बोका - पाच माणसं.. एक पहिलवान... एक..

Submitted by बेफ़िकीर on 23 March, 2012 - 07:37

सलग तिसरा दरोडा पडला आणि बोका सावध झाला.

एकाच शहरात दोन महिन्यांच्या कालावधीतील हा तिसरा दरोडा होता.

पद्धत फार वेगळी नव्हती.

पहिल्या वेळी एका गावाबाहेरच्या दुमजली बंगल्यात रात्री दरोडा टाकून बरेचसे सोने घेऊन दरोडेखोर पसार झाले होते. बंगल्यात राहणार्‍यांनी सांगितले होते की ते पाच जण होते आणि पाचहीजणांनी चेहरे झाकलेले होते. ते एकमेकांशी किंवा आमच्याशी फारसे बोलत नव्हते. तिघांनी आम्हाला शस्त्राचा धाक दाखवून स्थानबद्ध केले आणि उरलेल्या दोघांनी कपाटे फोडली. आम्ही घरात काही इतरही ठिकाणी थोडे पैसे वगैरे ठेवलेले असतात. पण त्या दरोडेखोरांना फारच घाई असावी. हाताशी जे सहज लागले ते घेऊन दरोडेखोर लगेच निघून गेले. आम्ही प्रतिकार करायचा प्रयत्न केला तेव्हा थोडी मारहाण झाली. बाकी आम्ही घाबरून गप्प बसल्यावर त्यांनी आम्हाला काहीही केले नाही. जाताना त्यांनी सगळीकडे कसलेतरी सेंट उडवले, फरशीवर दोन बादल्या पाणी टाकले. हातात ग्लोव्ह्ज घालून ते फिरत होते. संपूर्ण पोषाख जीन्सचाच होता. फक्त त्यांच्यातील एक जण थोडासा लंगडत होता किंवा वाकडा चालत होता. आमच्याकडचे जवळपास अडीच तीन लाखाचे सोने आणि चाळीस हजार कॅश गेली. त्यांच्याकडे सुरे आणि गज होते. सफाईने हालचाली करत ते दरोडा टाकून निघून गेले.

दुसर्‍या दरोड्याची बातमी पहिल्या दरोड्याची भीती लोकांच्या मनातून जायच्या आतच आली. दुसर्‍या वेळी एका भरवस्तीतील सोसायटीतील एका वृद्ध जोडप्याच्या घरात संध्याकाळी अंधार पडल्यावर तीन जण घुसले. दोघांना धाक दाखवून वृद्धेच्या गळ्यातले, कानातले व हातातले घेतले. कॅश कमीच होती. फक्त सहा सात हजार होते. मात्र त्यांना एक हनुमानाची देव्हार्‍यातील मूर्ती सोन्याची वाटली म्हणून ते ती घेऊन गेले. आम्ही ओरडूही शकलो नाही इतके आम्ही घाबरलेलो होतो. त्यांनीही चेहरे झाकलेले होते. एकमेकांशी ते काहीच बोलत नव्हते. मात्र त्यांच्यातील एक जण आमच्याशी मात्र बोलला. आम्हाला त्याने जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या, शिवीगाळ केली आणि भिंतीशी दाबून धरले. तो हिंदी बोलत होता. अस्खलीत हिंदी नव्हे तर साधारण टपोरी टाईपचे. आमच्या गेलेल्या सोन्याची किंमत मात्र जास्त होती व जवळपास दिड लाखाच्या आसपास होती.

तिसरा दरोडा मात्र काल रात्री, म्हणजे पहिल्या दोन दरोड्यांनंतर जवळपास सव्वा महिन्याने पडला.

तो दरोडा एका बंगल्यांच्या कॉलनीतील एका अशा बंगल्यावर पडला ज्याच्यापासून इतर बंगले बर्‍यापैकी लांब होते. या बंगल्यात दोन जोडपी व दोन मुले राहात होती. आजी आजोबा, आई वडील व त्यांची दोन मुले! यावेळी दरोडेखोर पाच होते. सर्वांनी चेहरे झाकलेले होते. यावेळी प्रतिकार करणार्‍या तरुण पुरुषाला थोडी मारहाण झाली. मुले रडायला लागल्यावर त्यांनी मुलांना घाबरवले. यावेळी त्यांनी बराच वेळ घरात घालवला. हा बंगला मोठा असल्याने यात अनेक ठिकाणी पैसे असतील असे मानून ते जवळपास अर्धा तास घरातच वावरत होते. सर्व फोन एकाने हस्तगत करून बंद करून ठेवलेले होते. यावेळी धाक दाखवायला पाचपैकी चौघे थांबलेले होते. ते शिवीगाळ करत होते. आमच्याकडचे जवळपास सात लाखाचे सोने आणि इतर काही दागिने त्यांनी पळवले. कॅश जवळपास वीस हजाराची गेली. पहाटे तीन वाजता घरात घुसलेल्या या दरोडेखोरांनी जाताना सर्व खोल्यांमध्ये कसलेतरी उग्र वासाचे सेंट उडवले व जाताना बाहेरून सर्व दारे बंद करून टाकली व आमचे फोन घेऊन पळून गेले. त्यांच्यातील एक जण थोडा बुटका होता व तो धाक दाखवण्यात सर्वात पुढे होता. सर्वाधिक शिवीगाळ व मारहाणही त्यानेच केली.

सकाळी दहा वाजता एका चहाच्या टपरीवर बोका समाधी लावल्यासारखा रस्त्याकडे बघत बसला होता. त्याला नेहमीचे गिर्‍हाईक असल्याने उठवत कोणीच नव्हते. तशीही रस्त्यावर लगबग असल्याने आत्ता चहाच्या टपरीवर फारशी गर्दीही नव्हती.

बोक्याचे तीक्ष्ण डोळे रस्त्यावर रोखलेले होते आणि मेंदू गंभीरपणे विचार करत होता.

तीनही दरोड्यातील टोळ्या पोलिसांना सापडलेल्या नव्हत्या. रस्त्यांवर रात्रीचे चेकिंग सुरू झालेले होते. सेंटचा वास पोलिसांना माहीत झालेला असल्याने तो सेंट कोठेकोठे मिळतो हे बघायला गेले तर शेकडो ठिकाणी मिळत होता. खबर्‍यांकडून त्यांच्या त्यांच्या भागातल्या हालचाली समजून घेतल्यावर लक्षात आले होते की कोणत्याच भागात काहीही विशेष घडलेले नाही. कोणीच नेहमीपेक्षा अधिक खर्च करत नाहीये. कोणीच ग्रूपने हिंडू लागलेले नाहीये. वाकडा चालणारा असा कोणता माणूस आहे ज्याचे काही ना काही क्रिमिनल रेकॉर्ड आहे हे बघायला गेले तर आठ माणसे मिळत होती. यातील तीन माणसे कायमची परगावी सेटल झालेली होती. दोन मेलेली होती आणि उरलेली तीन पोलिसांच्याच ताब्यात होती. सोनारांच्या दुकानांमध्ये टिच्चून चौकशी करूनही कोणी असे सोने विकायला आणल्याची खबर नव्हती. दरोडे पडलेले तीनही विभाग इतक्या भिन्नभिन्न दिशांना होते की त्यांच्यात काही सुसुत्रता मांडता येत नव्हती. नेहमीचे कलाकार गुन्हेगार ऑलरेडी आत घेऊन बडवून झालेले होते. त्यांनी त्यांची गेल्या दोन महिन्यांतील व्हेअरअबाऊट्स सिद्ध केलेली होती. त्यांचा कशातच हात नाही हे सरळ समजत होते. मुळात दरोडे टाकणारी एकच टोळी आहे, दोन आहेत की तीन आहेत हेही समजत नव्हते. दरोडेखोर सुशिक्षित आहेत की नाहीत हेही समजत नव्हते. म्हातार्‍या जोडप्याच्या फ्लॅटमध्ये जाण्याआधी एकाच मोटरसायकलवरून तिघे आलेले होते. वॉचमनच्या रजिस्टरमध्ये त्यांनी वेगळ्याच फ्लॅटमध्ये जाण्याची नोंद केलेली होती. हेही कसे समजले तर तीन जण आले होते का विचारल्यावर वॉचमन म्हणाला ते तर त्या फ्लॅटमध्ये गेले होते. त्या फ्लॅटमध्ये कोणीच गेलेले नाही हे समजल्यावर तेच हे तिघे असणार हे लक्षात आलेले होते. दोन खेळणार्‍या मुलांनी आणि एका आजींनी त्यांना पाहिलेले होते. तेव्हा मात्र त्यांचे चेहरे झाकलेले नव्हते. ते कसे दिसतात विचारल्यावर मात्र त्या तिघांना विशेष असे काहीच सांगता आले नव्हते. कपड्यांचा रंग फक्त सांगता आला होता. पाच दहा सेकंदात आणि तेही नुसती मान वळवून पाहिल्यावर असे काय खास समजणार लोकांना! मात्र वॉचमनने एक गोष्ट सांगितलेली होती. तिघेही एकाच वयाचे असावेत आणि त्यांच्यातील एक पहिलवान असावा. सर्वांना मिश्या होत्या आणि रगेल वागणे असावे असे वाटत होते. त्यांची नांवे वाचली तर उत्तर भारतीय नावे निघाले. शिवकुमार त्रिपाठी, राजेश सेठी आणि प्लस वन असे लिहिले होते. ही नांवे बोगस असणार हे स्पष्टच होते. तिघे मराठी वाटत होते हे वॉचमन आणि आजीबाई ठामपणे सांगत होत्या. त्या जोडप्याचे या नांवांचे कोणीही नातेवाईक अथवा स्नेही नव्हते.

पोलिस खाते हतबल मुळीच झालेले नव्हते. गुन्हेगार सापडणार हे त्यांना माहीत होते. पण प्रश्न होत अकधी सापडणार इतकाच. आणखी एक दरोडा पडू नये, त्या आधीच ते सापडावेत असे मात्र सगळ्यांना मनापासून वाटत होते.

बोक्याने अनेक गोष्टी गृहीत धरल्या.

उत्तरप्रदेशीय नांवे देण्यात त्या लोकांचे या भागात होत असलेले वाढीव स्थलांतर आणि त्यांच्यातील गुन्हेगारी प्रवृत्ती यांचा खुबीने वापर केलेला दिसत होता.

तिघेही एकाच वयाचे होते याचा अर्थ कॉलेजमधील विद्यार्थी असण्याची शक्यता बळावत होती.

तिन्ही दरोड्यात त्यांना सोन्याची शोधाशोध करावी लागली असली तरी घरात प्रवेश मिळवणे अगदी सोपे वाटत होते. माहीतगार म्हणावेत तर तिन्ही घरातल्यांच्या एकमेकांशी सुतरामही संबंध नाही. कोणी लांबचे नातेवाईकच काय, तर कॉमन ओळखीतलेही कोणी नाहीत. अजब कारभार होता.

एक जण पहिलवान होता हे बघितले तर जीमला जाणारे असावेत असा अंदाज काढता येत होता.

एक जण बुटका आणि आक्रमक होता हे पाहिले तर काहीच समजण्यासारखे नव्हते.

पाच जण होते की तीन हा प्रश्न आणखीन एक होताच. ते पाच आणि हे तीन वेगळे की एकच टोळी????

आणि एवढे सगळे करून पोलिसांना पुन्हा स्वतः बोकाच हवा असल्यामुळे पोलिसांशी संपर्क करणे घातकीच होते.

बोका नेमका कसा दिसतो आणि केव्हा कुठे असतो हेच माहीत नसणे हे बोक्याचे पहिले सर्वात मोठे अस्त्र होते तर गोंधळाचे वातावरण निर्माण करून पुरता घोळ झाला की पैसा खिशात टाकून प्रकरणातून सटकायचे हे दुसरे सर्वात मोठे अस्त्र.

या दरोड्यांच्या मालिकेत बोक्याला स्वारस्य निर्माण होण्याचे कारण एकच होते. जवळपास एकदम बारा चौदा लाखांचा माल हाती पडेल आणि ती टोळी सापडवून दिल्यामुळे खात्याचा आपल्याबाबतचा दृष्टिकोन कदाचित थोडासा निवळेल असे त्याला वाटत होते. अर्थात, तो निवळला काय आणि नाही काय, बोका आयुष्यात खात्याशी संपर्कात येणार नव्हता स्वतःहून.

असलेल्या तुटपुंज्या माहितीवर बोका काय करता येईल याचा विचार करत होता.

तीनही केसेसमधील कॉमन बाबी शोधायच्या तर तशा काहीच नव्हत्या असे नाही. पण सोने व कॅश गेली, हिंदी बोलले व सेंट उडवले इतक्याच तीन गोष्टी साम्य दर्शवणार्‍या होत्या. माणसांची संख्या बदललेली होती. ठिकाणे तर पारच वेगळी होती. आणि सर्वात मुख्य म्हणजे ज्यांना लुटले ते फार अती श्रीमंत होते अशातला भाग नव्हता.

आणि एका क्षणी विचार करताना बोका ताडकन उठून उभा राहिला.

ही केस आपण नक्की सोडवू शकू हे त्याला पटले तसा त्याने आणखी एक चहा मारला आणि लहानश्या स्कूटरला किक मारून बोका कामगिरीवर निघाला.

झब्बा घातलेला, डोक्याला पांढरट केसांचा टोप लावलेला आणि जाड चष्मा घातलेला हा प्रौढ माणूस म्हणजे तरणाबांड बोका आहे हे ब्रह्मदेवाच्या बापाला समजले नसते.

===========================

आपल्याला भेटायला कोणी येऊ शकेल हे सावंतला कधीच वाटलं नव्हतं

भाताची थाळी बाजूला सरकवत उठून त्याने खोपटासारख्या टिचभर खोलीचे दार उघडले.

बाहेर एक राकट देहाचा पण मध्यम उंचीचा मिशीवाला उभा होता. त्याच्या डोळ्यात समोरच्याला खरंच बोलावसं वाटेल अशी ताकद होती.

"सावंत, बाहेर ये"

सावंतला असे लोक पाहून माहीत होते. रापलेला चेहरा, मिश्या, कडक वागणे! हवालदार असणार.

हादरलेला सावंत बाहेर आला.

"चल... चौकीवर.."

"का साहेब???"

खाड

सावंतचा डावा गाल सुजला. हेलपाटत तो एका भिंतीवर आदळला. या साहेबाला सावंतच्या खोलीपर्यंत आणणारा माणूस ते दृष्य पाहून मागच्यामागे पळाला.

मात्र काही माणसे जमा होऊ लागली.

"तुझ्या श्राद्धाचं जेवण आहे... चल..."

"मी काय नाय केलं साहेब..."

सावंतच्या पोटात एक भयानक लाथ बसली. सावंतला मार तर खावाच लागणार होता.

आत्ताच खाल्लेला भात डचमळून पुन्हा घशातून बाहेर येतोय की काय असे सावंतला वाटले. कितीतरी वेळ पोट धरून तो वाकलेलाच होता.जरा बळ आल्यावर कसाबसा उभा राहात रडत हात जोडत म्हणाला..

"आईच्यान साहेब... मी काय नाय केलं..."

आता साहेबाचा हात हालणार तेवढ्यात सावंत घाबरून आधीच ओरडू लागला. त्याची मान धरून साहेब त्याला आपल्या गाडीकडे न्यायला लागला.

कापायला नेला जात असलेल्या बोकडासारखा सावंत मागून निघाला.

मेनरोडवर आल्यावर साहेबाने त्याला कारमध्ये ढकलले. आयुष्यात पहिल्यांदाच कारमध्ये बसलेल्या सावंतला तो अनुभव सुखद मात्र वाटला नाही.

कार वेगात जाऊ शकते हे सावंतला माहीत होतं... अशी विमानासारखी उडूपण शकते हे आज कळलं...

शिरोलीपुढच्या टेकाडावर एक कच्चा रस्ता जायचा. गाडी थेट टेकाडावर जाऊन थांबली. इथे कधी चौकी निघाली ते सावंतला माहीत नव्हते.

गारढोण हवा लागल्यावर जरा बरे वाटले त्याला, पण पुढच्याच क्षणी फारच जास्त वाईट वाटले. तेथे काहीच नव्हते. कारच्याच दिव्यांच्या उजेडात काय दिसत होते तेवढे दिसत होते. हबकलेला सावंत साहेबाकडे पाहू लागला.

साहेब बॉनेटवर बसून म्हणाला.

" खरं बोलणं बंद केलंस की लाथा बसतील.. पळायचा प्रयत्न केलास तर मुडदा... विचारतो त्या प्रश्नांची उत्तरे खरी दिलीस तर सोडून देईन...दरोडा घालणारे कोण होते????"

"नाही... नाही माहीत मला.. खरं सांगतोय... "

"वर्णन कर तिघांचं..."

"एक पहिलवान व्हता.... त्यानं गॉगल लावलावता.. "

"शर्ट पँट???"

"नाई... त्याने नाहीका ते पैलवान घालतात तसला झब्बा घातलावता... "

"तो काही बोलला का???"

"नाई..तो गुटखा खात होता... "

"कशावरून????"

"तिथे थुंकला तर मी म्हणालो की इथे थुंकायला मनाई आहे तर माझ्याकडे कसलं बघितलं..."

"कसलं बघितलं??"

"लावतोय फटके आता असंच वाटलं.."

"उंची???"

"उं... उंची आसल तुमच्याइतकीच.. थोडी जास्त आसंल... "

"दुसरा??? "

"दुसरा मोटरसायकल चालवत होता.. त्याच्या कपाळावर गंध व्हतं.. "

"केशरी का??"

"नाई.. लाल..."

"कपडे???"

"काय एवढं लक्षात नाई खरं.. पण आसंच आपलं शर्ट पँट बिंट.."

"रंग???"

"निळा... निळा शर्ट व्हता..."

"तो काय बोलला????"

"त्याने फ्लॅटचा नंबर सांगितला.. आन एन्ट्री केली..."

"आवाज कसा होता???"

"नाई लक्षात यवढं..."

"गोरा, सावळा, काळा???"

"सावळा असावा.."

"असावा म्हणजे???"

"अंधार पडू लागल्याला व्हता.. "

"हिंदी बोलला का मराठी??"

"तो होय ?? .. हिंदी..."

"तू काय विचारलंस???"

"कुठं जायचंय..."

"मराठीत??? "

"हो..."

"तो काय म्हणाला???"

"३०३ मे जानेका है..."

"जानेका की जाना???"

"नाई आठवत..."

"३०३ मधे कोण राहतं???"

"जुन्नरकर... त्यांचा नाई संबंध..."

"तुला कसं माहीत.. ??"

"आता तुमच्या खात्याला माहितीय की..."

"हं... तिसरा???"

"तिसरा लय गोरा व्हता साहेब..."

"ते दिसलं वाटतं अंधारात...."

"होय होय... खरंच दिसलं... चांगल्या घरचा वाटत होता.."

"बोलला का??"

"तो नाही बोलला..."

"कपडे??"

"हे आसंच ... शर्ट बिर्ट..."

" तिघे एकाच मोटरसायकलवर आले???"

"हो..."

"जाताना जायची एन्ट्री करतात का तुमच्याइथे???"

"नाई.. जाताना कसली एन्ट्री??"

"तुला कसं कळलं चोरी करून गेले हे??"

"ती म्हातारी आली की खाली बोंबलत..."

"किती वेळ वर असतील ते???"

"हे एक सात आठ मिनिटं..."

"जाताना खूप वेगात गेले का??"

"तसं फार वेगात जाताच येत नाही आमच्याहितल्या रस्त्यावरून.. "

"का??"

"बारीक रस्ताय.. पोरं खेळ्त असतात..."

"मला एक सांग.. "

"साहेब... हे सगळं.. तुम्ही मला हितं का विचारताय???"

"खोटं बोललास तर ढकलून देता यावं म्हणून..."

"मी खरंच बोलतोय साहेब... पण हे सगळे प्रश्न आधीच विचारलेले आहेत की खात्यानं??"

"तुला एकदाच चौकशीला बोलावता येतं असं तुला वाटतंय का??"

"नाई नाई.. तसं नाई..."

"ठीक आहे.. जा आता टेकडी उतरून.. शेवटचा प्रश्न आहे.. "

"म्हन्जे सोडणार नाही होय मला????"

"तुला सोडायला आमदार आहेस का तू??"

"नाई नाई... जाईन की मी..."

खरे तर सावंतची फाटलेली होती. अंधारात ही टेकडी उतरायची म्हंटल्यावर. कारण साहेब तर सुळ्ळकन गाडी घेऊन निघून जाणार होते..

"शेवटचा प्रश्न... ते तिघे आले, वर गेले आणि परत खाली येऊन निघून गेले... या दरम्यान आजूबाजूला काय काय झालं??? कोणी आलं होतं का बाकीचं??"

"आजूबाजूला?? नाई तर??.. सगळं नेहमीचंच होत..."

"त्या तिघांपैकी कोणी लंगडत होतं का??"

"नाइ नाई.. लंगड... त.. "

"काय झालं??"

"आरं खरंच की...मला आत्ता हे आठवलं... "

"काय???"

"ते तिघं आल्ते ना?? त्याचवेळी लांब रस्त्यावर एका मोटरसायकलवर दोघे येऊन थांबले होते... आणि... त्यातला एक... लंगडा होता.. "

सगळं कामंच झालेलं होतं.

साहेबाने सावंतला तीनशे रुपये दिले.. आणि गाडी घेऊन निघून गेला.. खिशातले तीनशे रुपये सावंतला अंधारात टेकडी उतरताना दिव्यासारखा रस्ता दाखवत होते..

गाडी कुठेतरी मधेच सोडून बोका घरी आला तेव्हा रात्रीचे साडे नऊ वाजलेले होते.. कामगिरी करायला चिक्कार वेळ उपलब्ध होता अजून... अख्खी रात्र..

टोळी पाचजणांचीच होती... आणि तीनही दरोड्यात तीच टोळी होती हे मात्र नक्की झालेलं होतं..

या एका आघाडीवर तरी या क्षणी बोका खात्याच्या पुढे होता.. उद्या सावंतने हीच माहिती खात्याला सांगितली की खाते बोक्याच्या बरोबर येणार होते.. त्यापूर्वीच पुढे जायला हवे हे बोक्याला माहीत होते...

====================================

मुक्या खबरी होता हे मुक्याच्या बायकोलाही माहीत नव्हते..

... आणि ते बोक्याला माहीत आहे हे मुक्याला माहीत नव्हते....

... बोका कोण हेच मुळात त्याला माहीत नव्हते..

त्यामुळेच मुक्या निवांत बारमध्ये एकटाच असताना एक जण समोर येऊन बसला तर त्याला काही विशेष वाटले नाही..

यावेळी गर्दी होतेच... टेबल शेअर करावे लागतेच..

वीस मिनिटे समोरासमोर बसून दोघे आपापले ड्रिंक सिप करत होते.... या अवधीत फार तर दहा वेळा एकमेकांकडे नजर गेली असेल त्यांची....

एकविसाव्या मिनीटाला बोक्याने मुक्याची नजर नाही हे पाहून स्वतःच्याच फोनचा रिंगटोन वाजवला...

.. अतिशय वैतागल्याचे भाव चेहर्‍यावर घेऊन बोक्याने स्वतःचाच फोन उचलला आणि हळू आवाजात म्हणाला..

"शेठ... आप समझते नही क्या बात??? क्या माहौल हे देख रहे है ना?? शहरमे चोरियां हो रही है.. फिर?? नही नही नही... सॉरी... आय अ‍ॅम सॉरी... सोनावोना भूल जाओ अब कुछ महिनोंतक... अं??? क्या बोले???"

"....."

"आप मुझे मरवाओगे बस... रातमे चेकिंग चलता है.. मै सोनेके साथ पकडा गया तो जो जुल्म मैने किया नही उसके लिये अंदर जाऊंगा... नही नही... सॉरी बॉस... "

"....."

"मै फोन रखरहा हूं... मेरेको बातच नही करनी है.. "

".... "

"छे लाख नही और सात लाख नही.. तीस चालीस हजार के लिये ब्लॅक का सोना आपको बेचके जेलमे सडू क्या मै??... नही नही अपना आदमीभी मत भेजिये... मै रखरहा हूं बॉस फोन..."

मुक्याचे डोळे तिसरीकडेच असले तरी दोन्ही कान जिवाचे कान बनून बोक्याचा आवाज ऐकत होते.. हात स्तब्ध झालेले होते... तेवढ्या अवधीत त्याने एक घोटही घेतलेला नव्हता..

आणि हे बोक्याच्या लक्षात आलेले होते...

बोक्याने मान खाली घालून प्यायला सुरुवात केली तेव्हा मुक्याने आपल्याकडे बघून आपला चेहरा वगैरे नीट न्याहाळलेला आहे हेही बोक्याला समजले... आणि अपेक्षेप्रमाणेच मुक्याने एक फोन लावला... हा फोन डिपार्टमेन्टला लावलेला असणार हेही बोक्याला माहीत होतेच...

"अरे किधर है चंदर तू??? कबसे बैठा है यार मै... निकलू क्या मै??? फिर??? दस मिनिटमे नही पहुंचा तो निकल जायेगा मै.. "

दहा मिनिटे! फक्त दहा मिनिटे होती बोक्याजवळ. त्यात मुक्याने सुरुवात केली नाही तर तो स्वतःच करणार होता..

"नमस्ते साहब... "

मुक्याने बोक्याकडे बघत स्मितहास्य करत त्याला विश केले..

"येस???"

"कुछ नही... बुरा न मानना.. मगर... मेरेको आपकी बाते सुनायी दी.... "

बोक्याने चेहरा टेन्शन आल्यासारखा केला....

"अरे घबराओ मत सेठ.. एकही बिरादरी के है.."

रुंद हासत बोक्याने मुक्याच्या हातात हात मिळवला ...

"कुछ काम है तो बताईये... सब सीधा करदेता हूं मै... "

"मी कसा विश्वास ठेवू???"

"तुम्हाला मराठी येतं???"

"मराठीच आहे मी... तो शेठ हिंदी बोलतो..."

"हा हा हा.. मी मुकेश ..."

"मी धुमाळ.. "

बोका दिसतही धुमाळसारखाच होता.. वयही तेवढेच वाटत होते..

"काय करायचंय??? सांगा..."

मुक्याला विश्वासात घेतल्यासारखं दाखवत बोका म्हणाला..

"चौदा लाख.. "

"काय??"

"गोल्ड..."

"मार्केट रेट??"

"मार्केट रेटच चौदा लाख... "

"कितीला देणार ??"

"तुम्हाला माहितीच आहे जोखीम काय असते ती..."

"हे हे...मला सगळं माहितीय सेठ... किंमत बोला तर??"

"साडे बारा.."

"साडे बारा???? व्यवहार तर तीस टक्क्यावर चालतो "

"म्हणजे किती???"

"नऊ ऐंशी मिळतील तुम्हाला .."

"मग विकू कशाला मी??"

"हा हा हा.. बघा.. "

"ओके.. थॅन्क्स.. चला बाय..."

"अरेअरे?????? निघता काय ??"

निघता काय मधील काय हा शब्द ऐकू येईपर्यंत बोका शंभराच्या पाच नोटा टेबलवर ठेवून निघून गेलेला होता..

पुतळ्यासारख्या थिजलेल्या मुक्याला काय करावे समजेना.... हा म्हातारा पकडला गेला तर बक्षीस मिळणार हे नक्की होतं....

मुक्या उठून धावला.... रस्त्यावर आला.. पाहिले तर म्हातारा चांगला ताडताड चालत निघाला होता..

धावून मुक्याने त्याला गाठले..

"ऐ... चालला कुठं????"

बोक्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला विचारलेला हा मुक्याचा शेवटचा प्रश्न होता.. त्यानंतर त्याला स्वतःला तो एका खोलीत असल्याचे समजले... समोर एक वेगळाच तरुण बसून ब्रेड खात होता.. मुक्याला बांधलेले नसले तरी तो सुटू शकणार नाही हे त्याला स्वतःलाही समजत होते... पण अंगात रग... उद्धटासारखे विचारले..

"तू कोण???"

खण्ण्ण्ण

कानसुल बधीर झाले मुक्याचे.... बोकाचा हात इतका वेगात हालला होता की त्याने काही हालचाल केली असे खात्रीलायकरीत्या म्हणताही आले नसते... मुक्या मात्र विव्हळत होता..

"मी बोका... "

मुक्या अक्षरशः भूत पाहिल्यासारखा बोकाकडे बघत होता...ही खोली विचित्र होती.. सर्व भिंती निळ्या गडद होत्या. भिंतींवर काहीही नव्हते... खोलीत काहीही नव्हते..... पंखाही नव्हता.. फरशी निळीच होती.. खोली फार तर आठ बाय दहा असेल.. बोका आणि मुक्या दोघेही मांडी घालून खालीच बसलेले होते... मुक्याचा अजूनही विश्वास बसत नव्हता की समोरचा माणूस बोका आहे.. आणि बोका तर आत्ताही वेषांतर करूनच बसलेला ह्ता.. तरुण दिसत होता इतकेच... उद्या पोलिसांना बोक्याचे वर्णन म्हणून मुक्या सांगणार होता एक काळाकभिन्न बुटका... ज्याच्या चेहर्‍यावर देवीचे असंख्य व्रण आहेत... आणि तो एका निळ्या खोलीत एकटा राहतो..ती खोली कुठे आहे हे मुक्याच्या बापाला माहीत नव्हते...

मुक्याने उठायचा प्रयत्न केल्यावर त्याच्या डाव्या मांडीवर एक जीवघेणी लाथ बसली.. पुन्हा विव्हळत आणि या वेळी कानसुलाऐवजी मांडी धरत तो खाली कोसळला..

"तुला आत घेतलं ना??? मग समजेल भडव्या... "

मुक्याच्या ` या धमकीवर बोका बायकी पद्धतीने तोंडावर हात ठेवून हासला किणकिणत..

.. उद्या मुक्याच्या वर्णनात... म्हणजे त्याने केलेल्या बोक्याच्या वर्णनात आणखी एक अ‍ॅडिशन होणार होती...

बोका असा असा हासतो...

"तुला काय हवंय??"

"हं.. असा लायनीवर येत जा पटकन... "

"बोल.."

"पाच माणसे... हिंदी नीट बोलता येत नाही.. एक पहिलवान... एक बुटकं... एक लंगडं... सोनं... आणि कॅश"

"तू दरोड्यांबद्दल बोलतोयस..."

"होय... आणि आता तू दरोड्यांबद्दल बोलणारेस..."

"अरे बाबा मी ते खात्यालाच नाही का सांगणार???"

"खातं तुला असं निळ्या खोलीत ठेवतं का???"

"इथून पेरकर रोड चौकी किती लांब आहे.."

"तू स्मशानापासून जितका लांब आहेस त्यापेक्षा खूप जास्ती लांब आहे.. माहिती काढायचा प्रयत्न करू नकोस..तुझा बाप आहे मी त्या प्रकारात..."

"मला काही माहीत नाही...."

"कैलासवासी मुकेश याचे प्रेत मिळाले नाही... म्हणून त्याला मृत घोषित करण्यात येत आहे.."

"तू खात्याला हवा आहेस बोका.. ज्या दिवशी सापडशील... कचरा होईल तुझा..."

"ते बघायला तू मात्र नसशील दुर्दैवाने.. "

असे म्हणत बोकाने मुकेशला अजून एक लाथ घातली तसा मात्र मुकेश खवळला... उसळून उभा राहात त्याने बोक्यावर झेप घेतली.. त्याचे दोन्ही हात बोक्याच्या डोक्यात आणि दोन्ही पाय बोक्याच्या पोटात अंदाधुंदी माजवणार हे निश्चीत होतं... पण बोका सावध होता.. तो सरकला आणि मुकेश कंबरेवर आपटला.. बोका पुन्हा तोंडावर हात ठेवून बायकी हासला आणि त्याने उभे राहात मुकेशच्या पाठीत मोजून सात लाथा घातल्या..

दहा मिनिटे

मुक्या दहा मिनिटे विव्हळत होता व नंतर थांबला..

"पाच माणसे... एक पहिलवान... एक बुटकं... एक लंगडं.. सोनं आणि कॅश..."

"तुझ्यायच्ची **..."

"शिव्या अवश्य दे... सज्जनांच्या शिव्या म्हणजे फुले... आता सांग बरं?? पाच माणसे.. एक प.."

"अरे बाबा मला एक नंबर लावूदेत.. तुला सगळे कळेल.. हवे तर स्पीकरवर ठेव फोन.. "

बोकाने स्वतःचा फोन हातात घेऊन मुक्याला नंबर विचारला व तो डायल करून स्पीकरवर आणला आणि आडव्या पडलेल्या मुक्यासमोर ठेवला..

तिकडून आवाज आला... मुक्याने चंदर हवालदाराचा नंबर दिला होता बोक्याला.. बोका हुषार होता.. मुक्या असे काहीतरी करेल हे त्याला माहीतच होते..

"हलो.. मुक्या बोलतोय.. "

"काय रे??.. कुठंयस??? च्यायला मी थांबलोय कृष्णा बारला.... हा कुठला नंबर बे???"

बोकाला समजले की हा चंदर असणार, ज्याला मुक्याने फोन केलेला होता..

बोकाने सरळ फोन स्वतःच्या हातात घेतला.. आणि मुक्याला बोका ही काय चीज आहे ते कळाले..

बोकाने चक्क मुक्याचा आवाज काढलेला होता.. त्याने चंदरला सांगून टाकले की त्याने चंदरची फक्त गंमत केली आणि उगीचच कृष्णा बारला बोलावले.. भडकलेल्या चंदरने शिव्या द्यायला सुरुवात करताच बोक्यान हासत फोन ठेवून दिला... इतका वेळ शारिरीक वेदनांनी विव्हळणारा मुक्या आता मानसिक विव्हळू लागला..

"पाच माणसं.. एक पहिलवान.. एक बु..."

"पेठनाक्याच्या अजिंक्य बारमध्ये हल्ली फार उधळपट्टी चालते.. "

मुक्याने हे वाक्य बोलताच बोका हसून थॅन्क्यू म्हणाला आणि त्याने मुक्याच्या मानेवर दुसरा आघात करून त्याला अर्धा पाऊण तासासाठी पुन्हा बेशुद्ध केले..

रात्रीच्या सव्वा बाराचा टोल पडत होता तेव्हा बोका पहिला टोल पास करून पुढे आलेला होता.. एका अत्यंत साध्या माणसाच्या वेषात तो थोड्याच वेळात अजिंक्य बारला पोचणार होता... आणि ...

====================

"क्या हुवा भाई.. रो क्यूं रहे हो??"

अजिंक्य बारमध्ये आलेला हा एकटाच मध्यमवर्गीय माणूस घोट घशाखाली उतरताच रडायला लागण्याचे कारण कोणालाही समजत नव्हते.. पण तो मन लावून रडत होता.. त्याच्या डोळ्यातील पाणी खळतच नव्हते....

बोक्याची खरी धमाल आता सुरू होत होती......

खुद्द गल्यावर बसलेल्याने येऊन विचारले तरी रडणे थांबेना.. प्रकार असा झाला की आत्तापर्यंत तावातावाने बोलणारे किंवा हास्यविनोद करणारे सगळेच आता शांत होऊन बोक्याकडे बघू लागले.. बोका विदीर्ण करणारे रडत होता... त्याचे रडणे पाहून एक दोघे गलबललेही...

आता शेजारचा एक ग्रूप होता त्यातील एक जण म्हणाला..

"कॅ प्राब्लेमेकॅ.. होआअय??..... कॅहालं रडायला??? आ???"

आता बोलायला हवेच होते..

"पैसा... पैसा... आआआआआआआआआआ"

"कॅलुटलंकॅ कोन?? आ?"

"नशीबच लुटलं माझ... सांगण्यासारखं नाहीये.. तरी सांगतो..."

भले शाब्बास.. उपकारच यांचे... स्वतःहून सांगतायत हे..

"मिसेस... ती जॉब करते.. काळ्यांचं .. म्हणजे तिच्या साहेबाचं आणि तिचं... ते.. दोघांचं.. प्रेम झालं... पळून गेली... चिठ्ठी लिहून.. पैसेवाला आहे ना तो.. आआआआअ... अह अह... मी सामान्य.. नाहीतर खून केला असता... आता पाचगणीला गेलेत... टोपच्या बंगल्यात असते तर जाऊन धरूनच आणली असती तिला... आआआआ.. काय पैसा... काय पैसा.. अन ती म्हातारी कामवाली... ती घरात राहते त्यांच्या.. चोवीस तास.. ती काय म्हणते मला.. तुझ्यात धमक नाही... म्हणून इथे आलीय ती.. साला त्या कामवालीचा काय रुबाब बघा साला.. वय सत्तर... पण गळ्यात सोनं... कानात सोनं... घरात तर काय असेल मग... आणि मी??? डीएसपी परवडत नाही म्हणून गावठी पितो किती वेळा.. बाईची जातच असली.... काय नाही केलं तिच्या सुखासाठी मी... आआआ अह अह "

बारमधील शुद्धीत असलेले सर्वजण गालातल्या गालात हासत होते. शुद्धीत नसलेले आपल्यापेक्षा कोण बेशुद्ध ओरडतोय हे कसेबसे बघत होते.. गल्ल्यावर बसलेला चोरून हासत होता..

फक्त एक टेबल.. ... फक्त एक टेबल बिल मागवत होतं... टोप, बंगला आणि काळे.. इतके त्यांना पुरेसे होते तो बंगला शोधून काढायला..

पाच माणसं... एक पहिलवान... एक बुटकं... एक लंगडं...

... बिल भरून दोन मोटरसायकलींवरून सुसाट निघाले तेव्हा त्यांना माहीत नव्हतं की मगाचचा रडणारा मध्यमवर्गीयही आत्ता बिल भरून आपल्यामागून यायला निघालेला आहे....

=================================================================

कुठूनतरी लांबून ट्रक्सचा घर्र आवाज... ब्रेक्सचे सपासप आवाज.. भयानक गार वारा... एक शेकोटी... सहा माणसं.. खाली गवत... दगड... वर काळं कुळकुळीत आणि चांदण्याने भरलेले आकाश.... मगाचचा रडणारा निवांत स्मोक करतोय आणि... बाकीचे पाचही जण आपला किमान एकेक अवयव कुरवाळत कण्हत आहेत... नुकतेच शुद्धीवर येऊन...

उठता येतही नाहीये आणि उठावेसे वाटतही नाहीये..

... हायवेवर कोणत्यातरी स्पॉटला बोका निर्धास्तपणे त्यांच्या पुढे निघून गेला.. इतका वेगात गेला की हाच तो मगाचचा रडणारा हे त्यांना समजले नाही... पुन्हा हेल्मेट घातलेले होतेच... वर एक स्वेटरही होता जो बारमध्ये त्याने घातलेला नव्हता.. आणि इतका भीषण रडणारा माणूस अचानक रडणं थांबवून आपल्यापुढे निघून जाईल हे त्यांना वाटणे शक्य नव्हते त्या अवस्थेत...

... बोका एका वळणावर काठी घेऊन थांबला होता.. टोपच्या फाट्याला याने एक मोटरसायकल उपडी केली.. दुसरी मोटरसायकल थांबली आणि दोघे बोकावर धावून आले.. तोवर पहिल्या तिघांच्या टाळक्यात काठ्या घालून बोकाने त्यांना बेशुद्ध पाडलेले होते.. दुसरे जे आले ते बोकाच्या जवळ पोचेपर्यंतच गळाठले होते... हाच तो रडणारा हे त्यांना आठवले त्याचक्षणी त्यांच्याही टाळक्यात काठ्या बसलेल्या होत्या... पहिलवानाला दोन काठ्या हाणाव्या लागल्या..

एकेकाला कसेबसे ओढत बोक्याने झाडीत आणून ठेवले होते.. खरे तर बोकाही दमला होता आता.. पहिलवानाला ओढताना तर त्याला स्वतःलाच कोणीतरीओढून घरी न्यावे असे वाटत होते.. पण पर्याय नव्हता.. हायवेपासून साधारण ऐंशी एक मीटर्सवर सगळे झाडीत गुप्त झाल्यावर बोक्याने एक अगदी बारीकशी शेकोटी पेटवली आणि मगाचची राहिलेली डी एस पी ड्राय घ्यायला सुरुवात केली...

सगळे शुद्धीत आले तेव्हा बोका त्यांच्यातच बसून त्यांच्याकडे लक्षही न देता स्मोक करत होता.. ते कण्हत होते..

बुटकं चवताळलं...

"ऐ.. कोन तू???"

"वडील.. "

"आ???"

"वडील तुम्हा सगळ्यांचे... "

"तुझ्यायला तुझ्या... "

"विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याव्यतिरिक्त जर तोंड उघडलं तर दात जमीनीवर पडलेले पाहायला मिळतील.."

पहिलवान उठू पाहात होता.. बोकाने बसल्या जागेवरून त्याच्या थोबाडात पुन्हा एक काठीचा तडाखा दिला.. पहिलवान सपाट झालेला पाहून बाकीचे हादरले..

"कोन तू... ??? का मारतोयस???"

"सोनं कुठंय???"

"सोन??? कसलं सोनं???"

विचारणारा आक्रोशला.. त्याची नडगी रक्ताळलेली होती..

प्रसंगी बोका क्रूर व्हायचा..

प्रतिकार करण्यात अर्थ नव्हता.... बुटकं नरमलं...

"सोनं.... ट्रकमध्ये ठेवलंय.. माझा बंद पडलेला ट्रक आहे एक..."

"हा ट्रक कुठे असतो????"

"इस्लामपूर... "

"इस्लामपुरात एकच ट्रक आहे का??"

"अब्दुल गल्ली..."

"रंग..."

"करडा.."

"मॉडेल..??"

"४०७"

"कुठे लपवलंय???"

"अ‍ॅक्सलच्या वर एक खोकं केलंय तयार लाकडी.. "

"कोणालाच कळलं नाही???"

"ट्रकबाहेर सगळा कचरा आहे... ती कचराकुंडी आहे.."

"छान.. आणि तिथे नसलं तर???"

"तिथेच आहे..."

"पुरावा काय??"

"अरे जाऊन बघ की..????"

"असं करू.... तू खोटं बोलतोयस असं क्षणभर गृहीत धरू... आणि असं समजू की तू खोट बोललास हे मला ट्रकजवळ गेल्यावर समजलं... त्यामुळे मला इतका राग आला की मला तुझी नडगी फोडावीशी वाटली... तर ती आत्ताच फोडून ठेवू.. म्हणजे परत आपल्याला भेटायला नको... काय????"

"ए.. अरे यडाय का काय तू??? कुठे आणलयंस आम्हाला??"

तेवढ्यात पहिलवान कण्हला... बोक्याने पुन्हा त्या पहिलवानाला एक लाथ घातली... पुन्हा निपचीत झाला तो..

"किती सोनंय??? "

"अं?? असेल वीस बावीस लाखाचं..."

बोका चमकला.. कोणतातरी दरोडा नोंदवलाच गेलेला नाही की काय????

"एवढंच???"

"एवढंच म्हणजे??? आहे तेवढं आहे..."

"पण दरोडे तर सहा घातलेत ना???"

"काय याड लागलंय काय??? दरोडे चार..."

"कुठले कुठले?? एक म्हातारं जोडपं... एक बंगला.. एक गावाबाहेरचं दुमजली घर... आणि???"

"आणि हे आत्ता आपण बसलोवतो ते हॉटेल...."

अरे तिच्यायला... तिथेच दरोडा घालून पुन्हा तिथेच जाता होय प्यायला??"

बोक्याने उगीचच बुटक्याचे थोबाड फोडले... बुटका चवताळला असला तरी जखमी असल्याने निपचीत होता..

"बाळा... मोबाईल बंद करतो हां तुझा???.."

बोक्याने सगळ्यांचे मोबाईल बंद करून स्वतःच्या खिशात टाकले.. असलेले बरे जवळ...

"चला... मग निघू का मी???"

मित्राला विचारावं तसं विचारलं बोक्याने...

"ए... अरे... आमचं काय????"

"तुम्हाला अजून पाच पाच लाथा बसतील ना??? काळजी काय करतो???"

खरंच बोक्याने लाथा घातल्या प्रत्येकाला.. प्रत्येकजण बोंब ठोकत होता.. एकेकाचे टाळके फुटलेले होते..

"खात्याचे लोक येतील थोड्या वेळाने.. काय??? त्यांना म्हणाव... बोक्याने मारलं... काय सांगाल ??"

आपल्यासमोर साक्षात बोका उभा आहे हे पाहून सगळे थिजले..

भन्नाट वार्‍यात बोका इस्लामपूरला निघाला तेव्हा टोपहून दोन हवालदार तुफान वेगाने हायवेकडे निघाले होते... दरोड्यातील टोळी पकडायला..

================================

-'बेफिकीर'!

गुलमोहर: