध होता... पण तरी चिवट माणूस मरायला वेळ लागतोच... पाच दहा मिनिटातंच एक आवाज आला.. साखळ्यांचा... तो काही सेकंद आला... नंतर पाते आपटल्याचा... नंतर एक घुसमटती किंकाळी.. नंतर थोडी थडथड धडधड...

थोड्या वेळाने सगळे शांत झाले.. कोणत्याही क्षणी जाधव बाहेर येईल हे आता माहीत होतेच.. जुनेजाने ईश्वराची माफी मागीतली आणि फस्सकन हासला.. बोका... बोका संपलेला होता...

तेवढ्यात बाहेर डोकावत जाधवने सांगितले...

"जुनेजाशेठ... काम झालेले आहे.. मात्र जीव पुरता जायला अजून दहा मिनिटे लागतील..."

कळवळून जुनेजा म्हणाला..

"वार कर अजून दोन तीन..."

"गरज नाही.. साफसफाई करायला माणूस मिळेल ना???"

मेहता लगबगीने म्हणाला...

"हे लपवून ठेवावे लागेल.. सफाई तूच कर जाधव..."

"ओके सर.."

जाधव परत आत गेला..

इकडे शर्माची बोलतीच बंद झालेली होती... त्याच्या भेदरलेल्या डोळ्यात मृत्यूची भीती स्पष्ट दिसत होती...

... एका माणसाला सरळ मारले जात आहे आणि आपण तेथून केवळ काही फुटांवर आहोत हे त्याला सहन होत नव्हते.. पण हे त्याच्याही भल्यासाठीच असल्याने तो कसाबसा बसला होता.... असल्या भानगडीत पुन्हा पडायचे नाही हे त्याने ठरवलेले होते...

इकडे आत घडलेला प्रकार काय होता?

बेशुद्ध बोक्याजवळ जाधव येताच बोक्याने चपळाईने त्याच्या पायात आपले बांधलेले पाय अडकवून त्याला स्वतःच्याच अंगावर आपटवला होता आणि साखळ्यांमध्ये बंदिस्त असलेले दोन्ही हात जाधवच्या गळ्यावर दाबून जाधवला पाते टाकून द्यायला भाग पाडलेले होते. तेवढे होत असतानाच बोक्याने स्वतःची सुटका त्याच्याकडून करून घेतलेली होती. त्यानंतर पाते हातात घेऊन बोक्याने ते पाते आपटून स्वतःच घुसमटल्यासारखा आवाज काढला होता. बघतच राहिलेल्या जाधवच्या गळ्यावर ते पाते दाबून बोका त्याला म्हणाला..

"यड्या.. मी शुद्धीतच आहे.. आठ लाखांत मला मारतोयस???.. त्यापेक्षा एक एक कोटी वाटून घेऊ... येऊन जाऊन तो अमन शेख आणि त्याची ती बुळी माणसे... त्यांना सपाट करायला किती वेळ लागतोय?? शर्मा, जुनेजा आणि मेहता तर लटपट कापतीलच... मी तर म्हणतो जुनेजाला उडवू म्हणजे तो तुझ्या मागे लागणार नाही... आणि बाकीच्यांना फक्त पिटून काढू... काय??? ... चल... दारातून त्यांना सांग की काम जवळपास झालेले आहे.. जीव जायला अजून थोडा वेळ लागेल..म्हणजे ते सेलिब्रेट करायला सुरुवात करतील... काय????"

जाधवने दाराबाहेर डोकावून ते सांगितले तेव्हा त्याचे दोन्ही हात त्याच्याच पाठीवर दाबले गेले होते आणि मानेवर सुर्‍याचे पाते दाबले जात होते...

बाहेर सेलिब्रेशनचा आवाज वाढू लागला तसे अचानक जाधव आणि बोका शस्त्रे घेऊन तिथे अवतरले..

त्यांना तसे पाहून भूत पाहिल्यासारखी अवस्था तर शेखचीही झाली.. बाकीच्यांची काय कथा...

मात्र जुनेजाला मारले नाही जाधवने.. शेवटी संबंध होते बिझिनेसचे...

... फक्त इतकेच झाले.. की बोक्याबरोबर वाटण्या करायला वेळच मिळाला नाही... त्यामुळे ऐनवेळी बोका सगळेच पैसे घेऊन पळाला...

पार्टी रात्रभर चालू राहिली... पण ती याचमुळे.. की जाधवने सांगितले की बोक्याने त्याच्या गळ्याला पाते लावून हे करायला लावल्यामुळे... अन्यथा जाधवला शेखने नुसते हातापायांनीच मारले असते... आणि या पार्टीत सेलिब्रेट कोणीच करत नव्हते.... सगळे शिव्या देत होते बोक्याला... एकटा अमन शेख शिव्या देत नव्हता त्याला...

कारण तो बाकीच्या सगळ्यांना म्हणत होता...

"सांगत होतो मी... विश्वास ठेवू नका...."

=================================

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

छान